Wednesday, December 18, 2024

रिझर्व बँक स्वायत्तता आणि सरकार

 १९.१२.२०२४

रिझर्व बँक स्वायत्तता आणि सरकार
भारतीय रिझर्व बँक ही प्रथम ब्रिटिश काळात १९३४ च्या रिझर्व बँक कायद्यानुसार १ एप्रिल १९३५ साली स्थापन झाली. त्याचे पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ हे एक व्यवसायिक बँकर होते. त्यावेळी ती स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे
A) पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देणे.
B) बँक नोट प्रसारित करणे
C) आर्थिक स्थिरतेसाठी योग्य तों निधी राखीव ठेवणे
D) देशाच्या प्रगतीसाठी करन्सी आणि क्रेडिट (पत ) सिस्टीम तयार करणे आणि चालवणे. पतपुरवठा नियंत्रण करणे.

पुढे १९४३ मध्ये सर चिंतामणरावं द्वारकानाथ देशमुख, ICS ( C D Deshmukh), हे तिचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. १९४४ साली रिझर्व बँकेच्या कायद्यात बदल होऊन पब्लिक डेबट ऍक्ट १९४४ साली पास झाला. यामुळे सरकारला आपल्या कार्यासाठी कर्जरोखे किंवा अन्य स्वरूपात लोकनिधी उपलब्ध करणे शक्य झाले.

पुढे १९४९ मध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आला त्याद्वारे बँकांचा कारभार, जमा कर्त्यांच्या जमेचे सौरक्षण, आणि बँकांची आर्थिक स्थिरता इत्यादी विषयात व्यवस्थापन करण्याचे अधिकार रिझर्व बँकेला मिळाले.

रिझर्व बँक,  बँकांच्या स्थिरतेसाठी कॅश रिझर्व रेशो ( CRR) आणि स्टेट्युटरी लिक्विडटी रेशो ( SLR) असे दोन प्रकारचे डिपॉसिट बँकांच्या राखीव निधीमध्ये अपेक्षित करते. पैकी CRR चा निधी रिझर्व बँकेकडे ठेवला जातों तर SLR निधी हे बँक स्वतःकडे वेगवेगळ्या मालमत्ताच्या स्वरूपात ठेवतें. यासर्वावर RBI चे नियंत्रण असते. शेतीविषयक बँकावर नाबार्डचे नियंत्रण असते.

रिझर्व बँक गव्हार्निंग बोर्ड २१ जणांचे असून त्याची नियुक्ती भारत सरकार आपल्या अर्थ मंत्रालयामार्फत करते. रिझर्व बँक गवर्नर त्या बोर्डाचा प्रमुख असतो.

रिझर्व बँक, त्यांच्या सांख्यिकी विभागातर्फे जमवलेल्या माहितीतून देशातील महागाई दर आणि तों नियंत्रणात आणण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट ( प्रमुख कर्ज व्याज दर ) वर नियंत्रण करते.  हे दर वेळोवेळी साधारण दर दोन महिन्याला रिझर्व बँक गवर्नर प्रसारित करतात.

त्याशिवाय, 2010 साली भारताच्या अर्थमंत्र्याच्या पदसिद्ध अध्यक्षतेखाली आर्थिक स्थिरता आणि राष्ट्रीय विकास परिषद (Financial stability and development council ) स्थापन झाली. ह्या परिषदेमध्ये रिझर्व बँक, सेबी, PFRDA ( पेन्शन फ़ंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी), IRDA ( इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हेलोपमेंट ऑथॉरिटी), FMC ( फॉरवर्ड मार्केट्स कमिशन ) यासंस्थांचे उच्च पदस्थ अधिकारी असतात. ह्या परिषदेकडून वर्षातून दोन वेळा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसारित केला जातो. हे करण्याचे कारण म्हणजे रिझर्व बँकेशिवाय वरील इतर संस्था सुद्धा देशाच्या आर्थिक स्थिरतेशी संबंधित आहेत.

दरवर्षी रिझर्व बँक सरकारला झालेल्या व्यवहाराच्या नफ्यातून काही लाभांश देते व उरलेला नफा राखीव निधी म्हणून ठेवते. सन २०२३-२४  साला साठी रिझर्व बँकेने केंद्र सरकारला रु. २.११ लाख कोटी एवढा लाभांश दिला. हा लाभांश गेल्या वर्षीच्या तुलनेत १४०% जास्त आहे. ह्या वाढीव लाभांशामुळे सरकार आपल्या बजेट मधील वित्तीय तूट (उत्पन्न आणि खर्च यातील तफावत) कमी करू शकेल.

रिझर्व बँकेकडे दोन प्रकारचे रिझर्व असतात, एक परकीय चलन स्वरूपात आणि दुसरे भारतीय रुपयाच्या स्वरूपात ज्याला कॉन्टीजन्सी रिस्क बफर (CRB)  असे म्हणतात. वरील लाभांश वाढवताना रिझर्व बँकेने आपल्या CRB मध्ये ६% वरून ६.५% एव्हडी वाढ केली आहे. रिझर्व बँकेकडे सध्या परकीय चालनामध्ये २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ६५८.०९ बिलीयन डॉलर्स राखीव निधी आहे, त्यापैकी ६७.५७३ बिलीयन डॉलर्स सोन्याच्या रूपात आहेत तर १७.९८५ बिलीयन डॉलर्स हे अंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे असलेले भारताचे पैसे काढण्याचे विशेष अधिकाराच्या स्वरूपात आहेत. भारताचे फॉरेक्स रिझर्व हे त्याच्या ११.२ महिने इम्पोर्टच्या किमती एव्हडे आहे.

गेले काही महिने, युक्रेन युद्धामुळे झालेल्या कच्चा तेलाच्या किमतीतील दरवाढी मुळे, अनेक परकीय गुंतवणूकदार आपला भारतीय शेयर बाजारातील सहभाग कमी करून आपली गुंतवणूक चीनकडे वळवत आहेत. त्यामुळे डॉलर्सच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे. त्याला उपाय म्हणून भारतीय रिझर्व बँक आपल्याकडे असलेले डॉलर्स विकून, रुपयाची घसरण थांबण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे परकीय चलन साठा कमी होत आहे. २०१४ मध्ये १ डॉलर = ६१.८३०६ रुपये होता तों आता १ डॉलर = ८४.९० रुपये झाला आहे ( १७.१२.२०२४). गेल्या वर्षी  याच तारखेला तों रु. ८३.०२४ एव्हडा होता म्हणजेच एका वर्षात तों २.२६% नी घसरला तर गेल्या १० वर्षात तों ३७.३१% नी घसरला.

भारताचे परकीय कर्ज ६८२.३ बिलीयन डॉलर्स जे भारताच्या जिडीपी च्या १८.८% आहे. भारताचा डॉलर मधील जिडीपी ३.५५ ट्रिलीयन डॉलर्स आहे.

रिझर्व बँकेचे मुख्य काम आर्थिक स्थिरता स्थापन करण्यासाठी योग्य तों राखीव निधी उपलब्ध करणे आणि सांभाळणे. याविरुद्ध वर्षानुवर्षे सरकारचे म्हणणे आहे की आपला देश हा विकासाधीन ( developing) देश असल्यामुळे आपला खर्च हा नेहमीच वाढीव असणार. त्यामुळे आपली वित्तीय तूट ( त्या वर्षातील उत्पन्न आणि खर्च यातील तफावत ) ही वाढत जाणार. २०२० - २०२१ सालच्या कोविड लॉकडाऊन मुळे, सरकारने केलेल्या लोक कल्याणकारी योजना आणि तात्पुरते उपाय, यामुळे सुद्धा ही तफावत दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या होत असलेल्या जिडीपीच्या वाढीपैकी बराचसा भाग हा सरकारने इन्फ्रास्ट्रकचर वर होत असलेली गुंतवणूक असून त्यामधून उत्पन्न परतावा मिळायला वेळ लागतो. शेतीविषयक उत्पन्नामध्ये घट होत असून त्याची जिडीपी मधील भागीदारी दिवसेंदिवस कमी होत आहे, तर उत्पादन क्षेत्रातील वाढ होत नाही. दरवर्षीच्या वित्तीय तुटीमधून कर्जाची उत्पती होत असते. शिवाय कर्जावरील व्याज शिल्लकेला कमी करत असते.

भारताचे कर्ज तिच्या जिडीपीच्या ८१.५९% म्हणजेच 3.23752 ट्रिलीयन डॉलर्स आहे. सरकार हे गुणोत्तर कमी करण्याचा कसोशिने प्रयत्न करीत आहे, परंतु वाढती वित्तीय तूट, जागतिक अस्थिरता आणि मेक इन इंडिया किंवा स्किल इंडिया यासारख्या योजनाना मिळालेला मिश्र प्रतिसाद, वाढता इम्पोर्ट यामुळे त्यात यश येणे अवघड होऊन बसले आहे. जेथपर्यंत सरकार आपल्या व्यवस्थापनावरील खर्च आटोक्यात आणत नाही तेथपर्यंत ही स्थिती अशीच रहाणार.

भारताचे दरडोई उत्पन्न २०१४ मध्ये Rs. ७२,८०५ होते तें  २०२४ मध्ये रु. १,८४,००० म्हणजेच १० वर्षात १.५२७ पट वाढले यां विरुद्ध भारताचे दरडोई कर्ज २०१४ मध्ये Rs ४३,१२४ होते तें वाढून २०२२ मध्ये Rs १,०९,३७३  झाले म्हणजेच यां काळात तें 2.53 पट वाढले. म्हणजे दरडोई उत्पन्न पेक्षा दरडोई कर्ज वाढण्याचा वेग जास्त आहे.

सरकार आणि रिझर्व बँकेने आपापल्या गरजा ओळखून त्यामध्ये सुवर्ण मध्य काढणे आवश्यक आहे, जेणेकरून सरकार आवश्यक तेव्हडाच खर्च करेल आणि रिझर्व बँक आवश्यक तेव्हडाच निधी राखीव ठेवेल असे न केल्यास कोणताही देश कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू शकणार नाही.

जगात कर्ज आणि जिडीपी रेशो प्रमाणे काही देश:
United States: 121.31%
France: 111.8%
Japan: 261.29%
United Kingdom: 101.36%
Sweden: 32.69%
Spain: 111.6%
Italy: 144.41%
South Africa: 71.12%
India: 83.13%

माधव भोळे

Monday, December 9, 2024

सात बारा थोडक्यात माहिती.

