Thursday, March 9, 2023
कै. नारायणराव वीरकर
06.02.23
इवलेसे रोप लावियले द्वारी (२)
काल देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवलीच्या कार्यक्रमाला डोंबिवली येथे गेलो होतो. तेथे श्री. वैभव रमाकांत निमकर यांचे सहायाने डोंबिवली पूर्व येथील "रोटरी क्लब मुक, कर्णबधीर" शाळेतील मुलांनी काही नाट्यछटा सादर केल्या. मुले म्हणजे देवाघरची फुले. अतिशय निरागस अशा ह्या दिव्यांग मुलांनी अतिशय सुंदर साजरीकरण केले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला भरून आले. त्यानंतर मी वैभव निमकरांद्वारे खालील माहिती त्यावेळी सभागृहात सांगितली. "रोटरी क्लब डोंबिवली पूर्वचे एक सदस्य आणि देवरूखे ब्राम्हण संघ डोंबिवलीचे पूर्व अध्यक्ष कै. नारायणराव वीरकर यांच्या पुढाकाराने, रोटरी क्लबच्या अधिपत्याखाली ही शाळा स्थापन झाली. त्यांची मुलगी कै. ज्योती वीरकर ही त्या शाळेतील पहिली कारकून होती आणि तिने अतिशय खटपट करून ह्या शाळेला मान्यता आणि सरकारी अनुदान मिळवून दिले.".
कोण होते हे नारायणराव? त्यांनी काय केले डोंबिवली आणि देवरुख्यांसाठी? नारायणराव माझी सख्खी मोठी आत्या मुक्ताबाई हिचे चिरंजीव. लहानपणी जन्मतःच त्यांचे मातृछत्र हरपले. लहानपणापासूनच ते आमच्या घरी वीर येथे आणि पुढे मुंबईत, आमच्याच घरी गिरगावात लहानाचे मोठे झाले, अगदी आमच्या भावंडापैकी एक असे. नारायणराव हुशार होते त्यामुळे आमच्या वडिलांचा त्यांचेवर जास्त लोभ. प्राथमिक शिक्षण आर्यन शाळेत झाल्यानंतर त्यांनी पुढे बि.एसी. पर्यंत शिक्षण घेतले. माझ्या वडिलांची परिस्थिती मध्यम असून सुध्दा वडिलांनी सर्व भार उचलला. विद्यार्थी सहायक संस्थेने सुध्दा मदत केली. त्यावेळी वीज अत्यंत महाग आणि दुर्मिळ होती. आमची आई सांगायची नारायण, चंद्रकांत वीरकर, विष्णुपंत वीरकर, अनंतराव वीरकर हे सर्व गायवाडीत म्युनिसिपल दिव्याखाली बसून अभ्यास करायचे.
त्यावेळी लोक मेट्रिक होताना मारामार तरी हे बी.एससी. पर्यंत शिकले आणि आसाम येथे कोणत्यातरी सरकारी खात्यात ऑफिसर म्हणून नोकरीला लागले. लवकरच ते पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यांच्या नार्डुवेकर वीरकर कुटुंबात सर्वच व्यवसायिक, त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा होती.
त्यावेळी डोंबिवली एक गाव होते आणि ते मूळ मुंबई शहरापासून अतिशय दूर समजले जायचे. अतिशय दुर्मिळ वस्ती होती. आता जेथे टिळकनगर पोस्ट ऑफिस आणि सुयोग मंगल कार्यालय आहे तेथे बद्री भैयाचा तबेला आणि उघडी खडकाळ जमीन होती. तेथून स्टेशन दिसत असे. नारायणराव दूरदर्शी होते. त्यावेळी त्यांनी ४ आणे वाराने जवळजवळ अख्खे टिळकनगर ची जमीन विकत घेतली होती. आपला गिरगावातील इंजिनियर मित्र कानेटकर याचे सहायाने त्यांनी डोंबिवलीमध्ये बांधकाम कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यावेळी 10, 15 हजारात बंगला बांधून व्हायचा पण तेव्हडा सुध्दा पैसा लोकांकडे नव्हता. लोक घर बांधून घेत पण पैसे देताना टाळाटाळ करीत. काही दिवसांनी कानेटकर, भागीदार म्हणून नारायणरावांवर उधारी आणि कर्ज ठेवून बाजूला झाला. नारायणरावांवर कर्ज झाल्यामुळे त्यांना राहत्या घराच्या प्रॉपर्टी जप्तीची नोटीस आली. पून्हा नारायणराव मामाकडे ( माझे वडील गणपतराव ) आले. त्यावेळी गणपतराव सन्मित्र सहकारी बँकेमध्ये डायरेक्टर होते. सर्व डायरेक्टर नारायणरावांना ओळखत होते. त्याकाळी बायकोचे सर्व दागिने गहाण ठेवून सन्मित्र बँकेने 20,000 रुपयाचे कर्ज दिले. असे दोन वेळा नारायणराव अडकले असताना सन्मित्र बँकेने त्यांना मदत केली. अर्थात त्यांनी वेळेवर परतफेड करून आपला आर्थिक रेकॉर्ड चांगला ठेवल्यामुळे हे शक्य झाले. असे करता करता वयाची 45 झाली तरी आर्थिक स्थिरता येत नव्हती. जो मिळेल तो व्यवसाय, अगदी हातगाडीने पाणी विक्री सुध्दा ( त्याकाळी डोंबिवलीमध्ये पाणी दुर्भिक्ष होते) संसार केला. त्यांचे सुरवातीचे सर्व आयुष्य अतिशय खडतर गेले.
शेवटी 48 व्या वर्षी त्यांनी एम. एच. हायस्कूल ठाणे येथे गणित आणि सायन्सचे हंगामी शिक्षक म्हणुनी नोकरी पत्करली. पुढे 50 व्या वर्षी बी.टी. ( बाचेलर ऑफ ट्रेनिंग ) केले आणि नोकरी कायम झाली. पार्ट टाईम व्यवसाय सुरूच होता. सकाळी 7 ते दुपारी 1 शाळा. दुपारी 3 ते 8 व्यवसाय.
निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले सर्व आयुष्य समाज सेवेत घालवले. रोटरी क्लबचे सदस्य झाल्यामुळे रोटरी आणि त्यांच्या सदस्यांची बांधकामे नारायणरावानाच मिळायची. त्यावेळी रोटरी क्लब डोंबिवलीने काहीतरी स्थाई प्रोजेक्ट करावा असे ठरवले. त्यावेळी फार्माटॅक्स चे कर्वे, राव हॉस्पिटलचे डॉ. राव इत्यादीनी ही जबाबदारी नारायणराव यांचेकडे सोपवली. नारायणराव हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपल्या ह्या डोंबिवलीमध्ये मुक, कर्णबधीर मुलांसाठी शाळा नाही तेव्हा आपण ती काढुया असे सुचवले. त्यामुळे आपोआप ती सर्व जबाबदारी रोटरीने त्यांचेवर टाकली. निधी संकलनासाठी अनुप जलोटा चा भव्य कार्यक्रम अखला गेला. बांधकाम सुरू झाले त्यावर मी पाणी मारायला सुध्दा गेलो आहे म्हणून मला हे सर्व माहिती आहे. अखेर शाळा उभी राहिली. शाळेला मान्यता मिळवून तिला अनुदान मिळवण्याची सर्व कामे त्यांची मुलगी ज्योती ताईने केली. आता ती सुध्दा हयात नाही. स्टाफ आला, विद्यार्थी आले. पहिल्या मुख्याध्यापिका सौ. सबनीस होत्या. आज ह्या शाळेचे महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यात खूप नाव आहे. ह्या शाळेने अनेक स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. एका व्रतस्थासारखे नारायणराव दररोज सकाळी 9 ते 10 शाळेत जायचे, असे त्यांनी जवळजवळ 22 वर्ष केले. काल त्या शाळेतील मुक, बधीर मुलांचे कार्यक्रम बघून सर्व आठवले ते मी फक्त शब्दांकन केले एव्हढेच.
हे सर्व करत असताना ते आपल्या जन्मगाव आजोळ, वीरला विसरले नाहीत. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेला 1986 चे सुमारास 100 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी वीर ग्राम विकास मंडळ स्थापन करून शाळेचा भव्य शतक महोत्सव साजरा केला. त्यावेळचे महाराष्ट्राचे मंत्री, डोंबिवलीकर तसेच त्यावेळचे अभिनव सहकारी बँक, डोंबिवलीचे अध्यक्ष, ना. नकुल पाटील यांनी वीर येथील समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. वीर येथे गाडीचा चांगला रस्ता नव्हता म्हणून कर्जुवे येथून होडीने मंत्र्यांना वीर बंदर पर्यंत प्रवास केला पुढे वीर बंदर ते जि. प. शाळा क्रमांक 1 पर्यंत डोलीने आणले. एव्हडी पूर्वीच्या लोकांची जिद्द आणि आपल्या गावाबद्दल ओढ असायची.
श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ, वीर ह्या संस्थेचे ते अनेक वर्ष अध्यक्ष तसेच पदाधिकारी होते आणि संस्थेचा सुवर्ण महोत्सव त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. देवरूखे ब्राह्मण संघ डोंबिवलीचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांचे मित्र डॉ. दे. ग. मुळे भाजपचे आणि नारायणराव काँग्रेसचे असेल तरी समाजकार्यात त्यांनी कधीही राजकारण आणले नाही.
ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते तरी त्यांच्या माझ्यात एक छान केमिस्ट्री होते. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारत होतो. एखाद्याचे कर्तुत्व आणि नेतृत्व बघून त्यांना खूप आनंद व्हायचा.
त्यांनी काही काळ अभिनव सहकारी बँक डोंबीवली मध्ये सुध्धा डायरेक्टर म्हणून काम केले आहे. सन्मित्र बँक भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी मी, नारायणराव आणि आमचे सहकारी ह्यानी अनेक प्रयत्न केले त्यावर कधीतरी वेगळे लिहीन. दूरदैवाने आपण ती वाचवू शकलो नाही. माझे वडील त्या बँकेत 12 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर होते म्हणून मला विशेष स्वारस्य होते पण आपलेच दात आणि आपलेच ओठ. काय बोलणार. ते एक धडाडीचे सामाजिक कार्य करते होते.
माझा त्यांना नम्रतापूर्वक नमस्कार.
माधव भोळे.
Monday, March 6, 2023
तारुण्याची ऐसी तैसी !!
तारुण्याची ऐसी तैसी !!
काल एक मित्राचा तरुण मुलगा भेटला होता. इकडतिकडच्या गप्पा झाल्यावर मी सहज त्याला विचारले की विवाह कर्तव्य आहे का? तो म्हणाला अर्थातच!. मी त्याची सर्व माहिती घेतली. तो एम. बी. ए. शिकलेला असून एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर आहे. वय सुध्दा फार नाही. मी त्याला विचारले का रे अजून का जमत नाही?
तो सांगायला लागला. "काका, बऱ्याच मुली बघितल्या पण आपण अपेक्षा करतो तशी मिळत नाही". मी विचारले "म्हणजे काय?".
म्हणाला एक मुलगी ओळखीतूनच आली होती. ( तिच्या मते अप्पर मिडल क्लास!) म्हणाली "कांदे पोहे" नकोत, आपण बाहेर कोठेतरी भेटूया. मी म्हंटले ठीक आहे. तिने मला एका उचभ्रू मॉलमध्ये भेटायला बोलावले. सुरवातीची ओळखदेख झाल्यानंतर म्हणाली आपण मॉलच्या गेमिंग सेक्शन मध्ये जाऊ. तेथे गेल्यावर ती तेथे खेळतच बसली. वर त्या 2/3 हजाराची फोडणी मला बसली. एक तासानंतर म्हणाली तिला कोठेतरी अर्जंट जायचे आहे. आपण पुढल्या रविवारी भेटू. त्या मुळे जास्त बोलणे झालेच नाही. खरे म्हणजे मला असेल खर्च परवडण्यासारखे नाहीत. मला माझी स्वत:ची जागा घ्यायची आहे त्यामुळे मला काटकसरीने राहायला हवे.
पुढल्या रविवारी त्याच मॉल मध्ये त्याच मुलीला परत भेटल्यानंतर म्हणाली आपण एका बार मध्ये जाऊ म्हणजे तेथे शांतपणे बोलता येईल. तेथे जाऊन तिने चक्क दोन बियर ऑर्डर केल्या. तिला मी सांगितले मी बियर किंवा कोणतेही उत्तेजक पेयं पित नाही. तर म्हणाली मी प्यायले तर तुझी काही हरकत? नवीनच ओळख होत असल्यामुळे मी गप्पच राहिलो. ती म्हणाली मला बरेच मित्र मैत्रिणी आहेत. आमच्या अधून मधून पार्ट्या होत असतात. तू पण त्यात सामील होऊ शकतोस. तुझी ईच्छा नसेल तर नको होऊस पण मी जाणारच. शेवटी आणखी एक दोन भेटी नंतर तो एपिसोड मी कसाबसा संपवून टाकला.
