Saturday, December 24, 2022
सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन वसंत कराडकर - एक परिचय
सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन वसंत कराडकर - एक परिचय
साधारण २००६ च्या विध्यार्थी साहाय्यक संस्थेच्या वार्षिक बक्षीस समारंभाला सुरवात झाली आणि दीपप्रज्वलना नंतर, एक प्रसन्न व्यक्तिमत्व, शुद्ध वाणी आणि खणखणीत आवाज असलेल्या व्यक्तीने, ध्वनी क्षेपकाच्या पाठी उभे राहून भगवद् गीतेतील, एक श्लोक म्हणून त्याचा सोप्या भाषेत अर्थ सांगून आपल्या प्रास्ताविकाला सुरवात केली. माझ्या बाजूला बसलेल्या पाहुण्यांनी विचारले हे कोण? आणि मी म्हटले हे आमच्या विध्यार्थी साहाय्यक संस्थेतील नवीन विश्वस्त श्री नितीन वसंत कराडकर.
विश्वस्त
शिक्षणाने बी. कॉम, एल. एल. बी असलेले नितीनजी पेशाने कर सल्लागार आहेत. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी प्रथम ५ वर्षे युनियन बँकमध्ये नोकरी केली आणि नंतर काका कै. गणेश बाळकृष्ण कराडकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी कर सल्लागार म्हणून काम करायला सुरवात केली. गेली ३५ वर्षे ते कर सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय करत आहेत.
कै. गणूकाका कराडकर हे चेंबूर मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जेष्ठ कार्यकर्ते होते. साहजिकच नितीनजी सुद्धा रा. स्व. संघाच्या, 'राष्ट्र प्रथम' या विचार धारेने आकर्षित झाले आणि संघाच्या स्थानीय शाखेत सुरवात करून पुढे ते रा. स्व. संघाच्या चेंबूर नगर संघचालक पदापर्यंत पोहोचले. वेळो वेळी संघाने दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या. करोना काळात ई-शाखा हा आभासी संघ शाखेचा स्तुत्य उपक्रम त्यांनी सुरु केला. देशातील विविध प्रश्नांची तज्ज्ञांद्वारे उकल आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्रावरील व्याख्याने ई शाखेद्वारे प्रक्षेपित करून या कठीण काळात स्वयंसेवकांचे मनोधर्य उंचावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. योगी अरविंद या महापुरुषावर त्यांनी अभ्यासपूर्वक तीन भागात एकंदर ५ तास केलेले व्याख्यान मी स्वतः ऐकले आहे, ते अप्रतिम होते.
शिक्षणाची आवड असल्याने बालविकास संघ, चेंबूर, चेंबूर एज्युकेशन सोसायटी, चेंबूर व गोवंडी एज्युकेशन ट्रस्ट, गोवंडी या शाळांच्या व्यवस्थापन कार्यकारिणीचे ते गेले कित्येक वर्ष सदस्य आहेत. या पैकी बालविकास संघ मध्ये त्यांनी 3 वर्ष कार्यकारिणी अध्यक्ष आणि 3 वर्ष विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. जेष्ठानी आपली पदे रिक्त करून, तरुणांना, जबाबदारी घेऊन काम करण्यासाठी वाव द्यावा या एकमेव उद्देशाने त्यांनी येथील महत्वाची पदे स्वखुशीने सोडून ते फक्त कार्यकारिणी सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत.
याच काळात इतर शैक्षणिक उपक्रमांबरोबर संस्कृती आणि सद्गुणांची जोपासना व्हावी म्हणून ते दरवर्षी, बालविकास संघात रक्तदान शिबिर तसेच व्याख्यानमाला आयोजित करतात. त्यामध्ये शेवटच्या पुष्पाच्या दिवशी महाराष्ट्रातील नामांकित संस्थांना आमंत्रित करून त्यांचे कार्य दृकश्राव्य माध्यमाद्वारे चेंबूर मधील रसिक श्रोत्यांना दाखवले जाते. त्या द्वारे उपस्थित श्रोत्यांना सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ बुद्धीने काम करणाऱ्या अशा संस्थांना जास्तीत जास्त आर्थिक योगदान करण्यास विनंती करतात. आजपर्यंत श्री प्रकाश व सौ मंदाताई आमटे , श्रीमती सिंधुताई सपकाळ सौ रेणूताई दांडेकर, घराडी येथील स्नेहज्योती निवासी अंधशाळा, हे सर्व बालविकास संस्थेत येऊन गेले आहेत. पितृ पंधरवड्यात पित्र वंदना या कार्यक्रमाचे आयोजन करून वर्षभरात निधन पावलेल्या सर्व व्यक्ती ,प्राणी, वनस्पती यांना गीता ज्ञानरूपी तर्पण केले जाते म्हणजे ५ दिवस गीतेचा एक अध्याय घेऊन त्यावर मराठीतून निरूपण केले जाते. त्यासाठी चिन्मय मिशनचे स्वामी येत असतात. वरील सर्व कार्यक्रम हे बालविकास संघाच्या खर्चाने न होता त्यासाठी एक कुटुंब प्रयोजकत्व घेते. भगवद् गीता सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने गीता परिचय व प्रसार आणि शिवरायांच्या शौर्याबरोबरच त्यांनी सुराज्य कसे केले हे हि जाणणे महत्वाचे आहे म्हणून या दोन्ही विषयावर जनजागृती व्हावी या इच्छेने ते स्वतः दीड तासाचे व्याख्यान देतात. ठाणे जिल्ह्यातील, भिवंडी तालुक्यातील पडघा या आपल्या मूळ गावी नवीन महाविद्यालय, दत्त मंदिर जिर्णोर्धार आणि चेंबूर येथील चेंबूर हिंदू गणेशोत्सव या तिन्ही ठिकाणी निधीसंकलनामध्ये भरघोस निधी मिळवून देऊन नितीनजींनी आपले योगदान दिले आहे.
माणसाच्या उत्कर्षाचा पाया शिक्षण आहे या भावनेतून ते गरजू विद्यार्थ्यांना स्वतः जमेल तशी आणि बाकी अन्य संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून देतात, तसेच तरुणांना सुरवातीची नोकरी मिळवून देणे अथवा व्यवसाय / धंदा करायचा असल्यास त्याविषयी मार्गदर्शन करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
हे करत असतानाच जून २००३ ते मार्च २०१५ या काळात त्यांनी देवरुखे ब्राम्हण संघ, मुंबई येथे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे, तसेच देवरुखे ब्राह्मण विद्यार्थि साहाय्यक संस्थेच्या कार्यकारिणीवर गेले २१ वर्ष ते सलग काम करत आहेत. सध्या विद्यार्थि सहायक संस्थेचे संयुक्त कार्यवाह म्हणून ते कार्यरत आहेत.
शिक्षण आरोग्य आणि वृद्धत्व या विषयासाठी समाजात निधीची खूप आवश्यकता आहे असे त्यांना वाटते.. समाजाकडे असलेला पैसा देणगीच्या स्वरूपात चांगल्या संस्थांना या कामांकरिता मिळावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शक्य असेल तर आणि आपली मुले चांगली स्थिरस्थावर असतील तर आपल्या हयातीत किंवा इच्छापत्र करून भरपूर निधी या कारणांसाठी सर्वांनी द्यावा, हे कर सल्लागार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून वारंवार समाजाला सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. वनवासी कल्याण आश्रम व रा. स्व. संघ चलीत जनकल्याण समिती या दोन्ही संस्थांसाठी ते नियमित व आपत्ती असताना निधी जमा करीत असतात.
अशा प्रकारचे परिचय लिहिताना ‘प्रसिद्धी पराङ्मुख’ असा एक परावलीचा शब्द लेखात नेहमी पेरला जातो परंतु तो वापरण्यापूर्वी पडताळून पाहावा म्हुणुन मी स्वतः त्यांचे फेसबुक आणि इतर सोशियल मीडिया अकाउंट चेक केले. दोन चार घरगुती फोटो सोडता त्यांनी आज पर्यंतच्या केलेल्या एवढ्या भव्य कामाचे फोटो किव्वा माहिती या बद्दल एक चकार सुद्धा मला कुठेच मिळाला नाही. तसेच त्याची प्रसिद्धी कोणत्याहि वर्तमान पत्रात सुद्धा झालेली मी ऐकली नाही. त्यामुळे हा शब्द त्यांना नक्कीच लागू होतो असे मला वाटते. कदाचित त्यांचे काका कै. गणोजी कराडकर यांच्या विचरांचा त्यांच्यावर पगडा असल्यामुळे असे होऊ शकते.
