Saturday, February 28, 2026

AI ची भीती

AI ची भीती.


IT आणि तत्सम इंडस्ट्री मध्ये आलेल्या AI च्या अभूतपूर्व वादळाने सर्व प्रस्थापित IT कंपन्याचे आणि त्यातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे IT मध्ये पूर्वी मुख्यत्व करून असलेल्या कोडींग ( प्रोग्रॅमिन्ग ) च्या कामामध्ये AI चे अतिक्रमण झाल्यामुळे प्रोग्रामरच्या नोकऱ्या कमी होणार आहेत. अंथ्रॉपिक ह्या AI tools बनवणाऱ्या कंपनीनी काल COBOL सारख्या पूर्वी मेनफ्रेम कॉम्पुटरवर चालणाऱ्या प्रोग्रॅमिन्ग भाषेत सुद्धा आपले AI टूल तयार झाल्याचे जाहीर केल्यामुळे मेनफ्रेम कॉम्पुटरची कामे असलेल्या IBM, L & T, TCS, Infosys, Hexaware सहित अनेक प्रस्थापित लोकांचे धाबे दणाणाले आहेत. 


परंतु AI जरी लॅबोरेटरी लेव्हल जरी यशस्वी होत असले तरी त्याचा व्यवहारात यशस्वी उपयोग व्हायला अजून ३ ते ५ वर्ष जातील. IBM सारख्या कंपनीकडे पूर्वी, ऑइल, एयरललाईन्स सारख्या अनेक मोठमोठ्या इंडस्ट्रिजचे काम आहे जे वर्षानुवर्षं सुधारणा होत आतापर्यंत यशस्वी चालत आहेत. अशा कंपन्यांचे जुने प्रोग्राम सुधारता सुधारता अनुभवी प्रोग्रामरच्या नाकाला फेस येतो कारण मूळ डॉक्युमेंटेशन, त्यात झालेल्या सुधारणा आणि त्यात असलेल्या त्रुटी यामुळे असे प्रोग्राम सुधारणे अथवा बदलणे ( मेन्टनन्स ) अत्यंत गुंतागुंतीचे काम असते. त्यामुळे ते जॉब्स जाण्याची शक्यता कमी आहे. कारण चालू गाडी सोडण्यास कोणीही तयार नसते. भारतात बऱ्याच नोकऱ्या याच विषयात आहेत. ( लेखक स्वतः ह्या विषयातील अनुभवी आहे ).


रहाता राहीला प्रश्न नवीन सिस्टीम बनवण्याचा. जेथपर्यंत एखादा प्रश्न, गरजा एकदम बरोबर समजला नाही आणि तो AI टूल्सना समजावून सांगितला जाणार नाहीत तेथपर्यंत AI योग्य प्रोग्राम बनवून शकणार नाही. चुकीचे ऍनालिसिस असेल तर चुकिचे परिणाम दिसून येतील. ( Garbage in Garbage out ).


त्यामुळे या भागात तर्कशुद्ध विचार करत प्रश्न किंवा गरजा समजून घेणारे आणि ते सोप्या भाषेत AI tools ना समजावून सांगणारे "Prompt Engineer" हा नवीन रोल तयार होत आहे. तसेच AI ने तयार केलेल्या सिस्टीम टेस्ट करण्याच्या टेस्टिंग इंजिनियर च्या नोकऱ्या तशाच राहणार आहेत. 


त्यामुळे एकंदरीत नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल पण भारतातील नोकऱ्यामध्ये फार घट येणार नाही असे वाटते. या उलट जगभर अनेक क्षेत्रामध्ये AI मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी चढाओढ वाढेल आणि ते वाढीव जॉब भारतात येतील. कारण जी तांत्रिक विषयातील आणि शास्त्र ( science ) विषयातील शिक्षित मॅनपॉवर भारतात आहे तशी इतर देशात कमीच आहे. 


आणखी एक गोष्ट म्हणजे एजन्टीक AI टूल्स मुळे जे रुटीन, रिपीटीटिव्ह नोकऱ्या जसे की KPO, BPO, ऑपेरेशनल नोकऱ्या यात कपात होण्याची शक्यता आहे हे खरे आहे.


या उलट डेटा अनालीसिस, डेटा सायन्स, ब्लॉक चेन, क्लाऊड कॉम्पुटिंग सारख्या विषयाचा वाढता वापर भारतात आणखी नवीन नोकऱ्या निर्माण करतील असे वाटते.


माधव भोळे 



राघव चड्डा आणि अतिशयोक्ती

 राघव चड्डा आणि अतिशयोक्ती 


सध्या संसदेत एक वादळ आले आहे. त्याचे नांव आहे राघव चड्डा. शिक्षणाने आणि पेशाने चार्टड अकाउंट असलेला, आप पार्टीचा हा तरुण राज्यसभा खासदार सरकारच्या कारभारातील त्रुटी शोधून काढून लोकांचा आवाज संसदेत उठवत अतिशय चांगले काम करीत आहे. नुकत्याच झालेल्या बजेट सत्रात त्याने सम भागवरील कॅपिटल गेन टॅक्स आणि STT मधील त्रुटी, विमाधारित रोग्यांची हॉस्पिटल कडुन होणारी लूटमार, बँकेतील न्यूनतम शिल्लक आणि ऐटीएम चार्जेस, होम लोन मध्ये घर गहाण असताना इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी बँक करीत असलेली जबरदस्ती इत्यादी विषय मांडले. ते खरोखरचं सरकारला आणि प्रशासनाला जागे करणारे आहेत. 


पण त्याने आणखी एक मुद्धा मांडला की सरकार फक्त थोड्याच नोकऱ्या देते पण लाखो विद्यार्थी लाखो रुपये भरून अभ्यास करत आहेत त्यांना जर नोकरीं नाही मिळाली तर त्यांची फी परत करायला हवी. हा मुद्धा अतिशय चुकीचा आहे. मुळात नोकरीं मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठीच शिक्षण घ्यायला हवे हा विचारच मुळात चुकीचा आहे. 


मुळात सरकारने प्रत्येक शिक्षिताला नोकरीं देणार किंवा बेकारी भत्ता देणार असे आश्वासन दिलेले नाही. शिक्षण घेणे जबरदस्ती नाही. जगाच्या व्यवहारात आपल्याला हुशार बनायचे असेल किंवा आपल्याला आपल्या पायावर उभे राहायचे असेल तर शिक्षण नक्कीच उपयोगी पडते. पण आपण काय शिकता, कसे शिकता, त्याचा वापर आपण व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक जीवनात कसा करता हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही शिक्षणासाठी फी भरली होती त्या मधून शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांचे प्रशासकीय आणि शिक्षण खर्च निघून गेले आहेत. त्यामुळे सरकार किंवा ती विद्यापीठे तुम्हांला डिग्री सोडून काहीही देय लागत नाहीत. त्यामुळे हा मुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे. 

राघव चड्डा आपण चांगले काम करता तेव्हा सदसदविवेक बुद्धी वापरून प्रश्न उपस्थित करा ही विनंती. विरोधा साठी विरोध नको.


माधव भोळे.

Thursday, February 26, 2026

तंजावरचे मराठा साम्राज्य.

तंजावरचे मराठा साम्राज्य.


छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजी महाराज अनेक वर्ष कधी विजापूर दरबारीं तर कधी निजाम दरबारीं एक प्रमुख सरदार म्हणून नोकरीं करीत असत. त्यांना ३ पत्नी होत्या, त्यातील प्रथम पत्नी जिजाबाई साहेब ( माहेरच्या जाधव ), द्वितीय पत्नी तुकाबाई ( माहेरच्या मोहिते ) आणि तृतीय पत्नी नरसाबाई. शहाजी राज्यांकडे पुणे आणि बंगलोर अशा दोन जहागिऱ्या होत्या. पैकी पुणे जहागिरी जिजाऊ माता सांभाळत तर बंगलोरची जहागिरी तुकाबाई सांभाळत. 


शहाजी राज्यांना जिजाऊ पासून छत्रपती शिवाजी आणि संभाजी असे दोन पुत्र झाले तर तुकाबाई पासून व्यंकोजी ( एकोजी १ ) पुत्र झाला आणि नसराबाई कर्नाटकी होत्या त्यांना संताजी आणि कोयाजी अशी दोन मूले होती. संभाजी शहाजी भोसले आपल्या वडिलांबरोबर असत आणि त्यांनी विजापूरच्या आदिलशाही मध्ये सरदारकी केली.


शहाजीराजे स्वारी निमित्त जास्तकरून बंगलोर वास्तव्यात तुकाबाई बरोबर रहात असत. पुढे शहाजीराज्यांचे एक पुत्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी विजापूरच्या बादशहाकडे नोकरीं करत असताना स्वपराक्रमावर दक्षिण भारतातील तंजावर येथे ५ मार्च १६७६ रोजी दक्षिणेतील स्वतंत्र मराठी राज्य स्थापन केले. शहाजी राजे यांच्या शेवटच्या काळात नसराबाई त्यांचे जवळ रहात असल्यामुळे बंगलोर जाहगिरी नसराबाईंच्या ताब्यात गेली.


पुढे १६७६ ते १६७८ मध्ये छत्रपती शिवाजी राज्यांनी दक्षिण दिग्विजय स्वारी करताना आपले सावत्र बंधू संताजी ( नसराबाईंचे सुपुत्र ) यांच्या साहाय्याने मद्रास ( चेन्नई ) जवळील वेलोर आणि जवळील जिंजीचा किल्ला जिंकून दक्षिणेत आपला दरारा वाढवला. त्यानंतर त्यांनी दोन्ही ठिकाणी आपले प्रशासक नेमले. ह्या स्वारीमुळे छत्रपतींच्या ताब्यात त्या विभागातील ७२ डोंगर आणि १४ किल्ले आले.


ह्या स्वारीमध्ये त्यांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजी महाराजांची तंजावर येथे भेट घेतली आणि त्यांना स्वराज्याच्या मोहिमेत सामील होण्याची विनंती केली तसेच त्यांच्या वडिलांच्या सामायिक मालमत्तेबद्दल विभागणी करण्याची मागणी केली, परंतु व्यंकोजीनी त्या दोन्ही गोष्टीकडे दुर्लक्ष केले. 


आज त्या तंजावरच्या मराठा राजवाड्यात काही भागात भेट देण्याची संधी मिळाली. त्याची काही क्षणचित्रे.


माधव भोळे 

NCERT आणि सुप्रीम कोर्ट यातील वाद

NCERT आणि सुप्रीम कोर्ट यातील वाद 

नुकताच आडवोकेट कपिल सिंबल आणि अभिषेक मनु संघवी यांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे तक्रार केली की NCERT च्या ८ वि च्या पुस्तकात कोर्टामधील भ्रष्टाचार, न्यायालयीन प्रक्रिया इत्यादी विषयवार असलेल्या धड्यात आक्षेपार्ह मजकूर आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की पृथ्वीवरील कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला अशा प्रकारे न्यायालयाचा अपमान करण्याची ताकद नाही. त्यांनी NCERT वर एकतारफा ( sue moto) केस टाकली आणि त्यामुळे NCERT ने ताबडतोब न्यायलायाची माफी मागितली.


खरे म्हणजे अशी वेळच का यावी की सुप्रीम कोर्टाने आपल्यावर झालेली टीका दबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या विशेष अधिकाराचा उपयोग करावा? सुप्रीम कोर्टाने अशी टीका सकारात्मक घेऊन त्याची माहिती आणि तथ्य समजून घ्यायला हवी. 


ज्या देशात श्रीरामाने एका सामान्य धोब्याच्या आक्षेपावर आपली पत्नी सीतेला अग्नी परीक्षा द्यायला लावली. राम शास्त्री प्रभुणे सारखे निपक्ष न्यायाधीश असताना, आई नाराज होईल हे माहिती असताना सुद्धा गुन्हेगार मामा मल्हारराव रास्ते यांना कैदेत टाकायचे फर्मान दिले त्या माधवराव पेशवे या देशाच्या इतिहासात असताना कोर्टावर भ्रस्टाचाराचा आरोप केला जातो ती परिस्थिती दुर्दैवी आहे असेच म्हणायला हवे.


जेथपर्यंत जस्टीस वर्मा, ज. सौमित्र सेन, ज. पि दिनकरन, ज. सी एस करनन सारखे लोक ह्या सिस्टीम मध्ये आहेत तो पर्यंत टीका करण्याचा अधिकार जनतेला आहे. असे नसते तर संविधानात removal of judges and impeachment provision ठेवले नसते. जस्टीस सूर्यकांत यांनी जसे NCERT वर sue moto केस केली तशी ह्या विषयात असे न्यायाधीश आणि न्यायालय प्रशासन ह्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपसाठी स्थायी चौकशी कमिशन नेमणे आवश्यक आहे. 


जस्टीस सूर्यकांत चांगले काम करतात परंतु त्यांनी आपल्या शवागारात किती मुडदे आहेत हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. जों न्याय सर्व भारतीयांना तोच कोर्टाला असायला हवा. 


माधव भोळे 

तामिळनाडू एक झलक.

तामिळनाडू एक झलक.

नुकतेच तामिळनाडू मध्ये विविध मंदिरे आणि शहरांना भेट देण्याचा योग आला. त्यातील निरीक्षणे खालील प्रमाणे.

१) स्वच्छ आणि सुंदर रस्ते. हायवे ट्राफिक विरहित. 

२) स्वच्छते बद्धल नागरिक जागरूक आहेत.

३) चेन्नई पासून सुरवात करून वेल्लोर, श्रीपुरम, कांचीपुरम, महाबलीपुरम, थिरूअण्णामलाई, चिदंबरम, तंजावर, त्रिची, पलानी, कोडाईकनाल इत्यादी शहराना भेट दिली. हायवे लगतची सर्व गावेच्या गावे सपाट आणि काळी कसदार किंवा तांबडी माती असलेली भातशेती, ऊस, अन्य धान्य शेती, तुती ( रेशीम किड्यांचे अन्न रेशीम शेती साठी उपयोगी ) आणि निलगिरीची झाडें होती आणि सर्वत्र हिरवेगार होते. फक्त जिंजी किंवा थिरूअण्णामलाई येथे डोंगर असल्यामुळे माकडे दिसली.


४) पल्लवा साम्राज्य ( ३ ते ९ वे शतक ), चोला साम्राज्य ( ९ ते १३ वे शतक ), आणि मदुराईचे नायक साम्राज्य किंवा विजयनगरचे साम्राज्य ( १४ ते १७ वे शतक ) या काळात बांधले गेलेले भले मोठे मंदिर परिसर ( Temple Complexes ). त्यात अगदी चुना किंवा सिमेंट रहित दगडी बांधकामा पासून चुना आणि गूळ मिश्रण असलेला पदार्थ वापरून भल्या मोठ्या भव्य दिव्य मंदिरांची उभारणी झाली असून त्यातील बहुतांश बांधकामे आजही टिकून आहेत. लोक रांग लावून दर्शन घेतात आणि कोठेही धक्का बुक्की नाही. तुम्ही थाळीत पैसे टाका अथवा नका टाकू, पुजारी तुम्हांला तीर्थ प्रसाद देतात. अनेक ठिकाणी विशेष दर्शन रु. १० ते ५० पर्यंत तिकीट आहे त्यामुळे रांगेत उभे राहायचा वेळ वाचतो. संपुर्ण मंदिर परिसर स्वच्छ असून कोणीही घरचे डबे आणून तेथेच खायला बसत नाहीत. बहुतेक ठिकाणी चप्पल स्टॅन्ड आहेत आणि नसला तरी चपला चोरी होत नाहीत. 


बहुतेक सर्व ठिकाणी फक्त त्यांच्या तामिळ भाषेत माहिती आणि देवतेची नांवे आहेत त्यामुळे समजतं नाही. फक्त photography not allowed ते मात्र इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिलेले🤪. शिवाय देवळे भव्य पण गाभारे लहान तसेच काळोखी. देवांच्या मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणाच्या. फक्त समया किंवा पणत्याचा उजेड त्यामुळे मूर्तीचा आकार आणि चेहरा नीट दिसत नाही. गाभाऱ्यात विजेचा प्रकाश नाही. 


वरदराज पेरूमल मंदिर ( २३ एकर ), अण्णामलाईयार मंदिर, अण्णामलई नगर ( २५ एकर ), एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम ( २५ एकर ), नटराज मंदिर चिदंबरम ( ४० एकर ), श्री लक्ष्मी सुवर्ण मंदिर, वेलोर ( १०० एकर ), रंगनाथ स्वामीं मंदिर श्रीरंगम ( १२६ एकर ). असे मोठ मोठाले मंदिर कॉम्प्लेक्स असून बहुतेक मंदिरांना २५, ३० फूट उंच दगडी तटबंदी आहे. अनेक मंदिराना चारही बाजूला किंवा दोन बाजूला प्रवेशद्वारे असून मोठ मोठाली नक्षीकाम केलेली गोपुरे आहेत. सर्व गोपुरे जवळजवळ सारखीच दिसतात त्यामुळे आलो कोणत्या गोपूरातून आणि बाहेर कोठून पडलो तेच कळत नाही. अनेक ठिकाणी गोपूराला नांवे दिली आहेत ( तामिळ मध्ये). मंदिरांमध्ये अप्रतिम कोरीव दगडी बांधकाम असून प्रत्येक देवतेसमोर दगडी कोरीव सभामंडप आहेत. एव्हडे कोरीव बांधकाम परत होणे शक्य नाही. ब्रिटिश आणि फ्रेंच कोरीव कामे सुंदर असतात पण ही त्या पेक्षाही सुंदर आहेत.


बहुतेक मंदिरे शंकर, पार्वती, विष्णु, लक्ष्मी, कार्तिक स्वामीं ( मुरुगन, सुब्रमण्यम ), श्रीकृष्ण, गणपती ( विनयागार किंवा पिल्लयार ) या देवांची आहेत. येथे कार्तिक स्वामीं हा विवाहित असून त्याला इंद्राची मुलगी देवयानी आणि वल्ली नावाची आदिवासी जमातीच्या राजाची मुलगी ( भिल्लीण ) अशा दोन पत्नी सुद्धा आहेत. आपल्याकडे किंवा उत्तरेत कार्तिक स्वामीं अविवाहित मानला जातो.  


५) तामिळनाडू मध्ये अनेक रेस्टॉरंटच्या मोठमोठ्या साखळ्या आहेत जसे की हॉटेल सरवाना भवना ( १०० रेस्टॉरंटस), अडियार आनंद भवना ( २०० रेस्टॉरंटस ), सागर रत्न रेस्टॉरंटस ( ११० रेस्टॉरंटस). आपल्याकडे अशा कामत, शिवसागर, कैलाश परबत, भगत ताराचंद सारख्या थोड्याफार साखळी रेस्टॉरंट आहेत पण ते सर्व अमराठी मंडळीची आहेत. 

दत्त स्नॅक्स, पणशीकर मिठाईवाले, जोशी वडेवाले सारखे काही मोजके नामचिन सोडले तर वेलणकर, विनय हेल्थ, तृप्ती सारखी मंडळी "आमची कोठेही शाखा नाही" ह्या ब्रीद वाक्यावर परमआनंद मानतात. त्याचे कारण सक्षेशन प्लॅन आणि कॉर्पोरोटायझेशनचा अभाव. 


६) कल्याण ज्वेलर्स, तनिष्क, शिवाय ज्वेलरी आणि साड्याची भव्य झगमगीत दुकानें इतर दिवशी सुद्धा ग्राहकांनी भरलेली दिसली. 

७) त्रिची ( त्रिचनापल्ली ) मधील एका कपड्याच्या आणि साड्यांच्या मॉल मध्ये गेलो होतो त्याचे शॊरूम ३ लाख sq ft आहे. तामिळनाडू मधील शुद्ध रेशमी कांजीवरम साडी ( प्युर सिल्क ) १० हजार ते ३०-३५ हजारापर्यंत जाते. ( आकडे ऐकूनच खाली उतरलो 🤪).


८) बहुतेक शहरे विस्तारत असून बंगले सिस्टीम अजून अस्तित्वात आहे. मोठ मोठ्या शहरात सुद्धा गगनचुंबी इमारती हातांच्या बोटावर मोजण्या एव्हडयाच दिसतात. अनेक शहरांना धार्मिक महत्व असून एकंदरीत लोक धार्मिक आणि समाधानी वाटले.


९) तामिळनाडू च्या राजकारणामध्ये सिनेमा स्टार्स आणि सुपर स्टार्स णा खूप महत्व आहे. येथे लोक हिरोस ना देव मानणारी लोक आहेत.

१०) तामिळनाडू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे स्वतंत्र मराठा साम्राज्य होते ही आनंदाची बाब आहे.


३० वर्षा पूर्वी तामिळनाडू मध्ये उटी, मदुराई, रामेश्वरम येथे गेलो होतो. त्या वेळची त्यांची गरिबी बघितली आहे त्या मानाने आता नक्कीच सुबत्ता आहे असे वाटते.

माधव भोळे 


Sunday, February 22, 2026

अड्यार आनंदभवना

 काल तामिळनाडू मधील एका हॉटेल मध्ये गेलो होतो त्याचे नांव आहे अड्यार आनंदभवना. अतिशय सुंदर पदार्थ आणि सेवा सुद्धा.



अड्यार आनंदभवना ( शुद्ध शाकाहारी ) विश्रांती गृह ( A2B restaurants ) ची यशोगाथा


( खास भारतीय मिठाई आणि स्नॅक्सचे घर | उच्च श्रेणीचे भारतीय शाकाहारी रेस्टॉरंट )


आमचा प्रवास हा आमच्या अविचल भावनेचा आणि समर्पणाचा पुरावा आहे; आमच्या लाडक्या संस्थापक दिवंगत के एस तिरुपती राजापासून सुरू झालेला वारसा. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात, त्यानी चेन्नई आणि मुंबईमध्ये आपल्या पाककौशल्याचा उपयोग करून घरापासून दूरचा प्रवास सुरू केला. टेबल क्लीनर म्हणून नम्र सुरुवातीपासून, त्यांनी मिठाई बनवण्याच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवले.


एका क्षणी, त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर शेती करण्यासाठी राजापलायमला परतावे लागले. सर्व मेहनत फळाला आली आणि यश त्याच्या दारात आले. लवकरच, त्यांनी विस्ताराची योजना आखली. कर्जाऊ घेतलेला निधी आणि आशेने भरलेल्या अंतःकरणाने, त्याने अधिक परताव्याच्या अपेक्षेने लगतच्या शेतजमिनी भाड्याने घेतल्या.


शेती खऱ्या अर्थाने भरभराट होत असताना, खोलवर, तरीही त्याने आपली स्वप्ने सोडली नव्हती. 1960 मध्ये, त्यांनी गुरू स्वीट्स, एक लहान मिठाईचे दुकान सुरू केले, ज्याने त्यांच्या उद्योजकीय व्यवसायाची सुरुवात केली. तथापि, त्यांच्या जीवनाला अनपेक्षित वळण मिळाले जेव्हा त्यांच्या शेतजमिनीत एक दुर्मिळ आणि विनाशकारी धुळीच्या वादळाने त्यांचा संपूर्ण नाश केला. त्याने अखलेला सर्व विस्तार उधार घेतलेल्या निधीवर होता, अनपेक्षित आपत्तीमुळे पीक अपयशी झाल्यामुळे तो कर्जाच्या डोंगराखाली गेला.


1970 च्या मध्यात त्यांनी बेंगळुरूला स्थलांतरित होण्याचा धाडसी निर्णय घेतला. दुकान चालवण्यासाठी त्यांच्या मुलांनी शिक्षण पुढे ढकलले.  आपल्या प्रेमळ पत्नी आणि दोन मुलांच्या अतूट पाठिंब्याने त्यांनी श्रीनिवास स्वीट्सची स्थापना केली.



त्यांचा प्रवास तडजोड आणि कठोर परिश्रम यांनी भरलेला होता. चार जणांचे कुटुंब विनम्रपणे जगत होते, आमच्या संस्थापकाने मिठाई तयार केली, त्यांच्या पत्नीने मदत केली आणि त्यांचे दोन मुल दुकानाचे विविध पैलू सांभाळत. अनेक आव्हानांचा सामना करूनही, त्यांचा निर्धार फळाला आला, ज्यामुळे त्यांना बंगळुरूमध्ये नवीन सुरुवात झाली.


1979 मध्ये, आमचे प्रिय संस्थापक, त्यांचे पुत्र केटी वेंकटेशन आणि केटी श्रीनिवास राजा यांच्यासमवेत, चेन्नईच्या वॉशरमनपेट येथे त्यांचे पहिले मिठाई दुकान उघडले. त्यांनी त्याला श्री आनंद भवन असे नाव दिले. व्यवसायाची भरभराट झाली आणि लवकरच अड्यारमध्ये दुसरे आउटलेट सुरू झाले. अड्यार आउटलेटचे प्रचंड यश लवकरच ओळखीचा भाग बनले. आणि अशा प्रकारे अड्यार आनंद भवनाचा जन्म झाला.


लवकरच आम्ही संपूर्ण चेन्नईमध्ये विस्तार केला आणि भारतातील विविध प्रदेशातील मिठाईची चवदार श्रेणी सादर केली. दर्जेदार आणि परंपरेबद्दलची आमची दृढ वचनबद्धता मिठाई उद्योगात अड्यार आनंद भवनाला वेगळे बनवते.


2005 मध्ये, आम्ही रेस्टॉरंट व्यवसायात प्रवेश करून, अड्यार आनंद भवन मिठाईच्या बरोबरीने A2B रेस्टॉरंट्स सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या निर्णयामुळे केवळ महसूलच वाढला नाही तर गुणवत्ता आणि परंपरेसाठी आमची प्रतिष्ठा वाढवून आमची ब्रँड किमत सुद्धा वाढली आहे.


