Friday, August 15, 2025

आ. भास्कर जाधव यांचे ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ!

 आ. भास्कर जाधव यांचे ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ!


नुकत्याच एका सभेमध्ये भास्कर जाधव यांनी खोती ह्या विषयावरून बहुजन समाजाला ब्राह्मण समाजा पासून तोडण्याचा प्रयत्न केला.


१९४८ साली लागू झालेला महाराष्ट्र टेनॅन्सी ऍक्ट (कुळ कायदा ) आणि १९६१ साली लागू झालेला land reforms act 1961 नंतर खोती समाप्त झाली. तरी सुद्धा ब्राह्मण समाजाने आपल्या दातृत्वाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर, गावा गावात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था काढल्या, सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत आपले स्थान सर्व समाजात टिकवून ठेवले आहे. सर्व हिंदू धार्मियांचा हिंदुत्वावर असलेला विश्वास आणि देवा धर्मावर असलेली श्रद्धा त्यांना ब्राह्मण समाजापासून तोडू शकत नाही. सर्वांच्या जन्मापासून ते मृत्यू पश्चातही या मंडळींना ब्राह्मण समाजाची सेवा लागते आणि ती ते आनंदाने देत असतात. 


अशा परिस्थिती मध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये मुसाफिरी करून सुद्धा भास्कर जाधवाना, त्यांना पाहिजे ती किंमत मिळत नाही तसेच विरोधी पक्षाच्या नेते पदाची खिरापत सुद्धा मिळाली नाही हे बघितल्यामुळे त्यांचा मानसिक तोल ढळळलेला दिसतो. त्यामुळे कायम चर्चेत राहण्यासाठी आणि बहुजनांच्या भावना चाळवून त्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी, इतरांप्रमाणे यांनीही ब्राह्मण समाजाला पंचिंग बॅग म्हणून उपयोगी करण्याचे ठरवलेले दिसते.


पण मला एक कळत नाही की ब्राह्मण समाज भारतात फक्त ३% असताना आणि तो कोकणासारख्या डोंगराळ आड प्रदेशात फक्त ०.०५% सुद्धा नसताना त्यांच्या सारख्या निरूपद्रवी समाजाला टार्गेट करण्यात भास्कर जाधवाना काय आसुरी आनंद मिळत आहे नाही?


खरे म्हणजे दुसऱ्याची रेष छोटी करण्यासाठी ती पुसण्या ऐवजी स्वतःची रेष मोठी करायला हवी हे संस्कार त्यांना मिळाले आहेत किंवा नाही हेच समजतं नाही.

त्यांच्यासारख्या बोल घेवड्या माणसाने आपली शक्ती ब्राह्मणासारख्या निरूपद्रवी समाजाला धोपटण्यात घालवण्या पेक्षा कोकण विभागाचे प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर सर्वच कोकण वासिय त्यांचे उपकार विसरणार नाहीत. पण जणू रोगच जडला आहे ब्राह्मणांना टार्गेट करण्याचा तर चांगल्या गोष्टी हातून कशा घडतील? 


लेखक अज्ञात 


मांसाहार बंदी!!

 मांसाहार बंदी!!

महाराष्ट्रातील काही नगरपालिकांनी १५ ऑगस्टच्या दिवशी मांसाहार बंदी केली असून मटण आणि चिकन विकणाऱ्या दुकानाना ते विकण्याचे बंदी करणारे आदेश दिले आहेत. जास्त खोलात गेले असता कळते की गोकुळ अष्टमी आणि पर्युषणाचा पाहिला दिवस असल्यामुळे ही बंदी लागू केली आहे.


मीं पूर्वी दुबईत रहात असताना आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवावे लागे. दुबई हे जाहीररित्या मुस्लिम धर्मीय राज्य असल्यामुळे, सरकारी फतव्यामुळे, रमझान महिन्यामध्ये तेथे दिवसा खाद्य पदार्थांची रेस्टॉरंट बंद असायची. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की आपले काय होणार? परंतु तेथील राजाच्या लक्षात आले की दुबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुसलमान लोकांनी रमझान पाळायला हवा म्हणजे बाकीच्यानी तो पाळायलांच असे नाही, हा उद्दात विचार करून त्यांनी अमुस्लिम बांधवांसाठी दिवसासुद्धा ही रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचे किंवा त्यांना होम डिलिव्हरी देण्याचे आदेश दिले आणि आमचा प्रश्न सुटला.