 सात बारा थोडक्यात माहिती.

आपले जमिनीचे ७/१२ असतात त्यात पुढील भागा मध्ये जमिनीचे ठिकाण, त्याचा सर्व्हे नंबर, सर्व्हे पोट क्रमांक, जमिनीची वर्गवारी (  वरकस, डोंगराळ, बागायती, जिरायती, इत्यादी ), जमिनीचे क्षेत्र हेक्टर आणि आर मध्ये ( १ आर = १,०७६.४ वर्ग फूट किंवा १०० वर्ग मिटर. १०० आर म्हणजे एक हेक्टर. साधारण पणे १ हेक्टर म्हणजे २.५ एकर अंदाजे समजले, थोडीफार फुटात तफावत असते. जुन्या पद्धतीमध्ये १ गुंठा म्हणजे १०८९ वर्ग फूट आणि ४० गुंठे म्हणजे एक एकर ),


त्यातील वर्गवारिप्रमाणे प्रत्येक क्षेत्र किती मापाचे आहे आणि एकंदर क्षेत्र किती मापाचे आहे हे पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेले असते. तिसऱ्या कॉलम मध्ये भोगावटदार: यां मध्ये जमीन मालकाचे नांव ज्याला भोगवटदार म्हणतात. जास्त भोगवटदार असतील तर त्यांचा जमिनीतील हिस्याचे प्रतिशत प्रमाण (%).


जर एखादे नांव तेथे असेल तर तें कोणत्या फेरफार नोंदीमुळे तेथे आले त्याचा फेरफार नंबर नावाच्या बाजूला गोल करून लिहितात. फेरफार म्हणजे कोणत्या बदलामुळे उदा. वारसा हक्काने किंवा खरेदी खतामुळे, किंवा विवाह नोंदणी मुळे विवाहित स्त्रीचे नांव बदलले इत्यादी.

४था कॉलम मध्ये जर जमिनीला कुळ लागले असेल तर कुळाचे नांव. आणि फेरफार नंबर, त्यानंतर इतर हक्कदारांची नांवे येतात.

जर जमिनीवर काही बोजा किंवा कर्ज बोजा ( देणे  असेल तर ) तें सुद्धा लिहिले जाते. खरेदी किंवा विक्री करताना तों बोजा काढून टाकल्याशिवाय हा व्यवहार होत नाही. ही झाली पुढील पानावरील माहिती. 


पाठच्या पानावर त्या शेतात होत असलेले पिक पाण्याची नोंद दरंवर्षी होते. उदा. त्या शेतात कोणतें पिक घेतले आहे. त्याचा उतारा किती येतो हे सुद्धा काही ठिकाणी लिहिले जाते. जर पिक न घेता शेत वारंवार रिकामे ठेवले जातं असेल तर त्याचा भोगावट दार बदलण्याचा हक्क सरकारला आहे.   शेत साऱ्यावर सरकारचे महसूल उत्पन्न  अवलंबुन असतें. 


पिक पाणी नोंद ही कर्ज घेण्यासाठी किंवा विमा योजनेची सुविधा घेण्यासाठी उपयोगाला येते. कारण तुमचे शेती उत्पन्न त्या नोंदीवर समजते. 


ज्यांनी पिक बदलून तेथे बागायती किंवा इतर वृक्ष लावले असतील तर त्याची नोंद तेथे घेणे आवश्यक आहे. कुळ कायदयाच्या केसेस मध्ये यां नोंदी खूप महत्वाच्या ठरतात.


माझ्या समजूती प्रमाणे लिहिले आहे. काही चुकीचे असेल तर जाणकारांनी जरूर मार्गदर्शन करावे.


माधव भोळे 

फक्त १५ मिनिटे आणि शेकडो कोटींचा चुराडा.

फक्त १५ मिनिटे आणि शेकडो कोटींचा चुराडा.


आज महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री श्री देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून आणि श्री एकनाथजी शिंदे आणि श्री अजित दादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय भव्य दिव्य असा शपथविधी पार पडला. प्रथम त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.


त्या शपथविधी साठी खुद्द देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, अमितभाई शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामण, अश्विनी वैष्णव, पियुष गोयेल, ज्योतिद्र राजे सिंदिया, चिराग पासवान सहित अनेक केंद्रीय मंत्री तसेच २४ भाजप प्रदेशित राज्याचे मुख्यमंत्री, शिवाय सहयोगी पक्षाचे चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते, संत, महंत, उद्योगपती, क्रिकेटीयर, सिनेमा श्रुष्टीतील दिग्गज, लाडक्या बहिणी एव्हड्या एकंदर ४३,००० मंडळीची उपस्थिती होती. यां समारंभासाठी हजारो पोलीस, मंत्रालय आणि इतर विभागातील शेकडो सरकारी कर्मचारी रात्रंदिवस खपत होते. अजय अतुल चा ऑर्केस्ट्रा आपल्यासाठी रिझवत होता. ( ज्या वेळी अदानी, अंबानी, बिर्ला यांच्यासारखे प्रचंड मोठे अबजाधिशांनासुद्धा यां १५ मिनिटासाठी आपले त्या दिवसाचे महत्वाचे व्यावसायिक कार्यक्रम बाजूला ठेवून हजर राहावे लागते, त्यावेळी तर त्यांच्या असहायतेची किंव मला आली. असे म्हणतात की बिर्लाच्या एव्हड्या कंपन्या आहेत की प्रत्येक कंपनीला जरी एक दिवस भेट दिली तरी त्याच कंपनीला परत भेट द्यायला त्यांना ३ वर्ष लागतात असे मला त्यांच्या कंपनी मधील एक माणूस म्हणाला होता.)