वाचन, तसेच चांगली अध्यात्मिक व सामाजिक भाषणे ऐकण्याचा त्यांना छंद आहे. वरील संस्थांमध्ये सामाजिक सांस्कृतिक व संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांना आनंद वाटतो. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नंदिनी कराडकर यांनी नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडिया मधून ऐच्छिक सेवा निवृत्ती घेतली आहे त्यांना शास्त्रीय गायनाची आवड आहे आणि मुलगी सौ राधिका वैद्य ह्या चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांनी आंतराष्ट्रीय कर कायद्यांचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या वयाला ६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांना आयुष्याच्या या गोड टप्प्यावर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, निरामय आणि आणखी दैदिप्यमान होवो. त्यांचे हातून अशीच समाजसेवा घडत राहो हि ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना.
माधव भोळे ( नितीन कराडकरांना शुभेच्छा द्यायची असल्यास त्यांचा मोबाईल नंबर ९८९२० ५४३७०)
प्रा. डॉ विनय भोळे, एक धडाकेबाज व्यक्तिमत्व
प्रा. डॉ विनय भोळे, एक धडाकेबाज व्यक्तिमत्व
१९३५ मध्ये, डोंबिवली येथे सुरू झालेली, "ब्राह्मण सभा, डोंबिवली" हि सर्व ब्राह्मण ज्ञातींची प्रसिद्ध संस्था आहे. एक सधन व दर्जेदार संस्था म्हणून तीचा लौकिक आहे. वातानुकूलीत चार सभागृहे, चार मजली इमारत, पतसंस्था, वधूवर मंडळ, शिक्षण समिती असलेली हि संस्था इतर अनेक समाजउपयोगी उपक्रम सुद्धा चालवते. या संस्थेमध्ये दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी पार पडलेल्या निवडणूकी मध्ये प्रा. डॉ. विनय भोळे यांची बिनविरोध निवड झाली. ब्राह्मण सभेच्या ८२ वर्षांच्या इतिहासातील ते पहिले देवरूखे अध्यक्ष ठरले. त्यांचा कार्यकाळ १ सप्टेंबर २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२० असा आहे. त्यांनी सुत्रं हाती घेतल्यानन्तर अनेक नवीन उपक्रम सुरू केले. त्या पैकी काही ठळक:
१) "Dare to Share" या कार्यक्रमा अंतर्गत शेअर मार्केट विषयावर अभ्यास वर्ग, मार्गदर्शक सी. ए. निखिलेश सोमण, यांनी सुरु केले. या कार्यक्रमासाठी ए बी पी माझा फेम सी. ए. संजीव गोखले, हे उद्घाटक होते. सोमणांचे वर्ग अजूनही सुरू आहेत.
२) देवरुखे ज्ञातीतील श्री इंद्रनील भोळे यांनी तेथे चायनीस भाषेचे वर्ग सुरु केले.
३) "इच्छापत्र, काळाची गरज" या विषयावर सी. ए. चंद्रशेखर वझे, अध्यक्ष, जनकल्याण सहकारी बॅंक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले.
४) "भारतीय अर्थसंकल्प" या विषयावर अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यानं आयोजित केले
५) "नोटाबंदीची वर्षपूर्ती" या विषयावर अर्थतज्ञ डॉ. अभिजीत फडणीस यांचे व्याख्यान आयोजित केले
६) टिळक पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी श्री दा. कृ. सोमण यांचे "गणिती टिळक" या विषयावर व्याख्यान आयोजित केले.
प्रा. डॉ. विनय भोळे (मूळ गाव पिलवली) हे डोंबिवलीच्या मॉडेल महाविद्यालयात प्राध्यापक व पोस्ट ग्रॅज्युएट विषयांचे समन्वयक ( Co-ordinator ) असून मुंबई विद्यापिठात व्यवस्थापन शास्त्र ( Management ) विषयाचे विद्या वाचस्पती मार्गदर्शक (Ph. D. Guide) आहेत. त्यांनी अर्थशास्त्र (Economics), वित्त (Finance), व्यवसाय व्यवस्थापन (Business Management), बँकिंग, मानव संसाधन (Human resources), कर्मचारी व्यवस्थापन (Personnel Management), सामग्री व्यवस्थापन (Materials Management), विपणन व्यवस्थापन (Marketing Management), कायदा (Law) इत्यादी विषयात २१ पदवी आणि पदवीका प्राप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे ४९ वर्षीय विनयजी आज सुद्धा मानस शास्त्रामध्ये (Psychology) मध्ये एम. एस्सी. चा अभ्यास करत आहेत. त्यांचे शोध निबंध अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय शोध मासिकात (Journals) प्रसिद्ध झाले असून, वेगवेगळ्या विषयावरील त्यांचे अनेक लेख अनेक वर्तमानपत्रात आणि मासिकात प्रसिद्ध झाले आहेत. लोक त्यांना गमतीने आधुनिक जिचकर असे म्हणतात.
त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलिमा (पूर्वाश्रमींच्या नीलिमा बेडेकर) या एम एस्सी (रसायन शास्त्र), एम एड , तसेच निसर्गोपचार डॉक्टर असून, ज्योतिष शास्त्राच्या पदविवधर आणि उत्तम ज्योतिषी आहेत.
नुकत्याच, दिनांक २५ डिसेम्बर २०१७, रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यमंत्री मा. रवींद्र चव्हाण यांच्या "डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार" तर्फे जाहीर झालेला "आदर्श डोंबिवलीकर" या किताब आणि पुरस्काराने ते गौरवले गेले आहेत.
विशेष सांगण्यास आनंद होतो कि दरवर्षी "देवरुखे मित्रमंडळ पुरस्कृत", विध्यार्थी सहायक संस्थेतर्फे, संस्थेच्या वार्षिक विद्यार्थी सम्मेलनामध्ये दिला जाणारा, "देवरुखे विद्याभूषण" या पुरस्काराचे, ते या वर्षीचे मानकरी ठरले आहेत.
आम्ही, आपल्या सर्व ज्ञातीतर्फे, त्यांना सुयश चिंतितो आणि त्यांच्या पुढील वाटचालीत परमेश्वर त्यांना भरघोस यश देवो हि प्रार्थना करतो.
माधव भोळे
झोमॅटो आणि वेटर:
झोमॅटो आणि वेटर:
आज कोणीतरी “प्रदीप गोखले” लिखित झोमॅटोच्या पब्लिक लिस्टिंग बद्दल "*वेटरने जमवले 5,000 कोटी रूपये ...*" असे शीर्षक असलेली पोस्ट (https://www.facebook.com/aruna.joshi.5283/posts/4820811267933306) फेसबुकवर वाचायला मिळाली.
२००८ साली दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा ( दोन्ही आय.आय.टी. बी टेक दिल्ली ) या दोघांनी गुरुग्राम, हरियाणा येथे स्थापन केलेली झोमॅटो हि भारतीय मल्टी नॅशनल कंपनी २४ देशात १०,००० शहरात विश्रांतीगृह ( Restaurants) आणि हॉटेल्स मधून ऑनलाईन फूड ऑर्डरींग आणि डिलिव्हरी हे काम करते. आपण घरी बसून ऑर्डर करा आणि डिलिव्हरी व्यक्ती आपल्या घरी येऊन आपले खाणे देऊन जाते एव्हडी साधी वाटणारी हि प्रक्रिया आहे !!
१४ जुलै २०२१ रोजी झालेल्या झोमॅटो चे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) झाले तो १ रुपयाच्या दर्शनी किमतीवर ७५ रुपये अधीमूल्य असलेला हा शेयर २३ जुलै २०२१ रोजी लिस्टिंग च्या दिवशी रु ११५ आणि आज लेख लिहीत आहे त्या दिवशी रु १४५/ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. सन २०२१ ला १८४५ करोड रुपये टर्न ओव्हर असलेल्या ह्या कंपनीला गेली तीन वर्षे 2018-19 (1010 कोटी तोटा), 2019-20 (2362 कोटी तोटा) आणि 2020-21 ( 822 कोटी तोटा) आहे.
ह्या शेयर लिस्टिंग नंतर दीपिंदर गोयलच्या ह्या कंपनीतील ४.७ % शेयरची किंमत आता ६५० US डॉलर्स (सुमारे रु ४८४३ कोटी रुपये) झाली आहे.