आज, अड्यार आनंद भवन ही १२०० कोटींहून अधिक उलाढाल असलेली कंपनी असून १२,००० हून अधिक कर्मचारी आणि तामिळनाडू (९४), कर्नाटक (६५), आंध्रप्रदेश (४३), दिल्ली, पोंडेचरी,  यूएसए, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि यूके येथे जागतिक शाखा आहेत. आम्ही या उल्लेखनीय प्रवासावर विचार करत असताना, आम्ही अभिमानाने त्या मूल्यांचे समर्थन करतो ज्यांनी आम्हाला सर्व मार्गांनी मार्गदर्शन केले - कुटुंब आणि विश्वासाचे महत्त्व, गुणवत्तेसाठी समर्पण आणि समाजाला परत देण्याची वचनबद्धता. कारण यातूनच एका छोट्या मिठाईच्या स्टॉलचा जागतिक ब्रँड म्हणून विकास झाला, जो अस्सल परंपरा दर्शवतो.

* माहिती त्यांच्या A2B.world वेबसाईट वरून आपल्यासाठी गुगल भाषांतरित केली आहे. मला जे भावते ते मी पोस्ट करतो.

माधव भोळे

Saturday, February 21, 2026

विद्वान सर्वत्र पूज्यते!!

 विद्वान सर्वत्र पूज्यते!!


चेन्नई आडियार मधून मैलापुर रोडला जात असताना वाटेमध्ये दुर्गाबाई देशमुख नावाचा रस्ता लागला. सर्वत्र तामिळ राजकारणी आणि महापुरुषांच्या नावाने रस्ते असताना मराठी स्त्रीच्या नावाने रस्ता आहे हे बघून अतिशय आनंद झाला.


कोण आहे ह्या दुर्गाबाई देशमुख?

नंतर लक्षात आले की भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि भारताचे तृतिय अर्थमंत्री ( १९५० ते १९५६)  सर चिंतामणराव देशमुख, ICS  यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख. 


दुर्गाबाईंचा जन्म आंध्र प्रदेशातील ( पूर्वीचे मद्रास राज्य ) राजमंद्री गावात एका वैदिक कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नांव गुम्मीदिडाला असे होते. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे त्यांचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी सुब्बाराव नावाच्या व्यक्तीशी झाला, परंतु दुर्गाबाई सज्ञान झाल्यावरती त्यांनी हा विवाह नाकारला आणि त्या परत आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या. या विषयात त्याना त्यांच्या आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या मते त्या सज्ञान नसताना त्यांचा विवाह होणे योग्य नव्हते.


लहानपणापासूनच त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यां आणि महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. सासरहुन परत आल्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केले आणि १९४२ साली मद्रास विश्वविद्यालयातून त्या वकील झाल्या. त्यांनी स्त्री उतथान  आणि सामाजिक सुधारणानसाठी मोठी चळवळ उभारली. त्या केंद्रीय सामाजिक विकास समितीच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिलांसाठी विशेष कौटुंबिक न्यायालये सुरू करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला.


भारताच्या ३८९ सदस्य असलेल्या संविधान आराखडा समितीच्या १५ महिला सदस्यांपैकी त्या एक होत्या. १९५२ साली काँग्रेसतर्फे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हरल्यानंतर त्या भारताच्या प्लॅनिंग कमिशनच्या पहिल्या महिला सदस्य झाल्या. 


१९४९ मध्ये चिंतामणरावांची ब्रिटिश पत्नी Rosina

Arthur Wilkox ( पहिली पत्नी ) निर्वातल्यानंतर १९५३ साली त्यांनी दुर्गाबाईंकडे लग्नासाठी मागणी घातली. त्या वेळी त्या ४४ वर्षाच्या होत्या. परंतु त्या दोघांचे विचार एक होते ते म्हणजे देशाचा विकास. चिंतामणराव आणि दुर्गाबाईंचा विवाहचे स्वतः नेहरू एक साक्षीदार होते. 


१९५६ साली मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये ह्या संबंधातील केंद्रीय कॅबिनेट बरोबर झालेल्या मतांतरामूळे चिंतामणरावांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला परंतु नेहरूंना चिंतामणरावांसारखा हिरा गमवायचा नव्हता म्हणून नेहरूंनी १९५० साली स्थापन झालेल्या प्लॅनिंग कमिशनच्या अध्यक्षपदी चिंतामणरावाची १९५६ साली नियुक्ती केली.


आपल्या निवृत्तीनंतर दुर्गाबाई आणि सी डी देशमुख हैद्राबाद येथे रहात असत. ९ मे १९८१ साली दुर्गाबाई आपल्या पतींचा आधी परलोकवासी झाल्या.


माधव भोळे 

श्रीपुरम, वेल्लोर येथील सुवर्ण मंदिर!

 श्रीपुरम, वेल्लोर येथील सुवर्ण मंदिर!


आज वेल्लोर ( तामिळनाडू ) शहरापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीपुरम मधील श्री नारायणी मंदिरात जाण्याचा योग आला. सुमारे १०० एकर परिसरात बसलेल्या ह्या महाभव्य महालक्ष्मी मंदिर कॉम्प्लेक्स मध्ये प्रचंड मोठ्या आकराच्या षटकोनी ताऱ्यासारख्या प्रदक्षिणा मार्ग असलेल्या परिसराच्या मध्यभागी तळ्यामध्ये वसलेल्या मंदिराच्या सर्व बाजूना खांबांसहित असलेल्या सभामंडपाचा प्रत्येक कोना न कोना तांबेमिश्रित सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले हे देऊळ रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशझोतात डोळे दिपवून टाकते. अत्यंत सुंदर कलाकुसरीने भरलेले हे मंदिर सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले आहे. ह्या पत्र्यांमध्ये एकंदर १५०० किलो वजनाचे सोने वापरले आहे, ज्याची किंमत सुमारे रु. २२०० कोटी असावी.


लँडस्केप, डिझाईन, लायटिंग, वास्तूशास्त्र, स्थापत्य शास्त्र, सिक्युरिटी, मुख्य म्हणजे श्री नारायणी देवींची मूर्ती, संपुर्ण व्यवस्था सुंदरच आहे.


मी आता पर्यंत अमृतसरचे सुवर्ण मंदिर, अयोध्येतील नवीन श्री राम मंदिर, मीनाक्षी मदुराई मंदिर, गांधीधाम आणि नवी दिल्ली मधील स्वामीं नारायण मंदिर, कोराडीदेवी, कोराडी, नागपूर आणि अशी अनेक भव्य मंदिरे बघितली आहेत पण आस्था आणि धार्मिक बाब हे विषय सोडले तर, ह्या मंदिराचा नंबर सर्वात वर लावायला मला संकोच वाटत नाही. 


आपण एकदा तेथे जाऊन बघाच म्हणजे कळेल. कॉम्प्लेक्स मध्ये कॅमेरा, मोबाईल न्यायला बंदी आहे म्हणून प्रत्यक्ष फोटो काढता आले नाही पण हे इंटरनेट वरील फोटो बघा म्हणजे कल्पना येईल.

