Wednesday, January 4, 2023
माधव भोळे यांचा थोडक्यात परिचय
माधव भोळे यांचा थोडक्यात परिचय
जन्म : गिरगाव, मुंबई, 18.01.1955
वास्तव्य : मालाड, मुंबई
शाळा: चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल. 1971 SSC batch.
कॉलेज: इंटर सायन्स पर्यंत एल्फिन्स्टन कॉलेज, फोर्ट, मुंबई आणि पुढे बी. एस. सी. ( Statistics / Mathematics ) के. सी कॉलेज, चर्चगेट, 1976. पुढे एम. एस. सी. कॉम्प्युटर सायन्सचा पदवीधारक. नंतर कॉम्प्युटर आणि इनफरमेशन टेक्नॉलजी विषयातील विविध सर्टिफिकेट कोर्सेस केले.
नोकरी: पहिली नोकरी 1977 ला आय. आय. टी., मुंबई, पवई येथे कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून. बँकिंग, फायनांशियल, ईआरपी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ह्या विषयात, विविध कंपन्यांमध्ये, विविध पदांवर नोकऱ्या केल्या. नोकरीनिमित्त अमेरिका, शारजाह, दुबई, स्पेन ह्या ठिकाणी काही काळासाठी वास्तव्य केले. त्या नंतर उच्यशिक्षित लोकांसाठी राष्ट्रीय आणि आंतररष्ट्रीय स्तरावर १० वर्ष प्लेसमेंट सर्व्हिसेसचा व्यवसाय केला.
छंद: सामाजिक कार्याचे बाळकडू वडील कै. गणेश रामकृष्ण भोळे आणि आतेभाऊ कै. नारायण सखाराम वीरकर, डोंबिवली यांचेकडून मिळाले. १९७९ साली विद्यार्थी सहायक संस्थेतर्फे प्रथमच विद्यार्थी पुस्तक पेढीची योजना मांडून कार्यकर्ता म्हणून सुरवात केली ती सर्व सहाकाऱ्यानी मिळून एकंदर ३५ वर्ष चालवली. १९८१ साली विद्यार्थी सहायक संस्थेमध्ये कै. लक्ष्मणराव भोळे अध्यक्ष असताना सर्वात तरुण विश्वस्त म्हणून प्रथमच बिनविरोध निवडून आलो. त्या नंतर एकंदर ३७ वर्ष ह्या संस्थेशी सक्रिय निगडित असून नोकरी निमित्त बाहेर गावी जायला लागल्यामुळे वेगवेगळ्या वेळी, विश्वस्त मंडळात काम विश्वस्त म्हणून केले. देवरूखे युवा ह्या संघटनेचा संस्थापक सदस्य.
२००३ साली श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ, मुबई ह्या वीर, तालुका चिपळूण ह्या संस्थेत सचिव म्हणून सुरवात केली आणि ७० वर्ष जुने भव्य मंदिर दुरुस्त करून त्या मंडळाचा शानदार शतकमहोत्सव, २०१३ साली आणि ७०० वर्ष जुन्या ६ फूट उंच मूर्तीचा वज्रलेपन आणि अर्चा विधी सोहोळा २०२२ साली सहकाऱ्यांच्या मदतीने साजरा करत गांगाजळीत मोलाची भर घातली. अजूनही ह्या संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहे.
२०१२ साली कै. राम गणेश निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीचा सचिव म्हणून काम कामाला सुरवात केली आणि संस्थेच्या भरीव प्रगतीला हातभार लावला असून अजूनही कार्यरत आहे.
२०१८ साली निवृत्त झाल्यानंतर लिखाणाला सुरवात केली आणि आतापर्यंत विविध विषयात मराठी आणि इंग्रजी मधून जवळपास १५० चे वर हौस म्हणून लेख लिहिले आहेत. हे लेख फेसबुकवर नेहमी प्रसिद्ध होत असतात.
माधव भोळे.
Saturday, December 24, 2022
आर्टिफिशयल इंटीलिजनस - ओपन ए. आय. चाटबॉट ( OpenAI ChatGPT )
आर्टिफिशयल इंटीलिजनस - ओपन ए. आय. चाटबॉट ( OpenAI ChatGPT )
काल एक बाजूचा मुलगा, यू टयुब वर एक व्हिडिओ बघत होता. मी सहज विचारले काय रे काय बघतोस? तो म्हणाला एक नवीन चाटबॉट आला आहे. चाटबॉट म्हणजे प्रश्नोत्तरे करणारा प्रोग्राम. हल्ली आपण कोणत्याही कंपनीच्या वेबसाईटवर गेलात तर उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात एक प्रश्र्नोतर करणारी खिडकी आपोआप उघडली जाते. पहिला प्रश्न येतो, "May I help you?". मग जसे एखाद्या कंपनीची रिसेप्शनिस्ट प्रश्नोतर करत आपल्याला मार्गदर्शन करते तसे ह्या खिडकीतून आपल्याला मार्गदर्शन होते, त्या त्या प्रोग्रामच्या भागाला चाट बॉट असे म्हणतात. चाट बॉट म्हणजे गप्पा मारणारा रोबोट. Robot चा शोर्टफोर्म bot, म्हणून चाटबॉट. हा चाटबॉट त्याला लिहून ठेवलेल्या, ठराविक प्रश्नांची, ठराविक उत्तरे देतो. हा अगदी प्राथमिक आर्टिफिशयल इंटीलिजनस ( AI ). झाला.
असाच एक चाटबॉट ओपन ए. आय. नावाच्या कंपनी ने काढला आहे त्याचे नाव आहे "Chat GPT". नुकतेच त्याचा बेटा (मार्केट पूर्व) अवतार बाजारात आला आहे. ही ओपन ए. आय. नावाची कंपनी म्हणजेच ओपन आर्टिफिशयल इंटीलिजनस ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) तयार करणारी कंपनी आहे. तिची मूळ संकल्पना, सॅम अल्टमेन आणि इतर ४ अमेरिकन तंत्रज्ञांनी काढली असून त्यातील एक आहे एलोन मस्क ( होय तोच एलोन मस्क ज्याची टेस्ला इलेक्ट्रिककार ची आणि स्पेसएक्स नावाची अंतराळ यान बनवण्याची कंपनी आहे आणि जो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ). या सर्वांनी मिळून सुमारे 1 बिलियन डॉलर ह्या कंपनीमध्ये गुंतवले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयाचा, मानवी जीवनासाठी जास्तीत जास्त उपयोग होण्याच्या दृष्टीनं विकास करणे हे तिचे उदिष्ट आहे.