आपले किती दुर्दैव आहे कि ज्या दीपिंदर गोयल ने आपली बुद्धिमत्ता, टेक्नॉलॉजी, स्वतःचे भांडवल लावून कायम स्वरूपी ४००० नोकर आणि हजारो पार्ट टाईम नोकर, लाखो हॉटेल्सचे नोकर (जे या व्यवसायावर अवलंबुन असून ह्या कम्पनीमुळे त्यांना नवीन जास्तीचा व्यवसाय मिळतो आणि आपली स्वयंपाक कला सादर करायला संधी मिळते) असलेली अशी कंपनी बहूकौशल्याने उभारली त्या दीपिंदर गोयलला, या प्रदीप गोखले नि एक वेटर म्हणून संबोधित केले. खरोखर आपण गुणग्राहक जरी नसलो तरी गुणगौरव करणारे असणे आवश्यक आहे. हि आणि ह्यांची मंडळी हजारो लोक उन्हा तान्हात, भर पावसात आणि कडाक्याच्या थंडीत रात्रन्दिवस काम करत असतात.
झोमॅटोचे व्हॅल्युएशन आणि गुंतवणूकदारांनी दिलेला प्रतिसाद यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया अगदी राकेश झुनझुनवाला सारख्या मुरब्बी गुंतवणूकदारांपासून ते अगदी नवख्या फायनान्शिअल अनॅलिस्टने द्यायला सुरवात केली आहे.
परंतु न्यू टेक्नॉलॉजी च्या कम्पन्या कशा प्रगती करतील याचा अंदाज अनेक गुंतवणूकदारांना नाही. ज्यांनी आयुष्भर सिमेंट, स्टील, केमिकल सारख्या मोठ्या कॅपिटल इंटेन्सिव्ह मॅन्युफॅक्चरिंग कम्पन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना तर टेक्नोलॉजी कम्पन्यामधली गुंतवणूक करणे एक मोठे आव्हान आहे.
कारण ५९ वर्ष काम करणारी जगात २२ लाख नोकर असलेली आणि जगभर ११,५०१ स्टोर्स असलेली वॉलमार्ट २०२० साली ५५९ बिलियन डॉलर चा टर्नओव्हर करते आणि १५.२ बिलियन डॉलर निव्वळ नफा कमावते तर २७ वर्ष जुनी असलेली ऍमेझॉन हि ऑनलाईन रिटेलर २०२० साली ३८६ बिलियन डॉलर चा टर्नओव्हर करून २१.३३ बिलियन निव्वळ नफा कमावते कारण दोघांच्या बीझिनेस मॉडेल मध्ये फरक आहे आणि तो टेक्नॉलॉजीचा सुद्धा आहे. २०१९ च्या शेवटाला ऍमेझॉनच्या वेबसाईटवर ६० कोटी ६ लाख एव्हडी विविध प्रोडक्ट विकायला आहेत आणि त्यांची एकत्रित विक्री ८७.४ बिलियन डॉलर (२०१९ - वॉलमार्ट ची १२९ बिलियन डॉलर) आहे. वॉलमार्ट आपल्या डिपार्टमेंटल दुकाना द्वारे फक्त ४ कोटी ६० लाख ७६ हजार एव्हडी प्रोडक्ट विकते.
याच व्यवसायातील अलीबाबा एक्सप्रेसचे चिनी मालक जॅक मा सांगतात, “माझ्या वेबसाईट वर १ बिलियन डॉलर एव्हडी वाढीव विक्री तयार करायला जेवढे भांडवल ओतायला लागते त्याच्या ८ ते १० पट जास्त भांडवल वॉलमार्टला तेव्हडिच वाढीव विक्री तयार करायला लागेल. कारण त्यांना जागा, नोकर वर्ग, गोदाम, वगैरे सर्वच ठिकाणी पैसे ओतावे लागतात या उलट मला २ कॉम्प्युटर सर्व्हर ज्यादा लावले कि माझे अर्धे काम तेथेच होऊन जाते.”
झोमॅटोचे सुरवातीचे गुंतवणूकदार सुद्धा जास्तकरून टेक्नॉलॉजी कंपन्या जसे कि इन्फो एज ( नौकरी.कॉम १८.६%), उबेर ( ९. १ %), अली पे सिंगापूर या ( ८. ३%) आणि आंट फायनांशियल्स ( ८.२ %) ह्या दोन्ही अलीबाबा डॉट कॉम च्या संलग्न कम्पन्या आहेत. कारण त्यांना टेक्नॉलॉजी ची ताकद माहित आहे. २०१० साली इन्फो एज ने झोमॅटो मध्ये लावलेले ४.७ करोड रुपयेची किंमत लिस्टिंग च्या दिवशी १५,००० कोटी झाली आहे.
Madhav Bhole
डॉक्टर विश्वास पुराणिक, डोंबिवली - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
डॉक्टर विश्वास पुराणिक, डोंबिवली - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व.
खरे म्हणजे जुन्या पिढीतील देवरूखे मंडळींना डॉक्टर पुराणिकांचा परिचय करून द्यायची काहीच आवश्यकता नाही, परंतु आपल्या सुदैवाने जेव्हा डॉक्टरांसारखी मंडळी गेले दोन पिढ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ते आता तिसऱ्या पिढीबरोबर सुध्दा खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, अशा वेळी ह्या जुन्या मंडळींच्या कर्तृत्वआलेखाचा परिचय करून देणे आवश्यक आहे. डॉक्टर विश्वास पुराणिकांचा परिचय लिहायला मी घेतला आणि काय लिहू आणि किती लिहू असा मोठा प्रश्न पडला.
डॉ. पुराणिकांचा जन्म, रत्नागिरी जिल्ह्यातील फुणगुस ह्या खेडेगावी, २८ नोव्हेंबर १९५२ रोजी, एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. हरहुन्नरी वडील, भिक्षुकी आणि इतर लहान मोठे व्यवसाय करून घर चालवत. डॉक्टर धरून, घरात एकंदर चार भावंडे. डॉक्टरांचे बालपण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फुणगुस येथे झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी आर. पी. गोगटे कॉलेज, रत्नागिरी येथे प्रवेश घेतला आणि काही काळ खाजगी वसतिगृह तसेच देवऋखे ज्ञाती आणि विद्यार्थी वसतिगृह येथे राहून आपला अभ्यास पूर्ण केला. एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्यांचा वसतिगृहात लौकिक होता असे त्यावेळचे विद्यार्थी अजूनही सांगतात. तेथे इंटर सायन्स पर्यंत अभ्यास केल्यानंतर पुढे त्यांना मुबई येथे सेंट जॉर्ज सरकारी दंतचिकित्सा विद्यालयात प्रवेश मिळाला. तेथे त्यांनी बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची परीक्षा पास करून आपला मुक्काम त्यावेळच्या होऊ घातलेल्या डोंबिवली शहराकडे वळवला आणि थोड्याच अवधीत १९७६ साली डोंबिवली पश्चिम, येथे दातांचा दवाखाना स्थापून आपल्या व्यवसायाचा जम बसवला.
आज पर्यंत देवरुखे ब्राह्मणांच्या एकंदर ६ परिषदा झाल्या त्यातील चौथी परिषद १९७८ साली डोंबिवली येथे झाली. त्यावेळी देवरूखे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष कै. डॉ. देविदास गणेश मुळे आणि उपाध्यक्ष कै. नारायण सखाराम वीरकर होते. डॉक्टर पुराणिक ह्यांना त्यावेळी देवरूखे समाजासाठी काम करण्याची पहिली संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या कार्याचा ठसा त्या परिषदेवर उमटवला. त्या वेळी कै. नारायणरावांनी डॉक्टर पुराणिकांचे आपल्या घरी तोंडभरून केलेले कौतुक मला अजूनही चांगलेच आठवते.
त्या कामगिरीच्या जोरावर पुढे ते देवरूखे ब्राह्मण संघ, डोंबिवलीचे प्रथम तरुण अध्यक्ष झाले. त्या नंतर त्यांनी आपल्या कामाचा सपाटाच लावला. त्याकाळी देवरूखे ब्राह्मण संघाची स्वतःची वास्तू नव्हती. एका बाजूला डोंबिवली झपाट्याने वाढत चालली होती आणि दुसऱ्या बाजूला संघाची स्वतःची वास्तू नाही याची डॉक्टरांना खंत होती. त्यांनी आपला हा विचार आपल्या सर्व सहकार्यांना बोलून दाखवला आणि झाले, सर्व डोंबिवलीकर कामाला लागले. त्या सर्वांच्या सहकार्याने आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संघाची एक शानदार वास्तू डोंबिवली शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भरवस्तीत तयार झाली जीचे उद्घाटन त्यावेळचे प्रतिथयश सामाजिक नेते, शेयर ब्रोकर कै. लक्ष्मणराव भोळे यांनी केले. त्याचा लाभ आज सर्व समाज घेत आहे. याच दरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवलीचा नेत्रदीपक रौप्य महोत्सव ३ दिवस साजरा झाला. डॉक्टरांची दूरदृष्टी आणि नेतृत्व गुणाचा पहिला परिचय, देवरूखे समाजाला तेथूनच झाला.
त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे डोंबिवली जिमखाना. डॉक्टरांना खेळ आणि व्यायामाची फार आवड आहे. अजूनही ते टेनिसचे दोन डाव सहज खेळतात. त्यांच्या ह्या आवडीसाठी त्यांनी त्यावेळी नुकताच सुरू झालेला डोंबिवली जिमखाना गाठला. त्यांचे संभाषण कौशल्य, सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची हातोटी, नियोजन आणि कडक आर्थिक शिस्त या मुळे थोड्याच अवधीत तेथील उच्चभृ, सुशिक्षित व्यवस्थापकीय मंडळात त्यांना स्थान मिळाले. १९९७ साली झालेल्या डोंबिवली जिमखान्याच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या प्रथम निवडणुकीत त्यांना पहिल्याच वेळी सर्वोच्च मते मिळाली. त्यांनी हा त्यांचा रेकॉर्ड पुढील ४ निवडणुकांमध्ये कायम ठेवला. त्यानंतर काही काळ ते त्या समितीचे अध्यक्ष सुध्दा झाले. आता सुद्धा ते जिमखान्याच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
हे करत असताना त्यांच्यातील कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. ज्या वैद्यकिय क्षेत्रात ते काम करतात त्यातील विविध समस्या त्यांनी जवळून पाहिल्या असल्यामुळे, समाजातील गोर, गरिबांना येणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन वैद्यकिय मदत निधी स्थापन करण्याच्या उद्देशाने त्यांनी २००० साली देवरूखे ब्राह्मण समाजाची पाचवी, परंतु प्रथमच एक जागतिक परिषद डोंबिवली येथे भरवली. अत्यंत सुनियोजित, सर्व देवरूखे ब्राह्मणांना एकत्र आणणारी, नेत्रदीपक, भरगच्च, तरीसुद्धा खर्चावर नियंत्रण असणारी आणि नवीन कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करणारी ही जागतिक परिषद भरविण्यात अध्यक्ष म्हणून ते यशस्वी झाले. जगभरातून सुमारे २,५०० देवरुखे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. त्या परिषदेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या निधीतून वैद्यकिय मदत निधी सन २००१ साली स्थापन झाला, ज्याचा लाभ आज सर्व समाज घेत आहे. या वर्षी वैद्यकिय मदत निधी २१ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त एक शानदार सोहोळा फुणगुस येथील श्री सिध्दी विनायकाच्या साक्षीने २८ जानेवारी २०२३ रोजी होत आहे आणि त्यासाठी सर्व ज्ञाती बांधवांनी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण त्यांनी जाहीर रित्या दिले आहे.
डॉक्टर पुराणिक ही बहुआयामी व्यक्ती म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपले कर्तृत्व आणि नेतृत्व फक्त देवरूखे समाजापूरतीच मर्यादित न ठेवता, १९४९ साली स्थापन झालेल्या जवळजवळ ७५,०००० दंतवैद्यक सभासद, २८ राज्य, ८ केंद्र शासित प्रदेश, १ संरक्षण शाखा, ह्या मध्ये ४५० स्थानिक शाखा असलेल्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान त्यांना २०१६-१७ मध्ये मिळाला. त्या वर्षभरात त्यांनी अनेक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी इंडियन डेंटल असोसियेशन चे अध्यक्ष म्हणून भेटी दिल्या आणि तेथील विविध विषयावरील परिषदांना आणि कार्यक्रमांना संबोधित केले. सध्या इंडियन डेंटल असोसिशनच्या आंतरराष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
या पुढील कळस म्हणजे औपचारिक शिक्षण सोडल्यानंतर जवळजवळ १७ वर्षांनी, १९९३ ला त्यांनी आपले एल. एल. बी. चे शिक्षण पूर्ण करून शिक्षणाला आणि कर्तुत्वाला वय नसते हे पुढील पिढीला दाखवून दिले. त्यानंतर दंतचिकित्सा व्यवसायातील, मेडिको लीगल तज्ञ म्हणून आपले अनुभव आणि कायदेशीर ज्ञान त्या व्यवसायातील व्यवसायिकांना प्रसार करण्यास त्यांनी सुरवात केली. देशातील एक प्रमुख डेंटल मेडीको लीगल एक्स्पर्ट म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आजवर वक्ता म्हणून त्यांनी प्रत्यक्ष तसेच दूरसंचार माध्यमातून भाषणे दिली आहेत.
हे सर्व करीत असताना ते आपले मूळ गाव फुणगुस विसरले नसून, तेथील "श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्ट, फुणगुस" ह्या न्यासाचे ते अध्यक्ष असून त्या न्यासातर्फे नुकतेच सुंदर अशा नवीन गणेश मंदिराचे बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठा समारंभ करण्याचा मान त्यांना मिळाला. देवरुखे ब्राम्हण समाजाच्या "विध्यार्थी सहायक संस्थेच्या" विश्वस्त पदी सुद्धा काहीकाळ त्यांनी काम केले आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून; त्यांना ब्राह्मण सभा, डोंबिवली तर्फे "डोंबिवली धन्वंतरी पुरस्कार २००२" दिला गेला. हा पुरस्कार मिळवणारे डॉक्टर पुराणिक हे डोंबिवलीतील पहिलेच दंतवैद्यक आहेत. २०१७ साली, महाराष्ट्राचे त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली मॅगझीन तर्फे दिला जाणारा "आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार" त्यांना प्रदान झाला. इंडियन डेंटल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेतर्फे "लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड" त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच, देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली तर्फे "देवरुखे भूषण" हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
नुकतीच त्यांनी आपल्या वयाची ७० री पूर्ण केली असली तरी त्यांनी त्यांचा व्यवसाय, त्यांचे समाज कार्य, अभ्यास आणि व्यायाम या सर्व विषयात प्रगती सुरूच ठेवली असून वय हा फक्त एक आकडा असून मनाची ताकद हीच खरी ताकद आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.
त्यांच्या वरील सर्व कार्यात त्यांच्या सूविद्य पत्नी ऍडव्होकेट सौ. स्वातीताई यांची संपूर्ण साथ असते. त्यांचा मोठा सुपुत्र डॉ. स्वरूप आणि त्याची सुविद्य पत्नी डॉ. अक्षता, दोघेही मास्टर ऑफ डेन्टिस्ट्री असून इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट ह्या कंपनीचे ते डायरेक्टर आहेत, त्यांना “मिरका” नावाची लहान मुलगी आहे, तर धाकटा सुपुत्र ऋषिकेश आणि त्याच्या पत्नी अस्लेषा दोघेही BE, MS ( USA) असून दोघेही अमेरिकेत आय टी क्षेत्रात कार्यरत असून त्यांना “सारा” नावाची एक लहान मुलगी आहे.
देश सेवा करताना प्रत्येकाने सीमेवर लढाई करायला हवी असे नाही. त्यांची वरील भव्य कामगिरी ही नक्कीच देशसेवा आहे असे मी समजतो. देव त्यांना दीर्घायुष्य देवो आणि त्यांचे हातून देवरुख्यांसहित सर्व समाजाची अशीच चांगली सेवा घडो ही प्रार्थना, मी ईश्वर चरणी करतो.
माधव भोळे.
मुक्तपत्र एक सामाजिक गरज
मुक्तपत्र एक सामाजिक गरज:
पूर्वी आम्ही शाळेत असताना माझ्या शाळेतील मैत्रिणींनी एक हाऊस मॅगझीन काढले होते. त्यामध्ये आम्ही आमच्या आवडीचे, आमच्या वयाला शोभणारे, विषय घेऊन, लेख लिहायचो. आमच्या पैकी काही व्यंगचित्र काढायच्या. काही मैत्रिणी आपल्याला माहित असलेले चुटके लिहायचे. हे सगळे गुप्तपणे चालायचे, ४ ते ६ पाठपोट कागद दर महिन्याला १० तारखेला बाहेर पडायचे कि झाले आमचे हाऊस मॅगझीन तयार, आणि ते वाचायला त्या वेळी नंबर लागायचे कारण ते छापायला आमच्याकडे पैसे नसायचे. एक दिवस आम्हाला आमच्या शाळामास्तर बाईंनी त्याचे काम करताना पकडले, थोडी भीतीच वाटली. बाईंनी सुद्धा जरा दम देत आमची खरडपट्टी काढली आणि सर्व जुने अंक मागून घेतले. रात्री घरी जाऊन बाईंनी सर्व अंक वाचून काढले आणि आमच्या एके एक दिव्य कल्पना, वाचून त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेत येऊन सर्व आमचे अंक परत केले आणि आम्हाला महिना १०० रुपयांचे बजेट मान्य करून, दर महिन्याला हे मॅगझीन सायक्लोस्टाईल पद्धतीने छापून देण्याचे मान्य केले. अशा रीतीने आम्ही त्यात यशस्वी झालो. ती आठवण आम्ही अजूनही विसरलो नाही.
ठाण्याचे मुक्तपत्र जेव्हा हाती पडले तेव्हा मला आनंदच झाला, त्यात त्यांच्या पदाधिकारी श्री मुसळे आणि कै उदय जोशी यांच्या कडून समजले कि ठाणेकर देवऋख्यांच्या स्थानिक समस्या, स्थानिक ब्राम्हण संघांचे आणि सामाजिक संस्थांचे कार्यक्रम, त्यातील आपल्या संघाचा सहभाग, स्थानिक लेखक, कवी याना आपल्या कलागुणांना वाव देणे, स्थानिक विद्यार्थ्यांचे, एखाद्या यशप्राप्त व्यक्ती किव्वा यशस्वी व्यावसायिक आणि कलाकार यांचे कोड कौतुक, इत्यादी अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे. बहुतेक संघ फक्त वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम करून आपल्या सभासदांशी आणि देणगीदारांशी सम्पर्क साधतात, परंतु मुक्तपत्राद्वारे हि तूट भरून निघते.
त्यात या मुक्तपत्राचा आर्थिकभार संस्थेवर पडू नये म्हणून वाजवी पैशात असलेले म्हणून मुक्तपत्र प्रायोजकत्व, हि कल्पना तर उत्तम वाटली आणि चालली सुद्धा. अर्थात या सर्वांपाठी असंख्य मदतीचे आणि मेहेनतीचे हात आहेत त्या शिवाय असे कार्य अखंड पूर्ण होऊ शकत नाही याची मला जाणीव आहे.
जेथपर्यंत ठाण्यामध्ये देवऋख्यांची नोंद घेण्याइतपत वस्ती राहील आणि ठाणेकर देवरुखे समाज कार्यात रस घेतील, तेथपर्यंत मुक्तपत्र सदैव त्यांच्यासाठी एक वरदान ठरेल यात मला शंका नाही. आपल्या कार्याला सलाम आणि पुढील शतकमहोत्सवी वाटचालीला शुभेच्छा.
वनमाला मुकादम (दादर संघ)
आमचे पंढरपूर, "वीर गाव"!!.
आमचे पंढरपूर, "वीर गाव"!!.
गाव म्हटले की प्रथम आठवते ते आपले हक्काचे, अर्थातच सर्व परीने सुरक्षित, पिढीजात वाडवडीलांचे गाव. आमच्या भोळे कुटुंबियांचे सुद्धा एक गाव आहे "वीर". कोकणातील वीर हे चिपळूण पासून ४६ किमी अंतरावर, सावर्डे मार्गे वहाळ फाट्याचे शेवटचे गाव. अजूनही तसेच निसर्गाने बहरलेले, बाहेरच्या धावपळीच्या जगापासून दूर!.
पूर्वीचा प्रवासाचा मार्ग:
लहानपणी १५ एप्रिलला शाळेचे परीक्षेचे पेपर दिले की आम्ही सर्व बच्चे मंडळी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून चौघुले शिपिंग कम्पनीच्या बोटीने वीर ला जात असू. जाताना गावातील इतर मित्रमंडळी सोबत असत. जणू काही जत्रेलाच जातो. एकदा ब्यागा खाली बोटीच्या हौद्यात टाकल्या की सर्व मंडळी बोटीच्या डेकवर जात. सीट नंबर वगैरे काही भानगड नव्हती. प्रत्येकाने एखादी चटई किंवा सतरंजी हांथरली की ती त्याची जागा झाली. केबिन वगैरे फक्त उच्चभ्रु लोकांसाठी राखीव असायच्या. साधारणपणे सकाळी ९ वाजता बोट सुटायची ती संध्याकाळी ६ ते ६.३० / ७ वाजता जयगड बंदराला लागायची. तो पर्यंत बोटीच्या डेकवरून बाहेर बघितले की चारी बाजूला निळेशार आकाशी पाणीच पाणी. सुरवातीला बोट हलायची अगदी भूकंप होतो तशी, त्यामुळे भीती वाटायची, पण एक दोन तासात त्याची सवय व्हायची. कधी अलिबाग, नागाव च्या नारळी फोफळी तर कधी मुरुड जंजिऱ्याचा किल्ला लांबून दिसायचा तर कधी बाणकोटची खाडी गेल्यावर दापोलीचा नयनरम्य समुद्र किनारा दिसायचा. ते दृश्य अजूनही लक्षात आहे. दुपारी जेवायला आई बटाट्याची भाजी आणि पोळ्या बरोबर आणायची ते खाऊन पितळेच्या फिरकीतल्या तांब्यातील पाणी पिऊन क्षुधा शांती व्हायची. तो फिरकीतला तांब्या वर्षभर दर्शन देत नसे पण गावाला जाताना हमखास दिसायचा. आता बिस्लरीच्या बंद पाणी बाटल्या आल्यामुळे तो तांब्या कोठे आहे ते शोधावे लागेल.
बोट मोठी असल्यामुळे जयगड बंदराला लागत नसे, त्यामुळे अब्बास भोई पडाव घेऊन बोटीपर्यंत यायचा, बोटीवरुन सर्वांना बकोटी धरून सुखरूप पडावात उतरवायचा आणि जयगड बंदरात समानासाहित सोडायचा. रात्री जयगड येथे भागवतांच्या खानावळी बाहेर पथारी टाकून सकाळी जयगड-कुरधुंडा लाँचने आम्ही भातगाव येथे जात असू, मग भातगाव ते वीर बंदर एक तासाचा होडी प्रवास आणि वीर बंदर ते घर, दोन किलोमीटर पायी चालत. एव्हडा जवळ जवळ २८ / २९ तासांचा प्रवास करून सुद्धा आम्ही दमलेले नसायचो. घरी आमची एक ७५ वर्षाची अलवणातील ( केशवपन केलेली, लाल लुगडे नेसणारी विधवा ) काकू वाट बघत असायची. बिचारी आपली म्हैस आणि रेडकू सांभाळत वर्षभर एकटी गावात राहायची. घरी गेल्यावर प्रथम अंघोळी आणि सोवळे ओवळे असायचे ते सर्व उरकेपर्यंत ३ वाजायचे. आजकाल सकाळी ७ वाजता गाडीत बसलो की दुपारी एक वाजेपर्यंत घरात दरवाज्यासमोर आपली गाडी उभी करू शकतो इतका फरक झाला आहे. आता बोटी सुद्धा बंद झाल्या आहेत पण बोटीच्या प्रवासाची मजा काही औरच.
वीर येथील वास्तव्य:
घरात शिरताना एक वेगळाच उत्साह मनात असायचा कारण येथे अभ्यास, परीक्षा याचे काही देणे घेणे नसायचे. दिवसभर हुंदडायचे, केव्हाही मनात आले की नदीत डुबकी मारत मनसोक्त पोहायचे, विटीदांडू, डब्बाऐस पैस, लगोरी, फुल रॅकेट सारखे मैदानी खेळ आणि गाढव (झब्बू), पाच तीन दोन, लेडीज पत्त्यांचे डाव, साप शिडी सारखे बैठे खेळ दिवसभर रंगायचे. मध्येच माझ्या शेजारच्या घरातील गोरगोमटा सुशील कपाळाला कुंकू, नाटकाच्या मेकपच्या सामानातील लिपस्टिक लावून आणि आईची साडी नेसून भावाला शंकासुराचा वेष घालून १० / १५ मिनिटे गावातील नमनाचे खेळे आणि एखादा वघ म्हणून दाखवायचा. फार मजा वाटायची त्यावेळी.
सोबत करवंदे, जांभळे, रायवळ आंबे, कैऱ्या, फणसाचे गरे पोटपूजा करायला असायचे, मग उरते तरी कसले टेन्शन?. दोन महिने मुक्त संचार गावातील सर्व घरात होत असे आणि आईच्या डोक्याची कटकट कमी झाल्यामुळे ती सुद्धा आनंदात असायची. रात्री अंधार पडला की मात्र आम्ही सर्वजण चुपचाप घरी हातपाय धुवून देवाला नमस्कार करून घरातील झोपाळ्यावर मोठमोठयाने पर्वचा, रामराक्ष, मारुती स्तोत्र म्हटल्याशिवाय कोणालाही जेवायला मिळत नसे. मग जेवून झाल्यावर रात्री भुताखेताच्या गोष्टी सांगत एखादा ताई किंवा दादा आम्हाला घाबरवीत असे. पूर्वी लाईट नसताना आणि कंदिलाच्या मिणमिणत्या दिव्यात फारच घाबरगुंडी उडायची. आजूबाजूची मुले सुद्धा आमचाकडेच झोपायला येत. एक मोठे जाजम पडवीत घातले की हवी तेव्हडी मुले एकत्र झोपत. त्याकाळी प्रत्येकाला वेगळी गादी, उशी ही नाटके नसायची.
आमचे घर आणि परसव:
गावात घराच्या पाठच्या अंगणात बसले की डाव्या बाजूला एक कोनकापा फणस, एक आंब्याचे कलम, खालच्या बाजूला परसवात रायवळ आंबा, फणस आणि नारळ अशी आजोबांनी लावलेली जुनी झाडे आहेत तसेच एक चिकुचे झाडसुद्धा आहे.पूर्वी रामफळ सुद्धा होती पण ती वादळात मोडली.
पूर्वी आमच्या घराच्या खाली बारमाही पाण्याचा पाट वाहत असे आणि तेथे असणाऱ्या द्रोणी मध्ये बसून बाथटब प्रमाणे आंघोळ करणे म्हणजे सिनेमातील रईसजादा झाल्यासारखे वाटायचे. आता नळ पाणी योजना आल्यानंतर पाटाचे पाणी बंद झाले. पाटाच्या खालच्या बाजूला नारळी पोफळीची बाग होती, तिला सारणीने पाटाचे पाणी लावले होते. बाग संपली की नादि वाहते. तिचा प्रवाह माझ्या घराच्या पाठच्या दरवाज्यात उभे राहिले तरी दिसतो. एव्हडे सुंदर आहे आमचे पाठचे परसव. या भरगचच परसवामुळे विविधरंगाचे रंगी बे रंगी पक्षी, बुलबुल, मैना, पोपट, साळुंक्या आमच्या बागेला भेट देत आपल्या सुस्वर गायनाने आमची झोपमोड करतात. रंगीबेरंगी फुलपाखरे बघून मन हरखून जाते. देवाने तयार केलेला निसर्ग हे जगातील पहिले आश्चर्य आहे हेच आपल्याला मानावेच लागेल.
उन्हाळ्यात आम्ही रात्री आमच्या गच्चीवर आकाशातीतील चांदण्या मोजत आणि पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत आणि पावसाळा जवळ आला की काजव्यांच्या मंद परंतु मधेच चमकणाऱ्या लख्ख प्रकाशात झोपतो. दिवसा पाठच्या अंगणात बसलो की एक खरकुंडीची जोडी आपसातच खोड्या करत खेळत असते. मध्येच एखादा सुतारपक्षी, बेलूर मधील चांन्नकेशव मंदिरातील दगडावर मूर्तिकाम करणाऱ्या कारागिरा प्रमाणे, आपली धारदार चोच कोणत्या तरी झाडावर तालात चालवत असतो, तर कोकिळा आपल्या मधुर गायनाने स्वर्गातील अप्सरांना सुद्धा नाचायला भाग पाडेल असे सुस्वरात गात असते. मध्येच एखादा ककणेर झपाझप पंखांचा आणि तोंडाने मोठा मधुर आवाज करत बघे बघे पर्यंत निघून जातो आणि मग लांब गेल्यावर दिसतो.
दरवर्षी आम्ही गावाला आलो की आई चैत्रगौरीचे हळदीकुंकू सवडीनुसार मे महिन्यात करायची आणि त्याची सजावट करण्याचे काम आम्ही मुले करीत असू, मग रंगीबेरंगी फुले, हिरवी, पांढरी, गुलाबी, काळी करवंद आणि इतर झाडांचे डहाळे यांनी गौरीचे मखर सजवत असू. दुसऱ्यादिवशी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असायची त्यावेळी पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या दिव्यात गावातील आमंत्रीत मंडळींच्या संगीत आरत्या रंगायच्या आणि मग सगळ्यांना आमरस पुरीचे जेवण. एक मेळावाच जणू.
एक दिवस पाठच्या पडवीत पोहे कांडण्याचा कार्यक्रम होत असे. आदल्या दिवशी भिजवलेले भात दुसऱ्या दिवशी एका विशिष्ठ मडक्यात भाजून ते मग उखळीत कुटले जाई. आजूबाजूच्या बायका आईच्या मदतीला येत. आई मुंबईला जाताना कुळीथ पीठ, भाजणी पीठ, घावन पीठ येथूनच करून नेत असे.
गावची प्रेक्षणीय स्थळे:
या गावात काय नाही ते विचारा!! वीर मध्ये देवपाट आणि रानपाट असे दोन बारमाही धबधबे आहेत. रानपाट च्या धबधब्याला जायला रस्ता व्यवस्थित नाही पण देवपाटच्या धबधब्याला जायचे असेल तर आपल्याला पाटातून चालत जायला लागते. मी दरवर्षी एकदातरी त्या धबधब्याचे मनसोक्त दर्शन घेऊन येतो. याचे नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे की फक्त 4 महिने पाऊस पडतो पण हे पाणी बारमाही कसे पडते आणि ते जर खडकात साठलेले असते तर ते एकदम कसे बाहेर पडत नाही? ऐन उन्हाळ्यात सुद्धा त्याची धार बऱ्यापैकी मोठी असते. असो, तर हे दोन्ही धबधबे एकत्र होऊन वर म्हटले तशी छोटीशी नदी माझ्या घराखालूनच वाहते. घराखाली नदीमध्ये कोकमाच्या झाडाखाली पाण्यात पायघालून, तरंगणाऱ्या पाणकोळ्यांची सतत चाललेली धडपड आणि रंगीबेरंगी माश्यांची कसरत बघता बघता वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही. धबधब्यांच्या त्या अखंड प्रवाहांमुळे आणि पावसाच्या कृपेमुळे अगदी ऐन उन्हाळ्यात जरी आपण वीरला गेलात तरी लहानच काय पण एखाद्या मोठ्या वृक्षाची पाने सुद्धा तुम्हाला सुकलेली आढळणार नाहीत. सर्व कसे हिरवेगार. त्या हिरवळीत सुद्धा वेगवेगळ्या छटा आहेत बर का! कधी कोवळी पोपटी, तर कधी वृद्ध ठळक हिरवी तर कधी नववधू सारखी ताजीतवानी हिरवी, एक ना अनेक. कॅमेरा तरी किती छटा टिपणार बिच्चारा?
वर देवपाट विभागात विष्णू अवतार असलेल्या श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवतेचे भव्य देऊळ आहे. किशोरावस्थेत असताना श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू बलराम, हे कंस, कैट्भ, चाणूर इत्यादी ८ मल्लांचा वध करत आहेत असे दृश्य असलेली ती सुमारे ७०० वर्षा पूर्वीची ६ फूट उंच आणि ४.५ फूट रुंद अशी भव्य पाषाण मूर्ती आहे. वर लक्ष्मी विष्णू असलेली महिरप आणि खाली हा मल्लमर्दन अशी ती मूर्ती आहे. नुकताच या मूर्तीवर वज्र्यलेप केला गेला आहे. दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला येथे २ दिवसाचा कार्तिकोत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो.
