Thursday, November 9, 2023
चिनी उत्पादने आणि भारत.
चिनी उत्पादने आणि भारत.
काल गावच्या मंदिरासाठी एक छोटेसे झुंबर विकत घ्यायला, मुंबई मधील लोहार चाळ येथे गेलो होतो. तेथे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकलं सामानाची मोठी बाजारपेठ आहे. अतिशय मनमोहक, वेगवेगळ्या डिझाईनची झुंबरे, वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे दिवे, दिव्यांच्या माळा इत्यादी बघून डोळे दिपून गेले. काय घेऊ आणि काय नको असे झाले होते.
तेथील सेल्समनला विचारले की हा सर्व माल कुठून येतो. तर तो म्हणाला चीन मधून येतो. तर मी म्हटले पूर्वी आग्रा, दिल्ली, उत्तर प्रदेशातून येत होता ना? तो म्हणाला, आता तसा येत नाही. आला तरी ते फिनिशिंग नाही, क्वालिटी नाही, आणि त्याची किंमत दाम दुप्पट असते, जी द्यायला ग्राहक तयार नाही.
जर तुम्ही कधी प्लम्बिंग किंवा टाईल्स च्या दुकानात गेलात तरी तेथे सुद्धा चिनचा माल आढळतो. टाईल्स मध्ये एकतर मोरबी, गुजरात किंवा चायना टाईल्स मिळतात ज्या चांगल्या आणि स्वस्त असतात. तुम्ही कुठलेही हार्डवेयर घ्या त्यात चायनाचे पार्टस मिळतात. कोणतीही इंडस्ट्री घ्या त्यामध्ये चीन स्पर्धात्मक किमतीला आपला माल भारतात विकत आहे. मालाड येथे इमिटेशन ज्वेलरी चे सुटे पार्टस, मणी वगैरे मोठी बाजारपेठ आहे त्यातील ७०% माल चिन मधून येतो. थोडा फार मेटलचा माल राजकोट मधून येतो.
चीन आणि भारत यांच्यातील संबंध चांगले नसताना सुद्धा चिनने भारतात २०२२ मध्ये ११८ बिलीयन डॉलर्स चा माल निर्यात केला तर त्याच काळात भारताने चीनला १५.०८ बिलीयन डॉलर्स चा माल निर्यात केला.
आणि आम्ही फक्त दिवाळी आली की चायनाचे फटाके वाजवू नका आणि होळी मध्ये चायनाचे रंग वापरू नका असे आवाहनाचे पोस्टर फेसबुकवर मिरवायचे आणि शुभेच्छा द्यायच्या.
काही भारतीय सरकारी आस्थापने सोडली आणि काही मोठे भारतीय उद्योगधंदे सोडले तर छोटा किंवा लघु उद्योगात जेवढी प्रगती चीनने केली आहे तेव्हडी प्रगती जगात फारच थोड्या देशांनी केली असेल, अर्थातच भारत त्यात पुढे नाही.
ह्याला कारण म्हणजे छोट्या उद्योजकाना पाहिजे तेव्हढे संरक्षण सरकार देत नाही. अनेक एम आय डी सी काढल्या पण त्यात रस्ते, २४ तास इलेक्ट्रिसिटी, पाणी, लॉजिस्टिक्स आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर याचा अभाव. शेतकऱ्यांना आणि घरगुती ग्राहकांना सबसिडी देण्यासाठी उद्योग धंद्याचे वीज दर वाढवले आहेत. तीच गोष्ट गॅस बद्धल आहे. इन्स्पेक्टर राज मध्ये काहीही बदल झालेला नाही फक्त आता त्याचे स्वरूप बदलेले आहे. आता ऑनलाईन पण भरा आणि प्रूफ पण दाखवा. जणूकाही व्यवसाय करतो म्हणजे गुन्हेगारच!!
महागाई असल्यामुळे, नोकरवर्गाची पगाराची अपेक्षा सुधा जास्त असते, एव्हडे आय. टी. आय. आहेत पण स्किल्ड वर्कर कमीच पडतात. नवीन स्किल शिकून घ्यायची तयारी नाही, त्यामुळे प्रशिक्षित कामगार उपलब्ध नाहीत. या सर्वांचा परिणाम उत्पादन दर्जावर होतो. चिनच्या व्यवसायिक आक्रमणामुळे दररोज नवनवीन उत्पादने बाजारात येत असल्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणे कठीण जाते. त्यामुळे भांडवलदार उत्पादनाच्या पाठी न लागता एक व्यापारी ट्रेडर म्हणून काम करतो. परिणामी बाजारात भारतीय माल कमी दिसतो. नाही म्हणायला टेक्स्टईल, साड्या ह्या विषयात आपण पुढे आहोत. व्यापारी फायनान्स साठी लागणारा व्याज दर जास्त आहे.
एक उद्योजक सांगत होता. तो चीन मध्ये फॅक्टरी टाकण्यासाठी गेला होता. त्याने तेथील एका औद्योगिक वसाहतीत फॅक्टरी टाकण्याचे ठरवले. तेथे वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे झोन आहेत. त्याप्रमाणे तेथे प्रशिक्षित कामगार, इन्फ्रास्ट्रक्चर, व्यवसायाची संपूर्ण इको सिस्टिम असते.
तेथील प्रमुखाला तो जाऊन भेटला. त्याने त्याच्याशी प्रोजेक्ट बद्धल चर्चा करून त्याला कोणकोणत्या परवानग्या लागतील याची माहिती दिली, स्वतःचे कागदपत्र घेऊन यायला सांगितले, आणि एक आठवड्यानंतर भेटण्याची तारीख आणि वेळ दिली. एक आठवड्यानंतर तो भेटायला गेला तेव्हा एका कॉन्फरन्स रूम मध्ये ८ अधिकारी बसले होते. त्यांनी त्याचे कागदपत्र बघितले आणि सर्व परवानग्या तेथेच देऊन टाकल्या. यातील एक ऑफिसर चिनच्या एका फायनान्स कॉरपोरेशनचा होता त्याने सांगितले तुमचे लोन सुधा दोन दिवसात मान्य होईल. फक्त ३५ मिनिटे मिटिंग चालली आणि सर्व परवानग्या घेऊन तो उद्योजक बाहेर आला. १५ दिवसात फॅक्टरी सुरु झाल्याबरोबर, दोन दिवसानी लोन मंजूर झाल्याचे पत्र सुद्धा हातात आले. ही कार्यपद्धती भारतात कधी येणार? सरकार तर्फे नेहमी सांगितले जाते सिंगल विंडो काम होईल, पण गेलात की प्रत्येक वेळी नवीन कागदपत्र आणि नवीन धोरणाची पूर्तता करे पर्यंत त्या प्रॉडक्ट ची बाजारात आणण्याची वेळ निघून गेलेली असते. नाहीतर मग कोणी दलाल बघा जो ह्या सर्व परवानग्या लौकर आणून देईल.
परवा पेपरात एक बातमी वाचली, २००५ साली बाळकूम, ठाणे मध्ये बांधलेल्या म्हाडाच्या घरांची लॉटरी लागलेल्या २५० कुटुंबाना १८ वर्षांनी म्हणजे ऑक्टोबर २०२३ ला ताबा मिळाला. एव्हडा अक्षम्य ढिसाळ कारभार? तुम्ही आणखी कितीही पे कमशिन आणा पण यांच्यात सुधारणा होणार नाही.
१५ ऑगस्ट २०१९ ला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची इकॉनॉमि ५ ट्रिलियन होऊ शकते असे लाल किल्ल्यावरून घोषित केले. त्यानंतर करोना मुळे सर्वच देशांची आर्थिक पीछेहाट झाली.
परत दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी जोहानसबर्ग येथे झालेला ब्रिक्स च्या परिषदेत मोदींनी या विषयाचा पुनःरूच्चार केला. या वेळी त्यांनी कोणतीही टाईम फ्रेम दिली नाही. ते लवकरच एव्हडे म्हणाले. सध्या भारताची इकोनॉमि ३.७५५ ट्रिलीयन डॉलर्स एवढी आहे.
जगात सर्वात मोठी इकोनॉमि १ नंबर अमेरिका - २६.४६२ ट्रिलीयन डॉलर्स , २ नंबर ला चीन १९.३७४ ट्रिलीयन डॉलर्स, ३ नंबर जपान ४.४११ ट्रिलीयन डॉलर्स, ४ नंबर जर्मनी ४.३०९ ट्रिलीयन डॉलर्स आणि ५ नंबर भारत ३.७५५ ट्रिलीयन डॉलर्स आहे.
भारताचा गेल्या काही वर्षाचा जी. डी. पि. चा ग्रोथ रेट बघता तो ६ ते ७% च्या मध्ये आहे ( या वर्षी ती ६.३% आहे). अगदी ६.३% जरी आपण तो पकडला तरी पुढील ५ वर्षात भारत ५ ट्रिलीयन ची इकोनॉमि होणे अशक्य नाही.