त्या नंतर आणखी एक मुलगी भेटली होती. पहिली भेटच मुळी बारमध्ये. तिच्याच आग्रहाने!. तेथे तिने व्होडका मागवली. मी आपला ऑरेंज ज्यूस. शेवटी तिने सांगितले, माझ्या कामामुळे मला अशा पार्ट्या अटेंड करणे भाग पडते. तसेच माझे मित्र मैत्रिणी सुध्धा अशाच प्रकारचे आहेत. समजा मी पार्टीला जाऊन रात्री उशिरा आले तर तुझे काय म्हणणे असेल?. मी म्हणालो हाच प्रश्न मी तुला केला तर तुझी काही हरकत? त्यावर ती गप्प बसली. मला म्हणाला असे एक एक विचित्र अनुभव येतात. काय निर्णय घेणार?
म्हणाला दीपिका पदुकोण पठाण सिनेमात डान्स करताना सर्वांना बरी वाटते, पण विवाहाच्या पत्नीकडून आपण अशी अपेक्षा करू शकत नाही. जर पत्नी रात्री झोकून देवून घरी आली आणि आपल्या होणाऱ्या मुलांनी ते बघितले तर आपण त्यांना काय स्पष्टीकरण देणार? आणि काय संस्कार देणार? लग्न म्हणजे नुसती मौजमजा नसून एक जबाबदारी सुध्दा आहे.
अर्थात ही गोष्ट नुसती तरुणींच्याच बाबतीतच आहे असे नाही तर तरुण सुध्दा अशा प्रकारचे आढळतात. आपल्याकडे असलेल्या वेळेचा, पैशाचा आणि शरीराचा अपव्यय दुसरे काय? देवाने दिलेल्या जगातील सर्वात उत्तम मशीन असलेल्या शरीराचे नुकसान जेव्हा सिगरेट, दारू, केमिकलयुक्त गुटक्याने स्वतःच्या हाताने केले जाते त्याला देव तरी कसा काय मदत करणार?
पबमध्ये किंवा डिस्को मध्ये जाणे, नशापाणी करणे हा आजकाल एक स्टेटस सिम्बॉल बनत चालला आहे. जेवणखाण घरी करण्याचा कल कमी होत चालला आहे. आम्ही जेथे राहतो तेथे आमच्यापाठी मोठमोठाली कॉल सेंटर, बिपिओ आहेत त्यात हजारो तरुण तरुणी वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करतात. त्यात कित्येक तरुणी बाहेर पडल्या की मस्तपैकी एक सिगारेट पाकीट पँट मधून काढतात आणि सिगारेट शिलगवतात. त्यांचे फ्रेंड सुध्दा त्यांचे बरोबर ती सिगारेट शेयर करत असतात. त्या सर्व प्रकारांबध्दल येथे वर्णन न केलेलेच बरे. यात परराज्यातील तरुण तरुणीनबरोबर आपल्या येथील तरुण तरुणी सुधा असतात. कारण कळपाची मानसिकता.
ह्या गोष्टी कधीतरीच केल्या तर कोणाला वावगे वाटणार नाही पण ती सवय झाली तर? हळू हळू ओकेजनलीचे रुपांतर रेग्युलरली मध्ये कधी होते ते समजत सुधा नाही.
हे बघितल्यावर असे वाटते की ज्या महर्षी धोंडो केशव कर्वे, न्या. महादेव गोविंद रानडे, पंडिता रमाबाई रानडे सारख्या धुरिणांनी महिला सशक्तीकरण किंवा गांधीजींनी, गाडगे बाबांनी आणि इतर धुरिणांनी दारूबंदी, व्यसनमुक्ती सारख्या मोहिमा राबवल्या त्यात काही चूक झाली का? नक्कीच नाही. सर्वांनी प्रगतिशील आणि पुरोगामी विचाराचे असणे नक्कीच स्वागतार्ह आहे.
पण नक्की प्रगती म्हणजे काय आणि पुरोगामी म्हणजे काय?
आपल्या आयुष्यात असलेल्या उणीवा भरून जावून सुखाने जगण्याचा मार्ग निर्माण झाला म्हणजे प्रगती झाली असे म्हणायला हरकत नाही. प्रगती म्हणजे माझ्याकडे किती बंगले, गाड्या, जमीन जुमला, सोने नाणे आले म्हणजे प्रगती झाली असे नसून मी कोणत्या विचारांचे धन घेवून जगत आहे. माझ्या वागण्यामुळे कोणी दुःखी होतो का? माझ्याबरोबर मी किती लोकांना सोबत नेत आहे जे माझे विचार मानत आहेत? जर या सर्वातून आपल्याला समाधान मिळत असेल तर ती प्रगती म्हणायला हरकत नाही. ती करण्यासाठी आपण आपले विचार संकुचित न ठेवता लिंगभेद, जातीभेद किंवा धर्मभेद इत्यादी न मानता, कर्तुत्वाला महत्व देणारे असाल तर त्याला पुरोगामी म्हणता येईल.
आज जी तरुण मंडळी या कुमार्गाला जात आहेत त्यांना त्यातून मिळत असलेले फायदे, यश आणि आनंद हे तात्कालिक आहे.
इतके दिवस आपण आदिवासी किंवा अडाणी स्त्री पुरुषांमध्ये असलेली व्यसनाधीनता बघून त्यांना कमी लेखत होतो पण आज सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित मंडळी जेव्हा फॉरेन लिकर, सिगारेट, तंबाखू, गांजा, किंवा इतर पार्टी ड्रग्जचे सेवन करताना दिसतात त्यावेळी खरोखरच प्रश्न विचारावासा वाटतो की आपण सुशिक्षित असूही पण सुसंस्कृत कधी होणार?
दिवसेंदिवस दारूचा आणि सिगारेटचा खप वाढतच आहे. परकीय लोक देशातून हद्दपार झाले पण त्यांनी ठेवलेल्या वाईट सवयी कधी हद्दपार होणार? आपण पश्चात्यांचे चांगले गुण घेतले नाही पण वाईट गुण पटकन आत्मसात केले. दुर्गंधी पटकन पसरते पण सुगंध पसरायला वेळ लागतो कारण तो मंद दरवळत असतो. अनुकरण कशाचे करावे हे समजण्याची सुधा अक्कल लागते. पाश्चात्यांची अभ्यासू वृत्ती, त्यांचा वक्तशीरपणा, शिस्तशीरपणा, कोणत्याही गोष्टींची नोंद करून ठेवायची सवय, त्यांना असलेला त्यांच्या संस्कृतीचा आणि देशाचा अभिमान, त्यांची जबाबदारी घेण्याची आणि जोखीम घेण्याची हिंमत, नवनवीन शोध आणि सुधारणा करण्याची त्यांची धडपड, जगाच्या पाठीवर कोठेही जायची आणि रहाण्याची तयारी, चिवटपणा, एक नाही अनेक गुण आहेत जे आपण अवगत करू शकलो असतो, पण त्यांचे अवगुण आपण पटकन आत्मसात केले आहेत. त्यांनी लावलेले शोध किंवा सुधारणा ह्यांनी त्यांनाच काय पण संपूर्ण जगाला समृध्द केले आहे पण हे आपण कधीच समजून घेतले नाही. आपल्याला साहेबाला खुश करून, झोल झपाटा करून, जुगाड करून झटपट यश हवे आहे आणि त्यासाठी हा एक मार्ग आपल्या पैकी काही मंडळी निवडतात.
