Wednesday, January 31, 2024

केल्याने होत आहे (एक अनुभव)!

केल्याने होत आहे (एक अनुभव)! परवा जव्हार, पालघर येथे दोन दिवस फिरायला गेलो होतो. अर्थात ती जागा पावसाळी पर्यटन करण्यासाठी जास्त योग्य आहे पण आम्हाला आता वेळ होता म्हणून आता गेलो होतो. तेथे शाकाहारी रेस्टॉरंट नाहीत. शोधावी लागतील. ५०% वस्ती मुस्लिम आहे, उरलेले आदिवासी आणि इतर. पालघर जव्हार करत एक रस्ता त्रंबक ( नाशिक ) येथे जातो तर दुसरा जव्हार वरून सेलवास (गुजरात दादरा नगर हवेली ) येथे जातो. बाकी एसटी आगारातून महाराष्ट्रात अनेक भागात बसेस जातात. तेथील एका हॉटेल मालकाशी ओळख झाली. तो शाकाहारी मारवाडी होता. अंदाजे वय ४५ असावे. म्हणाला आमचे पूर्वज ६५ वर्षापूर्वी येथे आले. अजूनही जव्हार गावचं आहे. २ किमीच्या पलीकडे सर्व शेत जमिनी. तर ६५ वर्षांपूर्वी काय स्थिती असेल? रस्ते सुद्धा धड नसतील. वीज अर्थातच नसावी. म्हणाला आज आम्ही ४ भावंड व्यवसायात एकत्र आहोत, संसार वेगवेगळे आहेत. आमचे २ रिसॉर्ट आहेत एकामध्ये ५० तर दुसऱ्यात ६० रूम्स आहेत. आणि एक हॉटेल आहे ते २५ वर्षांपूर्वी बांधले त्यात २४ रूम्स आहेत आणि आता जवळच आणखी एक ५ मजली हॉटेल आणि खाली २ मजली शॉपिंग असे ५ कोटी रुपये खर्च करून बांधत आहोत. शिवाय वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी १०० एकर जमीन आहे. बहुतेक हॉटेल मध्ये मॅनेजर ठेवले असून शिवाय मी आणि मोठा भाऊ दररोज साठी छोटे मोठे कॅन्स्ट्रक्शन चे काम करतो. आम्ही जास्त शिकलो नाही पण मुले चांगली शिकत आहेत. म्हणाला हे सर्व एकदम झालेले नाही. आमच्या आजोबानी एसटी स्टॅन्ड समोर चहा, बिस्कीट अशी टपरी टाकून सुरवात केली. पुढे माझ्या वडिलांनी पहिले २४ रूमचे हॉटेल बांधले. अर्थात कर्ज घेऊनच. दर पाच वर्षानी आम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घेतो आणि तो पूर्णतःवास नेवून त्याची व्यवस्था लावतो. सर्व व्यवसाय चालू स्तिथीत आहेत. त्यामुळे कॅश फ्लो चा प्रॉब्लेम नाही. दिवसेंदिवस पसारा वाढवतच आहोत. कोणाशी भांडण नाही तंटा नाही. काही वर्षांपूर्वी येथे जमीन ६० रुपये फूट होती पण येथे राजकारणी मंडळींनी भरपूर जमीन घेऊन ठेवली असून आताचा भाव १००० रु. फूट आहे. आज आमची मुले शिकली तरी ती हेच व्यवसाय पुढे चालवणार. आमच्या वडिलांनी आमची व्यवस्था केली, आम्ही आमच्या पुढील पिढीची. मी म्हटले आमच्या कोकणात याच्या पेक्षा जास्त सृष्टी सौंदर्य आहे. तो म्हणाला तुमच्याकडे थोडे पैसे असतील तर तुम्ही रिसॉर्ट काढून कृषी पर्यटन म्हणून MTDC मध्ये नोंद करा. चांगला प्रॉफिट आहे. पण तुमची मुले हे सांभाळणार असतील तर. ह्यात सुरवातीला थोडा वेळ लागतो पण एकदा तुमचे नांव झाले की मग प्रश्न नाही. अर्थात जव्हार मध्ये कोम्पिटिशन नाही कारण पर्यटन स्कोप लिमिटेड वाटला. पण म्हणाला पावसाळ्यात ४ महिने फुल जाते. मी निष्कर्ष काढला तो असा, ४ भावंडे एकत्र काम करतात. एकदा निर्णय झाला की सर्व एकत्र काम करतात. त्यांच्या फॅमिली ची साथ आहे त्यासाठी ते जव्हार येथे राहणे पसंद करतात, मुले धंदा सांभाळणार आहेत, सांभाळत आहेत. कष्ट करण्याची तयारी आहे. स्वभाव सरळ वाटला. माधव भोळे

Thursday, January 18, 2024

शाकाहारी रहा, शाकाहारी व्हा!!

# दोन तोळे मांस मगधसम्राट बिंदुसर यांनी एकदा त्यांच्या सभेत विचारले, 'देशातील अन्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू कोणती? ' मंत्रीपरिषद आणि विधानसभेचे इतर सदस्य विचारात होते. काही वेळाने शिकारीची आवड असलेले सामंत म्हणाले, 'राजन, सर्वात स्वस्त अन्न म्हणजे मांस. ' सामंत यांच्या बोलण्याला सर्वांनी पाठिंबा दिला, पण चाणक्य गप्पच होता. सम्राटाने त्याला विचारले, 'तुला याबद्दल काय वाटते? ' चाणक्य म्हणाला, 'मी उद्या माझे विचार तुमच्यासमोर ठेवेन. ' रात्री चाणक्य त्या सामंताच्या वाड्यात पोहोचला. सामंत यांनी दार उघडले. चाणक्य म्हणाला, महाराज संध्याकाळी अचानक आजारी पडले, राजवैद्य म्हणाले की राजाला दोन तोळे ह्रदयाचे मांस मिळाले तर त्यांचा जीव वाचवू शकतो, म्हणून मी तुमच्याकडे फक्त दोन तोळे हृदय मागण्यासाठी आलो आहे. यासाठी तुम्हाला एक दशलक्ष सोन्याची चलने घ्या. सामंत यांनी चाणक्यचे पाय धरून माफी मागितली आणि उलट एक लाख सोन्याचे चलन दिले की या पैशातून दुसर्‍या सामंताच्या हृदयाचे मांस विकत घ्यावे. अशाप्रकारे पंतप्रधान चाणक्य एकामागून एक त्या सर्वांकडे गेले ज्यांनी मांसाचे समर्थन केले परंतु कोणीही मान्य केले नाही परंतु इतर कोणाचे मांस विकत घेण्याची माफी मागून सर्वांनी चाणक्याला एक लाख सोन्याचे चलन दिले. चाणक्य सकाळच्या आधी राजवाड्यात परतला आणि राजासमोर अनेक लाखांचे सोने ठेवले. बादशहाने विचारले, 'हे सर्व काय आहे? ' तेव्हा चाणक्यने सांगितले की दोन तोळे हृदयाचे मांस खरेदी करण्यासाठी इतके पैसे जमा झाले, तरीही दोन तोळे मांस मिळाले नाही. 'राजन, आता तुम्हीच विचार करा की मांस किती स्वस्त आहे? जीवन अमूल्य आहे. जसे आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो, तसेच इतर सर्व सजीवांचे आपल्या जीवनावर तितकेच प्रेम असते. पण ते त्यांचे प्राण वाचवू शकत नाहीत. प्राणी बोलू शकत नाहीत आणि त्यांच्या वेदना सांगू शकत नाहीत. मग हाच त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घ्यायचा का? शुद्ध अन्न, शाकाहारी! मानवी अन्न, शाकाहारी! शाकाहारी रहा, शाकाहारी व्हा!!

Wednesday, December 27, 2023

Y combinator: स्टार्टप ऍक्सिलरेटर

Y combinator: स्टार्टप ऍक्सिलरेटर आपणास आठवत असेल की या आधी मी माझ्या एका पोस्ट मध्ये "थील शिष्यवृत्ती" आणि ओयो ह्या हॉटेल अग्रीगेटर आणि बुकिंग वेबसाईट चा संस्थापक रितेश अगरवाल याचे बद्दल लिहिले होते. अशाच एका स्टार्टप ऍक्सिलरेटर बद्दल आज लिहीत आहे. स्टार्टप ऍक्सिलरेटर म्हणजे नवीन सुरु होणाऱ्या कंपन्याच्या संस्थापकाना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना सतत मार्गदर्शन करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायासाठी बीज भांडवल पुरवणे. "Y Combinator management LLC" नावाची एक खाजगी संस्था पॉल ग्राहम, जेसीका लिविंगन्स्टन, रॉबर्ट तपन मॉरीस आणि ट्रिव्हर ब्लॅकवेल या संस्थापकांनी २००५ साली वरील उद्देशानी स्थापन केली. ह्याचा पत्ता माउंटन व्यू, कॅलिफोर्निया हा आहे. ही संस्था दर सहा महिन्यांनी नवनवीन कंपन्याकडून त्यांचे अर्ज आणि माहिती, बिझिनेस मॉडेल इत्यादी मागवते. साधारण पणे दर ६ महिन्यातून जगभरातून १०,००० कंपन्या अर्ज करतात. गेल्या ६ महिन्यामध्ये एकंदर २४,००० कंपन्यानी अर्ज केले होते. त्यातील फक्त १.५ ते २% कंपन्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. हा अभ्यासक्रम वर्षातून दोन वेळा प्रत्येकी ३ महिन्याचा ( जानेवारी ते मार्च आणि जून ते ऑगस्ट ) या काळात असून त्यातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यवसायिक आणि मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळते. सहभागी होणाऱ्यांचे विचार आणखी सुस्पस्ट केले जातात आणि गैरसमज दूर केले जातात. शेवटच्या आठवड्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रेसेंटेशन होते. निवडलेल्या सर्व कंपन्याना सुरवातीला प्रत्येकी १,२५,००० डॉलर्स एव्हडे बीज भांडवल दिले जाते आणि त्याबद्दल्यात त्या कंपनीचे ७% भांडवल Y Combinator ला मिळते. कंपनीच्या पुढील फंडिंग राउंड मध्ये त्याला ३,७५,००० डॉलर्स काही विशिष्ठ अटींवर Y Combinator पुरवते. २००५ पासून ह्या कंपनीने आजपर्यंत ९,००० संस्थापकांच्या ४,००० स्टार्टपना बीज भांडवल दिले असून त्या कंपन्यानची एकंदरीत मार्केट कॅप $१ ट्रिलीयन इतकी आहे. या वर्षीच्या बॅच मधील २८२ कंपन्या पैकी १२ कंपन्या भारतीय आहेत. २०२३ पर्यंत, Ycombinator नें २३३ भारतीय कंपन्यामध्ये पैसे गुंतवले आहेत. Razorpay, Meesho, Zepto, khatabook अशा काही नामांकित कंपन्याना Y Combinator कडुन निधी मिळाला आहे. Ycombinator सारखेच काम करणारी संस्थापक "सीकोषा सर्ज" नावाची संस्था भारतात काम करते तिला सिकोशा कॅपिटल नावाची संस्था वित्त पुरवठा करते. माधव भोळे

आर्टिफिशल इन्टीलीजन्स भीती आणि बागुलबुवा

आर्टिफिशल इन्टीलीजन्स भीती आणि बागुलबुवा आजकाल असे लेख येत आहेत की आर्टिफिशल इन्टीलीजन्स नें जगात भारी हैदोस घातला जाणार आहे. कोणीतरी लिहिले आहे की रोबोट एव्हडे तयार होतील की ते माणसाच्या नाशालाच कारणीभूत होतील. ही भीती सर्वतः चुकीची आणि अर्धवट माहितीच्या आधारे पसरवली जातं आहे. अशा प्रकारचे मनोरंजन पूर्वी हॉलिवूड च्या सिनेमांत येत असे पण तसे काही होईल असे वाटत नाही. या पूर्वी अणूशक्तीचा शोध लागला आणि अणुबॉम्ब तयार झाले ज्याने संबंध जगाला हादरवून टाकले आणि तशी ताकद सुद्धा त्यात आहे परंतु म्हणून काय प्रत्येक होणारे युद्ध आणविक युद्धच होईल असे नाही. तसेच बनणारे सर्व रोबोट म्हणजे महाभुतेच असतील असे नाही. अणूशक्तीचा उपयोग चांगल्या कामासाठी सुद्धा केला जातो जसे की वीज निर्मिती, कॅन्सर ट्रीटमेंट वगैरे. ज्या ज्या वेळी बदल होत गेले त्या त्या वेळी माणसानी विरोध केला आहे, मग ते राष्ट्रीयकृत बँक मधील संगणकीकरण असो की ऑफिस मधील खुर्चीची जागा बदलणे असो. यु पि आय असो की जी एस टी असो. परिवर्तन हा जीवनाचा पाया आहे. घोडा गाडी जाऊन ट्राम आली, ट्राम जाऊन ट्रेन आली. पहिली ट्राम चालू झाली त्यावेळी ती लोकांना भूत व्यवस्था वाटली आणि लोक त्यात बसायला घाबरात. आज जो उठतो तो विमानाने जातो आहे हा परिस्थितील बदल. जे नवीन व्यवस्थेशी जोडले गेले ते यशस्वी झाले, जे जुनेच कुरवाळत बसले ते घरीच बसले. छत्रपती शिवरायांनी सुद्धा नुसत्या तलवारिंवर अवलंबुन न राहता टोपीकरांकडून लांब पल्ल्याच्या तोफा घेतल्या तर पोर्तुगीज तंत्रज्ञा कडुन नौका बांधणी करून अरमार उभे केले. तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात तरी ह्या सुनामीतून तुम्हांला जावेच लागणार आहे. लाटाना भीऊन जाण्यापेक्षा त्यावर स्वार व्हायला शिकले पाहिजे. आर्टिफिशल इन्टीलीजन्स चा उपयोग सर्वत्र जेथे माणसाची बुद्धी चालते त्या सर्व ठिकाणी होईल आणि त्यासाठी तसा डेटा असणे आवश्यक आहे. अजून तरी जे ठाऊक आहे तेच तो गतीमान पद्धतीने तुमच्या समोर आणून ठेवतो. त्याला स्वतःचे डोके नाही. तो विचार करू शकत नाही. तो कोरीलेट (एकमेकांशी संबंध जोडणे) करू शकतो , तो एक्सट्रापोलेट ( तर्क लढवून नवीन माहिती तयार करणे) करू शकतो. असलेल्या माहितीच्या आधारे नवीन माहिती तयार करू शकतो, ऍक्शन घेऊ शकतो. या त्याच्या ताकदीचा उपयोग वैद्ध्यक शास्त्र, रसायन शास्त्र, इंजिनियरिंग, संख्या शास्त्र, फायनान्स, अशा एक ना अनेक विषयात त्याचा उपयोग आहे. मानव एव्हडा मूर्ख नाही की तो दुसऱ्याला आपल्यावर हवी होऊन देईल. तरी कृपया भीती सोडून द्या. माधव भोळे