दुबई सारख्या मुस्लिम देशाला हे कळावे आणि आम्ही विविध जात, पंथ, धर्म, संस्कृती असलेल्या एकसंघ राज्यातील लोकांना आणि त्यांच्या प्रतिनिधीना हे कळू नये की आपली आराधना, आपला धर्म, आपले संस्कार आपल्याजवळ ठेवायला हवेत आणि ते आपण दुसऱ्यावर लादु शकत नाहीत. तुम्ही जैन आहात म्हणून महावीर जयंती किंवा पर्युषण दिवसात कोणी मांसाहार करू नये अशी अपेक्षा कशी बाळगू शकता? तुमचा धर्म तुम्ही अवश्य पाळा पण दुसऱ्यावर थोपण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. 


मीं स्वतः पूर्ण शाकाहारी असलो तरी सुद्धा माझे हेच मत आहे.


माधव भोळे 

Tuesday, August 12, 2025

वाटाघाटी, कला आणि तंत्र:

वाटाघाटी, कला आणि तंत्र:


आपण अनेक वेळा एक वाक्य ऐकले आहे "युद्धात जिंकले पण तहात हरले". 


तह म्हणजे काय तर दोन्ही बाजूनी एका ठराविक उदष्टानी एकत्र येऊन वाटाघाटी करून समायिक करार किंवा समझोता करणे म्हणजे तह.


आयुष्यात कोणताही व्यवहार करताना वाटाघाटी करणे अपरिहार्य असते. मग ते एखादे कंत्राट देण्यासाठी पुरवठादाराबरोबर असो की एखादा भूखंड विकत घेताना असो. आपण खरेदीदार असो किंवा आपण विक्रेता असो, वाटाघाटी ओघाने आल्याचं. ज्या ठिकाणी निश्चित किंमत ठरलेली नसते किंवा जे विकण्याच्या अथवा विकत घेण्याच्या सर्व अटी आणि नियम निश्चित नसतात अशा सर्व ठिकाणी वाटाघाटी होणे आवश्यक असते. कित्येक वेळा असे अटी नियम निश्चित असल्या तरी सुद्धा वाटाघाटी होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त कान आणि डोळे उघडे हवेत. 


वाटाघाटी एक कला आहे आणि तंत्र सुद्धा आहे. कला या साठी की त्यात मानसिक युक्ती खेळ सुद्धा आहे आणि तंत्र आहे कारण त्यामध्ये तांत्रिक बाबी सुद्धा आहेत. दबावतंत्र आहे आणि लवचिकता सुद्धा. 


एखाद्या वाटाघाटी कशा कराव्यात याची हमखास लागू पडेल अशी तंत्रशुद्ध पद्धत जरी नसली तरी ढोबळ मानाने प्रचलित प्रकिया नक्कीच आहे. यातील काही गोष्टी पुढे मांडत आहे पण ह्या मर्यादित नाहीत. काळ, स्थान, परिस्थिती मुळे ह्यामध्ये बदल होऊ शकतात.


प्रभावी वाटाघाटी:

1. तयारी आणि नियोजन:

तुमची ध्येये निश्चित करा: तुम्हांला काय अपेक्षित आहे? तुमचे इच्छित परिणाम आणि तुम्ही काय स्वीकारण्यास तयार आहात ते ओळखा.


दुसऱ्या पक्षाचे संशोधन करा: त्यांच्या गरजा, स्वारस्ये आणि संभाव्य कमकुवतपणा समजून घ्या. 


तुमची मर्यादा नक्की करा: या व्यवहारापासून तुमच्या कमीत कमी अपेक्षा आणि तुम्ही काय स्वीकारण्यास इच्छुक आहात ते ठरवा. 


