Thursday, May 2, 2024

संगते संग दोषानते

कॉपी पेस्ट संगते संग दोषानते एक शेतकरी होता, ज्याने उत्कृष्ट दर्जाचा मका पिकवला. दरवर्षी प्रमाणे त्याला सर्वोत्तम पिकवलेल्या मक्याचा पुरस्कार मिळाला. एका वर्षी एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली आणि त्यांनी कशी प्रगती केली याबद्दल एक गोष्ट त्यांना समजली, की शेतकऱ्याने त्याचे बियाणे त्याच्या शेजाऱ्यांसोबत वाटले. "तुमच्या शेजाऱ्यांबरोबर दरवर्षी तुम्ही स्पर्धा करत असताना तुमचे सर्वोत्तम मक्याचे बियाणे त्यांना वाटणे तुम्हाला कसे परवडते?" पत्रकाराने विचारले. का सर,” शेतकरी म्हणाला, “तुम्हाला माहीत नाही का? वारा पिकलेल्या मक्याचे परागकण उचलतो आणि ते शेतातून दुसऱ्या शेतात फिरवतो. माझ्या शेजारी निकृष्ट मका पिकवल्यास, क्रॉस-परागीकरणामुळे माझ्या मक्याची गुणवत्ता सतत खराब होईल. जर मला चांगला मका पिकवायचा असेल, तर मी माझ्या शेजाऱ्यांना चांगला मका पिकविण्यात मदत केली पाहिजे. आपल्या जीवनाबाबतही असेच आहे... ज्यांना अर्थपूर्ण आणि चांगले जगायचे आहे त्यांनी इतरांचे जीवन समृद्ध करण्यास मदत केली पाहिजे, कारण जीवनाचे मूल्य ते ज्या जीवनाला स्पर्श करते त्यावरून मोजले जाते. आणि जे आनंदी राहणे निवडतात त्यांनी इतरांना आनंद शोधण्यात मदत केली पाहिजे, कारण प्रत्येकाचे कल्याण सर्वांच्या कल्याणाशी जोडलेले आहे.

India's Entrepreneurial Journey book reviw

कॉपी पेस्ट prashant joshi एक वाचक श्री प्रशांत जोशी यांनी लिहिलेला माझ्या पुस्तकाचे परीक्षण "India's Entrepreneurial Journey" India's Entrepreneurial Journey हे श्री माधव भोळे लिखित पुस्तक नुकतच वाचनात आले. भारतातील ५१ उद्योगपतींची यात संकलित माहिती आहे. सर्व उद्योगपतींची माहिती वाचनीय, मनोरंजक व अचंबित करणारी आहे. शून्यातून आपल्या कर्तृत्वाने, हुशारीने, निर्णय क्षमतेने त्यांनी केलेली उद्योग भरारी वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. या निवडक ५१ उद्योगपती मध्ये MRF , HDFC, इन्फोसिस, निरमा, रिलायन्स, लिज्जत पापड, झिरोदा, पतंजली या सारख्या वेगवेगळ्या उद्योग जगता बरोबरच नॅचरलस आईस्क्रीम चे श्री रघुनंदन कामथ, पितांबरीचे श्री रवींद्र प्रभुदेसाई, पर्सिस्टंट सिस्टीम चे डॉ आनंद देशपांडे यांचं कर्तृत्व वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो. श्री माधव भोळे यांनी प्रत्येकाची मोजकीच पण उल्लेखनीय माहिती अत्यंत रोचक पणे या पुस्तकात मांडली आहे. न्हावी असलेला रमेश बाबू व त्याचा जगातील सर्व महागड्या गाड्या सहित असलेला ट्रॅव्हल व्यवसाय चक्रावून टाकतो. सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचा. प्रत्येक तरुणाने हे पुस्तक जरूर वाचावे जेणे करून त्याला आपल्या कर्तृत्वाची दिशा ठरविण्यास मदत होईल. ज्यांना पुस्तक हवे आहे त्यांनी कृपया श्री माधव भोळे (madhavbhole99@gmail.com) यांचेशी संपर्क साधावा. Prashant Joshi

शैक्षणिक कर्ज, एक अमूल्य सामाजिक सुविधा.

