Tuesday, December 12, 2023
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी!!
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी!!
बिझिनेस टूडे ह्या मासिकाच्या "मोस्ट पॉवरफूल बिझिनेस वूमन " ह्या कार्यक्रमाचे विसावे पुष्प ८ डिसेम्बर २०२३ रोजी हॉटेल ताज लँडस एंड बांद्रा येथे झाले, त्यात व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर महिलांनी हजेरी लावली होती. प्रमुख पाहुण्या म्हणून सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(sebi) च्या प्रथम महिला अध्यक्षा "माधुरी पुरी बूच" होत्या तर नायका च्या संस्थापक फाल्गुनी नायर, एक व्यवसायिक, प्रतिथ यश तरुण गायिका आणि कुमारमंगलम बिर्ला यांची कन्या अनन्या बिर्ला सारख्या एकंदर ५६ सेलिब्रेटी महिलांनी सहभाग घेतला होता.
त्यापैकी एक विशेष म्हणजे नंदिनी पिरामल, ह्यांची मुलाखत झाली. नंदिनी पिरामल ही पिरामल फर्मास्यूटिकलं ह्या औषध कंपनीची अध्यक्षा असून ती पिरामल इंटरप्राईझस ह्या बहुआयामी औद्योगिक ग्रुप ची एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर आहे. त्यांनी पीटर डी यंग ह्या अमेरिकन नागरिकाशी विवाह केला असून त्यांचा भाऊ आनंद पिरामल हा ईशा अंबानीचा पती आणि मुकेश अंबानीचा जावई आहे. एवढ्या मोठ्या खानदानातील आणि मोठ्या हुद्यावर असलेल्या ह्या महिलेला मुलाखतीच्या वेळी चक्क भारतीय साडीमध्ये बघून अनेक जणांच्या भुवया उंचावल्या. अर्थात फाल्गुनी नायर, कल्पना मोरपंरिया ( विधी तज्ज्ञ आणि आय सी आय सी आय बँकेच्या पूर्वीच्या डायरेक्टर आणि जे पि मॉर्गन च्या दक्षिण आशियायी विभागाच्या पूर्व सिईओ) ह्या सारख्या कित्येक व्हेटरन सुद्धा साडीलाच प्राधान्य देतात. सुधा मूर्ती सुधा साडीच वापरतात.
नंदिनीने आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले की इन्फोसिस चे माजी अध्यक्ष पद्मविभूषण नारायण मूर्ती आणि नंदन नीलकेणी हे तिचे आदर्श आहेत. ज्या पद्धतीने हे दोघे आपल्या कंपन्यानमधून निवृत्त झाले आणि त्यांनी समाजाचे देणे समाजाला आणि देशाला परत देण्याचा प्रयत्न चालवला आहे तो तिला भावतो. नीलकेणी यांनी आधार आणि डिजिटल इंडिया आणि युपीआय (UPI) पेमेंट्स ह्या विषयात केलेल्या भरीव तांत्रिक कामगिरीला तोड नाही आणि ती सुद्धा भविष्यात त्यांच्याच मार्गांवर चालण्याचा प्रयत्न करणार आहे.
पिरामल फार्मासयुटिकलं मध्ये तिच्याकडे मानव संसाधन विभाग आणि गुणवत्ता विभागाची जबाबदारी असून तिने नमूद केले की भारतीय औषधं कंपन्याना जगात भरपूर संधी असून त्यासाठी आपल्या औषधांची गुणवत्ता अमेरिकेसारख्या पुढरलेल्या देशांप्रमाणे असायला हवी. गेले काही वर्ष अमेरिकन फूड अँड ड्रग्स विभागाने भारतीय औषध कंपन्यांच्या औषधांच्या गुणवत्तेवर ओढलेले ताशेऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ती म्हणते मी आमच्या कामगारांना नेहमीच पटवून देण्याचा प्रयत्न करते की जी औषधें आपण बनवतो ती आपले घरचे नातेवाईक सुद्धा घेऊ शकतील इतकी चांगली आणि शुद्ध असणे आवश्यक आहे.
नंदिनी आपल्या व्यवसायाबरोबरच आपल्या कंपनीच्या पिरामल फाउंडेशन आणि पीरामल जलसेवा ह्या एनजिओ मध्ये सुद्धा सल्लागार म्हणून काम करते. पिरामल जलसेवा भारताच्या २० राज्यात ७,५०,००० कुटुंबियांना शुद्ध पाणी पुरवते.
नंदिनीची आई पद्मश्री डॉ. स्वाती पिरामल सुद्धा एक उच्च शिक्षित शास्त्रज्ञ् महिला आहे आणि तिचे पती अजय पिरामल यांच्या औषध व्यवसायात तिने खांद्याला खांदा लावून काम केले आहे, त्याचाच परिणाम आता पिरामल फर्मासयुटिकलं ह्या एका मोठ्या वटवृक्षात झाला आहे.
म्हणतात ना शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी!!
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment