Friday, September 16, 2022
भारतीय पोस्टल पिन कोड ला 50 वर्ष पूर्ण:
भारतीय पोस्टल पिन कोड ला 50 वर्ष पूर्ण:
काल ज्यावेळी भारताच्या स्वात्र्यंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली त्याच वेळी भारताने आणखी एक टप्पा गाठला. 15 ऑगस्ट 1972 ला भारताने प्रथमच पोस्टल पिन कोड ची व्यवस्था राबवली. ह्या गोष्टीला काल 50 वर्ष पूर्ण झाली.
आलेली पत्रे नीट विभागवार वेगळी करण्यासाठी पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी त्यावर उपाय म्हणून पिन कोड पद्धती शोधून काढली. १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली गेली. त्यामुळेच श्रीराम भिकाजी वेलणकर यांना 'पिन कोड कोड' प्रणालीचे जनक म्हणतात. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली हे खरं.
श्री वेलणकर हे भारतीय पोस्ट आणि टेलिग्राफ समितीचे वरिष्ठ सभासद आणि केंद्रीय दूरसंचार विभागाचे सचिव होते. ते एक संस्कृत तज्ञ सुद्धा होते आणि "देववाणी संस्कृतम" या त्यांच्या मुंबईतील संस्थेतर्फे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी अनेक संस्कृत अभ्यासक्रम तयार केले आणि काही संस्कृत पुस्तके सुद्धा लिहिली. त्यांना माझे विनम्र अभिवादन.
माधव भोळे
नेट हिप्नॉटीसम
नेट हिप्नॉटीसम
नुकतेच 14 ऑगस्ट 22 ला शिवसंग्राम संघटनेचे मराठा नेते कै विनायकराव मेटे याचे दुःखद अपघाती निधन झाले आणि त्यानंतर इंटरनेट वर "रोड हिप्नॉटीसम" ह्या विषयावर काही पोस्ट फिरू लागल्या.
अशाच काही वेगवेगळ्या प्रकारच्या हिप्नॉटीझम मध्ये आपले अनेक अपघात / नुकसान होण्याची शक्यता असते पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही. त्यातील एक म्हणजे नेट किंवा फेसबुक हिप्नॉटीसम किंवा तत्सम हिप्नॉटीसम हे होत असते.
आज सकाळचीच गोष्ट बघा. फक्कड पैकी चहा घेवून मी सोफ्यावर बसलो होतो आणि सौ. नि गॅसवर दूध ठेवले आणि मला म्हणाली थोडे दुधाकडे लक्ष ध्या आणि ती तिच्या कामाला बाहेर निघून गेली. जवळच मोबाईल होता त्यावर नेहमीच्या पोस्ट बघता बघता अचानक एक पोस्ट दिसली "बुक युवर रूम इन पुंतामिता" आणि एका महाकाय हॉटेलचे चित्र होते.
हे पुंतामिता नाव मी प्रथमच ऐकले होते त्यामुळे कुतूहल म्हणून मी सहजच नेट वर शोधायला सुरवात केली तर ते दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको देशातील नियारीट राज्यातील 1500 एकर जमिनीचा खाजगी तुकडा असलेली मालमत्ता आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही बाजूने निळेशार स्फटिकासमान स्वच्छ असलेले पाणी असलेला बंडारसचा समुद्र किनारा. फोर सिझन हॉटेल्स चेन पैकी 177 हॉटेल रूम्स असलेले एक हॉटेल त्या ठिकाणी आहे तसेच सेंट रेगिस सारखी इतर ही काही उंची हॉटेल्स आणि खाजगी पर्यटक बंगले तेथे आहेत. वर्षभर सुसह्य आणि आल्हाददायक वातावरणामुळे अनेक पर्यटक तेथे येत असतात. पर्यटनाला पूरक म्हणून तेथे 20 रेस्टॉरंट ( भोजनालय), बार्स (दारूचे गुत्ते ), किराणा मालाची सुपर मार्केटस, कपड्यांची दुकाने, पर्यटन व्यवसाईकांची ऑफिसेस, सामुद्रिक आणि साहसी खेळाचे साहित्य पुरवणारी दुकाने इत्यादी पर्यटन व्यवसाया संबंधी पूरक वातावरण तेथे आहे. जगभरातील तसेच अमेरिकेतील श्रीमंत अशा कालिफोर्निया, सिलिकॉन व्हॅली मधील मंडळी येथे मजेसाठी येत असतात. ( यातील फोर सिझन हॉटेल हे बिल गेट्स ने लिलावात विकत घेतले).
एव्हडे सुंदर वर्णन वाचून मी मनाने तेथील फेसाळलेल्या समुद्र किनाऱ्यावर सर्फिंग करायला लागलो, नंतर एक शिडाची बोट होती त्यात बसलो आणि डोलकाठी वर लटकवलेल्या त्या शिडाची दोरी सोडून त्याला वाऱ्याच्या दिशेने फडकावून खोल समुद्रात बोटीने घुसलो. तेथील फेसाळलेले चमकणारे पाणी आणि ऑक्सिजनने परिपूर्ण शुद्ध हवा घेऊन तर मन अमृत प्याल्यासारखे प्रफुल्लित झाले. आता आणखी काही नको होते. स्वर्गसुख म्हणजे काय याची झलक येथेच आली होती.
एव्हढ्यात बेल वाजल्याचा आवाज कानावर आला. कसा बसा धडपडत मी उठलो आणि दरवाजा उघडला तर समोर रागाने लाल बुंद झालेल्या सौभाग्यवती हातात भाजीच्या आणि किराणा सामानाच्या पिशव्या घेऊन उभ्या होत्या आणि त्यांनी सुरवात केली. "अहो मगाच पासून 10 बेल मारल्या. लक्ष होते कोठे तुमचे? आणि हा गॅस वर दूध करपल्याचा वास नाही का आला तुम्हाला? त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी मी भानावर येऊन प्रथम गॅसवरील दूध बघायला गेलो तर दूध उतू जाऊन गॅसच्या चुलीवर पडून ते जळले होते त्याचा वास सबंध घरात दरवळला होता. अर्धे अधिक दूध फुकट गेले होते.
अपराधी भावना मनात निर्माण झाल्यामुळे गपचूप काहीही न बोलता गॅस वरील पडलेल्या दुधाची सफाई करून पटकन अंघोळीला गेलो म्हणजे पुढची बोलणी ऐकायला नकोत म्हणून. खरे म्हणजे त्या पुंता मिता ची महती मला तिला सांगायची होती पण तवा बराच गरम असल्यामुळे मी ती यथावकाश सांगण्याचे ठरवले. उगाच आताच भडका नको उडायला.!!
अंघोळ करता करता हिप्नॉटीसम हिप्नॉटीसम म्हणतात ते हेच काय असा मी विचार करता करता "नेट हिप्नॉटीसम" हा एक शब्द सुचला आणि मी हा लेख लिहायचे ठरवले.
असो, अशी बेटे आपल्या केरळ मध्ये सुद्धा आहेत बर का? आणि हो आपल्या रत्नागिरी जवळील आरे वारे काही कमी नाही पण महाराष्ट्र शासनाला चांगला पर्यटन मंत्री लाभला तर ते नक्कीच जगातील पर्यटनाचे केंद्र बनेल यात शंका नाही.
माधव भोळे
मराठा साम्राज्याचे मुख्य इंजिनिअर, श्री हिरोजी इंदुलकर
आज 15 सप्टेंबर. आजचा दिवस भारताचा महान इंजिनिअर सुपुत्र सर एम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस हा इंजिनिअर दिवस म्हणून भारतात पाळला जातो.
या दिवशी आणखी एका महान इंजिनिअरची आठवण होते ते म्हणजे मराठा साम्राज्याचे मुख्य इंजिनिअर, श्री हिरोजी इंदुलकर. त्या काळी वास्तुविशारद आणि इंजिनिअर अशा दोन वेगवेगळ्या शाखा नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी साम्राज्याचे मुख्य वास्तुविशारद म्हणून काम केले. त्यांनी भव्य सिंधुदुर्ग आणि रायगड किल्ला बांधला जो दूरदर्शी वास्तुविशारदाच्या स्थापत्यकलेचे तेज प्रतिबिंबित करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग ही अभियंता आणि वास्तुविशारद स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर यांची कालातीत निर्मिती आहे. त्यांनी बांधलेला भव्य किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराजवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिश आणि पोर्तुगीजांपासून किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला बनवला. मालवणच्या किनाऱ्यालगत असलेल्या खुर्ते बेटावर, अरबी समुद्राने वेढलेला सिंधुदुर्ग म्हणजे समुद्रातील किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती हा एक ऐतिहासिक प्रवास आहे. दिवंगत श्री हिरोजी इंदुलकर यांची सिंधुदुर्गच्या बांधकामाचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
भव्य सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी तीन वर्षे आणि 3000 मनुष्यबळ लागले. 1674 मध्ये, बांधकामाची संपूर्ण प्रक्रिया मुख्य वास्तुविशारद स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली होती. वारा, समुद्र आणि मुसळधार पाऊस यांसारखी अनेक आव्हाने असली तरी द्रष्ट्या वास्तुविशारदाने सृष्टीच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ शकत नाही याची काळजी घेतली. स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर हे खरे सूत्रधार होते. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ३००० लोकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी त्याने गोव्यातील १०० पोर्तुगीज अभियंत्यांना कामावर घेतले.
प्लिंथची पातळी 25 फुटांवर आल्यानंतर अचानक संरक्षक भिंत कोसळली. मध्य समुद्राची माती भक्कम पाया देऊ शकली नाही. स्वर्गीय श्री हिरोजींनी जवळच्या ब्रिटीश गोदामात एक वाटाघाटी केली, शिसे विकत घेतले आणि ते वितळवून संरचनेचा पाया तयार केला. संसाधन व्यवस्थापन, नियोजन, रचना आणि संकट व्यवस्थापन या बाबतीत तो खरोखरच त्याच्या काळापेक्षा खूप पुढे होता.