शैक्षणिक कर्ज, एक अमूल्य सामाजिक सुविधा. काल आमच्या मालाड मधील दादासाहेब भेटले होते. ते कुठल्याशा शैक्षणिक संस्थेत काम करतात. म्हणत होते की माझ्या ओळखीमध्ये कोणीतरी संस्थेकडून शिक्षणासाठी कर्जाऊ पैसे घेतले आहेत. गेले ८ वर्ष झाली पण अजून पूर्णफेड केलेली नाही. तर मी त्यांच्याशी परतफेडी बद्दल बोलावे. त्यांच्या माझ्यात झालेला सव्वाद खालील प्रमाणे : मी: तुम्ही कर्ज देताना काही करारनामा करता का? ते: हो. मी: बँक कर्ज देताना काही तारण घेते तर तुम्ही काय तारण घेता? ते: आम्ही तारण घेत नाही पण दोन किंवा तीन शिफारसकर्ते यांची शिफारस घेतो. मी : तुम्ही व्याज घेता का? ते : व्याज घेत नाही मी: परत फेडीला काही मुदत असते का? ते: शिक्षण पूर्ण झाल्या पासून ५ वर्ष. मी: जर ५ वर्षात परत फेड झाली नाहीतर त्या नंतर व्याज लावतात का? ते: त्या ५ वर्षानंतर व्याज घेण्याची तरतूद त्या करार पत्रात आहे. मी: जर परतफेड होत नसेल तर तुम्ही काय करता. ते: आम्ही कर्ज फेडिसंबंधि पत्र आणि स्मरण पत्र पाठवतो. मी: कोणत्या पत्यावर? ते: त्याच्या मूळ पत्यावर, ज्या वेळी तो शिक्षण घेत होता. पण बरेच वेळा नंतर पत्ते बदललेले असतात आणि विध्यार्थी नवीन पत्ता कळवत नाहीत. दिलेले फोन नंबर सुद्धा बदलेले असतात. मी: मग तुम्ही काय करता? ते : त्या विद्यार्थ्यांच्या ओळखीतील माणसांकडुन त्याचा नवीन पत्ता घेतो. कधी कधी मिळतो, कधी कधी मिळत सुद्धा नाही. मी: बरे ज्यांना हे पत्र मिळते ते ताबडतोक परत फेड करतात का? ते: कर्ज घेताना त्यांची प्राथमिकता शिक्षण असते त्यामुळे ते सर्व अटी मान्य करून कर्ज घेतात. काही चांगली मुले आणि चांगली कुटुंबे, कर्ज परत फेड आपले इती कर्तव्य समजून लवकर परत फेड करतात, पण काही विध्यार्थ्यांची कर्ज परत फेड करण्याची ईच्छा शक्ती कमी असते. वेळ येते तस तसे त्यांची आयुष्याची प्राथमिकता बदलते असे दिसते. कधी नोकरीं मिळाली नाही, मिळाली तर ती पर्मनंट नाही, जागा विकत घ्यायची असते, लग्न झालेले असते, मूल झालेले असते त्या मुळे परत फेड शक्य होत नाही असे सांगून वेळ मारून नेतात. कधी कधी तर चार चाकी किंवा बंगला घेतात आणि शैक्षणिक कर्ज टांगून ठेवतात. मी: मग अशा मुलांना तुम्ही कर्ज का देता? ते: ही संस्था सामाजिक आहे. समाज आणि त्यातील मंडळी चांगली आहेत या चांगुलपणावर विश्वास असलेली मंडळी देणग्या देतात, त्या पैशातून त्याच भावनेने संस्था विद्यार्थ्यांना परत फेडीच्या अटीवर कर्ज देते. मी: पूर्वी असे कधी होत असे का? ते: हो. पण बरेच विध्यार्थी पैसे