सध्याच्या कॉम्प्युटरच्या युगात पुढची पायरी म्हणजे आर्टिफिशियल इंटीलिजनस ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि मशीन लर्निग ( यंत्राचे शिकणे ). जसे आपण लहान असताना एक एक पायरी वर चढायला शिकतो आणि मोठेपणी खाली न बघता आपोआप जिना चढून वर जातो, कारण आपल्या मेंदूने ती पायरी चढण्याची प्रक्रिया शिकलेली असते, तशीच एखादी गोष्ट किंवा प्रक्रिया कॉम्प्युटर ला शिकवली जाते त्याला मशीन लर्निग म्हणतात. ह्या मध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ( लिखाणाचा किंवा संभाषणाचा किंवा त्यातील सूचनांचा खरा अर्थ समजावून घेतले जाणारा प्रोग्राम ) च्या सहायाने प्रथम आपण लिहिलेला प्रश्न किंवा सूचना समजावून घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याबाबतीत कॉम्प्युटरकडे असलेल्या ज्ञानाचा ( पूर्वीची गोळा केलेली माहिती ) उपयोग करून आपणास उत्तर दिले जाते. ह्या विषयाला आर्टिफिशियल इंटीलिजनस आणि मशीन लर्निग ( AI / ML ) असे म्हणतात. आता ह्या आर्टिफिशियल इंटीलिजनस विषयात अनेक कंपन्या काम करत असून त्यातील एक आहे ओपन ए. आय.
तर ह्या चाट जीपिटी ( Chat GPT) ला त्या मुलाने गणिताचे काही कठीण प्रश्न प्रोग्रामिंग मध्ये सोडवायला सांगितले तर त्याने चक्क प्रोग्राम कोड च तयार करून दिला जो बरोबर होता. त्या नंतर त्याने त्या प्रश्नात थोडा बदल केला तर लगेच त्याने कोड बदलून नवीन कोड दिला. त्या मुलाला उत्सुकता वाटली म्हणून त्याने सूचना केली की मला शाळेत महात्मा गांधींवर एक प्रेझेंटेशन करायचं आहे, तर लगेच त्याने प्रेझेंटेशन च्या 5 / 6 स्लाईड ला लागणारा मजकूर तयार करून दिला.
त्या मुळे आणखीनच उत्सुकता वाढली. तो मुलगा म्हणाला मला गांधी, ओबामा, मेसी ह्यांचेवर एक नाटकाची स्क्रिप्ट हवी आहे तर त्यांनी नाटकाच्या स्क्रिप्ट प्रमाणे गांधी, ओबामा, मेसी यांच्यातील जवळजवळ खरा वाटेल असा संवाद तयार केला उदा. "गांधी म्हणाले जगात शांततेचा भंग होत चालला आहे! ओबामा म्हणाला आपण काय करू शकतो? गांधी म्हणाले ओबामा तू एक अत्यंत ताकदवान राष्ट्राचा अध्यक्ष आहेस, आपली ताकद वापरून तू शांती प्रस्थापित करू शकतोस. मग मेसी तेथे येतो, तो म्हणतो ह्या विषयात स्पोर्ट्सला खूप महत्व आहे. स्पोर्ट्स मुळे लोक एकत्र येतात. स्पोर्ट्स मुळे आपण आपसातील वाद कमी करू शकतो..." अशा आशयाचे स्क्रिप्ट तयार करून दिले. ते फार सुंदर आणि भावनात्मक होते असे नाही पण हा चाट बॉट आपली ताकद दाखवू शकला. त्याला आणखी सुधारले तर तो आणखी चांगले काम करेल हे नक्की.
मुलाने "ज्येष्ठ लोकांसाठी एक आकृती बनवून त्यात कोणते रंग घालू? असा प्रश्न केला" लगेच उत्तर आले, ज्येष्ठांची नजर कमकुवत असते, त्यांना जास्त भडक रंग टाकले तर बघायला किंवा वाचायला त्रास होतो. तू फिके रंग टाक जसे की फिकट हिरवा.
एकाने त्याला सांगितले अमुक अमुक अल्गोरिथम ( सूत्र ) मला डोनाल्ड ट्रंपच्या पद्धतीने समजावून सांग, लगेच चाट बॉट डोनाल्ड त्रंप च्या बोलण्याच्या पद्धतींत उत्तर देतो, "माझ्या पेक्षा हा अलोगोरिथम आणखी चांगला कोणीही समजावू शकत नाही".
अशा विविध प्रश्नांची किंवा सूचनांची विविध उत्तरे किंवा प्रक्रिया, त्यांचे विविध आयाम लक्षात घेवून हा चाट बॉट देतो.
ह्या कंपनीचे आणखी एक प्रोडक्ट आहे डेले 2 जे आपल्या सूचनेनुसार एखादे चित्र काढते, रंग भरते, त्यात सूचनांप्रमाणे सुधारणा करते, त्याचे आकार बदलते.
एलोन मस्क सद्या ह्या कंपनीच्या बोर्ड किंवा डे टु डे कारभाराशी निगडित नाही कारण त्याची टेस्ला कंपनी सुध्दा "विना चालक" गाडी बनवते आहे ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप वापर होतो जसे की गाडी सिग्नलला आपोआप थांबते, आपली गाडी पुढील गाडी पासून सुरक्षित अंतरावर ठेवते, पुढच्या गाडीचा स्पीड कमी झाला तर स्वतःचा वेग कमी करते, रस्त्यावर सांगितलेल्या नकाशा प्रमाणे गाडी वळवते किंवा चालवते इत्यादी. ह्या सर्व ठिकाणी AI चा वापर होत असल्यामुळे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ नये म्हणून त्याने त्याच्या ओपन ए. आय. कंपनीतील बोर्ड सीट चा राजीनामा दिला परंतु गुंतवणूक काढून घेतली नाही.
शिवाय ही कंपनी कशी चालवावी ह्या बाबतीत सुध्दा इतर भागीदारांबरोबर त्याचे मतभेद झाले. त्याचे मते हे तंत्रज्ञान कितीही चांगले असेल तरी त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि जसे की ऑटोमेशनमुळे नोकऱ्या जाऊ शकतात, खरया सारख्या वाटणाऱ्या खोट्या बातम्या तयार करून निवडणुकात गोंधळ तयार केला जाऊ शकतो, शस्त्रांचे ऑटोमेशन वाढू शकते, खाजगी आयुष्य उध्वस्त होऊ शकते, चुकीचा डेटा असेल तर चुकीचे सूत्र वापरून चुकीचा परिणाम मिळू शकतो अशा अनेक विषयात त्याचा गैर वापर होऊ शकतो. ह्या गैर असंस्कृत वापरला त्याचा पूर्ण विरोध आहे. तो या बाबतीत नेहमीच सावधान करण्याचा प्रयत्न करत असतो पण म्हणून आर्टिफिशयल इंटीलिजनस चे महत्व तो कमी समजत नाही. ह्या विषयात पुढे घोडदौड सुरूच राहणार आहे.