48 एकरांवर पसरलेला, सिंधुदुर्ग किल्ला हा अभिजातता आणि स्थापत्यशास्त्रातील कौशल्याचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे. 52 बुरुजांनी युक्त असलेली ही भव्य भिंत काळाच्या कसोटीवर उतरली आहे आणि आजही आपल्या मंत्रमुग्ध सौंदर्याने लोकांना मोहित करत आहे. अवाढव्य भिंती, बांधणीची शैली, छुपे प्रवेशद्वार यामुळे हा किल्ला अधिक वैचित्र्यपूर्ण आणि विलोभनीय दिसतो. दिल्ली दरवाजा किंवा लपलेले प्रवेशद्वार तुम्हाला परिचित असल्याशिवाय कुठूनही दिसत नाही. किल्ल्यातील पाण्याखालची वाट खरोखरच विलोभनीय आहे.
मराठ्यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यामागील कथा वास्तुविशारदाची प्रचंड उत्कटता दर्शवते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हा ऐतिहासिक किल्ला बांधण्याची जबाबदारी दिली होती. स्व.श्री हिरोजींनी रायगड किल्ला बांधण्यास सुरुवात केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत दिवस घालवत होते. काम करत असताना, वास्तुविशारदाच्या लक्षात आले की त्याच्याकडे पैसे शिल्लक नाहीत आणि राजाने सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी त्याने आपली जमीन आणि घरासह सर्व मालमत्ता विकल्या.
छत्रपती शिवाजी महाराज बंदिवासानंतर परत आले तेव्हा अद्भूत रायगड किल्ला आणि स्वर्गीय हिरोजींच्या समर्पणाने त्यांस पूर्णपणे प्रभावित केले. त्याने त्याच्या मुख्य आर्किटेक्टला बक्षीस म्हणून काय हवे आहे ते विचारले. स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर हे इतिहासातील सर्वात निःस्वार्थ अभियंते होते ज्यांनी आपल्या कलाकुसरीबद्दल अंतहीन उत्कटता बाळगली होती. तो जगात काहीही मागू शकला असता, पण त्याऐवजी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या नावावर कोरलेली एक छोटीशी फरशी भेट देण्यास सांगितले.
दगडात कोरलेली ही पाटी रायगड किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावली जाईल जेणेकरून महाराज मंदिरात गेल्यावर त्यांचे पाय स्वर्गीय श्री हिरोजींच्या नावाला स्पर्श करतील आणि त्यांच्या मस्तकावर अभिषेक करतील. छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर यांनी समर्पित केलेल्या जगदीश्वर (संपूर्ण जगाचे देव) मंदिराची ही पहिली पायरी आहे. ‘सेवेच्या ठायी तत्पर, हिरोजी इंदुलकर’ असा उल्लेख असलेला शिलालेख जगदीश्वर मंदिरात आजही पाहायला मिळतो.
संसाधन व्यवस्थापन, नियोजन, रचना किंवा संकट व्यवस्थापन असो, स्वर्गीय श्री हिरोजी इंदुलकर त्यांच्या काळात खरोखरच अतुलनीय पुढे होते.
त्या महान वास्तू विशारद आणि इंजिनिअरला आज 15 सप्टेंबर या इंजिनिअर दिवशी नम्रता पूर्वक नमस्कार
माधव भोळे
Tuesday, August 16, 2022
राकेश झुंनझुनवला, शेयर मार्केट मधील एक जादूगार, हरपला.
राकेश झुंनझुनवला, शेयर मार्केट मधील एक जादूगार, हरपला.
जसे वॉरेन बफेट हे नाव जगात एक तज्ञ गुंतवणूकदार म्हणून आहे तसे भारतीय शेयर बाजारात राकेश झुंनझुनवला हे नाव तेव्हडेच तज्ञ गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाते. 5 जुलै 1960 साली इन्कमटॅक्स कमिशनर च्या घरी जन्मलेले राकेश सिडनह्याम कॉलेज चर्चगेट चे विद्यार्थी असून त्यांनी पुढे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ची चार्टर्ड अकाउंट ही पदवी प्राप्त केली.
1 एप्रिल 1979 साल हे बेस वर्ष म्हणून 100 पॉईंट्स धरलेला मुंबई शेयर बाजाराचा इंडेक्स 1986 साली 150 पॉईंट आणि 1989 साली 750 पॉईंट एव्हडा होता. ( सध्या शेयर मार्केट इंडेक्स 58,000 चे आस पास असतो). 1985 साली कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेयर मार्केट मध्ये आपल्या स्वतःच्या बचतीमधून 5000 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरवात केली. त्याच्या वडिलांनी स्वतःकडील पैसे त्याला कधीच गुंतवायला दिले नाहीत तसेच।मित्रांकडून पैसे घेऊन गुंतवणूक करायला सुद्धा मना केली. तरीपण स्वकर्तुत्वाने त्याने या विषयाचा अभ्यास करून काही विशिष्ट कंपन्या शोधून त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली.
1986 साली टाटा टी मध्ये 43 रुपये प्रति शेयर या प्रमाणे 5000 शेयर घेऊन पुढील तीन महिन्यात 143 ला तो पोहोचल्यावर त्यांनी रु 5 लाखाचा पहिला घसघशीत नफा मिळवला. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढत जाऊन अनेक कँपन्यांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. छोट्या कँपन्यांमधील हिरे शोधून काढुन त्यात गुंतवणूक करायची, त्यातील शेयर एकंदर भांडवलाच्या 5% पेक्षा जास्त झाल्यामुळे अनेक कँपन्यांमध्ये त्यांना नियामक मंडळात निर्देशक म्हणून स्थान मिळाले.
