Thursday, April 22, 2021

आत्मनिर्भर भारत, सुपर कॉम्पुटर आणि भारतीय उद्योगजगत

 आत्मनिर्भर भारत, सुपर कॉम्पुटर आणि भारतीय उद्योगजगत

आत्मनिर्भर भारत:

आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत  (शपथ समारोह ३० मे २०१९) एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर  म्हणजेच ५ मे २०२० च्या चीनच्या आक्रमणानंतर, देशाला आयातीवर ( विशेषतः चिनी मालावर ) अवलंबुन न राहता,  १२ मे २०२० ला "आत्मनिर्भर भारत" चा नारा दिला. या आधी सुद्धा त्यांच्या गाजलेल्या नाऱ्यांपैकी "सबका साथ, सबका विकास", "बेटी बचाव, बेटी पढाओ", "झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट", "मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स",  "स्वच्छ भारत - पाहिले सुविधालय फिर देवालय", "डिजिटल इंडिया" या प्रसिद्ध नाऱ्यानि काही प्रमाणात का होईना जनतेत जागृती केली आणि त्याचे काही प्रमाणात का होईना चांगले परिणाम देशाला दिसू लागले. अर्थातच त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा सुद्धा उंचावल्या. परंतु कोणत्याहि प्रकारचे छोटेसे सुद्धा योगदान दिल्याशिवाय लोकांना या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्या आहेत. “आत्मनिर्भर भारत” योजना ज्या ५ गृहीतांवर आधारित आहे ते म्हणजे ५ ट्रिलियन डॉलरची  अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधावर भर, तंत्रज्ञानावर आधारित अनुशासन, प्रगत लोकसंख्याशास्त्र आणि सेवा व मालाची मागणी. या कामासाठी त्यांनी रु २० लाख कोटी, म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या १०% एवढी रक्कम राखीव ठेवली आहे. हि कोणत्याहि एका विभागा करता किंवा विशिष्ट्य वर्गाकरता न ठेवता छोटे उद्योग धंदे, डबघाईला आलेल्या परंतु आवश्यक अशा सुविधा कंपन्या तसेच अर्थव्यवस्थेचे २५ विभाग या मध्ये त्याला प्राधान्याने वाटणाऱ्या कामांसाठी द्यायचे ठरवले असून त्यासाठी विशेष नियमावली सुद्धा बनवल्या आहेत, जेणे करून या उद्योगधंद्यांच्या अडचणी दूर करून त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावे आणि उन्नतीचा मार्ग पकडावा.

तसे म्हटले तर “आत्मनिर्भर भारत” हा जरी नवीन नारा असला तरी या आधी डॉ ऍनी बेसंट आणि टिळकांनी सुरु केलेली स्वदेशी चळवळ, गांधीजींचे चरखा आंदोलन, नेहरूंचा सी एस आय आर, ऍटोमिक एनर्जी कमिशन, आय आय टी, आय आय एम, स्पेस रिसर्च सारख्या  संस्थात्मक विकासावर भर आणि अगदी अलीकडे स्व.राजीव गांधी यांचे सुपर कॉम्युटर मधील योगदान या सर्वांच्या पाठी हाच विचार होता.

 

स्व. राजीव गांधी, डॉ विजय भाटकर आणि सी-डॅक चे योगदान:

जरी जवाहरलाल नेहरू असताना १९६१ साली टाटा इन्स्टिटयुट ऑफ फन्डामेन्टल रिसर्चच्या डॉ रंगास्वामि नर सिमहन यांनी टीफरॅक (TIFRAC) हा भारतीय बनावटीचा कॉम्पुटर बनवला होता, तरी भारतातील कॉम्पुटरच्या प्रगतीला खरी सुरवात झाली ती स्व. राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत हे कोणीही नाकारू शकत नाही. १९८५ आणि १९८७ मध्ये स्व. राजीव गांधी यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांचेकडे भारतीय शास्त्रज्ञांना लागणारे सुपर कॉम्पुटर विकत घेण्याची तयारी दर्शवली त्यावेळी रिगन यांनी त्या प्रस्तावाला चक्क नकार दिला. कारण अमेरिकेला आपले प्रगत तंत्रज्ञान कोणालाही विशेषतः विकसनशील देशाला विकायचे नव्हते. भारताने हे सुपर कॉम्पुटर हवामान खात्याच्या उपयोगासाठी वापरणार असे जाहीर केले होते,  तरीसुद्धा ते कॉम्पुटर ऍटोमिक बॉम्ब तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी सुद्धा वापरता येतात याची अमेरिकेला जाणीव होती. सोविएत रशिया सुद्धा प्रथम ते तंत्रज्ञान विकायला तयार होती पण अमेरिकेने नकार कळवल्यावर, रशियाने सुद्धा काढता पाय घेतला.

अशा वेळी राजीव गांधी यांनी हि गोष्ट मनावर घेतली. मुळात राजीव गांधी यांनी अमेरिकेकडे सुपर कॉम्प्युटर साठी मागणी करावी हि गोष्ट्च मुळी भारतीय शास्त्रज्ञांना मान्य नव्हती. आपल्या देशात तशी बुद्धिमत्ता उपलब्ध आहे, फक्त अभाव आहे तो राजकीय आणि आर्थिक पाठिंब्याचा असे त्यांचे मत होते. राजीव गांधींच्या सांगण्यावरून १९८७ साली काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑफ इंडिया  (CSIR) या भारतीय शास्त्र विषयक परिषदेतर्फे या विषयाचा उहापोह करण्यात आला आणि त्यांच्या ठरावानुसार हा प्रॉजेक्ट हाताळण्यासाठी सी - डॅक (Centre for Development and advanced computing ) ह्या नवीन संस्थेची स्थापना झाली आणि त्याच्या अध्यक्षपदी डॉ विजय भाटकर यांची नियुक्ती होऊन ३ कोटी डॉलर्स चा निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला गेला. या संस्थेने दिवसरात्र काम करून सुमारे ३ वर्षात भारतीय बनावटीचा "परम - ८०००" हा सुपर कॉम्पुटर तयार केला. याच संस्थेने पुढे १९९८ साली  "परम - १०,०००" हा सुपर कॉम्पुटर तयार केला शिवाय डॉ भाटकरांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल परम सुपर कॉम्पुटिंग फॅसिलिटी (National Param Super-computing Facility (NPSF) ) ची स्थापन झाली आणि हाय परफॉर्मन्स कॉम्पुटिंग या संकल्पनेची सुरवात त्यांनी केली. परम ८००० ची गती (स्पीड) होती ३८.१ ते ५४ TFLOPS ( टेरा फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन्स पर सेकंद (एक गणिती कॅल्क्युलेशन)). TFLOPS हे सुपर कॉम्पुटरची गती मोजण्याचे एक परिमाण आहे. एक टेरा म्हणजे १ ट्रिलियन, किंवा १००० गिगा,  किंवा १० खर्व.  ).  परम १०,००० ची गती  १०० TFLOPS आहे.  अगदी ताज्या माहिती प्रमाणे ( जून २०२०) सी डाक, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या तिघांच्या साहायाने बनवलेला  "परम - सिद्दी"  हा भारतीय बनावटीचा 5.267 पेटा फ्लॉप्स स्पीड असलेला सुपर कॉम्पुटर  जगात  ६३ व्या क्रमांकावर आहे. डॉ विजय भाटकरांच्या या हिमालयाएवढ्या कामासाठी त्यांना भारत सरकाने २००० साली पद्मश्री आणि पुढे २०१५ साली पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

डॉ नरेंद्र करमरकर,  सर  रतन टाटा आणि सी आर एल लॅबोरेटरी: 