पण यासाठी जोरदार प्रयत्न करायला हवे. सरकारी तिजोरीचा वाढता खर्च कमी करायला हवा. सरकारी ब्युरोक्रसी वर संपूर्ण नियंत्रण आणायला हवे. निवडणुकांवरील वेळ आणि खर्च कमी करायला हवा. सरकारी आस्थापने सकस, पारदर्शक, परिणामकारक, गतिमान व्हायला हवीत. खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाला जबाबदार व्यक्ती नेमून आणि त्यातून होणारे फायदे तोटे याचे गणित मांडायला हवे. विकासाचे निर्णय व्हायला हवेत. देशात होत असलेली हजारो निदर्शने, मोर्चे, बंद आणि त्यातून होणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यावर काही ठोस नियमावली आणि त्याची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. केंद्र आणि राज्यसरकार यामध्ये असलेले संबंध निकोप आणि सुदृढ व्हायला हवेत. काहीकाळ राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्ष देशाच्या विकासासाठी एकत्र यायला हवेत.
औद्योगिक धोरण आणि शैक्षणिक धोरण यांची सांगड असणे आवश्यक आहे. स्किल डेव्हलपमेंट साठी नुसत्या योजना घोषित न करता त्याची अंमलबजावणी कशी चालली आहे या कडे विषेश लक्ष द्यायला हवे. विध्यार्थ्यांच्या, तरुणांच्या, स्त्रियांच्या, वंचिताच्या, दिव्यांगांचा कर्तुत्वाला जास्तीतजास्त वाव कसा मिळेल अशी धोरणे आखली पाहिजे.
जातीयवाद, धार्मिक वाद, कुप्रथा, वायफळ खर्च, भपका, मोठेपणा आणि शोबाजी याला संपूर्ण पूर्णविराम द्यायला हवा. उत्पादकता कशी वाढेल या साठी कामगार लक्षित धोरणे व्यवसायिकानी राबवायला हवीत. कामगारानी सुद्धा व्यवस्थापनाला सहकार्य करायला हवे. भ्रष्टाचार समूळ उपटून काढायला हवा.
चीन आणि आपल्यात अनेक विषयात दऱी आहे. पण त्यांचे चांगले गुण आणि चांगले काम आपण आत्मसात करायला हवे.
काल एक सांगत होता. अमेरिका मशीन लर्निंग आणि आर्टिफिशीयल इन्टीलीजन्स वर खूप काम करते आहे हे सर्वाना माहिती आहे पण या विषयात चीन मध्ये सुद्धा ऍडव्हान्स स्टेज वर काम सूरु असून चीन या विषयात जगाला कधी धक्का देईल हे सांगता येणार नाही.
असो.
माधव भोळे
Sunday, November 5, 2023
७० तास काम?
७० तास काम?
काल पदमविभूषण नारायण मूर्ती यांचा टी.वी. मोहनदास पै यांचे बरोबरचा एक सव्वाद यु ट्यूब वर ऐकायला मिळाला.
मोहनदास पै यांनी प्रश्न विचारला नवीन प्रगतीशील देशांची प्रगती (उदा. चीन ) बघता भारताने त्या पातळीवर यायला काय प्रयत्न करायला हवेत. त्यावर त्यांनी उत्तर दिले १) देशातील नेत्यांनी ( त्यात कॉर्पोरेट नेते सुद्धा आले ) कथित भ्रस्टाचारावर पूर्ण नियंत्रण मिळवायला हवे २) ब्युरोक्रसी ने वेळकाढू पणाचे धोरण बाजूला ठेवून योग्य निर्णय योग्य वेळेत घेण्याची तयारी दाखवायला हवी आणि ३) भारत प्रगतीशील होण्यासाठी भारतातील तरुणांनी पश्चिमात्य देशातील लोकांचे अनुकरण करून आठवड्याला ७० तास काम करायला हवे. हा देश माझा आहे आणि त्या साठी झटायला मी तयार आहे हे वाटणे महत्वाचे आहे. जपान आणि जर्मनीतील नागरिकांनी दुसऱ्या महायुद्धा नंतर अशी धोरणे अवलंबल्यामुळे त्यांची प्रगती झाली.
या त्यांच्या वाक्यामुळे बरीच तरुण मंडळी नाराज झाली. त्यांच्या मते वर्क लाईफ बॅलन्स असतो किं नाही? आम्ही काही गाढवासारखी ओझी वाहणारी गाढवं नाहीत.
वरवर ही वाक्य जरी ऐकायला चांगली वाटली तरी यात खूप अर्थ दडला आहे. मला एकदा नारायण मूर्तीनीच मागे म्हटलेले वाक्य आठवते. ते म्हणतात जो माणूस ८ तासात आपले काम पूर्ण करू शकत नाही तो आकार्यक्षम. आता सांगा नक्की कसा विचार करायचा ते?
या पैकी पहिल्या दोन मुद्यांनवर नवीन बोलण्यासाठी माझ्याकडे काही नाही कारण त्यावर माझ्याकडे काही समाधान (सोल्युशन ) नाही. तिसरा मुद्धा म्हणजे भारतातील तरुणांना असे का वाटते की जास्त काम करणे म्हणजे गाढवासारखे ओझे वहाणे? मुळात एखादे काम ओझे होते जेव्हा ते आपल्या आवडीचे नसते. जर एखादा विषय आपल्याला आवडला, तो आपली पॅशन बनला तर तरुण मंडळी रात्रंदिवस काम करायला तयार असतात. गड किल्यावर किंवा ट्रेकिंग ला जीवापाड मेहेनत करणारी मंडळी आपण बघतोच की?. अशा अनेक विषयात तरुण मंडळी काम करतात जे त्याना त्यांच्या आवडीचे वाटते. पण आपल्याकडची शिक्षण पद्धती, घरच्यांच्या आणि समाजाच्या आपल्या बद्दल असलेल्या अपेक्षा. नोकऱ्या आणि खाजगी नोकऱ्या या मध्ये असलेल्या मालकांच्या अपेक्षा तेथे सुरु असलेले हाजी हाजी कलचर. या सर्व गोष्टींचा तरुणांवर परिणाम होत असतो होत आहे.
एकदा मिलिंद गुणाजीचे वडील भेटले होते. म्हणाले तो चांगला क्वालिफाईड इंजिनियर आहे पण आवड सर्व भटकंती आणि पर्यटनाची. वसंत वसंत लिमये सारखी मंडळी फेमस झाली ती कॉरपोरेट लीडर म्हणून नव्हे तर एक चांगले लेखक, गिर्या रोहक वगैरे वगैरे. डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. लागू, डॉ. जब्बार पटेल अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
आज आपण विध्यार्थ्याला सांगतो अभ्यास कर, अभ्यास कर पण शेवटी आरक्षणामुळे ९०% मार्क मिळवून सुद्धा मेडिकल ला ऍडमिन मिळत नसेल तर मुलांना साहजिकच निराश व्हायला होते. वेगवेगळ्या विषयातील अनेक इंजिनियर मंडळी चांगला पगार मिळतो म्हणून आय. टी. मध्ये स्विच होतात. पण मग शिक्षण, आवड आणि उत्पन्न याचा काहीही संबंध न राहायल्या मुळे तो तरुण पाट्या टाकण्याचेच काम करतो मग तो कशाला ७० तास काम करेल?
याचे कारण भारतातील कंपन्या तरुणांना भरती करतात ते एक नोकर म्हणून. त्याना अ किंवा ब नोकरीं सोडून गेला म्हणून काही फरक पडत नाही. त्याच्या विद्वात्तेचा वापर एक सांगकाम्या म्हणून केला जातो. आपले ज्ञान दाखवण्याची संधी त्याला मिळायला हवी त्याचबरोबर तरुणांनी सुद्धा कंपनीमध्ये आपले अस्तित्व चांगल्या पद्धतीने दाखवून आपण कंपनीला कसे उपयोगी आहोत हे दाखवून देणे महत्वाचे आहे. दोघेही एकमेकावर अवलंबुन असतात पण तो विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी दोघांवरही आहे तरच कंपनीची आणि व्यक्तीची प्रगती होईल. काही कम्पनिमध्ये अत्यंत कमी शिकलेला व्यक्ती सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे आलेले दिसतात. पण सध्या डिग्री, कॉलेज ब्रँड यांचे दिवस असल्यामुळे बुद्धिमत्ता, कल्पकता, कंपनी सोबत असलेली निष्ठा याला किंमत कमी आहे.
लोक एखादी लाईन किंवा विषय कमी दर्जाची किंवा हलकी ठरवतात, पण जर त्या लाईनबद्दल पूर्ण आणि सखोल माहिती असेल तर ती लाईन आपल्याला आयुष्यात नक्कीच तारून नेऊ शकते. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर केमिस्ट्री ह्या विषयाला भारतात म्हणावा तसा मान मिळत नाही परंतु केमिकलस हा इंडस्ट्रिज चा एक अविभाज्य भाग आहे. बालाजी केमिकल्स, विनती ऑरगॅनिक्स, घरडा केमिकलस, पीडिलाईट सारख्या कंपन्यानी अब्जो रुपयाचे व्यवसाय केले आहेत. एव्हडेच कशाला एस. एच. केळकर सारख्या फाईन केमिकल्स आणि पर्फ्यूमरी कंपन्या फ्रांस मधील अत्तर कंपन्याना टक्कर देत आहेत. अनेक विषयात अनेक काम बाकी आहे आणि जगाला चांगले पुरवठादार हवे आहेत. आपले डोळे उघडे ठेवायला हवेत.