माधव भोळे 

Monday, February 9, 2026

असहमत होण्यास सहमत ( Agree to Disagree! ).

असहमत होण्यास सहमत ( Agree to Disagree! ).


आजकाल घटस्फोटाचे प्रमाण बरेच वाढले आहे असे म्हणले जाते. शुल्लक कारणावरून घटस्फोट होत असतात ( इंग्लिश मध्ये म्हणतात at the drop of the hat ). एखाद्या विषयावर प्रत्येकाला आपापली मते असू शकतात. घरात सुद्धा आपण लोकशाही राबवत असतो. विरोध किंवा मतभिन्नता हा लोकशाहीचा पायाच असतो. कित्येकवेळा विरोध टोकापर्यंत जातात.  अहंकार आडवा येतो. सामंज्यस्याची जागा स्पर्धेत बदलते आणि स्पर्धेतून घृणा निर्माण होते. यातून सुवर्णं मध्य निघत नाही आणि मग संबंध बिघडायाला लागतात आणि त्याचे पर्यावसनं घटस्फ़ोटात होते. 


पण एक साधा शब्द किंवा वाक्य समजून वापरले तर ह्यातील अर्धे अधिक घटस्फोट कमी होतील. "सॉरी" हा असा शब्द आहे की जर तो योग्य वेळी वापरला तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. 


पण मीच पहिली सॉरी का म्हणावे? 


या बाबतीत एक कथा फार प्रसिद्ध आहे. एका नाल्यावर एक छोटासा लाकडी पूल असतो. त्यावर एका वेळी एकच प्राणी किंवा मनुष्य एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शके. एक दिवस दोन मोठे शिंगवाले बकरे त्या पुलावर बरोबर मध्यभागी समोरासमोर आले. दोघेही एकमेकात शिंगे अडकवून एकमेकांना पाठी दाबू लागले. दोन्ही बाजूनी दुसऱ्याला पाठी टाकण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा सुरूच होती. जर ते भांडण असेच सुरू राहिले तर दोघेही नाल्यात पडण्याची शक्यता होती.  त्यावेळी त्यादोघांपैकी एक सुज्ञ बकरा अचानक खाली बसला आणि त्याने दुसऱ्या बकऱ्याला  त्याच्या पाठीवर चढून पुढे जायला खुणावले. त्या प्रमाणे दुसऱ्या बकऱ्याने तसें केले आणि तो आपल्या वाटेने निघून गेला आणि भांडण सुटले.


म्हणजे कोण सॉरी म्हणतो याला महत्व नसून त्यामुळे काय परिणाम होतो ते महत्वाचा आहे, हे जेव्हा कळेल, तेव्हाच संसार सुखाचा होईल. 


इंग्रजी मध्ये एक वाक्य आहे "Agree to Disagree". म्हणजे जेव्हा दोघांची मते वेगवेगळी असतात तेव्हा ती वेगवेगळी आहेत हे सत्य तरी मान्य करायला हवे. पण माझेच बरोबर असे म्हटले तर त्याच्याशी सहमत कसे होणार?

सुसंवाद आणि सहकार्य ही सुखी संसराच्या रथाची दोन चाके आहेत. ती नीट चालत असतील तर घटस्फोट होऊच शकत नाही.


माधव भोळे 

ज्ञाती संस्थांची गरज आणि उपयुक्तता

ज्ञाती संस्थांची गरज आणि उपयुक्तता 

दरवर्षी जानेवारी महिना हा विविध ज्ञातीसंस्थांच्या कार्यक्रमांनी गच्च भरलेला असतो. कधी कधी एकाच दिवशी दोन कार्यक्रम दोन वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणी असतात त्या मुळे ईच्छा असूनही जाणे शक्य होत नाही. अनेकवेळा कार्यक्रमांची आखणी आणि दर्जाही अतिशय सुंदर असतो. कार्यकर्ते जीव तोडून आपले पूर्ण योगदान देत असतात, परंतु बरेच वेळा असे दिसून येते की तीच तीच मंडळी सर्व ठिकाणी प्रेक्षक म्हणून असतात. विद्यार्थी संमेलनांमध्ये तर आयोजकांनी प्रयत्न करुनसुद्धा पालकांचीच उपस्थिती जास्त दिसून येते.

पण खरोखरचं ह्या ज्ञाती संस्थांची गरज आहे कां? यांचा उपयोग काय आहे ?

मानव हा कळपात जगणारा प्राणी आहे. आपल्या एका संस्थेचे बोधवचन आहे "संघे शक्ति कलियुगे". मूळ श्लोक असा आहे "त्रेतायां मंत्र शक्तिश्च, ज्ञान शक्ति कृते युगे, द्वापरे युद्ध शक्ति, संघे शक्ति कलियुगे". म्हणजे त्रेता युगात मंत्र शक्ती, कृत युगात ज्ञान शक्ती, द्वापार युगात युद्ध शक्ती, तर कलियुगात संघ शक्ती बलवान आहे".

असे म्हणतात की एकटी काठी तोडणे सोपे असते परंतु काठीचा भारा किंवा जुडी तोडणे सोपे नाही. आपण ज्ञाती संस्थेमध्ये आणि त्यांच्या कार्यात सामील होतो याचा अर्थ अन्य ज्ञाती धर्माच्या विरुद्ध काम करतो असे नसून आचार्य विनोबांनी सांगितल्याप्रमाणे "प्रत्येकाने आपले अंगण साफ केले तरी देश साफ होईल" या पद्धतीने आपल्या ज्ञातीची प्रगती कशी होईल याचाच विचार करायला हवा. 

अर्थात अशा संघटनांमुळे विचारांचे आदान प्रदान होते. आपल्यातील जेष्ठ तसेच कर्तृत्वान व्यक्तींचा परिचय सर्वाना होतो. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नवंचैतन्य निर्माण होते तसेच आपणही काहीतरी करून दाखवावे ही ईच्छा निर्माण होते.

आपल्यातील किंवा आपल्या पाल्यातील उपजत किंवा कष्टाने मिळवलेल्या गुणांचे कोणी कौतुक केले तर आपल्याला सुद्धा हुरूप वाढतो. अनेक लोकोपयोगी प्रकल्प संघटनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कोणतेही लोकोपयोगी काम करायला आर्थिक बळाबरोबर मनुष्य बळ लागते आणि ते संघटनेतूनच मिळते.