ऍपटेक लिमिटेड आणि हंगामा मेडिया ह्या कँपन्यांचे ते अध्यक्ष बनले तर व्हाईस रॉय हॉटेल्स, काँकॉर्ड बायोटेक, प्रोव्होग, जिओजिट फायांनान्शियल ह्या कँपन्यांचे ते निर्देशक असुन स्टार हेल्थ, टायटन, रॅलीस इंडिया, एसकोर्टस, इंडियन हॉटेल्स, ऍग्रो टेक फूड, नजारा टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स, प्राज इंडस्ट्रीज, सारख्या 47 नावाजलेल्या कँपन्यांमध्ये त्यानी गुंतवणूक केली आहे. हर्षद मेहेताच्या काळात सुरवातीला त्यांनी भरपूर पैसे कमावले पण नंतर थोडा फटका सुद्धा बसला. त्यांच्या टायटन, क्रीसिल सारख्या कँपन्यांमधील शेयरच्या गुंतवणुकीचे मूल्य 11,000 करोड चे वर आहे. राकेशच्या एकंदर शेयर्स चे बाजारी मूल्य 48000 कारोड आहे. त्याच्या पोर्टफोलिओ मधील बरीचशी गुंतवणूक टाटा ग्रुप ची आहे हे बघितल्यावर लक्षात येईल. त्याची पत्नी रेखा झुंनझुनवला सुद्धा मोठ्या गुंतवणूकदार आहेत. स्वतःचे 5.8 बिलियन डॉलर एव्हडी संपत्ती असलेले राकेश भारतातील 36 वे आणि जगातील 438 वे श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचे 2022 च्या फोर्ब्स च्या श्रीमंतांच्या यादीत नाव आले आहे. राकेश चे नाव शेयर बाजारातील व्यक्तींमध्ये एव्हडे प्रसिद्ध होते की ज्या शेयरमध्ये त्याने खरेदी ला सुरवात केली त्याचे भाव थोडेच दिवसात वर जात, जणूकाही परिस स्पर्शच.
5 ऑक्टोबर 2021 ला श्री नरेंद्र मोदी यांची आणि राकेश ची नवी दिल्लीत एक छोटी भेट झाली आणि त्यात राकेश म्हणाले की आता भारताची वेळ आली आहे आणि आपल्या कल्पनेपलीकडे भारतात सुधारणा होत आहे तसेच राकेश भारतीय अर्थव्यवस्थेवर उत्साही आणि खुश आहेत. त्याच्या मते 2030 मध्ये भारताचे दर डोई उत्पन्न 6000 डॉलर असेल ( सध्या ते साधारण 2000 डॉलर आहे). आणि भारताचे सेव्हिंग साधारण 3 ट्रेलियन डॉलर एव्हडे असेल.
नुकतेच डिसेंबर 2021 ला त्यानी आकासा एयर नावाची बजेट एयरलाईन काढली आणि त्याची सुरवात 7 ऑगस्ट 2022 ला झाली. या बाबतीत बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केले की जगभर एयरलाईन्स तोट्यात असताना त्याने हे धाडस करण्याचे कारण काय? त्यावर तो म्हणाला की मी अपयशी झालो तरी चालेल पण प्रयत्न केले नाही से नको व्हायला.
आज ( 14.08.2022) सकाळी त्यांचे ब्रिजकांडी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 62 व्या वर्षी हार्ट अटॅक ने निधन झाले. गेले काही वर्षे त्यांना किडनीचा सुद्धा आजार होता.
झाले बहू, होतील बहू पण या सम हा. तेथे कर माझे जुळती.
एका आयुष्यात सन्मार्गाने एव्हडी संपत्ति जमवणाऱ्या राकेश ला माझा सलाम आणि भाव पूर्ण श्रद्धांजली.
माधव भोळे
ब्राह्मण संस्था आणि प्रगती
12.08.22
ब्राह्मण संस्था आणि प्रगती;
काल एक आजोबा भेटले होते. ते कुठल्याशा ब्राह्मण सभेच्या वार्षिक सभेला गेले होते. म्हणाले काय सांगू तुम्हाला, सकाळी 10 वाजता सभा सुरू झाली ती संध्याकाळी 5 वाजता अडजर्न करायची वेळ आली, आणि हे दरवर्षीचेच आहे.
एका पेक्षा एक सुशिक्षित लोक आहेत पण मुद्यावरून गुद्यावर कधी येतील सांगता येत नाही. एकमेकांना समजावून सांगणे राहिले बाजूला पण प्रत्येकाला वाटते की मीच शहाणा आणि समोरच्याला काही समजत नाही. बरे प्रत्येकाला वाटते की मी जे बोलतो ते समाज हिताचच आहे. पण मग एव्हडे एकमेकांच्या विरुद्ध का आणि कसे? त्याचे कारण गटबाजी आणि अहंकार. अमक्याची मी चार लोकांत कशी हजामत केली हे सांगण्यात त्यांना आनंद वाटतो. पण त्यांना सांगा की अमुक दिवशी संस्थेत काम आहे जरा येशील का मदतीला, मग शंभर कारणे सांगतील. बरे दुसऱ्याने केलेल्या कामाची कदर नाही आणि समजून घ्यायची तयारी नाही.
