Wednesday, January 25, 2017

अमेरिका फर्स्ट

अमेरिका फर्स्ट
नुकतेच अमेरिकेचे ४५ वे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे  २० जानेवारी २०१७ रोजी  त्याच्या शपथविधीचे वेळी १७ मिनिटे प्रथम राष्ट्राध्यक्षीय भाषण झाले. निवडणूक प्रचाराचे वेळी घेतलेल्या अमेरिका फर्स्ट या त्यांच्या मूळ मुद्याला साजेसे असे ते छोटेखानी परंतु जोशपूर्ण भाषण झाले.  त्यांनी सांगितले कि अमेरिकेच्या याआधीच्या राजनीती आणि व्यापारनीती मुळे जगातील देश श्रीमंत झाले आणि अमेरिकन गरीब झाले. आमचे सैनिक दुसऱ्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायला गेले आणि आमच्या सीमा उघड्या पडल्या. हे करताना आमचे अब्जोनी खरबोनि डॉलर रणांगणात खर्च झाले,  ते अमेरिकेतील प्रामाणिक करदात्यांच्या होते. आमच्या पायाभूत सुविधा आणि त्याचा विकास रखडला. आमच्या फॅक्टऱ्या बंद झाल्या आणि आमच्या हाताची कामे दुसऱ्या देशात गेली.  आमच्या मध्यम वर्गीयांची कष्टाने कमावलेली संपत्ती देशाच्या राजकारण्यांनी गोंडस कारणे दाखवुन लुबाडली आणि ती जगभर वाटली. श्रीमंत झाले ते मूठभर लोक, पण गावागावातील अमेरिकी नागरिक तसाच उपेक्षित राहिला. बाहेरच्या देशातील लोक येऊन कमी पगारावर काम करून आमच्या लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आणू लागले आणि आमच्या अमेरिकन बंधू भगिनींवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. परंतु आता तो भूतकाळ आहे. आजपासून एकच नवीन मंत्र, अमेरिका फर्स्ट. या पुढे अमेरिकेचे व्यापार धोरण,  करविषयक धोरण, परराष्ट्रीय धोरण आणि व्हिसा धोरण या सर्व ठिकाणी अमेरिकन कामगार आणि अमेरिकन कुटुंबाचाच विचार करून धोरणे ठरवली जातील. इस्लामिक दहशदवाद ज्याने जगात मानवतेविरुद्ध भस्मासुर निर्माण केला आहे तो जगातून समूळ नष्ट करण्यास अमेरिका वाचनबद्द आहे. 

या त्यांच्या भाषणावर आणि विचारांवर अनेक देशाचे नागरिक आणि राजकारणी नाराज आहेत. पण ट्रम्प यांचे काय चुकले हे ते सांगू शकत नाहीत.  प्रत्येक देशाला आपले आणि आपल्या देशाच्या नागरिकांचे हितसंबंध जपायलाच पाहिजेत,  किंबहुना त्या त्या देशाच्या नेत्यांची ती घटनाबध्द जबाबदारी असते.  आचार्य विनोबाजी भावे यांनी म्हटले होते कि प्रत्येकाने आपले आंगण साफ करा म्हणजे देश साफ होईल.  आता त्यामुळे इतर देशांच्या हितसंबंधांना धोका पोहोचत असेल तर तसे होऊ नये अशी तजवीज त्यांनी करायला हवी. आपणास माहित असेल कि अमेरिकेत आणि आता भारतात सुद्धा सुई पासून,  मोठमोठ्या ट्रॅक्टर पर्यंत अनेक गोष्टी चीन मधून आयात केल्या जातात. दिवाळीचे कंदील, फटाके एवढंच काय गणपतीच्या मुर्त्या सुद्धा चीन मधून विकायला येत आहेत. मग काय भारतीय कामगारांनी माशा मारायच्या? अर्थात तयार झालेल्या अशा प्रसंगामुळे आपत्तीतुन उत्पत्ती या धोरणानुसार भारतीय किव्वा अमेरिकी नागरिकांनी आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि ग्राहकाला परवडेल अशा किमतीची  बनवणे आवश्यक आहे. सरकारांनी भरमसाठ व विविध स्तरावरील टॅक्स कमी करून, आपले व्यवस्थापकीय खर्च कमी करायला पाहिजे. सर्व ठिकाणी वीज, पाणी,  व्यवसायास आणि उत्पादनास कमी व्याजावर कर्ज आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारी खात्यातील गोंधळ आणि भ्रष्टाचार निर्दयपणे निपटून काढायला हवा. लायसनराज बंद करून व्यापारास आणि उद्योगास उपयुक्त धोरण राबवायला हवे. भारतात उद्योग करून पैसे कमावणारा माणसाकडे गुन्हेगार या नात्याने बघितले जाते. जर उद्योग धंदे वाढले तरच पुढील पिढीला नोकरी धंदा मिळणार आहे. नुसता पुस्तकी शिक्षणावर भर न देता व्यवसायोपयोगी शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे.

आणखी एक महत्वाचा विषय येथे मांडू इच्छितो. सध्या सामाजिक माध्यमांवर आणि वर्तमान पत्रात  वेगवेगळ्या राष्ट्रीय पुढाऱ्यांबद्दल आणि काही विशिष्ठ हेतूने स्वार्थासाठी वेगवेगळ्या समाजाबद्दल गरळ ओकले जात आहे. जातीजातीत, जाती-उपजातींत, धर्माधर्मात स्वतःच्या स्वार्थासाठी तेढ वाढवली जात आहे (त्याशिवाय यांच्या मर्सिडिस आणि लम्बोर्घिनी गाड्यांची संख्या कशी वाढेल?).   अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगवेगळी नाटके आणि सिनिमे जुने ऐत्यासींक वाद उकरून काढत आहेत.  यामध्ये देशासमोर असलेले मूळ प्रश्न बाजूला राहून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम असे अभिव्यक्ती स्वातंत्रवादी करत असून राजकारणी आपल्या फायद्यासाठी त्या आगीत तेल ओतत आहेत.

भारतीय समाजातील फूट पाडायला आणि त्याचा फायदा उठवायला ब्रिटिशांना १५० वर्ष लागली तेच काम आजकालचे तथाकथित पुरोगामी म्हणवणारे नेते मंडळी सहज एक काडी लावून करत आहेत आणि त्या आगीत जनता होरपळून जात आहे. त्या विध्वंसात नुकसान होतंय ते देशाचं आणि पर्यायाने सामान्य नागरिकांच्या संपत्तीचे. या राजकारण्यांना त्याचे काहीच पडलेले नाही. ज्या राष्ट्रपुरुषांनी किव्वा पुढाऱ्यांनी  काही निर्णय त्या त्या वेळी घेतले असतील ते त्या परिस्थितीत योग्य असावेत आणि त्याचे मूल्यमापन करण्याची तसदी कृपया आपण घेऊ नये.  मी असे म्हणत नाही कि काही चुका कोणाकडून घडल्याचं नाहीत किव्वा नसतील. अहो जगात कुठलाही कोळसा उगाळला तरी तो काळच असतो आणि तो जाळल्यावर त्याची राखच होते.  जर आपण समजूतदार आणि पुरोगामी असाल तर मोठ्या मनाने सर्वानी झाले गेले गंगेला मिळाले असे मानून नव्याने समृद्ध भारताचा इतिहास घडवूया आणि या प्रगतीची गंगा जगभर पोहोचवूया.

या वर एकच उपाय आहे. गौरव निमकर यांच्या "इबत्तीदा" या एकांकिकेमध्ये म्हटल्या प्रमाणे नागरिकांना जिहाद किव्वा धर्मयुद्धच करायचे असेल तर ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध करा, मागासलेपणाच्या विरुद्ध करा, गरिबीच्या विरुद्ध करा, घाणीच्या साम्राज्याच्या विरुद्ध करा, गुन्हेगारीच्या विरुद्द करा, व्यसनांच्या विरुद्ध करा. प्रत्येक भारतीयाने म्हटले पाहिजे, भारतीय हि माझी ओळख आहे, मानवता माझा धर्म आहे. सदाचार आणि प्रामाणिकपणा हि माझी संस्कृती आहे.  जर्मन आपला इतिहास विसरून कामाला लागले, जपान हिरोशिमाच्या राखेतून उभे राहिले,  अमेरिका यादवी युद्धातून सावरून पुढे गेली, चीन भूक आणि दुष्काळावर  मात करू शकला मग आपण कमी आहोत कायचला आपणही म्हणूया भारत फर्स्ट, भारतीय फर्स्ट.

माधव भोळे Email madhavbhole99@gmail.com
(वरील लेख लेखकाच्या परवानगी शिवाय अन्यत्र छापू नये. )

चक्र
(जगाच्या कल्याण भाग ४ )
चक्र: लिखित इतिहासात, चक्र एक साधन म्हणून, प्रथम मेसोपोटॅमिया, या देशात (सध्याच्या इराक)  जुन्या संस्कृतीमध्ये (ख्रि. पु. ६०००) तयार झालेले आढळते. प्रथम तयार झालेले चक्र हे दगडाचे असून ते एकसंधी होते. पृथ्वीच्या उगमापासून आतापर्यंत झालेल्या सत्य युग (१७,२८,००० वर्ष), त्रेता युग (१२,९६,००० वर्ष), द्वापार युग (,६४,००० वर्ष ) आणि सध्या चालू असलेल्या कलीयुगाच्या वर्णनाप्रमाणे ( ख्रि. पु. ३१०२  ते पुढे सुरु म्हणजेच महाभारताचे युद्ध संपल्यानंतर), कृष्णाचे सुदर्शन चक्र, रथांना असलेली चाके लक्षात घेता, चक्र या विषयाबद्दल भारतीय संस्कृतीला बरीच आधी माहिती होती असे दिसते. शिवाय विष्णू पुराणात लिहिल्याप्रमाणेसमुद्र मंथनामध्ये मेरू पर्वताची रवी करून समुद्र मंथन केल्याचे आढळते. हे लक्षात घेता, चक्राकार गती आणि त्यामुळे तयार होणारी ऊर्जा आणि ताकद (Force) याचा अंदाज हिंदू संस्कृतीला आधीपासूनच होता असे दिसते. व्यास ऋषींनी लिहिलेली पुराणे जरी ५१०० वर्षांपूर्वीची असली तरी त्यामध्ये वर्णन केलेल्या गोष्टी कितीतरी आधी होऊन गेल्या आहेत (महाभारताचा काळ साधारणपणे ख्रि. पु. ३१०२ पकडला जातो).  इजिप्तशिअन लोकांनी लाकडी ओंडक्याचा वापर करून मोठमोठाले दगड गिझाच्या पिरॅमिडसाठी (ख्रि. पु. २५८९-२५६६) उंच वर नेल्याचे सुद्धा इतिहासात आढळते. 

पूर्वी एक संधी असलेले चक्र (चाक) सुरवातीला कुंभार मडकी तयार करण्यासाठी वापरायचे. हे दगडाचे चक्र, पुढे त्याचे वजन कमी व्हावे म्हणून लाकडाचे झाले आणि आणि त्या पुढील सुधारणा म्हणजे त्याला एका अक्षा भोवती आरे (Spokes) असलेले चक्र प्रचलित झाले. ह्या लाकडाच्या अरे असलेल्या चक्राच्या गतीचा वापर करून ते चक्र दूरवर सहज ओझी वाहून नेण्यासाठी म्हणून बैल,घोडा किव्वा प्राण्याने ओढलेली गाडी म्हणून त्यांचा वापर होऊ लागला आणि इथून मानवाच्या उत्क्रांतीला वेग येण्यासाठी आणखी एक जोर मिळाला. नोव्हेंबर १८३६ मध्ये फ्रान्सिस स्मिथ या ब्रिटिश इंजिनियर ने प्रथम चक्राकार पंख्याच्या साहाय्याने पाण्याला मागे ढकलणारी (Propeller) ३० फूट लांब ६ टन वजनाची बोट इंग्लंड मधील पॅडींगटन क्यानॉल येथे चालवली. १७ डिसेम्बर १९०३ साली राईट बंधूनी चक्राकार पंख्यांचा वापर करून त्याच्या गतीने हवेला मागे फेकत उडण्याचा प्रयत्न करत पहिले विमान आकाशात उडविले. या सर्व गोष्टींमुळे दळण वळण क्षेत्रात एक वेगळीच क्रांती झाली.  सध्या सायकल पासून ते मोटार गाड्यांपर्यंत सर्व ठिकाणी चक्राचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने होऊ लागला.

कमीत कमी ताकदीत वजनदार  वस्तू उचलणे या कामासाठी चक्राचा उपयोग पुली म्हणून केला जातो. आपण गावाला विहिरीच्या पाण्यावर चक्राकार आड बघितले आहेत्या मध्ये विहिरीतील पाणी जमिनीवर चक्राच्या साहाय्याने काढले जातेदोन चक्राकार जात्यामधील घर्षणाने धान्य दळणारी चक्की, तसेच मिक्सर, ग्राईन्डर, हवेचा पंखा या सारखे घरगुती उपयोग चक्रामुळेच शक्य झाले. मुलांच्या खेळाची अनेक साधने जसे कि मेरी गो राउंड, जायंट व्हील, वगैरे या सर्वात चक्राकार गतीचा वापर केला आहेच. अगदी चरखा आणि कुंभाराच्या चक्रापासून सुरवात करून तसेच  मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये चक्र वापरून अनेक मशीन बनवली गेली आणि त्याचा उपयोग वाढत गेला.
 पाण्यावर वीज निर्मिती करताना लागणारी जनित्रे सुद्धा चक्राकार असून त्या वर जोराने पाणी पडल्यास ती फिरून जनित्राची पाती त्याच्या आजूबाजूला असलेल्या चुंबकीय क्षेत्र कापतात आणि त्यामुळे वीज निर्माण होते. त्याच प्रकाराने गॅसवर चालणारी जनित्रे किव्वा पवन चक्की वर चालणारी जनित्रे चालतात. या सर्वात चक्राचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. अर्थातच चक्राबरोबर भौतिक शास्त्राने इतर विषयात सुद्धा प्रगती केल्यामुळे चक्राचा हा वापर शक्य झाले हे निश्चित.

जर चक्र मानवाला सापडले नसते तर आपण कोणत्या अवस्थेत असतो याची कल्पना करवत नाही. अगदी ज्या कोणी चक्राचा शोध लावला तेथेपासून ज्यांनी कोणी तिचा वापर आधुनिकतेसाठी करण्यास मानवाला दिशा दिली त्या सर्वाना माझा प्रणाम.

माधव भोळे (मोबा: ८४५१८८६७५९) Email madhavbhole99@gmail.com
(वरील लेख लेखकाच्या परवानगी शिवाय अन्यत्र छापू नये. )

Wednesday, December 14, 2016

विश्वकोष / ज्ञानकोष
(जगाच्या कल्याण भाग 3)
आपण व्यवहारात वेगवेगळे शब्द वाचत / वापरत असतो उदा. डेटा(Data), माहिती (Information), ज्ञान (Knowledge) आणि बोध (Wisdom), या मधील फरक थोडक्यात सांगायचा तो असा डेटा आपणास फक्त माहिती जशी आहे तशी पुरवतो उदा. व्यक्तींचे टेलेफोन नंबर लिहिलेला कागद हा डेटा (Data) झाला,  तो टेलेफोन नंबरचा डेटा जर मित्र, नातेवाईक, गाववाले अशा विभागात, विभागून लिहून आखून ठेवला तर ती माहिती (Information) तयार होते, तीच माहिती आणि त्या संबंधी अधिक माहिती मिळवून तिचा या नंबरांशी संबंध जोडला तर ते ज्ञान (Knowledge) तयार होते उदा. हा शाळेतला मित्र,  तो मामाचा मुलगा जो अमेरिकेला असतो त्याचा नंबर वगैरे.  शेवटचे अशा व्यक्तींमधून आपल्याला कोणत्या मार्गदर्शनासाठी कोण उपयोगी पडेल असा ठामपणे तर्क (judgment) मांडणे किव्वा कुणाचा सल्ला किती उपयोगाचा आहे याचा अंदाज बांधणे याला बोध (Wisdom) म्हणतात किव्वा एखाद्या कंपनीचा मालक / CEO ज्या वेळी मीटिंग मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींकडून माहिती घेतो आणि त्यावरून नक्की निर्णय घेतो ते त्याचे बोध (Wisdom) असते. बोध हा वैयक्तिक असतो तर ज्ञान हे उघडे पुस्तक असते.

मानवाने आजवर बऱ्याच गोष्टींची माहिती / अनुभव / निरीक्षण  घेतले आहे. ते जमवायला त्याला अनेक कष्ट, हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि धन लागले. परंतु आपल्याला झालेला हा त्रास दुसऱ्याला होऊ नये आणि आपली माहिती / अनुभव / निरीक्षणे दुसऱ्याला सहज मिळावीत या उदात्त हेतूने अनेकांनी ती माहिती / अनुभव / निरीक्षणे लिखित स्वरूपात, फोटो किव्वा अन्य प्रकारे जपून ठेवली आहेत. जगातील अशी वेगवेगळ्या विषयावरील , वेगवेगळी माहिती,  वेगवेगळ्या वर्गवारीने, सुनियोजित स्वरूपात एका ठिकाणी उपलब्ध करून दिली असेल अशा पुस्तकाला / पुस्तकांना (हल्लीच्या काळात मीडियाला ),  एनसायक्लोपेडिया (विश्वकोश / ज्ञानकोष) असे म्हणतात.

गौस प्लिनीस सेकन्डस ( ख्रिस्तपश्चात २३ - ख्रिस्तपश्चात ७९), ज्याला प्लिनी द एल्डर या नावाने ओळखले जाते त्या रोमन विद्वानाने Naturalis Historia (Natural History)  हा  जगातील पहिला ज्ञानकोश २ वर्षात १० खंडात आणि ३७ पुस्तकांमध्ये तयार केला असे मानले जाते, ज्यामध्ये खगोलशास्त्र (Astrology), गणित (Mathematics), भूगोल (Geography),  मानववंशशास्त्र (Anthropology), मानसशास्त्र (HumanPsychology), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Biology), शेतीशास्त्र (Agriculture), बागायतशास्त्र (Horticulture), औषधशास्त्र (Pharmacology), खाणशास्त्र (Mining), खनिजशास्त्र (Mineralogy),  मूर्तिशास्त्र (Sculpture), रंगकाला (Paintings),  मौल्यवान खडे (Precious stones) ह्या प्रमुख विषयांवर माहिती संकलित केली आहे.

चीन मधील "झू डी" या मिंग साम्राजाच्या, तिसऱ्या सम्राटाने, १४०३ साली "यॉन्गल कॅनन" हा चायनीज विश्वकोश बनवण्यास  आपल्याकडील विद्वानांना आवाहन केले आणि तो त्यांनी १४०७ साली पूर्ण केला.  त्या मध्ये  २२,९३७ हस्तलिखिते ११,०९५ विभागामध्ये जमा केली होती त्याची व्याप्ती बघता तो १४ फूट लांब, १० फूट रुंद आणि १० फूट उंच अशा खोलीत मावू शकला असता. दुर्दैवाने तो छापला जाण्याचं पूर्वीच आगीचे भक्षस्थानी पडला असे म्हणतात.  त्यानंतर १७२८ साली एफ्राहीम चेम्बर्स या अमेरिकन विद्वानाने शास्त्र आणि कलेचा २,४६६ पानांच्या विश्वकोश  २ पुस्तकात लंडन मधून प्रसीद्ध केला.


१७६८ ते १७७१ मध्ये, एडीनबर्ग या ब्रिटनच्या स्कॉटलंड प्रदेशात, प्रथम मोठा इंग्रजी विश्वकोश तयार
करण्याचे काम एनस्क्लोपेडिया ब्रिटानिकाने सुरु केले आणि २०१० मध्ये, १५ व्या आवृत्तीला त्यांचेकडे १०० पूर्णवेळ
आणि सर्व जगातून ४००० योगदानकर्ते,  ज्या मध्ये ११० नोबेल पारितोषिक विजेते आणि ५ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
आहेत. अशा लोकांच्या समृद्ध ज्ञानसंपदेमुळे, ३२ खंडामध्ये ३२६४० पाने असलेला हा सर्वमान्य आणि समृद्ध असा,  
विश्वकोश समजला जातो. सध्या हा सीमित प्रमाणात इंटरनेट वर आणि पूर्णपणे डिजिटल (सीडी / डीव्हीडी )
माध्यमात उपलब्ध आहे. या मध्ये २ लाख २८ हजार २७४ विषयांवर इंग्रजी भाषेतून ४ लाख ७४ हजार ६७५ लेख आहेत. 

ह्या शिवाय वेगवेगळ्या देशांनी, वेगवेगळ्या सौस्कृतींनी आप आपल्यापरीने अनेक एनसायक्लोपेडिया (विश्वकोश / ज्ञानकोष)
तयार केले आहेत त्या पैकी बहुतेक सर्व पुस्तक रूपात तर अनेक सीमित प्रमाणात इंटरनेटवर आणि पूर्ण पणे डिजिटल
(सीडी / डीव्हीडी ) माध्यमात उपलब्ध आहेत.

१५ जानेवारी २००१ ला या प्रयत्नांमध्ये आणखी एक मैलाचा दगड ओलांडला. जिमी वेल्स आणि लॅरी संगेर  या विद्वानांनी विकीपेडिया (Wekipedia) फौंडेशन नांवाची कम्पनी काढली आणि त्याद्वारे इंटरनेटवर लोकांसाठी प्रथम खुला(Open) इंटरनेट एनसायक्लोपेडिया सुरु केला. याचे वैशिष्ट असे कि आपणास एखाद्या विषयावर जास्त माहिती असेल तर ती माहिती संदर्भासहित त्यावर आपण लिहू शकता आणि त्याबद्दल खातरजमा करून ती या विकीपेडियामध्ये समाविष्ट केली जाते. या विकिपीडियावर आज पर्यंत वेगवेगळ्या विषयावर, २९० भाषांमध्ये, ४ कोटी लेख उपलब्ध आहेत. पैकी ५२ लाख ९३ हजार ५३९ लेख एकट्या इंग्रजी भाषेत आहेत. हि सर्व माहिती आपणास एकहि पैसा खर्च न करता मिळते. आता लक्षात आले असेल इंटरनेट ची ताकद किती आहे ती. 
भारताने वेदकाळापासून जगाच्या ज्ञानामध्ये भर घातली आहे. फेब्रुवारी २००३ मध्ये, भारतीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने स्थापन केलेल्या www.Namami.org (National Mission for Manuscript) या संस्थेने भारतातील पुरातन ज्ञान असलेल्या पोथ्या आणि हस्तलिखिते यांचा संग्रह करून तो डिजिटल फॉर्म मध्ये आणण्याचा भव्य प्रकल्प हाती घेतला आहे. त्या संस्थेतर्फे, प्रत्येक राज्यात घरोघरी जाऊन, सर्वे करून, आज पर्यंत जमवलेली, २० लाख हस्तलिखिते डिजिटल करून कृतीसंपदा या डेटाबेस मध्ये समाविष्ट करण्याचा संस्थेच्या मानस आहे, आज पर्यंत त्या पैकी १० लाख हस्तलिखिते डिजिटल करून झाली आहेत. भारतात एकंदर ५० लाख वेगवेगळी हस्तलिखिते असण्याचा अंदाज आहे.
मराठीमधील पहिला ज्ञानकोश बनवण्याचे महदकार्य, अमेरिकेतील प्रसिद्ध कॉर्नेल विद्यापीठातून पीएचडी  पदवी प्राप्त केलेले  कै डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (१८८४ - १९३७) यांनी १९१६ ते १९२८ दरम्यान त्यांनी स्थापन केलेल्या मराठी ज्ञानकोश मंडळाच्या साहाय्याने केले. मराठी ज्ञानकोश( http://ketkardnyankosh.com/) हा सध्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई चे साहाय्याने हा इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे.  २३ खंडांचा हा ग्रंथ त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आणि तुटपुंज्या आर्थिक पाठबळावर संपादित केला, त्या साठी त्यांनी आपले सर्व आयुष्य हाल अपेष्टात वेचले. त्यांना तसा ज्ञानकोश गुजरातीमध्ये सुद्धा तयार करायचा होता परंतु  महात्मा गांधींनी दिलेल्या थंड्या प्रतिसादाने आणि भारतीय विद्याभवनाचे संस्थापक, डॉ. कन्हय्यालाल मुन्शी यांचा "गुजराथी माणूसच गुजराथी ज्ञानकोश काढू शकेल" या त्यांच्या हट्टापायी त्यांनी तो नाद सोडून दिला. 
इंटरनेट वर मोफत उपलब्ध असलेला आणखी एक मराठी विश्वकोश म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या अखत्यारीतील "महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ" यांनी २० खंडात सादर केलेला,  मराठी विश्वकोश (https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/). वाई येथील प्रख्यात विद्वान कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, त्यानंतर प्रा. मे. पुं. रेगे, रा. ग. जाधव, कै डॉ. श्रीकांत जिचकर, डॉ. विजया वाड या तज्ज्ञांनी या विश्वकोशाचे वेळोवेळी प्रमुख संपादक म्हणून काम बघितले आहे. सध्या  हे काम श्री दिलीप करंबेळकर पुढे नेत  आहेत. या शिवाय अनेक भारतीय भाषांतून सुद्धा विश्वकोश / ज्ञानकोश निर्माण केले गेले आहेत.
वरील सर्व विभूती "जगाच्या कल्याणा संतांच्या .. " उक्तीला पात्र आहेत असे मला वाटते. त्यांना माझा प्रणाम.

