Monday, February 9, 2026

नॅशनल स्टार्टअप दिवस, दशक पूर्ती

 नॅशनल स्टार्टअप दिवस, दशक पूर्ती  


१६ जानेवारी २०२६ रोजी भारतातील नॅशनल स्टार्टअप डे ची पहिली १० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने नवी दिल्ली येथे एक आनंदोत्सव भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. बरोबर १० वर्षापूर्वी ( १६ जानेवारी २०१६ ) भारत सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेऊन स्टार्टअपना मदत करायला सुरवात केली. ज्याला स्टार्टअप इकोसिस्टीम असे म्हणतात जसे की स्टार्टअप फंडिंग, टॅक्स सूट, इंटलेकच्यूअल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, मान्यता प्राप्त स्टार्टअपना सरकारी टेंडर भरण्यास स्वीकृती इत्यादी. 


काल एका अनुभवी व्यवसायिक व्यक्तीकडुन स्टार्टअप बद्दल काही वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, त्या म्हणजे स्टार्टअप हे उपयोगी नाहीत. स्टार्टअप प्रोफीटेबल नसतात. त्या पेक्षा सरळ रूळलेले व्यवसाय करावेत इत्यादी इत्यादी. अशाच प्रकरची वक्तव्ये या पूर्वी प्रसिद्ध उद्योजक राजीव बजाज, हर्ष गोयेंका सारख्या अनेक यशस्वी व्यवसायकांकडून सुरवातीला ऐकायला मिळाली. एक फेसबुकवर सुद्धा अशीच पोस्ट बघितली की स्टार्टअपवाली इन्व्हेस्टर मंडळी तीच तीच असतात. त्यांचा एक कंपू असतो. ते व्हाल्यूएशन वाढवत नेतात इत्यादी. त्यांनी कधी बाहेर पडायचे आधीच ठरलेले असते पण सामान्य नागरिकाला काहीच हाती लागत नाही इत्यादी इत्यादी. 


पण सत्य काय आहे?

आपल्या लहानपणी टाटा, बिर्ला, वालचंद सारखे धनाढ्य उद्योजक होते, परंतु संशोधनामध्ये जास्त पैसा न घालता त्यांनी जागतिक कीर्तीच्या उत्पादकांबरोबर करारनामे करून त्या उत्पादकांनी तयार केलेला माल हे भारतात आणून विकायचे किंवा तसाच माल थोडेफार भारताला सुयोग्य बदल करून भारतातच तयार करून विकायचे. बरेच वेळा त्यांनी जुने घिसे पिटे तंत्रज्ञान भारतात आणून त्यावर पैसे कामावले आहेत कारण नवीन तंत्रज्ञान कोण कशाला विकेल? नुकतीच एक बातमी वाचली की मोबाईल, इलेक्ट्रीकलं व्हेईकल पासून अगदी सोलार पॉवर प्लांट साठी लागणाऱ्या लिथीयम आयन बॅटरी बनवणाऱ्या ५ वर्ष जुन्या चिनी कंपनीने रिलायन्स सारख्या बड्या आणि नावाजलेल्या भारतीय कंपनीला आपली टेक्नॉलॉजी विकण्यास नकार दिला. कारण त्यांनी अब्जो डॉलर्स गुंतवून विकसित केलेले तंत्रज्ञान त्यांना दुसऱ्याला आयते द्यायचे नाही. या वरून समजा भारत कोठे आहे?


मॉरीस ओक्सफोर्ड कंपनीने बनवलेले डिझाईन वापरून, बिर्लाची हिंदुस्थान मोटर्स कंपनी वर्षानुवर्षे अँबेसॅडर गाडी विकत होती, तर इटालियन पियाजिओ कंपनीने इटालियन व्हेस्पा स्कुटरचे डिझाईन वापरून बजाज ग्रुप "बजाज चेतक" स्कुटर विकत होती. टाटा ग्रुपने डेलमर बेन्झ कंपनीशी करार करून भारतात कित्येक वर्ष टाटा मरसिडीज बेन्झ ट्रक तयार करून विकले आहेत. जर चांगला व्यवसाय होत असेल तर जोखीम कोण घेणार? पण नोकिया, कोडॅक, हिंदुस्थान मोटर्स सारख्या कंपन्या भाकरी न फिरवल्या मुळेच बंद पडल्या किंवा पाठी पडल्या.