निदान चांगले काय आणि वाईट काय एव्हढे समजण्याची निरक्षिर विवेक बुद्धी आपल्याकडे असण्याची आवश्यकता आहे हे ज्यावेळी कळेल त्यावेळी आपण प्रगतीची पहिली पायरी चढायला सुरवात केली असे म्हणायला हरकत नाही.
अर्थात लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र जरूर आहे. पण स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे. या सर्वामध्ये एक अत्यंत पुसट अशी एका रेषा आहे. ती कोठे आहे हे ओळखणे गरजेचे आहे आणि ती ओळखल्यानंतर ती न ओलांडण्यासाठी संयमाची गरज आहे. जो ते समजू शकला तो जग जिंकला.
यशस्वी होण्यासाठी या सर्व व्यसनांची गरज नाही असे मला वाटते. तुमच्या अंगात धम्मक असेल तर तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही!!.
माधव भोळे.
Sunday, January 15, 2023
अमुल मधील वादळ
10.01.2023
अमुल मधील वादळ.
आज एका अनपेक्षित घटनेमध्ये गुजरात को ऑप मिल्क मार्केटिंग फेडरशन ( अमुल ) ह्या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री आर एस सोधी यांना अमुल मधील 40 वर्षाच्या नोकरी नंतर तडकाफडकी कामावरून काढून टाकले. गेले 12 वर्ष ते मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पहात आहे.
1946 साली धवल क्रांतीचे जनक मिल्कमन डॉ. वर्गीस कुरियन ह्यांनी सूरवात केलेल्या "कैरा डिस्ट्रिक्ट को ऑप मिल्क प्रोड्युसर युनियन" ह्या संस्थेचे पुढे महाकाय गुजरात को ऑप मिल्क मार्केटिंग फेडरशन (अमुल ) मध्ये रुपांतर झाले. डॉ कुरियन वर्गीस यांनी निवडलेले श्री आर एस सोधी 1982 साली फक्त रू. 1450 महिना पगारावर रुजू झाले त्यावेळी अमुलचा टर्न ओव्हर फक्त 121 कोटी रुपये होता. ते 2010-11 साली मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवडले गेले त्या वेळी अमुलचा टर्न ओव्हर फक्त 9774 कोटी रुपये होता. तोच 2022-23 ला म्हणजे फक्त 12 वर्षात 72,000 कोटी रुपये एव्हढा आहे.
अमुल मध्ये 1 कोटी साठ लाख गवळी , 28 स्टेट मार्केटिंग फेडरेशन मधील 222 जिल्ह्यातील 1,85, 903 को. ऑप सोसायटी मधून दूध संकलन करतात आणि ती जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक संस्था आहे. त्यांची 2000 प्रकारची विविध उत्पादने असून त्यातील 50 सोधी मॅनेजिंग डायरेक्टर असताना लॉन्च झाली.
सोधि जयपूर च्या अग्रिकलचर कॉलेज चे इंजिनियर आणि इन्स्टिट्युट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आनंद चे पहिल्या ब्याच चे एम बी ए. ही संस्था सुध्दा डॉ. वर्गीस कुरियन यांनी अमुल मार्फत स्थापन केली.
त्यांच्या अचानक काढून टाकण्या मागे नक्की कारण समजले नाही परंतु सोधीं म्हणतात माझी 5 वर्षाची मुदत 2 वर्षापूर्वीच संपली होती आणि मला 2 वर्ष मुदत वाढ दिली होती. पण त्यांच्या सर्व्हिस टर्मीनेशन पत्राचा रोख वेगळाच वाटतो असे जाणकार म्हणतात.
अगदी अशाच प्रकारे ह्याच फेडरेशनने आपले या आधीचे अध्यक्ष आणि अमुलचे एके काळचे सर्वेसर्वा धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचेवर 2006 साली अविश्वास ठराव आणला होता आणि त्यांनी 35 वर्षाच्या सेवेनंतर नाईलाजाने राजीनामा दिला. बरेच वेळा फेडरेशन मधील सत्ता संघर्ष आणि राजकारण असे या मागचे कारण असू शकते.
माधव भोळे.
आदिवासी आणि वनवासी यातील फरक.
आदिवासी आणि वनवासी यातील फरक.
भारतात आदिवासी ह्या विषयाला विशेष महत्व आहे. आदिवासी म्हणजे जे भारतातील मूल निवासी. असे म्हणतात साधारण, 4,000 वर्षापूर्वी भारतात आर्यन संस्कृती आली. लोकमान्य टिळक लिहितात (ओरायन ग्रंथ), "या पूर्वी आर्य उत्तर ध्रुवाजवळ रहात होते. वेदांची उत्पती त्या ठिकाणी झाली. त्यानंतर त्यातील काही टर्की आणि इराक जवळील युफ्रेस्टस नदी किनारी मेसोपोटेमिया येथे राहायला आले तर काही सिंधू नदी जवळ राहायला आले. दोघेही वैदिक संस्कृतीचे पालक. युफ्रेट्स जवळील वेदांना खालवियन वेद असे म्हणतात."
त्यापूर्वी भारतात द्रविडी संस्कृती होती आणि त्या पूर्वी येथे द्रविड पूर्व संस्कृती होती. भारतातील आदिवासी हे ह्या द्रविड पूर्व संस्कृतीचे वंशज आहेत ज्याला आपण tribal किंवा Normadic tribes असे म्हणतो. द्रविडी लोक रावणाला मानतात रामाला मानत नाही. राम आर्य होता तर रावण अनार्य होता. दंडकारण्याच्या दक्षिणेकडील भाग हा बहुतेक द्रविड लोकांनी भरला होता तर उत्तरेकडे आर्य जास्त होते. ( देवरूखे स्वतःला पंचद्रविड ब्राह्मण म्हणून मानतात.). अर्थात द्राविदानी सुध्दा नंतर वेद स्वीकारले.
सर्व आदिवासी वनात किंवा जंगलात रहात नाहीत. त्यामुळे सर्व आदिवासी वनवासी होत नाहीत. उदा. जे आदिवासी वाळवंटात राहतात ते वनवासी होऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व आदिवासी वनवासी होऊ शकत नाहीत. तसेच सर्व वनवासी आदिवासी असतीलच असे नाही.
