Saturday, May 31, 2025

बहिष्कार एक नवीन खूळ खुळा

बहिष्कार एक नवीन खूळ खुळा 


मध्यंतरी काही पोस्ट वाचल्या त्यामध्ये जेथे जेथे पाक शब्द आहे तेथे तेथे श्री किंवा अन्य शब्द वापरा असा संदेश होता जसे की स्वयंपाक ऐवजी स्वयंश्री किंवा मैसूरपाक ऐवजी मैसूरश्री वगैरे. म्हणजे पाकिस्तानची निर्मिती १९४७ साली झाली आणि स्वयंपाक किंवा मैसूरपाक शब्दाची किंवा पदार्थाची निर्मिती त्या आधी झाली तर आपण स्वतःला कशाला बदलायचे हे समजले नाही.


पण आज गोकुळ ब्रँड ( कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ) दूध संघाचा अध्यक्ष नविद मुश्रीफ झाल्यानंतर लोक नगारे पिटायला लागले की गोकुळ दुधावर बहिष्कार घाला. 


आहो कोल्हापूर दुघ संघाची स्थापना १६ मार्च १९६३ साली झाली त्यामध्ये हजारो मराठी शेतकरी सभासद असून त्यांच्या सातत्याने टिकवलेल्या उत्तम दुग्ध गुणवत्तेमुळे गोकुळ हा एक अजरामर ब्रँड झाला. भारतात गोकुळच्या दूध गुणवत्तेला तोड नाही असे असताना निव्वळ अध्यक्ष मुसलमान झाला म्हणून ब्रँडचा सत्यानाश करायचे हे तत्वच मुळी चुकीचे आहे.

 

तो नविद मुश्रीफ अध्यक्ष का आणि कसा झाला याची कारणे शोधून आणि त्यात शक्य असेल तर सुधारणा करायचे सोडून कष्टाने उभ्या केलेल्या उद्योगाला संपवणे म्हणजे स्वतः आत्महत्या करण्यासारखे आहे.


माधव भोळे 

कोकणचा इतिहास, महाराष्ट्राची अनास्था.

 कोकणचा इतिहास, महाराष्ट्राची अनास्था.


आज  कसबा, संगमेश्वर तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे गेलो होतो. तेथील छत्रपती संभाजी  महाराज्यांच्या पुतळ्याला भेट दिल्यानंतर छ. संभाजी महाराज रोडवरील सरदेसाई वाड्याला भेट दिली. हा तोच वाडा जेथे छ. संभाजी राजे आणि कवी कलश यांना मुकरब खान ह्या मोगल सरदारांने गणोजी शिर्के यांच्या फितूरीच्या साहाय्याने पकडले.


तो वाडा पूर्णपणे कोसळला असून आतील इमारती लाकडे आडवी पडली आहेत. वाड्याचा बहुतांश भाग नष्ट झाला असून सर्वात दुर्दैव म्हणजे तेथे कोणताही बोर्ड नाही की त्यावर लिहिलेले आहे की हाच तो सरदेसाई वाडा. तेथील स्थानिकांनी सांगितले तेव्हा समजले. जरी संगमेश्वरची स्थानिक जनता मुस्लिम बहुल असली तरी जवळच असलेला रत्नागिरी जिल्हाधिकारी या दुरावास्तेवर काही उपाय योजू शकत नाही हे आश्चर्य वाटते.


महाराष्ट्राचे सांस्कृतिक विभाग दरवर्षी अनेक मंडळाना त्यांचे कार्यक्रम साजरे करायला करोडो रुपये खर्च करतात पण ह्या ऐत्याहिसिक ठेव्यावर कोणतेही लक्ष नाही. शिवाय जे छत्रपती म्हणून पिढ्यानं पिढ्या आपला वारसा हक्क चालवत छत्रपतींच्या मालमत्ता उपभोगत आहेत आणि सध्या राजकाराणात आहेत ते सुद्धा ह्या बाबतीत गप्प आहेत. 


