Friday, March 24, 2023

दुरितांचे तीमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ...

दुरितांचे तीमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ... काल सहजच आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मा. भास्करराव पेरे पाटील यांचे युट्यूब वरील भाषण ऐकत होतो. फक्त ७ वी पर्यंत शिकलेल्या ह्या महान कार्यकर्त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे पंचपक्वान्न मेजवानीच. जेव्हढा आनंद मी चारुदत्त आफळे बुवा किंवा दादा महाराज सातारकर यांचे कीर्तन किंवा प्रवचन ऐकताना घेतो त्यापेक्षा जास्त आनंद मी पेरे पाटील ऐकताना घेतो. कारण एकच, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे मला वाटते. ते एका शेती प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तेथे एक आमदार सुध्दा आले होते. आज पर्यंत अशा ३५०० गावात ते गेले आहेत. ते सांगत होते, आपल्याला सर्वांना आपल्या गावासाठी काम करायचे आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करत नसून माझ्या गावाच्या आणि गावातील जनतेच्या विकासासाठी मी काम करत आहे ही भावना पंचायतीच्या प्रत्येक सदस्याकडे आणि नागरिकाकडे असली पाहिजे. घटनेच्या 73 व्या दुरुस्तीनुसार पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यामध्ये महत्वाचे बदल होऊन तो अधिक सशक्त बनला आहे. ह्या कायद्यामुळे देशाच्या विकासासाठी निर्णय घेण्याची क्षमता आणि शक्ती ही केंद्राकडून, राज्याकडे आणि राज्यांकडून ग्रामीण जनतेकडे आली आहे. ह्यात समाजातील सर्व घटकांच्या सदस्यांना सारखे मौलिक अधिकार प्राप्त झाले आहेत. सरपंचाकडे खूप अधिकार आहेत. आपल्याला सरपंच, ग्राम सेवक, कृषी अधिकारी असे एकंदर 30 सरकारी नोकर प्रत्येक गावासाठी दिले आहेत. त्या सर्वांचे कार्यक्षेत्र आणि आपली ग्रामपंचायत यांचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. मी गेले २५ वर्ष काम करून सुद्धा मला तो पूर्ण कळला नाही. याची माहिती होणे आवश्यक आहे. पण आम्ही फक्त एकमेकाची उणी दुणी काढत बसतो. चांगल्या गोष्टीची प्रसिध्दी होत नाही, वाईट गोष्टी पटकन पसरतात. उदा. आज तुमचे हे शेतीविषयक प्रदर्शन आहे पण तुमच्या जिल्ह्यातील प्रमुख वर्तमान पत्रात पहिल्या पानावर बातमी काय आहे?. कोणाची भानगड काय आहे? कोणी आत्महत्या केली?, खून केला? हीच आहे आणि तुमच्या ह्या प्रदर्शनाची बातमी दिली ती शेवटच्या पानावर कोपऱ्यात ते सुद्धा तुम्ही जाहिरात दिलीत म्हणून मिळते. सर्व प्रसार माध्यमांची हीच अवस्था आहे. ज्या प्रमाणे एखादे असत्य दहा वेळा सांगितल्यानंतर खरे वाटू लागते तसेच ह्या माध्यमांकडून नकारात्मक गोष्टींचा जाणून बोजुन प्रसार मोठ्या प्रमाणत, तुम्ही म्हणू शकाल प्रचंड ताकदीने होत आहे जेणेकरून समाजात नैराश्य निर्माण होईल आणि लोक मग स्वतःच्या विकासासाठी नेते आणि सरकारवर अवलंबून रहातील. ज्या वर्तमानपत्रांची निर्मिती मानव उद्धरासाठी झाली आहे ते हे काम करत आहेत!!. आपल्या प्रत्येकात ताकद आहे, आपल्याला कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही. आपली ग्रामपंचायत ताकदवान बनवा, आपले काम लोकोपयोगी करा. विरोध सर्वत्र आहे, अगदी संसेदेपासून, ते घराघरांपर्यंत आहे. पण आपण निर्धार केलात तर त्या विरोधाची शस्त्रे बोथट होऊन जातील. गेल्या 25 वर्षात माझा हाच अनुभव आहे. एखादे कुत्रे म्हंटले की ते भूंकणाराच. तो त्याचा धर्म आहे पण तुम्ही तुमचा चांगले काम करण्याचा धर्म चालू ठेवा. आपल्याला शिकवले आहे की बाळ जन्मले की त्याला आईचे दूध लागते. हे चूक आहे कारण प्रथम त्याला ऑक्झिजन लागतो मग दूध. आईच्या दुधाशिवाय तो काही काळ जगू शकेल पण ऑक्झिजन शिवाय काही मिनिटे सुध्दा शक्य नाही. माणूस वर्षाला 740 किलो ऑक्सीजन खर्च करतो. एक झाड वर्षाला 117 किलो ऑक्सीजन तयार करते म्हणजे एक माणूस जगायला कमीतकमी 6.3 झाडे अस्तित्वात हवीत. म्हणून म्हणतो झाडे लावा. पण आम्ही लोक शेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या नादात सर्व झाडे कापून तेथे शेती करतो. अहो अगदी तुम्हाला पाहिजे ती झाडे लावा पण तुम्ही निदान स्वत:च्या ऑक्सिंजनची व्यवस्था स्वतः करा. प्रत्येकाने आयुष्यात 10 तरी झाडे लावली पाहिजेत. आपण अनेक चुकीच्या गोष्टी शाळेत शिकलो आहे. आपल्या पूर्वजांनी भारंभार ज्ञान लिहून ठेवले असून तेच आपण सांगत आलो आहोत. पण आता ती ज्ञान सांगण्याची वेळ जाऊन ते ज्ञान अमलात आणण्याची, प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली आहे. आपण रस्त्याने जातो, तेथे लिहिले असते "अपघात क्षेत्र" मग मी काय करू शकतो, ज्या इंजिनियर ने हे लिहिले त्याने हे लिहिण्याऐवजी अपघात कसा होणार नाही असा रस्ता बनवणे अपेक्षित आहे. नुसते लिहून अपघात कमी होणार आहेत का? बरेच ठिकाणी लिहिले असते की येथे लघवी करू नये मग त्यापेक्षा सार्वजनिक स्वच्छता गृह जास्त बांधा म्हणजे असे लिहिण्याची वेळ येणार नाही. काय करू नको सांगण्यापेक्षा पर्याय ध्या म्हणजे गरज भागेल. पाटोदा गावची माहिती. ग्राम पंचायत हे पैसे कमावण्याचे एक खोरे नसून, ग्राम विकासासाठी आणि पर्यायाने तेथील नागरिकांच्या विकासासाठी एक चांगले पीठ आहे हे लोकांना समजायला हवे. औरंगाबाद पासून जेमतेम 12 किमी दूर असलेल्या पाटोडा गावात गेले 25 वर्ष एकमेव सरपंच असलेल्या पेरे पाटील यांनी गावाचा विकास एका वेगळ्याच पद्धतीने केला. गावाला 600 कुटुंबाकडून एकंदर 23 लाख टॅक्स जमा केला जातो त्यात त्यांना आरो चे फिल्टर पाणी, सकाळी अंघोळीला गरम पाणी शिवाय इतर प्रकारचे पाणी असे 4 प्रकारचे पाणी पुरवले जाते. गावात पिठाची गिरणी असून तेथे मोफत पीठ दळले जाते. ग्रा.पं.मार्फत गावात शाळा ,कार्यालय व महत्वाच्या ठिकाणी एकुण ३२ सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सी.सी टी व्ही कॅमेरामुळे नोकरवर्गावर नियंत्रणठेवले जाते तसेच गावातील प्लॉस्टिक बंदी , गुटका बंदी ,सांडपाणी व्यवस्थापन ,कचरा व्यवस्थापन व गावाची सुरक्षा करीता मदत होते. लोकसहभागातुन प्रत्येक महिन्याच्या ३ऱ्या शनिवारी संपुर्ण नागरिकासांठी समुह भोजनाचे आयोजन करण्यात येते .या दिवशी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येत असुन हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येतो. गावातील प्रत्येक घरांसमोर ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी २ कचरा कुंड्याची व्यवस्था ग्रा. पं . तर्फे करण्यात आली आहे. कचरा संकलित करुन कचऱ्यापासुन  कंपोस्ट खत तयार करण्यात येते.तसेच प्रत्येक घराला प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी पर्यावरण पिशवी देण्यात आली असुन प्रत्येक शनिवारी सदरील प्लॅस्टिक गोळा केले जाते. व नंतर ग्रा.पं.प्लॅस्टिकची विक्री करते.गावात विविध ठिकाणी १५ सौर दिवे लावण्यात आले असुन बायोगॅसचे एकुण ११ प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत . त्यापैकी बायोगॅसचे २ प्रकल्प शौचालयाला जोडण्यात आले आहेत. इतरही अनेक योजना आहेत ज्या सर्व टॅक्स मधूनच दिल्या जातात. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक सरासरी रू. ३८५० टॅक्स बसतो. सर्वांना सर्व गोष्टी मिळत असल्यामुळे जवळजवळ 100% टॅक्स वसुली होते. पापी माणसांच्या पापाचा आणि अज्ञानरुपी अंध:कराचा नाश होऊन, प्रत्येक जणाने आपल्या स्वधर्म ( गुणानुकर्म धर्म ) रुपी सूर्याच्या तेजाने आपापले जीवन उजळून जाऊंदे आणि त्याला जे जे ( चांगले ) इच्छित असेल ते ते त्याला लाभुदे हेच ज्ञानेश्वर माऊली यांचे त्या विश्वाच्या नियांत्याला मागणे आहे. त्यासाठी पेरे पाटलांसारखी माणसे झटून काम करत आहेत त्यांना माझा नम्रता पूर्वक नमस्कार. माधव भोळे

एक रूम आई साठी

शेअरिंगचं सौजन्य : नीता दिवेकर—ठाणे मूळ लेखक / लेखिका : WhatsApp च्या (अव) कृपेने— अज्ञात " एक रूम आई साठी प्रत्येकानेच वाचावीच अशी पोस्ट” साहेब ! कुरिअर आहे... नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले, त्याला रिसीट सही करून दिली... कोणाचे आहे रे कुरिअर, अंजली माझ्या पत्नीने हॉल मध्ये येत विचारले... बघतो... म्हणून कुरिअर उघडले... आत एक पॅक केलेला मोबाईल आणि ३पानी एक पत्र... अरे ! हा तुझ्या आईचा मोबाईल आहे... इकडे कसा..? आणि पत्र कोणाचे आहे..? मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले... अगं ! आईचे पत्र आहे... मग वाच ना.. ! बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्या सारखा. वाच पत्र... मी पत्र वाचायला सुरुवात केली... प्रिय अजित, अजूनही तू मला प्रिय आहेस, म्हणून प्रिय लिहिले आहे... तुझा व्हॅट्स ऍप वर मातृदिना प्रित्यर्थ पाठविलेला संदेश मिळाला... अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे, हे समजून बरे वाटले... नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान... फेसबुक/व्हाटसअपवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले... १०० च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या... पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही... न जाणो नावातील साधर्म्य पाहून, कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर, तू उगाच कानकोंडा होणार, म्हणून टाळले... पण बेटा ! हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते... असो ! प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे... कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील, तुझा व सुनेचा फोटो पण पहिला... खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू... सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून... बंगला पण छान बांधला आहेस... कोणा त्रयस्थ वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले... लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली... त्यावेळी खरंच वाटले नव्हते, कि तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू... सर्वजण म्हणायचे, माई ! तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय, मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही... सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही... तुला खूप शिकविले, म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरविला... तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास... परदेशात जाऊन आलास, गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळाली... तुला आवडलेल्या मुलीशी, लग्न लावून दिले... सोन्या सारखी दोन नातवंडे मिळाली... तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून, आनंदाने डोळे मिटणार होते. पण ! अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली... परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस, परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास... पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते... परदेशातून परत आलेला मला, आमच्या संस्थापक बाई कडून समजले... आणि तू दिलेला १० लाखाचा चेक पण समजला... चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा..! पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर तुझ्या स्टेटस ची होती... मग मी सुद्धा, आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली... एक सांगू राजा..! तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस... तुझ्या कडे राहिले असते, तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्या पुरते मर्यादित राहिले असते... इथे मला खुप समवयस्कर, समदुःखी मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत... मी आता एकदम मजेत आहे... तुझ्या १० लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे... मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही... अधून मधून बंटी-बबली आठवतात... आता मोठे झाले असतील ना रे..! आजीला ओळखणार पण नाहीत... आणि तुही ओळख सांगू नकोस... सुनबाई नोकरी करते का रे अजून... हं ! आता विचारून काय उपयोग म्हणा, आपली आता भेट होणे नाही...हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन... तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे... अरे..! आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भुकेलेले नसतो रे..! आम्हाला माया हवी असते... ज्या मुलांना आपण वाढविले, त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बाललीला पाहत, सुनेचे कोड-कौतुक कर ... आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची ईच्छा असते... पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार...अरे ..! केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका... आपल्या साठी पैसा हवा, पैश्या साठी आपण नको... आता वाटते की, माझेच संस्कार कुठे तरी कमी पडले, नाहीतर मुले हि मातीचा गोळा असतात, जसा आकार द्यावा तसा घेतात... त्यामुळे मी तुला किंवा सूनबाईला दोष देत नाही... तुम्ही सर्वजण सुखात रहा हीच अंतिम इच्छा... फक्त एकच प्रश्न विचारते, बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच... "नोकर माणसां साठी आणि कुत्र्यां साठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यात, तशीच एक रूम आई साठी बांधता आली नाही का रे तुला...? 🙏🌹🙏

पुन्हा भास्करराव पेरे पाटील

पुन्हा भास्करराव पेरे पाटील काल श्री भास्करराव पेरे पाटील यांचा व्हिडीओ यूट्यूब वर ऐकत होतो. त्यांनी एक चांगला विचार मांडला जो कदाचित तुम्ही सुद्धा ऐकला असाल. पण सर्वांच्या माहितीसाठी खाली देत आहे. ते म्हणाले. आपल्या पैकी कोणी प्रियजन जर मृत झाला तर आपण त्याचे दहन करून त्याची राख गंगा, गोदावरी किंवा अन्य कोणत्यातरी नदीत सोडतो. एक काम करा. एक पिण्याच्या पाण्याने भरलेला ग्लास घ्या त्यात वरील एक चमचाभर राख घालून ढवळा आणि ते पाणी आपल्या प्रियजनाना वंदन म्हणून पिया. आपण असे करू का? कारण राख घातल्यामुळे ते पाणी आता अशुद्ध झाले असून आपल्या शरीराला अपायकारक आहे. मग आपण राख नदीत सोडल्याने ती नदी अशुद्ध झाली तरी त्या नदीचे पाणी इतर लोकांना पिण्यास योग्य राहील का याचा विचार आपण हे कृत्य करण्यापूर्वी करायला हवा. ठीक आहे मी काही धर्म आणि परंपरा यांच्या विरुद्ध नाही पण आता आपल्याला बदलायला हवे. ज्यावेळी ह्या कृती सांगितल्या त्यावेळी ह्या नद्या जोरदार प्रवाही होत्या. आता त्यांची डबकी झाली आहेत!! माझी आई वारली त्यावेळी मी असे काही नकरता ५ खड्डे खणले. त्या मध्ये वरील राख घातली. त्यामध्ये पाच झाडे लावली. मेल्या नंतर सुधा माझी आई राखेच्या रुपात खत म्हणून झाडांना आणि पर्यायाने जगाला उपयोगी झाली. शिवाय ही पाच झाडे माझ्या आईची आठवण म्हणून माझ्यासोबत आहेतच. घरात फोटोच लावायला पाहिजे असे नाही. संकलित माधव भोळे.

बदल हाच स्थायीभाव आहे !!!

बदल हाच स्थायीभाव आहे !!! काल मी भास्करराव पेरे पाटीलांचा "मृत माणसाची राख नदीत सोडू नका" हा विचार मांडला त्यावेळी अनेक लोकांनी सहमती दर्शवली तर अनेकांनी त्याविरुद्ध अगदी "भारतीय परंपरा नषट करण्यासाठी हे एक षडयंत्र आहे" येथ पासून ते अगदी "ही कम्युनिस्ट विचारधारा" आहे वगैरे अगदी टोकाची भूमिका मांडणारे अभिप्राय वाचले. खरे म्हणजे बदल कोणालाच नको असतो. अगदी घरातील कपाटाची जागा बदलण्यापासून, सूनेनी स्वयंपाक घरात केलेला बदल किंवा खिडक्यांचे पडदे बदलण्याचा विषय सुरवातीला कोणीच खपवून घेत नाही, पण हळूहळू तो सर्वांना मान्य होतो. ज्यावेळी बँकांमध्ये कॉम्प्युटर आणले त्यावेळी कामगार युनियननी थयथयाट केला पण आज कॉम्प्युटर बंद पडला तर तोच कामगार बेचैन होतो कारण त्याच्याशिवाय त्याचे अडते. ज्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली त्यावेळी त्यांच्यावर शेण आणि चिखल फेकला गेला. मुलींनी शिक्षण घेवू नये म्हणून सर्जन डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या काशीबाई ह्या लाडक्या लहान मुलीला लाडूमध्ये काचा घालून तिला मारले एव्हढ्या पर्यंत विरोधकांची मजल गेली. (बाहुलीचा हौद, पुणे). (आज तेच लोक गार्गी गणित शिकत होती म्हणून सांगत आहेत.). आज स्त्री शिक्षण हा आधुनिक जगाचा कणा बनला आहे. वेदशास्त्रामध्ये इतरांची ढवळा ढवळ नको म्हणून तुकारामाच्या गाथा बुडवल्या गेल्या. आज त्याच गाथा अभ्यासून लोक दुसऱ्यांना दाखले देत आहेत. गेली अनेक वर्ष त्या त्या वेळचे संत, समाज सुधारक आणि धुरीण, तत्ववेत्ते वाईट चालीरीती आणि वाईट परंपरा नश्ट व्हाव्यात आणि चांगल्याचा स्वीकार व्हावा म्हणून धडपडत आहेत. त्या सर्वांना बदल नको म्हणून विरोधच झाला. आगरकर काही चुकीचे होते असे नाही पण बहुजनांना त्यांचे विचार पटत नव्हते. स्वा. सावरकर यांचे "सामाजिक विचार" आणि "विज्ञान हाच देव" ही पुस्तके वाचली तर तुम्ही आश्चर्य चकित व्हाल. असो अशी शेकडो उदाहरणे मी देवू शकीन. पेरे पाटीलांनि एक विचार मांडला. एखाद्या विषयावर दुमत असणे स्वाभाविक आहे, किंबहुना वेगळे मत असणे लोकशाहीचा मूलभूत पायाच आहे. हिंदू धर्मातील सर्वच रूढी परंपरा वाईट नाहीत. पण एखाद्याने त्यावर आपले मत मांडले तर ते स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आपल्याला अधिकार आहे. जर आपल्या रूढी परंपरांवर आपण पुनरावलोकन करू शकणार नसू तर इतर धर्मियांच्या रूढी परंपरांमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. मग लगेच परकियांचे षडयंत्र, धर्म विरोधी वगैरे टोकाचे अभिप्राय मांडणे अयोग्य. आपल्या धर्मातच अनेक पंथ आहेत आणि त्यांच्या रूढी परंपरा सुध्दा अगदी एकमेकांच्या परस्पर विरुद्ध आहेत. अगदी साधी गोष्ट बघितली तरी शैव आणि वैष्णव यांच्या अनेक परंपरा वेगवेगळ्या आहेत. उदा. एक जेवायला केळीचे पान उभे घेतो तर एक आडवा घेतो. म्हणून हा चुकीचा आणि हा बरोबर असे आपण म्हणू शकत नाही. मग अशा वेळी जे जास्त सयुक्तिक वाटते त्याचा विचार व्हायला हवा असे मला वाटते. कोणीही कोणावर मत लादू शकत नाही. चांगला बदल स्वीकारायला हवा. परंपरा म्हणून तो बाजूला ठेवणे योग्य नाही असे वाटते. असो नूतन हिंदू वर्षाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा. माधव भोळे.

Monday, March 13, 2023

दुरितांचे तीमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ...