देवपाट मध्ये मुख्य गावकीचे रत्नेश्वराचे प्राचीन देऊळ आहे. रत्नेश्वर च्या देवळात रत्नेश्वर सोडून सोमेश्वर, केदार, वर्धन, वाघजाई, नवलाई, मानाई इत्यादी ग्रामदेवतांच्या मुर्ती आहेत. ग्रामदेवतेचे पुजारी गुरव आहेत. परंपरेने गावात दोन पालख्या आणि दोन होळया असतात. गावकीच्या देवळात पूर्वीपासून पूर्वसत्ता आणि राजसत्ता असे काम करण्याचे मान असतात. १३ व्या शतकात हा सर्व कोकण प्रांत विजयनगर साम्राज्याचा भाग होता. त्या काळात राजाचे प्रतिनिधी म्हणून काही ब्राह्मण मंडळी या गावात खोत म्हणून महसूलवसुली च्या उदेशाने येथे स्थायिक झाली. या देवळात राजसत्ता म्हणून त्यांना सुद्धा मान असायचा परंतु कूळ कायद्यांमध्ये खोतकि गेल्याने आता नवीन पिढी तो मान मनापासून राखायला तयार नाही. चौसोपी विभागात श्री भगवती देवीचे खाजगी देऊळ आहे. येथे नवरात्रात मोठ्या प्रमाणात पूजा विधी होतात. असे म्हणतात की जावळीच्या चंद्रराव मोरे यांचे ब्राह्मण कारभारी मोऱ्यांची देवी सांभाळायला घेऊन वीर येथे आले ती ही देवी. काही काळ मोऱ्यांच्या वंशजाने सुद्धा येथे वास्तव्य केले होते अशी आख्यायिका आहे. पण याबद्दल कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.
खाली गावाच्या दुसऱ्या टोकाला वीर बंदर येथे कापशी नदी जयगड खाडीला मिळण्यासाठी आमच्या गावकडूनच जाते तिचे पाणी पावसाळ्यात आणि काही काळ हिवाळ्यात गोड असते एरवी खारट असते. कधी बंदरावर गेलो तर घरातील आणि आजूबाजूच्या चार कच्चा बच्चाना बरोबर घेऊन जाताना घरून भेळ घेऊन जातो आणि आमच्या जितू भोईला सांगून खाडीचा एक फेरफटका त्याच्या होडीतून फिरवून आणतो. ती जी भेळेची मजा वीर बंदरात आहे ती अगदी चौपाटीवर खाल्लेल्या भेळेत सुद्धा वाटत नाही.
कोकणातील भुते, खेते आणि अंधश्रद्धा:
कोकणात मालक, भुते, मांत्रिक आणि गुरव ह्या गोष्टी अजूनही फार चालतात. त्यापायी अनेक लोक आर्थिक दृष्ट्या धुपले आहेत पण सुधारणा नाही. आमच्या विभागात वायंगं भूत फार प्रसिद्ध आहे. अनेक लोकांची समजूत आहे की हे वायंगं भूत म्हणजे अल्लाउद्दीन जादूचा दिवा आहे. त्या वायंगं भुताला खुश ठेवा आणि आपल्याला वाटेल ते चांगले वाईट काम त्याच्याकडून करवून घ्या असा एक समज आहे. गावातील काही मंडळी अजूनही अशा प्रकारच्या विचाराने मागासलेलीच आहेत. जरा माणूस जास्त आजारी झाला की पहिले मांत्रिक आणि नंतर डॉक्टर ही ह्यांची परिस्थिती. तुम्ही कितीही समजवा ते वागायचे तसेच वागणार. वर्षाची कमाई 8 दिवसात मांत्रिकाच्या बोडक्यावर घालून परत लोकांकडे कर्ज मागायला मोकळे. त्यासाठी परत वाडीवाडीचे फंड, भिश्या जास्त व्याजाने पैसे ध्यायला तयार आहेत. यामध्ये बिना कागदपत्रे पटकन निधी मिळतो आणि जिथपर्यंत परतफेड पूर्ण होत नाही तेथपर्यंत चक्रवाढ चालूच. त्यामुळे कोकणी माणसाने कितीही कमावले तरी त्याची प्रगती होताना दिसत नाही. भावकी मात्र कायम उपयोगी असते पण या बाबतीत कोण कोणाला समजवायला जात नाही.
गावाची प्रगती:
गाव जरी एकच असला तरी त्याचे महसूल दृष्ट्या देवपाट आणि वीर असे दोन विभाग आहेत. गावात एकंदर १६ वाड्या आहेत. दहावी पर्यंत एक इंग्रजी हायस्कुल आणि जिल्हा परिषदेच्या ३ मुख्य शाळा ७ वि पर्यंत शिक्षण देत आहेत. शिवाय वाडीवाडीत बालवाड्या सुद्धा आहेत. शिक्षणाच्या दृष्टीने हे गाव फार पूर्वी पासून पुढारलेले असून आमच्या गावातील पहिल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला कमीतकमी १४० वर्ष होऊन गेली आहेत. मी अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रातील पहिल्या मराठी इंग्रजी डिक्शनरी चे प्रवर्तक लेखक कै. कृष्णाजी भास्कर वीरकर हे याच गावातील विद्यार्थी ज्यांनी पुढे पुणे येथे आदर्श शिक्षण मंडळी ही संस्था स्थापन करून पुण्यात ६ शाळा आणि एक शिक्षक ट्रेनिंग कॉलेज काढले. १९६८ साली गावातून पहिला राज्य शासनाचा रस्ता वाहतुकीला खुला झाला आणि चिपळूण वीर अशी राज्य परिवहन मंडळाची बस सुरू झाली. गावात छोटे वाचनालय सुद्धा आहे पण अजून त्याची म्हणावी तेव्हडी गोडी मुलांना लागलेली नाही.
सध्य स्थिती:
आता आम्ही जातो ते एका वेगळ्याच वीर मध्ये. आता आमचे कौलारू घर जाऊन आम्ही कुटुंबीयांनी एक स्लॅबचे नवीन घर बांधले आहे. आमच्या ब्राह्मण आळीत आता मोजकीच घरे उघडी आहेत. बाकीची घरे एकतर बंद असतात किंवा मोडकळीस आलेली आहेत. गावात पाणी, रस्ता, वीज, गॅस कनेक्शन या सुविधा आहेत, एवढेच काय घरात जीओ चा मोबाईल सुद्धा लागतो. दिवसातून 2 वेळा जायला आणि 2 वेळा यायला चिपळूण पर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत. पाण्याचे पाट जाऊन धबधब्यावर छोटी धरणे बांधून नळाने पाणी सर्व वाडी वस्तीवर घराघरात फिरवले गेले आहे. सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत. गावात इतर समाजाची केम्बळारू घरे जाऊन आता फाडीची पक्की आणि वर पत्रे अशी टुमदार ऐसपैस घरे आहेत. त्यांच्याकडे सुद्धा काही घरांमध्ये एक दोन म्हातारा म्हातारी रहातात बाकी सर्व तरुण मंडळी पुण्या मुंबईत कामाला जातात. पूर्वी आमच्याकडे प्लम्बर आणि रंगकाम करणारी खूप लोक होती पण आता नवीन मुले त्या लाईनमध्ये जात नाहीत. थोडीफार मुले १० वि च्या पुढे शिकली आहेत पण बाकी जे मिळेल ते काम करून शहरात पोट भरत आहेत. आर्थिक सुधारणा थोडी फार आहे. गावात हमखास रोजगार नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. जिथपर्यंत स्थानिक रोजगार संधी उपलब्ध होत नाहीत तेथपर्यंत हे असेच चालू रहाणार असे दिसते. खरे म्हणजे फूड प्रोसेसिंग आणि ऍग्रीकल्चर प्रोसेसिंग किंवा लघु उद्योगासाठी खूप मोठा वाव आहे पण त्यासाठी लागणारे नेतृत्व नाही आणि आहे ते पक्षीय आणि जातीय राजकारणात आनंद मानत हात चोळत बसले आहेत.
शेतीची सध्य स्थिती:
शेतमजूर परवडत नाहीत आणि शेतीला घरची माणसे नसल्यामुळे शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात सरकारी स्वस्त धान्य मिळते म्हणून कोणी शेती करण्यात रस घेत नाही. आंबा आणि काजू लागवड खूप झाली आहे पण आंब्याच्या बे भरवशी उत्पन्नामुळे खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. जुन्या मोठ्या आंब्याच्या झाडावर चढायला गडी मिळत नाही. नारळाच्या आणि पोफळीच्या झाडावर चढणारे तयार गडी मिळत नाहीत त्यामुळे बागायतदार अडचणीत आहेत. मिळतात त्यांची जास्त रोजाची मागणी जास्त असते. त्यात डोंगरळविभाग असल्यामुळे मोठमोठे वांनर, लाल तोंडाची माकडे आणि लहान केलटी यांची खूप पैदास आहे ते खूप हैदोस घालतात. कितीही पाळत ठेवा, तुमच्या चुलीवरील भाकरी कधी पळवून नेतील ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. दरातील भाजीपालाच काय पण फुलझाडांचा पाला सुद्धा ओरबाडून खातात. तयार होत आलेल्या भाताच्या लोम्ब्या सुद्धा खातात, नाहीतर डुकरे येऊन खातात.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या बाबतीत सरकारी दरबारी तक्रारी होऊन सुद्धा काही उपाययोजना होताना दिसत नाहीत. आपले गाव म्हणून एका बाजूला प्रगती झाल्यासारखे वाटते पण गावात माणसे कमी झाली आणि तरुण मंडळी कमी झाल्याने हे पुढे कसे चालणार हा प्रश्न पडतो. गाव म्हातारे होऊ लागले आहे असे वाटते.