शेवटी सर्व प्रश्न येतो तो आपला जगण्याचा उद्देश काय? आपला ध्यास आणि ध्येय काय आहे? ते जर आपण लवकरात लवकर ओळखलेत तर आपण लवकर प्रगत व्हाल. योग्य आवड निर्माण करायला, त्या साठी मेहेनत घेतली, सखोल ज्ञान मिळवलेत तर ते आपल्याला ओझे वाटणार नाही. एक लक्षात घ्या मेहेनत घेऊन माणूस झीजत नाही पण मेहेनत आनंदाची असेल तर त्याचा सर्वांगीण फायदा होतो.
७० तास हा आकडा महत्वाचा नाही, तर तुम्ही किती वेळात काय परिणाम घडवून आणू शकता, त्याचा तुम्हाला आणि जगाला काय फायदा आहे ते जास्त महत्वाचे आहे.
नवनवीन कल्पना करणे ज्याला आपण out of box thinking असे म्हणतो आणि त्या कशा अमलात आणता येतील याचा सखोल विचार करणे हा तरुणांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. ऍमेझॉन (जेफ बेझोज ), टेसला ( इलोन मस्क ), गुगल ( लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ), फेसबुक ( मार्क झुकरबर्ग), चॅट जिपिटी ( सॅम अल्टमन ) सारखी मंडळी काही स्वप्न बघू शकली. ती अस्तिवात आणण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहेनत घेतली. आपल्या आयुष्याचे अगणित तास घालवले. अनेक रात्री खराब केल्या. आयुष्यातील चढ उतार पहिले. पण आज जगाला ते काही चांगले देत आहेत.
पण आपल्या भारतात ते कलचर नाही. आपण "धोपट मार्ग सोडू नको" म्हणणाऱी मंडळी. आपल्याला पूर्वीपासूनच "अंथरूण पाहून पाय पसरावेत", किंवा "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असावे समाधान" हे शिकवले पण त्याचा योग्य अर्थ आणि कोणत्या काळाला ह्या म्हणी लागू पडतात हे माहिती नसल्यामुळे गोंधळ होतो.
भारतातील प्रतिथयश कंपन्या सुद्धा उत्पन्नाच्या २% चे वर रिसर्च आणि डेव्हलपमेंट वर खर्च करत नाहीत. भारताचा जिडीपी च्या सरासरी फक्त ०.६६% उत्पन्न आर अँड डी वर खर्च केले जाते जो आकडा जगात १.५% तर चीन २% खर्च करते.
पेटंट च्या बाबतीत सुद्धा चीन (3.6 million), अमेरिका (3.3 million), जपान (2 million) तर भारत ( ५,८४,००० त्यातील निम्याहून अधिक २०१० नंतर ची ) असून पेटंट मध्ये भारताचा नंबर ५५ देशात ४२ वा लागतो. २०२२ साली भारताने सर्वात जास्त म्हणजे ६६,००० पेटंट फाईल केली जी २०२१ चे मानाने १३.६% जास्त झाली.
त्यामुळे नारायण मूर्तिच्या उदगारांचा योग्य अर्थ लावून तरुणांनी आपली दिशा ठरवायला हवी. रखडत रखडत जगायचे की ताठ मानेने ते तुम्हीच ठरवायचे.
माधव भोळे
एका लग्नाची गोष्ट
एका लग्नाची गोष्ट
(मुलीचे आई वडील मुलगे कसे नाकारतात, त्याची )
सुप्रसिद्ध व्यवसायिक पदमविभूषण नारायण मूर्ती आणि सुधा ( कुलकर्णी) मूर्ती यांची पुण्यात ओळख झाल्यानंतर काही दिवसांनी सुधाने आपल्या वडिलांना मूर्तिबद्दल संगितले.
सुधाचे वडील सर्जन होते तर सुधा बीई, एम ई होती आणि टाटा मोटर्स मध्ये नोकरीला होते.
नारायण मूर्ती बि.टेक, एम टेक( आय आय टी मद्रास ) होते. त्या वेळी ते स्वतःच छोटा व्यवसाय करत होते.
सुधाच्या वडिलांच्या बोलावण्यावरून मूर्ती त्याना भेटायला गेले. मूर्तिनी लाल शर्ट घातला होता. ते पुण्यात भाडयाच्या खोलीत राहत होते. अचानक काम आल्यामुळे ते मुंबईला गेले होते आणि येताना घाटात ट्राफिक जाम मुळे त्याना २ तास उशीर झाला होता.
सुधाच्या वडिलांनी मूर्तिना विचारले, तुझे पुढील प्लॅन काय आहेत? मूर्ती म्हणाले मी कम्युनिस्ट पार्टीचा नेता बनणार आहे, मला एक अनाथाश्रम काढायचा आहे.
मूर्ती गेल्यावर सुधाच्या वडिलांनी सुधाला आपला निर्णय सांगितला. अशा मुलाशी मी तुझे लग्न लावून देणार नाही जो दिलेली वेळ पळू शकत नाही, ज्याला धड चांगली नोकरीं नाही, जो पैसेवाला ही नाही, ज्याला स्वतःचे घर नाही, आणि तो अनाथाश्रम काढायला निघाला आहे.
आणि पुढील इतिहास सर्वांनाच माहिती आहे.
माधव भोळे
आगाशे डिपार्टमेंल स्टोअर, रत्नागिरी
आगाशे डिपार्टमेंल स्टोअर, रत्नागिरी
( २० जुलै २०२२, गोळप कट्ट्याच्या ३३ व्या पुष्पात घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन )
अनेक व्यवसायानंतर किराणा दुकान व्यवसायात स्थिरावलेले श्री.अनंत मुकुंद आगाशे होते..आपला प्रवास सांगताना ....आम्ही आगाशे मूळचे गिम्हवणे दापोली येथील पण हल्ली शोध लागला आहे की आम्ही कोळंबे गावचे....
वडिल कोर्टात काम करत त्यांची बदली झाली रत्नागिरीला आणि आम्ही पाच भावंडे आणि आई बाबा १९६८ ला रत्नागिरीत आलो . राहायचं कुठे? प्रश्न होता . सुवारे नावाच्या एका बाईंनी राहायला खोली दिली त्यांना जेवण करून द्यायचं या बोलीवर खोली मिळाली.
काही महिन्यांनी आप्पासाहेब ठाकूर यांनी वडिलांना गीतामंडळ येथे व्यवस्था पहाल का? तुम्हाला एक खोली मिळेल त्यात राहा सांगितलं. राहायला मिळणार म्हणून तिथे आलो. शेवटचं भावंड ईश्वर याचा जन्म तिथे झाला. वडिलांच्या पगारात भागणं शक्य नव्हतं. मग दोन बहिणींच्या साथीने फुलांचे हार विकणे, मोगरे गजरे विकणे,लग्नासाठी पेढे पुड्या बनवणे,सरबत बनवणे असे अनेक उद्योग केले. तुळशीचे हार विकणे माझी जबाबदारी असे. विठ्ठलमंदिर बाहेर मी उभा राहून पाच पैशाला हार विकत असे.
काही महिन्यांनी वडिलांवर खोटा आरोप करून आम्हाला गीतामंडळ सोडायला सांगितलं. काही महिने दुसरीकडे राहिल्यावर पुन्हा आमचा गैरसमज झाला अस म्हणून पुन्हा गीतामंडल येथे बोलावलं गेलं. त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की कुठेतरी जागा घ्यायची. नाचणे येथे घैसास यांनी जागा दिली. वडील रिटायर्ड झाल्यावर पैसे देऊ. या बोलीवर हळूहळू घर बांधणे सुरू झालं. छोटस घर झालं पण पाणी नव्हतं.
दरम्यान मी दहावी झालो. ऑप्शनला विषय असल्याने मी फिशरीज घेतलं. प्रॅक्टिकल साठी मच्छीमार्केट मध्ये जावं लागायचं. मासे खात नव्हतो पण अभ्यासासाठी सगळं प्रॅक्टिकल करायला लागायचं. बारावीनंतर जडे सरांनी सीए करायला सांगितलं म्हणून फौंडेशन परीक्षा दिली. पुढे बाहेर जावं लागणार आणि पैसे नाही म्हणून कॉलेज सोडलं. ते पुढे पूर्ण केलं.
एमआयडीसी त्याच्या बाहेर उद्योगाला पाणी द्यायची म्हणून गोटीसोडा व्यवसाय दाखवला. पाणी मिळू लागले. वडील निवृत्त झाले होते. मात्र घर बांधण्यात पैसे खर्च झाले होते. गोटीसोडा साठी वडिलांकडे एकदाच पैसे द्या म्हणून मागितले त्यांनी दिले.
उद्योग सुरू झाला. डोक्यावरून क्रेट घेऊन साळवी स्टॉप येथे दुकानांना देत असे. एक दिवशी बनवताना बाटली फुटून मानेजवळ काच लागली थोडक्यात वाचलो. पण मग ठरवून हा व्यवसाय बंद केला.