दुरितांचे तीमिर जावो विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ... काल सहजच आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मा. भास्करराव पेरे पाटील यांचे युट्यूब वरील भाषण ऐकत होतो. फक्त ७ वी पर्यंत शिकलेल्या ह्या महान कार्यकर्त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे पंचपक्वान्न मेजवानीच. जेव्हढा आनंद मी चारुदत्त आफळे बुवा किंवा दादा महाराज सातारकर यांचे कीर्तन किंवा प्रवचन ऐकताना घेतो त्यापेक्षा जास्त आनंद मी पेरे पाटील ऐकताना घेतो. कारण एकच, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे मला वाटते. ते एका शेती प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तेथे एक आमदार सुध्दा आले होते. आज पर्यंत अशा ३५०० गावात ते गेले आहेत. ते सांगत होते, आपल्याला सर्वांना आपल्या गावासाठी काम करायचे आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करत नसून माझ्या गावाच्या आणि गावातील जनतेच्या विकासासाठी मी काम करत आहे ही भावना पंचायतीच्या प्रत्येक सदस्याकडे आणि नागरिकाकडे असली पाहिजे. घटनेच्या 73 व्या दुरुस्तीनुसार पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यामध्ये महत्वाचे बदल होऊन तो अधिक सशक्त बनला आहे. ह्या कायद्यामुळे देशाच्या विकासासाठी निर्णय घेण्याची क्षमता आणि शक्ती ही केंद्राकडून, राज्याकडे आणि राज्यांकडून ग्रामीण जनतेकडे आली आहे. ह्यात समाजातील सर्व घटकांच्या सदस्यांना सारखे मौलिक अधिकार प्राप्त झाले आहेत. सरपंचाकडे खूप अधिकार आहेत. आपल्याला सरपंच, ग्राम सेवक, कृषी अधिकारी असे एकंदर 30 सरकारी नोकर प्रत्येक गावासाठी दिले आहेत. त्या सर्वांचे कार्यक्षेत्र आणि आपली ग्रामपंचायत यांचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. मी गेले २५ वर्ष काम करून सुद्धा मला तो पूर्ण कळला नाही. याची माहिती होणे आवश्यक आहे. पण आम्ही फक्त एकमेकाची उणी दुणी काढत बसतो. चांगल्या गोष्टीची प्रसिध्दी होत नाही, वाईट गोष्टी पटकन पसरतात. उदा. आज तुमचे हे शेतीविषयक प्रदर्शन आहे पण तुमच्या जिल्ह्यातील प्रमुख वर्तमान पत्रात पहिल्या पानावर बातमी काय आहे?. कोणाची भानगड काय आहे? कोणी आत्महत्या केली?, खून केला? हीच आहे आणि तुमच्या ह्या प्रदर्शनाची बातमी दिली ती शेवटच्या पानावर कोपऱ्यात ते सुद्धा तुम्ही जाहिरात दिलीत म्हणून मिळते. सर्व प्रसार माध्यमांची हीच अवस्था आहे. ज्या प्रमाणे एखादे असत्य दहा वेळा सांगितल्यानंतर खरे वाटू लागते तसेच ह्या माध्यमांकडून नकारात्मक गोष्टींचा जाणून बोजुन प्रसार मोठ्या प्रमाणत, तुम्ही म्हणू शकाल प्रचंड ताकदीने होत आहे जेणेकरून समाजात नैराश्य निर्माण होईल आणि लोक मग स्वतःच्या विकासासाठी नेते आणि सरकारवर अवलंबून रहातील. ज्या वर्तमानपत्रांची निर्मिती मानव उद्धरासाठी झाली आहे ते हे काम करत आहेत!!. आपल्या प्रत्येकात ताकद आहे, आपल्याला कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही. आपली ग्रामपंचायत ताकदवान बनवा, आपले काम लोकोपयोगी करा. विरोध सर्वत्र आहे, अगदी संसेदेपासून, ते घराघरांपर्यंत आहे. पण आपण निर्धार केलात तर त्या विरोधाची शस्त्रे बोथट होऊन जातील. गेल्या 25 वर्षात माझा हाच अनुभव आहे. एखादे कुत्रे म्हंटले की ते भूंकणाराच. तो त्याचा धर्म आहे पण तुम्ही तुमचा चांगले काम करण्याचा धर्म चालू ठेवा. आपल्याला शिकवले आहे की बाळ जन्मले की त्याला आईचे दूध लागते. हे चूक आहे कारण प्रथम त्याला ऑक्झिजन लागतो मग दूध. आईच्या दुधाशिवाय तो काही काळ जगू शकेल पण ऑक्झिजन शिवाय काही मिनिटे सुध्दा शक्य नाही. माणूस वर्षाला 740 किलो ऑक्सीजन खर्च करतो. एक झाड वर्षाला 117 किलो ऑक्सीजन तयार करते म्हणजे एक माणूस जगायला कमीतकमी 6.3 झाडे अस्तित्वात हवीत. म्हणून म्हणतो झाडे लावा. पण आम्ही लोक शेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या नादात सर्व झाडे कापून तेथे शेती करतो. अहो अगदी तुम्हाला पाहिजे ती झाडे लावा पण तुम्ही निदान स्वत:च्या ऑक्सिंजनची व्यवस्था स्वतः करा. प्रत्येकाने आयुष्यात 10 तरी झाडे लावली पाहिजेत. आपण अनेक चुकीच्या गोष्टी शाळेत शिकलो आहे. आपल्या पूर्वजांनी भारंभार ज्ञान लिहून ठेवले असून तेच आपण सांगत आलो आहोत. पण आता ती ज्ञान सांगण्याची वेळ जाऊन ते ज्ञान अमलात आणण्याची, प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली आहे. आपण रस्त्याने जातो, तेथे लिहिले असते "अपघात क्षेत्र" मग मी काय करू शकतो, ज्या इंजिनियर ने हे लिहिले त्याने हे लिहिण्याऐवजी अपघात कसा होणार नाही असा रस्ता बनवणे अपेक्षित आहे. नुसते लिहून अपघात कमी होणार आहेत का? बरेच ठिकाणी लिहिले असते की येथे लघवी करू नये मग त्यापेक्षा सार्वजनिक स्वच्छता गृह जास्त बांधा म्हणजे असे लिहिण्याची वेळ येणार नाही. काय करू नको सांगण्यापेक्षा पर्याय ध्या म्हणजे गरज भागेल. पाटोदा गावची माहिती. ग्राम पंचायत हे पैसे कमावण्याचे एक खोरे नसून, ग्राम विकासासाठी आणि पर्यायाने तेथील नागरिकांच्या विकासासाठी एक चांगले पीठ आहे हे लोकांना समजायला हवे. औरंगाबाद पासून जेमतेम 12 किमी दूर असलेल्या पाटोडा गावात गेले 25 वर्ष एकमेव सरपंच असलेल्या पेरे पाटील यांनी गावाचा विकास एका वेगळ्याच पद्धतीने केला. गावाला 600 कुटुंबाकडून एकंदर 23 लाख टॅक्स जमा केला जातो त्यात त्यांना आरो चे फिल्टर पाणी, सकाळी अंघोळीला गरम पाणी शिवाय इतर प्रकारचे पाणी असे 4 प्रकारचे पाणी पुरवले जाते. गावात पिठाची गिरणी असून तेथे मोफत पीठ दळले जाते. ग्रा.पं.मार्फत गावात शाळा ,कार्यालय व महत्वाच्या ठिकाणी एकुण ३२ सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सी.सी टी व्ही कॅमेरामुळे नोकरवर्गावर नियंत्रणठेवले जाते तसेच गावातील प्लॉस्टिक बंदी , गुटका बंदी ,सांडपाणी व्यवस्थापन ,कचरा व्यवस्थापन व गावाची सुरक्षा करीता मदत होते. लोकसहभागातुन प्रत्येक महिन्याच्या ३ऱ्या शनिवारी संपुर्ण नागरिकासांठी समुह भोजनाचे आयोजन करण्यात येते .या दिवशी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येत असुन हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येतो. गावातील प्रत्येक घरांसमोर ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी २ कचरा कुंड्याची व्यवस्था ग्रा. पं . तर्फे करण्यात आली आहे. कचरा संकलित करुन कचऱ्यापासुन कंपोस्ट खत तयार करण्यात येते.तसेच प्रत्येक घराला प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी पर्यावरण पिशवी देण्यात आली असुन प्रत्येक शनिवारी सदरील प्लॅस्टिक गोळा केले जाते. व नंतर ग्रा.पं.प्लॅस्टिकची विक्री करते.गावात विविध ठिकाणी १५ सौर दिवे लावण्यात आले असुन बायोगॅसचे एकुण ११ प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत . त्यापैकी बायोगॅसचे २ प्रकल्प शौचालयाला जोडण्यात आले आहेत. इतरही अनेक योजना आहेत ज्या सर्व टॅक्स मधूनच दिल्या जातात. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक सरासरी रू. ३८५० टॅक्स बसतो. सर्वांना सर्व गोष्टी मिळत असल्यामुळे जवळजवळ 100% टॅक्स वसुली होते. पापी माणसांच्या पापाचा आणि अज्ञानरुपी अंध:कराचा नाश होऊन, प्रत्येक जणाने आपल्या स्वधर्म ( गुणानुकर्म धर्म ) रुपी सूर्याच्या तेजाने आपापले जीवन उजळून जाऊंदे आणि त्याला जे जे ( चांगले ) इच्छित असेल ते ते त्याला लाभुदे हेच ज्ञानेश्वर माऊली यांचे त्या विश्वाच्या नियांत्याला मागणे आहे. त्यासाठी पेरे पाटलांसारखी माणसे झटून काम करत आहेत त्यांना माझा नम्रता पूर्वक नमस्कार. माधव भोळे