माधव भोळे.
The Universal Declaration of Human Rights:
The Universal Declaration of Human Rights:
1. We are all free and equal. We are all born free. We all have our own thoughts and ideas. We should all be treated in the same way.
2. Don’t discriminate. These rights belong to everybody, whatever our differences.
3. The right to life. We all have the right to life, and to live in freedom and safety.
4. No slavery – past and present. Nobody has any right to make us a slave. We cannot make anyone our slave.
5. No Torture. Nobody has any right to hurt us or to torture us.
6. We all have the same right to use the law. I am a person just like you!
7. We are all protected by the law. The law is the same for everyone. It must treat us all fairly.
8. Fair treatment by fair courts. We can all ask for the law to help us when we are not treated fairly.
9. No unfair detainment. Nobody has the right to put us in prison without a good reason and keep us there, or to send us away from our country.
10. The right to trial. If we are put on trial this should be in public. The people who try us should not let anyone tell them what to do.
11. Innocent until proven guilty. Nobody should be blamed for doing something until it is proven. When people say we did a bad thing we have the right to show it is not true.
12. The right to privacy. Nobody should try to harm our good name. Nobody has the right to come into our home, open our letters or bother us or our family without a good reason.
13. Freedom to move. We all have the right to go where we want in our own country and to travel as we wish.
14. The right to asylum. If we are frightened of being badly treated in our own country, we all have the right to run away to another country to be safe.
15. The right to a nationality. We all have the right to belong to a country.
16. Marriage and family. Every grown-up has the right to marry and have a family if they want to. Men and women have the same rights when they are married, and when they are separated.
17. Your own things. Everyone has the right to own things or share them. Nobody should take our things from us without a good reason.
18. Freedom of thought. We all have the right to believe in what we want to believe, to have a religion, or to change it if we want.
19. Free to say what you want. We all have the right to make up our own minds, to think what we like, to say what we think, and to share our ideas with other people.
20. Meet where you like. We all have the right to meet our friends and to work together in peace to defend our rights. Nobody can make us join a group if we don’t want to.
21. The right to democracy. We all have the right to take part in the government of our country. Every grown-up should be allowed to choose their own leaders.
22. The right to social security. We all have the right to affordable housing, medicine, education, and child care, enough money to live on and medical help if we are ill or old.
23. Workers’ rights. Every grown-up has the right to do a job, to a fair wage for their work, and to join a trade union.
24. The right to play. We all have the right to rest from work and to relax.
25. A bed and some food. We all have the right to a good life. Mothers and children, people who are old, unemployed or disabled, and all people have the right to be cared for.
26. The right to education. Education is a right. Primary school should be free. We should learn about the United Nations and how to get on with others. Our parents can choose what we learn.
27. Culture and copyright. Copyright is a special law that protects one’s own artistic creations and writings; others cannot make copies without permission. We all have the right to our own way of life and to enjoy the good things that “art,” science and learning bring.
28. A free and fair world. There must be proper order so we can all enjoy rights and freedoms in our own country and all over the world.
29. Our responsibilities. We have a duty to other people, and we should protect their rights and freedoms.
30. Nobody can take away these rights and freedoms from us.
श्री संजय दत्तात्रय भोळे
नांव: श्री संजय दत्तात्रय भोळे
गांव : वीर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी
शिक्षण : जुनी एस एस सी पास
शेती विषयक कर्तृत्व : एस एस सी पास झाल्यावर, वडील बंधू कै. विजय दत्तात्रय भोळे यांचे मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबाळाच्या जोरावर, ६० वर्षे पडीक असलेली डोंगराळ, सामायिक, वडिलोपार्जित, ३५ एकर जमीन त्यांनी १९७७ पासून लागवडीत आणली.
पहिल्या दोन वर्षात ६०० कलमे सुरवातीला भेट कलमे आणि नंतर रोपदळ कलमे लावली. त्यानंतर १५०० वेंगुर्ला ६ नंबर आणि १५०० वेंगुर्ला ७ नंबर काजूची झाडे लावली. १५ -२० वर्षात हि संपूर्ण बाग उभी राहिली आहे. या मध्ये भाताचे आंतरपीक घेतले जाते. उत्पन्नांत वाढ होण्यासाठी पावसाळ्यात सेंद्रिय खताचा वापर करतात आणि वर्षातून ३ वेळा कीटकनाशकांची फवारणी करतात. स्वतःची बाग स्वच्छ ठेवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात. त्यांचे शेतात डिसेंबर ते मे हंगामी सहा महिने २५-३० कामगार काम करतात.
या सर्वांचे फलित म्हणून त्यांचा बागेमधून प्रतिवर्षी ८ टन काजू उत्पन्न आणि १०-१२ टन आंब्याचे उत्पन्न होते.
पूर्वी ते मुंबई आणि पुणे येथे आंब्याचा व्यापार करत परंतु गावातील कुशल कामगारांची वाढलेली मजुरी तसेच इतर अवाढव्य खर्च लक्षात घेता आंब्याची शेती फार फायद्याची होते असे वाटत नसल्यामुळे तसेच आमचे भागात आंबा उशिरा तयार होत असल्यामुळे काही वेळा नाईलाजाने माल कॅनिंग ला टाकावा लागतो असे त्यांना वाटते.
वरील कामात त्यांची सर्व सक्खी आणि चुलत भावंडे याचे त्यांना संपूर्ण सहकार्य आहे, तसेच रत्नागिरी डिस्ट्रिक्ट बँकेचे (आरडीसि बँक ) अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे साहेब यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य असते.
संजयरावांची कडी मेहेनत आणि प्रयोग शिलता हे त्यांचा यशाचे गमक आहे असे सांगायला हरकत नाही.
लिहिणार : माधव गणेश भोळे (मोबा: ८४५१८८६७५९)
मराठी व्यावसायिकला सपोर्ट
मराठी व्यावसायिकला सपोर्ट
माझ्या "व्यवसायामध्ये माणसे जोडायला शिका, माल नंतर विका" या एका छोट्या स्वगतवर भरपूर Likes आणि Comments मिळाल्या. बहुतेकांचे म्हणणे होते कि आपण सुधारले पाहिजे. काहींचे म्हणणे मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे.
या बाबतीत मी आपणास माझे दोन अनुभव सांगतो, निर्णय आपला असेल
१. मी एका मराठी व्यापारी महिलेशी तिच्या प्रॉडक्टची माहिती आणि किमती मागितल्या, तिने मला त्या दोन दिवसात देते म्हणून सांगितले. आठ दिवस तिचा फोन किव्वा माहिती आली नाही म्हणून तिला परत स्मरण फोन केला. तिने त्या नंतर दोन दिवसांनी मला प्रॉडक्टचे सर्व फोटो आणि किंमत तक्ता पाठवला.