१९८३ ला किराणा व्यवसाय सुरू करायचा ठरवलं. राजापूरचे मेहुणे पाटणकर पेढीवाले यांनी त्यांचं क्रेडिट वापरून सुरुवातीला माल दिला. कोकण विकास मंडळाचं कर्ज काढलं. काहीही माहीत नसल्याने व्यवसायातील अनेक गोष्टी शिकलो. रॉकेल मिळण्याबाबत वडिलांना अपमानित व्हावं लागलं होतं. ते डोक्यात घेऊन रॉकेल एजन्सी घेतली. लोकांना किराणा नाही घेतलं तरी रॉकेल देऊ लागलो. प्रचंड लाईन लागायची पण मागाल तेवढं आणि संपेपर्यंत रॉकेल द्यायचो. त्याचा फायदा किराणाला झाला. जम बसू लागला. एकदा रॉकेल मध्ये 3 पैसे जास्त घेतले म्हणून तक्रार झाली. मनस्ताप झाला. त्यामुळे आयुष्यात कायम प्रामाणिक आणि सचोटीने वागायचं ठरवलं.दर्जा कायम चांगला ठेवला.
पॅकिंगचा शोध ईश्वरने (छोटा भाऊ ) लावला. आधीच पुड्या बांधून ठेवेन या त्याच्या हट्टामुळे हळूहळू वस्तू पॅक करून विकू लागलो. घरपोच सुविधा रत्नागिरीत प्रथम सुरू केली. पुढे सेमी डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केलं. मग व्याप वाढला. पहिलं एसी डिपार्टमेंटल स्टोअर सुरू केलं. २००० ला पहिलं कॉम्पुटर बिलिंग सुरू केलं. त्यासाठी मी व पत्नी कॉम्पुटर शिकलो. घरगुती वस्तू पत्नी करू लागली. आज ८० उत्पादने आमची स्वतःची आहेत. मुलगा मोठा झाल्यावर त्याने अजून मोठं नूतनीकरण करूया म्हटलं.
असलेलं सगळं विकून जागा घेऊन सध्याचं तीन मजली आगाशे एम्पायर २०१८ ला सुरू केलं. त्याच दरम्यान डी मार्ट आलं. रिलायन्स मार्ट आलं. अनेक जणांनी भीती दाखवली. मात्र आम्ही आमच्या व्यवसायावर, दर्जावर,सचोटीवर ठाम होतो. आम्हाला आत्मविश्वास होता की आम्ही यातून निभावून जाऊ. फक्त एक महिना व्यवसायावर परिणाम झाला. त्यानंतर कधीही मागे वळून पाहावं लागलं नाही. विठ्ठल मंदिरासमोर पाच पैसे ला हार विकणारा मी पत्नी,मुलगा,सून बाकी कुटुंबीय यांची भक्कम साथ आणि अनेक माणसांच्या सहकार्यामुळे,कष्टाने, प्रामाणिकपणाने आणि सचोटीने कोटींपर्यंत व्यवहार करू लागलो.
देवाची कृपा आणि अनेक लोकांची साथ यामुळे हे शक्य झालं.पतंजली चा योग शिक्षक आहे. गेली चौदा वर्ष ओम साई क्रीडामंडळ च्या माध्यमातून रोज मोफत योगा शिकवतो. विविध प्रकारचे शिक्षण तिथे देतो.
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण संघ अध्यक्ष आहे. सध्या संघाची हॉस्टेल,हॉल,वाचनालय अशी सुसज्ज इमारत बांधत आहोत. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ,भारत शिक्षण मंडळ याही संस्थात कार्यरत आहे. सगळ्यांनी आपली तब्येत उत्तम राहण्यासाठी योग करावा.
आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. मात्र थांबून न राहता पुढे चालत राहायचं. प्रामाणिक पणे वागण आणि खर बोलणं याला जगात साथ मिळते.
याशिवाय आगाशे यांनी अनेक अनुभव आणि प्रसंग सांगितले..
मूळ लेखन : अविनाश काळे, गोळप कट्टा
भारतीय एकात्मता दिवस निमित्ताने!!
भारतीय एकात्मता दिवस निमित्ताने!!
नुकताच ३१ ऑक्टोबरला भारताचे गाजलेले उपपंतप्रधान बॅरिस्टर वल्लभभाई पटेल यांचा वाढदिवस भारतीय एकात्मता दिवस म्हणून साजरा झाला.
आणि आज एका डॉक्टर ची पोस्ट फेसबुकवर वाचली, त्यात पोस्ट च्या शेवटी लिहिले होते आर्य पुणेकर. मी मनात म्हटले एवढेच राहिले होते.
देवाने मानवाला तीन भागात विभागले स्त्री, पुरुष, आणि तृतियपंथी. वेगवेगळ्या सतपुरुषांनी मानवाला वेगवेगळ्या धर्मात विभागले.
काही लोक मनुस्मृतीना दोष देतात की माणसांना चार वर्णात विभागले. जाती आणि पोटजाती कुठून आल्या हे कोणालाच माहिती नाही पण तरी ती अंधश्रद्धा न मानता त्याच्या जोरावर आरक्षण देता येते म्हणून भारतीय घटनेमध्ये बराच घोळ घालून ठेवला आहे.
ब्रिटिशांना आपण दोष देतो की त्यांनी भारताला धर्मात विभागले. अगदी आमच्या सेनेत सुद्धा महार रेजिमेंट, शीख रेजिमेंट, गोरखा रायफल आहेत. ( खरे म्हणजे यांची नावे बदलायची आता वेळ आली आहे.)
त्यात आता हे पुण्यात नवे काय "आर्य पुणेकर". कोणी म्हणतो मी सनातन आहे. कोणी म्हणतो मी ऋग्वेदी, कोणी यजूर्वेदि, कोणी मध्यंदिन ब्राह्मण, कोणी कायस्थ तर कोणी खत्री. तिकडे दक्षिणेत लोक बोंब मारतच असतात की ते द्रविड आहेत.
कोणी म्हणतो मी अप्पर क्लास, कोणी अप्पर मिडल क्लास, कोणाला लोक लोवर क्लास म्हणून म्हणतात.
शाळेत शिकवले जाते एक काठी मोडता येते पण तिचा गठ्ठा मोडणे अवघड आहे. United we win, devided we loose. पण ते फक्त निबंधात लिहिण्यापूरतेच!!
पण काही ठिकाणी मात्र आपण एकत्र आहोत.
भ्रस्टाचाराला जात विचारली जात नाही. पैसे कमवताना आपण एकत्र आहोत. पर्यावरण हानी आणि कचरा करायला आपण एकत्र आहोत. हॉस्पिटलमध्ये आजारी झाल्यावर आपल्याला कोणताही चांगला डॉक्टर पाहिजे असतो मग तो कोणी का असे ना?
यापुढे नवीन भिंती तयार न करता, आता पासूनच आपण ह्या भिंती तोडायला पाहिजेत. त्या कधी तुटतील ते माहित नाही पण ज्या दिवशी त्या तुटतील त्या दिवशी पासून भारताची आणि भारतीयांची घोडदौड जगात कोणीही रोखू शकणार नाही. आपल्या पुढील पिढीचे भवितव्य याच विषयावर अवलंबुन आहे.
विचार करा आणि आचरणात आणा.
माधव भोळे.
Sunday, October 22, 2023
शकुंतला अनिरुद्ध भगत भारतातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर
शकुंतला अनिरुद्ध भगत
भारतातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअर
आपल्या भारतात जेव्हा एखादा तरुण जगप्रसिद्ध खेळाडु लाकडाच्या बँटने क्रिकेटचा चेंडू मैदानाबाहेर भिरकावून शंभर शतके करतो म्हणून त्याला भारतरत्न दिले जाते. आणि जेव्हा याच भारतातील पहिली महिला सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवुन स्टील स्ट्रक्चर डिझाइन आणि बांधकाम क्षेत्रात दिवस रात्र अपार कष्ट करुन जगभरातील २०० पुल (Bridges) निर्माण करते हे आताच्या पिढिला म्हणजे विषेश करुन ईजिंनिअरींग पदवीधर तरुणाई याबाबत अज्ञात असावी ही आपल्या देशासाठी फार मोठी शरमेची गोष्ट आहे. १९५० साली जन्मलेल्या टाटा उपक्रमात पहिल्या महिला ईजिंनिअर व पद्मश्री सौ. सुधा मुर्ती यांचे जेवढे कौतुक आज होते आहे त्यापेक्षा कदाचित कितीतरी पट जास्त ईजिंनिअरींग क्षेत्रात योगदान देणाऱ्या शकुंतला भगत यांना आजही काही महत्व दिले जात नाही. शकुंतला भगत कोण होत्या ? व त्यांचे सिव्हिल स्टील स्ट्रक्चर डिझाइन क्षेत्रात काय योगदान होते ते आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आपण पुल (Bridges) किती प्रकारचे असतात त्यासाठी आपण या लेखासोबत जोडलेले ' Types of bridges ' हे चित्र पहा. म्हणजे Bridges design and calculation हा विषय कीती किचकट विषय आहे ते आपणास यावरुन अंदाज येईल. २०० Bridges एका भारतीय महाराष्ट्रातील एका महिलेने निर्माण करणे ही काही साधी गोष्ट नाही हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एखादा खेळाडु शतक पूर्ण करीत असताना ९९ वर बाद झाला तर त्याने देशातील क्रिडा प्रेमींना काही क्षण फरक पडत असेल पण पुर्ण होत आलेला पुल अर्धवट बांधकाम राहिल्याने कितीतरी नागरिक त्यामुळे वंचित राहतात व त्या स्टील स्ट्रक्चर डिझाइनर व कंत्राटदारास उर्वरित जीवन आयुष्यभर मान खाली घालुन शरमेने जगण्या सारखा प्रकार असतो. असे प्रकार झाल्यामुळे इतिहासात अशा अनेक ईजिंनिअर नी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
आता आपण शकुंतला मँडमचा जीवनप्रवास पाहुया.