जेथपर्यंत बाजार परकीय कंपन्याना खुला नव्हता तेथपर्यंत ह्या धनिकांची डाळ शिजत होती. पण १९९१ च्या भारताच्या न्यू इकोनॉमिक पॉलिसी नंतर भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले. नवनवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन मार्केटिंग स्ट्रॅटिजी वापरून अमेरिकन, युरोपीयन, चिनी प्रोडक्ट्स भारतीय बाजारपेठा काबीज करू लागले. उशिरा कां होईना संशोधन महत्वाचे हे लोकांना आणि व्यवसायकांना लक्षात येऊ लागले. 


अगदी नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळापासुन जरी देशात संशोधन खर्चावर टॅक्स सूट मिळत असली तरी संशोधनावर खर्च न करता त्याचा लाभ टॅक्स चोरी करण्यासाठी हे उद्योजक वापरत असत. थोडक्यात संशोधन आणि उद्योजकांचे नाते विळ्या भोपळ्याचे असे. 


टाटा ग्रुप जरी १८६८ मध्ये स्थापन झाला असला तरी पहिली संपूर्ण भारतीय बनवटीची पॅसेंजर गाडी टाटा इंडिका यायला १९९८ साल उजाडले. याचे कारणच मुळी संशोधनाचा अभाव. 


स्टार्टअप म्हणजे नुसते संशोधन नाही तर नवीन पद्धतीने ( प्रोसेस) किंवा नवीन तंत्रज्ञान वापरून किंवा नवीन व्यवस्थापन तंत्र वापरून केलेला व्यवसाय. अनेक वेळा एखादा व्यवसाय आजपर्यंत न सोडवलेले सामाजिक, आर्थिक, अन्य विषयातील प्रश्न किंवा न दिलेल्या सेवा जर समाधानकारक देऊ शकत असेल तरी त्याला स्टार्टअप म्हणता येईल. अनेक वेळा हे व्यवसाय रूळलेले नसल्यामुळे अशा व्यवसायाना नफ्यामध्ये यायला वेळ लागतो. काही वेळा त्यांची सुरवातीची गुंतवणूक खूप मोठी असते. त्यांचा आवाका एव्हडा मोठा असतो की त्याची जोखीम एकटा दुकटा व्यवसायिक घेऊ शकत नाही. अशा वेळेला जे गुंतवणूकदार अशी जोखीम भागीदारीत किंवा एकटे किंवा समूहाने घ्यायला तयार होतात त्याला वेंचर कॅपिटलिस्ट असे म्हणतात. 


अर्थातच कोणताही वेंचर कॅपिटलिस्ट अंध:पणे फक्त लालच म्हणून कोणतीही गुंतवणूक करत नसतो, तर त्याची ती calculated रिस्क असते. त्याला माहिती असते की १० पैकी ७ स्टार्टअप पुढपर्यंत पोहोचतच नाहीत पण उरलेल्या ३ त्यांची गुंतवणूक कित्येक पाटीनी परतावा देतील. जेथपर्यंत स्टार्टअप आपल्या हेतूवर शुद्ध असतो किंवा त्याची कामाची दिशा आखलेल्या नियोजना प्रमाणे असते तेथपर्यंत गुंतवणूकदार आशावादी असतो. आणि तो व्यवसाय फळा फुलाला आला की तो त्यातून काही प्रमाणात बाहेर पडून आपली गुंतवणूक मोकळी करतो.


अशा शेकडो स्टार्टप आहेत ज्यांनी बिलीयन्स ऑफ रुपयांचा परतावा दिला आहे. Naukri.com, makemytrip सारख्या कंपन्या आहेत ज्या अशा वातावरणात यशस्वी झाल्या आहेत. ओला / उबेर, blinkit, झेपटो, झोमॅटो, पोलिसीबाजार, ऍमेझॉन सारख्या कंपन्याची नांवे तर घरा घरामध्ये पोहचली असून बच्चा बच्चा त्यांना ओळखतो. त्यांनी तयार केलेले मार्केट ( बाजार) पारंपरिक मार्केट पेक्षा कितीतरी मोठे आहे. 