मी त्यांना सांगितले तुमच्या होलसेल किमती ऍमेझॉन वरील रिटेल पेक्षा २५% जास्त आहेत. जर तुमच्याकडून माल घेतला तर माझ्या गिर्हाईकाला कसा विकणार? त्यांनी सांगितले आमची, क्वालिटी जास्त चांगली आहे. तुम्हाला परवडले तर घ्या. मी गप्प बसलो, काय सपोर्ट करणार?
२. आमच्या एका ओळखीच्या, मराठी, औषध शास्त्रात मार्केटिंग मध्ये आयुष्य घालवलेल्या व्यक्तीने सलाईन तयार करण्याचा कारखाना टाकला. त्या साठी त्याने मोठमोठे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि व्यावसायिक आपल्या कम्पनी च्या बोर्डावर घेतले. बाजारात पूर्वी काचेच्या बाटलीत सलाईन भरले जायचे, काचेची बाटली जास्त शुद्धपणा ठेवू शकते पण तिचा खर्च आणि ट्रासनपोर्टशन खर्च जास्त, प्लास्टिकची बाटली स्वस्त पण शुद्धतेती थोडी कमी, म्हणून त्यांनी काचेची बाटली वापरण्याची मशीनरी लावून माल बाजारात आणला. प्रॉडक्टची क्वालिटी सर्व तज्ज्ञांनी सुंदर म्हणून सांगितली, परंतु इतर व्यापारी बांधवानी प्लास्टिकची बाटली स्वस्त आणि त्यात मार्जिन जास्त म्हणून ती विकून यांची काचेची बाटली बाजूला ठेवली. झाले दोन वर्षात कारखाना बंद करायची वेळ आली.
3. एक व्यापारी बोलला काही प्रॉडक्ट हि कमी उत्पन्न गटातील लोकांची आवडती असतात. त्यांना क्वालिटीशी काही देणे घेणे नसते. उदबत्ती पेटल्याशी मतलब असतो सुगंध नसला तरी चालतो फक्त १० रुपयामध्ये काड्या किती मिळतात ते ते मोजतात. त्या वर मी म्हटले असे कसे क्वालिटी महत्वाची आहेच ना. त्या वर त्याने सांगितले, बघा दोन वर्गात गिऱ्हाईकांची विभागणी करा, एक जो क्वालिटी साठी जास्त पैसे द्यायला तयार आहे, असा वर्ग भारतात तुलनेने कमी आहे आणि दोन जो महिन्याचा बजेट मध्ये घर कसे चालवता येईल त्या चिंतेत असतो किव्वा त्याची अवाक कमी असते, हा वर्ग भारतात तुलनेने जास्त आहे. त्याला क्वालिटी चांगली दिली तर हवी आहे, पण त्या क्वालिटीचे पैसे द्यायला तो असमर्थ आहे किव्वा नाखूष आहे. किव्वा एक असा वर्ग आहे कि ज्याला या कमी क्वालिटीच्या प्रॉडक्टची इतकी सवय झाली आहे कि त्याला तीच जास्त योग्य वाटते. त्या साठी त्याने उदाहरण दिले. एक आर्थिक दृष्ट्या कमकुवत व्यक्ती आहे त्याला तुम्ही साजूक तुपातील बिर्याणी दिली तर तो म्हणेल याला काहीतरी वास येतो कारण त्याला पामोलिन मधील जेवण जेवायचीच सवय झाली असते. म्हणून या वर्गाला त्यांना परवडेल अशीच उत्पादने तुम्ही विकली नाहीत तर दुसरा कोणतरी विकणारच आहे., मग तुम्ही का विकू नये?
आता मला सांगा मराठी माणसाचे प्रॉडक्ट प्राईस कॉम्पिटिटिव्ह असले पाहिजे आणि क्वालिटी सुद्धा चांगले असेल तरच मी किव्वा माझे गिर्ह्यायक घेणार ना? मग सपोर्ट कसा करणार? जर मी बाजार भावापेक्षा जास्त किंमत देत गेलो तर तो मला माल विकू शकेल पण इतरांचे काय आणि त्या मुळे तो पुढे यशस्वी होऊ शकणार नाही. त्या मुळे नको त्या कुबड्या त्याला देऊ नका. टप्पे टोणपे खाल्याशिवाय तो सशक्त होणार नाही.
आपली प्रतिक्रिया मोलाची असेल
माधव भोळे
केतकर ज्ञानकोश आणि देवरुखे
केतकर ज्ञानकोश आणि देवरुखे
१५ डिसेंबर, २०१६ च्या सन्मित्र समाचार मधील माझा "जगाच्या कल्याणा - भाग ३, विश्वकोश / ज्ञानकोश" या विषयावरील लेख वाचल्या नंतर सन्मित्र समाचारच्या संपादिका सौ. वृंदा भागवत यांनी, केतकरांच्या ज्ञानकोशात देवऋख्यांच्या बद्दल छापलेली चुकीची माहिती आणि त्यामुळे समस्त देवरुखे ज्ञातीला होणार मनस्ताप व्यक्त केला. व या बाबतीत आपणास काय करता येईल याची विचारणा केली. हा विषय जिव्हाळ्याचा असल्यामुळे मी आणि देवरुखे ब्राह्मणांबद्दल माहिती असलेले माझे मित्र श्री रमेश निंबकर, मुलुंड यांचे कडे हा विषय काढला. त्यांनी या बाबतीत दिलेली माहिती अशी.
भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक कै. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, यांनी पुणे १९२० येथे मंडळाच्या सभेत देवरुखे या ज्ञातीवर एक लेख सादर केला. त्या लेखाला पुण्यातील नूतन मराठी विद्यालयाचे त्यावेळचे प्रसिद्ध शिक्षक कै. भिकाजी मोरेश्वर मादुस्कर यांनी आक्षेप घेतला. त्यावर खडाजंगी होऊन राजवाड्यांच्या दबदब्यामुळे मादुस्करांना पुराव्या अभावी नमते घ्यावे लागले. त्यानंतर त्या वेळचे एक काँग्रेस कार्यकर्ते आणि लो. टिळकांचे सहकारी कै रामकृष्ण सदाशिव पिंपुटकर (ज्यांनी गीता रहस्याचे प्रूफ रिडींग केले) त्यांनी जाती पुराणातील "शतप्रश्न कल्पकता" या पुस्तकात देवऋख्यांच्या उत्पत्ती बद्दल लिहिले गेले आहे ते "चितळे भट प्रकरण" या वर १९२६ साली एक पुस्तिका काढून त्याला उत्तर दिले. परंतु राजवाड्यांनि कोणाचेही न ऐकता तो लेख केतकरांच्या "मराठी ज्ञानकोश” मंडळाकडे पाठवून दिला. केतकरांनी त्या लेखाचा आधार घेऊन देवऋख्यांबद्दल माहिती "ज्ञानकोशात" छापली. त्यानंतर देवरुखे ब्राह्मणांतील त्या वेळच्या प्रतिष्ठित अशा "नारायण दामोदर देवधेकर, वकील, सदस्य जिल्हा काँग्रेस कमिटी; विष्णू बजाजी वीरकर (वकील), शेठ परशुराम भाऊ महाजन" वगैरे प्रभूतीनि डॉ. केतकरांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली, त्यावर डॉ केतकरांनी त्यांना सल्ला दिला कि एकतर राजवाड्यांकडुन तो लेख सुधारून आणा किव्वा देवऋख्यांच्या प्रातिनिधिक संस्थेचा ठराव आणा कि त्यांना हा मजकूर मान्य नसून बदली मजकूर सादर करीत आहोत. या आणि इतर काही महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी देवऋख्यांची पहिली परिषद १६ एप्रिल १९२७ दहिवली कर्जत येथे, दुसरी परिषद २२ मे १९२७ हिराबाग मुंबई येथे आणि उंबरगाव येथे तिसरो परिषद १८ मे १९२९ रोजी पार पडल्या परंतु काही ना काही कारणामुळे ज्ञानकोशात माहितीला नाकारणारा आणि नवीन माहिती देणारा असा कोणताही ठराव मंजूर केला गेला नाही
वास्तविक राजवाड्यांनि गृहीत धरलेली मूळ गोष्ट हि कि शके १६४६ (स. १७२४) मध्यें सोपारें (जि. ठाणें) येथील देवरुख्यांनां देवराष्ट्रीय म्हटलें आहे, आणि देवराष्ट्रीय लढाईत हरलेल्या देवराष्ट्रातून आले म्हणून त्यांना पंक्तिपावन ब्राह्मण नाहींत असा निकाल दिला होता (भा. इ. मं. वा. इति. १८३६). हे एक निकालपत्र सोडता देवरुखे हे देवराष्ट्रीयच आहेत असं दुसरा कोणताही पुरावा राजवाडे यांचे कडे नसावा.
काशी विश्वेश्वराच्या मुक्ती मंडपातील निर्णय पात्र १५८३ - देवर्षी आणि चित्पावन ब्राह्मण": या उलट भारतीय इतिहासाच्या संशोधिका प्रो. डॉ. रोसलिन ओ. हँनलॉन यांनी, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे दिनांक २८ सप्टेंबर २००९ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेल्या "बनारस पंडित आणि महाराष्ट्रीय पंडित यांच्यातील अर्वाचीनकालचा पत्रव्यवहार" प्रमाणे १५८३ मध्ये गणेश शास्त्री कोझरेकर यांनी कोंकणातील समस्त देवरुखे ब्राह्मणाचे प्रतिनिधी असलेल्या गणेश प्रभू भडसावळे, हरदेप्रभू तेरे, विश्वनाथ प्रभू चाफेकर, बाळप्रभू खलगावकर आणि आरेकर महाजन यांसी लिहिलेले पत्र कि ज्या मध्ये काशी येथे मुक्ती मंडपात झालेल्या निर्णयाप्रमाणे अनंतभट्ट चितळे यांनी (जो कदाचित वासुदेव चितळे ज्याचे १४९७ साली उद्भवलेल्या "चितळे भट्ट" प्रकरणामध्ये, भानू तेरे यासबरोबर वादविवाद होऊन ज्याने समस्त देवरुख्याना पंक्तीभेदाचा शाप दिला त्याचे उत्तराधिकारी असावेत) त्यांचे बनारस मधील अमात्य गाविंदभट्ट अभ्यंकर आणि इतर यांचे मार्फत त्यांनी बनारस येथील श्री विठ्ठल ज्योतिषी आणि त्याचे चिरंजीव कृष्णा देवर्षी ब्राह्मणास त्यांच्या कर्मपरत्वे आलेल्या अग्निहोत्री या पदास मान्यता देऊन, त्याचे देवर्षी ब्राह्मणाचा द्वेष करणे धर्मशास्त्राप्रमाणे संमत नसून त्यांचे बरोबर रोटी व्यवहार करायला माझी मान्यता आहे आणि आज पर्यंत मी त्यांच्याशी केलेला व्यवहार चुकीचा आहे अशी कबुली श्रीरंगपूरच्या दरबारात कृष्णाजी आणि कान्होजी राजे यांचे दरबारात ताम्र पत्रावर कोरून दिली आहे अशा आशयाचे हे पत्र आहे.
याच लेखातील दुसरे पत्र आहे ते म्हणजे १६५७ साली पुन्हा एकदा बनारस येथे झालेल्या महाराष्ट्रीयन, कोंकणी, कर्नाटकी, तेलगू ब्राह्मणांच्या धर्मसभेत असा निर्णय केला गेला कि देवर्षी ब्राह्मण हे वेद, शास्त्र, आणि पुराण जाणणारे ब्राह्मण असून ते स्वतः किव्वा दुसऱ्यासाठी वैदिक / धार्मिक कृत्ये करू शकतात आणि ते दुसऱ्या ब्राह्मणांबरोबर जेवल्याने दुसरे सुद्दा पावन होतात. रोटी बेटी व्यवहार करायला ते लायक ब्रह्मन् असून हि सभा हा निर्णय देत आहे कि समस्त ब्राह्मण ज्ञाती त्यांच्याशी नाते संबंध ठेवू शकते
अशा प्रकारे मराठी ज्ञानकोशात हि माहिती पूर्वग्रह दूषित असून त्याचा आम्ही देवरुखे समाज नाकारत आहे.
ज्ञानकोशात मूळ छापील मजकूर आहे तो खालील प्रमाणे:
देवरुखे:- हे ब्राह्मण मुख्यत्वें कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यांत (फुणगुसच्या खाडीच्या दोन्ही कांठांवर ९० गांवांत) आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यांत संगमेश्वर तालुक्यांतील देवरुख गांवावरून ते आपल्यास देवरुखे म्हणवितात. त्यांचें म्हणणें कीं, आपण मूळचे देशस्थ; परंतु देवरुखभागांत राहावयास गेल्यामुळें देवरुखे हें गांव प्राप्त झालें. विल्सन म्हणतो कीं, अथर्ववेदाच्या देवर्षिशाखेचा हा वर्ग असावा. महाराष्ट्र ब्राह्मणांत त्यांचा दर्जा कमी लेखला जातो; त्यांच्या पंक्तीस बसल्यास संकटें कोसळतात असा समज आहे. त्यामुळें पुष्कळ कर्हाडे-देशस्थ-चित्पावनब्राह्मण त्यांच्या पंक्तीस बसत नाहींत'‘(से. रि. १९११; बाँबे, भा. २ पृ. २४५.). यांच्या धार्मिक व सामाजिक चालीरीती देशस्थ-ब्राह्मणांहून फारशा निराळ्या नाहींत. यांच्यापेकीं पुष्कळजण शेतकरी असून, अगदीं थोडे लोक व्यापार व सरकारी नोकरींत शिरले आहेत.