तुमचे युक्तिवाद तयार करा: तुमच्या मागण्या किंवा अपेक्षांचे समर्थन करण्यासाठी व्यवहाराची तथ्ये आणि आकडेवारी तयार ठेवा. तुम्ही हे का अपेक्षित करता हे समजावून सांगा. वेळ पडल्यास ऑडिओ विस्युअल प्रेसेंटेशन चा वापर करा. 


2. वाटाघाटी दरम्यान:

खंबीर पण आदरयुक्त व्हा: तुमच्या गरजा स्पष्टपणे सांगा.

 

ऐका: दुसरा पक्ष काय म्हणत आहे याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या प्रश्नांकडे किंवा विषयांकडे सुद्धा लक्ष द्या. शंका वाटल्यास स्पष्टीकरण मागा. काय समजले आहे त्याची उजळणी करा.


सामान्य आधार शोधा: दोन्ही पक्षांच्या विषयांमधील समान भूमिका असलेली क्षेत्रे ओळखा आणि तेथून सुरवात करा.


लवचिक व्हा: ज्या ठिकाणी मुद्यामध्ये थोडीफार तफावत आहे त्या ठीकाणी तडजोड करण्यास आणि सर्जनशील उपाय शोधण्यास तयार व्हा. 

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "If you want to eat a Cake, you will have to give Icing to others " म्हणजे जर तुम्हांला केक खायचा असेल तर त्यावरील क्रीम तुम्हांला दुसऱ्याला द्यायला लागू शकते.


व्यक्तिमत्त्वांवर नव्हे तर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा: कित्येक वेळा समोरची व्यक्ती बघून चर्चा केली जाते. समोरच्या व्यक्तीच्या दडपणाखाली किंवा त्या व्यक्तीबद्धल असलेला पूर्वग्रह लक्षात ठेवून चर्चा केली जाते ते बरोबर नाही. चर्चेत तथ्य आणि समस्या यावर लक्ष केंद्रित करा. 


दुसऱ्या बाजूचा दृष्टीकोन विचारात घ्या: त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या पडताळून पहा आणि गरज असेल तर त्या ठिकाणी लवचिकता दाखवा. 


धीर धरा: वाटाघाटीला वेळ लागू शकतो, त्यामुळे प्रक्रियेत घाई करू नका. 


3. प्रमुख वाटाघाटी धोरणे:

"निघून जाणे" तंत्र:

ज्या वेळी वाटाघाटी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातं आहे असे लक्षात येईल तेव्हा, वाटाघाटीमधून माघार घ्या. कधी निघून जायचे हे जाणून घेतल्याने तुमची स्थिती मजबूत होऊ शकते आणि तुम्ही हताश नसल्याचे दाखवून देऊ शकता.


पुढाकार घ्या:

उच्च किंवा कमी ऑफरसह प्रारंभ केल्याने वाटाघाटी श्रेणीबद्दल इतर पक्षाच्या समजावर प्रभाव पडू शकतो. कधी कधी अगदी या विरुद्ध प्रथम दुसऱ्याची ऑफर ऐका आणि ती आपल्या अपेक्षेला उतरत असेल तर त्यात सुधारणा होऊ शकते का ते बघा.


संबंध तयार करणे:

इतर पक्षाशी सकारात्मक संबंध प्रस्थापित केल्याने ते तुमच्या प्रस्तावांना अधिक ग्रहणक्षम बनवू शकतात. कित्येकवेळा ह्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत तरी संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरूच ठेवा कारण ह्या नाही तर दुसऱ्या कामाच्या वेळी ते प्रथम आपल्याशी संपर्क साधतील.


सर्जनशीलतेला प्राधान्य द्या:

विचारमंथन आणि विविध पर्यायांचा शोध घेतल्यास नाविन्यपूर्ण उपाय मिळू शकतात. 


सवलती देणे:

छोट्या सवलती देण्यास तयार असण्याने तुमची लवचिकता आणि तडजोड करण्याची इच्छा दिसून येते.


4. वाटाघाटीनंतर:

कराराची पुष्टी करा: दोन्ही पक्षांनी कराराच्या अटी समजून घेतल्या आहेत आणि त्यावर सहमत आहात याची खात्री करा. 

कराराची अंमलबजावणी करा: मान्य केलेल्या अटी कृतीत आणा.


कधी वेळ मिळाला तर "What they don't teach you at Harvard" हे Mark H. McCormack यांचे पुस्तक वाचा.


माधव भोळे 




Wednesday, August 6, 2025

पहिले पाऊल!

पहिले पाऊल!

देवरुखे उद्योजक ह्या व्हाट्सअप ग्रुपचे प्रवर्तकांचे मार्फत काल दिनांक ३.८.२०२५ रोजी वेस्ट एंड हॉटेल, मारिन लाईन्स ह्या ठिकाणी, देवरुखे बिझिनेस फोरम ह्या ग्रुपने, एक मेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ह्या उक्तीला न्याय देत आजची बिझिनेस फोरम आयोजित केली होती. अतिशय सुरेख आयोजन, वेळेचे काटेकोर नियोजन, उत्कृष्ट निवेदन, जेष्ठ मंडळीचे मार्गदर्शन, तरुण आणि अनुभवी उद्योजक आणि व्यावसायिक यांची उपस्थिती आणि रुचकरं भोजन, ह्या कार्यक्रमाने ह्या सर्वच  आघाड्यांवर बाजी मारली आहे.

आधी केले मग सांगितले ह्या उक्ती प्रमाणे अनिल नवरंगे सर, चंद्रशेखर भडसावळे सर, डॉ पुराणिक, दिवाकर निमकर, संदीप भाटलेकर, नितीन कराडकर, समीर काळे सर इत्यादी मंडळींनी आपले अनुभव दिल खुलासपणे उपस्थितांसमोर मांडले.

अमेय पांगरकर यांच्या  AI वरील भाषणातून AI म्हणजे काही जगावेगळे भूत आहे आणि ते सर्वांनां नाकाम करणार ही  माझ्या सारख्या सर्व सामान्य व्यक्तीच्या मनात असलेली भीती काढून टाकण्याचा रास्त प्रयत्न केला. विशेषत: त्यांनी सांगितले की ज्या कामाला कल्पकता लागते, जे काम आधी कुठेही कोणत्याही मानवाने केलेले नाही ते काम AI ने करण्याचा प्रयत्न करू नका. कारण AI हा एक शिक्षित जादूचा दिवा आहे. जेव्हडे त्याला शिकवलेले असते तेव्हडेच काम तो जास्तीतजास्त योग्य प्रमाणात आणि कमीतकमी वेळात करतो.

Garbage in garbage out ह्या कॉम्पुटर च्या नियमानुसार जर तुम्ही आवश्यक असलेली योग्य माहिती, योग्य पद्धतीने दिलीत तर AI तुम्हांला त्याचे चांगले परिणाम देतो, या उलट चुकीची माहिती दिलीत तर अनपेक्षित उत्तर देतो हे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी बुद्धिमत्तेला पर्याय होऊ शकणार नाही हे त्रिवार सत्य त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांच्या दोन्ही पुस्तकांच्या भेटी बद्दल त्यांचे आणि आयोजकांचे आभार.

नितीन कराडकर सरांनी एका वाक्यात जीवनाचे सर सांगितले "मृत्यू, टॅक्स आणि परिवर्तन" ह्या तीन गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. त्यांना घाबरून जाऊ नका,  तर त्यांना सामोरे जायला शिका.
सरकारी यंत्रणा, GST, यश अपयश हे अडथळे येतच राहणार पण त्याला खंबीर पणे तोंड द्या आणि ठाम उभे रहा.

नवरंगे सर आणि चंद्रशेखर भडसावळे यांनी पर्यावरण संवर्धन, कार्बन क्रेडिट, वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषयाला हात घालून, माणसाच्या अजून पुढील शंभर पिढ्या सुसहाय्य जगाव्यात ह्या करिता काय उपाय योजना करायला हव्यात ह्याबद्दल सुद्धा चांगले मार्गदर्शन केले.

एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला. छोटे उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील या साठी काय करता येईल या बद्दल सलील कारुळकर यांनी सूचना केली, तिचा विचार करायला हरकत नाही.

आज आपल्या समाजात सुद्धा परिवर्तन होत आहे हे बघून आनंद झाला. आपल्या आणि पुढच्या पिढीला सरस्वती पूजका बरोबरच लक्ष्मी पूजक होण्यासाठी त्यांनी चक्कीवरं ओव्या गायला सुरवात केली आहे. जर आत दाणे टाकले तर आटा नक्कीच बाहेर येणार.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हे सर्वांच्या लक्षात हळू हळू येत आहे.

भूषण शितूत, दिनेश निमकर, मंदार कानडे, योगेश वीरकर, समीर निमकर, प्रशांत जोशी, श्रीमती शिल्पा भोळे, निशिगंध भडसावळे आणि सर्व आयोजन टीम ला मनःपूर्वक धन्यवाद.

हे पहिले पाऊल आहे. अशी अनेक पावले चालू तेव्हा कोठे हिमालय सर होणार आहे.

सर्व जेष्ठाना नमस्कार, आणि आपले असेच मार्गदर्शन सर्वांनां लाभो हीच प्रार्थना.

माधव भोळे

पण लक्षात कोण घेतो!!

 पण लक्षात कोण घेतो!!


काल देवरुखे बिझिनेस फोरम च्या कॉन्फरन्स मध्ये एक गोष्ट श्री अनिल नवरंगे सर आणि चंद्रशेखर भडसावळे सर यांनी एक विषय मांडला, तो म्हणजे व्यवसाय करताना पर्यावरणाचा आणि सामाजिक भानचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसाय म्हटला की त्या मध्ये पाणी, ऊर्जा, कच्चा माल आणि त्या पासून प्रक्रिया होऊन तयार होणारा माल या मध्ये जरुरी पेक्षा जास्त ऊर्जा वापरणे, तयार होणारी हानिकारक केमिकलं किंवा गॅसेस वातावरणात सोडणे, प्रक्रिया झाल्यानंतर निरूपयोगी वस्तूंच्या कचऱ्याची नीट व्यवस्था न लावणे यासारख्या कृती निश्चितच वातावरणाला हानी पोहोचवतात.


कॉम्पुटर किंवा AI च्या बाबतीत जर बघितले तर निरूपयोगी कॉम्पुटर किंवा त्याचे स्पेयर पार्टस ज्याला e waste किंवा इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणतात त्याची नीट व्यवस्था लावणे आवश्यक आहे. त्यात वापरले जाणारे प्लास्टिक, सिलिकॉन तसेच अन्य धातू मटेरियल वातावरणाला घातक आहे. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.


त्याच बरोबर एक महत्वाचा मुद्धा म्हणजे कॉम्पुटरचेजे सर्व्हर आणि डेटा सेंटर असतात, ते चालायला प्रचंड वीज लागते आणि त्याच्या वापरामुळे खूप उष्णता निर्माण होते. जेव्हडी जास्त कॉम्पुटीशन तेव्हडा जास्त वीज वापर आणि तेव्हडी जास्त ऊष्णता निर्माण होते. त्या साठी जरी अपारंपरिक वीज निर्मितीचा वापर केला तरी उष्णता निर्मितीचा मुद्धा राहतोच आणि त्यासाठी वेगवेगळे कुलन्ट ( थंड करणारे पदार्थ वगैरे ) वापरले जातात. 


AI च्या बाबतीत म्हणाल तर एका साध्या प्रश्नासाठी कॉम्पुटरला शेकडो विकल्प बनवून त्यातून योग्य तो परिणाम काढून त्याला मूळ प्रश्नाशी ताडून ते उत्तर आपणांस दिले जाते. अर्थात यासाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते आणि त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होते. 