फक्त १५ मिनटं चाललेल्या यां कार्यक्रमासाठी एव्हडा मोठा घाट घातला होता तों सुद्धा अर्थातच जनतेच्या पैशातून. गेले कित्येक वर्ष सरकार बजेट मधून आपल्या व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्याचा वादा करते. आपल्या बजेटच्या १५ तें २०% खर्च हा फक्त आपल्या व्यवस्थापनावर होत असून, बजेट आणि उत्पन्नाचे स्रोत यांमध्ये नेहमीच तफवात असते. बजेट नेहमीच घाट्याचे असते. अर्थात त्यामुळे कर्ज वाढतच असते.


परंतु सरकारी जाहिरातबाजी, भव्य समारंभ, मंत्र्यांचे बंगले आणि त्यांची वारंवार चाललेली नूतनीकरणे, त्यांची इलेक्ट्रिक बिले, लावाजमा, सुरक्षा, गाड्या, हेलिकॉप्टर, वारंवार चाललेले दौरे, आमदार खासदारांची आयुष्यभराची पेन्शने, यावरील खर्च याचे गणित सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. 


शेतकरी, लाडक्या बहिणी, आंदोलनकर्ते यांना एव्हडेच समजते की आपल्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत, पण नागरिकांना समजतच नाही की अपण दिलेले टॅक्सेस खरोखर योग्य ठिकाणी खर्च होत आहेत कां? अनेक मूलभूत सरकारी योजना पैशाच्या अभावी पडून आहेत. 


मोठमोठाले ब्रिजेस, इन्फ्राष्ट्राचर, विमानतळे, महारास्ते इत्यादी गोष्टीमुळे आपण विकसित झालो, आपली इकोनॉमि ५ ट्रीलिएन ची झाली यां भ्रमात आपण आहोत. पण आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशाचा असा वायफळ दुरुपयोग होतो याबद्दल कोणीच खूष नाही. शिवाय एवढ्या ४३,००० लोकांचा अमूल्य वेळ जीं एक राष्ट्रीय संपत्ती आहे ती वाया गेली तें वेगळेच.


अतिशय खडतर अशा संघर्षमय आयुष्यानंतर १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला तों सुद्धा समर्थ रामदास स्वामीं यांच्या सल्ल्यावरून, जिजाऊ मातेच्या आशिर्वादानें आणि काशीचे गागाभट्ट यांच्या मार्गदर्शना खाली. स्वतः तें यां गोष्टीसाठी तयारच नव्हते परंतु गेल्या कित्येक शतकात मोगल साम्राज्यात हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला नाही आणि हिंदुचे अस्तित्व दाखवणे गरजेचे आहे हे ज्यावेळी छत्रपतीना पटले त्यावेळी त्यांनी तों सल्ला स्वीकारला. स्वतःच्या मोठेपणाची त्यांना हौस नव्हती. आजचा शपथविधी सोहोळा बघून छत्रपतीनी सुद्धा तोंडात बोट घातले असेल, कोण हा फडणवीस म्हणून?


पण ईथे तर काय जनतेने बहुमताने निवडून दिले म्हणजे आपण काहीतरी फार मोठा पराक्रम गाजवला यां भूमिकेत असे शपथविधी भारतात राजरोस होत आहेत. सर्वत्र फक्त धनिकांचे राज्य आहे. निवडणुकीत उभे राहून जिंकलेल्या पैकी ८०% पेक्षा जास्त उमेदवार करोडोपती आहेत. निडणुकीत उभे राहिलेल्या मंडळीपैकी ७५% लोक राजकारणी घराणेशाहितून पुढे आले आहेत. अगदी राजघराणी सुद्धा यां स्पर्धेत कमी नाहीत. निवडून आलेल्या मंत्र्यांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्याचा थाट अतिशय राजेशाही असतो. यांच्या बैठका फाईव्ह स्टार हॉटेल मध्येच होत असतात.


लोकशाही हे फक्त लेबल आहे. हे सर्व वतनदारांचे राज्य आहे, तुम्ही कोणालाही निवडून द्या, तों कोणत्या ना कोणत्या राजकीय घराण्याशी निगडित आहे कारण पक्ष ए बी फॉर्म देतात तेच मुळी अशा मंडळींना जों पैसा खर्च करू शकेल. आणि ही सर्व सामान्यांची ताकद नाही.