शके १६४६ (स. १७२४) मध्यें सोपारें (जि. ठाणें) येथील ब्राह्मणांनीं देवरूखें हे पंक्तिपावन ब्राह्मण नाहींत असा निकाल दिला होता (भा. इ. मं. वा. इति. १८३६). सध्यां मुंबईतील बहुतेक खाणावळी देवरुख्यांनीं चालविल्या आहेत व त्यांत सर्व तर्हेचे ब्राह्मण जेवतात; कोंकणांतहि बहुतेक लोक त्यांच्याशीं रोटीव्यवहार करतात.
वरील निर्णयपत्रांत देवरुख्यांनां देवराष्ट्रीय म्हटलें आहे. स्कंदपुराणांतहि त्यांनां देवराष्ट्रीय म्हणून ते देवराष्ट्रांतून आलेले व अपांक्त म्हटलें आहे.’'अन्येपि देवराष्ट्रीया देवराष्ट्रादुपागता: । अपांक्तेया अयाज्याष्व गिरिकांतारवासिन: ॥'‘पद्मपुराणांत सुद्धां यांनां पंक्तिदूशक देवराष्ट्रब्राह्मण म्हणून संबोधिलें आहे.
शके २७२ (स. ३५०) च्या अलाहाबादच्या समुद्रगुप्ताच्या शिलालेखांत देवराष्ट्र देशाचा उल्लेख आढळतो. दक्षिणापथांतील जे जे राजे त्यानें जिंकले त्या देशांच्या नामावलींत देवराष्ट्राचें नांव आहे. तसेंच तेथील कुबेर नांवाच्या राजाचाहि उल्लेख आहे. नागपुर ते म्हैसूरपर्यंतच्या प्रदेशांत मध्येंच हें देवराष्ट्र होतें. सह्याद्रीच्या किना-याचा टापू त्या राष्ट्रांत मोडत असे.
कृष्णानदीच्या कांठीं कर्हाडा (सातारा जिल्हा) जवळ कुंडलच्या पूर्वेस २/३ कोसांवर हल्लीं देवराष्ट्र नांवाचें एक खेडें आहे (पहा). त्याच्या आसपास प्राचीन अवशेष, लेणीं, देवळें फार आहेत. येथें कुबेरेश्वर व समुद्रेश्वर यांचीं देवळेंहि आहेत. हेंच पूर्वीच्या देवराष्ट्राच्या राजधानींचें शहर; हें राज्य सातारा ते कोल्हापूर व अरबीसमुद्र ते पंढरपुर या भागावर पसरलें असावें व शके २७२ त तेथें कुबेर राजा होता. त्याच्या आश्रयानें देवराष्ट्र या प्रांतांत जे ब्राह्मण रहात असत ते देवराष्ट्र-देवराष्ट्रीय-देवरुखे ब्राह्मण होत असें रा. राजवाडे म्हणतात.
शातवाहनांचें राज्य (२२८) नष्ट झाल्यावर त्यांचे मांडलिक तगरेश्वर यांचाहि र्हास होऊन देवराष्ट्र येथील राजांनीं महाराष्ट्रांत डोकें वर उचललें असावें. त्यांनां पुढें (३५०) समुद्रगुप्तानें मांडलिक केलें. नंतर ते ४७८ पर्यंत कांहीं काळ मांडलिक व कांहीं काळ स्वतंत्र राहून, शेवटीं चालुक्याचे मांडलिक बनले असावेत. या २५० वर्षांच्या (२३०-४८०) कालांत महाराष्ट्रांत अनेक लहानमोठे राजे व राज्यें उदयास आलीं. त्यांपैकींच देवराष्ट्राचें एक राज्य होय. हें राज्य ४७८ त चालुक्यांच्या अंकित झालें असावें व पुढें थोड्याच कालानें नष्ट झालें असावें. त्यावेळीं कुबेर राजाचे आश्रित हे देवराष्ट्रीय ब्राह्मण राजाश्रयाभावीं त्या (देवराष्ट्र) प्रांतांतून निघून संगमेश्वर व फुणगूसच्या आसपास येऊन कायमचे राहिले असावे. हा टापू त्यावेळीं चालुक्यांच्या अंमलापासून दूर होता. यावेळीं तेथें दुसरे (चित्पावन) ब्राह्मण होतेच. त्यांच्यामध्यें परचक्राच्या भयानें हे देवराष्ट्रीय येऊन गिरिगव्हरांत लपून राहिले. या घाटावरील भिन्नाचाराच्या व भिन्न व्यवहाराच्या ब्राह्मणांपासून यज्ञयाग करणारे चित्पावन ब्राह्मण अर्थातच अलिप्त राहिले.
देवराष्ट्र याचा अपभ्रंश देवरठ्ठ होतो; देवऋषि याचा अपभ्रंश देवरुखे किंवा देवरखे. संगमेश्वराजवळ देवरुख हें एक गांवहि आहे. सारांश ही जात प्रादेशिक आहे; याशिवाय इतर महाराष्ट्रीय ब्राह्मण व यांच्यांत विशेष फरक नाहीं.
हे स्वत:स देवर्षिब्राह्मण ह्मणवून पंचद्राविडांतर्गत महाराष्ट्र ब्राह्मण असल्याचें सांगतात. मुंबई इलाख्यांत यांची लो. सं. सुमारें ५ हजार असून याशिवाय माळवा, ग्वाल्हेर, कर्नाटक इकडे २ हजारांपर्यंत लोक आहेत. ठाणें जिल्ह्यांत उंबरगांव पट्ट्यात यांची वस्ती बरीच आहे.
कुलाबा जिल्ह्यांत दहिवली येथील विठ्ठलदेवाचें एक संस्थान या जातीच्या पंचायतीच्या मालकीचें आहे. गरीब विद्यार्थ्यांकरितां अलीकडे यांनीं कांहीं फंड काढले आहेत. पूर्वी यांच्यांत पंचायती होत्या, सांप्रत नाहींत. यांच्यांत पोटजाती नाहींत; हे आपणास ऋग्वेदीय देशस्थांची पोटजात म्हणवितात आणि देशस्थांशीं आपला लग्नव्यवहार २५० वर्शांपासून असल्याचें सांगतात. यांचा धर्मविधी देवरुखे भिक्षुकांकरवींच बहुश: होतो. हे अपांक्त नाहींत याबद्दल निरनिराळ्या ठिकाणच्या धर्मसभेचीं व अधिकार्यांची आज्ञापत्रें (नकला) पहाण्यांत येतात.