आजपर्यंत रत्नागिरी मध्ये या विषयांवरील प्रवचने आणि व्याख्यानावर स्थानिकांनी लाखो रुपये खर्च केलेले मीं बघितले आहेत पण प्रत्यक्ष स्थानाबद्दल दुरावस्था.


कोणत्या तोंडाने आम्ही पुढील पिढीला इतिहास सांगणार?


माधव भोळे 

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकटातून संधी निर्माण करणे, एक कला

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकटातून संधी निर्माण करणे, एक कला 


मागे एकदा मोदींना एकाने प्रश्न विचारला होता की विरोधक आपल्यावर शब्दरुपी दगडफेक करत असतात, आपणांस काय वाटते? मोदी म्हणाले की जे दगड ते फेकतात त्याचा जिना बनवून मीं आणखी वरच्या उंचीवर जातो.


काही दिवसापूर्वी, विरोधी पक्षातील कर्तृत्ववान मंडळींना हाताशी धरून ऑपरेशन सिंदूर बद्धल स्पष्टीकरण देण्यासाठी ५० देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याच्या कल्पनेला माझ्यासहित अनेक मंडळींनी विरोध दर्शवला होता परंतु आज मा. खा.शशी थरूर यांच्या पनामा देशातील पत्रकार परिषदेवरुन असे लक्षात येते की तसा विरोध करणारे चूक होते. 


पाकिस्तानने केलेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरचे स्पष्टीकरण देण्यासाठी भारताने पाठवलेली शिष्टमंडळे आपले कामा चोख बजावत असून, भारत एक लोकशाही देश आहे आणि भारताबरोबर व्यापार, शिक्षण, कला, संस्कृती इत्यादी विषयात आदान प्रदान करणे हे त्या त्या देशांच्या आणि जगाच्या हिताचे आहे, तसेच भारताने ह्या शिष्टमंडळाचे द्वारे पाकिस्तानची नापाक कर्तृत्व सुद्धा चव्हाट्यावर आणली असून भारताच्या कारवाईला जगभरातून पाठिंबा तयार केला आहे. जर पाकिस्तान ५३ देशांच्या ऑरगॅनायझेशन ऑफ इस्लामिक कंटरीज ( OIC) मध्ये आपली व्यथा मांडत असेल तर भारत जगाच्या पटलावर आपली भूमिका मांडत आहे. हे करत असतानाच ह्या द्वारे विरोधकांची धार सुद्धा बोथट केली जातं आहे.


ह्याला म्हणतात संकटातून संधी निर्माण करणे.

उद्या कदाचित मा. शशी थरूर कुठल्यातरी देशात राजदूत म्हणून नियुक्त झाले तर आश्चर्य वाटायला नको.


माधव भोळे 


अमेरिका आर्थिक महासत्ता.

अमेरिका आर्थिक महासत्ता. 


काल आपण ऐकले की जगाच्या आर्थिक चढाओढीत भारत ( ४.१८७ ट्रिलीयन डॉलर्स ) चौथ्या क्रमांकावर आला असून पहिल्या क्रमांकावर अर्थातच नेहमीप्रमाणे अमेरिका ३०.५०७ ट्रिलीयन डॉलर्स वर उभी आहे. 

काय असे अमेरिकेत आहे की ती जगातील आर्थिक महासत्तेच्या चढा ओढीत अजूनही प्रथम क्रमांकावर टिकून आहे?


त्याचे कारण संशोधन आणि उत्क्रांती ह्या विषयात तेथील शस्त्रज्ञ् आणि तंत्रज्ञ अजूनही कंटाळलेले नाहीत. नवनवीन प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्नच अमेरिकेला यशाच्या शिखरावर पोचवत आहेत. 


