Saturday, May 31, 2025

अमेरिका आर्थिक महासत्ता.

अमेरिका आर्थिक महासत्ता. 


काल आपण ऐकले की जगाच्या आर्थिक चढाओढीत भारत ( ४.१८७ ट्रिलीयन डॉलर्स ) चौथ्या क्रमांकावर आला असून पहिल्या क्रमांकावर अर्थातच नेहमीप्रमाणे अमेरिका ३०.५०७ ट्रिलीयन डॉलर्स वर उभी आहे. 

काय असे अमेरिकेत आहे की ती जगातील आर्थिक महासत्तेच्या चढा ओढीत अजूनही प्रथम क्रमांकावर टिकून आहे?


त्याचे कारण संशोधन आणि उत्क्रांती ह्या विषयात तेथील शस्त्रज्ञ् आणि तंत्रज्ञ अजूनही कंटाळलेले नाहीत. नवनवीन प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्नच अमेरिकेला यशाच्या शिखरावर पोचवत आहेत. 


आजच एक रिपोर्ट वाचला की गुगलचा ५१ वर्षीय सह संस्थापक सर्जी ब्रिन हा ६ वर्षाच्या निवृत्तीनंतर परत गुगलची पालक संस्था असलेल्या अल्फाबेट मध्ये दाखल झाला असून तो दररोज कामावर येत आहे. गुगल च्या जेमिनी ह्या जनरेटिव्ह AI model मध्ये सुधारणा करून, AI च्या घोडदौडी मध्ये सर्वोत्कृस्ट आर्टिफिसिअल जनरल इन्टीलीजन्स मॉडेल म्हणून जेमिनीच्या नविन अवताराला स्थिर स्थावर करणे हेच त्याचे सध्याचे ध्येय आहे. 


त्याचे म्हणणे आहे की एखादा संवेदनशील कॉम्पुटर इंजिनियर अशा वेळी घरी बसूच शकत नाही ज्या वेळी संपुर्ण कॉम्प्युटर इंडस्ट्रि आर्टिफिशल इन्टीलीजन्स नें ढवळून निघत आहे. 


ह्या आणि अशा अनेक तंत्रज्ञानी, इंजिनियर्सनी, शास्त्रज्ञानी, डॉक्टर्सनी, आणि देशप्रेमी सेवाभावी कर्मचाऱ्यांनी चालवलेला देश आहे म्हणून अमेरिका जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनली आहे. 


एका बाजूला आपण मौज मजा करणारे अमेरिकन बघतो परंतु तीच मंडळी आपल्या कामावर अत्यंत निष्ठेने, बुद्धी चतुर्याने आणि आपले तन, मन, धन देऊन काम करतात म्हणून हा देश पुढे आहे.


आपण मात्र आपल्या गत वैभवावर, छत्रपतींच्या शौर्यावर, मुत्सदेगिरीवर, राज्यकारभारावर, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समतेवर, सावरकरांच्या त्यागावर आणि नेहरू गांधींच्या चुकांवर वर्षानुवर्षे चर्चा करत ते किती मोठे होते यावर वाद घालत बसणार. 


काही ठराविक भारतीय संस्था सोडल्या तर भारतातील उद्योगपती आणि सरकारी आस्थापने कोणतेही संशोधन वगैरे न करता तयार टेक्नॉलॉजी बाहेरुन विकत आणतात आणि ती आपल्या येथे अड्जस्ट करतात. भारतीय कंपन्या संशोधनाच्या नावाखाली खोटी करसूट घेऊन करचोरी करत असल्यामुळे देशाने संशोधना साठी दिलेले करसूट सुद्धा हल्लीच काढून घेतली आहे, यावरून भारतात संशोधनाचे महत्व किती आहे ते आपणांस समजलेच असेल.


त्यामुळे नुसत्या लोकसंख्येचा आधारे भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघत असेल तर ते अनाठाई आहे.


माधव भोळे 


No comments:

Post a Comment