परत करीत. आता न देण्याचे प्रमाण वाढले आहे किंवा खूप उशीर करतात. मी: मग तुम्ही काय उपाययोजना करता? ते : त्या विध्यार्थ्यांच्या शिफारस कर्त्याना सांगून बघतो. कधी कधी परिणाम होतो, कधी कधी होत नाही. मी: मग एव्हडा सर्व खटाटोप करायला खूप वेळ आणि पैसा लागतो तो वेळ कोण खर्च करतो? आणि तुमच्यापुढे हे काम कोण करणार? ते: आपण आपले कर्तव्य करत राहायचे. बाकी परमेश्वर बघून घेईल. मी: पण संस्था म्हणून तुम्ही काही स्ट्रातिजी आखली असेल ना? कारण मी असे ऐकले आहे की याच कारणास्तव बऱ्याच ब्राह्मण संस्थानी शैक्षणिक कर्ज देणे बंद केले आहे. शिवाय हल्ली बँका सुद्धा कर्ज देतात. ते: मग ते आपली सामाजिक बांधिलकी म्हणून काय करतात? मी: ते शैक्षणिक शिष्यवृत्ती देतात पण ती परत फेडीची नसते, कारण त्यांचे म्हणणे आहे की समाजात देणगीदार भरपूर आहेत, पण सामाजिक काम करायला कार्यकर्ते कमी आहेत. असले तरी, असली किचकट कामे करायची त्यांची तयाऱी नाही. त्यांच्या मते नवनवीन विध्यार्थी कर्ज घेत राहणार, त्यातील काही परतफेड करणार, काही नाही. मग हे चक्र असेच चालू राहणार. ते याला थँकलेस जॉब म्हणतात. त्यांच्यामते आजकालच्या काळात कर्ज दिल्या नंतर त्याची जाणीव तर राहुंध्या उलट ती वसुल करते वेळी वाईटपणाच येतो. ते: तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण जी जुनी दिलेली कर्जे ती सुद्धा अजून पूर्ण वसुल होत नाहीत. अडचण अशी आहे, ही सुविधा खूप चांगली आहे पण म्हणतात ना एखादा नासका कांदा सर्व कांदे खराब करतो किंवा एखादा घाणेरडा मासा पूर्ण तलाव खराब करतो. मी: हो, जर सर्व मंडळींनी आपआपली कर्जे वेळेवर परत केली असती तर हा प्रश्नच नव्हता पण तसे होत नाही मग दुसरी काही उपाययोजना करावी लागते. नाहीतर आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते अशी परिस्थिती उद्भवायला नको. ते: तुमचे म्हणणे मी आमच्या विश्वसतांच्या कानावर घालीन, बघूया ते काय म्हणतात ते. मी : तुम्ही सांगितलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना मी बोलून बघतो पण ते विचारतील की हा व्यवहार आम्ही आणि त्या संस्थेमधील आहे, तो त्यांनी तुम्हाला का सांगितला, तर काय सांगू? उलटा चोर कोतवाल को डाटे!! ते: त्यांनी त्यांचा संस्थेशी असलेला व्यवहार नीट केला नाही म्हणून ही सांगायची वेळ आली असे मी म्हटले म्हणून सांगा. मी: ठीक आहे, तुमच्या सदकार्याला माझा विनम्र नमस्कार आणि देव त्या सर्व कर्जदारांना वेळेवर परतफेड करण्याची बुद्धी देवो हीच प्रार्थना. माधव भोळे