सर्व सामान्यांनी फक्त गुपचूप टॅक्स भरायचा. टॅक्स रेट वाढवला तर त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. टॅक्स वाढवणे शक्य नसेल तर त्यावर सरचार्ज बसवायचा. तें म्हणतील ती पूर्व, तें म्हणतील त्या योजना आणि तें म्हणतील तें बजेट. कधीही टॅक्सेस वाढवताना लोकमत विचारात घेतले जात नाही. बजेट पूर्व मिटिंग फक्त आणि फक्त देखावा असतो. टूथपेस्ट, मोबाईल, हेयर ऑइल सारख्या मूलभूत गोष्टींवर १८ टक्के जीएसटी आहे तर हेलिकॉप्टर वर फक्त ५% आहे. बघा कशी टॅक्स रचना ती. तयार घरांवर जींएसटी नाही आणि बांधकाम होत असलेल्या घरांवर ५% जींएसटी आहे. कोणता अर्थशाश्त्रज्ञ यांना सल्ले देतो कोण जाणे.


विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष फक्त निवडणुकांपुरते, बाकी सर्व एकत्र बसून चहा पीतात आणि हा तमाशा बघत असतात.


माधव भोळे

Tuesday, December 3, 2024

जाहिरात आणि भुलावण्या

 जाहिरात आणि भुलावण्या 

आजकाल अनेक रिअल इस्टेट डेव्हल्पर च्या जाहिराती समाज माध्यमांवर येतात. अतिशय आकर्षक फोटो किंवा डिझाईन असलेले फ्लॅट्स, बंगले, जमिनी वगैरे. एका पेक्षा एक सुविधा आणि सवलती जाहीर केलेल्या असतात. 


अर्थात अशी जाहिरात बघून लोक आकर्षित होतात. त्यांच्या स्वप्नातील घर, आणि तें ही थोडक्या पैशामध्ये मिळत आहे हे बघून त्यांना फोन करण्याचा मोह आवरत नाही.


मग आपण फोन करतो आणि एखादी उत्तर भारतीय ललना आपल्या फोन ला उत्तर देते.


ती : सर आप जगह देख रहे है?

आपण : जीं हा 

ती : सर क्या देख रहे है 1 BHK, 2 BHK यां 3 BHK. 

आपण : देख रहा हूं 2 BHK पर कोई बजेट मे अच्छा 3 BHK मिलेगा तों भि सोच सकता हूं 

ती: सर हमारे पास बहुत ऑप्शन्स है 1 BHK, 2 BHK, 3 BHK, टेरेस फ्लॅट, गार्डन व्यू फ्लॅट. 

सर आपका बजेट क्या है? 

आपण: बजेट ऐसा नहीं, पहिले क्या है वों देखके बता सकता हूं 

ती: सर हमारे पास बंगला ऑप्शन भि है, 2/3 BHK, with veranda और बंगले के सामने गार्डन.

आपण: अरे वा, ये तों बहुत अच्छा है.

ती : अच्छा तों आपके घर मे कितने लोग है? 

आपण : 4 लोग, हम दो, हमारे दो

ती : आपके दो लडके है यां एक लाडका एक लडकी?

आपण : उससे आपको क्या लेना देना.

ती : सर दोनो लडके है तों एक बेडरूम मे चलेगा, पर लडकी है तों एक और बेडरूम लगेगा.

आपण : ठीक है हमे कमसे कम, 2 BHK कां मकान चाहिये.

ती : ये देखो हमारे स्टेशन के पास २ मिनिट दुरी पर २ टॉवर प्रोजेक्ट चल रहे है और स्टेशन से सिर्फ 15 मिनिट दूर ३ बंगलो प्रोजेक्ट चल रहे है

आपण: क्या प्राईस क्या है?

ती : सर टॉवर प्रोजेक्ट मे 2 BHK प्राईस है 40 और 3 BHK 50 लाख. और बंगलो प्रोजेक्ट भि 2 BHK 55 लाख और 3 BHK 65 लाख 

आपण: कोनसा स्टेशन है?

ती : सर आसनगाव.

आपण: तें कुठे आले? 

ती: सर कल्याण कसारा लाईन है उसमे है.

आपण: तों पहिले क्यू नहीं बताया?

ती : क्या नहीं बताया? सब मालूमत तों दे रही हूं 

आपण : कोनसा स्टेशन क्यू नहीं बताया.

ती : सर आपने कहा पूछा! आप अभी पूछा तभी जबाव दिया. सर आप कहा रहते हो?

आपण : मै गोरेगाव रहता हूं

ती: तों सर आसन गांव आपके यहाँ से रेल्वे से नजदिक रहेगा. गुगल मॅप देखो. 

आपण : आप किधरसे बात कर रही हो? 

ती : सर मै बंगलोर से बात कर रही हूं

आपण : तों फिर आपको गोरेगाव और आसनगांव दोन्ही सरिखा लगेगा, स्वाभाविक है.

ती : सर दोनो तों गांव ही है ना?

आपण : पर ये आसनगाव की मार्केटिंग आप बंगलोर से क्यू कर रही हो.

ती: सर हम एक टेलिमार्केटिंग कंपनी है, हरररोज 100 फोन कॉल करने कां टार्गेट है! उसके लिये हमे हररोज 250 रुपया मिलता है. सर कुछ गलती हो गया क्या? 

आपण : नाही मॅडम आपकी कोई गलती नहीं. मै आसनगाव जगह नहीं धुंड रहा हूं.