आजच एक रिपोर्ट वाचला की गुगलचा ५१ वर्षीय सह संस्थापक सर्जी ब्रिन हा ६ वर्षाच्या निवृत्तीनंतर परत गुगलची पालक संस्था असलेल्या अल्फाबेट मध्ये दाखल झाला असून तो दररोज कामावर येत आहे. गुगल च्या जेमिनी ह्या जनरेटिव्ह AI model मध्ये सुधारणा करून, AI च्या घोडदौडी मध्ये सर्वोत्कृस्ट आर्टिफिसिअल जनरल इन्टीलीजन्स मॉडेल म्हणून जेमिनीच्या नविन अवताराला स्थिर स्थावर करणे हेच त्याचे सध्याचे ध्येय आहे. 


त्याचे म्हणणे आहे की एखादा संवेदनशील कॉम्पुटर इंजिनियर अशा वेळी घरी बसूच शकत नाही ज्या वेळी संपुर्ण कॉम्प्युटर इंडस्ट्रि आर्टिफिशल इन्टीलीजन्स नें ढवळून निघत आहे. 


ह्या आणि अशा अनेक तंत्रज्ञानी, इंजिनियर्सनी, शास्त्रज्ञानी, डॉक्टर्सनी, आणि देशप्रेमी सेवाभावी कर्मचाऱ्यांनी चालवलेला देश आहे म्हणून अमेरिका जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनली आहे. 


एका बाजूला आपण मौज मजा करणारे अमेरिकन बघतो परंतु तीच मंडळी आपल्या कामावर अत्यंत निष्ठेने, बुद्धी चतुर्याने आणि आपले तन, मन, धन देऊन काम करतात म्हणून हा देश पुढे आहे.


आपण मात्र आपल्या गत वैभवावर, छत्रपतींच्या शौर्यावर, मुत्सदेगिरीवर, राज्यकारभारावर, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समतेवर, सावरकरांच्या त्यागावर आणि नेहरू गांधींच्या चुकांवर वर्षानुवर्षे चर्चा करत ते किती मोठे होते यावर वाद घालत बसणार. 


काही ठराविक भारतीय संस्था सोडल्या तर भारतातील उद्योगपती आणि सरकारी आस्थापने कोणतेही संशोधन वगैरे न करता तयार टेक्नॉलॉजी बाहेरुन विकत आणतात आणि ती आपल्या येथे अड्जस्ट करतात. भारतीय कंपन्या संशोधनाच्या नावाखाली खोटी करसूट घेऊन करचोरी करत असल्यामुळे देशाने संशोधना साठी दिलेले करसूट सुद्धा हल्लीच काढून घेतली आहे, यावरून भारतात संशोधनाचे महत्व किती आहे ते आपणांस समजलेच असेल.


त्यामुळे नुसत्या लोकसंख्येचा आधारे भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघत असेल तर ते अनाठाई आहे.


माधव भोळे 


"फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष - वीर सावरकर"

"फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष - वीर सावरकर"

आज एक पोस्ट वाचली, ठाणे येथील स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान तर्फे आज २८ मे २०२५ रोजी डॉ. उदय निरगुडकर यांचे सावरकर यांचेवरील व्याख्यान "फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष - वीर सावरकर" असे आयोजित केले आहे. 


वि. दा. सावरकर यांचे महात्म्य सांगण्याएव्हडे ज्ञान डॉ. निगुडकर यांचेकडे नक्कीच आहे परंतु व्याख्यानाचा मथळाच मुळी सांगतो की आत्याबाईला मिशा असत्या तर, काका म्हटले असते.


जीं गोष्ट झाली नाही त्या गोष्टी बद्धल एखाद्याला क्रेडिट देणे किंवा त्याने ते काम केले असते असे म्हणणे अयोग्य आहे. जर तेव्हडेच सावरकर ताकदवान असते आणि तेव्हडीच भारताची जनता त्यांच्या पाठीशी असती तर सावरकरांनी फाळणी नक्कीच रोखली असती. 

पण तसें नव्हते.