Thursday, March 14, 2024

बेल आणि कोठडी

बेल आणि कोठडी देवेंद्र फडणवीसांना धमकी देणारा आरोपी किंचक नवले आणि योगेश सावंत यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर ते हायकोर्टात गेले आणि तेथे त्यांना जमानत ( बेल ) मिळाली. बऱ्याच वेळा गंभीर आरोप असलेल्या आरोपीला जमानत मिळते आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा कोर्टावरील विश्वास उडून जातो त्यामुळे प्रथम जमानत का आणि केव्हा मिळते ते समजून घेतले पाहिजे. जेथेपर्यंत एखाद्या आरोपीवर बेलेबल गुन्हा दाखल झालेला असतो तेव्हा पोलिस प्राथमिक चौकशीसाठी आरोपीला पोलीस कोठडीमध्ये नेण्याची परवानगी मागू शकतात. पुढे चौकशी पूर्ण झाल्या नंतर अधिक तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ किंवा न्यायालयीन कोठडी मागू शकतात, अशा वेळी आरोपीचा वकील कोर्टात अर्ज करतो की पोलीस आणि सरकारी यंत्रणेला ज्या ज्या वेळी आवश्यक वाटेल त्या त्या वेळी किंवा ठरवलेल्या वेळापत्रकनुसार पोलिसांना / सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याच्या अटीवर बेल बॉण्ड देऊन आपली न्यायालयीन कोठडी वाचवू शकतो. आणि जर पुढे आरोप सिद्ध झाला तरच त्याला तुरुंगात जावे लागते किंवा दंड भरून त्याची सुटका होऊ शकते. त्यानंतर ९० दिवसाच्या आत पोलिसांना पूर्ण आरोप पत्र सादर करून न्यायालयीन केस करावी लागते. आधीच्या केसला साधी पोलीस केस म्हटली जाते. जरी ९० दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही तरी आरोपी बेल मागू शकतो कायद्याचा भाषेत Bail is rule, jail is an exception. मी वकील नाही पण काही चुकले असेल तर जरूर सांगा म्हणजे मला कळेल. Madhav Bhole

भविष्याचे वेध आणि कॉम्पुटिंग रिसॉर्सेस:

भविष्याचे वेध आणि कॉम्पुटिंग रिसॉर्सेस: ६ मार्च २०२४ रोजी NVidia कॉर्पोरेशन हि २.१५ ट्रिलीयन डॉलर मार्केट कॅपिटलाझेशन असलेली जगातील ४ थी आणि अमेरिकेतील ३ ऱी जास्तीतजास्त किमती कंपनी ठरली. ऍपल आणि मायक्रोसॉफ्ट नंतर अमेरिकेत ३ नंबर वर आणि जगात सौदी आरामको ह्या कंपनी नंतर ४ थी किमती कंपनी म्हणून तिचा नंबर लागतो. काय आहे ह्या NVidia चे प्रॉडक्ट्स? आपण आतापर्यंत कॉम्पुटर मध्ये CPU हा शब्द ऐकला असणार. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कोणत्याही कॉम्प्युटर चा CPU हा एक अविभाज्य भाग आहे. CPU हे कॉम्पुटर चे हृदय आहे. कॉम्पुटर मधील सर्व गणिते तसेच डेटा वाहतूक CPU मधून होते. CPU बंद पडला की कॉम्पुटर बंद. तर CPU चा नवीन अवतार GPU आहे. GPU म्हणजे ग्राफिकलं प्रोसेसिंग युनिट. हा GPU, ग्राफिक्स, अतिशय किचकट असे गेम्स, भलीमोठी गणिते तो CPU पेक्षा जास्त वेगाने सोडवतो. प्रत्यक्ष GPU हा साधे काम करण्यासाठी आखलेला आहे परंतु त्याचे अनेक GPU जोडून संच तयार केले की तो अतिशय वेगवान काम करतो. तो ह्या मध्ये Parallel processing करतो त्यामुळे एक काम अनेक GPU मध्ये वाटतो आणि लवकर परिणाम तयार करतो, जशी आपण एक भाजी ४ लोकांना सोलायला किंवा चिरायला दिली की पटकन तयार होईल तसे. सध्या जगभरात बोलबाला असलेल्या आर्टिफिशल इन्टीलीजन्स ( कृत्रिम बुद्धिमत्ता ), मशीन लर्निंग सारख्या अध्ययावत विषयात प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लाखो पॅरामीटर्स ( बदलणारी गृहिते ) असतात आणि ती वापरून निष्कर्ष तयार करण्यासाठी प्रचंड कॉम्पुटर मेमरी आणि वेग लागतो आणि तो वेग ह्या GPU मध्ये CPU पेक्षा जास्त असतो. ( एक GPU हा साधारण पणे १० ते २०० पट वेगवान असतो. ). तर असे GPU बनवण्यात NVidia, AMD, intel, Qualcom ( for mobile and telecom) ह्या काही प्रमुख कंपन्या आहेत. त्यात सर्वात जास्त वेगवान GPU बनवणारी कंपनी NVidia आहे. त्यांचे H100 GPU मॉडेल आहे. हे त्याच्या आधीच्या मॉडेल A100 पेक्षा ६ पट जास्त वेगवान आहे. NVidia link switch वापरून असे २५६ H100 एकत्र जोडता येतात. अशा प्रकारचे संच Cloud computing मध्ये वापरतात जे पुढे AI अँड मशीन लर्निंग मध्ये वापरतात. सध्या ह्या गोष्टीचे पेव आल्यामुळे NVidia च्या H100 ला खूप मागणी आहे. तुलनाचं करायची झाली तर AMD च्या GPU असलेल्या MI300X ह्या चिपसेट ची किमत १० ते १५ हजार डॉलर्स आहे तर Nvidia च्या H100 ची किमत साधारण ४०,००० डॉलर्स आहे. २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाही मध्ये NVedia ने सुमारे ५,००,००० H100 विकले. मायक्रोसॉफ्ट आणि मेटा हे त्यांचे दोन मोठे ग्राहक आहेत. Perplexity Ai म्हणून एक San Fransisco, California मधील आर्टिफिशल इन्टीलीजन्स वर काम करणाऱया कंपनीचा एक संस्थापक अरविंद श्रीनिवास म्हणतो, मी मेटा( पूर्वीची फेसबुक ) कंपनी मधील एका आर्टिफिशल इन्टीलीजन्स शास्त्रज्ञाला आमच्याकडे काम करतोस कां म्हूणन विचारले तर तो म्हणाला की आधी "१०,००० H1000" काम करण्यासाठी उपलब्ध कर मग माझ्याकडे विचारायला ये. इतकी सध्या कॉम्पुटर रिसॉर्सेसची गरज आहे. आणि इतकी GPU ला मागणी आहे. AI चा पूर्ण प्रवास हा कॉम्पुटर रिसॉर्सेस वरतीच अवलंबुन आहे. आणि अर्थात ह्या रिसॉर्सेस साठी सेमी कंडक्टर, सिलिकॉन इत्यादी मटेरियल ला विशेष महत्व आले आहे. मायक्रोसॉफ्ट ची अझूरे नावाची एक cloud computing शाखा आहे आणि आर्टिफिशल इन्टीलीजन्स मध्ये आतापर्यंत पुढे असलेली कंपनी Open AI जीचा मुख्य प्रवर्तक सॅम अल्टमन आहे ( चॅट जीपिटी ४ वाला). तर काळाची पावले ओळखून, सॉफ्टवेअर मध्ये दादा असलेल्या मायक्रोसॉफ्टने OPEN Ai कंपनी मध्ये एकंदर १३ बिलीयन डॉलर्स गुंतवून ४९% भागीदारी घेतली आहे. ती सुद्धा या अटीवर की ओपन AI यातील बहुतेक रक्कम अझूरे प्लॅटफॉर्म वापरून खर्च करेल. म्हणजे चित भी मेरी और पट भी मेरी. म्हणजे इकडे १३ बिलीयन गुंतवायचे आणि इकडे १३ बिलीयन चा व्यवसाय बांधून घ्यायचा. असो अशाच प्रकारे ज्या टेक्नॉलॉजी वर आधारित हे GPU आहेत त्या तंत्रज्ञातील एक भारतीय शास्त्रज्ञ्, गणिती, पुण्यातील डॉ. नरेंद्र करमरकर, हे आहेत, आणि त्यांनी सिम्प्लेक्स मेथड ह्या मॅनेजमेंट थियरी वापरून parallel processing च्या वर आधारित सुपर कॉम्पुटर काढण्याचा आराखडा २००६ मध्येच तयार केला होता आणि भारतातील दिग्गज अशा एक मोठ्या व्यवसायिक ग्रुपबरोबर भागीदारी सुरु केली होती परंतु बौद्धिक संपदा हक्क कोणाचे राहतील यावर काही अटींवर मान्यता न झाल्यामुळे ती भागीदारी रद्द झाली. या साठी दोन्ही पार्टीचे नक्की कुठे बिनसले ते कळले नाही परंतु एक गोष्ट नक्की की व्यवहारात दोन्ही बाजूनी अडेल तट्टू पणा झाला की व्यवहार पूर्ण होत नाही आणि कार्य नाश होतो. करमरकर यांचे नावावर अनेक पेटंट्स आहेत. हे झाले असते तर कॉम्पुटिंग पावर मध्ये भारताचा झेंडा अटकेपारच काय पण जगाच्या पुढे गेला असता. अर्थात हे सर्व करायला दूर दृष्टी लागते, त्याचा अभाव भारतीय व्यवसायिकात आहे. संशोधनावर पैसे खर्च करणे म्हणजे त्यांचे मते वाया घालवणे आहे. तसेच प्रत्येकाला ते नोकरच समजतात. माधव भोळे

Saturday, March 2, 2024

राखेतून उभे राहणारे - ब्राह्मण

आज काल ब्राह्मणांना शिवीगाळ आणि धमक्या देण्याचे, त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचे काम काही समाज कंटक करताना दिसत आहेत. त्यांना ब्राह्मण म्हणजे पालापाचोळा वाटतो. ईश्वर आराधना करून समाजाला आदर्शवादाकडे नेणे, समाजाला शिक्षित आणि सुसंस्कृत करणे, समाजाला शिस्त लावणे आणि मार्गदर्शन करणे अशी कामे ब्राह्मण करतात. भारतवर्षाच्या आजवरच्या प्रगतीमध्ये ब्राह्मणांचा वाटा मोठा आहे. चंद्रगुप्त मौर्याला राज्य शासनाबद्दल सल्ला देणारा चाणक्य, ब्राह्मण होता. पन्हाळ्याहून सिद्धी जोहरचा वेढा फोडून छत्रपती शिवरायांनी विशाळगडावर सुखरूप पोहोचावे म्हणून शत्रूला पवनखिंडीत (घोडखिंड ) रोखून धरण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा बाजी प्रभू देशपांडे, ब्राह्मण होता. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पश्चात त्यांची सून ताराबाई आणि नातू शाहू महाराज १ (संभाजी पुत्र ) यांच्यामध्ये सामंजस्य तयार करून पुढे महाराज्यांचे मराठा साम्राज्य निष्ठेने चालवणारा आणि वाढवणारा पेशवा बाळाजी विश्वनाथ, हा ब्राह्मण होता. पुढे मराठा साम्राज्य अटके पर्यंत वाढवून मराठा सम्राज्याला स्थईर्य देणारा बाजीराव पेशवा ब्राह्मण होता, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे मेहेंदळे, पटवर्धन असे अनेक सरदार ब्राह्मण होते. १८५७ ला इंग्रजांविरुद्ध मेरी झान्सी नही दूंगी म्हणत युद्ध पुकारणाऱी झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर, तात्या टोपे आणि बिठुरचे नाना साहेब पेशवे २ हे सर्व ब्राह्मण होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम मुलींच्या शाळेसाठी जागा देणारे भिडे ब्राह्मण होते. प. पु. बाबासाहेब आंबेडकरांना सकपाळ ऐवजी आंबेडकर नांव आवडते म्हणून शाळेत बदलून देणारे मुळे गुरुजी ब्राह्मण होते. पुढे स्वातंत्र्य लढ्यात ३% लोकसंख्या असून सुद्धा बलाढ्य अशा इंग्रज्यानपुढे आघाडीच्या नेत्यात लढणारे गोपाळ कृष्ण गोखले, टिळक, आगरकर पुढे तात्याराव सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आणि अनेक स्वातंत्र्य सैनिक ब्राह्मण होते. प्लेग च्या साथीमध्ये पुण्यात इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी रॅनड ची हत्या करणारे चाफेकर बंधू ब्राह्मणच होते. किती उदाहरण देऊ, फेसबुक भरून जाईल 😄 देशासाठी एव्हडे करून सुद्धा ब्राह्मणांचा वंश विच्छेद करण्याची भाषा बोलणारे हे उर्मट कार्यकर्ते, नक्की कोणत्या समाजाचे नेतृत्व करतात? ब्राह्मण आणि मराठे यांचे संबंध एव्हडे वाईट कधीच नव्हते कारण खरे मराठे ब्राह्मणांची किंमत जाणतात. मराठा स्वतःला कुणबी प्रमाणपत्र लावून घ्यायला तयार नाहीत. जरंगे सरसकट सर्वाना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सांगत आहे आणि ते अस्सल मराठ्यांना मुळीच मान्य नाही असे दिसते. एक लक्षात घ्या एका नथुराम गोडसेनी गांधीजींना मारले म्हणून संपूर्ण ब्राह्मण समाजाला गावा गावातून हाकलवून लावून सुद्धा ब्राह्मणांचे अस्तित्व संपत नाही. संपलेले नाही कारण ब्राह्मण कोणापुढे लाचार नाही. ब्राह्मण स्वकर्तृत्वावर जगतो. त्याची ताकद त्याच्या बुद्धिमत्तेत आहे आणि ती जपण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो. मग तुम्ही कितीही शिव्या द्या नाहीतर तूताऱ्या वाजवा. ब्राह्मणाना दुसरे नांव आहे द्विज म्हणजे दोनदा जन्मणारा. एकदा जन्मतो त्यावेळी आणि एकदा मुंज झाल्यानंतर असे ब्राह्मणाचे दोन जन्म असतात असे शास्त्र सांगते. लिहून ठेवतो की यदाकदाचित जरी त्याला संपवायचा प्रयत्न केला तरी तो राखेतून उभा राहील याची त्याला खात्री आहे. संपवणारे संपतील पण ब्राह्मण संपणार नाही. माधव भोळे

Wednesday, January 31, 2024

केल्याने होत आहे (एक अनुभव)!