भारताच्या GDP मध्ये स्टार्टअप नी २०२३ साली १४० बिलीयन डॉलर्सने सहभाग केला असून २०३० पर्यंत तो १ ट्रिलीयन पर्यंत जाईल असा अंदाज आहे. हा आकडा सद्याच्या GDP च्या ४ ते ५% आहे. त्यांनी सुमारे १६ लक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.


जसे प्रत्येक केलेला व्यवसाय यशस्वी होतोच असे नाही तसेच वर लिहिल्या प्रमाणे प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होईलच असे नाही. शेवटी स्टार्टअपच्या कल्पने प्रमाणेच स्टार्टअपचे नेतृत्व, आर्थिक आणि अन्य व्यवस्थापन, कामाशी प्रामाणिकपणा आणि यशस्वी होण्याची तळमळ इत्यादी अनेक गोष्टीवर स्टार्टअप किंवा कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.


माधव भोळे


सॅम वॉल्टन (१९१८-१९९२)

 सॅम वॉल्टन (१९१८-१९९२)

(वॉलमार्टचे सह-संस्थापक)


अनेक वर्षांपूर्वी, जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेन वॉल-मार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांनी मोठ्या हुशारीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला होता. जेव्हा प्रत्येकजण विक्री आणि सेवेबद्दलच्या भाषणाची अपेक्षा करत होता, तेव्हा त्यानी या शब्दांनी सुरुवात केली:


"मी तो माणूस आहे जो रेस्टॉरंटमध्ये जातो, टेबलावर बसतो आणि संयमाने वाट पाहतो, तर वेटर माझ्या ऑर्डरची नोंद करणे सोडून बाकी सर्व काही करतो."


मी तो माणूस आहे जो दुकानात जातो आणि शांतपणे वाट पाहतो, त्यावेळी विक्रेते त्यांची वैयक्तिक संभाषणे पूर्ण करत असतात.


मी तो माणूस आहे जो पेट्रोल पंपावर जातो आणि कधीही हॉर्न वाजवत नाही, तर कर्मचारी आपले सकाळचे वर्तमानपत्र वाचून पूर्ण करेपर्यंत मीं संयमाने वाट पाहतो.


मी तो माणूस आहे जो एका वस्तूसाठी आपली गरज समजावून सांगतो, आणि तीन आठवडे वाट पाहिल्यानंतर ती मिळाल्यावरही तक्रार करत नाही.


मी असा माणूस आहे की, जेव्हा तो एखाद्या व्यावसायिक ठिकाणी जातो, तेव्हा तो जणू काही तें आपल्यावर उपकारच करत आहेत असे त्यांना वाटते.मीं फक्त एका हास्यासाठी विनवणी करत आहे किंवा फक्त आपल्याकडे लक्ष दिले जावे अशी आशा बाळगत आहे असे त्यांना वाटते.


तुम्हाला वाटत असेल की मी एक शांत, संयमी, कधीही त्रास न देणारा माणूस आहे.

..... पण तुमचा गैरसमज आहे.


मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मी तो ग्राहक आहे जो कधीही परत येत नाही!


 तुमच्या कंपनीत मला परत आणण्यासाठी दरवर्षी सर्व प्रकारच्या जाहिरातींवर लाखो रुपये खर्च केलेले पाहून मला खूप आनंद होतो. कारण जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो होतो, तेव्हा त्यांनी फक्त एक छोटी, साधी आणि स्वस्त गोष्ट करायला हवी होती: माझ्याशी थोडे अधिक सौजन्याने वागायला हवे होते.


लक्षात घ्या बॉस फक्त एकच असतो: तो म्हणजे ग्राहक. आणि तो आपले पैसे दुसरीकडे खर्च करून कंपनीतील अध्यक्षांपासून ते शिपायापर्यंत, प्रत्येकाला कामावरून काढून टाकू शकतो.


यशस्वी व्हायचे असेल, तर इतरांपेक्षा उत्तम ग्राहक सेवा द्या.


सॅम वॉल्टन




Saturday, January 24, 2026

पुण्य स्मरण !!

पुण्य स्मरण !!