सावरकरांचा पूर्ण आदर राखून नमूद करू इच्छितो की १९३७ साली झालेल्या प्रांतीय निवडणुकामध्ये एकंदर १५८५ जागा पैकी ७११ जागा काँग्रेस, १०६ मुस्लिम लीग, युनियनिस्ट पार्टी १०१ आणि १९१५ साली स्थापन झालेल्या आणि १९३३ साली राजकीय पक्ष म्हणून नोंद झालेल्या हिंदू महासभा आणि सिंध हिंदू सभा या दोन हिंदुत्ववादी पक्षांना मिळून फक्त २१ जागा मिळाल्या होत्या. २७ सप्टेंबर १९२५ साली स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी राजकीय पक्ष म्हणून काम करत नव्हता ( आजही नाही ). 


ज्या नेत्याकडे जनमत नाही असा नेता फाळणी रोखू शकला असता असे म्हणणे अवास्तव नाही का? आपल्या नेत्याबद्धल जरूर आदर असावा आणि असायलाच पाहिजे परंतु आकडे बघितल्यावर वास्तव वेगळे दिसते.


फाळणी रोखण्यासाठी नेहरू, वल्लभभाई पटेल, महत्मा गांधी तसेच अन्य नेत्यांनी बरेच प्रयत्न केले परंतु एकसंघ भारत ब्रिटिश महासत्तेला आव्हानत्मक ठरेल म्हणून ब्रिटिशांनी १५० वर्ष धार्मिक विष पेरल्यामुळे मुसलमानांचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याच्या इर्षेमुळे फाळणी शिवाय काँग्रेसला पर्याय राहिला नाही.


मुस्लिम लीगनें समोपचार हा शब्द सोडून बंगाल मधील नोवाखाली मध्ये सुऱ्हावर्दी मुख्यमंत्री असताना वंश शुद्धीकरण सारख्या घातक आणि क्रूर मोहिमा अवलंबल्यामुळे फाळणी स्वीकारणे काँग्रेसला भाग पडले. नेहरू आणि गांधीजींना मान्य नसलेला फाळणीचा प्रस्ताव वल्लभभाई पटेलानी गांधीजींचा विरोध पतकरून काँगेस वर्किंग कमिटी मध्ये मांडला आणि गांधीजींना तो मान्य करायला लावला.


असो. झाले ते चांगले झाले शरीरातील कॅन्सर असलेला भाग काढला गेला आणि स्वतंत्र हिंदुस्थानचा प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. 


काल भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानावर पोहचली ते हेच दर्शवते की त्या वेळेला झालेला फाळणीचा निर्णय योग्यच होता. आपल्या जुन्या नेत्यांबद्दल दुमत असू शकते पण त्यावेळचे आपले नेते नालायक नक्कीच नव्हते. 


माधव भोळे 

अश्विनी भिडे, पत्रकार परिषद, सरकारच्या निर्लज्जपणाचा कळस

अश्विनी भिडे, पत्रकार परिषद, सरकारच्या निर्लज्जपणाचा कळस 


मेट्रो ३ रेल्वेवरील आचार्य अत्रे मेट्रो स्थानाकात आलेल्या महापुरात स्थानक बुडून गेल्यामुळे फडणवीस आणि शिंदे तसेच सरकारवर टिकेची झोड उठली. त्यातील शंकांचे निराकरण करण्यासाठी मेट्रो प्रकल्पच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौं. अश्विनी भिडे ( IAS 1995 batch) यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात त्यांनी स्पष्ट केले की आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन मधील ६ पैकी दोन एक्सिट गेट जवळील कामे अपूर्ण होती. त्यांच्यामते त्या कामाच्या भोवती सौरक्षक भिंत होती परंतु अनपेक्षित पावसामुळे, अपेक्षित अंदाजापेक्षा ( capacity) जास्त पाणी भरल्यामुळे मेट्रो स्टेशन पाण्याने भरले.


