Sunday, August 13, 2023
बारसु चा विरोध बघत
बारसु चा विरोध बघता खालील प्रश्न मनात येतात:
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक गावात कमीतकमी 2 ते 3 सामाजिक मंडळे आहेत. या सर्वांची काही असोसिएशन वगैरे आहे कां?
जर असेल तर त्यांनी आपापल्या गावचा विकास सोडून, संपूर्ण तालुका किंवा जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कोणता प्रकल्प आणण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? सरकारी योजना गावोगावी समजावून सांगण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी काही मार्गदर्शन केले आहे कां?
मोठ्या प्रमाणात सहकारी तत्वावर किंवा इतर पद्धतीने
1) फूड प्रोसेसिंग
2) मत्स्योत्पादन आणि एक्स्पोर्ट
3) मधुमक्षी पालन
4) रेशीम किडा पालन
5) मसाला झाडें लागवड
6) कॉफी लागवड
7) रंगीत मासे पालन आणि प्रोजोत्पादन तसेच एक्स्पोर्ट
8) इतर पर्यावरण पूरक प्रकल्प
9) वृक्षारोपण
इत्यादी प्रकल्पासाठी काही प्रयत्न झाले कां?
फक्त कारणे देऊन उपयोग नाही, विरोध करून उपयोग नाही तर कोकण विकासासाठी पर्याय हवाच...
अँटी कॅथी वुड गुंतवणूक सूत्र:
अँटी कॅथी वुड गुंतवणूक सूत्र:
आज एक बातमी वाचली. अदानीच्या फॅमिली ट्रस्ट ने रू. 15, 446 करोड ( $ 1.87 बिलियन) किमतीचे अदानी एंटरप्राईसेस, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन ह्या कंपन्यांतील स्वतःचे मालकीचे सरासरी सुमारे 3.5% समभाग GQG पार्टनर ( ग्लोबल क्वालिटी ग्रोथ) ह्या अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन स्टॉक एक्सचेंज नोंदणीकृत मालमत्ता फंडला विकले. अदानीचे हे चारही समभाग गेल्या 2 महिन्यात 50 ते 70 % ने घसरले होते. GQG partners जगभरात 92 बिलियन डॉलरचा फंड मॅनेज करतो. त्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजीव जैन असून त्यांना या विषयातील 22 वर्षाचा अनुभव आहे. जैन ह्या फंडचे प्रवर्तक आहेत.
त्यांच्याबद्दल लिहिताना पत्रकार लिहितो की ते अँटी कॅथी वुड गुंतवणूक सूत्र वापरतात. काय आहे हे अँटी कॅथी वुड सूत्र? अँटी कॅथी वुड ह्या ए. आर. के. इनोवेशन ई.टी. एफ. फंड चालवतात. हा एक फोकस फंड आहे. ज्या वेळी इंटरनेट, कॉम्पुटर, नवीन टेक्नॉलॉजी ह्या विषयात शेयर मार्केटमध्ये तेजी होती तेव्हा ह्या टेक्नॉलॉजी फंडाने खूप कमाई करून दिली. करोना नंतर गेले 2 वर्ष अमेरिका आणि युरोपमधील मंदी, महागाई आणि युक्रेन युद्ध या मुळे टेक्नॉलॉजी शेयर मध्ये झालेली घसरण या विरुद्ध मूलभूत किंवा पारंपरिक व्यवसायाला आलेली मागणी या मुळे त्या शेयर मध्ये भरभराट दिसून आली. भारतात सुधा पेटीएम, झोमॅटो, नायका, सारख्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे भाव घसरले. अमेरिकेत अनेक टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये लोकांना कामावरून काढून टाकले गेले.
आता अमेरिकेत अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी फोकस गुंतवणुकीला कॅथी वुड गुंतवणूक सूत्र म्हणतात. पारंपरिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे एक नवीन "अँटी कॅथी वुड सूत्र असे घोषवाक्य तयार केले आहे.