माधव भोळे (मोबा: ८४५१८८६७५९) Email madhavbhole99@gmail.com
(वरील लेख लेखकाच्या परवानगी शिवाय अन्यत्र छापू नये. )
मानव अधिकार आणि त्याचे पुरस्कर्ते
(जगाच्या कल्याण भाग २)
पददलित मानवाचे शोषण करण्याचा प्रयत्न जगातील अनेक राष्ट्रांमध्ये झाला आहे. मानवाला वंश, रंग,
रूप, धर्म, जात, लिंग, भाषा, राजकीय किव्वा इतर मतमतांतरं, शारीरिक स्थिती, आर्थिक स्थिती इत्यादी 
विषयांच्या आधारे पृथकरण करून त्या मधील उच्च नीचता यातील दारी वाढवायची आणि त्यांच्या 
दुबळेपणाचा फायदा आपल्या स्वार्था साठी करून घ्यायचा हि जगाची रीतच झाली आहे. जे हक्क 
आपण नैसर्गिक रित्या आपले मूलभूत हक्क समजतो, ते मिळवण्यासाठी आपल्या मागील पिढ्यानी किती 
कष्ट सोसले आणि लढा दिला याची आपल्याला कल्पनाच येणार नाही. जगातील महान विभूतींनी या 
बाबतीत वेळो वेळी लढा देऊन या वाईट चाली रीती मोडून काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. 
संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सध्याच्या आकड्या नुसार अजून सुद्धा जगात ३ कोटी गुलाम आहेत त्या पैकी १.८ कोटी 
भारतात आहेत. गुलामांचे अनेक प्रकार आहेत ज्या मध्ये परंपरागत गुलामी, वेठबिगार, स्थलांतरित कामगार, 
बालमजुरी, लहानपणीच किंवा जबरदस्तीचे लग्न, वेश्याव्यवसायातील जबरदस्ती वगैरे. 

ख्रिस्तपूर्व ५३९ रोजी, जुन्या पर्शियाच्या (सध्याच्या इराणचा काही भाग) "सम्राट सायरसने" जेव्हा बाबिलोन संस्कृती (सध्याच्या बगदाद पासून ९४ किलोमीटर जवळ) असलेल्या राज्यावर विजय मिळवला आणि तेथील गुलाम, युद्धबंदी यांना मुक्त करून, सर्व  नागरिकांना आपला धर्म पाळण्याची, कायद्यासमोर सर्व सामान आहेत आणि त्यांचे मूलभूत हक्क सुरक्षित आहेत अशी ग्वाही एका मातीच्या दंडगोलावर (Cylinder) लिहून, त्याने आपला हा जाहीरनामा प्रजेसमोर मांडला, तो इतिहासातील प्रथम लिखित मानव अधिकार जाहीरनामा मनाला जातो.  
७ जून १८९३ रोजी पीटरमारित्झबर्ग या दक्षिण आफ्रिकेमधील एक लहान स्टेशन जवळ 
बॅरिस्टर मोहनदास क गांधी (महात्मा गांधी १८६९-१९४८) यांना, प्रथम वर्गाचे तिकीट बाळगून सुद्धा निव्वळ 
गोरा वंशीय नाही म्हणून, एका गोऱ्या नागरिकांच्या तक्रारीवरून, दुसऱ्या एका गोऱ्या  दक्षिण आफ्रिकी
अधिकाऱ्याने चालत्या गाडीतून ढकलून त्यांचे सामान गाडी बाहेर फेकले, त्या ठिकाणी महात्मांना साक्षात्कार 
झाला कि या अन्यायाविरुद्द आवाज उठवायला हवा. त्या साठी त्यांनी अहिंसा हे शास्त्र वापरून दक्षिण 
आफ्रिकेत, वंशभेदावर  मोठा लढा उभारला. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ते मानवजातीवरील या आणि 
इतर अन्यायाविरुद्ध लढत राहिले.
 