मीं आणि माझे एक मित्र चर्चा करीत होतो. आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक मंडळींनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्यासाठी काही ना काही मदत केली आहे. त्या लोकांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्याची परतफेड होणे शक्य नाही परंतु त्यांचे पुण्य स्मरण करणे कसे शक्य होईल? 


मीं त्या वेळी माझ्या आयुष्यातील एक गोष्ट त्याला सांगितली. माझी आई ज्यावेळी विवाह होऊन आमच्या गावी आली त्यावेळी आमच्या घरी आंब्याची कलमे किंवा विशेष झाडें नव्हती. या उलट मामाच्या घरी आणि त्यांच्या संपूर्ण गावात अनेक आंब्याची कलमे होती. ज्या वेळी मामा माझ्या आईला सासरी सोडायला आले त्यावेळी त्याने येताना आंब्याची ३ कलमे ( रोपे )आणली ती आमच्या शेतात लावली ( अर्थात त्याला पाणी घालण्याचे काम आमच्या आईकडील मंडळींनी केले). आज शंभर वर्ष होऊन गेली त्या तीन पैकी दोन झाडें अजूनही जिवंत आहेत ( एक वादळामध्ये मोडले) आणि आम्हाला एक वर्ष आड करून घरच्यापुरते आंबे त्या झाडापासून मिळतात. दरवर्षी आंबा खाताना आम्ही आमच्या मामाची आठवण काढतोच काढतो.


त्या वरून ही कल्पना सुचली की प्रत्येकाने आपल्या प्रियजनांसाठी किंवा आपल्याला निष्काम मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी निरापेक्ष बुद्धीने एक तरी झाड लावायचे, मग त्याचा उपयोग कोणालाही झाला तरी चालेल. 


झाड जगले म्हणजे पशु पक्षीचे आणि सकल प्रणि्मात्रांचे जीवन समृद्ध होईल, लोकांना आणि श्रुष्टीला ऑक्सिजन नामक टॉनिक मिळेल आणि वातावरण बदला सारख्या समस्येवर उपाय म्हणून आपला खारीचा कां होईना, वाटा राहील. 


एकाने लिहिले आहे "एका डाळिंबा मध्ये किती दाणे आहेत तुम्ही मोजू शकता परंतु एका दाण्यापासून किती डाळिंब निर्माण होतील हे सांगणे अवघड आहे म्हणून सत्कर्म करीत रहा".


माधव भोळे

Thursday, January 1, 2026

जगातील अलौकिक सोमनाथचे मंदिर

जगातील अलौकिक सोमनाथचे मंदिर 

गुजरात मधील सौराष्ट विभागातील गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ तालुक्यातील वेरावळ शहरातील ( पूर्वीचे नांव प्रभास पाटण ) येथील सोमनाथ मंदिर ( ज्याला सोरटी सोमनाथ मंदिर असेही म्हणतात ) सर्वांनाच माहिती आहे.


आपण इतिहासामध्ये वाचले आहे की तुर्कीचा आक्रमक बादशाह गझनीचा महंमद याने सण १०२४ पासून १७ वेळा सोमनाथच्या मंदिरावर स्वारी केली आहे आणि प्रत्येकवेळी ते सोने, हिरे, माणिक, मोती यांच्या सहित लुटले आहे. त्या नंतर अल्ला उद्धीन खिलजी पासून अगदी औरंगजेब पर्यंत आलेल्या सर्व मुस्लिम आक्रमकांनी हेच केले आहे.  


परंतु अफाट सिंधू समुद्राजवळ असलेले हे सोमनाथ मंदिर आणखी एका गोष्टी साठी विशेष प्रसिद्ध आहे. हे सर्व आक्रमक मंदिरातील जड जवाहिरे लुटू शकले, त्यांनी आतील शंकराच्या पिंड्या तोडल्या परंतु त्या मंदिराचा भक्कम पायाला ते हात लावू शकले. ना भूकंप, समुद्राच्या लाटा त्याला कमकुवत करू शकल्या. वैदिक काळातील हे बांधकाम स्थापत्य शास्त्रासाठी एक अव्वल नमुना आहे. मॉडर्न सायन्स आणि इंजिनियरिंगच्या काळाच्या कितीतरी पुढेजाऊन ह्या कल्पना वेद कालीन तयार झाल्या आहेत.