अर्थातच ह्या जास्त उष्णतेचा परिणाम पर्यावर्णावर होऊन ग्लोबल वॉर्निंग, समुद्राची लेव्हल वर येणे, अनियमित पाऊस पडणे या सारखे दुष्परिण तयार होतात. ज्याचे परिणाम आपले शेतकरी भोगत असतात.


जसे साधारण पणे १०,००० टीश्यू पेपर बनवायला एक झाड कापले जाते तसेच AI चा एक प्रश्न सोडवण्यासाठी चॅट जिपिटीला ०.३ वॉट hours लागतात. असे हजारो प्रश्न विचारले तर किती विज वाया जाईल आणि किती उष्णता निर्माण होईल याचा तुम्हीच अंदाज लावा. 


मेटा ( फेसबुक ) ह्या एकाच कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनीकडे एकाच ठिकाणी २० डेटा सेंटर्स आणि सर्वर असून ४.८ कोटी वर्गफूट एव्हडया जागेवर असून त्याची वीज गरज १४,९७५ गिगा वॉट hours एव्हडी आहे. आणि एक गिगा वॉट hours ७,००,००० घरांना वीज पुरवू शकते. म्हणजे कल्पना करा की एक फेसबुक किंवा इन्स्टाग्राम चा व्हिडीओ किती वीज फुकट घालवत असेल.


हे सर्व्हर आणि डेटा सेंटर थंड ठेवण्यासाठी चीनने आणखी एक नामी युक्ती शोधून काढली ती म्हणजे समूद्राखाली सर्वर आणि डेटा सेंटर ठेवायची म्हणजे तिची उष्णता समुद्राच्या पाण्यात सोडली जाईल आणि ते थंड राहतील. कल्पना जरी वर वर नामी वाटली तरी ते संपूर्ण जगाच्या समुद्राचे तपमान वाढवणार हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे त्यांचा देश थंड राहील आणि उष्णता समुद्रात सोडली जाईल आणि जगात सगळीकडे पसरेल.


याचा अर्थ असा नव्हे की कॉम्पुटर, फेसबुक, इंस्टाग्राम वापरूच नये पण त्यातील चांगल्या गोष्टींचा आग्रह धरा. योग्य तोच वापर करा. 


अमेरिका सारख्या देशात कंझ्यूमरिझम च्या नावाखाली हजारो टन च्या टन tissue पेपर वापरला जातो, लाखो टन प्लास्टिक वापरले जाते. शेकडो टन ई वेस्ट तयार होत असते आणि ह्या सर्वांचा परिणाम संबंध जग भोगत आहे. 


पॅरिस येथील ग्लोबल वार्मिंग परिषदे मध्ये ठराव केल्या प्रमाणे पृथ्वीचे तपमान इंडस्ट्रीयल रिवोलूशन च्या पूर्वीच्या तपमाना पेक्षा १.५ डिग्री पेक्षा जास्त वाढता कामां नये या साठी जास्तीतजास्त झाडें लावणे आणि पर्यावर्णन पूरक काम करणे या साठी प्रत्येक देशाने आपले आर्थिक योगदान देणे आवश्यक असून तसें करायला अमेरिकेने स्पष्ट शब्दात संमती दिलेली नाही. जर पृथ्वीचे तपमान अजून १.५ डिग्री सेल्शियस वाढले तर अजून भयंकर परिणाम भोगावे लागतील असे तज्ञानचे म्हणणे आहे. म्हणजे पृथ्वीचे सर्व रिसॉर्सेस ह्यांनी जास्तीतजास्त वापरायचे आणि त्यांची उष्टी खरकटी बाकीच्या देशानी साफ करायची हे त्यांचे मनसुबे आहेत.


असो आपण आपल्या बाजूनी आपले कर्तव्य करायला हवे. कोणतेही काम करताना पर्यवरणाचा विचार करायलाच हवा. 


माधव भोळे 


विश्वसाचा पाया.

 विश्वसाचा पाया.


आपण नेहमी म्हणतो की अन्य भारतीय व्यवसायात आपआपल्या ज्ञातीमध्ये काम करतात. त्यांच्या बहीण भावाना ते मदत करतात आणि त्यामुळे त्यांचे व्यवसाय वाढतात.