अमेरिकेचे ३२ वे राष्ट्रपती फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांची पत्नी एलानोर रुझवेल्ट (१८८४-१९६२), एक मुत्सद्दी 
राजकारणी, हिने मानव अधिकार या विषयात महत्वाचे योगदान केले आहे. १९४६ रोजी आपल्या पतीच्या 
निधनानंतर (१९४५), त्या अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून, संयुक्त राष्ट्र परिषदेच्या, मानव अधिकार 
आयोगावर नेमल्या गेल्या. त्या ठिकाणी त्या आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी तयार केलेले 
"संयुक्तराष्ट्र मानव अधिकार जाहीरनामा"  हा या विषयातील मैलाचा दगड मनाला जातो.
 
आपल्या माहितीसाठी पुढील गोष्टी देत आहे. "संयुक्तराष्ट्र मानव अधिकार जाहीरनामा या मध्ये 
एकंदर ३० कलमे आहेत त्याचा सारांश थोडक्यात खालील प्रमाणे:
 
कोणत्याही मूलभूत मानवी हक्कांसाठी वंश, रंग, रूप, धर्म, जात, लिंग, भाषा, राजकीय किव्वा इतर 
मतमतांतरं, शारीरिक स्थिती, आर्थिक स्थिती, मूळ-राहता किव्वा नागरिकत्वाचा देश इत्यादी विषयांच्या 
आधारे असमान वागणूक देता येणार नाही.  विचार स्वतंत्र; अभिव्यक्ती स्वतंत्र; जीवन, स्वतंत्र आणि 
सुरक्षिततेची हमी; सर्व प्रकारच्या गुलामी आणि छळवादापासून पासून मुक्तता; कायद्यासमोर सर्व सामान आहेत 
आणि सर्वाना अन्याया विरुद्ध कायद्याचे सौरक्षण आहे; आरोप किव्वा गुन्हा सिद्ध होई पर्यंत सर्व निर्दोष मानले 
जातील; प्रत्येकाला आपले जीवन खाजगी ठेवण्याचा अधिकार; स्वतःच्या देशात मुक्त संचार करायला परवानगी;
केव्हाही स्वतःच्या देशाबाहेर जाण्याचा आणि देशामध्ये परत येण्याचा अधिकार; सबळ कारणाशिवाय तुरुंगवास नाही; 
देशांतर्गत अन्यायकारक वागणूक मिळत असल्यास दुसऱ्या देशाचा आश्रय घेण्यास सवलत; स्वतःच्या देशाचा नागरिक 
बनण्याचा हक्क; लग्नाचे वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लग्न करण्याचा आणि परिवार वाढवण्याचा अधिकार आणि 
असा परिवार समाजाचा एक घटक म्हणून ओळखला जाईल; स्वतःची किव्वा आपल्या समूहाची मालमत्ता बनवण्याचा 
अधिकार आणि अशी बनवलेली मालमत्ता आपणाकडून बेकायदेशीर रित्या कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही; आपली 
मते स्वतंत्रपणे किव्वा समूहाने मांडण्याचा अधिकार परंतु आपण कोणत्याना कोणत्या समूहाचा भाग असण्याची सक्ती 
असणार नाही; प्रत्येकाला थेट किव्वा आपल्या प्रतिनिधींमार्फत देश कारभारामध्ये भाग घेण्याचा अधिकार; सर्वाना 
सार्वजनिक सेवा सामान न्यायाने मिळण्याचा अधिकार; प्रत्येकाला प्रतिष्ठितपणे जगण्यासाठी लागणारी,  आपआपल्या 
उत्पन्नाच्या साधनांवर अवलंबून सर्व सामाजिक सार्वजनिक सुरक्षा देण्याची जबाबदारी त्या त्या देशांची; आपल्या 
निवडीची नोकरी/व्यवसाय करण्याचा, त्या साठी योग्यती कामाची वेळ, विश्रांतीची वेळ, त्या दर्जाला साजेसा सामान 
मोबदला मिळण्याचा अधिकार असून तो कोणत्याही संघटनेला जोडला जाण्याचा अधिकार; मानवअधिकारांना समजावून 
देणाऱ्या आणि मानवाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शिक्षणाचा हक्क त्या पैकी प्राथमिक शिक्षण मोफत असण्याची 
अपेक्षा;पालकांनि आपल्या पाल्याला कोणते शिक्षण द्यावे यासाठी पालकांच्या मताला अग्रक्रम; आपण आपल्या निवडीच्या 
कोणत्याही समूहाचा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतात परंतु तो भाग घेण्यासाठी आपणास कोणीही सक्ती करू 
शकणार नाही.
 