Tuesday, December 12, 2023

हव्यास!

हव्यास! आज पेपरात एक बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. "डॉक्टर तरुणीची आत्महत्या. हुंडा म्हणून BMW कार, १५ एकर जमीन देता न आल्याने लग्न रद्द; नैराश्यातून उचललं पाऊल." केरळ मधील एका एम. एस. सर्जऱी च्या विध्यार्थीनी चे त्यांच्याच समाजातील एका डॉक्टरवर प्रेम होते परंतु मुलाच्या घरच्यांनी लग्नाला परवानगी देताना हुंडा म्हणून BMW गाडी आणि १५ एकर जमीन मागितली आणि ती पुरी करणे शक्य नसल्यामुळे लग्न मोडले. या मागणीमध्ये तिच्या प्रियकाराचा सुद्धा सहभाग होता असा आरोप आहे. त्यामुळे त्या त्रासाला कंटाळून मुलीने जीव दिला असे बातमीत म्हटले आहे. भारतात सर्वात जास्त शिक्षित म्हणून केरळ चा नंबर लागतो. उच्च शिक्षित मुलगा आणि मुलगी असताना कशाला हवेत यांना हुंडे? आणि हुंडाच हवा तर कोणी पैसेवाली मुलगी बघायची मग ती शिकलेली कशाला हवी? हुंडा बंदीचे कितीही कायदे आणा, भारतातील कित्येक समाजात या ना त्या पद्धतीने हुंडा, वर दक्षिणा म्हणून सर्रास पैसे किंवा अन्य वस्तू मागितल्या जातात. एरवी समान कायदा, समान हक्क यावर लढणाऱ्या रणरागिणी या वेळी गप्प बसतात. खरे म्हणजे लग्न विवाह आणि समारंभ या विषयात वधू वरानी पुढाकार घेऊन आवाजवी मागण्या आणि खर्चाला चाट देण्याच्या बाबतीत आपापल्या घरी आग्रही असले पाहिजे. आधीच मुला मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करून आईवडीलांनी आपल्या हौशी बाजुला ठेवून घरखर्च भागवलेला असतो त्यात ह्या विवाह खर्चाचा बोजा म्हणजे म्हातारपणाची तरतूद त्यात खर्च करून त्यांच्या हाती पुढे काय राहणार याचा विचार दोन्ही कडच्या मंडळीनी करायला हवा. तुम्हांला स्टेट्स जपायची असेल तर तुम्ही खर्च करा, दुसऱयाच्या पैशावर तुमची हौस भागवू नका असा स्पष्ट संदेश पुढच्या पिढीने मागच्या पिढीला द्यायला हवा असे वाटते. आज काल हे विवाह परत जास्त खर्चिक व्हायला लागले आहेत. आता प्री विडींग शूटिंग, लग्नातील नाचगाणी, मेहंदी सोहळा असे उत्तरेकडील रितिरिवाज महाराष्ट्रात सुद्धा घडायला लागले असून साहजिकच खर्च वाढायला लागला आहे. ज्यांचे उत्पन्न चांगले आहे त्यांनी ते करायला काहीच हरकत नाही पण दुसऱ्याच्या जीवावर किंवा रीण काढून ते करणे निषेधार्थच. आपण जेव्हा एखादी मुलगी पत्नी म्हणून घरी आणतो ती लक्ष्मी चे रूप असते आणि तिच्याच आईवडिलांना कर्जात ढकलून, त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर ती सासरी सुखी राहू शकेल का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. जर पैशाची तेव्हडीच हाव असेल तर तो कमवायला शिकले पाहिजे, ना की कोणाकडून ओरबाडून किंवा कोणाच्या उसनवारी आपला खर्च चालवायचा. पैसा कमवायला वेळ लागतो, गमवायला ५ मिनिटे लागतात हे ज्यावेळी कळेल त्यावेळी दुसऱ्याच्या कष्टाची किमत कळेल. असो, माधव भोळे

शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी!!

शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी!! बिझिनेस टूडे ह्या मासिकाच्या "मोस्ट पॉवरफूल बिझिनेस वूमन " ह्या कार्यक्रमाचे विसावे पुष्प ८ डिसेम्बर २०२३ रोजी हॉटेल ताज लँडस एंड बांद्रा येथे झाले, त्यात व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर महिलांनी हजेरी लावली होती. प्रमुख पाहुण्या म्हणून सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(sebi) च्या प्रथम महिला अध्यक्षा "माधुरी पुरी बूच" होत्या तर नायका च्या संस्थापक फाल्गुनी नायर, एक व्यवसायिक, प्रतिथ यश तरुण गायिका आणि कुमारमंगलम बिर्ला यांची कन्या अनन्या बिर्ला सारख्या एकंदर ५६ सेलिब्रेटी महिलांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एक विशेष म्हणजे नंदिनी पिरामल, ह्यांची मुलाखत झाली. नंदिनी पिरामल ही पिरामल फर्मास्यूटिकलं ह्या औषध कंपनीची अध्यक्षा असून ती पिरामल इंटरप्राईझस ह्या बहुआयामी औद्योगिक ग्रुप ची एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर आहे. त्यांनी पीटर डी यंग ह्या अमेरिकन नागरिकाशी विवाह केला असून त्यांचा भाऊ आनंद पिरामल हा ईशा अंबानीचा पती आणि मुकेश अंबानीचा जावई आहे. एवढ्या मोठ्या खानदानातील आणि मोठ्या हुद्यावर असलेल्या ह्या महिलेला मुलाखतीच्या वेळी चक्क भारतीय साडीमध्ये बघून अनेक जणांच्या भुवया उंचावल्या. अर्थात फाल्गुनी नायर, कल्पना मोरपंरिया ( विधी तज्ज्ञ आणि आय सी आय सी आय बँकेच्या पूर्वीच्या डायरेक्टर आणि जे पि मॉर्गन च्या दक्षिण आशियायी विभागाच्या पूर्व सिईओ) ह्या सारख्या कित्येक व्हेटरन सुद्धा साडीलाच प्राधान्य देतात. सुधा मूर्ती सुधा साडीच वापरतात. नंदिनीने आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले की इन्फोसिस चे माजी अध्यक्ष पद्मविभूषण नारायण मूर्ती आणि नंदन नीलकेणी हे तिचे आदर्श आहेत. ज्या पद्धतीने हे दोघे आपल्या कंपन्यानमधून निवृत्त झाले आणि त्यांनी समाजाचे देणे समाजाला आणि देशाला परत देण्याचा प्रयत्न चालवला आहे तो तिला भावतो. नीलकेणी यांनी आधार आणि डिजिटल इंडिया आणि युपीआय (UPI) पेमेंट्स ह्या विषयात केलेल्या भरीव तांत्रिक कामगिरीला तोड नाही आणि ती सुद्धा भविष्यात त्यांच्याच मार्गांवर चालण्याचा प्रयत्न करणार आहे. पिरामल फार्मासयुटिकलं मध्ये तिच्याकडे मानव संसाधन विभाग आणि गुणवत्ता विभागाची जबाबदारी असून तिने नमूद केले की भारतीय औषधं कंपन्याना जगात भरपूर संधी असून त्यासाठी आपल्या औषधांची गुणवत्ता अमेरिकेसारख्या पुढरलेल्या देशांप्रमाणे असायला हवी. गेले काही वर्ष अमेरिकन फूड अँड ड्रग्स विभागाने भारतीय औषध कंपन्यांच्या औषधांच्या गुणवत्तेवर ओढलेले ताशेऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ती म्हणते मी आमच्या कामगारांना नेहमीच पटवून देण्याचा प्रयत्न करते की जी औषधें आपण बनवतो ती आपले घरचे नातेवाईक सुद्धा घेऊ शकतील इतकी चांगली आणि शुद्ध असणे आवश्यक आहे. नंदिनी आपल्या व्यवसायाबरोबरच आपल्या कंपनीच्या पिरामल फाउंडेशन आणि पीरामल जलसेवा ह्या एनजिओ मध्ये सुद्धा सल्लागार म्हणून काम करते. पिरामल जलसेवा भारताच्या २० राज्यात ७,५०,००० कुटुंबियांना शुद्ध पाणी पुरवते. नंदिनीची आई पद्मश्री डॉ. स्वाती पिरामल सुद्धा एक उच्च शिक्षित शास्त्रज्ञ् महिला आहे आणि तिचे पती अजय पिरामल यांच्या औषध व्यवसायात तिने खांद्याला खांदा लावून काम केले आहे, त्याचाच परिणाम आता पिरामल फर्मासयुटिकलं ह्या एका मोठ्या वटवृक्षात झाला आहे. म्हणतात ना शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी!! माधव भोळे