GQG partners च्या राजीव जैन यांचे मते अदानी यांचे वरील कंपन्यांचे सद्याचे मूल्य गुंतवणूक करण्यायोग्य असून त्यांच्या कंपन्या पुढे अपेक्षित काम करू शकतील असा त्यांना विश्वास वाटतो. तसेच त्यातील बहुतांश पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या असल्यामुळे त्या भारताला आवश्यक असलेल्या प्रगतीसाठी दमदार कामगिरी करू शकतील.
एक लक्षात घ्या राजीव जैन जरी भारतीय वंशाचे असेल तरी ते एक मुरब्बी गुंतवणूक तज्ञ असून 92 बिलियन डॉलरचा फंड सांभाळत आहेत. लाँग टर्म गुंतवणुकी वर त्यांचा विश्वास आहे. काल ही बातमी आल्यानंतर त्याचा ताबडतोब परिणाम म्हणजे ऑस्ट्रेलियन शेयर मार्केट मध्ये GQG partners चा शेयर 3.02% ने कमी झाला. परंतु असे खाली वर मार्केट होतच असते. गेल्या 3 वर्षात हा शेयर 7.52% सरासरी परतावा देत होता जो अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन बाजाराच्या मानाने चांगला आहे परंतु गेल्या महिन्यात त्याने -2.43 परतावा दिला आहे.
माझ्यामते व्यक्तिगत गुंतवणूकदारांनी कोणत्याही एका सेक्टरवर अवलंबून न राहता 5 ते 7 मुख्य प्रगतिशील सेक्टर मधील चांगले शेयर आपल्या पदरी ठेवले आणि त्याचा वेळोवेळी रिव्ह्यू घेतला तर नक्कीच फायदेशीर होईल.
माधव भोळे
मातृदिन mothers day विशेष:
मातृदिन mothers day विशेष:
आज 14 May म्हणजे mothers डे.
खरोखरच कल्पना चांगली आहे. ज्या मातेने आपल्या भविष्याची आणि प्राणाची परवा न करता आपल्याला वाढवले तिची आठवण अथवा तिचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे.
पण मातेला वृद्धाश्रमात ठेवून मदर्स डे च्या शुभेच्छा देणारे, ५ मुले किंवा मुली असताना प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ७३ दिवस सांभाळणार म्हणून मातेचा हिशोब करणारे, आईने किंवा वडिलांनी बहिणीला सुधा इस्टेटी मधील वाटा दिला म्हूणन त्यांचा छळ करणारे किंवा मुलीने सुधा पालकांचा सांभाळ करायला हवा म्हणून नवऱ्याला बजावणाऱ्या सुना मी बघितल्या आहेत.
हे जिवंत पणी ज्यांना भोगायला लागले तरीसुद्धा माझ्या मुला नातवंडांचा संसार सुखाचा होवो म्हणून त्यांना आशीर्वाद देणारे ते पालक खरोखरचं धन्य मानायला हवेत. आपणही कधी वृद्ध होऊ शकतो आणि आपल्यावर सुद्धा अशी वेळ येऊ शकते याचे भानच अशा वाईट वागणाऱ्या मंडळींना नसते.
नुसता पैसा असला म्हणजे सर्व जग जिंकले असे वाटणारी ही मंडळी ज्यावेळी आजारी पडतात त्यावेळी त्यांना त्यांची सर्व कर्म आठवतात.
कोणतीही अपेक्षा न ठेवता, आपले सर्वस्व वाहून जे पालक आपल्या मुलांना लहानचे मोठे करतात, त्या सर्व पालकांना माझा नम्र प्रणाम.
माधव भोळे
मेडिक्लेम विमा योजना हा एक तारणहार आहे
माझा एक मित्र आहे, प्रत्येक पैसा विचार करून खर्च करणारा. त्याच्या मते मेडिक्लेम पॉलिसी ही चांगली गुंतवणूक नाही, म्हणून तो आपल्याच नातेवाईक असलेल्या विमा प्रतिनिधीला नेहमी टाळायचा.