यांच्या बापजाद्यानी पै पै जमवून इस्टेटी उभ्या केल्या, त्यातून काही काळ उत्पन्न मिळत होते पण आता महागाई मुळे उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. देणगीदार स्वयंकेंद्रीत झाल्यामुळे आखडले. त्यात हे असे घोळ बघितले तर कोण येणार ह्या बजबजपुरीमध्ये? त्यामुळे तरुण वर्ग लांब आणि हे अनुभवी भांडत बसले आपसात तर कशी प्रगती होणार आपल्या समाजाची सांगा मला?
ते म्हणतात ठीक आहे एखाद्या मुद्यावर नाही पटणार म्हणून काय सर्वच मुध्ये चुकीचे असू शकतील का? पण कोणी एखादी सूचना केली की त्याला उपसूचना आलीच म्हणून समजा, मग मूळ सुचनेवरील चर्चा राहते बाजूला आणि उपसूचनेवरच चर्वण होते. या मध्ये सामान्य सभासदांचा वेळ फुकट जातो आणि तो निराश होतो.
मी त्या काकांना म्हटले की जर अशी परिस्थिती असेल तर त्या मंडळींनी प्रथम ज्या विषयात मतभिन्नता आहे किंवा होईल असे वाटते त्या विषयावर स्वारस्य ( interested ) असलेल्या माणसांचा अभ्यासगट नेमावा, त्यावर त्या अभ्यास गटात सखोल चर्चा व्हायला हवी. मत पटत नाही म्हणून बहिष्कार टाकणारी व्यक्ती किंवा आपले मत ग्राह्य व्हावे म्हणून गटबाजी करणारी व्यक्ती यात न घेतलेली चांगली पण जे चार चांगले लोक आहेत ते तरी त्या विषयाचा अभ्यास करून त्याचा अहवाल कार्यकारीणीला सादर करतील आणि मग कार्यकारिणी त्यावर विचार करून निर्णय घेईल म्हणजे वार्षिक सभेतील बरेचसे मुध्ये आधीच निकाली लागलेले असतील.
पण हे करण्यासाठी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ? माझ्या मते कार्यकारिणीने हे काम करावे म्हणजे सभासद, ( minority) स्टेक्स होल्डर किंवा विरुद्ध मत असलेल्या व्यक्तीची बाजूसुद्धा ऐकली जाते आणि जे संस्थेच्या हिताचे त्याचा निर्णय होतो. मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐका हे आपापल्या घरी ठेवून संस्थेचे हित ते माझे हा विचार असायला हवा. अनेक लोक अशा संस्थांमध्ये येतात ते मोठेपणा घेण्यासाठी किंवा आपला मोठेपणा मिरवण्यासाठी. त्यांचा इगो एव्हडा मोठा असतो की त्यांना अशा गोष्टी कोणीही समजावून सांगू शकत नाही. त्यांच्या अशा वागण्यामुळे विरोधी वातावरण तयार होऊन संस्थेच्या आणि पर्यायाने समाजाच्या प्रगतीमध्ये अडसर निर्माण होतो.
माझा अनुभव सांगतो. आमच्या गावात कित्येक वर्षे (70) दोन मंडळे आहेत एक मुंबईकर आणि दुसरे ग्रामस्थांचे मंडळ आणि दोन्ही एकाच देवस्थानासाठी काम करतात पण पूर्वी पासून ही मंडळे विभक्त आहेत. मी ज्यावेळी आमच्या मुंबईच्या मंडळाचा सचिव झालो, त्यावेळी ही गोष्ट माहिती असल्यामुळे गावच्या मंडळातील अध्यक्षांना एक चार ओळींचे पत्र लिहिले "आपले मंडळ गेले कित्येक वर्षे श्रींची सेवा अतिशय उत्तम रीतीने करत आहे आणि ह्या पत्राद्वारे आमचे मंडळ त्याची दखल घेत आहे". उलट टपली त्यांच्या सचिवांचे पत्र आले. लिहितात, "गेल्या 75 वर्षात तुमच्या मंडळाने असे कधी म्हटले नाही. तू जी कौतुकाची थाप आमच्या मारलीस त्यामुळे आनंद वाटला. तुम्ही आमच्या कामाची दखल घेतलीत यातच सर्व आले. या पुढे तू कुठलेही मंदिराचे काम सांग आमचे संपूर्ण सहकार्य असेल." त्या प्रमाणे गेल्या 14 वर्षात आम्हाला त्यांचेकडून सम्पूर्ण सहकार्य मिळाले आहे आणि जोपर्यंत ही भावना राहील तोपर्यंत हे सुरूच राहील.
मी म्हणतो दुसऱ्याला मोठेपणा दिल्याने किंवा त्याच्या कामाचे कौतुक केल्याने काही नुकसान होत नाही उलट झाला तर फायदाच होतो पण त्यासाठी आपले मन मोठे असावे लागते.