विद्वान सर्वत्र पूज्यते

विद्वान सर्वत्र पूज्यते ( तंत्रज्नानातील नैतिकतेचे शीत युद्ध ). राजाचा मान सन्मान फक्त आपल्याच राज्यात असतो मात्र विद्वान सर्वत्र पूज्यते असा श्लोक आहे. आज एक जाहिरात बघितली, दुबईच्या एमीरेट्स एयरलाईनने घोषणा केली की एमीरेट्स एयर लाईंनच्या कोणत्याही विमानाने तुम्ही दुबई बाहेर जात असाल तर तुम्हाला पासपोर्ट दाखवण्याची आवश्यकता नाही. बायोमेट्रिक्स (डोळ्याची बाहुली, चेहरा आणि बोटांचे ठसे इत्यादी ) आणि फेस रेकग्निशन (चेहऱ्याचीं ठेवणं तसेच हावभाव पाहून व्यक्ती/प्राणी ओळखणे ) सॉफ्टवेअर च्या साहाय्याने प्रवाश्याची त्यांच्या कडे असलेली माहिती ताडून ईमिग्रेशन डिपार्टमेंट चे पोलीस हे काम करू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्यापैकी अनेकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ( आर्टिफिशल इन्टीलीजन्स - AI ), मशीन लर्निंग (ML) सारखे माहितीतंत्रज्ञातील शब्द ऐकले असतील. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हळू हळू वाढत असून नवनवीन कम्पन्या ह्या तंत्रज्ञानात संशोधन करून वाढ करत आहेत. अशीच एक कम्पनी आहे ओपन ए.आय. ज्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी चॅट जिपिटी-३ नावाचे आर्टिफिशल इंटलीजन्स सॉफ्टवेअर काढून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वादळ निर्माण केले. त्यांनी आपले हे सॉफ्टवेअर, वापरकर्त्यांना काही काळासाठी मोफत वापरण्यासाठी परवानगी देताच गेल्या एका वर्षात जगभरातील १८.०५ कोटी लोकांनी त्याचीं वैशिष्ट्य तपासली तसेच त्याचे विविध उपयोग अनुभवले. ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग विध्यार्थी, राजकारणी पासून अनेक लोक अनेक प्रकारचीं कामे जी माणसाची बुद्धी करू शकते त्यासाठी वापरला जाऊ शकतो पण सर्वसाधारण माणसाच्या बुद्धिमत्तेला असलेल्या वेग आणि पसारा ( volume, scope etc.) याच्या मर्यादा हे तंत्रज्ञान, कॉम्प्युटर च्या साहाय्याने सहज पार पाडू शकते. उदा. द्यायचे झाले तर एखाद्या १००० पानाच्या पुस्तकाचा फडषा हे तंत्रज्ञान अवघ्या काही मिनिटात पाडून त्या पुस्तकाबद्दल सुटसुटीत आणि शास्त्रशुद्ध अवलोकन ते तयार करू शकते तर आपल्याला पाहिजे असलेल्या विषयाची अचूक माहिती ते इंटरनेट मायाजालातून काही क्षणात शोधून आपल्याला पाहिजे त्या फॉरमॅट (नमुन्यात) मध्ये सादर करू शकते असे अनेक विविध गुण ह्या तंत्रज्ञानात आहेत. ह्या अचंबित करणाऱ्या गुणांमुळे विविध निवेशक आणि तंत्रज्ञ यात रस घेत असून ह्या तंत्रज्ञानाचे नवनवीन अवतार जे मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध विषयात तयार होत आहेत. ह्या तंत्रज्ञान जगात १७ नोव्हेंबर २३ रोजी एक महाभूकंप करणारी बातमी आली आणि अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मध्ये जोरदार सुनामी लाटा उसळळ्या. ह्या दिवशी ओपन ए.