कैसर चावेझ या मेक्सिकन अमेरिकन विभूतीने अमेरिकेतील लॅटिन अमेरिकन शेत मजुरांसाठी केलेला अहिंसक लढा प्रसिद्ध आहे.
डॉ मार्टिन ल्युथर किंग या पाद्र्याने आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन लोकांसाठी वांशिक भेदभावापासून मुक्तता आणि नागरी हक्क या साठी केलेला अहिंसक 
आणि सविनय कायदेभंग लढा जगाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. त्या साठी त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले परंतु त्यांच्या या 
लढ्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला. त्यांच्या विरोधकांनी त्यांची हत्या केली. त्यांच्यावर महात्मा गांधी आणि 
अब्राहाम लिंकन यांच्या विचारांचा प्रभाव होता
 
दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकेतील गोऱ्या लोकांची वांशिक दादागिरी संपवण्यासाठी आणि 
काळ्या लोकांचे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी केलेल्या लढ्यामुळे त्यांना २८ वर्षे तुरुंगवास पत्करावा लागला. 
त्यांचा या कामाचा मोबदला त्यांचा नवीन राजकीय समीकरणात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होण्यात मिळाला. 
त्यांच्या कामाबद्दल १९९० साली त्यांना भारत सरकारने भारत रत्न दिले तर १९९३ साली त्यांना शांततेचे नोबेल 
पारितोषिक मिळाले.
 
दक्षिण आफ्रिकेतील दुसरे महत्वाचे नेते डेस्मंड टुटू यांनी सुद्धा वंशवाद, गरिबी हटाव, एच आय वि, लिंगभेद 
आणि संबंधित विषय, क्षयरोग आणि त्रितिय पंथीय यांचे साठी खूप काम केले त्यामूळे  त्यांना १९८४ साली 
शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.  
 
भारतमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंदीसाठी केलेले प्रयत्न; दयानंद सरस्वती, महर्षी धोंडो केशव 
कर्वे (१९५८ भारत रत्न), मदन मोहन मालवीय(२०१४ भारत रत्न), रमाबाई रानडे, विष्णू शास्त्री पंडित इत्यादी 
विभूतींनी केलेले स्त्रि शिक्षण, स्त्री हक्क आणि विधवा कल्याणविषयीचे लढे; लोकमान्यांनी स्वराज्य हा माझा 
जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून केलेली गर्जना; महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि  डॉ. 
बाबासाहेब आंबेडकरांनी (१९९० भारत रत्न) केलेली "अस्पृश्यता निवारणाची चळवळ" याला जगात 
तोड नाही(त्या मुळे ४०% समाज जो कष्टकरी होता परंतु त्याला समाजात मनाचे स्थान नव्हते अशा 
सर्वाना मुख्य प्रवाहात सामील करून घेऊन भारताचा सर्वांगीण विकास होण्यास समाजाचा एक घटक 
म्हणून त्यांचा सुद्धा हातभार लागावा अशी व्यवस्था केली); विनोबा भावे(१९८३ भारत रत्न)यांनी केलेली 
भूदान चळवळ ज्यामुळे भूमिहीन शेतकऱ्यांना श्रीमंत जमीनदारांकडून मिळालेल्या जमिनी आणि पुढे आलेला 
कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा; बाबा आमटे, विकास आणि प्रकाश आमटे यांनी सुरु केलेले कुष्ट रोग 
सेवा आश्रम; संत मदर तेरेसा (१९८० भारत रत्न) यांनी गाठलेली सेवेची परिसीमा, स्वामी विवेकानंदानी 
स्थापन केलेले "रामकृष्ण मिशन आश्रम" मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून मानवाच्या उत्थापनासाठी 
काम करतात. हि सर्व कार्ये मानवाला आपल्या योग्य स्थानावर नेण्यास मदत करतात. भारतीय संतांनी 
तर त्याही पलीकडे जाऊन हे विश्वची माझे घर, आणि ईश्वर सर्व भूतात आहे, चरा चरात आहे, वृक्ष वल्ली 
आम्हा सोयरे वनचरे असे मानून त्या प्रमाणे आपले आयुष्य लोक कल्याण आणि सृष्टी कल्याणासाठी वेचले आहे.
 
 
 
आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी फार मोठा ठेवा ठेवला आहे त्याचा आपण शर्थीने सांभाळ करूया. वरील सर्व विभूती 
"जगाच्या कल्याणा संतांच्या .. " उक्तीला पात्र आहेत असे मला वाटते. त्यांना माझा प्रणाम.
 
माधव भोळे (मोबा: ८४५१८८६७५९) Email madhavbhole99@gmail.com
(वरील लेख लेखकाच्या परवानगी शिवाय अन्यत्र छापू नये. )
 
14.NOV.2016