परतीचा प्रवास:
पूर्वी गावातून मुंबईला निघताना परतीच्या वाटेवर जाताना अनेक घरांमध्ये हाक मारून निरोप घेवुन यावे लागत असे. आबालवृद्ध मंडळींचे आणि आमचे सुद्धा डोळे पाणावलेले असायचे. कारण त्याकाळी पत्राशिवाय सम्पर्क साधन नसायचे. यावर्षी ते त्यावर्षी भेट व्हायची. त्यामुळे खूप दूर गेल्यासारखे वाटायचे. आम्हाला आमच्या काकूचे फार वाईट वाटायचे कारण ती बिच्चारी वर्षभर गावात एकटी रहायची. पण आमच्या मुंबईच्या गिरगावातील छोट्याश्या खोलीत तिला करमत नसे. तिने तिच्या दुधपाण्यासाठी एक म्हैस आणि रेडकू बाळगले होते. बाल विधवा असल्यामुळे बिचारीला असे जीवन जगणे क्रमप्राप्त होते. माझे वडील सर्व आर्थिक मदत करीत असत पण एकटेपणाला काय उपाय? त्यामुळे हे 2 महिने तिचे चांगले जात असत. ती आम्हाला परतीला सोडायला यायची त्यावेळी खूप रडायची पण मग दर महिन्याला एक पत्र पाठवू या अश्वासनाने सांगता व्हायची. बाकीच्या घरातील माणसे सुद्धा त्या वेगळ्या सोहोळ्यात सामील व्हायची. आता काकू नाही ती १९७० साली निर्वतली.
आता लोक गाडी घेऊन जातात, गाडी घेऊन येतात कोणाला कळत सुद्धा नाही. जो तो आपापले बघतो. मी मात्र आमच्या शेजाऱ्यांना आमच्या घरावर लक्ष ठेवा असे सांगून येतो.
असो असे हे स्वर्ग सुख आम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार? हॉटेलात गेलो की दिवसाचा चार्ज लागू. त्यावेळी नेहमी आठवण येते ती "राजास ज्या महाली, सौख्ये जरी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या" ह्या कवितेची.
वडिलांनी सांगून ठेवले आहे, आपण एव्हडी जागा दुसरीकडे विकत घ्यायला गेलो तर ती आपल्याला परवडणार नाही आणि परवडली तरी ती आपल्याला परकीच वाटणार कारण या गावात आपले वर्षानुवर्षे ऋणानुबंध आहेत. त्यापेक्षा आहे ती वाडवडिलांची इस्टेट सांभाळून ठेवा. त्यातच तुम्हाला सुख आहे आणि पूर्वजांचे आशिर्वाद. ते करण्यात अजून तरी कंटाळा आलेला नाही. असे हे आमचे वीर गाव. कधी संधी मिळाली तर वेळातवेळ काढून कार्तिकी उत्सवाला जरूर या म्हणजे तुमची सर्व सोय होऊ शकते.
माधव भोळे
व्हाट्सप 9819479791
ईमेल : madhavbhole99@gmail.com
Thursday, December 22, 2022
एक अजात शत्रू व्यक्तिमत्व - सौ. वनमला मुकादम
सौ वनमाला मुकादम ही व्यक्ती माहित नाही असा देवरूखे विरळाच. दादर येथे राहणाऱ्या हरहुन्नरी महिला म्हंटले की लोक लगेच विचारतात, वनमाला ताई का? त्याचे कारण एकच, सगळ्यांमध्ये मिसळणे, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणे, एखाद्या गटाचे नेतृत्व करणे, सर्वांना आपल्या विचारांनी आणि कार्याने बांधून ठेवणे, एखाद्याला निर्भिडपणे जाऊन भेटणे आणि त्याला देवरूखे समाजाच्या कामासाठी उद्युक्त करणे असे अनेक चांगले गुण त्यांचेकडे आहेत.
देवरूखे ब्राह्मण विद्यार्थी सहायक संस्थेच्या शतक महोत्सवात त्यांचे अमूल्य योगदान होते. तेथूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरवात झाली. देवरूखे संघ दादरचे अनेक दिमाखदार कार्यक्रम त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केले आहेत.
त्यांच्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा कस लागला तो देवरूखे महिला मेळाव्यात. २००८ साली ठाण्याच्या सौ. अनुराधा जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झालेल्या महिला मेळाव्याची धुरा ज्यावेळी वनमला ताईंनी खांद्यावर घेतली त्यानंतर त्यांनी भलेमोठे महिला मेळावे ठाणे, पुणे, शिरगाव ( उंबर गाव), डोंबिवली येथे आयोजित केले. एक हजार पेक्षा जास्त महिला एकत्र येवून, एक विचाराने, कोणतेही वाद न होता, महिलांच्या उत्कर्षासाठी काम करतात आणि एक चांगला मेळावा सादर करतात हे नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानासपद आहे. असे एक नव्हे तर लागोपाट पाच वर्ष झाले हा नक्कीच योगायोग नव्हे. ह्या सर्वाचे श्रेय त्या अर्थातच आपल्या सर्व २० महिलांच्या टीम ला देतात. त्यांच्यामते कोणतेही कार्य यशस्वी करायचे असेल तर ते चांगल्या सहकार्यांशिवाय होत नाही.
२०१२ साली त्यांच्यातील वरील गुण बघून ज्ञातीतील जुने जाणते नेते कै. रामभाऊ निमकरांनी त्यांना देवरुखे ब्राम्हण अनाथ कौटुंबिक निधीमध्ये काम करण्यास पाचारण केले. तेथपासून त्यांनी कामाचा धडाका लावला. देवरुख्यातील गोरगरिबांची जमेल तेव्हढी मदत करणे हा उद्देश ठेवून, असे लोक शोधून काढून, त्याची योग्य माहिती घेवून विश्वस्त मंडळापुढे सादर करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. या शिवाय पडेल ते काम करायची त्यांची तयारी आहे.
लेख लिहिण्याचा प्रपंच म्हणजे 5 दिवसापूर्वी त्यांनी मला दूरध्वनी केला आणि म्हणाल्या कोकणातील एका खेडेगावातील एका गरजू देवरूखे वृध्द महिलेला व्हील चेयर ची गरज आहे, काही करता येईल का? आमची संस्था ही कामे करू शकत नाही हे त्यांना माहिती आहे पण कोणाला मदत होत असेल तर आम्ही प्रयत्न करत असतो. मी दोन चार नावे सुचवली पण त्यातून काही फार प्रगती झाली नाही. मग अचानक त्यांना त्यांच्या ओळखीचा संपर्क आठवला, आणि त्यांनी त्याला फोनवर गाठले, आणि काय आश्चर्य, देवाची कृपाच म्हणा, 3 दिवसात ती व्हील चेअर, विनामूल्य, त्या महीलेपर्यंत तिच्या खेडेगावात पोच झाली. अर्थात त्यामध्ये अनेकांचे मदतीचे हात असतातच. मुख्य म्हणजे योजलेले काम पार पडले याचे आम्हाला समाधान झाले.
.
पूर्वी कधीतरी मी प्रसिध्दी परांगमुख शब्द वाचला होता, पण त्याचा खरा अर्थ मला आज उमगला. काल सहजच बोलता बोलता त्यांना विचारले की आपली साठी झाली का? तर त्या म्हणाल्या 2021 साली. मला आश्चर्य वाटले की आम्ही एकत्र काम करून सुध्दा आम्हाला याची खबरबात नाही? असो, त्यांच्या सद्गुणांची दखल घेतली जावी तसेच त्यांचे कार्य वाचून आणखी काही लोक प्रेरित होतील असे वाटून हा लेख लिहिला आहे. चांगल्याला चांगले म्हणायला काय हरकत आहे?
माधव भोळे
( व्यक्तिगत लेख ).
Subscribe to:
Posts (Atom)