माधव भोळे
एकच ध्यास! रत्नागिरी जिल्ह्याचा विकास!!
एकच ध्यास! रत्नागिरी जिल्ह्याचा विकास!!
महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतिशील राज्य मानले जाते. त्यात रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे अथांग समुद्र आणि स्वच्छ किनारे, डौलदार वळणाच्या नागमोडी खाड्या, उंचच उंच डोंगर, हिरवीगार वनसंपदा, बारमाही वाहणारे धबधबे, लहान मोठ्या नद्या आणि मुख्य म्हणजे प्रदूषण मुक्त वातावरण. काय नाही ते सांगा इथे? मग एव्हढे करून रत्नागिरी जिल्हा प्रगती पथावर का नाही? आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल हा प्रश्न माझ्याप्रमाणेच सर्वानाच पडलेला असेल!!
आपल्या सुपीक तांबड्या जमिनीवर तयार होणारी फळ आणि फुल संपदा ह्याचा आपण विकास करायला हवा. आंबा, काजू ह्या पारंपरिक पिकांबरोबर काळीमिरी, लवंग, दालचीन सारखे मसाल्याचे पदार्थ, बांबू, करवंद, कोकम ह्या विषयात आपण व्यवसायिक लागवड करायला हवी. बांबूचे कोंब माकडे खातात तर ते फुटल्यानंतर त्याला कडुलिंबाच्या तेलाचा एक हात ब्रशने मारावा आणि पावसाळ्यात वर प्लास्टिक बांधावे म्हणजे वानर, माकडे खाणार नाहीत आणि किडही लागणार नाही. एकदा बांबू 1 ते 1.5 फुटाचे वर गेला की मग तो माकडे खात नाहीत. डोंगर उतारावर आपले पावसाळी पाणी झटकन ओसरून जाते, त्याठिकाणी मोठमोठाली शेततळी बांधून त्यातून किंवा बोअरच्या साहाय्याने ड्रिप इरिगेशन व्यवस्था करून पोफळीच्या बागा वाढवायला हव्यात आणि त्यावर काळी मिरीचे आंतरपीक घ्यायला हवे. त्यामुळे आपले वार्षिक उत्पन्न वाढेल. वानर आणि माकडे काळी मिरी खात नाहीत.
शेडनेट च्या सहायाने सिझनला वेलवर्गीय भाजीपाला, भोपळी मिरची सारखे रोख उत्पन्न घेता येते. सणासुदीच्या सिझन मध्ये झेंडूची फुले चांगली कमाई करून देतात जे अगदी डोंगर उतारावर सुध्दा होते आणि माकडे खात नाहीत. ज्या ठिकाणी इरिगेशन ची व्यवस्था होऊ शकत नाही अशा ओसाड जमिनीमध्ये आयन, किंजळ, भेळा, बांबू अशी जंगली झाडे लावावीत, त्याचे उत्पन्न साधारण 10 वर्षात तयार होते. त्याला पाणी द्यावे लागत नाही. साग 20 वर्षानंतर तयार होतो तो म्हातारपणाचा प्रोवीडांट फंड आहे. आमच्या गावात एकाने 5000 साग लावले आहेत, 10 वर्षात फार उंच आणि मजबूत झाले आहेत. आपल्या कोकणात चंदनाचे सुध्दा झाड होते पण लहान असताना माकडांपासून थोडी निगा राखायला हवी. एकदा मोठे झाले की ती खात नाहीत.
आपल्या जिल्ह्यात असलेल्या शेती मदतनिसांचा आपण उपयोग करून घेत नाही. सरकारी योजना भरपूर आहेत पण आम्ही लाभ घेत नाही. कित्येक जमिनी सामाईक असतात, त्यावर ना हरकत प्रमाण पत्राअभावी काही कामे रखडतात. आमच्या पैकी कित्येकांनी आपल्या जमिनीचे परीक्षण करून आपल्या झाडांना काय खते लागतात, काय मायक्रो न्युट्रियांट्स लागतात याची माहिती घेतलेली नाही. कोणी सांगेल तसे किंवा दुकानदार सांगेल ते खते आणि औषधे वापरतात.
जिथपर्यंत आपण मोठे जमीन तुकडे आणि व्यवसायिक गुंतवणूक करणार नाही तेथपर्यंत त्याच्या आर्थिक गणिताचा ताळमेळ बसणार नाही. त्यासाठी वेळ पडल्यास सामूहिक शेती करता येईल का हा विकल्प पण विचारात घ्यायला हवा. आपण सर्व प्रश्नांना एकच उत्तर, प्रश्न विचारून देत आलो आहोत. "वानर आणि माकडांचा खूप त्रास आहे बंदोबस्त कसा करायचा ते आधी सांगा?". जी फळे आणि झाडे माकडे खात नाहीत त्यावर भर द्यावा. थोडी फार राखण ठेवली तर माकडांचा त्रास कमी होतो.
फूड प्रोसेसिंग ह्या विषयात आपण फार पाठी आहोत. कोकम सरबत, अंबावडी, फणस पोळी, फारफार तर लोणची ह्या पलीकडे आपण अजूनही गेलो नाही. आपली आंबा कॅनिंग कपॅसिटी कमी असून आपला बहुतेक माल गुजरात मध्ये जातो. आपला बहुतेक काजू गोवा आणि केरळ मध्ये प्रोसेसिंगला जातो. आंबा, फणस, काजू, कोकम, आवळा, करवंद, जांभूळ ह्यापासून अनेक पदार्थ तयार होऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे जाम, मोरंबे, चुंदा, बर्फी, सरबते इत्यादी पदार्थ तसेच सर्व प्रकारचे पापड, फेण्या, कुरडया इत्यादी वाळवणाच्या पदार्थाना खूप मागणी आहे. तसेच सर्व प्रकारच्या पिठाना, नाचणी सत्त्व ह्या पदार्थाना शहरात खूप मागणी आहे. त्यासाठी योग्य कमिशनवर लोक घरगुती विक्री करायला तयार आहेत. पण त्याला आधुनिकतेची सुध्दा जोड हवी. महिला बचत गट एकत्र येवून या विषयात महत्वाची कामे करू शकतील. फक्त भारताचे फूड प्रोसेसिंग मार्केट 25 लाख कोटी रुपये आहे.