हे स्पष्टीकरण तांत्रिक दृष्ट्या जरी योग्य असले तरीसुद्धा काम अपूर्ण असताना आणि योग्य ती काळजीवाहू यंत्रणा स्थिर स्थावर नसताना मेट्रो रेल्वे सुरू करण्याची घाई कशाला या बाबत त्यांच्याकडे समाधान कारक उत्तर नव्हते. नुसते रेल्वे ची ट्रायल सुरक्षित झाली म्हणजे काम झाले का? रेल्वे यंत्रणा आणि रूळ सुरक्षित झाले पण प्रवशांसाठी असलेल्या सुविधा अपूर्ण असतील तर प्रवास करणे सुरक्षित आहे का? 


खरे म्हणजे ही सर्व यंत्रणा फायर, फ्लड, दहशदवाद विरुद्ध तसेच अन्य सेफ्टी ऑडिट करून सुरक्षित करे पर्यंत यंत्रणा बंद ठेवावी असे मला वाटते. आपण प्रवाश्यांचा जीवाशी खेळत आहोत या बद्धल अश्विनी ताईंना कोणतीही खंत वाटलेली दिसली नाही. 


यथा राजा तथा प्रजा.


माधव भोळे 



भारत आर्थिक महासत्ता आणि वास्तव.

 भारत आर्थिक महासत्ता आणि वास्तव.

काल नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यानुसार भारताच्या आर्थिक घोडदौडीचा निर्देशांक असलेला GDP, सन 2025 मध्ये ४.१८७ ट्रिलीयन डॉलर्स असा दर्शवला गेल्यामुळे जपान च्या पुढे एक क्रमांक सरकून,  भारत जगातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक सत्ता बनला आहे. तसेच भारताचे दरडोई उत्पन्न गेल्या १० वर्षात १४३८ डॉलर्स वरून २८८० डॉलर्स एव्हडे झाले आहे. अर्थातच एक भारतीय म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. योग्य ती सरकारी आणि आर्थिक धोरणे अखल्यामुळे गेल्या दशकामध्ये भारतीयांचे राहणीमान सुद्धा उंचावले आहे ही गोष्ट सुद्धा सुखावह आहे.

एकाबाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला वर्तमान पत्रात बातमी बघतो की बिल्डर लॉबी सरकारी बाबू बरोबर वाटघाटी करून लाच घेण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

आजपर्यंत भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग केसेस मध्ये एन्फॉरसमेंट संचलयाने १७५० च्या वर केसेस केल्या असून गेल्या वर्षात ७७५ नवीन केसेस केल्या आणि फक्त ३४ लोकांना गुन्हेगार म्हणून शाबीत करण्यात त्यांना यश आले.

सरकारी दरबारीं अगदी शिपायाच्या नोकरीतील भरती आणि बदली पासून ते रस्त्यावरील वाहतूक पोलीसंपर्यंत सर्वत्र राजरोस भ्रष्टाचार सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि प्रत्येक सरकारी खात्यात कोणतेही काम सरळ होत नाही आणि दललांचा सुळसुळाट आहे. निवडणुका मध्ये आणि पक्ष फोडी मध्ये खोके च्या खोके वाटले जातं आहे. या सर्व विषयात अतिशय माफक प्रमाणात कारवाई होते. अशा वेळी ही आर्थिक प्रगती ही फक्त काही स्तरा पर्यंतच मर्यादित आहे असे लक्षात येते. मर्जितील सरकारी बाबुंवर कोणतीही कारवाई होत नाही.