आठ दिवसा पूर्वी अचानक त्याच्या वडिलांना अर्धअंगाचा चा झटका आला (आपत्ती कधी सांगून येत नाही). खाजगी रुग्णालयात गेला, पहिल्याच दिवशी 25 हजार उडाले, म्हणून मुंबईतील मोठ्यातल्या मोठ्या सरकारी रुग्नग्णालयात गेला. 5 दिवस कारभार बघितला, तोबा गर्दी, पेशन्टकडे दुर्लक्ष, दोन दोन वेळा टेस्ट साठी वेळा निश्चित होऊन सुद्धा आयत्या वेळी रद्द, त्यामुळे पेंशनट आणि नातेवाईकांना होणार शारीरिक आणि मानसिक त्रास. त्यात ट्रीटमेंटच्या हलगर्जीपणा मुळे झालेले रोग्याचे आबाळ हे बघितल्यावर पुन्हा खाजगी रुग्णालयात हलवणे आणि त्याचे लाखात बिल. हे लक्षात घेता आता तरी त्याला पटले असावे.
मेडिक्लेम विमा योजना हा एक तारणहार आहे. (मी विमा दलाल नाही परंतु फेसबुक वर अनेक वेळा ऑपरेशनला अमुक लाख खर्च झाला त्याला मदत करा वगैरे पोस्ट वाचतो आणि प्रत्यक्षात आलेला अनुभव याचा ताळमेळ घालावा म्हणून टाकलेली पोस्ट. पुढच्या ला ठेच, पाठचा शहाणा !!!, हेल्मेट सक्ती सुद्धा असेच आहे, अपघातापासून संरक्षण. लक्षात ठेवा हेल्मेट नसेल तर मेडिक्लेम पास होत नाही).
सत्य घटनेवर आधारित.
माधव भोळे
मी मराठी व्यवसाईकाबद्दल लिहिलेले कोणाला तरी आवडले नाही.
मी मराठी व्यवसाईकाबद्दल लिहिलेले कोणाला तरी आवडले नाही.
ठीक आहे कोणाला पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला वाटतो, तर कोणाला तो अर्धा रिकामा वाटतो. इंग्रजी मध्ये म्हण आहे "beauty is in beholders eyes" म्हणजे बघणार्याच्या दृष्टीकोनावर औलंबून आहे. आपल्याला वाटते मराठी व्यवसाईकाने खूप मोठे व्हावे म्हणून हा खटाटोप.
पर्वा दादरच्या जुन्या प्रसिद्ध मराठी कापडाच्या दुकानात गेलो होतो पितांबर घ्यायला सर्व किमती छापील लावल्या होत्या. आम्ही दोन पितांबर म्हणून रुपये 3,500 चा माल घेतला. शेटजींना म्हटले काही कमी करा. एक नाही दोन नाही सरळ 3500 चे बिल प्रिंट करून हातावर ठेवले. मी त्यांच्या हातावर 3450 ठेवले. त्यांनी सांगितले आणखी 50 ध्या. शेवटी मी विचारले अहो एव्हडा माल घेतला काहीतरी कमी करा. ते म्हणाले एक रुपया कमी होणार नाही.
मला वाटते याना शाळेत / कॉलेजात अंकगणितात डिस्काउंट, वोल्युम डिस्काउंट, व्हॅल्यू डिस्काउंट, कस्टमर रिलेशनशिप कशी सांभाळायची याचे शिक्षण नसावे. या उलट आमच्या मालाडला बिल दिल्यानंतर सुद्धा (परप्रांतीय) शेटजी एवढया रकमेत 50 कमी दिले तरी घेतो आणि उलट हसत सांगतो, दोन आठ्वद्यांनी दिवाळीचा नवीन माल येणार आहे तेव्हा एक चक्कर टाका. अहो शोधले तर अशी दहा दुकाने असतील. कोण कशाला झक मारायला दादर ला त्याची आठवण करेल. ते असेच आठवणीत राहतील "आमची कोठेही शाखा नाही" सारखे.