ती : सर आपको इन्व्हेस्टमेंट के लिये अच्छा रहेगा. हमारी कंपनी हौसिंग लोन भि प्रोव्हाईड करती है 

आपण : मै पहिले ही बताया की मै आसनगांव जगह नही धुंड रहा हूं!

ती : तों पहिला ही क्यू नहीं बताया? फुकट टाईम पास कर रहे हो? लडकी कां आवाज अच्छा लगा, किया बात चालू.

आपण : आपको कुछ गलत फैनी हो गयी है. आप तमीज से बात किजीये 

ती : फोन ठेवून देते  


त्या नंतर आठच दिवसात महाराष्ट्रातील पुणे, तळेगाव, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार,नालासोपारा, अगदी गोरेगाव सोडून सर्व ठिकाणच्या इस्टेट एजंट चे फोन यायला सुरवात होते. सकाळी उठलो नाही तर फोन. 

एजंट : सर आप जगह देख रहे क्या?

आपण : आपको कोन बोला?

एजंट.: सर आपकी इन्कवायरी आई थी

आपण : मेरी कोई इन्कवायरी नहीं है 

एजंट : सर है तों बोल देना, अच्छा प्रपोसलं दे दूंगा 


आतापर्यंत जवळजवळ ४५० एजंट चे नंबर ब्लॉक केले आहेत. आज जागा घेऊन दोन वर्ष झाली तरी अधुन मधून फोन येतच असतात. 

म्हणतात ना लग्न पाहावे करून आणि घर बघावे विकत घेऊन.


यां जाहिरातीच्या दुनियेत बडा घर पोकळ वासा मंडळी खूप आहेत. एकां ठिकाणी झणझणीत मिसळची जाहिरात बघितली, म्हणून माझ्या मित्रानी त्या हॉटेल ला फोन केला. 

मित्र : आम्हाला १५ प्लेट मिसळ हवी आहे. 

हॉटेल : आम्ही फक्त सकाळी ९ तें १२ मिसळ ठेवतो

मित्र : तुम्ही करून ठेवा. आम्ही पार्सल घेऊन जातो 

हॉटेल : आम्ही पार्सल देत नाही.

मित्र : बरे उद्या सकाळी येतो.

हॉटेल: जास्त प्लेट असतील तर २ दिवस आधी सांगावे लागेल कारण तशी तयारी करावी लागेल. उद्या शक्य नाही. 

मित्र : आहो आम्ही स्वतः १५ लोक येऊन उद्या मिसळ खाऊन जाऊ. 

हॉटेल: आम्ही मिसळ जास्त बनवून ठेवत नाही. सर्वाना ताजी आणि झणझणीत मिसळ देतो. आधी बनवून ठेवली की चव उतरते. आज ऍडव्हान्स दिलात तर परवा १५ प्लेट मिसळ मिळेल.

मित्र : ठीक आहे. विचार करून कळवतो. 

(मनात ) मग एव्हडी झणझणीत मिसळची जाहिरात करता. साधी १५ प्लेट मिसळ देऊ शकत नाही. १५ म्हणजे काही १०० प्लेट नव्हेत, की त्यासाठी २ दिवस आगाऊ ऑर्डर करावी लागेल.


कोणीतरी म्हटले आहे रिकामा घडा जास्त आवाज करतो आणि उथळ पाण्याला खळखळात फार. 


माधव भोळे 


Thursday, November 28, 2024

पैशासाठी काय पण!!

 पैशासाठी काय पण!!

आज एक पोस्ट वाचली "भारतात विवाह संभारंभात न बोलावलेले पाहुणे खूप असतात यां विरुद्ध जपानमध्ये विवाह संभारंभांसाठी पाहुण्यांना पैसे देऊन आणावे लागते, शिवाय उंची जेवण पार्टी वेगळीच, कारण तेथे लोक कामात एव्हडे व्यस्त असतात की तें विवाह समारंभांसारख्या वेळखाऊ कार्यक्रमाला उपस्थित रहात नाहीत".


यां आधी आपल्या देशात श्रीमंत माणसांकडे प्रेतयात्रेमध्ये रडण्यासाठी काही ग्रुप असतात जे पैसे घेऊन रडतात हे ऐकले होते किंवा सिंधी, पंजाबी लोकांमध्ये मुलं जन्मले तर तृतिय पंथी ग्रुप येतात आणि त्यांचावर गाणी गात आशीर्वाद देतात हे ऐकले होते पण वरील गोष्ट ऐकली नव्हती. शिवाय भारतात आपल्या विवाह समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात एखादी सेलिब्रेटी आणायची असेल तर त्याची व्यवस्था सुद्धा पब्लिक रिलेशन कंपनीतर्फे पैसे घेऊन आणि त्यातील काही हिस्सा त्या सेलिब्रेटीला देऊन केली जाते. चिपळूण जवळील एका खेडे गावात एक प्रसिद्ध समाजसेवक कार्यक्रम अध्यक्ष आणि मार्गदर्शक

म्हणून बोलावला होता, मोजून रु. २५,००० घेतले आणि १ तास तेच भाषण केले जे इतर चार ठिकाणी करतो. अर्थात गावाच्या समारंभात आपली पत वाढावी म्हणून संस्थेचे पैसे खर्च करणारे लोक भरपूर आहेत.