ही ह्या गोष्टीची एक बाजू आहे. दुसरी बाजू आहे विश्वास. सर्वसाधारणपणे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्या लोकांमध्ये ते व्यवसायाची काही एथीक्स पाळतात. ती आपण पाळायला शिकले पाहिजे.

१. Never over commit.: जर आपल्याला एखादी गोष्ट जमणार नसेल तर आधीच सांगा. 

उदा. एका ज्ञाती संस्थेने त्यांच्या ज्ञातीतील एका छोट्या कॅटेररला एका समारंभचे काम दिले होते. थोडी पैशात बचत होईल आणि ज्ञातीबांधवाला काम मिळेल म्हणून. पण समारंभाच्या आदल्या दिवशी त्या व्यक्तीला विचारले तर तिने संगितले की मला जमणार नाही. आता आयत्यावेळी दुसरा कॅटररं कुठून आणणार? आली का पंचाईत. म्हणजेच तुम्ही काम घेतल्यानंतर भले तोटा होवो अथवा फायदा हो, तुम्ही काम करणारच ही खात्री ज्यावेळी तुम्ही ३ / ४ कामातून दाखवून द्याल त्याच वेळी तुम्हांला लोक उभे करतील. कारण सांगून प्रश्न सुटणार नाहीत.

२. तुमच्या व्यवसाय किंवा कामावर तुमची १००% पकड. असली पाहिजे.

एकदा एका ज्ञातीच्या फोटोग्राफरला त्याच ज्ञातीच्या व्यक्तींनी एका विवाह सोहोळ्याचे फोटोग्राफीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले होते. त्या व्यक्तीने सर्व फोटो काढले. पण प्रत्यक्षात काही तांत्रिक कारणामुळे फोटो आलेच नाहीत. मग ज्याने काम दिले त्याला लग्न घरातून खूप शिव्या पडल्या. कारण ही चूक पुढे सुधारली जाऊ शकते पण पाठच्या विवाहाचे फोटो परत मिळणार नाहीत ना?


३. आपण देत असलेल्या मालाची खात्री करून मग द्या. ( quality control ).

गेले काही वर्ष माझे मित्र मोठया प्रमाणात आंबा व्यवसाय करतात आणि ते सांगतात की मीं बाहेर गावी आंबा पाठवतो. मीं या आधी कधी बाहेरून आंबा विकत घेतला नाही परंतु या वर्षी माझ्या गावी आंबा आला नव्हता म्हणून त्या मित्राला सांगितले की तू एक डझन आंबे मला पाठव. पसंत पडले तर आणखी घेईन. त्याला मीं १५०० डझन ची ऑर्डर कॅनडा मध्ये सुद्धा देणार होतो. त्याने अतिशय सुबक अशा बॉक्स मधून पॅक करून आंबे पाठवले. आंबे आल्यावर उघडले तर त्यातील आंबे दबले गेले होते आणि त्यातील ४ आंबे कुसले होते. त्याला लगेच फोटो पाठवला. त्यानंतर २ दिवसात जवळजवळ ९ आंबे कुसले. आता सांगा एक डझन पैकी ९ आंबे कुसले आणि ३ आंबे बाठीपाशी काळे पडले होते तर कोण ह्याला कॅनडाची ऑर्डर देईल. पण माणूस मनातून उतरला. फेसबुकवर जोरदार मार्केटिंग करत असतो पण प्रत्यक्षात मालाची ग्यारंटी नाही. 


असो अशाच काही गोष्टी तुम्हांला आवडल्या तर लिहीत जाईन.


माधव भोळे 

Friday, August 1, 2025

कली युगात काय चाललंय काय?

 कली युगात काय चाललंय काय?


नुकतेच एक बातमी वाचली. कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्यामधील धर्मस्थळ ह्या धार्मिक स्थळाची गोष्ट. ह्या ठिकाणचे मंदिर हे मंजुनाथ ह्या शंकर देवाचे मंदिर असून तेथे मधवा वैष्णव पुजारी असून हेगडे नावाच्या अतिशय श्रीमंत अशा जैन कुटुंबियांचे ताब्यात कारभारासाठी आहे.