माधव भोळे
मृत्युपत्र करायला वकिलाची गरज नाही?".
मृत्युपत्र करायला वकिलाची गरज नाही?".
हे खरे आहे की मृत्यू पत्र करायला वकिलाची गरज नाही तसेच ते रजिस्टर करायची सुद्धा गरज नाही.
पण हे अर्ध सत्य आहे कारण सर्वसाधारण माणूस अजाणतेपणी विल करताना अनेक चूका करतो आणि त्या चुका सुधारण्यासाठी विलकर्त्याचे ज्ञात आणि अज्ञात वारस लाखो रुपये खर्च करून त्यातून आपल्या सोयीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात आणि काही कमावतात, काही गमावतात.
मागे एका शिक्षित अविवाहित व्यक्तीने आपल्या प्राईम एरिया मध्ये असलेल्या रहत्या घराची इस्टेट एका ट्रस्टला विल मध्ये लिहून दिली, त्यावेळी ट्रस्टीनी आग्रह केला की आपण वकिलामार्फत ते विल करू, परंतु त्या व्यक्तीने हेच सांगितले की मला माहित आहे विल कसे करायचे ते आणि लिहून देताना घराखालचा जमिनीचा प्लॉट नंबर चुकून चुकीचा लिहिला.
त्या व्यक्तीच्या पश्चात ज्यावेळी ट्रस्ट त्या इस्टेटीचा ताबा घ्यायला गेली त्यावेळी तेथील एका गल्लीच्या दादाने दुसरे मृत्यू पत्र दाखवले आणि ही सर्व इस्टेट त्याला लिहून दिली आहे असे दाखवले. त्या दादाच्या पाठी तेथील एक बिल्डर होता. केस कोर्टात गेली 5 वर्षांनंतर दादाचे विल खोटे निघाले परंतु ट्रस्ट च्या विलमध्ये प्लॉट नंबर चुकीचा निघाल्यामुळे ती जमीन ट्रस्ट ला मिळाली नाही. शेवटी कोर्टाने निर्णय दिला की मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसाकडे ही संपत्ती जाईल आणि त्यामुळे ट्रस्ट ला 4.5 लाख रुपये आणि अनमोल वेळ कोर्ट कचेरीत नुकसान झाले.
जर योग्य वकिलामार्फत हे केले असते तर सारे तपशील नीट तपासून मृत्युपत्र तयार होऊ शकले असते. हे एक उदाहरण आहे पण अशा अनेक सर्वसाधारण चूका सामान्य लोक करत असतात, उदा. त्यांच्या मते सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये नॉमिनी दिला की तो त्या फ्लॅट चा कायदेशीर वारस होतो पण तसे नाही. तसेच जे आप कमाईचे आहे तेच तुम्ही मृत्यू पत्रात लिहून देऊ शकतात पण जे वडिलोपार्जित आहे त्यातील फक्त तुमच्या वाट्याची इस्टेटच तुम्ही लिहून देऊ शकता वगैरे.
माधव भोळे
कोकण विकास लेख क्र. 1
कोकण विकास लेख क्र. 1
लेखक माधव भोळे
कोकण म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे अतिशय समृद्ध वनश्रीने नटलेले जिल्हे आहेत. सकस माती, भरपूर ऊन आणि कमी क्षार असलेल्या शुद्ध पाण्याची मुबलकता हे ह्या जिल्ह्यांचे वैशिष्ट्यें आहे. जरी कोकणी माणूस हुशार असला तरी सम्पतीच्या बाबतीत आणि उत्पन्नाच्या बाबतीत तो मागासलेलाच आहे असे म्हणायला हरकत नाही. कोकणचा विकास हे येथील अनेक नेत्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न आहे. अजूनही अनेक तरुण मुले दरवर्षी रोजगारासाठी शहराकडे वळत आहेत. अनेकांना वाटत होते की कोकणात रेल्वे आली म्हणजे विकास होईल. होय काही प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये विकास झाला आहे पण मूळ म्हणजे ज्या कारणांनी उत्पन्न वाढते त्या ठिकाणी कोकणी माणसाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आम्हाला वाटते गावात रस्ता झाला, लाईट आले, घराघरात नळ पाणी आले, जिओ चा टॉवर आणि मोबाईलला रेंज आणि इंटरनेट आली म्हणजे विकास झाला. पण हे सर्व करून सुद्धा कोकणी माणसाने आपले उत्पन्नात वाढ व्हावी या साठी केलेल काहीे ठोस प्रयत्न दिसण्यात येत नाहीत.