आय. चा एक संस्थापक सॅम अल्टमन ह्या कपंनीच्या सिईओला कंपनीच्या व्यवस्थापन समितीने कोणतेही विशेष कारण न देता, तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकले. ज्या सॅम अल्टमनने ही कंपनी उभारण्यात मोलाचे योगदान दिले त्यालाच त्याचे व्यवस्थापक मंडळ काढते हे काय गौडबंगाल आहे? हे समजण्या पूर्वी हे लक्षात घ्यायला हवे की ओपन ए.आय. ह्या कम्पनीचीं मूळ स्थापना आर्टिफिशल इन्टीलीजन्स ह्या विषयातील मूलभूत संशोधन करणारी "विना फायदा - Not for profit" संस्था म्हणून करण्यात आली आणि त्यासाठी सॅम अल्टमन, टेसलाचे कंपनीचे सर्वे सर्वा इलोन मस्क आणि सिलिकोन व्हॅली मधील इतर काही गुंतवणूकदारानी त्यात पैसे गुंतवले. परंतु थोड्याच काळात तयार झालेले उत्तम परिणाम बघून ह्या संस्थेचा संस्थापक सॅम अल्टमन याने हे तंत्रज्ञान जगाला माफक दरात उपलब्ध करुन काही फायदा सुद्धा मिळवता येईल या विचाराने ही कंपनी "फायदा मुखी - प्रॉफिट ओरिएंटेड " बनवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवाच्या विकासासाठी होईल की फायद्याच्या पाठी लागून जगाला विनाशाकडे नेण्यासाठी होईल यावर चर्चा सुरु होऊन त्यामधून त्यांचा एक प्रसिद्ध गुंतवणूकदार इलोन मस्क २०१८ साली बाहेर पडला. इलोन मस्कला ही कंपनी आपल्या टेसला कंपनीत समाविष्ट करायची होती जेणेकरून ती टेसलाच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार ( ड्रायव्हर शिवाय चालणारी गाडी ) ह्या गाडीच्या तंत्रज्ञानात त्याचा उपयोग होईल. त्यानंतर ह्या तंत्रज्ञाचा वाढता प्रसार आणि प्रचार लक्षात घेऊन त्या तंत्रज्ञानाचे फायदे तोटे यावर सरकार दरबारीं गंभीर विचार सुरु झाला. अमेरिकन सरकारने ह्या विषयात सरकार आणि उद्योजक यांची समिती स्थापन करून ह्या तंत्रज्ञानावर काय निर्बन्ध असावेत याबाबत चर्चा सुरवात केली. ह्या तंत्रज्ञानाचे काही गंभीर दुष्परिणाम मनुष्य प्राण्याचे जीवन क्लेशकारक करण्यासाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात जसे की खोट्या जाहिराती, समाज माध्यमातून निंदा नालस्ती, चारित्र्य हनन, खोटे व्हिडीओ तयार करणे, तुमच्या बदली तुम्हीच म्हणून काही ठिकाणी गैरव्यवहार करणे वगैरे इत्यादी (impersonification). त्याचे परिणाम एव्हडे गंभीर असू शकतात की त्याच्या अमर्याद आणि अनियंत्रित ताकदीला वेसण घालणे आवश्यक आहे असे काही मंडळींना वाटते. त्याचाच परिणाम म्हणून ओपन ए.आय. कंम्पनीच्या व्यवस्थापन समितीमध्ये शीत युद्ध सुरु झाले आणि कंपनीचे चार दिशा दर्शक (डायरेक्टर ) मुख्य ए. आय. शास्त्रज्ञ् डॉ. इल्या सुटसकीवर, कोरा कंपनीचा सिइओ ऍडम डी एंजेलों, ए. आय. चीं एक प्राध्यापिका हेलेन टोनर आणि एक व्यवसायिक ताशा मेकोली विरुद्ध अन्य डायरेक्टर आणि सॅम अल्टमन यांच्यातील ए. आय. वरील संशोधन मर्यादा आणि सरकारी धोरण बनवण्यात कंपनीचे सहकार्य, ए.आय. च्या गैर वापरला आळा घालण्यासाठी तयार करायच्या उपाय योजना या बाबतीत वाद विकोपाला जाऊन सॅम व्यवस्थापन समितीला योग्य ते अहवाल देत नाही, तो वेगवेगळ्या गुंतवणूकदारांशी बोलतो ते समितीला माहिती नसते, कंपनीचे या विषयातील संशोधन आणि मर्यादा तसेच त्याचे होणारे संभाव्य दुष्परिणाम या बाबत तो व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन सांगत नाही या कारणाखाली त्याला १७ डिसेम्बर ला अचानक नोकरीतून आणि व्यवस्थापन समितीमधून काढून टाकले गेले. या ब्रेकिंग न्यूजनें संपुर्ण जग हलले. जो सॅम अल्टमन भारतासहित २२ देशांमध्ये भेट देऊन ए. आय. ह्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करतो, तेथील देशामध्ये ह्या तंत्रज्ञानाबद्दल असलेले संभाव्य गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो, ज्याने ए. आय. तंत्रज्ञानाला प्रयोगशाळेतून लोकांच्या डेस्कवर आणून पोहोचवले, त्याला सीईओ म्हणून नोकरीवरून काढायची हिम्मत कशी काय होते? असा प्रश्न सर्वत्र पडला. त्यानंतर ह्या गोष्टीवर तंत्रज्ञान जगतात खूप खलबते झाली. ज्या मायक्रोसॉफ्टनें ह्या ओपन ए. आय. कम्पनी मध्ये १३ अब्ज डॉलर्स गुंतवणूक करून गुगल आणि आय.बि. एम. सारख्या मात्तबर कंपन्यांच्या नाकात दम आणले आणि त्यांचे कोपऱ्यात पडलेले सर्च इंजिन (बिंग) ला परत उभारी देऊन मुख्य प्रतिस्पर्धी गुगलचे तंगडे तोडण्याचा प्रयत्न केला, ते मायक्रोसॉफ्ट आणि त्याचा तेव्हडाच धूर्त सी.ई.ओ. सत्या नाडेलानें घोषित केले की सॅम ला तेथे काम करायचे नसेल तर त्याला आणि त्याच्याबरोबर जेवढे येतील तेवढ्या स्टाफला मायक्रोसॉफ्ट घ्यायला तयार असून लागेल तेवढी सुविधा आणि पैसे गुंतवायला मायक्रोसॉफ्ट तयार आहे. त्याचवेळी ओपन ए. आय. च्या ७७० पैकी ७०० नोकरदारांनी एक विशेष सभा घेऊन सॅम अल्टमनला पाठिंबा जाहीर करून त्याला परत कामावर घ्या अन्यथा आम्ही नोकरीं सोडतो तसेच ज्या लोकांनी त्याला कामावरून काढण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी राजीनामे द्यावेत असा निर्वाणीचा इशारा दिला. शेवटी कंपनीमधील गुंतवणूकदार, व्यवस्थापन समिती, नोकरवर्ग आणि सॅम अल्टमन यांच्यात खूप विचारमंथन होऊन शेवटी सॅम अल्टमनला परत कामावर घेणे आणि त्या चार जणांनी राजीनामा देणे हा निर्णय झाला. हा आहे विद्वात्तेचा डंका. ही आहे ज्ञानाची ताकद. यामागे दोन प्रश्न उरतात. एक म्हणजे सॅम अल्टमन ला सिईओ पदावरून वरून हटवण्यात कोणत्या परकीय शक्ती ज्या ह्या विषयात खूप संशोधन करत आहेत आणि अमेरिकेच्या ह्या विषयातील प्रगतीला खीळ घालण्यासाठी रचलेले परंतु अयशस्वी झालेले हे एखादे षडयंत्र आहे का? जसे की भारताचे दोन मोठे शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, डॉ. विक्रम सारभाई यांचा अनपेक्षित अनैसर्गिक मृत्यू झाला आणि भारताचा अणू प्रकल्पना यशस्वी होण्यासाठी खूप काळ वाट बघायला लागली. दुसरा प्रश्न की तंत्रज्ञानाचा विचार किंवा संशोधन करताना, फ्री सोसायटीमध्ये अशा प्रकारची सरकारी बंधने आवश्यक आहेत का? ती किती परिणामकारक ठरतील? त्या बंधनाने संशोधनात्मक निर्मितीला आळा बसेल आणि त्याची वाढ खुंटेल का? हे सर्व प्रश्न हे पुढरलेले देश कसे हाताळणार आहेत? बघूया पुढे काय होते ते? भारत या बाबतीत अजून खूपच पाठी आहे पण त्याच्या दुष्परिणामाचा फटका त्याला सुद्धा बसू शकतो. माधव भोळे.