आपल्या ज्ञातीतील देवरुखे ब्राह्मण विद्यार्थी सहायक संस्था, देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी, वैद्यकीय मदत निधी ह्या अखिल विश्व स्तरावर काम करणाऱ्या तसेच मुंबई, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, पनवेल, विरार, चिपळूण, रत्नागिरी इत्यादी ठिकाणचे स्थानिक देवरुखे ब्राह्मण संघ, देवर्षी प्रकाश आणि सन्मित्र समाचार सारखी नियतकालिके आणि सर्व संस्था आपल्या ज्ञातीची उन्नती व्हावी ह्या एकाच उदिष्टाने स्थापन झाल्या असून त्या झपाटून काम करणाऱ्या सर्व संस्थांचा एकच धागा आहे तो म्हणजे "मानव सेवा ही ईश्वर सेवाच" आहे आणि त्या साठी सर्व कार्यकर्ते आपले तन, मन, धन लावून झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांच्या कार्याला विनम्र नमस्कार. 

त्या सर्वांचे कौतुक करायला आणि त्यांनी केलेल्या कष्टाना दाद द्यायला आपण वेळेवर हजर नको कां राहायला?

माधव भोळे 

नॅशनल स्टार्टअप दिवस, दशक पूर्ती

 नॅशनल स्टार्टअप दिवस, दशक पूर्ती  


१६ जानेवारी २०२६ रोजी भारतातील नॅशनल स्टार्टअप डे ची पहिली १० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने नवी दिल्ली येथे एक आनंदोत्सव भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. बरोबर १० वर्षापूर्वी ( १६ जानेवारी २०१६ ) भारत सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेऊन स्टार्टअपना मदत करायला सुरवात केली. ज्याला स्टार्टअप इकोसिस्टीम असे म्हणतात जसे की स्टार्टअप फंडिंग, टॅक्स सूट, इंटलेकच्यूअल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, मान्यता प्राप्त स्टार्टअपना सरकारी टेंडर भरण्यास स्वीकृती इत्यादी. 


काल एका अनुभवी व्यवसायिक व्यक्तीकडुन स्टार्टअप बद्दल काही वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, त्या म्हणजे स्टार्टअप हे उपयोगी नाहीत. स्टार्टअप प्रोफीटेबल नसतात. त्या पेक्षा सरळ रूळलेले व्यवसाय करावेत इत्यादी इत्यादी. अशाच प्रकरची वक्तव्ये या पूर्वी प्रसिद्ध उद्योजक राजीव बजाज, हर्ष गोयेंका सारख्या अनेक यशस्वी व्यवसायकांकडून सुरवातीला ऐकायला मिळाली. एक फेसबुकवर सुद्धा अशीच पोस्ट बघितली की स्टार्टअपवाली इन्व्हेस्टर मंडळी तीच तीच असतात. त्यांचा एक कंपू असतो. ते व्हाल्यूएशन वाढवत नेतात इत्यादी. त्यांनी कधी बाहेर पडायचे आधीच ठरलेले असते पण सामान्य नागरिकाला काहीच हाती लागत नाही इत्यादी इत्यादी. 


पण सत्य काय आहे?

आपल्या लहानपणी टाटा, बिर्ला, वालचंद सारखे धनाढ्य उद्योजक होते, परंतु संशोधनामध्ये जास्त पैसा न घालता त्यांनी जागतिक कीर्तीच्या उत्पादकांबरोबर करारनामे करून त्या उत्पादकांनी तयार केलेला माल हे भारतात आणून विकायचे किंवा तसाच माल थोडेफार भारताला सुयोग्य बदल करून भारतातच तयार करून विकायचे. बरेच वेळा त्यांनी जुने घिसे पिटे तंत्रज्ञान भारतात आणून त्यावर पैसे कामावले आहेत कारण नवीन तंत्रज्ञान कोण कशाला विकेल? नुकतीच एक बातमी वाचली की मोबाईल, इलेक्ट्रीकलं व्हेईकल पासून अगदी सोलार पॉवर प्लांट साठी लागणाऱ्या लिथीयम आयन बॅटरी बनवणाऱ्या ५ वर्ष जुन्या चिनी कंपनीने रिलायन्स सारख्या बड्या आणि नावाजलेल्या भारतीय कंपनीला आपली टेक्नॉलॉजी विकण्यास नकार दिला. कारण त्यांनी अब्जो डॉलर्स गुंतवून विकसित केलेले तंत्रज्ञान त्यांना दुसऱ्याला आयते द्यायचे नाही. या वरून समजा भारत कोठे आहे?


मॉरीस ओक्सफोर्ड कंपनीने बनवलेले डिझाईन वापरून, बिर्लाची हिंदुस्थान मोटर्स कंपनी वर्षानुवर्षे अँबेसॅडर गाडी विकत होती, तर इटालियन पियाजिओ कंपनीने इटालियन व्हेस्पा स्कुटरचे डिझाईन वापरून बजाज ग्रुप "बजाज चेतक" स्कुटर विकत होती. टाटा ग्रुपने डेलमर बेन्झ कंपनीशी करार करून भारतात कित्येक वर्ष टाटा मरसिडीज बेन्झ ट्रक तयार करून विकले आहेत. जर चांगला व्यवसाय होत असेल तर जोखीम कोण घेणार? पण नोकिया, कोडॅक, हिंदुस्थान मोटर्स सारख्या कंपन्या भाकरी न फिरवल्या मुळेच बंद पडल्या किंवा पाठी पडल्या.


जेथपर्यंत बाजार परकीय कंपन्याना खुला नव्हता तेथपर्यंत ह्या धनिकांची डाळ शिजत होती. पण १९९१ च्या भारताच्या न्यू इकोनॉमिक पॉलिसी नंतर भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले. नवनवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन मार्केटिंग स्ट्रॅटिजी वापरून अमेरिकन, युरोपीयन, चिनी प्रोडक्ट्स भारतीय बाजारपेठा काबीज करू लागले. उशिरा कां होईना संशोधन महत्वाचे हे लोकांना आणि व्यवसायकांना लक्षात येऊ लागले. 


अगदी नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळापासुन जरी देशात संशोधन खर्चावर टॅक्स सूट मिळत असली तरी संशोधनावर खर्च न करता त्याचा लाभ टॅक्स चोरी करण्यासाठी हे उद्योजक वापरत असत. थोडक्यात संशोधन आणि उद्योजकांचे नाते विळ्या भोपळ्याचे असे. 


टाटा ग्रुप जरी १८६८ मध्ये स्थापन झाला असला तरी पहिली संपूर्ण भारतीय बनवटीची पॅसेंजर गाडी टाटा इंडिका यायला १९९८ साल उजाडले. याचे कारणच मुळी संशोधनाचा अभाव. 


