श्रीपुरम, वेल्लोर येथील सुवर्ण मंदिर!
आज वेल्लोर ( तामिळनाडू ) शहरापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीपुरम मधील श्री नारायणी मंदिरात जाण्याचा योग आला. सुमारे १०० एकर परिसरात बसलेल्या ह्या महाभव्य महालक्ष्मी मंदिर कॉम्प्लेक्स मध्ये प्रचंड मोठ्या आकराच्या षटकोनी ताऱ्यासारख्या प्रदक्षिणा मार्ग असलेल्या परिसराच्या मध्यभागी तळ्यामध्ये वसलेल्या मंदिराच्या सर्व बाजूना खांबांसहित असलेल्या सभामंडपाचा प्रत्येक कोना न कोना तांबेमिश्रित सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले हे देऊळ रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशझोतात डोळे दिपवून टाकते. अत्यंत सुंदर कलाकुसरीने भरलेले हे मंदिर सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले आहे. ह्या पत्र्यांमध्ये एकंदर १५०० किलो वजनाचे सोने वापरले आहे, ज्याची किंमत सुमारे रु. २२०० कोटी असावी.
लँडस्केप, डिझाईन, लायटिंग, वास्तूशास्त्र, स्थापत्य शास्त्र, सिक्युरिटी, मुख्य म्हणजे श्री नारायणी देवींची मूर्ती, संपुर्ण व्यवस्था सुंदरच आहे.
मी आता पर्यंत अमृतसरचे सुवर्ण मंदिर, अयोध्येतील नवीन श्री राम मंदिर, मीनाक्षी मदुराई मंदिर, गांधीधाम आणि नवी दिल्ली मधील स्वामीं नारायण मंदिर, कोराडीदेवी, कोराडी, नागपूर आणि अशी अनेक भव्य मंदिरे बघितली आहेत पण आस्था आणि धार्मिक बाब हे विषय सोडले तर, ह्या मंदिराचा नंबर सर्वात वर लावायला मला संकोच वाटत नाही.
आपण एकदा तेथे जाऊन बघाच म्हणजे कळेल. कॉम्प्लेक्स मध्ये कॅमेरा, मोबाईल न्यायला बंदी आहे म्हणून प्रत्यक्ष फोटो काढता आले नाही पण हे इंटरनेट वरील फोटो बघा म्हणजे कल्पना येईल.
माधव भोळे
No comments:
Post a Comment