मला एका शिक्षकाने सांगितलेली गोस्ट आठवते. एका पुलावर दोन मोठे शिंगवाले बकरे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत होते. पूल एव्हडा छोटा होता की एकावेळी एकच प्राणी जाऊ किंवा येऊ शकत होता. हे समोरासमोर आल्यामुळे एकमेकांचा पुढे जाण्याचा रस्ता अडकला आणि ते लागले एकमेकांत शिंग घालायला. मग त्यातील एक समजूतदार बकरा होता तो खाली बसला आणि दुसऱ्या बकऱ्याला त्याच्या पाठीवरून पाय देऊन पुढे जाण्याची खूण केली. दुसरा बकरा पुढे गेला आणि त्याने त्याचे आभार मानले आणि विचारले की तू असे का केलेस? त्यावर तो म्हणाला आपण दोघे एकमेकांना शिंग मारत बसलो असतो तर दोघेही रक्तबंबाळ झालो असतो. आता तू तुझ्या मार्गाला जाऊ शकतोस आणि मी माझ्या. मी वाकुन खाली बसलो म्हणून कमजोर नाही हे समजून घे.
माधव भोळे
भारतीय राष्ट्रध्वज संहिता 2002 ( 30 डिसेंबर 2021 च्या सुधारणा सहित;)
मी घर घर तिरंगा वापरण्याचा लेखावर अनेक लोकानी समाधान व्यक्त केले पण अनेकांना त्याबद्दलचे नियम माहिती हवे होते. ते खालील प्रमाणे:
भारतीय राष्ट्रध्वज संहिता 2002 ( 30 डिसेंबर 2021 च्या सुधारणा सहित;)
यंदा भारत 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हर घर तिरंगा ही मोहिम सुरु केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वज भारतातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा दर्शवतो. हे आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे आणि राष्ट्रध्वजाबद्दल सर्वत्र आपुलकी, आदर आणि निष्ठा आहे. भारतीय राष्ट्रध्वज फडकवणे/वापरणे/प्रदर्शन करणे हे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ आणि भारतीय ध्वज संहिता, २००२ द्वारे नियंत्रित आहे.
भारतीय ध्वज संहिता, २००२ ची काही ठळक वैशिष्ट्ये:
अ) संहिता, २००२ मध्ये ३० डिसेंबर २०२१ ला सुधारणा करण्यात आली तीच्या आदेशानुसार भारतीय ध्वज आणि पॉलिस्टर किंवा मशीनपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाला परवानगी देण्यात आली. आता, राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा यंत्राने बनवलेल्या, कापूस/पॉलिस्टर/लोकर/रेशीम / खादीचा असेल.
ब) सार्वजनिक, खासगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेचा सदस्य राष्ट्रध्वजाच्या सन्मान आणि प्रतिष्ठा राखून सर्व दिवस आणि प्रसंगी, राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो/प्रदर्शन करू शकतो.
क) भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये १९ जुलै, २०२२ च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आणि भारतीय ध्वज संहितेच्या भाग-II च्या परिच्छेद २.२ चे खंड (xi) खालील कलम बदलले :- (xi) “जेथे ध्वज उघड्यावर प्रदर्शित केला जातो किंवा सामान्य नागरिकाच्या घरावर प्रदर्शित केला जातो तेथे तो रात्रंदिवस फडकू शकतो. ( पूर्वी तो संध्याकाळी उतरवायला लागायचा)
ड) राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती असावा. ध्वज कोणत्याही आकारमानाचा ( Size) असू शकतो परंतु ध्वजाची लांबी आणि उंची (रुंदी) यांचे गुणोत्तर ३:२ असावे. त्याच वेळी, पांढर्या पट्टीच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये 24 आरे असणे आवश्यक आहे.
इ) जेव्हा जेव्हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जातो तेव्हा तो सन्मानाचे स्थान व्यापलेला असावा आणि तो सुस्पष्टपणे लावला गेला पाहिजे.
फ) खराब झालेला किंवा विस्कटलेला ध्वज प्रदर्शित केला जाऊ नये.
ग) राष्ट्रध्वज एका मास्टहेडवरून इतर कोणत्याही ध्वज किंवा ध्वजांसह एकाच वेळी फडकवू नये.
ह) ध्वज संहितेच्या भाग III च्या कलम IX मध्ये नमूद केल्यानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल इत्यादी मान्यवरांशिवाय इतर कोणत्याही वाहनावर ध्वज फडकवू नये.
य) इतर कोणताही ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा वर किंवा शेजारी ठेवू नये.
घरावरही तिरंगा फडकावू शकता.
हा कायदा तिरंगा फडकवण्याचे नियम आणि कायदे (Flag Hosting rules) ठरवतो. याबाबत भारतीय माहिती सेवा अधिकारी (IIS) डॉ. प्रेम कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. डॉ. प्रेम हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या बिलासपूर, छत्तीसगड येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयात क्षेत्रीय प्रचार अधिकारी आहेत.
डॉ. प्रेम यांनी सांगितले, की पूर्वी सामान्य लोकांना त्यांच्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकावण्याची परवानगी नव्हती. रात्रीच्या वेळीही तो फडकवण्यास मनाई होती. 22 डिसेंबर 2002 नंतर सामान्य लोकांना त्यांच्या घरांमध्ये किंवा कार्यालयात परवानगी मिळाली. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तिरंगा फडकवण्याची परवानगी 2009 साली देण्यात आली होती. स्टेजवर तिरंगा फडकवताना वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असते तेव्हा तिरंगा नेहमी उजव्या बाजूला असावा.
