गुगल आणि सुंदर पिचाई, एक यशोगाथा
गुगल, हे नाव कोणाला माहीत नाही असा माणूस जगात विरळच. आपल्या सर्वांच्या जीवनात हा गुगल कायम आपला मित्र बनून राहिला आहे.
काल या गुगल मध्ये एक मोठा व्यवस्थापकीय बदल झाला आहे.
गुगल ही कम्पनी दि. 4 सप्टेंबर 1998 ला लॅरी पेज आणि सेर्गे ब्रीन या स्टँनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पी. एच. डी. करणाऱ्या दोन विध्यार्थ्यांनि कॅलिफोर्निया मधील एका गॅरेज मध्ये सुरू केली. गुगल चे नाव जरी घेतले किव्वा ऐकल तरी लगेचच मला स्वामी समर्थांच्या "जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करुनि सोडावे सकल जन" या उक्तीची आठवण येते. कोणत्याही गोष्टीची आपणास माहिती पाहिजे असल्यास आपण गुगल कडे धाव घेतो, जसा काय तो जादूचा दिवाच.
2018 मध्ये मायक्रोसॉफ्ट या जागतिक सॉफ्टवेअर कंपनीला मागे टाकत 116 बिलीयन डॉलर एवढा प्रचंड व्यवसाय करून ही कम्पनी जगातील एक नंबर ची सॉफ्टवेर कम्पनी ठरली आहे. विशेष म्हणजे गुगलच्या अनेक सेवा मोफत आहेत तरी सुद्धा ते एवढे पैसे कमावतात त्याचे कारण म्हणजे गुगल सेवा वर असणाऱ्या जाहिरातींमधून त्यांना उत्पन्न मिळते.
गुगल मोठी झाल्यावर गुगल ने वेगवेगळ्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या काढल्या, त्या सर्वांची होल्डिंग कम्पनी किंवा पालक कम्पनी म्हणून 2 ऑक्टोबर 2015 ला अल्फाबेट नावाची कम्पनी काढली गेली ज्याचे सीईओ काल पर्यन्त लॅरी पेज होते. त्याच वेळी 24 ऑक्टोबर 2015 ला गुगल मधील आपला पदभार सोडत पेज ने भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई या आपल्या सहकाऱ्याला गुगल चे सी इ ओ पद आणि अल्फाबेट चे निर्देशक पद (डायरेक्टर) दिले. काल लॅरी पेज आणि सेर्गे ब्रीन यांनी जाहीर केले की आजपासून श्री सुंदर पिचाई हे या दोन्ही कम्पन्याचे सी ई ओ असतील, आणि ते दोघे आजपासून दैनंदिन व्यवहारात दखल घेणार नाहीत. विशेष म्हणजे हे दोन्ही मंडळी फक्त 48 वर्षांची असून सुद्धा त्यांना या पदांचा मोह नाही, नाहीतर आपल्याकडे 90/90 वर्ष झाली तरी पदे सोडायला लोक तयार नाहीत. सुंदर चे वय सुद्धा फक्त 46 वर्ष आहे.
आपल्या 1,24,000 सहकाऱ्यांशी सम्पर्क साधताना लॅरी पेज लिहितात "सुंदर एक विनम्र व्यक्ती असून सहकाऱ्यांशी मिळूनमिसळून काम करत, समोर असलेली आव्हाने लीलया पेलण्याची त्याची हातोटी आम्हाला भावली त्याच बरोबर संस्थापकांची दूरदृष्टी, स्वप्ने समजून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारी समज, कष्ट करायची प्रामाणिक तयारी, आणि ती सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घेण्याची त्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे म्हणून ही जबाबदारी त्याला देण्यात आम्हाला कोणताही संदेह नाही."
कोण आहेत हे सुंदर पिचाई? 10 जून 1972 साली मदुराई, दक्षिण भारत स्थित एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेले पिचाई, आय आय टी खरगपूर चे मेटालर्जी मधील स्थानक असून, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मधून एम एस आणि व्हारटन युनिव्हर्सिटी चे एम बी ए आहेत. गेले 15 वर्ष ते गुगल मध्ये काम करत असून, गुगल क्रोम हा वेब ब्राऊसर तयार करण्यात आणि तो यशस्वी रित्या चालवण्यात टीम लीडर म्हणून त्यांचा मोठा वाटा आहे. तेव्हापासून गुगल च्या मॅनेजमेंटच्या दृष्टीपथास ते आले आणि त्यांच्या कसोटी ला उतरले.
स्वतःबद्दल सांगताना सुंदर सांगतात, आम्ही मदुराईमध्ये भाड्याने रहात होतो, आमच्याकडे फ्रीज सुद्धा नव्हता. सर्व मंडळी जमिनी वरच झोपायची. दक्षिणी असल्यामुळे मला हिंदीचे वावडे होते, खरगपूर आय आय टी मध्ये मला अभ्यासात कधी कधी क वर्ग सुद्धा मिळाला आहे. वाचनाची प्रचंड आवड, आणि फावल्या वेळात मैदानी खेळ या मध्ये माझे बाल पण गेले. गुगल मला जबाबदारी देत गेले आणि मी त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला एवढेच. सुंदर चा 2018 चा वार्षिक पगार 19 लाख डॉलर एवढा आहे. त्याची सम्पत्ती 60 करोड डॉलर एवढी आहे. तर त्याचा बॉस लॅरी पेज फक्त वार्षिक 1 डॉलर पगार घेतो. त्याची सम्पत्त 51.1 बिलियन डॉलर असून तो जगातला 10 वा श्रीमंत माणूस आहे.
वयाच्या 50 शी चे आत ही मंडळी एवढी कशी यशस्वी होतात? त्यांचे कोणते गुण आपल्यात नाही किव्वा आपल्याकडे असलेले कोणते गुण आपण कसे वापरतो? या बद्दल आपण आपले आत्मपरीक्षण करणे जरुरीचे आहे. वय काहीही असून दे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment