Thursday, February 26, 2026

तामिळनाडू एक झलक.

तामिळनाडू एक झलक.

नुकतेच तामिळनाडू मध्ये विविध मंदिरे आणि शहरांना भेट देण्याचा योग आला. त्यातील निरीक्षणे खालील प्रमाणे.

१) स्वच्छ आणि सुंदर रस्ते. हायवे ट्राफिक विरहित. 

२) स्वच्छते बद्धल नागरिक जागरूक आहेत.

३) चेन्नई पासून सुरवात करून वेल्लोर, श्रीपुरम, कांचीपुरम, महाबलीपुरम, थिरूअण्णामलाई, चिदंबरम, तंजावर, त्रिची, पलानी, कोडाईकनाल इत्यादी शहराना भेट दिली. हायवे लगतची सर्व गावेच्या गावे सपाट आणि काळी कसदार किंवा तांबडी माती असलेली भातशेती, ऊस, अन्य धान्य शेती, तुती ( रेशीम किड्यांचे अन्न रेशीम शेती साठी उपयोगी ) आणि निलगिरीची झाडें होती आणि सर्वत्र हिरवेगार होते. फक्त जिंजी किंवा थिरूअण्णामलाई येथे डोंगर असल्यामुळे माकडे दिसली.


४) पल्लवा साम्राज्य ( ३ ते ९ वे शतक ), चोला साम्राज्य ( ९ ते १३ वे शतक ), आणि मदुराईचे नायक साम्राज्य किंवा विजयनगरचे साम्राज्य ( १४ ते १७ वे शतक ) या काळात बांधले गेलेले भले मोठे मंदिर परिसर ( Temple Complexes ). त्यात अगदी चुना किंवा सिमेंट रहित दगडी बांधकामा पासून चुना आणि गूळ मिश्रण असलेला पदार्थ वापरून भल्या मोठ्या भव्य दिव्य मंदिरांची उभारणी झाली असून त्यातील बहुतांश बांधकामे आजही टिकून आहेत. लोक रांग लावून दर्शन घेतात आणि कोठेही धक्का बुक्की नाही. तुम्ही थाळीत पैसे टाका अथवा नका टाकू, पुजारी तुम्हांला तीर्थ प्रसाद देतात. अनेक ठिकाणी विशेष दर्शन रु. १० ते ५० पर्यंत तिकीट आहे त्यामुळे रांगेत उभे राहायचा वेळ वाचतो. संपुर्ण मंदिर परिसर स्वच्छ असून कोणीही घरचे डबे आणून तेथेच खायला बसत नाहीत. बहुतेक ठिकाणी चप्पल स्टॅन्ड आहेत आणि नसला तरी चपला चोरी होत नाहीत. 


बहुतेक सर्व ठिकाणी फक्त त्यांच्या तामिळ भाषेत माहिती आणि देवतेची नांवे आहेत त्यामुळे समजतं नाही. फक्त photography not allowed ते मात्र इंग्लिश मध्ये सुद्धा लिहिलेले🤪. शिवाय देवळे भव्य पण गाभारे लहान तसेच काळोखी. देवांच्या मूर्ती सुद्धा काळ्या पाषाणाच्या. फक्त समया किंवा पणत्याचा उजेड त्यामुळे मूर्तीचा आकार आणि चेहरा नीट दिसत नाही. गाभाऱ्यात विजेचा प्रकाश नाही. 


वरदराज पेरूमल मंदिर ( २३ एकर ), अण्णामलाईयार मंदिर, अण्णामलई नगर ( २५ एकर ), एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम ( २५ एकर ), नटराज मंदिर चिदंबरम ( ४० एकर ), श्री लक्ष्मी सुवर्ण मंदिर, वेलोर ( १०० एकर ), रंगनाथ स्वामीं मंदिर श्रीरंगम ( १२६ एकर ). असे मोठ मोठाले मंदिर कॉम्प्लेक्स असून बहुतेक मंदिरांना २५, ३० फूट उंच दगडी तटबंदी आहे. अनेक मंदिराना चारही बाजूला किंवा दोन बाजूला प्रवेशद्वारे असून मोठ मोठाली नक्षीकाम केलेली गोपुरे आहेत. सर्व गोपुरे जवळजवळ सारखीच दिसतात त्यामुळे आलो कोणत्या गोपूरातून आणि बाहेर कोठून पडलो तेच कळत नाही. अनेक ठिकाणी गोपूराला नांवे दिली आहेत ( तामिळ मध्ये). मंदिरांमध्ये अप्रतिम कोरीव दगडी बांधकाम असून प्रत्येक देवतेसमोर दगडी कोरीव सभामंडप आहेत. एव्हडे कोरीव बांधकाम परत होणे शक्य नाही. ब्रिटिश आणि फ्रेंच कोरीव कामे सुंदर असतात पण ही त्या पेक्षाही सुंदर आहेत.


बहुतेक मंदिरे शंकर, पार्वती, विष्णु, लक्ष्मी, कार्तिक स्वामीं ( मुरुगन, सुब्रमण्यम ), श्रीकृष्ण, गणपती ( विनयागार किंवा पिल्लयार ) या देवांची आहेत. येथे कार्तिक स्वामीं हा विवाहित असून त्याला इंद्राची मुलगी देवयानी आणि वल्ली नावाची आदिवासी जमातीच्या राजाची मुलगी ( भिल्लीण ) अशा दोन पत्नी सुद्धा आहेत. आपल्याकडे किंवा उत्तरेत कार्तिक स्वामीं अविवाहित मानला जातो.  


५) तामिळनाडू मध्ये अनेक रेस्टॉरंटच्या मोठमोठ्या साखळ्या आहेत जसे की हॉटेल सरवाना भवना ( १०० रेस्टॉरंटस), अडियार आनंद भवना ( २०० रेस्टॉरंटस ), सागर रत्न रेस्टॉरंटस ( ११० रेस्टॉरंटस). आपल्याकडे अशा कामत, शिवसागर, कैलाश परबत, भगत ताराचंद सारख्या थोड्याफार साखळी रेस्टॉरंट आहेत पण ते सर्व अमराठी मंडळीची आहेत. 

दत्त स्नॅक्स, पणशीकर मिठाईवाले, जोशी वडेवाले सारखे काही मोजके नामचिन सोडले तर वेलणकर, विनय हेल्थ, तृप्ती सारखी मंडळी "आमची कोठेही शाखा नाही" ह्या ब्रीद वाक्यावर परमआनंद मानतात. त्याचे कारण सक्षेशन प्लॅन आणि कॉर्पोरोटायझेशनचा अभाव. 


६) कल्याण ज्वेलर्स, तनिष्क, शिवाय ज्वेलरी आणि साड्याची भव्य झगमगीत दुकानें इतर दिवशी सुद्धा ग्राहकांनी भरलेली दिसली. 

७) त्रिची ( त्रिचनापल्ली ) मधील एका कपड्याच्या आणि साड्यांच्या मॉल मध्ये गेलो होतो त्याचे शॊरूम ३ लाख sq ft आहे. तामिळनाडू मधील शुद्ध रेशमी कांजीवरम साडी ( प्युर सिल्क ) १० हजार ते ३०-३५ हजारापर्यंत जाते. ( आकडे ऐकूनच खाली उतरलो 🤪).


८) बहुतेक शहरे विस्तारत असून बंगले सिस्टीम अजून अस्तित्वात आहे. मोठ मोठ्या शहरात सुद्धा गगनचुंबी इमारती हातांच्या बोटावर मोजण्या एव्हडयाच दिसतात. अनेक शहरांना धार्मिक महत्व असून एकंदरीत लोक धार्मिक आणि समाधानी वाटले.


९) तामिळनाडू च्या राजकारणामध्ये सिनेमा स्टार्स आणि सुपर स्टार्स णा खूप महत्व आहे. येथे लोक हिरोस ना देव मानणारी लोक आहेत.

१०) तामिळनाडू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे स्वतंत्र मराठा साम्राज्य होते ही आनंदाची बाब आहे.


३० वर्षा पूर्वी तामिळनाडू मध्ये उटी, मदुराई, रामेश्वरम येथे गेलो होतो. त्या वेळची त्यांची गरिबी बघितली आहे त्या मानाने आता नक्कीच सुबत्ता आहे असे वाटते.

माधव भोळे 


No comments:

Post a Comment