दिनांक ६ फेब्रुवारी १९३३ साली शकुंतला जोशी यांचा जन्म झाला.त्या काळातील समाजाचा विचार करता मुलीने इंजिनियर होणे ही खूपच मोठी गोष्ट होती. पण शकुंतला च्या वडिलांनी त्यांना शिकायला भरपुर प्रोत्साहन दिले. शकुंतला जोशी म्हणून इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमा साठी नाव नोंदवलेल्या या हुशार मुलीने सिव्हिल इंजिनिअरिंग च्या विषयांमध्ये त्वरित गती पकडली. शकुंतला जोशी यांचे वडील एस.बी. जोशी हे सुध्दा स्वतः Bridge Engineer म्हणजेच सिव्हिल क्षेत्रातील उत्तम ईजिंनिअर होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनात ते सहभागी झाले होते. ते विचारांनी इतके पुढारलेले होते की शकुंतलाने आपले इंजिनीअरिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्न केले नसते तरी त्यांना ते चालणार होते. १९५३ साली शकुंतला यांनी मुबंईतील मांटुगा येथील VJTI (वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट) म्हणजे त्या काळातील Victoria Jubilee Technical Institute मधुन सिव्हिल इंजिनियर ची पदवी घेऊन देशातील पहिल्या महिला ठरल्या. शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी एका ठिकाणी फॅक्टरी ट्रेनी (internship)म्हणून कामाला सुरुवात केली. पण एकदा फॅक्टरीत काम करत असताना अचानक छोटासा अपघात होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यावेळी शकुंतला यांचे मनोबल उंचावण्यासाठी पुन्हा एकदा वडिलांनी त्यांना कणखर आधार दिला. पुढे त्यांनी त्यांना डिझाईन इंजिनियर म्हणून काम करण्यासाठी जर्मनीला पाठवले. जर्मनीहून त्या १९५७ मध्ये भारतात परतल्या. त्यानंतर त्यांनी पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमधून सिव्हिल आणि स्ट्रक्चरल ईजिंनिअरींग मध्ये मास्टर पदवी मिळविली.त्यानंतर त्यांनी अजून एक धाडस केले ते म्हणजे प्रेमविवाह! काळाच्या कितीतरी पुढे जात त्यांनी आपल्या पसंतीचा जोडीदार निवडला. तोही फक्त मेकॅनिकल इंजिनीअर ची साधी पदवी असलेला ! अनिरुद्ध शिवप्रसाद भगत यांचे स्वतःचे फँब्रिकेशन व ऑटोमोबाईल पार्टस बनविण्याचा वर्कशॉप होता. ते दिवसभर स्वतःच्या वर्कशॉप मधे काम करत म्हणून त्यांना बघणारे लोक मेकॅनिक समजत असत. एवढी शिकलेली मुलगी एका वर्कशॉप मधे काम करणाऱ्या मेकॅनिक वर प्रेम करते हे कळल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. शकुंतला यांनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहात लग्न केले आणि संसारही निभावून नेला. अर्थात त्यासाठी अनिरुद्ध शिवप्रसाद भगत यांची साथ मोलाची ठरली. भगत यांचे उत्पन्न पुरेसे नसल्यामुळे शकुंतला यांनी आर्थिक जबाबदारीही स्वीकारली. त्यासाठी त्यांनी १९६० ते १९७० या काळात त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IIT) या भारतातील अग्रगण्य संस्थेत सिव्हिल इंजिनियर साठी असिस्टंट प्रोफेसर व स्टील स्ट्रक्चर लॅबोरेटरी मधे हेड ऑफ डिपार्टमेंट अशी जबाबदारी पार पाडल्यावर १९७० साली त्यांनी मेकॅनिकल ईजिंनिअर असलेले पती श्री अनिरुद्ध शिवप्रसाद भगत यांच्यासमवेत 'भगत इंजिनियरिंग' नावाची ही त्यांची स्वतःची फर्म स्थापन केली. या कंपनीने वेगवेगळी रुंदी आणि विस्तार असलेले पूल अल्प खर्चात तयार केले. त्यासाठी त्यांनी प्री-फॅब्रिकेटेड(आधीच तयार करुन ठेवलेल्या) सुट्ट्या भागांचा वापर केला. तसेच हे भाग एकमेकांना जोडण्यासाठी बिजागऱ्यांसारख्या जोडणीचा वापर केल्यामुळे त्यासाठी कमी स्टील वापरावे लागे. अस्तित्वात असलेला एखादा पूल मोडकळीस आला असेल तर त्याला आधार देण्यासाठी त्यांनी टोएबल ब्रिज या नव्या प्रकारच्या पुलांचे डिझाईन तयार केले. हे पूल नादुरुस्त पुलांखाली वापरून मोडकळीस आलेल्या पुलावरून देखील अवजड वाहनांची वाहतूक करणे शक्य होऊ लागले.
क्वाड्रिकॉन मॉड्यूलर ब्रिज साठी 'टोटल सिस्टम' विकसित करुन पेटंट घेतल्यावर प्रीफॅब्रिकेटेड मॉड्यूलर डिझाइन करुन भले मोठे पुल बांधायचे काम सोपे केले. प्रीफॅब्रिकेटेड म्हणजे आपणास समजण्यास सोपे जावे म्हणुन सांगतो की भल्या मोठ मोठ्या पुलाचे लहान लहान भाग म्हणजे रस्त्यावरुन वाहुन नेऊ शकतो अशा रुंदीच्या आकाराचे मॉड्यूल वर्कशॉप मध्ये फँब्रिकेट म्हणजेच वेल्डिंग करुन ते प्रत्यक्ष साईट वर आणुन फक्त जोडायचे काम केल्याने बांधकामाचा वेळ भरपुर वाचतो. आजसुद्धा आपल्याकडे अनेक गावे अत्यंत दुर्गम आहेत. तेथे पोहोचायला वाहतुकीची साधने नाहीत, दळणवळणा च्या सुविधा नाहीत.देशात असूनही अशी 'बेटे' त्यांच्या दुर्गम स्थानामुळे प्रगतीपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर पुलांचे मोठे योगदान आहे. या पुलांनी गावे एकमेकांना 'जोडण्याचे' महत्त्वाचे काम केले आहे; अनेक गावांवरचा दुर्गमपणाचा शिक्का पुसण्यात शंकुतला मँडम नी आपल्या देशाला मदत करताना काश्मीर ते अरुणाचल प्रदेश पर्यंत ६९ पुल बनवले. त्यांनी पूल बांधणीच्या क्षेत्रात केलेले काम आजही भल्याभल्यांना चकित करते. निवडलेल्या कामाची तीव्र आवड असेल तर कुठल्या कुठे पोहोचता येते; याचे उत्तम उदाहरण म्हणजे शकुंतला अनिरुद्ध भगत. भारताच्या प्रथम महिला सिव्हिल इंजिनियर शकुंतला अनिरुद्ध भगत यांनी Bridges construction व R&D मधे फार मोठी भुमिका बजावली . त्यांनी त्यांचे पति अनिरुद्ध शिवप्रसाद भगत यांच्यासमवेत या क्षेत्रात जागतिक स्तरावर पहिल्यांदाच ‘टोटल सिस्टम’ नावाची पद्धत विकसित केली.
हा काळ एकंदरच आपल्या भारत देशाच्या विकासाचा आणि भरभराटीचा होता. हिमालया- लगतच्या प्रदेशात बांधल्या गेलेल्या पुलांमुळे त्या प्रदेशाचे चित्र पालटू लागले होते. इतके दिवस भौगोलिक दृष्टीने दुर्गम असलेले भाग क्वाड्रीकॉनने उत्तर आणि ईशान्य भारतात बांधलेल्या ६९ पुलांमुळे आज उर्वरित भारताशी जोडले गेले आहेत. याशिवाय युके, युएस, जर्मनी या देशांमध्येही त्यांनी २०० पूल बांधलेत. त्यांनी लंडनच्या सिमेंट आणि काँक्रीट असोसिएशनसाठी संशोधनावर भरपुर काम केले. त्यांनी डिझाइन केलेले क्वाड्रिकॉन स्टील पुल सिस्टीम ही आपल्या देशातील हिमालया सारख्या डोंगराळ क्षेत्रात बांधण्यासाठी फार उपयोगी पडल्याने त्या सिव्हिल इंजिनियर क्षेत्रात जगप्रसिद्ध झाल्या. रोल्ड स्टील सेक्शन हे बांधकामासाठी उत्तम असले तरी त्याचे अनेक भले मोठे भाग साईटवर वेल्डिंग करुन जोडणे खूप कठीण असते . त्यासाठी पुलाच्या बांधकामासाठी त्याचा वापर होत नव्हता . या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन १९६९ मध्ये क्वाड्रिकॉनने ' Unishear Conector' विकसित केले. स्टील स्ट्रक्चर्स जोडण्यासाठी हे एक सुंदर पीन सारखे उपकरण आहे. पण हे बणविण्या पुर्वी योग्य क्षमतेसाठी भरपुर मोठ मोठी गणिते करावी लागतात. व या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून ती गणिते तपासुन घ्यावी लागतात.