स्टार्टअप म्हणजे नुसते संशोधन नाही तर नवीन पद्धतीने ( प्रोसेस) किंवा नवीन तंत्रज्ञान वापरून किंवा नवीन व्यवस्थापन तंत्र वापरून केलेला व्यवसाय. अनेक वेळा एखादा व्यवसाय आजपर्यंत न सोडवलेले सामाजिक, आर्थिक, अन्य विषयातील प्रश्न किंवा न दिलेल्या सेवा जर समाधानकारक देऊ शकत असेल तरी त्याला स्टार्टअप म्हणता येईल. अनेक वेळा हे व्यवसाय रूळलेले नसल्यामुळे अशा व्यवसायाना नफ्यामध्ये यायला वेळ लागतो. काही वेळा त्यांची सुरवातीची गुंतवणूक खूप मोठी असते. त्यांचा आवाका एव्हडा मोठा असतो की त्याची जोखीम एकटा दुकटा व्यवसायिक घेऊ शकत नाही. अशा वेळेला जे गुंतवणूकदार अशी जोखीम भागीदारीत किंवा एकटे किंवा समूहाने घ्यायला तयार होतात त्याला वेंचर कॅपिटलिस्ट असे म्हणतात. 


अर्थातच कोणताही वेंचर कॅपिटलिस्ट अंध:पणे फक्त लालच म्हणून कोणतीही गुंतवणूक करत नसतो, तर त्याची ती calculated रिस्क असते. त्याला माहिती असते की १० पैकी ७ स्टार्टअप पुढपर्यंत पोहोचतच नाहीत पण उरलेल्या ३ त्यांची गुंतवणूक कित्येक पाटीनी परतावा देतील. जेथपर्यंत स्टार्टअप आपल्या हेतूवर शुद्ध असतो किंवा त्याची कामाची दिशा आखलेल्या नियोजना प्रमाणे असते तेथपर्यंत गुंतवणूकदार आशावादी असतो. आणि तो व्यवसाय फळा फुलाला आला की तो त्यातून काही प्रमाणात बाहेर पडून आपली गुंतवणूक मोकळी करतो.


अशा शेकडो स्टार्टप आहेत ज्यांनी बिलीयन्स ऑफ रुपयांचा परतावा दिला आहे. Naukri.com, makemytrip सारख्या कंपन्या आहेत ज्या अशा वातावरणात यशस्वी झाल्या आहेत. ओला / उबेर, blinkit, झेपटो, झोमॅटो, पोलिसीबाजार, ऍमेझॉन सारख्या कंपन्याची नांवे तर घरा घरामध्ये पोहचली असून बच्चा बच्चा त्यांना ओळखतो. त्यांनी तयार केलेले मार्केट ( बाजार) पारंपरिक मार्केट पेक्षा कितीतरी मोठे आहे. 


भारताच्या GDP मध्ये स्टार्टअप नी २०२३ साली १४० बिलीयन डॉलर्सने सहभाग केला असून २०३० पर्यंत तो १ ट्रिलीयन पर्यंत जाईल असा अंदाज आहे. हा आकडा सद्याच्या GDP च्या ४ ते ५% आहे. त्यांनी सुमारे १६ लक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.


जसे प्रत्येक केलेला व्यवसाय यशस्वी होतोच असे नाही तसेच वर लिहिल्या प्रमाणे प्रत्येक स्टार्टअप यशस्वी होईलच असे नाही. शेवटी स्टार्टअपच्या कल्पने प्रमाणेच स्टार्टअपचे नेतृत्व, आर्थिक आणि अन्य व्यवस्थापन, कामाशी प्रामाणिकपणा आणि यशस्वी होण्याची तळमळ इत्यादी अनेक गोष्टीवर स्टार्टअप किंवा कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.


माधव भोळे


सॅम वॉल्टन (१९१८-१९९२)

 सॅम वॉल्टन (१९१८-१९९२)

(वॉलमार्टचे सह-संस्थापक)


अनेक वर्षांपूर्वी, जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेन वॉल-मार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांनी मोठ्या हुशारीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला होता. जेव्हा प्रत्येकजण विक्री आणि सेवेबद्दलच्या भाषणाची अपेक्षा करत होता, तेव्हा त्यानी या शब्दांनी सुरुवात केली:


"मी तो माणूस आहे जो रेस्टॉरंटमध्ये जातो, टेबलावर बसतो आणि संयमाने वाट पाहतो, तर वेटर माझ्या ऑर्डरची नोंद करणे सोडून बाकी सर्व काही करतो."


मी तो माणूस आहे जो दुकानात जातो आणि शांतपणे वाट पाहतो, त्यावेळी विक्रेते त्यांची वैयक्तिक संभाषणे पूर्ण करत असतात.


मी तो माणूस आहे जो पेट्रोल पंपावर जातो आणि कधीही हॉर्न वाजवत नाही, तर कर्मचारी आपले सकाळचे वर्तमानपत्र वाचून पूर्ण करेपर्यंत मीं संयमाने वाट पाहतो.


मी तो माणूस आहे जो एका वस्तूसाठी आपली गरज समजावून सांगतो, आणि तीन आठवडे वाट पाहिल्यानंतर ती मिळाल्यावरही तक्रार करत नाही.


मी असा माणूस आहे की, जेव्हा तो एखाद्या व्यावसायिक ठिकाणी जातो, तेव्हा तो जणू काही तें आपल्यावर उपकारच करत आहेत असे त्यांना वाटते.मीं फक्त एका हास्यासाठी विनवणी करत आहे किंवा फक्त आपल्याकडे लक्ष दिले जावे अशी आशा बाळगत आहे असे त्यांना वाटते.


तुम्हाला वाटत असेल की मी एक शांत, संयमी, कधीही त्रास न देणारा माणूस आहे.

..... पण तुमचा गैरसमज आहे.


मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मी तो ग्राहक आहे जो कधीही परत येत नाही!


 तुमच्या कंपनीत मला परत आणण्यासाठी दरवर्षी सर्व प्रकारच्या जाहिरातींवर लाखो रुपये खर्च केलेले पाहून मला खूप आनंद होतो. कारण जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो होतो, तेव्हा त्यांनी फक्त एक छोटी, साधी आणि स्वस्त गोष्ट करायला हवी होती: माझ्याशी थोडे अधिक सौजन्याने वागायला हवे होते.


लक्षात घ्या बॉस फक्त एकच असतो: तो म्हणजे ग्राहक. आणि तो आपले पैसे दुसरीकडे खर्च करून कंपनीतील अध्यक्षांपासून ते शिपायापर्यंत, प्रत्येकाला कामावरून काढून टाकू शकतो.


यशस्वी व्हायचे असेल, तर इतरांपेक्षा उत्तम ग्राहक सेवा द्या.


सॅम वॉल्टन