केल्याने होत आहे (एक अनुभव)! परवा जव्हार, पालघर येथे दोन दिवस फिरायला गेलो होतो. अर्थात ती जागा पावसाळी पर्यटन करण्यासाठी जास्त योग्य आहे पण आम्हाला आता वेळ होता म्हणून आता गेलो होतो. तेथे शाकाहारी रेस्टॉरंट नाहीत. शोधावी लागतील. ५०% वस्ती मुस्लिम आहे, उरलेले आदिवासी आणि इतर. पालघर जव्हार करत एक रस्ता त्रंबक ( नाशिक ) येथे जातो तर दुसरा जव्हार वरून सेलवास (गुजरात दादरा नगर हवेली ) येथे जातो. बाकी एसटी आगारातून महाराष्ट्रात अनेक भागात बसेस जातात. तेथील एका हॉटेल मालकाशी ओळख झाली. तो शाकाहारी मारवाडी होता. अंदाजे वय ४५ असावे. म्हणाला आमचे पूर्वज ६५ वर्षापूर्वी येथे आले. अजूनही जव्हार गावचं आहे. २ किमीच्या पलीकडे सर्व शेत जमिनी. तर ६५ वर्षांपूर्वी काय स्थिती असेल? रस्ते सुद्धा धड नसतील. वीज अर्थातच नसावी. म्हणाला आज आम्ही ४ भावंड व्यवसायात एकत्र आहोत, संसार वेगवेगळे आहेत. आमचे २ रिसॉर्ट आहेत एकामध्ये ५० तर दुसऱ्यात ६० रूम्स आहेत. आणि एक हॉटेल आहे ते २५ वर्षांपूर्वी बांधले त्यात २४ रूम्स आहेत आणि आता जवळच आणखी एक ५ मजली हॉटेल आणि खाली २ मजली शॉपिंग असे ५ कोटी रुपये खर्च करून बांधत आहोत. शिवाय वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी १०० एकर जमीन आहे. बहुतेक हॉटेल मध्ये मॅनेजर ठेवले असून शिवाय मी आणि मोठा भाऊ दररोज साठी छोटे मोठे कॅन्स्ट्रक्शन चे काम करतो. आम्ही जास्त शिकलो नाही पण मुले चांगली शिकत आहेत. म्हणाला हे सर्व एकदम झालेले नाही. आमच्या आजोबानी एसटी स्टॅन्ड समोर चहा, बिस्कीट अशी टपरी टाकून सुरवात केली. पुढे माझ्या वडिलांनी पहिले २४ रूमचे हॉटेल बांधले. अर्थात कर्ज घेऊनच. दर पाच वर्षानी आम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घेतो आणि तो पूर्णतःवास नेवून त्याची व्यवस्था लावतो. सर्व व्यवसाय चालू स्तिथीत आहेत. त्यामुळे कॅश फ्लो चा प्रॉब्लेम नाही. दिवसेंदिवस पसारा वाढवतच आहोत. कोणाशी भांडण नाही तंटा नाही. काही वर्षांपूर्वी येथे जमीन ६० रुपये फूट होती पण येथे राजकारणी मंडळींनी भरपूर जमीन घेऊन ठेवली असून आताचा भाव १००० रु. फूट आहे. आज आमची मुले शिकली तरी ती हेच व्यवसाय पुढे चालवणार. आमच्या वडिलांनी आमची व्यवस्था केली, आम्ही आमच्या पुढील पिढीची. मी म्हटले आमच्या कोकणात याच्या पेक्षा जास्त सृष्टी सौंदर्य आहे. तो म्हणाला तुमच्याकडे थोडे पैसे असतील तर तुम्ही रिसॉर्ट काढून कृषी पर्यटन म्हणून MTDC मध्ये नोंद करा. चांगला प्रॉफिट आहे. पण तुमची मुले हे सांभाळणार असतील तर. ह्यात सुरवातीला थोडा वेळ लागतो पण एकदा तुमचे नांव झाले की मग प्रश्न नाही. अर्थात जव्हार मध्ये कोम्पिटिशन नाही कारण पर्यटन स्कोप लिमिटेड वाटला. पण म्हणाला पावसाळ्यात ४ महिने फुल जाते. मी निष्कर्ष काढला तो असा, ४ भावंडे एकत्र काम करतात. एकदा निर्णय झाला की सर्व एकत्र काम करतात. त्यांच्या फॅमिली ची साथ आहे त्यासाठी ते जव्हार येथे राहणे पसंद करतात, मुले धंदा सांभाळणार आहेत, सांभाळत आहेत. कष्ट करण्याची तयारी आहे. स्वभाव सरळ वाटला. माधव भोळे