त्यांनी ११ प्रोटोटाइपद्वारे भगत Unishear Connectors कनेक्टर्स डिझाइन करण्याची संकल्पना विकसित केली, जी ऍप्लिकेशन्सद्वारे परिपूर्ण केली गेली. भगत युनिशीअर कनेक्टरची २० मेट्रिक टन ते ५०० मेट्रिक टन पर्यंत कोणत्याही क्षमतेची टेंशनमध्ये आणि कॉम्प्रेशनमध्ये वापरल्यास १०० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त क्षमता तयार करण्यासाठी शकुंतला यांनी सूत्रे विकसित केल्याने
या नवीन शोध कार्यासाठी या दांपत्यास १९७२ मध्ये आविष्कार प्रोत्साहन मंडळाने ( Invention Promotion Board) सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.
त्यांच्या मुलांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई शंकुंतला व वडील अनिरुद्ध दोघांमध्येही प्रचंड इच्छाशक्ती होती. अगदी रात्री सगळेजण एकत्र जेवायला बसल्यावरही त्यांच्यातल्या चर्चा दिवसभर कामाभोवतीच फिरत. कधी त्या चर्चांमधून वादही रंगायचे. पण एकदा का एक निर्णय झाला आणि तो कंपनीच्या हिताचा आहे यावर शिक्कामोर्तब झाले की वाद थांबे. मग जणू काही झालेच नाही अशा थाटात ह्या मुलांचे आईवडील खेळीमेळीने संभाषण सुरू करत. आपण उभारलेली संस्था बहरावी म्हणून त्यांनी त्या काळात सर्व प्रकारचे धोके स्वीकारले, पण कंपनीची घोडदौड कायम ठेवली. जेव्हा त्यांच्या कल्पनांमध्ये व कंपनीमध्ये गुंतवणूक करायला सरकार किंवा खाजगी कंपन्या राजी नव्हत्या, तेव्हा त्यांनी पैसा उभा करण्यासाठी स्वतःचे घर गहाण टाकले, दागदागिने विकले, पण स्वप्ने सत्यात उतरवून दाखवली. कधी एखाद्या पुलाच्या साइटवर छोटासा जरी अपघात झाला तरी घरात सुतकी वातावरण असे. त्यांच्यासाठी त्यांची कंपनी घराइतकीच जवळची होती. पण म्हणून त्या दांपत्याने स्वतःच्या घराकडे कधी दुर्लक्ष केले नाही. उलट करिअरची एकेक शिखरे सर करत असताना शकुंतला यांनी कौटुंबिक आघाडीही तितक्याच ताकदीने सांभाळली. एवढे सगळे करूनही जर्मनीत असताना परिचित झालेल्या वेस्टर्न क्लासिकल सिंफनीज ऐकण्यासाठी त्या खास वेळ काढत. त्यांच्या तिन्ही मुलांनी त्यांना अतिशय पद्धतशीरपणे काम करताना पाहिलेले आहे. त्या काळात संगणक नसल्यामुळे वह्यांमध्ये आकडेमोड करणारी, एखादे डिझाईन मनासारखे उतरेपर्यंत वहीत रेखाटने करण्यात गढून गेलेली आई आजही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. इतरांपेक्षा आपली आई नक्कीच वेगळी आहे, जिथे एकही स्त्री नाही अशा क्षेत्रात ती समर्थपणे पाय रोवून उभी आहे याचा अभिमान त्या मुलांना वाटला नाही तर नवलच ! त्यांच्या फॅमिली पिकनिक्ससुद्धा बहुतेक वेळा कंस्ट्रक्शन साइटवरच असायच्या. त्यामुळे नकळतच मुलांवर कामाचे संस्कार झाले. मोठमोठ्या स्ट्रक्चर्समधील बारकावे, त्यांची तपशीलवार तपासणी याबद्दल मुलांना आई-वडिलांकडूनच शिकायला मिळाले. सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पुलांची बांधणी सगळ्यात अवघड मानली जाते. पण याच विषयाला हात घालत, त्याला आपलेसे करत शकुंतला भगत यांनी जी उभारणी केली आहे त्याला तोड नाही. अशा या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनियर शकुंतला अनिरुद्ध भगत यांचे १४ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले.
लेखन व माहिती संकलन:
रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी
फोटो, माहिती सौजन्य:
गुगल, विकिपीडिया
आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक १
आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक १
आजपासून जवळपास ३०० वर्षांपूर्वी आर्य-द्रविड आणि कोण एतद्देशीय कोण परकीय असा वाद नव्हता, किंबहुना, आज प्रचलित असलेला अर्थही या शब्दांना मुळीच नव्हता. मग या वादाचा उगम कसा झाला ?
युरोप तथा भारत यांचा संबंध आपल्याला अगदी प्राचीन काळापासून दिसतो. सातवाहन काळात रोमपर्यंत व्यापार चालायचा हे सर्वश्रुत आहे. पण इस्तान्बुल नगर ऑटोमन (ओस्मानी) तुर्कांनी जिंकले आणि त्यानंतर समुद्री मार्गाने भारताकडे येण्याने इतिहासास कलाटणी मिळाली. याच काळात युरोपात अनेक वैचारिक क्रांतींचे बीज रोवले जात होते ज्याचा कित्येक क्षेत्रांवर प्रभाव पडला, आणि विविध शास्त्रांच्या अभ्यासाला वेगळे वळण मिळाले.
या आणि या नंतरच्या भारतात आलेल्या युरोपीय लोकांना उत्तर भारतीय (महाराष्ट्र-गोवा सह), इराणच्या, युरोपीय भाषांमध्ये परस्पर सादृश्य आणि साधर्म्य जाणवू लागले. हे साधर्म्य थोडो-थोडके, वरवरचे आणि काही विशिष्ट शब्दांत नसून अतिशय मूलभूत शब्द, धातु, प्रत्यय, व्याकरण या सर्व बाबींत होते. निरीक्षणावरून साहजिकच या सर्व भाषांचे मूळ एकच असावे असा अंदाज त्यांनी लावला. या भाषाकुळास संबोधनाच्या सोयीसाठी, आधी इंडो-जर्मानिक (Indo-Germanisch) आणि नंतर इंडो-युरोपीयन (Indo-European) असे नाव देण्यात आले.
सुरुवातीला सर्वात प्राचीन आणि व्यापक असल्यामुळे संस्कृत हीच भाषाकुळाची जननी आहे असे त्यांना वाटले, ज्यानुसार भारतातून हे लोक जगभरात पसरले असावेत असा अंदाज त्यांनी बांधला. संस्कृत भाषेतील वेद हे या इंडो-युरोपीयन भाषाकुळातील सर्वात जुने साहित्य असून त्यात वैदिक जनांसाठी 'आर्य' हा शब्द वापरला गेला आहे. त्यावरून या भाषाकुळाच्या भाषकांसाठी त्यांनी आर्य (Aryan) हे नाव वापरण्यास सुरुवात केली.
कालौघात भाषातज्ज्ञांना उच्चारशास्त्र आणि व्याकरणाच्या अभ्यासावरून संस्कृत हे मूळ नसून संस्कृतहूनही जुनी कोणती तरी भाषा इंडो-युरोपीयन भाषाकुळाचे मूळ असावी असे वाटू लागले. तेव्हा संस्कृतसकट युरोपीयन भाषाकुळाचे मूळ असलेल्या या अज्ञात भाषेला त्यांनी प्रोटो-इंडो-युरोपियन (Proto-Indo-European) असे नाव दिले.
ज्या भाषांमध्ये साम्य आढळून आले अशा युरोपीय इंग्रजी, जर्मन पासून ते उत्तर भारतीय हिंदी, बंगाली तथा दक्षिणेकडील मराठी, कोंकणी आणि थेट श्रीलंकेतील सिंहलीपर्यंत या समस्त भाषा एकाच इंडो-युरोपियन भाषापरिवारातील जर आहेत तर कधीकाळी इंग्लंडपासून श्रीलंकेपर्यंत प्रोटो-इंडो-युरोपियन ही एकच भाषा बोलले जाणे शक्य नाही हेही तर्कसंगत जाणवले. कारण दक्षिण भारतात द्राविड, आ᳴स्ट्रो-एशियाटिक इत्यादि भाषाकुळातील भाषा बोलल्या जात. तेव्हा, प्रोटो-इंडो-युरोपियन भाषक ज्या ठिकाणाहून सर्वत्र पसरले असावेत त्या देशास अभ्यासक प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड म्हणजे मूळस्थान असे म्हणू लागले.
हे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड मूळस्थान कुठे तरी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच दक्षिण रशियात असावे असा आधारहीन विचार यातून काही अभ्यासकांनी केवळ आपल्या तर्कशक्तीच्या विस्तारावर मांडला. यामुळे वेद रचणारे संस्कृतभाषक आर्य म्हणवले जाणारे लोक बाहेरून भारतात आले असा मतप्रवाह रूढ झाला. आणि इंग्रजांच्या काळात त्यांच्या पथ्यावर पडत असल्यामुळे तो आणखीन प्रबळ करण्यात आला. या आर्य बाहेरून आले असे अंदाज लावणाऱ्या मतास Aryan Invasion Theory (AIT/AMT) म्हणतात. त्याचेच एक गोंडस स्वरूप म्हणजे Aryan Migration Theory (AMT).
