Saturday, July 1, 2023

मसाला किंग डॉ धनंजय दातार, दुबई.

मसाला किंग डॉ धनंजय दातार, दुबई. मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही हा सर्वसाधारण समज दूर करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न: ********* मसाला किंग डॉ धनंजय दातार, दुबई. १९८३-८४ सालची गोष्ट असेल. मी त्यावेळी पहिल्यांदाच शारजाह, दुबई येथे ऑफिसच्या कामासाठी १ महिन्या साठी गेलो होतो. दुबई, मध्ये माझ्या मित्राची बहीण सौ परांजपे लग्न झाल्यानंतर तेथेच रहात होती. तिने मला घरी जेवायला बोलावले आणि मला गाडीने घेऊन दुबईमध्ये भारतीय बहुल्य भाग असलेल्या करामा भागात घेऊन गेली. तेथे काही वस्तू खरेदी करून पुढे बर-दुबई मधील आस्टोरीया हॉटेल जवळ वाळवंटाच्या एका टोकाला कोठेतरी एका पत्र्याच्या शेड मध्ये घेऊन गेली. त्यावेळी दुबईमध्ये वाळवंट भरपूर दिसे. तेथे एक दळण दळण्याची छोटी चक्की होती आणि एक मराठी गृहस्थ श्री महादेव दातार एकटेच काम आटपून बसले होते. चक्कीच्या बाजूलाच बेडेकर मसाल्याची काही उत्पादने लाईन नि लावून मंडणीवर ठेवली होती. हेच ते महादेव दातार ज्यांचा मुलगा म्हणजे मसाला किंग डॉ धनंजय दातार. महादेव दातार, इंडियन एयरफोर्स मध्ये नोकरीला होते. नंतर त्यांनी रिटायरमेंट घेऊन एयर इंडिया दुबई मध्ये ३ वर्ष नोकरी केली. नोकरीचा कालावधी सम्पल्यानंतर परत मुंबईत न जाता त्यांनी दुबई मध्येच छोटीशी चक्की आणि छोटेसे किराणा मालाचे पहिले दुकान टाकले. आपल्या आयुष्यात कमवावलेली सर्व पुंजी त्यांनी या दुकानात टाकली. त्या दुकानाचे नाव अल आदिल ट्रेडिंग कम्पनी. दुबई मध्ये अजुनही तुम्हाला स्वतःच्या नावावर धंदा करता येत नसून तुम्हाला अरबी प्रायोजक भागीदार म्हणून घ्यावा लागतो. सर्व व्यवहार त्याच्या नावावर होतात आणि खरा मालक तो रहातो. पण अनेक (बहुतांशी सर्व) अरबी काही पाहिजे ती रक्कम कबूल करून तुम्हाला पाहिजे तो करार करून देतात आणि त्याला ते जागतात कारण तेथे करार म्हणजे करार. तर अल आदिल ट्रेडिंग कम्पनी हे नाव असे आले. त्यावेळी दुबईत बरेच भारतीय कामाला होते पण तेथे भारतीय वस्तू, मसाले मिळत नसत आणि विशेष म्हणजे गहू दळण्याची चक्की नव्हती. त्याच्या वडिलांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. वडील इंडियन एयरफोर्स मध्ये असल्यामुळे बदल्या होतात म्हणून धनंजय वयाच्या ८ व्या वर्षापासूनच अकोल्याला आपल्या आजीकडे (आईच्या आईकडे) रहायचा. आजी गरीब परंतु स्वाभिमानी होती. तिने नातवाला काटकसरीने आणि हुशारीने कसे राहायचे याचे चांगले संस्कार केले. सर्वसाधारण शाळेत त्याचे मॅट्रिक पर्यन्त शिक्षण झाले. तो वयाच्या २० वर्षाचा होईपर्यंत वडिलांनी दुबईत वरील दुकान थाटले होते. धनंजय ने पुढे शिकावे अशी वडिलांची इच्छा होती परंतु धनंजय ला दुबईत काम करण्याची ईच्छा होती. त्याला वाटले दुबईत काम करायला मिळणार म्हणजे खूप हाय फाय राहणीमान असणार म्हणून तो खुश होता. शेवटी वडिलांनी १९८४ साली आपल्याला मदत होईल म्हणून धनंजय ला दुबई येथे बोलावले. तो त्यावेळी मुंबईतील कालीना परिसरात आई आणि भावाबरोबर रहात असे. तो पहिल्यांदा दुबईला गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी एयरपोर्ट वर घ्यायला त्याला एक छोटा टेम्पो पाठवला होता. त्याला वाटले वडिलांकडे एखादी चांगली गाडी असेल. घरी येऊन बघितले तर एका पत्र्याच्या शेडमध्ये पुढे एक आटा पिसायची चक्की आणि पाठी गोडाऊन वजा स्वयंपाकघर त्यात एका बाजूला चार भांडी आणि जेवणाचा ग्यास. वडील स्वतः हाताने जेवण करून जेवायचे. सुरवातीला वडिलांनी त्याला एका मोठ्या सुपर मार्केटमध्ये कामाला लावले, जेणेकरून त्याला धंद्याची माहिती होईल. असे एक दोन वर्षे करता करता त्याला तेथील ग्राहक आणि गरजांचा अनुभव