नुकत्याच झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात वधू पित्याने जवळजवळ २ कोटी रुपये खर्च केले. त्या घटनेबद्धल शोक सर्वांनी व्यक्त केला असला तरी हे २ कोटी ते कसे खर्च करू शकले या बद्दल समाज माध्यमातून एक चकार शब्द सुद्धा कोणी विचारला नाही. शेती उत्पन्न नावाखाली मिळत असलेल्या सवलती जसे की आयकर सूट वगैरे फक्त गरजू माणसांनाच मिळतात की अबजाधिशाना सुद्धा मिळतात हे बघणे आवश्यक आहे. बाकीचे लोक घामाचा कष्टाचा पैसा मिळवत असताना आयकर भरतात आणि श्रीमंत शेतकरी भरत नाहीत असे होता कामां नये.  पूर्वी १० लाखाच्या वर शेती उत्पन्न असेल तर त्यावर टॅक्स असे पण २०२३ च्या बदलानंतर जर तुमचे फक्त शेती उत्पन्न असेल आणि दुसरे उत्पन्न नसेल तर ते शेती उत्पन्न कर मुक्त असते. याचा फायदा अनेक लोक उत्पन्न चोरी करून करतात त्याची शहानिषा होणे आवश्यक आहे.
आमदार,खासदारांच्या वेतनावर टॅक्स भरला जातो का?

जेथपर्यंत भ्रस्टाचार आणि करचोरी हे दोन कॅन्सर भारतातून हद्दपार होत नाहीत तो पर्यंत वरील आर्थिक घोडदौडीचा आनंद सीमितच राहणार.

माधव भोळे

वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि सकल मराठा समाजाचे प्रस्ताव:

 वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि सकल मराठा समाजाचे प्रस्ताव:


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणा नंतर समाजातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले. त्यावर विचार करण्यासाठी काल एक बैठक सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्यात समाजातील कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. त्यावर सकल चर्चा होऊन मांडलेल्या ठरवांचा गोषवारा खालील प्रमाणे:

१) समाजातील विवाह संबंधिच्या अनिष्ट तसेच नवीन आलेल्या प्रथा जसे की प्री विडींग शूटिंग, संगीत रजनी इत्यादी, याला थारा न देणे. 

२) कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी माणसाच्या उपस्थितित विवाह साजरा करणे 

३) ज्या घरामध्ये मुली किंवा सुनांचा छळ होतो त्या घरात रोटी बेटी व्यवहार बंद करणे.

४) मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे 

५) जर काही कारणामुळे आपल्या मुलीला सासरी त्रास होत असेल तर तीला माहेरी आणायची वेळ आली तर तिचे माहेर, नातेवाईक आणि समाज तिच्या पाठीशी उभे राहील.

६) मोठ मोठी घरांणी याप्रमाणे वागतील आणि सर्व सामान्य माणसाला आदर्श घालून देतील. 


वरील मतांचा बाकीच्या हिंदू समाजाने सुद्धा विचार करावा.


माधव भोळे 



Wednesday, May 7, 2025

भारतीय सैन्याचे मनःपूर्वक अभिनंदन.

 ७.०५.२५

भारतीय सैन्याचे मनःपूर्वक अभिनंदन.


२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हिंदुविरोधी आतंकवादी कारवाई मध्ये मारल्या गेलेल्या २६ निष्पाप हिंदूंचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्यंत विचारपूर्वक, तोलून मापून, युद्ध कोणतेही उग्र रुप धारण करणार नाही याची काळजी घेत, अचूक हल्ला करुन एकंदर ९ आतंकी गड उध्वस्त केले आणि त्यामध्ये साधारण ७६ आतंकवादी मृत होऊन अनेक जखमी झाले, या कारवाई बद्धल देशाची तिन्ही सशस्त्र दले, भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच विरोधी दल आणि सर्व धर्मातील सच्चे भारतीय नागरिक यांनी भारत सरकारच्या ह्या कारवाईला विनाअट पाठिंबा दिला याबद्दल त्या सर्वांचे आभार.