Thursday, March 9, 2023

अब्जाधीश राय दालिय ( Principles: Life & Works )

2017 साली प्रसिद्ध झालेल्या "Principles: Life & Works" मध्ये, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, अब्जाधीश राय दालियो, 4 महत्त्वाचे संदेश देतो. तो म्हणतो अमेरिकेत असे 50% लोक आहेत की त्यांना आपण नोकरी किंवा व्यवसाय का करत आहोत हेच माहिती नाही. आपले यशस्वी करियर करणे हे फार कठीण पण महत्वाची गोष्ट आहे. तो म्हणतो: 1. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्राथमिकता ( Priorities) माहिती हव्यात. निदान त्या ठरवायला हव्यात. आपल्या समोर अनेक विकल्प असतात. आणि कदाचित ते सर्वच आपल्याला हवे असतात परंतु ते शक्य नाहीत. हे म्हणजे लग्नाच्या बुफे पद्धती सारखे आहे. समोर अनेक पदार्थ आपल्या आवडीचे असतात पण आपण सर्वच खाऊ शकत नाही. शेवटीं आपल्यालाच ठरवायला लागते काय खायचे, काय नाही ते. नाहीतर आपण आजारी पडू. काही चांगल्या गोष्टी साठी काही दुसऱ्या चांगल्या गोष्टी सोडाव्या लागतात. म्हणून प्रथम पायरी म्हणजे आपले उद्दिष्ट ठरवणे. दलिओने स्वतः 12 व्या वर्षी पहिला शेयर बाजारातून विकत घेतला. 20 व्या वर्षी हार्वर्ड मधून ग्राजूएट होऊन 26 व्या वर्षी "Bridgewater Associates" नावाची पहिली फायनान्स कंपनी काढली. ती आता जगातील सर्वात मोठा हेज फंड आहे जो 160 बिलियन डॉलरस संपत्तीचे व्यवस्थापन करतो. 2. तुम्ही उदिष्ट आणि आवड यातील फरक समजून घ्या. समजा तुमचे उदिष्ट आहे की तुम्हाला चांगली तब्येत बनवायची आहे पण तुम्हाला टेस्टी (उदा. चायनीज किंवा बटाटा वेफर्स ) परंतु कदाचित शरीरास अपायकारक ( unhealthy ) खाणे आवडते. अशा वेळीं तुम्हाला उदिष्ट महत्वाचे की आवड महत्वाची हे समजून घ्यावे लागेल. आपल्या भाषेत सांगायचे झाले तर लोभ भरपूर आहेत पण त्यात आपण गुंतायचे का? अर्थात काही आवडी आणि उदिष्ट यांची चांगली सांगड होऊ शकते उदा. स्वयंपाकाची आवड असलेल्या व्यक्तीला चांगला रेस्टॉरंट चा व्यवसाय सुरू करता येवू शकतो. मग तुम्ही ठरवा की तुमच्या आवडी आणि उदिष्ट या मध्ये कसे आणि किती अंतर ठेवायचे ते. 3. उदिष्ट पैसा की आणखी काही? बरेच वेळा अनेकांची उदिष्ट पैसा असतो. परंतु थोड्याच काळात ते उदिष्ट फिकट होते कारण तुमच्या लक्षात येते की कितीही कमवला तरी तो कमीच वाटतो आणि त्यामुळे तुम्ही सुख गमवाल. ऍपल चा टीम कुक, किंवा रिचर्ड ब्रान्सन किंवा वॉरेन बफेत सांगतात तुम्ही काम करताना पैसा सोडून इतर काही आनंद शोधा, जर तो मिळाला तर तुम्ही सुखी व्हाल. 4. तुम्ही पुरेसे मोठे स्वप्न बघत नाहीत. अनेक वेळा आपण आपल्याला जे शक्य वाटते तेच उदिष्ट धरतो. पण ते तर जे आपल्याला जे माहिती आहे त्यावरच अवलंबून असते. खरे म्हणजे आपल्या उद्दीश्टाला आपण मर्यादा किंवा वेसण घालू नका ( Sky is the limit ). जस जसे आपण हे उदिष्ट सार्थ करण्याचा प्रयत्न कराल तेव्हढे आपण मजबूत व्हाल. जर तुम्ही छोटे उदिष्ट ठेवले तर तुमच्याकडे असलेल्या सर्व ताकदीचा उपयोग होणार नाही विकास होणार नाही. In English "Having low aim is crime, failure is not a crime". 5. कोणतेही उद्दीष्ट धरा पण ते पूर्ण करण्यासाठी झोकून देवून काम करा. ( ही माझी टीप आहे ). माधव भोळे