हापूस हा आंब्याचा राजा समजला जातो. हापूस ची चव जगात उत्कृष्ट आंब्याची चव मानली जाते. भारतात 1500 प्रकारचे आंबे तयार होतात. त्यातील 1000 प्रकारचे आंबे व्यवसायिक उत्पादन देतात. भारतात एकंदर 200 लाख मे. टन आंबा उत्पादन होते पैकी सर्वात जास्त उत्तरप्रदेश मध्ये 40 लाख टन होते तर सर्वात कमी महाराष्ट्रात 5,66,000 मे. टन होते म्हणजे संपूर्ण भारताच्या सुमारे 2.5%. पेप्सी, कोका कोला, पार्ले सारख्या कंपन्यांना त्यांच्या माझा, फ्रूटी, सारख्या आंबा पेयांमध्ये लाखो टन आंब्याची गरज आहे. एकटा कोका कोला माझा पेयासाठी वर्षाला 70,000 मेट्रिक टन आंबा भारतातून विकत घेतो.
आपल्या जिल्ह्यात डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ,दापोली, कॉलेज ऑफ ऍग्रिकलचर, दापोली, कॉलेज ऑफ फोरेस्ट्री दापोली, डेअरी आणि ऍनिमल हजबंड्री शाखा, दापोली आहे. त्याच विद्यापीठाच्या अंतर्गत भाट्ये नारळ संशोधन केंद्र आहे, शिरगाव येथे मत्स्य व्यवसाय आणि मत्स्योत्पादन कॉलेज आहे. सावर्डे येथे गोविंदराव निकम कृषी कॉलेज, दहीवली, चिपळूण येथे शरद पवार कृषी कॉलेज, शरद पवार कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि होरटीकलचर सुध्दा आहे. ह्या सर्व ठिकाणी तयार झालेले विद्यार्थी आपल्याला शेतात काम करताना दिसत नाहीत. ते शहरात नोकरीला जातात. यातील उच्च शिक्षित कधी बँकांच्या अग्रिकलचरल लोन डिपार्टमेंट मध्ये नाहीतर पीक विम्याच्या कंपन्यांत किंवा शेतीविषयक केमिकल विकणाऱ्या कंपन्यांत काम करतात. शहरात 10 x 12 ची भाड्याची खोली असली तरी चालेल पण बाप जाध्यानी 5 एकर जमीन आणि मोठे घर ठेवले असेल ते नको. त्याची दोन कारणे एक म्हणजे रोख पैसा आणि दुसरी म्हणजे विवाह समस्या.
आपण सरकारी योजनांचा लाभ पूर्णपणे घेत नाही. भाऊबंदकी मुळे आपल्या कित्येक जमिनी ओसाड आहेत. ह्यासाठी समाज म्हणून आपण एकत्र यायला हवे. आपल्या खाडी किनारच्या जमिनी सुध्दा ओसाड आहेत. त्यात मत्स्योत्पादन विषयक शेती करायला हवी. आपण खारे आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन सुध्दा करू शकतो. जगाची मत्स्योत्पादन मागणी 228 बिलियन डॉलर ची आहे त्यापैकी भारताचा वाटा फक्त 7.7 बिलियन डॉलर एवढाच आहे. आपण कलचर्ड मोत्याची शेती करू शकतो. त्याला जगात खूप मागणी असून हे उत्पन्न 15 ते 18 महिन्यात तयार होते. तसेच रंगीत ( ऑर्नामेंटल ) माश्यांची पैदास करून ती शहरात किंवा परदेशी विक्रीस पाठवू शकतो. जगात 322 मिलियन डॉलर चा ऑर्नामेंटल फिशचा व्यवसाय आहे त्यात भारत फक्त 3.22 मिलियन डॉलर एक्सपोर्ट करतो तर सिंगापूर सारखा छोटा देश 62 मिलियन डॉलर करत आहे.
अलीकडे आपल्या जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. परंतु आपल्या भागातील रस्ते आणि दळणवळणाची साधने सुधारायला हवी. कोकण रेल्वे च्या फेऱ्या वाढवायला हव्यात तसेच त्यात चिपळूण, रत्नागिरी साठी विशेष डब्याची सोय हवी. एस टी च्या सेवेचा दर्जा सुधारायला हवा. प्रत्येक रेल्वेगाडीला कनेक्टिंग पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय हवी. खात्रीशीर आणि वक्तशीर टुरिस्ट गाड्या आणि टुरिस्ट टॅक्सीची खूप आवश्यकता आहे. भारताच्या इतर भागात ही सोय खूप चांगली आहे पण कोकणात वक्तशीर आणि खात्रीशीर पणाची कमतरता आहे. यातील बऱ्याच गोष्टी ऑनलाईन वर मिळायला हव्यात. त्याचीं योग्य पारदर्शक माहिती इंटरनेटवर / वेबसाईट वर उपलब्ध हवी. तितका प्रोफेशनलपणा अजून आपल्याकडे आला नाही. आपल्याकडे कमीत कमी माहिती देण्याचा कल आहे. त्यामुळे विश्वासार्हता कमी होते.
कोकणातील खाड्यामध्ये केरळ प्रमाणे हाऊस बोट किंवा बोटिंगची सफर करण्याची सोय तेथील तालुका किंवा गाव पातळीवर झाली तर कोकण सारखे नंदनवन जगात कोठे असणार नाही इतके आपले कोकण सुंदर आहे.
फक्त नेत्यांवर अवलंबून विकास होणार नाही. यातील कोणत्याही बाबतीत स्वतः पासून सूरवात करायला हवी दोष देणे बंद करून स्वतः सुधारणा करायला हवी.
ह्या बाबतीत प्रत्येक ग्राम सभेने ह्या वर काही विशेष सभा घेवून गावात रोजगार निर्मिती कशी होईल, पीक पाणी, शेती उत्पन्न या बाबत विचार करायला हवा. गणपती, शिमगा, वाडीची पूजा, गावची जत्रा अशावेळी येणाऱ्या चाकरमान्यांसमोर यातील एक दोन सभा व्हायला हव्यात. जिथपर्यंत हे होणार नाही तेथपर्यंत गावातून शहराकडे जाणारा लोंढा आटणार नाही.
जय रत्नागिरी, जय महाराष्ट्र, जय भारत
माधव भोळे
Saturday, January 7, 2023
ब्राह्मण समाजापुढील आव्हाने !!
ब्राह्मण समाजापुढील आव्हाने !!
ब्राह्मण समाज हा विद्वान समाज म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळात राजांचे सल्लागार, खोत, कारभारी, चिटणीस, टिपणीस, सरदार अशी पदे ह्या समाजाला मिळाली होती. एकेकाळी ब्राह्मणांना राजाश्रय होता. शेतीसाठी जमिनी होत्या. आज कुळकायद्यामध्ये ब्राह्मणांची शेती गेली. राजाश्रय तर सोडाच पण उलट विशिष्ट वर्गाला आरक्षण दिल्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता कमी झाली.
