राघव चड्डा आणि अतिशयोक्ती
सध्या संसदेत एक वादळ आले आहे. त्याचे नांव आहे राघव चड्डा. शिक्षणाने आणि पेशाने चार्टड अकाउंट असलेला, आप पार्टीचा हा तरुण राज्यसभा खासदार सरकारच्या कारभारातील त्रुटी शोधून काढून लोकांचा आवाज संसदेत उठवत अतिशय चांगले काम करीत आहे. नुकत्याच झालेल्या बजेट सत्रात त्याने सम भागवरील कॅपिटल गेन टॅक्स आणि STT मधील त्रुटी, विमाधारित रोग्यांची हॉस्पिटल कडुन होणारी लूटमार, बँकेतील न्यूनतम शिल्लक आणि ऐटीएम चार्जेस, होम लोन मध्ये घर गहाण असताना इन्शुरन्स पॉलिसी काढण्यासाठी बँक करीत असलेली जबरदस्ती इत्यादी विषय मांडले. ते खरोखरचं सरकारला आणि प्रशासनाला जागे करणारे आहेत.
पण त्याने आणखी एक मुद्धा मांडला की सरकार फक्त थोड्याच नोकऱ्या देते पण लाखो विद्यार्थी लाखो रुपये भरून अभ्यास करत आहेत त्यांना जर नोकरीं नाही मिळाली तर त्यांची फी परत करायला हवी. हा मुद्धा अतिशय चुकीचा आहे. मुळात नोकरीं मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठीच शिक्षण घ्यायला हवे हा विचारच मुळात चुकीचा आहे.
मुळात सरकारने प्रत्येक शिक्षिताला नोकरीं देणार किंवा बेकारी भत्ता देणार असे आश्वासन दिलेले नाही. शिक्षण घेणे जबरदस्ती नाही. जगाच्या व्यवहारात आपल्याला हुशार बनायचे असेल किंवा आपल्याला आपल्या पायावर उभे राहायचे असेल तर शिक्षण नक्कीच उपयोगी पडते. पण आपण काय शिकता, कसे शिकता, त्याचा वापर आपण व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक जीवनात कसा करता हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. तुम्ही शिक्षणासाठी फी भरली होती त्या मधून शाळा, कॉलेज, विद्यापीठ यांचे प्रशासकीय आणि शिक्षण खर्च निघून गेले आहेत. त्यामुळे सरकार किंवा ती विद्यापीठे तुम्हांला डिग्री सोडून काहीही देय लागत नाहीत. त्यामुळे हा मुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे.
राघव चड्डा आपण चांगले काम करता तेव्हा सदसदविवेक बुद्धी वापरून प्रश्न उपस्थित करा ही विनंती. विरोधा साठी विरोध नको.
माधव भोळे.
No comments:
Post a Comment