कै. नारायणराव वीरकर

06.02.23 इवलेसे रोप लावियले द्वारी (२) काल देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवलीच्या कार्यक्रमाला डोंबिवली येथे गेलो होतो. तेथे श्री. वैभव रमाकांत निमकर यांचे सहायाने डोंबिवली पूर्व येथील "रोटरी क्लब मुक, कर्णबधीर" शाळेतील मुलांनी काही नाट्यछटा सादर केल्या. मुले म्हणजे देवाघरची फुले. अतिशय निरागस अशा ह्या दिव्यांग मुलांनी अतिशय सुंदर साजरीकरण केले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला भरून आले. त्यानंतर मी वैभव निमकरांद्वारे खालील माहिती त्यावेळी सभागृहात सांगितली. "रोटरी क्लब डोंबिवली पूर्वचे एक सदस्य आणि देवरूखे ब्राम्हण संघ डोंबिवलीचे पूर्व अध्यक्ष कै. नारायणराव वीरकर यांच्या पुढाकाराने, रोटरी क्लबच्या अधिपत्याखाली ही शाळा स्थापन झाली. त्यांची मुलगी कै. ज्योती वीरकर ही त्या शाळेतील पहिली कारकून होती आणि तिने अतिशय खटपट करून ह्या शाळेला मान्यता आणि सरकारी अनुदान मिळवून दिले.". कोण होते हे नारायणराव? त्यांनी काय केले डोंबिवली आणि देवरुख्यांसाठी? नारायणराव माझी सख्खी मोठी आत्या मुक्ताबाई हिचे चिरंजीव. लहानपणी जन्मतःच त्यांचे मातृछत्र हरपले. लहानपणापासूनच ते आमच्या घरी वीर येथे आणि पुढे मुंबईत, आमच्याच घरी गिरगावात लहानाचे मोठे झाले, अगदी आमच्या भावंडापैकी एक असे. नारायणराव हुशार होते त्यामुळे आमच्या वडिलांचा त्यांचेवर जास्त लोभ. प्राथमिक शिक्षण आर्यन शाळेत झाल्यानंतर त्यांनी पुढे बि.एसी. पर्यंत शिक्षण घेतले. माझ्या वडिलांची परिस्थिती मध्यम असून सुध्दा वडिलांनी सर्व भार उचलला. विद्यार्थी सहायक संस्थेने सुध्दा मदत केली. त्यावेळी वीज अत्यंत महाग आणि दुर्मिळ होती. आमची आई सांगायची नारायण, चंद्रकांत वीरकर, विष्णुपंत वीरकर, अनंतराव वीरकर हे सर्व गायवाडीत म्युनिसिपल दिव्याखाली बसून अभ्यास करायचे. त्यावेळी लोक मेट्रिक होताना मारामार तरी हे बी.एससी. पर्यंत शिकले आणि आसाम येथे कोणत्यातरी सरकारी खात्यात ऑफिसर म्हणून नोकरीला लागले. लवकरच ते पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यांच्या नार्डुवेकर वीरकर कुटुंबात सर्वच व्यवसायिक, त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा होती. त्यावेळी डोंबिवली एक गाव होते आणि ते मूळ मुंबई शहरापासून अतिशय दूर समजले जायचे. अतिशय दुर्मिळ वस्ती होती. आता जेथे टिळकनगर पोस्ट ऑफिस आणि सुयोग मंगल कार्यालय आहे तेथे बद्री भैयाचा तबेला आणि उघडी खडकाळ जमीन होती. तेथून स्टेशन दिसत असे. नारायणराव दूरदर्शी होते. त्यावेळी त्यांनी ४ आणे वाराने जवळजवळ अख्खे टिळकनगर ची जमीन विकत घेतली होती. आपला गिरगावातील इंजिनियर मित्र कानेटकर याचे सहायाने त्यांनी डोंबिवलीमध्ये बांधकाम कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यावेळी 10, 15 हजारात बंगला बांधून व्हायचा पण तेव्हडा सुध्दा पैसा लोकांकडे नव्हता. लोक घर बांधून घेत पण पैसे देताना टाळाटाळ करीत. काही दिवसांनी कानेटकर, भागीदार म्हणून नारायणरावांवर उधारी आणि कर्ज ठेवून बाजूला झाला. नारायणरावांवर कर्ज झाल्यामुळे त्यांना राहत्या घराच्या प्रॉपर्टी जप्तीची नोटीस आली. पून्हा नारायणराव मामाकडे ( माझे वडील गणपतराव ) आले. त्यावेळी गणपतराव सन्मित्र सहकारी बँकेमध्ये डायरेक्टर होते. सर्व डायरेक्टर नारायणरावांना ओळखत होते. त्याकाळी बायकोचे सर्व दागिने गहाण ठेवून सन्मित्र बँकेने 20,000 रुपयाचे कर्ज दिले. असे दोन वेळा नारायणराव अडकले असताना सन्मित्र बँकेने त्यांना मदत केली. अर्थात त्यांनी वेळेवर परतफेड करून आपला आर्थिक रेकॉर्ड चांगला ठेवल्यामुळे हे शक्य झाले. असे करता करता वयाची 45 झाली तरी आर्थिक स्थिरता येत नव्हती. जो मिळेल तो व्यवसाय, अगदी हातगाडीने पाणी विक्री सुध्दा ( त्याकाळी डोंबिवलीमध्ये पाणी दुर्भिक्ष होते) संसार केला. त्यांचे सुरवातीचे सर्व आयुष्य अतिशय खडतर गेले. शेवटी 48 व्या वर्षी त्यांनी एम. एच. हायस्कूल ठाणे येथे गणित आणि सायन्सचे हंगामी शिक्षक म्हणुनी नोकरी पत्करली. पुढे 50 व्या वर्षी बी.