भारताचा एक गणिती सुपुत्र डॉ. नरेंद्र करमरकर यांचे नाव आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. १९५६ मध्ये ग्वालियर, मध्य प्रदेश मधील मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेले डॉ नरेंद्र करमरकर यांनी आय. आय. टी. मुंबई मधून १९७८ साली इलेकट्रीकल इंजिनीरिंग मधून बी. टेक.  पूर्ण केले त्यावेळी त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्यानंतर १९७९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी मधून मास्टर ऑफ सायंन्स आणि १९८३ साली युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली मधून कॉम्पुटर सायन्स मध्ये रिचर्ड एम.  कार्प यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एचडी. केली. १९८३ ते १९९८ मध्ये त्यांनी अमेरिकेतील ए.टी. अँड टी. बेल लॅबोरेटरीज च्या मॅथेमॅटिकल सायन्स रिसर्च सेंटर मध्ये रिसर्च फेलो म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी ऑपरेशन रिसर्च या विषयातील लिनियर प्रोग्रामिंग या विभागात इंटिरियर पॉईंट मेथड  (लिनियर  सोल्युशन्स इन पॉलिनोमियल टाइम)   हा नवीन पायाभूत अल्गोरिथम (सिद्धांत)  तयार केला. ह्या सिद्धांतामुळे सर्वोत्तमीकरण (Optimization)  प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा वेळ फारच कमी झाला. त्या आधी सिम्प्लेक्स मेथडने हे प्रश्न सोडवले जात होते आणि ती वेळखाऊ होती. या बद्दल त्यांना सन २००० मध्ये असोसिएअशन फॉर कॉम्पुटिंग मशीनरी (ACM) या प्रतिष्टीत संस्थेकडून पॅरिस कानेलाकीस ( सिद्धांत आणि सराव ) हा पुरस्कार मिळाला. हे करत असतानाच ते मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी  मध्ये १९९१ मध्ये गणिताचे प्राध्यापक आणि इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी, प्रिन्स्टन, न्यू जर्सी या संशोधन संस्थेत १९९६ साली गणितावर संशोधन करत होते. त्यांच्या गणितातील संशोधनाबद्दल त्यांना जगभरातून अनेक पुरस्कार मिळाले.  आय आय टी मुंबई चा “प्रतिष्ठित माजी विधार्थी” चा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला ( देवऋख्यांमध्ये असा पुरस्कार डॉ सदानंद जोशी, मुलुंड सध्या अमेरिकेत स्थायिक याना मिळाला आहे. ) त्यांचे सक्खे मामा  डॉ.  श्रीराम अभ्यंकर हे सुद्धा प्रसिद्ध भारतीय अमेरिकन गणित शास्त्रज्ञ होते.

त्या नंतर त्यांनी भारतातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिसर्च या सरकारी संस्थेत होमी भाभा चेयर प्रोफेसर म्हणून १९९८ ते २००५ पर्यंत कामगीरी केली. हे करत असताना त्यांनी फायनाईट जॉमेट्रीवर आधारित अतिशय नवीन गणिती पद्धतीने सुपर कॉम्पुटरचा आराखडा तयार केला. तो जगातली एक वेगळाच आराखडा होता. 

टि.आय. एफ. आर. मध्ये होत असलेल्या या संशोधनाचा फायदा टाटा ग्रुप ने घ्यायचे ठरवले.  २००६ ते २००७ या काळामध्ये डॉ करमरकर यांनी सर रतन टाटा यांचे शास्त्रीय सल्लागार म्हणून काम बघितले. २००६ चे दरम्यान टाटा ग्रुपने डॉ करमरकर यांचे मार्गदर्शनाखाली सुपर कॉम्पुटर बनवण्याच्या व्यवसायात उडी घेण्याचे ठरवले. टाटा सन्सच्या उपकंपन्या टाटा टेक्नॉलॉजीस, टाटा एलेक्सि, टाटा कॉन्स्लटिंग इंजिनियर्स आणि टाटा पॉवर ने त्या साठी बीज भांडवल पुरवण्याचे मान्य केले आणि कॉम्पुटर रिसर्च लॅबोरेटरी (CRL) हि टाटा सन्सची  उपकंपनी स्थापन झाली.