या गोष्टी आहेत निषिद्ध
1) ध्वजावर काहीही लिहिणे, बनवणे बेकायदेशीर आहे.
2) राष्ट्रध्वज कोणत्याही वाहनाच्या मागे, विमानात किंवा जहाजावर लावता येत नाही.
3) राष्ट्रध्वज कोणत्याही वस्तू, इमारती आदी झाकण्यासाठी वापरता येत नाही.
4) कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज जमिनीला स्पर्श करू नये.
5) ध्वजाचा वापर गणवेशासाठी किंवा सजावटीसाठी करता येत नाही.
6) राष्ट्रध्वजापेक्षा दुसरा कोणताही ध्वज ठेवता किंवा उंच करता येत नाही.
भारतीय राज्यघटनेनुसार, राष्ट्र विभूती असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ध्वज काही काळ खाली केला जातो आणि राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. ज्या इमारतीत त्या विभूतीचे पार्थिव ठेवण्यात आले आहे, त्याच इमारतीचा तिरंगा खाली केला जातो. मृतदेह इमारतीच्या बाहेर काढल्यानंतर तिरंगा पूर्ण उंचीवर फडकवला जातो. त्याचबरोबर देशातील महान व्यक्ती आणि हुतात्म्यांच्या पार्थिवांना तिरंग्यात गुंडाळून आदरांजली वाहिली जाते. मात्र, तिरंग्याची भगवी पट्टी डोक्याच्या बाजूला आणि हिरवी पट्टी पायाला असावी, याची काळजी घेतली जाते.
प्रसार माध्यमातून प्रसारित झालेल्या माहितीनुसार
माधव भोळे
ग्रेट व्हेंचर कॅपिटालिस्ट मासायोशी सोन
ग्रेट व्हेंचर कॅपिटालिस्ट मासायोशी सोन
नुकतेच आपण वाचले असाल की जपानीज व्हेंचर कॅपिटल फ़ंड सॉफ्टबॅंक ने आपल्याकडे असलेल्या चिनी इंटरप्रिनर जॅक मा च्या "अलिबाबा. कॉम" च्या होल्डिंग कम्पनीचे आपल्याकडे असलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त किमतीचे शेयर्स प्रीपेड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मध्ये २२ बिलियन डॉलर्स ना विकले.
आधी प्रीपेड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते समजावून घेऊ या. जर एखादया व्यक्तीकडे किंवा व्यावसायिक समूहाकडे एखाद्या कम्पनीचे मोठ्या प्रमाणात शेयर्स असतील आणि त्याला काही पैसे ताबडतोब हवे आहेत पण त्याला ते लगेच विकायचे नाहीत ( कारण विकले तर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल) तर त्याच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे ते शेयर्स बँकेत गहाण टाकायचे आणि त्यावर लोन घ्यायचे आणि नंतर ते फेडायचे पण यामध्ये त्याला कर्जाचे हफ्ते किंवा परतावा तसेच नियमित व्याज द्यावे लागेल. दुसरा पर्याय म्हणजे प्रीपेड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. या मध्ये ती व्यक्ती किंवा समूह एखाद्या ब्रोकरेज फर्मशी असे कॉन्ट्रॅक्ट करतो की तुम्ही मला या शेयर्स च्या समोर 75 ते 90 % पर्यंत पैसे ध्या आणि मी तुम्हाला ठरवलेल्या रेंज प्रमाणे अमुक डॉलर किमतीला ते शेयर्स पुढील तारखेला किवा पिरियडला विकत ध्यायला तयार आहे एक तर पैसे आणि पेनल्टी तरी परत करीन किंवा शेयर्स तरी विकेन करीन तसेच त्या शेयर्स वरती लिन ( बोजा) असेल म्हणजे मी ते शेयर्स दुसऱ्या कोणाला विकू शकणार नाही किंवा ते माझ्या व्यवहारात वापरू शकणार नाही. या मध्ये प्रत्यक्ष शेयर्स विकलेले नसून फक्त "Agreed to Sale" असे ऍग्रिमेंट होते. ( आपण ज्यावेळी बिल्डर कडून जागा विकत घेतो त्यावेळी लोन घेतेवेळी तो आपल्या बरोबर एक ऍग्रिमेंट करतो ते असते "Agreed to sale" असते पण प्रत्यक्षात ज्यावेळी आपले लोन सांक्शन होऊन त्या बिल्डर च्या हातात सर्व पैसे मिळतात त्यावेळीच तो व्यवहार पूर्ण होतो आणि त्यानंतर "Sale Deed" तयार करायचे असते किंवा तसा clause "Agreed to Sale" मध्ये असावा लागतो. त्यासाठी बिल्डर कडून आपल्या ऍग्रिमेंट वर सर्व पैसे मिळाल्याची सही लागते. तर ते सेल डिड मानले जाईल.)