टी. ( बाचेलर ऑफ ट्रेनिंग ) केले आणि नोकरी कायम झाली. पार्ट टाईम व्यवसाय सुरूच होता. सकाळी 7 ते दुपारी 1 शाळा. दुपारी 3 ते 8 व्यवसाय. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले सर्व आयुष्य समाज सेवेत घालवले. रोटरी क्लबचे सदस्य झाल्यामुळे रोटरी आणि त्यांच्या सदस्यांची बांधकामे नारायणरावानाच मिळायची. त्यावेळी रोटरी क्लब डोंबिवलीने काहीतरी स्थाई प्रोजेक्ट करावा असे ठरवले. त्यावेळी फार्माटॅक्स चे कर्वे, राव हॉस्पिटलचे डॉ. राव इत्यादीनी ही जबाबदारी नारायणराव यांचेकडे सोपवली. नारायणराव हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या ह्या डोंबिवलीमध्ये मुक, कर्णबधीर मुलांसाठी शाळा नाही तेव्हा आपण ती काढुया असे सुचवले. त्यामुळे आपोआप ती सर्व जबाबदारी रोटरीने त्यांचेवर टाकली. निधी संकलनासाठी अनुप जलोटा चा भव्य कार्यक्रम अखला गेला. बांधकाम सुरू झाले त्यावर मी पाणी मारायला सुध्दा गेलो आहे म्हणून मला हे सर्व माहिती आहे. अखेर शाळा उभी राहिली. शाळेला मान्यता मिळवून तिला अनुदान मिळवण्याची सर्व कामे त्यांची मुलगी ज्योती ताईने केली. आता ती सुध्दा हयात नाही. स्टाफ आला, विद्यार्थी आले. पहिल्या मुख्याध्यापिका सौ. सबनीस होत्या. आज ह्या शाळेचे महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यात खूप नाव आहे. ह्या शाळेने अनेक स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. एका व्रतस्थासारखे नारायणराव दररोज सकाळी 9 ते 10 शाळेत जायचे, असे त्यांनी जवळजवळ 22 वर्ष केले. काल त्या शाळेतील मुक, बधीर मुलांचे कार्यक्रम बघून सर्व आठवले ते मी फक्त शब्दांकन केले एव्हढेच. हे सर्व करत असताना ते आपल्या जन्मगाव आजोळ, वीरला विसरले नाहीत. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेला 1986 चे सुमारास 100 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी वीर ग्राम विकास मंडळ स्थापन करून शाळेचा भव्य शतक महोत्सव साजरा केला. त्यावेळचे महाराष्ट्राचे मंत्री, डोंबिवलीकर तसेच त्यावेळचे अभिनव सहकारी बँक, डोंबिवलीचे अध्यक्ष, ना. नकुल पाटील यांनी वीर येथील समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. वीर येथे गाडीचा चांगला रस्ता नव्हता म्हणून कर्जुवे येथून होडीने मंत्र्यांना वीर बंदर पर्यंत प्रवास केला पुढे वीर बंदर ते जि. प. शाळा क्रमांक 1 पर्यंत डोलीने आणले. एव्हडी पूर्वीच्या लोकांची जिद्द आणि आपल्या गावाबद्दल ओढ असायची. श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ, वीर ह्या संस्थेचे ते अनेक वर्ष अध्यक्ष तसेच पदाधिकारी होते आणि संस्थेचा सुवर्ण महोत्सव त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. देवरूखे ब्राह्मण संघ डोंबिवलीचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांचे मित्र डॉ. दे. ग. मुळे भाजपचे आणि नारायणराव काँग्रेसचे असेल तरी समाजकार्यात त्यांनी कधीही राजकारण आणले नाही. ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते तरी त्यांच्या माझ्यात एक छान केमिस्ट्री होते. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारत होतो. एखाद्याचे कर्तुत्व आणि नेतृत्व बघून त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यांनी काही काळ अभिनव सहकारी बँक डोंबीवली मध्ये सुध्धा डायरेक्टर म्हणून काम केले आहे. सन्मित्र बँक भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी मी, नारायणराव आणि आमचे सहकारी ह्यानी अनेक प्रयत्न केले त्यावर कधीतरी वेगळे लिहीन. दूरदैवाने आपण ती वाचवू शकलो नाही. माझे वडील त्या बँकेत 12 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर होते म्हणून मला विशेष स्वारस्य होते पण आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय बोलणार. ते एक धडाडीचे सामाजिक कार्य करते होते. माझा त्यांना नम्रतापूर्वक नमस्कार. माधव भोळे.