शतप्रश्नकल्पलता या पुस्तकांत (अ. १, प्र. ९) यांच्या उत्पत्तीबद्दल एक दंतकथा आहे. तीच सर्वत्र आढळते. यांचें म्हणणें कीं कोल्हापूरप्रांतांतून शृगाल राजाच्या (?) छळामुळें आम्हीं कोंकणांत गेलों. पुढें परशुराम कोंकणांत आल्यावर त्याच्या वडिलाच्या श्राद्धास या ब्राह्मणांनां क्षण दिला असतां हे गेले नाहींत म्हणून मग त्यानें चित्पावनांनां निर्माण केलें व देवर्षि ब्राह्मणांनां शाप दिला.
यांचीं व देशस्थांचीं गोत्रें (बरीचशीं) एकच आहेत. तसेंच दोघांच्या कुलस्वामींमध्येंहि बरेंच साम्य आहे. ऋग्वेदी आश्वलायन व यजुर्वेदी तैत्तिरीय शाखांतर्गत हिरण्यकेशी अशा दोन शाखा यांच्यामध्यें आहेत. तुळजापूर व कोल्हापूर येथील देवी, जेजूरीचा खंडोबा हे यांचे मुख्य देव आहेत.
यांचीं कांहीं आडनांवें:- करोडे, कानडे, कारूळकर, कोबजे (कोगजे), कारकर, कवठेकर, कुलकर्णी, खटावकर, खरवतकर, आरेकर, आंबेडकर, चाफेकर (दोन गोत्रांचे), चांदे, जुवेकर, जकाते, जोशी, ढापरे, डांगे, ताले, टांकसाळे, तेरे, तेरेदेसाई, डंबळकर, गोंधळेकर, चौगुले, निमकर, नवरंगे, निबंधे, धनुर्धर, पेडवळे, पिंपुटकर, बोमे (भोभे), भोळे, भडसावले, बाढे, बाठे, पांगारकर, मोगरे, देवळे, महाजन, मराठे, मांदुसकर, मुठ्ठल, मुळे, मुसळे, रोडे, शितूत, साले, सावले. यांशिवाय कर्नाटक प्रांतांत गेलेल्या लोकांची आडनांवें:- थळहट्टी, बनहट्टी, कलघटगीकर वगैरे.
कै. विष्णु परशुराम पंडित यानीं’पंचद्राविडान्तर्गत महाराष्ट्र ब्राह्मणांतील देवरुख्यांविषयीं शास्त्रसंमतविचार’नामक एक पुस्तक लिहिलें आहे (१८७४) त्यांत देवरुख्यांनां देशस्थ म्हटलें आहे.
मुसुलमानी अंमलांत कुळकर्ण, देसाईपण, करोडगिरी वगैरे अधिकार यांनां मिळाल्यानें पुन्हां हे देशावर अहमदनगर, बेळगांव, धारवाडाकडे गेले. मराठी राज्यांत हे जकाते, कारकून झाल्यानें गुजराथ, माळवा, सातारा, पुणें या भागांत पसरले. महादजी शिंद्याच्या लष्करांत अमझारवाले जहागीरदार होते. नागो देवचक्के हाहि एक पथक्या त्यांत होता. (सेन्सस रिपोर्ट १९११. मुंबई; भा. इ. सं. अहवाल, शके १८३८; रत्नागिरी ग्याझे; सोलापूर ग्याझे; भांडारकर-हिस्टरी ऑफ दि डेक्कन; विल्सन-इंडियन कास्ट्स; हरिवंश; सह्याद्रिखंड; रा. भि. मो. मांदुसकर यांची माहिती.)
सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन वसंत कराडकर - एक परिचय
सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन वसंत कराडकर - एक परिचय
साधारण २००६ च्या विध्यार्थी साहाय्यक संस्थेच्या वार्षिक बक्षीस समारंभाला सुरवात झाली आणि दीपप्रज्वलना नंतर, एक प्रसन्न व्यक्तिमत्व, शुद्ध वाणी आणि खणखणीत आवाज असलेल्या व्यक्तीने, ध्वनी क्षेपकाच्या पाठी उभे राहून भगवद् गीतेतील, एक श्लोक म्हणून त्याचा सोप्या भाषेत अर्थ सांगून आपल्या प्रास्ताविकाला सुरवात केली. माझ्या बाजूला बसलेल्या पाहुण्यांनी विचारले हे कोण? आणि मी म्हटले हे आमच्या विध्यार्थी साहाय्यक संस्थेतील नवीन विश्वस्त श्री नितीन वसंत कराडकर.
विश्वस्त
शिक्षणाने बी. कॉम, एल. एल. बी असलेले नितीनजी पेशाने कर सल्लागार आहेत. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी प्रथम ५ वर्षे युनियन बँकमध्ये नोकरी केली आणि नंतर काका कै. गणेश बाळकृष्ण कराडकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी कर सल्लागार म्हणून काम करायला सुरवात केली. गेली ३५ वर्षे ते कर सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय करत आहेत.
कै. गणूकाका कराडकर हे चेंबूर मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जेष्ठ कार्यकर्ते होते. साहजिकच नितीनजी सुद्धा रा. स्व. संघाच्या, 'राष्ट्र प्रथम' या विचार धारेने आकर्षित झाले आणि संघाच्या स्थानीय शाखेत सुरवात करून पुढे ते रा. स्व. संघाच्या चेंबूर नगर संघचालक पदापर्यंत पोहोचले. वेळो वेळी संघाने दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या. करोना काळात ई-शाखा हा आभासी संघ शाखेचा स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरु केला. देशातील विविध प्रश्नांची तज्ज्ञांद्वारे उकल आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्रावरील व्याख्याने ई शाखेद्वारे प्रक्षेपित करून या कठीण काळात स्वयंसेवकांचे मनोधर्य उंचावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. योगी अरविंद या महापुरुषावर त्यांनी अभ्यासपूर्वक तीन भागात एकंदर ५ तास केलेले व्याख्यान मी स्वतः ऐकले आहे, ते अप्रतिम होते.