होय, सोमनाथ मंदिराच्या पायामध्ये भूकंप आणि समुद्राच्या लाटांचा सामना करण्यासाठी तयार केलेली एक कल्पक प्राचीन अभियांत्रिकी प्रणाली समाविष्ट आहे, ज्यामध्ये एकमेकांत गुंतलेले दगड, पाण्याखालील निचरा प्रणाली आणि धक्के शोषून घेणारे खांब आहेत. हे खांब हालचालीस वाव देतात आणि भूकंपाची ऊर्जा विखुरतात, ज्यामुळे मंदिर महत्त्वपूर्ण धक्के सहन करू शकते, ज्यात २००१ च्या विनाशकारी गुजरात भूकंपाचाही समावेश आहे. 


आपणांस माहिती असेलच की सध्याचे अयोध्येतील राम मंदिर बांधताना लार्सन अँड टूब्रो कंपनीला एकदा संपूर्ण पाया तोडून परत घालावा लागला कारण जमिनी खालून शरयू नदीचा प्रवाह वाहत होता आणि तो पायाला झीजवत होता. पाईल फाउंडेशन करून सुद्धा ही स्थिती होती, या वरून आपण कल्पना करू शकता.


पायाची प्रमुख वैशिष्ट्ये:

आंतरजोडणी केलेले दगड: पायामध्ये एकमेकांत जोडलेले दगड वापरले आहेत, ज्यामुळे भूकंपाच्या वेळी कडकपणे तडे जाण्याऐवजी किंचित हालचाल शक्य होते आणि ऊर्जा विखुरली जाते.


लाट विखुरणारी प्रणाली: समुद्राच्या लाटांना तोडण्यासाठी आणि विखुरण्यासाठी पाण्याखाली एक रचना तयार करण्यात आली होती, ज्यामुळे मंदिराचे भरतीच्या शक्तींपासून संरक्षण होते.


पाण्याखालील निचरा प्रणाली: पाया मध्ये काढलेले कालवे लाटांचे पाणी बाहेर वाहून जाण्यास मदत करतात, ज्यामुळे पाण्याचा दाब साचत नाही.


शॉक ॲब्सॉर्बर: संरचनेखालील खांब शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतात, ज्यामुळे भूकंपांमुळे होणारी कंपने कमी होतात.


लवचिक चुना: चुना, शिंपले आणि गुळाचे प्राचीन मिश्रण आधुनिक काँक्रीटच्या विपरीत, खाऱ्या पाण्यात अधिक मजबूत होते.


लवचिकतेचा पुरावा:

२००१ चा भूकंप: २००१ च्या कच्छच्या भीषण भूकंपात, ज्याने गुजरातचा मोठा भाग उद्ध्वस्त केला होता, त्यातून हे मंदिर कोणत्याही मोठ्या संरचनात्मक नुकसानीशिवाय बचावले.


वैज्ञानिक अभ्यास: एमआयटी आणि स्टॅनफोर्डसारख्या संस्थांमधील आधुनिक शास्त्रज्ञ या मंदिराच्या पायाच्या रचनेवर संशोधन करत आहेत, जेणेकरून त्यातील प्रगत सागरी आणि भूकंप-प्रतिरोधक अभियांत्रिकी समजून घेता येईल.


पारंपरिक ज्ञान, पदार्थ विज्ञान आणि सामरिक रचनेचे हे संयोजन सोमनाथ मंदिराला भूकंप-प्रतिरोधक स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना बनवते, जे अत्याधुनिक वैदिक अभियांत्रिकीचे दर्शन घडवते.


अशा ह्या थोर संस्कृतीचा मीं पाईक आहे याचा मला अभिमान वाटतो.


माधव भोळे 


Tuesday, December 2, 2025

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास 


आज बिहार मधील पूर्व चंपारणमध्ये विराट रामायण मंदिर परिसरात, ३३ फूट उंच, १७.८ फूट परीघ असलेली २१० टन वजन असलेली, एकाच ग्रानाईट दगडातून कोरलेली, सहस्त्रलिंग शिवलिंगाची महाकाय मूर्ती स्थापन करण्यासाठी तामिळनाडू मधील महाबलीपुरम मधून निघाली असे वाचले. 


दिवसेंदिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारची देवळे स्थापून करून किंवा असलेल्या देवळानचा जीर्णोद्धार करून गेल्या ५०० वर्षात धर्माची आणि आस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न बहुतेक सत्ताधाऱ्यांकडुन होताना दिसत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण त्या मागे नक्की विचार काय आहे हे जाणून घ्यायला हवा.


पूर्वीचे राजे महाराजे जनता भुकी किंवा अर्ध पोटी असताना सुद्धा अशा प्रकारची मंदिरे बांधून आपली धर्माबद्दलची आस्था, कर्तव्य आणि कलासक्ती याचे प्रदर्शन करीत. जनतेच्या अडीअडचणी, त्यांची सुख दुःखे आणि प्रशासनात बोकाळत चाललेला भ्रस्टाचार याच्याशी त्यांचे सोयर सुतक नव्हते कीवा ते जाणून घेण्याची तसदी ते घेत नसतं. एखाद दुसरा गुन्हेगार पकडला गेला तर त्याला कडेलोट करायचा की झाले काम ( ED सारखे ).


आज कालचे सर्वच राजकीय पक्ष अश्याच प्रकारचा विचार करतात. काल झालेल्या नगर पंचायत आणि नगर परिषदांमध्ये मतदानासाठी पैसे वाटून जागा जिंकण्याच्या कार्यक्रमात तर जणू स्पर्धाच लागली होती. कारण त्यांना माहिती आहे की एकदा जिंकून आले की जेव्हडे खर्च केले त्यांच्या १०० ते १००० पट ते हडप करू शकतात. सरकारी अनुदान, निधी वाटप, भूखंड लाटणे, टेंडर घोटाळे, टेंडर शिवाय वर्क ऑर्डर काढणे, नाले सफाई या साठी त्यांच्या सभामध्ये राजरोस हाणामाऱ्या होताना लोकांना दिसतात ते काही देशप्रेम म्हणून नव्हे. आणि या गोष्टी फक्त बदनाम नेत्यांबद्दलच नाही तर त्यांच्या चेल्या चपाट्या पासुन ते गल्ली मधील छोटया कार्यकर्त्या पर्यंत लागू आहेत. एव्हडी सरकारी ऑडिट होऊन सुद्धा हे घडते म्हणजे विचार करा. भ्रस्टाचार नुसता निधी खाण्यातच नाही तर सामान्य माणसांच्या सेवा पुरवण्यात सुद्धा होत आहे. मृत बॉडी पोस्ट मार्तंम केल्या नंतर पैसे दिल्याशिवाय लवकर मिळत नाही ही अवस्था आहे. ( सारांश सिनेमा बघा. पण ही सत्य परिस्थिती आहे.)


अशा वेळी मूळ मुद्धे झाकण्यासाठी, लोकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष व्हावे म्हूणन आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी धर्म ही एक अफूची गोळी म्हणून अनेक राज्यकर्त्यांनी कित्येक शतके याचा वापर केला आहे. 


औरंगजेब कोणतेही नीच कृत्य करताना ते इस्लामच्या इफाजतीसाठी करत आहे असे सांगून करायचा मग ते सक्ख्या भावाला दारा शु्कोहोला मारणे असून दे की जन्म दात्या बापाला कैदेत टाकणे असून दे आणि त्याचे पोसलेले मौलवी त्याच्या निर्णयावर हाजी म्हणायचे. बस.


धर्माचा मूळ उद्धेश अत्याचाराविरुद्ध लढणारा, सुसंस्कृत, संस्कारी नागरिक तयार करणे जों एक न्याय्य व्यवस्था असलेला समाज निर्माण करेल अथवा त्याचा भाग बनेल. त्याचसाठी वेद, रामायण, महाभारत, श्रीमद भगवद गीता, इत्यादी धर्म ग्रंथांची निर्मिती झाली. मंदिर किंवा देवमूर्ती हे त्या धर्माच्या आशा आकांक्षाचे प्रतिक मानले गेले. त्या मूळ उद्धेशाला हरताळ फासून चाललेली ही धर्म पुनरस्थापना हा एक दिखावाच म्हणावा लागेल. याचे कारण राजा कालस्य कारणम. 