आज श्रीनगर विमानतळ बंद ठेवला आहे. ज्या पर्यटकांना देशातील सुज्ञ लोक विनवण्या करत होते की युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे आपण पर्यटनास जाऊ नये तरी सुद्धा जे तेथे गेले आहेत, त्यांच्या मुळे तयार होणाऱ्या लष्करी कारवाईतील अडथळ्याना ते स्वतः जबाबदार असून त्यांना उचकवणारे अतुल कुलकर्णी, किरण माने आणि काही लीब्रांडू लोक हे त्यांना वेळ आली तर सुखरूप परत घेऊन येतील अशी आपण आशा करूया त्यामुळे त्यांची काळजी नसावी. 


पंतप्रधान मोदी यांनी बोलें तैसा चाले, मऊ मेणाहून आम्ही विष्णु दास कठीण वज्रास भेदू ऐसे आणि भले जरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी हे आपले शब्द खरे केले असून ये तो बस ट्रेलर है, असली पिक्चर बाकी है, हे पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत समजावून नव्या भारताची ओळख करून दिल्यामुळे संपूर्ण भारतीय जनता त्यांच्या पाठीशी आहे. 


पुन्हा एकदा वरील सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

जय हिंद, भारत माता की जै,


माधव भोळे 


 







Sunday, May 4, 2025

देवानंतर दुसरे देव म्हणजे डॉक्टरच!

 देवानंतर दुसरे देव म्हणजे डॉक्टरच!

२०२० मधील गोष्ट. लंडन मधील जेस नावाचा मुलगा ज्याची दृष्टी जन्मताच कमजोर होती. डोळ्यातील बाहुलीच्या पाठी असलेला पडदा ज्याला रेटीना असे म्हणतात ज्यावर समोर दिसणाऱ्या वस्तूची रंगीत प्रतिमा पडते आणि त्या प्रतिमेतील रंग, उजेड तीव्रता तसेच वेगवेगळे आकार याच्याबद्दल संदेश एका तारसदृश अवयवाचे द्वारे मेंदू पर्यंत पोहचवून मेंदू दृश्य बघू शकतो तो पडदा म्हणजे रेटीना. त्या रेटीना मधील फोटो सेन्सिटिव्ह ( उजेड संवेदनशिल) पेशी आकार्यक्षम झाल्यामुळे जेसची दृष्टी दिवसेंदिवस कमी होत चालली होती.

अशा वेळी ग्रेट ओरंमोंड स्ट्रीट हॉस्पिटल आणि मुरफिल्ड आय हॉस्पिटल जे दोन्ही हॉस्पिटल लहान मुले आणि डोळ्यासंबंधित  संशोधन क्षेत्रात जगात अग्रगण्य आहेत त्यांनी जेसच्या डोळ्यावर एक अतिशय नाजूक अशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. त्यांनी एका अतिसूक्ष्म छिद्राच्या सहायने इंजेक्शन द्वारे AIPL 1 नावाचे बीज सूत्र ( जिन gene  ) त्याच्या एका डोळ्याच्या रेटीना मध्ये घुसवले. आपल्या बीज सूत्रांमध्ये एक सूत्र असे असते की जे उजेड संवेदनशील असते. तेच AIPL 1. ( The photoreceptor/pineal-expressed gene, AIPL1, encoding aryl-hydrocarbon interacting protein-like 1).

ह्या मुळे हळू हळू जेसच्या रेटीना मधील मूळ असलेल्या मृतवत उजेड संवेदनशील पेशी कार्यरत होऊ लागल्या आणि त्याला आकार समजायला लागले, रंग समजायला लागले आणि तो वस्तू ओळखायला लागला. त्याची दृष्टी अजूनही एकदम पूर्ववत झाली नसली तरी त्यात बरीच सुधारणा होत आहे.

अशा प्रकारे नवनवीन प्रयोग करून माणसाचा ईह लोकीचा प्रवास सुखकर करणारे, त्यांना त्यांच्या शारीरिक  समस्या सोडवून बळ देणारे असे डॉक्टर हे देवाचाच अवतार म्हणायला काय हरकत आहे?

माधव भोळे