आला. दरम्यान त्याच्या वडिलांनी तेथे जवळ दुसरे दुकान टाकले आणि ते धनंजय च्या ताब्यात दिले. पहिली १० वर्ष या दोन दुकानांवर त्यांनी आपली उपजीविका चालवली. त्या नंतर धनंजय चे लग्न होऊन त्यांना वंदना नावाची चांगली सहचारिणी पत्नी मिळाली. त्या दोघांनी या रोपट्याचा वटवृक्ष बनवण्याचा निर्धार केला. अनेक वादळानंतर आज धनंजय दातार यांची ४३ दुकाने दुबई आणि इतर अरब देशात आहेत. कापसाच्या वाती, पोळपाट लाटण्यापासून ते भारतीयांना स्वयंपाक घरात आणि घरात लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्या दुकानात मिळतात. सुमारे ९००० प्रकारच्या वस्तू ते आपल्या वेगवेगळ्या दुकानात ठेवतात. हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या चक्की शिवाय २ गहू दळण्याच्या चक्की अधिक दुबई, अबू धाबी, शारजाह, अजमान या प्रत्येक ठिकाणी मसाला दळण्याची एक एक चक्की, शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी पॅकिंग युनिट आणि नवी मुंबईत एक मसाला दळण्याची फॅक्टरी आणि मसाला किंग एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड चे ऑफिस ठेवले आहे. आता ओमान आणि बहरिन मध्ये सुद्धा आपल्या दुकानांचे जाळे विणायला त्यांनी सुरवात केली आहे. अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनिया, स्वित्झर्लंड, इटली, ओमान, कुवेत सारख्या देशात एक्स्पोर्ट करायला त्यांनी सुरुवात केली आहे. हे सर्व करत असताना त्यांनी आपले शिक्षण बाहेरून पूर्ण करून व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली आणि आपल्या व्यवसायाचा पाया भक्कम केला. नुकताच आपल्या व्यवसायाची २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या प्रमुख सहकार्यांना रॉयल जेट एयरवेज च्या बोइंग ७३७ विमानात बसवून २५,००० फूट उंचीवर आपली व्यवसायिक आणि कौटुंबिक भागीदार पत्नी सौ वंदना दातार याना २० लाख डॉलर किमितीची रोल्स रॉईस फँटम नावाची किमती गाडी भेट दिली जी जगातील १७ वि विशेष बनवलेली गाडी आहे. या आधी २००८ साली आपल्या वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी आपल्या मुलाची मुंज मुंबई आणि विदर्भातील १५० निवडक नातेवाईकांना जेट एयरवेज च्या बोइंग ७०७ विमानात आमंत्रित करून २५,००० फूट उंचीवर लावली. या पैकी कित्येक नातेवाईक पहिल्यांदाच विमानात बसत होते. या विषयाचा बोलबाला त्या वेळी अनेक मराठी वृत्तपत्रात झाला. डॉ. धनंजय दातार हे अरब देशातील श्रीमंत भारतीयांच्या लिस्ट मधील ८ वे भारतीय असून फॉर्ब्स लिस्ट फॉर मिडल ईस्ट मध्ये त्यांचा क्रमांक ३७ वा आहे ज्यात सर्व देशाचे मिडील ईस्ट मधील नागरिक येतात. युनायटेड अरब एमिरेटसने (दुबई, शारजाह, अबू धाबी, अजमान, फुजेराह, रास अल खैमा, उम अल क्वेन या ७ संस्थानांनी बनलेले राष्ट्र) विशेष व्यवसाईकांसाठी नुकत्याच सुरू केलेल्या १० वर्षाच्या गोल्डन वीसा स्कीम चे ते पहिले लाभार्थी ठरले आहेत. एका अरब आर्थिक मासिकानुसार २०१९ मध्ये त्यांची निव्वळ मालमत्ता १.२७ बिलियन डॉलर आहे. नुकत्याच करोना मुळे आपत्ती आल्याने दुबईतील गरीब कामगार भारतीय नागरिकांना त्यांनी मदतीचा हात पुढे करून त्यांना विमान तिकीट अधिक काही रोख पैसे देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. तसेच त्यांनी दुबई ते कोझिकोडे विमान अपघातात मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकाला रूपये 1 लाख या प्रमाणे २० लाख रुपये मदत म्हणून दिले आहेत. त्या मुळे इच्छा असेल तर मार्ग आहे आणि प्रामाणिक प्रयत्न, शिखर गाठण्यासाठी केलेली धडपड आणि नवनवीन प्रयोग करण्याची आणि धोका पत्करण्याची तयारी यांनी माणूस ३५ वर्षात काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम. माधव भोळे

No comments:

Post a Comment