मंदिरे बनवूच नयेत या मताचा मीं नाही, परंतु हा देश धर्माने चालावा असे वाटतं असेल तर जमिनीवरील त्रुटी कमी करून सुधारणा होणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे असे मीं मानतो. मीं एक सनातनी असून धर्म आणि देव मानतो म्हणून हे लिहावेसे वाटले.


माधव भोळे

Monday, December 1, 2025

देव धर्म आणि कुळाचार

देव धर्म आणि कुळाचार 


आज काल अनेक मंडळींना आपल्या घरचा देव धर्म, कुलदेवता, कुळाचार, गोत्र, इत्यादी गोष्टी माहिती नसतात. मग अडचण आली की लोक कोणा कोणाला तरी विचारत राहतात आणि अर्धवट माहितीवर पुढे काम करतात. 


पुढील पिढी इंग्रजी माध्यमातून शिकलेली असणार अशा वेळी ही माहिती आवश्यक आहे असे वाटते. कित्येक वेळा पुढील पिढीला ते सांभाळायचे असते परंतु त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसते.


जर आपण अशी माहिती आणि ते कुळाचार कसे करावेत याची थोडक्यात माहिती लिहून ठेवली तर किती सोपे होईल. तसेच प्रत्येक वेळचा नैवेद्य कसा करावा याची सुद्धा थोडक्यात माहिती लिहून ठेवायला हवी. 


आपण जर आपापल्या घरची ही माहिती लिखित स्वरूपात ठेवली किंवा त्याला लॅमिनेट करुन ठेवले तर त्याचा उपयोग आपल्या पुढील पिढ्याना होईल असे वाटते.

मला वाटते यात किमान खालील गोष्ट लिहायला हव्यात 


१. आडनांव

२. गोत्र

३. मूळ गांव आणि मूळ चौथऱ्याचा पत्ता 

४. लेख लिहिला त्या वेळचे वास्तव्य आणि पत्ता 

५. कुल देवता आणि कुल दैवत 

६. ग्राम देवता 

७. चैत्र हळदीकुंकू 

८. श्रावण मांस विशेष 

८.१ नारळी पौर्णिमा नैवेद्य ( जागर )

८.२ गोकुळ अष्टमी उत्सव 

८.३ श्रावण महिन्यातील एकादशण्या

८.४ वार्षिक रुद्र वगैरे करण्याची प्रथा 

९. गणपती आराधना ( किती दिवस ). 

९.१ गणपतीवर एकादशणी करतात कां? अथर्वशिर्ष पठण इत्यादी 

१०. गौरी आराधना ( कशी करतात ). खड्याच्या, मुखवटा, इत्यादी 

१०.१ गौरी नैवेद्य कसे आणि कोणत्या दिवशी करतात.

११. अनंत पूजा असल्यास ती कधी करतात 

१२. महालय पर्व : श्राद्ध & ते करण्याची पद्धत ( चटावर, पिंडदान इत्यादी ). श्राद्ध करण्याची तिथी. 

पिंडदान करण्यासाठी वडील, आजोबा, पणजोबा यांची तसेच तर्पण करण्यासाठी इतर जवळच्या नातेवाईकांची नांवे आणि गोत्र 

१३. नवरात्र : हिंदू पंचांगात ३/ ४ वेळेला नवरात्र या पैकी कोणतेही एक केले जाते.

१३.१ चैत्र नवरात्री 

१३.२ अश्विन नवरात्री 

१३.३ कार्तिक नवरात्री 

१३.४ मार्गशिर्ष नवरात्र ( खंडोबाचे ) इत्यादीl

नवरात्र स्थापन करणे, नवरात्र करण्याची पद्दत, बसता उठताना सवाष्ण, कुमारिका पूजन, महालक्ष्मी पूजन, अष्टमी होम, नवरात्र उठवणे, दररोज नैवध्य पद्धत 

१४ दीपावली नैवेद्य

१४.१ वार्षिक कार्तिकी किंवा तत्सम ग्राम दैवत उत्सव 

१४.२ देव दीपावली नैवेद्य 

१५. होळी उत्सव ( नैवेद्य गोडे नैवेद्य आणि तिखट नैवेद्य ). होलिका दहन 

१६. धनुर्मास नैवेद्य

१७ संक्रांत : हळदीकुंकू. 

     १७.१ संक्रांत नववधू विशेष.