मीं तर ऐकले आहे हे सिनेमा किंवा इतर काही स्पर्धात्मक बक्षीस समारंभ असतात त्यातील काही बक्षिसे सुद्धा विकाऊ असतात आणि प्रतिष्टे साठी लोक पैसा द्यायला तयार असतात.


आता कोणी याला सर्व्हिसेस म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल. एकूण काय पैशासाठी काहीही?? पैसे वाल्यांची बातच काही वेगळी आहे. 


माधव भोळे 

Sunday, November 24, 2024

वासुदेव आला रे, वासुदेव आला!!

 वासुदेव आला रे, वासुदेव आला!!


लहानपणी गिरगांव मध्ये नेहमी ठराविक वारी आमच्या बिल्डिंगच्या खाली वासुदेव येत असे. मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी. हातामध्ये चिपळ्या, अंगात बंद आणि घोळ असलेला विशिष्ठ प्रकारचा सफेद अंगरखा आणि सुरवार, गळ्यात वेगवेगळ्या मण्याच्या आणि कवड्यांच्या माळा आणि दोन तीन झोळ्या. एव्हढाच काय तों लवाजमा. 


एकेकाळी अध्यात्माचे ज्ञानभांडार, समाजातील काही विशिष्ठ वर्गापूर्ती मर्यादित असताना, ते ज्ञान, समाजातील सर्व स्तरावर पोचावे यांसाठी समाज धुरीणानी तयार केलेल्या समाज व्यवस्थेमध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, वासुदेव, गोंधळी, कथेकरी, भारूड करणारे यां सर्वाना महत्वाचे स्थान असून आपापल्या परीने ईश्वर आराधना, भक्ती, वाईट चालीरिती आणि परंपरांचे समूळ उच्चाटन, व्यसनमुक्ती, सामाजिक एकोपा इत्यादी विषयात काम करणारी ही मंडळी अत्यल्प मोबदल्यात समाजसेवा करीत असतात. आपण द्याल ते खुशीने घेऊन संतुष्टपणे "जों देगा उसका भला, जों नहीं देगा उसका भि भला" असे आशीर्वाद देत आपले आयुष्य जगत असतात. यांच्याकडे असलेले वाङ्मय, यांची मुखोदगत असलेली ग्रंथसंपदा, यांची कवने, यांच्या ओव्या, यांची चटकदार कथानके आणि त्यामुळे समाजात झालेली क्रांती याला इतिहासात तोड नाही. ज्यावेळी बाकीच्या देशात लोक कंद मुळे खात उघडे नागडे फिरत होते त्यावेळी भारतामध्ये अध्यात्माच्या अमृताचे घडे च्या घडे वरील वेगवेगळ्या मार्गाने रिकामे होत होते.


आजकाल इतर समाजाप्रमाणे यां समाजातील पुढची पिढी सुद्धा शिक्षणामुळे आपापल्या परीने प्रगती करीत असून त्यांच्या यां पारंपरिक व्यवसायाला राम राम ठोकून नोकरीं किंवा अन्य व्यवसायात मार्गक्रमण करीत आहे. 


जर आपल्याला आपला धर्म आणि संस्कृती, वरील टिकवायची असेल तर यां endangered species ( लुप्तजाय प्रजाती) ना यथाशक्ती दान देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत. 


माधव भोळे 


श्री चंद्रशेखर भडसावळे

 अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठाचा "Environmentally sound Agriculture - Hero Farmer" पुरस्कार.


सगुणा बागचे सर्वेसर्वा "कृषीरत्न, कृषीभूषण श्री चंद्रशेखर भडसावळे" यांना अत्यंत मनाचा, अमेरिकेतील मीशिगन युनिव्हर्सिटी चा 'Environmentally sound Agriculture मधील HERO FARMER' पुरस्कार नुकताच देण्यात आला. या विद्यापीठातील वरिष्ठ प्रोफेसर डॉ. बर्ड यांच्या हस्ते, आणि साधारण 30 इतर अमेरिकन शेती तज्ञांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. भारतातील व्यक्तीला किंवा अमेरिकेच्या बाहेरील व्यक्तीस प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.


१९६० साली, माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मालेगाव, नेरळ ( ता. कर्जत, जिल्हा रायगड) जवळील एक गांधींवादी स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी एक स्वप्न बघितले. आपल्याकडे असलेल्या शेतीची दर्जेदार पर्यावरण पूरक वाढ करत दर्जेदार शेतकरी म्हणून आपली ओळख बनवत आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या शेतीसाठी प्रेरित करायचे. 


त्यांचे सुपुत्र श्री चंद्रशेखर भडसावळे ( जन्म :२९ जानेवारी १९५०) यांनी १९७० साली दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ येथून B.Sc. Agriculture शिक्षण घेतले आणि पुढे १९७२ साली अमेरिकेत University of California मध्ये जाऊन M.Sc ( Food Technology ) ही डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी १९७२ ते १९७५ पर्यंत अमेरिकेत वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम केले. 