शिक्षणाचे बाजारीकरण केल्यामुळे आणि महागाईमुळे शाळा कॉलेजमध्ये भरमसाठ फी वाढ झाली, मेरिट सोडून जातीला महत्व आले आणि त्यामुळे चांगल्या शाळा कॉलेजमधील प्रवेशास अडचणी येवू लागल्या. ह्या सर्व विषयात इतर समाजाला विविध सवलती प्राप्त झाल्या आहेत पण त्या ब्राह्मणांना उपलब्ध झाल्या नाहीत. पारंपरिक भिक्षुकी शिक्षण आणि व्यवसायात रस कमी झाला. त्यामुळे एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या ब्राह्मण वर्गाला आपला संसार कसा चालवायचा हा मोठा प्रश्न सर्वसामान्य ब्राह्मण समाजाला पडला आहे.
आजपर्यंत धंदाउद्योग केला नसल्यामुळे त्याबद्द्ल मनात असलेल्या शंका कुशंका सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन नाही. धंदा व्यवसायात लागणारी लवचिकता, संधीशोधक वृत्ती ह्याबद्दल घरातून संस्कार नाहीत. आम्ही सर्वच रामशास्त्री बाण्याचे असल्यामुळे वेळ पडल्यास नुकसान करून घेवू पण तत्व सोडणार नाही हा आमचा हेका म्हणा किंवा तत्व म्हणा ह्या मुळे आम्ही मागे पडत चाललो आहोत. त्यातून जर व्यवसाय करायला गेलो तर आमच्या समाजाकडून प्रोत्साहन नाही, उलट तो कसा नुकसानीत येवू शकेल अशाप्रकारचे पाय खेचणारे अनाहुत सल्ले दिले जातात. इतर समाजाप्रमाणे आमची कोणतीही व्यापार विषयक संघटना नसल्यामुळे आम्हाला व्यापारी वर्गातून पाठिंबा कमीच.
व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला विवाहासाठी आपली मुलगी द्यायला लोक तयार नाहीत कारण त्यांना त्यांच्या व्यवसायाची खात्री वाटत नाही. ( म्हणजे जी नोकरी दुसऱ्याचा व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाची खात्री वाटते पण आपल्या मुलांच्या व्यवसायांबद्दल खात्री नाही. बघा किती विरोधाभास आहे?). मान्य आहे सर्वच किर्लोस्कर होऊ शकत नाहीत पण मेहेनत केल्यास आणि उत्तम गुणवत्ता राखल्यास एखादा पणशीकर किंवा चितळे सुध्दा होऊ शकतो हे सुध्दा समजून घ्यायला हवे.
मुळात जे पाहिजे ते मिळवण्यासाठी जी जिद्द लागते, जी मेहेनत लागते, ती करण्याची मानसिक तयारी नाही कारण आमचा एक गोड गैरसमज आहे की आम्ही बुद्धिजीवी आहोत, बुद्धिवान आहोत त्यामुळे आम्ही फक्त बुध्दीचीच कामे करणार. त्यामुळे आम्ही मागे पडत चाललो आहोत. प्रगती नाही असे नाही, पण इतर समाजाच्या प्रगतीच्या वेगाच्या मानाने आमची प्रगती कमी वाटते. ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान ह्या उक्तीचा योग्य तो अर्थ आम्हाला समजला नाही.
आणखी एक प्रश्न सर्व समाजांना भेडसावत आहे जो ब्राह्मण समाजालाही भेडसावत आहे. तो म्हणजे विवाह समस्या. आपल्या समाजात इतर समाजाप्रमाणेच मुला मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जेवढ्या अपेक्षा जास्त वाढल्या, तेव्हढे विवाह होण्याचे विकल्प कमी होत आहेत. विवाहाबद्धल विचार करण्याच्या पद्धती बदलल्यामुळे विवाहासंबंधी कलह वाढून सुख, शांती, समाधान भंग पावत चालले आहेत. शिक्षणाचा हा अनपेक्षित परिणाम म्हणायला हवा.
अनादी काळापासून राष्ट्र उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान अमूल्य आहे. अनेक वेळा राष्ट्रहितासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. अन्याय आणि अत्याचार या विरुद्ध भगवान परशुरामाचा आदर्श ठेवून त्यांनी स्वात्र्यंत्र लढ्यात आपले प्राण पणाला लावून स्वतः ला झोकून दिले आहे. असे असताना एकेकाळी इतर समाज जो ब्राह्मणांना आदर देत होता तो आदर आजकाल कमी होऊन उलट कोणाच्या पूर्वजांनी काय केले त्याचा आढावा घेवून तेच तेच जुने विषय चघळत ठेवून ब्राह्मण विरोधी वातावरण तापवण्याचा पद्धतशीर प्रयत्न काही विशिष्ट राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून केला जातो आहे. त्यासाठी अगदी दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी, महापराक्रमी पेशवे, लोकमान्य टिळक, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे या सारख्या विभुतींवर सुध्दा शिंतोडे उडविण्यास ही मंडळी कमी करत नाहीत. अनाजी पंत, कवी कलश, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या सारख्या मंडळींच्या नावाचा वापर करून ब्राह्मणांना झोडपणे आणि आपली राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पोळी भाजून घेणे एव्हढेच काम ही मंडळी अगदी खालपासून वरपर्यंत करत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअँप सारख्या समाज माध्यमांवर हे ज्ञाती कलहाचे विषबीज पद्धतशीर पणे पेरले जात आहे. समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्यास जे काही लागेल ते सर्व ही मंडळी करत असतात, जेणेकरून काही विशिष्ट गटाची मते आणि सहानुभुती त्यांना मिळेल.
अशी अनेक आव्हाने ब्राह्मण समाजासमोर आहेत.
ह्या समस्या आणि आव्हाने यावर उपाययोजना काय आहेत ह्यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो, परंतु थोडक्यात सांगायचे झाल्यास, ब्राह्मणांनी आपली शैक्षणिक घोडदौड अशीच चालू ठेवावी, त्यासाठी समाजाने आपल्या शैक्षणिक संस्था आर्थिकदृष्ट्या आणि व्यवसथापकीय दृष्ट्या बळकट करायाला हव्यात. संस्थांची शैक्षणिक किंवा अन्य येणी असतील तर समाजाने जागरूक राहून ती येणी वसूल करण्यास संस्थांना मदत करायला हवी.
आपल्या पाल्याला व्यवसायाचे बाळकडू घरातूनच द्यायला सुरवात करायला हवे. नोकरी घेणारे होण्याऐवजी नोकरी देणारे बनायला हवे. सामाजिक संस्थांनी औपचारिक शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यायला हवा. व्यवसायिकांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विशेष कार्यक्रम आखणे इत्यादी गोष्टीना संस्थांनी महत्व द्यायला हवे. व्यवसायिकांकडे नफेखोर किंवा गुन्हेगार या विचाराने न बघता, त्यांना योग्य व्यक्ती असल्यास त्यांच्या अडचणीच्या वेळी जशी जमेल तशी मदत करायला हवी.