आम्ही आमच्या वीर गावामध्ये श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवाचा उत्सव कसा साजरा करावा याचे असेच लिखाण करून ठेवले आहे, जे वज्रलेप पुरवणी मध्ये प्रसिद्ध केले आहे.


यात काही सुधारणा हवी असल्यास कळवावी.


माधव भोळे 


सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व

 सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व 


काल एक  तडफदार मराठी ब्राह्मण अभिनेता, सुयश टिळक याने श्रीलंकेतील दित्वा चक्री वादळात कोलंबो एअरपोर्ट बंद झाल्यामुळे त्याच्यासहित प्रवाशांचे झालेले हाल, तेथील एयरलाईन्स आणि भारतीय दुतावासाचे कर्मचारी यांनी आपल्या व्यक्तिगत अडचणी बाजूला ठेवून प्रवाश्याना मदत करण्यासाठी केलेले शर्थीच प्रयत्न आणि एकंदर ३८ तासाचा तो कठीण काळ या बद्धल वर्णन करणारी आणि सर्व मदत करणाऱ्या आणि प्रार्थना करणाऱ्या मित्र मंडळीचे आभार व्यक्त करणारी पोस्ट टाकली. पोस्टचा उद्देश सरळ आणि स्पष्ट होता.


परंतु ब्राह्मण माणसाने कुठलीही पोस्ट टाका त्यावर काही ठराविक समाजातील लोकांनी कुसकट, खवचट टिप्पणी नाही केली तर ते स्वतःला संविधान प्रेमी मंडळी कशी म्हणवतील? 


एकाने विचारले, "अरे तू तिकडे विदेशात कशाला गेला होतास? आता तू परत लोकमान्य टिळकांसारखे सोन्याच्या योनीतून प्रवेश करणार कां?".  विषय काय? तू लिहितोस काय? जरा तरी परिस्थिचे गांभीर्य? किती नीच वृतीची ही हलकट माणसे आहेत!!


होय लोकमान्य टिळकांनी आपला मुलगा श्रीधर याचा व्रतबंध करायचे ठरवले त्यावेळी पुण्यातील पुरोहित मंडळींनी त्यांना संगितले की तुम्ही विदेश यात्रा केली आहेत तर हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे तुम्ही प्रायश्चित घेतल्याशिवाय आम्ही तुमच्या मुलाची मुंज लावणार नाही. प्रायश्चित चित्त असे की त्यांनी प्रतिमात्मक सोन्याच्या योनीतून प्रवेश करायचा. 


त्यावेळी श्रीधर टिळक म्हणाले की माझी मुंज नाही झाली तरी हरकत नाही पण हे होऊ द्यायचे नाही. त्या वेळी लोकमान्यांनी ब्रह्मवृंदाच्या शब्दाला मान देत तो विधी केला आणि श्रीधरची मुंज लावली. त्या एका गोष्टीसाठी ब्राम्हण विरोधी मंडळींनी त्या काळी लोकमान्यानवर सडकून टीका केली. लोकमान्यांच्या ब्रह्मवृंदानंपुढे नमते घेण्याच्या एका चुकीसाठी त्यांच्या इतर सद्गुणानवर बोळा फिरवणारे हे कोण? ह्यांची काय लायकी?


तो काळ संपला, टिळक सुद्धा गेले आणि ते ब्रम्हवृंद सुद्धा गेले असणार, पण अजून १०० वर्षानंतर सुद्धा हेच ताशे आणि टोमणे लोक अजूनही मारत आहेत. सुंभ जळले तरी पिळ जळत नाही. 


मग कां कोणी वर्मा कर्मा IAS च्या कुटुंबात लोक आपली ब्राह्मण कन्या दान करतील? जों म्हणतो की जेथपर्यंत माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीच्या मुलाला कोणी ब्राह्मणव्यक्ती जेथ पर्यंत आपली मुलगी देत नाही तेथपर्यंत आरक्षण आवश्यक आहे. त्या मुलीला काय दररोज टोमणे खाऊन आत्महत्या करायची आहे?


जातीच्या भिंती होत्याच त्या अजूनच रुंदावत चालल्या आहेत इतकेच. सुधारणा काहीही नाही कारण द्वेष नसानसात भिनला आहे.


माधव भोळे