या मताची काही प्रमुख विधाने आहेत
१) युरोपीय, उत्तर भारतीय, मध्य आशियातील अनेक भाषांमध्ये साम्य आहे.
२) या सर्व भाषांचे मूळ एक असेल ज्यास प्रोटो-इंडो-युरोपियन म्हणता येईल.
३) प्रोटो-इंडो-युरोपियन ही भाषा एका विशिष्ट ठिकाणी विकसित झाली ते स्थान म्हणजे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड.
४) हे प्रोटो-इंडो-युरोपियन होमलँड कुठे तरी दक्षिण रशियात असावे, म्हणजे वेद रचणारे आर्य बाहेरून भारतात आले.
उपरोक्त पहिली ३ विधाने संयुक्तिक असली तरीही चौथे विधान का निराधार आहे हे भाषाशास्त्र, ऋग्वेदीय वाङ्मय, पुरातत्वशास्त्र इत्यादि काही महत्वपूर्ण घटकांवरून पुढे इतिहास आणि भाषा संशोधक श्रीकांत तलगेरी यांनी कसे सिद्ध केले आहे हे आपण पुढे बघू.
__
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com
††**†*****
आर्य आणि त्यांचे मूळ स्थान लेख क्रमांक २
भाषाशास्त्रीय आधार
सर्वप्रथम बघू आर्य शब्दाचा नेमका अर्थ आणि उत्पत्ती काय.
संस्कृतमध्ये अरि म्हणजे जो आपल्या पुढे असतो (एकतर राजा किंवा शत्रू पण इथे अपेक्षित राजा). तेव्हा त्या अरिचे/राजाचे परिजन अर्थात् सन्मानित लोकजन म्हणून अरि या शब्दाचा साधित शब्द आर्य. आर्यचा मूळ अर्थ आपले चांगले लोक असा होतो. पण जसजशी आपल्या लोकांची परिभाषा बदलत गेली तसतसे आणखीन लोकांचा समावेश होऊ लागला. हळूहळू त्याची व्याख्या अधिकाधिक व्यापक होत गेली आणि आर्यांनी व्यापलेला जो प्रदेश तो आर्यावर्त सुद्धा तसा वाढत गेला.
ऋग्वेदात स्वतःस आर्य म्हणविणारे भरतवंशी पुरु लोक त्यांच्या शत्रूंना मृध्वाच् म्हणत. आजच्या इराणमध्ये त्याकाळी असलेले लोक स्वतःस आरिय आणि शत्रूंस तुरिय म्हणत. रामायणात युद्धकांडाच्या १६ व्या सर्गात रावण रागवल्यावर विभीषणाला अनार्य म्हणतो, म्हणजे असभ्य. थोडक्यात, असंस्कृत व्यक्तीस अनार्य म्हटले जाते. उदाहरणार्थ, यथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयबिन्दवः l न श्लेषमभिगच्छन्ति तथानार्येषु सौहृदम् ll, वाल्मिकी रामायण, ६-१६-११ (म्हणजे कमळाच्या पानांवर पडणाऱ्या पाण्याचे थेंब त्या पानांना चिकटत नाही, म्हणूनच मैत्री अनार्य लोकांना चिकटत नाही.) आज आर्य म्हणजे एखादी क्रूर, आक्रमक जमात असल्याचे आपल्यावर बिंबवणे सुरू आहे जे असंयुक्तिक आहे.
ऋग्वेदात आंगिरस, भार्गव, वासिष्ठ, वैश्वामित्र अशा अनेक ऋषींची कुळे आणि नानाविध जमातींची नावे येतात ज्यात तृक्षि (इक्ष्वाकु) सारख्या सूर्यवंशी तर यदु, तुर्वसु, दृह्यू, अनु, पुरु इत्यादि चंद्रवंशी म्हणविणाऱ्या जमातींचा अंतर्भाव होता. यापैकी ऋग्वेदात ३ ऋषीकुळे भरत नामक पुरूंशी संबंधित आहेत जी आंगिरस, वासिष्ठ, वैश्वामित्र अशी. ऋग्वेदात या तीन ऋषीकुळांनी आणि भरत लोकांनी मिळून एकूण ३१ वेळा आर्य शब्द वापरला आहे.
आज जगात १९ भाषाकुळं आहेत ज्यापैकी भारतात ६ भाषाकुळांचे अस्तित्व आढळते ते खालीलप्रमाणे
१) इंडो-युरोपियन (मराठी, हिंदी, गुजराती, नेपाळी, सिंहली, पंजाबी, बंगाली, राजस्थानी, बंगणी इत्यादि)
२) आ᳴स्ट्रो-एशियाटिक (मुंडारी, कोलमुंडा, खासी, संथाली, निकोबारी इत्यादि)
३) सिनो-तिबेटीयन (ईशान्य भारतीय, लडाखी, नागा इत्यादि)
४) द्राविड (तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, तुळू, गोंड, ब्राहुई इत्यादि)
५) बुरुषास्की (गिलगिट, बाल्टिस्तानातील स्थानिक भाषा)
६) अंदमानी (अंदमानातील वनवासीयांची भाषा)
यातील इंडो-युरोपियन, आ᳴स्ट्रो-एशियाटिक, सिनो-तिबेटीयन ही ३ भाषाकुळे जगात इतरत्रही आहेत आणि उर्वरित ३ जी द्राविड, बुरुषास्की, अंदमानी ही केवळ भारतीय उपखंडातच आढळतात.
आता जगात सर्वत्र पसरलेल्या इंडो-युरोपियन भाषाकुळाच्या १२ प्रमुख शाखा आहेत ज्या पुढीलप्रमाणे
१) इंडो-आर्यन
२) इराणीयन
३) अल्बानियन
४) आर्मेनियन
५) ग्रीक
६) बाल्टिक
७) स्लाव्हिक
८) इटॅलीक
९) जर्मनिक
१०) केल्टिक
११) तोखारीयन (आज अस्तित्वात नाही)
१२) ऍनातोलियन/हिटाईक (आज अस्तित्वात नाही)
या १२ शाखा सॅटम, केंटूम या दोन भागात विभागल्या आहेत. उपरोल्लेखित भाषांमध्ये भारतीय भाषा या इंडो-आर्यन कुळातील आहेत ज्यांचे इराणीयन भाषांशी साम्य अधिक असल्याने त्यांस एकत्रितपणे इंडो-इराणीयन म्हणतात.
ऋग्वेद हा आज उपलब्ध इंडो-इराणीयन भाषाकुळातील सर्वात प्राचीन ग्रंथ असून तो वैदिक संस्कृत भाषेत याच भारतभूवर रचला आहे. ऋग्वेदावरून आर्य एतद्देशीय असल्याचे सिद्ध करायला आपल्याला असे म्हणता येईल की
१) आजमितीला असा कोणताही लेखी, पुरातत्वीय पुरावा उपलब्ध नाही जो भारताबाहेर वैदिक अस्तित्व दर्शवेल.
२) ऋग्वेदात सर्व इंडो-युरोपियन शब्दच आहेत, त्यामुळे त्यांचा संबंध द्राविडी लोकांशी आला नाही हे लक्षात येते आणि जर संबंध येत नाही तर AIT/AMT म्हणते तसे आर्यांनी द्राविडी लोकांना दक्षिणेकडे ढकलण्याचा विषयच उद्भवत नाही.
३) ऋग्वेदात येणारी नद्यांची नावे अजूनही तीच आहेत, जर ते बाहेरील असते तर जुनी, स्थानिक भाषांतील नावे का नाहीत ?
४) आर्य बाहेरून आले असते तर त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वीच्या संस्कृती, जीवन, प्रदेशाच्या जुन्या स्मृती का नाहीत ?
आता AIT/AMT च्या तत्वांचे खंडन करणे क्रमप्राप्त ठरते.
१) AIT/AMT समर्थक म्हणतात की
१. इंडो-युरोपियन भाषांचे मूळ भारतात नाही.
२. ऋग्वेदात आर्य आगमनाचे पुरावे आहेत.
ऋग्वेदात शत्रूसाठी फक्त एकदाच अनास (अन् + आस) असा शब्द आला आहे ज्याचा वास्तविक अर्थ अस्पष्ट बोलणारा असा आहे. पण आर्य बाहेरून आले हे सिद्ध करताना AIT/AMT समर्थक म्हणतात की अनास म्हणजे चपट्या नाकाचे लोक जे येथील मूलनिवासी असून लांब नाकाच्या (युरोपीय लोकांसारखे) आर्यांनी त्यांना हाकलले.
२) वैदिक संस्कृत भाषा ही प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेस सर्वात जवळची आहे. चाईल्डने ७२ प्रोटो-इंडो-युरोपियन शब्दांची सूची दिली आहे ज्यांपैकी इंडो-युरोपियन भाषांमध्ये पुढीलप्रमाणे शब्द आढळले.