असो, काय आहे हे सॉफ्टबँक प्रकरण. सॉफ्टबँक हे एक महाकाय जापनीस व्यवसायिक गृप आहे जो टेक्नोलॉजी, ऊर्जा आणि फायनान्स ह्या विषयात जगभर गुंतवणूक करत असतो. ह्याचे संस्थापक आणि सीईओ मासायोशी सोन हे 11 ऑगस्ट 1957 रोजी जपान मध्ये जन्मलेले कोरियन व्यवसायिक असून त्यांनी 1990 मध्ये जपानचे नागरिकत्व पत्करले. पूर्वापार शेती चा व्यवसाय असताना वयाच्या 16 व्या वर्षी त्यांची गाठ जपानच्या डेन फुजिता ह्या एका हॉटेल व्यवसाईकाशी पडली. त्याच्या मार्गदर्शनावरून ते अमेरिकेला शिक्षणासाठी गेले. अमेरिकेतील Berkeley युनिव्हर्सिटी मधून इकॉनॉमिक्स मध्ये बी ए पास करत असताना त्यांनी छोटे मोठे व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी ह्या दोन गोष्टी जगाचे व्यावसायिक भविष्य ठरवणार आहेत.
ह्याचा गुंतवणूकीची वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळी कोणत्या छोट्या कम्पनीला सुरवातीला भांडवलाची गरज असते त्यावेळी त्या कम्पनीचे पोटेनशीयल, त्याची टेक्नॉलॉजी, व्यवसाय वृद्धीसाठी योजना, त्यातील माणसांची कामाची पद्धत वगैरे ओळखुन त्यांना सुरवातीचे भांडवल पुरवायचे. त्याला व्हेंचर कॅपिटल म्हणतात. सुरवातीला त्याने इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी कँपन्यां मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. सोन ने आतापर्यंत अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्यातील कितीतरी वयासुद्धा गेली परंतु याहू ( अमेरिकन) आणि अलिबाबा.कॉम ( जॅक मा, चीन) ह्या दोन कँपन्यांच्या गुंतवणुकीने त्याला चांगला हात दिला.
याहू च्या सुरवातीला त्याने 100 मिलियन डॉलर ची गुंतवणूक केली आणि त्याच्याकडे याहू चे असलेल्या काही शेयर्स पैकी त्यातील काही शेयर्स ते उच्च किमतीला असताना विकले, काही दिवसांनी गुगल आल्यानंतर याहू ची किंमत कमी झाली तरीसुद्धा त्याच्याकडे अजून याहू कम्पनीचे 1.7 बिलियन डॉलर्स किमतीचे 7% शेयर्स आहेत.
जॅक मा ह्या चिनी इंटरप्रिनर ने तयार केलेल्या अलिबाबा.कॉम ह्या कम्पनिमध्ये सुद्धा सोन ने फक्त 20 मिलियन डॉलर्स गुंतवले. त्याचे अलिबाबा मधील होल्डिंग 29.5% असून त्याची 2018 ची किंमत 108 बिलियन डॉलर्स असून त्यातील काही भाग त्याने नुकताच प्रीपेड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मधून विकला असे मगाशी मी लिहिले. हे शेयर्स विकण्यामागचे एक कारण चीनने जॅक मा वर आणि त्याच्या ant फायनान्शियल कम्पनी वर लावलेले निर्बंध लक्षात घेऊन सोन ने सावध भूमिका घेतली शिवाय करोना काळात त्याच्या अनेक कँपन्यांची हानी झाली म्हणून असलेल्या शेयर्स चे काहींप्रमाणात कॅश मध्ये रूपांतर करून गुंतवणूक मोकळी करणे हे सुद्धा आहे.
ह्या शिवाय आर्म्स होल्डिंग ह्या युके च्या चिप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, अमेरिकेच्या स्प्रिंट टेलिकॉम, तसेच सोलर एनर्जी मध्ये त्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारतात Paytm, Flipkart, Ola, Oyo हॉटेल्स ( रितेश अगरवाल) , Swiggy, Delhivery, InMobi, and Lenskart ह्या सारख्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित कँपन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 14 बिलियन डॉलर च्या वर गुंतवणूक केली आहे त्यातील 3.2 बिलियन डॉलर गेल्या वर्षात केली आहे.
2017 साली त्याने सॉफ्टबँक व्हिजन फ़ंड नावाचा टेक्नॉलॉजी कँपन्यांना आणि जगाच्या भवितव्याच्या उपयोगी होणाऱ्या कँपन्यांना जसे की आर्टिफिसल इंटिलिजन्स, ब्लॉक चेन, मशीन लर्निंग सारख्या नवोदित तंत्रज्ञान वापरणाऱ्या कँपन्यांना गुंतवणुकीद्वारे आधार देण्यासाठी एक फ़ंड काढला त्याचे मूळ भांडवल 100 बिलियन डॉलर्स असून तो जगातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी फ़ंड आहे. 2021 साली त्याची नेट वर्थ 150 बिलियन झाली असून त्यांची उद्दिष्टे फार मोठी आहेत.
2022 मध्ये सोन ची वैयक्तिक नेट वर्थ 22.4 बिलियन असून 'फोर्ब्स' च्या बिलियनियर यादीत त्याचा क्रमांक 74 वा लागतो. तर सॉफ्टबँक ची नेट वर्थ 342.34 बिलियन डॉलर्स आहे.
तो आपल्या पगाराचा काही भाग आणि 10 मिलियन डॉलर्स जपानच्या सुनामी पीडित आणि इतर गरीब लोकांच्या औषधोपचार करण्यासाठी धर्मादाय खर्च करतो.
माधव भोळे
Subscribe to:
Posts (Atom)