मुंबई शहारापासून सुमारे ७५ किमी दूर ( २ तास ) असलेली सुमारे ५५ एकर वडिलोपार्जित जमीन त्यांना अमेरिकेत स्वस्थ बसून देत नव्हती. वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि आपली स्वतःची वेगळी ओळख बनवायची यां दुहेरी उद्देशाने ते भारतात परत आले. तों काळ म्हणजे १९७५ चा काळ. आजच्यासारखे नेरळ सुधारलेले नव्हते. दिवसातून ठराविक रेल्वे गाड्या सीएसटी ते कर्जत धावत. आजूबाजूला वस्ती कमी, विजेचा लपंडाव चालूच. शेतामध्ये साप, सरपटणारे प्राणी यांचेच राज्य. अशा परिस्थितीवर मात करायची म्हणजे स्वतः सक्षम असणे महत्वाचे. चंद्रशेखरांनी हे आव्हान स्वीकारले. ते स्वतः साप पकडायला शिकले. हे बघण्यासाठी लोक आजूबाजूच्या गावातून यायला लागले. त्यांची खाण्यापिण्याची सोय करणे ही नैसर्गिक जबाबदारी आली. त्याची व्यवस्था करायला सुरवात केली. हळूहळू लोक त्यांची शेती बघायला यायला लागले. अशी झाली सगुणा बागेची आणि कृषी पर्यटनाची सुरवात. 


१९८५ पासून सुमारे ५५ एकर जमिनीमध्ये सगुणा बाग साकार झाली. यामध्ये १० एकर मध्ये ६ तलावामध्ये मत्सशेती ( Aqua culture) , १५ एकर मध्ये कृषी वनिकरण (Agro forestry), १० एकर बागायत ( Horticulture), ५ एकर मध्ये जनावरे गोठे, व्हर्मी कंपोस्टिंग आणि स्लरी प्रोजेक्ट. 


सगुणा बागेत वेगवेगळ्या प्रकारची राहण्याची घरे आणि व्यवस्था आहे. शेती आणि मनोरंजना संबंधि वेगवेगळ्या प्रकरच्या २० कार्यशाळा आणि खेळ आहेत. बैल गाडी राईड, म्हैशीवर बसणे, फ्लायिंग फॉक्स झिप लाईन, घोडे सवारी, नौकानयन, पक्षी निरीक्षण, मधुमक्षी पालन, सायकल सवारी, तारे निरीक्षण, ईमू फार्म, रोप वॉल चढणे, धनुष्यबाण आणि रायफल शूटिंग, फिश फार्मिंग, डेयरी फार्मिंग, पोहणे, कॅम्प फायर, गाईचे दूध काढणे, कब्बड्डी, फूट मसाज इत्यादी गोष्टी तेथे आहेत. त्या समजावून सांगायला त्यांचा प्रशिक्षित नोकर वर्ग असून त्या सर्वावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा मुलगा चंदन भडसावळे आहे. सगुणा बागेची निर्मिती करून चंद्रशेखर भडसावळे यांनी जणू भारतातील कृषी पर्यटनाची मुहूर्तमेढच रोवली म्हणा.


शेकडो पर्यटक ह्या परीपूर्ण कृषी पर्यटन क्षेत्राला आवर्जून भेट देतात. त्याचे श्रेय सगुणा बागेच्या व्यवस्थापना बरोबरच चंदनच्या कसबदार सोशल मीडिया मार्केटिंगला सुद्धा जाते. तों अतिशय छोट्या छोट्या परंतु सर्व सामान्याना माहिती नसलेल्या आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचे प्रत्यक्षासहित दर्जेदार व्हिडीओ सोशल मीडिया वर टाकत असतो ज्यामुळे कृषी पर्यटकांमध्ये त्याने सगुणा बागेचे विशेष स्थान निर्माण केले आहे. सगुणा बाग म्हणजे नुसती भटकंती नसून एक ज्ञानयज्ञ सुद्धा आहे ज्याची सुरवात चंद्रशेखर भडसावळे यांनी १९७५ साली केली.


चंद्रशेखर भडसावळे यांना देशभरात शाश्वतं शेतीबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी भात शेतीसाठी शोधून काढलेले बिना नांगरणी शेती टेक्निक ( SRT : Saguna Regenerative Techniques ) देशभर गाजत आहे. त्यांच्या "कृषी पर्यटन" ह्या विषयाच्या पुस्तकाच्या मराठी आणि हिंदी आवृत्या आहेत. त्यांनी जंगल आग विरोधक तंत्र शोधून काढले आहे. शिवाय जलपर्णीच्या विळख्यातून नदी आणि जलाशयाना सोडवण्यासाठी त्यांनी काही उपाय योजना काढल्या असून त्या महाराष्ट्र सरकार वापरत आहे. 


गेले काही वर्ष ते सगुणा रूरल फाउंडेशनचे ते संस्थापक आणि मुख्य ट्रस्टी असून सगुणा सस्टेनेंबलिटी सोल्युशनस प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजजिंग डायरेक्टर आहेत. 


ते टेडेक्स स्पीकर आहेत. परदेशात अनेक ठिकाणी त्यांनी शेतीच्या विविध संशोधनांवर व्याख्यानें दिली आहेत. 


कर्मयोगीं म्हणजे काय याचे श्री चंद्रशेखर भडसावळे साहेब हे एक मूर्तिमंत उदाहरणं म्हणायला हरकत नाही. अशा ह्या कर्मयोग्याला माझा नम्रतापूर्वक नमस्कार.


माधव भोळे