गेले ८०० वर्ष ह्या ठिकाणी धार्मिक पवित्र कामे होत असून तेथे देश विदेशातून लाखो भक्तगण येतात आणि त्या देवस्थानाला करोडो रुपयांचे उत्पन्न आहे. अनेक भक्तांनी देवस्थानाकडे अनेक जमिनी दान केल्या आहेत. त्यांचे व्यवस्थापन ह्याच कुटुंबियांकडे आहे.


त्या देवस्थानामध्ये १९९५ ते २०१४ पर्यंत काम करणाऱ्या एका सफाई कामगारांने ३ जुलै २०२५ रोजी दोन ऍडव्होकेट ना घेऊन रंगीत फोटो च्या पुराव्या सहित, असा दावा केला की ह्या देवस्थानाच्या परिसरात गेल्या १९ वर्षात १०० हुन अधिक महिला, विद्यार्थिनी यांचेवर बलात्कार करून त्यांचा खून करून  नग्न अवस्थेत त्यांना पुरण्याचे किंवा जाळण्याचे काम त्याला नाईलाजाने करावे लागले. त्यांनें याला विरोध केल्यास त्याला मारून टाकण्याची धमकी दिली गेली आणि दबावाखाली त्यांने हे काम केले असे तो म्हणतो. २०१४ ते आतापर्यंत तो तेथून पळून गेला आणि भूमिगत राहिला परंतु त्याचा अंतरआत्मा त्याला स्वस्थ बसून देत नव्हता. शेवटी त्याने वकिलांचा सल्ला घेऊन कर्नाटक पोलिसांकडे पुरावे सादर केले आणि त्याला संरक्षण देण्याची विनंती केली, कारण हेगडे कुटुंबिय खूप श्रीमंत असून त्यांची पोच वरपर्यंत आहे. ते त्याचा कधीही काटा काढू शकतात. 


ह्या बाबती मध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ( SIT) स्थापन करून त्यांच्यातर्फे ह्या संपूर्ण नीच घृणास्पद कृत्याची चौकशी व्हावे अशी त्याने सरकारला विनंती केली. २००३ साली अनन्या भट नावाची मुलगी अशाच प्रकारे धर्मस्थळ येथे ट्रिप ला गेली असता गायब झाली होती आणि तिची आई सुजाता भट हिने तिचा खूप शोध घेतला आणि नंतर पोलिस तक्रार केली परंतू तिला अनेक धमक्या मिळाल्या मुळे तिने आपली तक्रार पाठी घेतली असे आज SIT पुढे झालेल्या जबाबात तिने सांगितले. 


कर्नाटक महिला राज्य कमिशनच्या पत्रानंतर कर्नाटक चे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता ह्या प्रकरणासाठी SIT चौकशी लावली असून त्यामध्ये चौकशी सुरू झाली आहे.


या आधी महाराष्ट्रात शनि शिंगणापूर येथील रंजक कथा आपण वाचल्याच असाल ज्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शनि शिंगणापूर येथे २५८  कर्मचारी आवश्यक असताना २४६४ कर्मचारी काम करत आहेत असे दाखवून गेले १० वर्ष वाढीव कर्मचाऱ्यांचा पगार गायब होतो असे स्वतः फडणवीस म्हणाले आणि त्या विषयात चौकशी लावली आहे असे सांगितले.


श्रद्धाळु भक्त आपल्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आणि संपत्ती दान करीत असताना त्याची भर कोठे होते याचा विचार प्रत्येक देणगीदाराने करायला हवा. धर्मात सतपात्री दान धर्म करावा असे म्हटले आहे. ते पैसे जर सत्ताधिशांच्या आणि ठगांच्या खिशात जातं असतील तर त्या साठी उपाय योजना होणे आवश्यक आहे.


कलीला असाच सोडला तर एकदिवस तो सर्वांचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवायला हवे.


माधव भोळे