संस्कृत - ७०
ग्रीक - ४८
जर्मनिक - ४६
लॅटिन - ४०
बाल्टिक - २५
स्लाव्हिक - २३
आर्मेनियन - १६
तोखारीयन - ८
जर प्रोटो-इंडो-युरोपियनचे मूळ दक्षिण रशिया असते तर तेथील स्लाव्हिक भाषाकुळामध्ये सर्वाधिक शब्द समान असायला हवे होते पण त्याउलट संस्कृतमध्ये सर्वाधिक साम्य दिसते.
वैदिक संस्कृत, ग्रीक भाषांमध्ये शब्दांस विशिष्ट लय आहे जो पाणिनीय संस्कृतमध्ये बरेचदा जाणवत नाही.
तसेच वैदिक, ग्रीक, जर्मन, हिटाईट देवतांमध्ये साम्य आहे. (जर्मन आणि ग्रीकमध्ये परस्पर साम्य क्वचितच दिसते हेही महत्वाचे), तर इराणीयनचे साम्य वैदिकशीच आहे. इराणीयन आणि इंडो-आर्यन लोकांनी दक्षिण रशिया सोबत सोडले असे AIT/AMT म्हणते पण तसे असल्यास जे साम्य वैदिक संस्कृतीचे इतरांशी आहे तसेच इराणीयनचे असायलाच हवे होते. वेदांत जौस पितर ही देवता आहे, ग्रीकमध्ये झुस पातेर तर रोमनमध्ये ज्युपिटर बनते. यापैकी ग्रीक, रोमन या देवता असून वैदिक देवतेचाच निसर्गाशी सर्वात जवळचा अगदीच प्राथमिक संबंध आहे.
म्हणजे मूळस्थान इंडो-आर्यन भाषेला जवळच असणार. कारण मूळस्थान दक्षिण रशियात असते तर तिथून भारतात येईपर्यंत स्थानिक लोकांशी सांस्कृतिक संबंध येऊन त्यांची संस्कृती स्वीकारत इंडो-आर्यन लोकांमध्ये अनेक बदल व्हायला हवे होते जे दिसत नाहीत.
३) AIT/AMT विरुद्ध दुसरा मतप्रवाह म्हणजे Out of India Theory (OIT) ज्यांचे म्हणणे की मूळस्थान भारत असून इथूनच इंडो-युरोपियन भाषा बाहेर पडल्या. पण बाहेर जाताना त्या कोणत्या स्वरूपात होत्या यावरून या मताचे २ प्रकार आहेत
१. संस्कृत भारताबाहेर गेली असे मानणारे :
अर्थात संस्कृतचे भारताबाहेरील नगण्य अस्तित्व बघूनच याचे खंडन होते.
२. प्रोटो-इंडो-युरोपियन भारताबाहेर गेली असे मानणारे :
यावर विरोध दर्शविताना AIT/AMT समर्थक म्हणतात जर प्रोटो-इंडो-युरोपियन मूळची भारतात होती तर १२ इंडो-युरोपियन भाषाकुळांपैकी १ संस्कृतच इथे शिल्लक राहून ११ भाषाकुळं बाहेर जाणे शक्य नाही. पण जर दक्षिण रशिया मूळस्थान मानले तरी हेच म्हणावे लागेल की तिथे एक भाषाकुळ राहून इतर ११ बाहेर गेले त्यामुळे विरोध करायचा प्रश्न नाही.
अल्बानियन, आर्मेनियन, इराणीयन, इंडो-आर्यन, ग्रीक या भाषाकुळांतील संबंध बघून कळते की या भाषा सर्वात शेवटी मूळस्थान सोडून गेल्या जे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. म्हणजे आता मूळस्थान यांच्याच जवळ कुठेतरी असणार. जर दक्षिण रशिया मूळ असते तर स्लाव्हिक भाषाकुळ जे तिथे आज आहे ते हा भाग सोडून जाऊन परत तिथे आले म्हणावे लागेल जे शक्य नाही.
इंडो-युरोपियन भाषांचे सॅटम आणि केंटूम हे दोन प्रकार आहेत. आज सर्व इंडो-आर्यन भाषा सॅटम आहेत आणि युरोपात मात्र दोन्ही प्रकार आहेत. त्यामुळे असे मत होते की मूळस्थान युरोपात असेल पण या मतास तडा तेव्हा गेला जेव्हा बंगणी भाषा (उत्तराखंड) आणि मध्य आशियात लुप्त झालेले तोखारीयन हे भाषाकुळ केंटूम आहे असे सिद्ध झाले.
AIT/AMT समर्थक म्हणतात की भारतात द्राविड, आ᳴स्ट्रो-एशियाटिक भाषा असताना मूळस्थान भारत कसे असणार ? पण जसे इंग्लिश ही मूळची इंग्लंडची भाषा जी आज अमेरिका, ऑस्ट्रेलियातही बोलली जाते आणि मूळच्या इंग्लंडमध्ये मात्र आजही आयरिश, वेल्स, स्कॉटीश वगैरे भाषा आहेत जे उपरोक्त तर्क चूक ठरवते. तसेच दक्षिण रशियातही इंडो-युरोपियन नसलेल्या युरालिक, अल्टाईक, कॉकसीन वगैरे भाषा आहेतच.
द्राविडी भाषक येथील मूळनिवासी होते हे दाखवताना AIT/AMT समर्थक म्हणतात की बलुचिस्तानात अजूनही द्राविडी कुळातील ब्राहुई लोक आहेत जे आर्यांनी हाकलूनही गेले नाहीत पण आज हेही सर्वमान्य आहे की ब्राहुई दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले आहेत. त्यामुळे AIT/AMT चा हा तर्कही फोल ठरतो.
४) अजूनही उत्तर भारत, पाकिस्तानच्या भागात जिथे आर्यांनी आक्रमण केले म्हणतात तिथे भौगोलिक घटकांची नावे संस्कृतच आहेत, जसे अमेरिकेत मिसिसिपी, शिकागो ही रेड इंडियन नावे आहेत किंवा लंडन वगैरे जसे इंग्लिश पूर्व काळापासून आहेत तसेच. किंबहुना युरोपीय नद्यांची नावे इंडो-युरोपियन पूर्वीची आहेत पण ऋग्वेदात येणारी नद्यांची नावे अजूनही तीच आहेत, जर इंडो-आर्यन बाहेरील असते तर जुनी, स्थानिक भाषांतील नावे उपलब्ध का नाहीत ?
५) पूर्व युरोपातील युरालिक भाषा (ज्या इंडो-युरोपियन नाहीत) जशा फिनिक, हंगेरीयन आदींमध्ये इंडो-इराणीयन शब्द विपुल आहेत ज्यावरून इंडो-इराणीयन तिथून आल्याचा तर्क लावला गेला. हे खोटे यावरून सिद्ध होते की इंडो-इराणीयनमध्ये युरालिक शब्द नाहीत म्हणजेच हे लोक तिथून आलेले नाहीत. उलट इराणीयन लोकांचे समूह पूर्व युरोपात गेले ज्यांच्याकडून या युरालिक भाषांनी शब्द घेतले. इंग्रजांनी जगभरात जाऊन इंग्लिश शब्द इतर भाषांना दिले आणि त्यांचे आपल्या भाषेत घेतले पण कायमस्वरूपी बाहेर स्थायिक न होता त्यांनी स्वदेशी जाऊन ते शब्द आपल्या भाषेत आधी रूढ केले म्हणून इंग्लिशमध्ये इतर भाषांचे आणि इतर भाषांमध्ये इंग्लिश शब्द आढळतात. याविरुद्ध दोन शतकांपूर्वी भारतातून फिजी, मॉरिशस तर पूर्वी आग्नेय आशियात गेलेल्या लोकांनी अशी देवाणघेवाण केली पण तिकडील स्थानिक शब्द आपल्या मायदेशी परत येऊन मूळ भाषेत मिसळले नाहीत कारण ते विदेशातच स्थायिक झाले. तसेच इथेही युरालिक लोकांचे झाले की इंडो-इराणीयन शब्द युरालिक भाषांमध्ये आहेत पण युरालिक भाषांचे या इंडो-इराणीयनमध्ये नाहीत. मध्य आशियातील आणि भारतीय पशूंची नावेही युरालिक भाषांमध्ये आहेत जरी तिथे ते पशु नसले तरी. ही नावे इतर युरोपीय भाषांमध्ये दिसत नाहीत.
६) AIT/AMT समर्थक म्हणतात की जर भारतातुन आर्य युरोपात गेले तर भारतीय वाघ, सिंह, झाडांची नावे युरोपियन भाषांमध्ये का नाहीत ? पण हे असत्य ठरवायला जिप्सी भाषा पुरेशी आहेत. या लोकांनी ख्रिस्तपूर्व ३०० च्या सुमारास भारत सोडूनही आज त्यांच्यात इंडो-आर्यन नावे नाहीत.
यावरून सिद्ध होते की भाषाशास्त्रानुसार आर्य भरताबाहेरून आलेले आक्रमक नसून एतद्देशीय रहिवासी होते.
__
स्रोत :
१) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda : A Historical Analysis
२) श्री श्रीकांत तलगेरी लिखित The Rigveda and the Avesta : The Final Evidence
- शुभम् जयंत सरनाईक©
sjsarnaik37@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)