शिक्षणाची आवड असल्याने बालविकास संघ, चेंबूर, चेंबूर एज्युकेशन सोसायटी, चेंबूर व गोवंडी एज्युकेशन ट्रस्ट, गोवंडी या शाळांच्या व्यवस्थापन कार्यकारिणीचे ते गेले कित्येक वर्ष सदस्य आहेत. या पैकी बालविकास संघ मध्ये त्यांनी 3 वर्ष कार्यकारिणी अध्यक्ष आणि 3 वर्ष विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. जेष्ठानी आपली पदे रिक्त करून, तरुणांना, जबाबदारी घेऊन काम करण्यासाठी वाव द्यावा या एकमेव उद्देशाने त्यांनी येथील महत्वाची पदे स्वखुशीने सोडून ते फक्त कार्यकारिणी सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत.
याच काळात इतर शैक्षणिक उपक्रमांबरोबर संस्कृती आणि सद्गुणांची जोपासना व्हावी म्हणून ते दरवर्षी, बालविकास संघात रक्तदान शिबिर तसेच व्याख्यानमाला आयोजित करतात. त्यामध्ये शेवटच्या पुष्पाच्या दिवशी महाराष्ट्रातील नामांकित संस्थांना आमंत्रित करून त्यांचे कार्य दृकश्राव्य माध्यमाद्वारे चेंबूर मधील रसिक श्रोत्यांना दाखवले जाते. त्या द्वारे उपस्थित श्रोत्यांना सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ बुद्धीने काम करणाऱ्या अशा संस्थांना जास्तीत जास्त आर्थिक योगदान करण्यास विनंती करतात. आजपर्यंत श्री प्रकाश व सौ मंदाताई आमटे , श्रीमती सिंधुताई सपकाळ सौ रेणूताई दांडेकर, घराडी येथील स्नेहज्योती निवासी अंधशाळा, हे सर्व बालविकास संस्थेत येऊन गेले आहेत. पितृ पंधरवड्यात पित्र वंदना या कार्यक्रमाचे आयोजन करून वर्षभरात निधन पावलेल्या सर्व व्यक्ती ,प्राणी, वनस्पती यांना गीता ज्ञानरूपी तर्पण केले जाते म्हणजे ५ दिवस गीतेचा एक अध्याय घेऊन त्यावर मराठीतून निरूपण केले जाते. त्यासाठी चिन्मय मिशनचे स्वामी येत असतात. वरील सर्व कार्यक्रम हे बालविकास संघाच्या खर्चाने न होता त्यासाठी एक कुटुंब प्रयोजकत्व घेते. भगवद् गीता सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने गीता परिचय व प्रसार आणि शिवरायांच्या शौर्याबरोबरच त्यांनी सुराज्य कसे केले हे हि जाणणे महत्वाचे आहे म्हणून या दोन्ही विषयावर जनजागृती व्हावी या इच्छेने ते स्वतः दीड तासाचे व्याख्यान देतात. ठाणे जिल्ह्यातील, भिवंडी तालुक्यातील पडघा या आपल्या मूळ गावी नवीन महाविद्यालय, दत्त मंदिर जिर्णोर्धार आणि चेंबूर येथील चेंबूर हिंदू गणेशोत्सव या तिन्ही ठिकाणी निधीसंकलनामध्ये भरघोस निधी मिळवून देऊन नितीनजींनी आपले योगदान दिले आहे.
माणसाच्या उत्कर्षाचा पाया शिक्षण आहे या भावनेतून ते गरजू विद्यार्थ्यांना स्वतः जमेल तशी आणि बाकी अन्य संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून देतात, तसेच तरुणांना सुरवातीची नोकरी मिळवून देणे अथवा व्यवसाय / धंदा करायचा असल्यास त्याविषयी मार्गदर्शन करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
हे करत असतानाच जून २००३ ते मार्च २०१५ या काळात त्यांनी देवरुखे ब्राम्हण संघ, मुंबई येथे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे, तसेच देवरुखे ब्राह्मण विद्यार्थि साहाय्यक संस्थेच्या कार्यकारिणीवर गेले २१ वर्ष ते सलग काम करत आहेत. सध्या विद्यार्थि सहायक संस्थेचे संयुक्त कार्यवाह म्हणून ते कार्यरत आहेत.
शिक्षण आरोग्य आणि वृद्धत्व या विषयासाठी समाजात निधीची खूप आवश्यकता आहे असे त्यांना वाटते.. समाजाकडे असलेला पैसा देणगीच्या स्वरूपात चांगल्या संस्थांना या कामांकरिता मिळावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शक्य असेल तर आणि आपली मुले चांगली स्थिरस्थावर असतील तर आपल्या हयातीत किंवा इच्छापत्र करून भरपूर निधी या कारणांसाठी सर्वांनी द्यावा, हे कर सल्लागार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून वारंवार समाजाला सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. वनवासी कल्याण आश्रम व रा. स्व. संघ चलीत जनकल्याण समिती या दोन्ही संस्थांसाठी ते नियमित व आपत्ती असताना निधी जमा करीत असतात.
अशा प्रकारचे परिचय लिहिताना ‘प्रसिद्धी पराङ्मुख’ असा एक परावलीचा शब्द लेखात नेहमी पेरला जातो परंतु तो वापरण्यापूर्वी पडताळून पाहावा म्हुणुन मी स्वतः त्यांचे फेसबुक आणि इतर सोशियल मीडिया अकाउंट चेक केले. दोन चार घरगुती फोटो सोडता त्यांनी आज पर्यंतच्या केलेल्या एवढ्या भव्य कामाचे फोटो किव्वा माहिती या बद्दल एक चकार सुद्धा मला कुठेच मिळाला नाही. तसेच त्याची प्रसिद्धी कोणत्याहि वर्तमान पत्रात सुद्धा झालेली मी ऐकली नाही. त्यामुळे हा शब्द त्यांना नक्कीच लागू होतो असे मला वाटते. कदाचित त्यांचे काका कै. गणोजी कराडकर यांच्या विचरांचा त्यांच्यावर पगडा असल्यामुळे असे होऊ शकते.
वाचन, तसेच चांगली अध्यात्मिक व सामाजिक भाषणे ऐकण्याचा त्यांना छंद आहे. वरील संस्थांमध्ये सामाजिक सांस्कृतिक व संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांना आनंद वाटतो. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नंदिनी कराडकर यांनी नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडिया मधून ऐच्छिक सेवा निवृत्ती घेतली आहे त्यांना शास्त्रीय गायनाची आवड आहे आणि मुलगी सौ राधिका वैद्य ह्या चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांनी आंतराष्ट्रीय कर कायद्यांचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या वयाला ६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांना आयुष्याच्या या गोड टप्प्यावर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, निरामय आणि आणखी दैदिप्यमान होवो. त्यांचे हातून अशीच समाजसेवा घडत राहो हि ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना.
माधव भोळे ( नितीन कराडकरांना शुभेच्छा द्यायची असल्यास त्यांचा मोबाईल नंबर ९८९२० ५४३७०)
Subscribe to:
Posts (Atom)