मेहेनतीला पर्याय नाही. तुम्ही कितीही बुद्धिमान असाल पण लोकांना सांभाळून, त्यांना विश्वासात घेवून, त्यांच्या सहकार्याने टीम वर्क म्हणून काम करायला शिकायला हवे. उच्चनिचता हा विचार डोक्यात न आणता, जे पडेल ते काम करायला शिकायला हवे. व्यवसायात किंवा इतर ठिकाणी सुध्दा लागणारी लवचिकता अंगी बाणवायला हवी. उगाचच रामशास्त्री बाणा नको. सामाजिक किंवा अन्य टीकेला बळी न पडता, आणि त्यांच्या आरोपांचे खंडन करण्यात वेळ न घालवता तो वेळ आणि ताकद आपल्या ध्येयपूर्तीसाठी खर्च करायला हवी. बोलणारे बोलत राहतील, काम करणारे पुढे जातील हे लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य अथवा कृती करू नये त्याचे परिणाम कधीच चांगले असणार नाहीत. जे काम हातात घ्याल ते पूर्णत्वास नेण्यासाठी लागेल ते कष्ट, त्याग करण्याची तयारी आणि मनाचा खंबीर पणा हवा.
समाजात एकजूट असेल तर कोणीही आपले वाकडे करू शकत नाही हे लक्षात घ्या. जैन, पारशी समाजाकडे बघा. सबंध भारतात जैन लोकांची लोकसंख्या 44 लाख आहे म्हणजेच भारताच्या लोकसंख्येचा 0.4% आहे पण त्यांची आर्थिक आणि सामाजिक शक्ती एव्हडी मोठी आहे की विमान कंपन्यांत सुध्दा जैनांसाठी वेगळा शाकाहारी मेनू आहे. तर पारशी समाजाची लोकसंख्या एक लाखाच्या आत म्हणजेच 0.06% एव्हढीच आहे पण उद्योगधंदे, वकिली, व्यापार ह्या क्षेत्रात ते बरेच आघाडीवर आहेत.
ब्राह्मणाची लोकसंख्या अंदाजे 6 कोटी 5 लाख म्हणजे जवळजवळ 4.6% आहे. तरी आपण कच का खातो ह्यावर नक्कीच विचार करायला हवा. फक्त स्वतःसाठी न जगता समाजासाठी काहीतरी करायला हवे अशी भावना प्रत्येक ब्राह्मणात येईल त्याचवेळी एक समाज म्हणून आपण पुढे जावू.
माधव भोळे
Wednesday, January 4, 2023
माधव भोळे यांचा थोडक्यात परिचय
माधव भोळे यांचा थोडक्यात परिचय
जन्म : गिरगाव, मुंबई, 18.01.1955
वास्तव्य : मालाड, मुंबई
शाळा: चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल. 1971 SSC batch.
कॉलेज: इंटर सायन्स पर्यंत एल्फिन्स्टन कॉलेज, फोर्ट, मुंबई आणि पुढे बी. एस. सी. ( Statistics / Mathematics ) के. सी कॉलेज, चर्चगेट, 1976. पुढे एम. एस. सी. कॉम्प्युटर सायन्सचा पदवीधारक. नंतर कॉम्प्युटर आणि इनफरमेशन टेक्नॉलजी विषयातील विविध सर्टिफिकेट कोर्सेस केले.
नोकरी: पहिली नोकरी 1977 ला आय. आय. टी., मुंबई, पवई येथे कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून. बँकिंग, फायनांशियल, ईआरपी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ह्या विषयात, विविध कंपन्यांमध्ये, विविध पदांवर नोकऱ्या केल्या. नोकरीनिमित्त अमेरिका, शारजाह, दुबई, स्पेन ह्या ठिकाणी काही काळासाठी वास्तव्य केले. त्या नंतर उच्यशिक्षित लोकांसाठी राष्ट्रीय आणि आंतररष्ट्रीय स्तरावर १० वर्ष प्लेसमेंट सर्व्हिसेसचा व्यवसाय केला.
छंद: सामाजिक कार्याचे बाळकडू वडील कै. गणेश रामकृष्ण भोळे आणि आतेभाऊ कै. नारायण सखाराम वीरकर, डोंबिवली यांचेकडून मिळाले. १९७९ साली विद्यार्थी सहायक संस्थेतर्फे प्रथमच विद्यार्थी पुस्तक पेढीची योजना मांडून कार्यकर्ता म्हणून सुरवात केली ती सर्व सहाकाऱ्यानी मिळून एकंदर ३५ वर्ष चालवली. १९८१ साली विद्यार्थी सहायक संस्थेमध्ये कै. लक्ष्मणराव भोळे अध्यक्ष असताना सर्वात तरुण विश्वस्त म्हणून प्रथमच बिनविरोध निवडून आलो. त्या नंतर एकंदर ३७ वर्ष ह्या संस्थेशी सक्रिय निगडित असून नोकरी निमित्त बाहेर गावी जायला लागल्यामुळे वेगवेगळ्या वेळी, विश्वस्त मंडळात काम विश्वस्त म्हणून केले. देवरूखे युवा ह्या संघटनेचा संस्थापक सदस्य.
२००३ साली श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ, मुबई ह्या वीर, तालुका चिपळूण ह्या संस्थेत सचिव म्हणून सुरवात केली आणि ७० वर्ष जुने भव्य मंदिर दुरुस्त करून त्या मंडळाचा शानदार शतकमहोत्सव, २०१३ साली आणि ७०० वर्ष जुन्या ६ फूट उंच मूर्तीचा वज्रलेपन आणि अर्चा विधी सोहोळा २०२२ साली सहकाऱ्यांच्या मदतीने साजरा करत गांगाजळीत मोलाची भर घातली. अजूनही ह्या संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहे.
२०१२ साली कै. राम गणेश निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीचा सचिव म्हणून काम कामाला सुरवात केली आणि संस्थेच्या भरीव प्रगतीला हातभार लावला असून अजूनही कार्यरत आहे.
२०१८ साली निवृत्त झाल्यानंतर लिखाणाला सुरवात केली आणि आतापर्यंत विविध विषयात मराठी आणि इंग्रजी मधून जवळपास १५० चे वर हौस म्हणून लेख लिहिले आहेत. हे लेख फेसबुकवर नेहमी प्रसिद्ध होत असतात.
माधव भोळे.
Subscribe to:
Posts (Atom)