डोंगर आणि दऱ्या ही अडचण न समजता त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याचा विचार होणे आवश्यक आहे. माकडे खातात म्हणून काहीच करायचे नाही ह्या नकारात्मक विचारातून बाहेर पडणे आवश्यक आहे. ज्याला माकड हात लावत नाहीत असे पदार्थ किंवा झाडे याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, त्या नुसार उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. एक मोजपट्टी सर्वाना लावून उपयोग नाही. ऊन हे देवाने दिलेले सोने असून त्यात जर उपयुक्त झाडे लावली तर या गावागावात सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही.
पण त्या साठी कल्पक नियोजन हवे. तसेच हा वैयक्तिक विचार नसून हा समूहाचा विचार होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राने 70 वर्षां पासून सहकार्याने प्रगतीची रोपे रुजवली तशी रोपे आपल्या कोकणात रुजवण्याची गरज आहे. गावकितील वाद, वाड्यावाड्यातील चढाओढी, जातिजातीतील, धर्मधर्मातील तेढ त्यातून राजकीय पक्ष घेत असलेला फायदा यावर एकच उपाय आहे तो म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाने हे सर्व जुगारून एकत्र येणे. आणि मला खात्री आहे की जर पैसे किंवा फायदा दिसत असेल तर हे सर्व लोक नक्की एकत्र येतील. मराठी माणसाला भावाभावातील, भावकितील, गावातील वाद सोडवायला कोणी पटेल, तिवारी चालतो पण आमचे वाद आम्ही आमच्यात सोडवू शकत नाही हे दुर्दैव. लहानपणी दोन माकडे मांजराच्या मदतीने, लोण्याचा गोळा कसा वाटतात आणि मांजर माकडांना कसे मूर्ख बनवते हे आम्ही शिकलो पण प्रत्यक्ष जीवनात आम्ही मांजरांनाच मध्यस्ती करायला सांगत असतो.
आज शहरातील पैसा ह्या गावच्या राजकारणात ओतला जातो आणि त्यामुळे गावाचा विकास होण्याचे ऐवजी गावे भकास होत चालली आहेत. गावात रोजगार नसल्यामुळे आणि पुरेशी उत्पन्नाची साधने नसल्यामुळं गावातील तरुण नाईलाजाने शहराकडे वळतो. करोना च्या काळात आलेल्या आपत्ती लक्षात घेता आपली गावे अडचणीच्या काळात कशी उपयोगी होतील यासाठी आपण काय करायला हवे हे समजले पाहिजे. शहरातील पैसे कमवून गावात घर बांधण्यापेक्षा गावातच उत्पन्न तयार करून गावात पक्के आवश्यकते नुसार घर, बागबागायत करायला हवी. शासनाकडून काय प्रयत्न होत आहेत त्यांची माहिती घेऊन त्यात काही सुधारणा करता येईल का या साठी दबावगट होणे आवश्यक आहे. माझ्याकडे काही कल्पना आहेत. या बाबतीत आपण सर्वाना हा लेख आवडला असेल तर मी पुढील लेखात त्यातील काही कल्पना मांडिन. आपल्याला हे लेख कसा वाटला ते कळवावे
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)