हिंजवडे, पुणे येथे टाटा टेक्नॉलॉजीची इमारत, १० एकर चा कॅम्पस, १५० कॉम्पुटर शास्त्रज्ञ ( बहुतेक पी एच डी ) आणि ४०० कोटीची गरज असलेला त्यावेळचा जगातली एकमेव द्वितीय प्रोजेक्ट होता. या प्रोजेक्टचे सादरीकरण, त्यावेळचे सायन्स आणि टेकनॉलॉजी मंत्री श्री कपिल सिब्बल आणि सी. एस. आय. आर. चे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर यांचे सोबत झाले. अतिशय आव्हानात्मक असलेला हा प्रोजेक्ट जगाला मार्गदर्शक ठरणार होता. त्यावेळी १  पेटा फ्लॉप्स गती असलेला सुपर कॉम्पुटर जगात नव्हता आणि भारत प्रथमच असा सुपर कॉम्पुटर बनवणार होता. डॉ करमरकरांनी  तयार केलेला प्रोटोटाईप त्या दर्जाचे परिणाम देत होते. गरज होती ती त्याची प्रत्यक्षात उभारणी करणे आणि त्यासाठी लागणारे श्रम, पैसे आणि पायाभूत सुविधा तयार करणे. माशेलकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर तो त्यावेळचा सुपर सुपर कॉम्पुटर होणार होता. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर सरकार सुद्धा तसले कॉम्पुटर विकत घ्यायला तयार झाले होते. ऍटोमिक एनर्जी, बायो टेकनॉलॉजी, ड्रग डिस्कव्हरी पासून हवामान खात्यातील अनेक शास्त्रीय कामाना ते उत्तर होणार होते. हे सर्व करमरकर पुढील एक वर्षात करून द्यायला तयार होते.

पण कुठे तरी माशी शिंकली, डॉ करमरकर आणि टाटा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. नक्की कारणे बाहेर आली नाहीत परंतु वर्तमान पात्रातील बातम्यांवरून (इकॉनॉमिक टाईम ०४ जुलै २००७ ) असे कळते कि डॉ करमरकारानी ह्या उत्पादनातील नफ्याच्या वाट्यापैकी आपल्या बौद्धिक संपदेचा हिस्सा काय असायला हवा या बद्धल मागणी केली. त्यांच्यामते अशी कामे नुसती पैशाच्या पाठबळावर अवलंबुन नसून शास्त्रीय संशोधकाला आपली किंमत वसूल करण्याचा अधिकार आहे. या उलट टाटा ग्रुपच्या मते ते धोका (Risk) पत्करून असे प्रयोग करत असल्यामुळे ती अट त्यांना मान्य नव्हती. खाजगीत बोलताना टाटा ग्रुप अधिकारी म्हणतात कि डॉ करमरकर या संशोधनासाठी किती वेळ आणि पैसे लागतील याचे निश्चित गणित देऊ शकत नव्हते म्हणून बोलणी फिस्कटली. कारण काही असो पण परिणाम भारत एका वेगळ्या सुपर कॉम्पुटरला मुकला. 

पुढे टाटा ग्रुपने करमरकरांची टेक्नॉलॉजी न वापरता "एच पी कॉम्प्युटर्स या अमेरिकन कंपनीचे तयार झिनॉन प्रोसेसर"  घेऊन समांतर कॉम्पुटर पद्धतीवर (Paralel Computing) आधारित “EKA”  नावाचा १२० टीफ्लॉप्स गती असलेला सुपर कॉम्पुटर तयार केला. तो २००७ साली जगातील ४ था आणि आशिया खंडातील पहिला जलद कॉम्पुटर होता.

मोदी सरकार

मधल्या काळात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे.  मोदी सत्तेवर आल्यानंतर २०१५ साली मिनिस्ट्री ऑफ इलेकट्रोनिकस आणि इन्फर्मेशन टेक्नॉलजीने २०२२ पर्यंत रु ४,५०० कोटी रुपये  खर्च करून नॅशनल सुपर कॉम्पुटिंग मिशन या कार्यक्रमांतर्गत ७३ संपूर्ण भारतीय बनावटीचे सुपर कॉम्पुटर देशातील वेगवेगळ्या लॅबोरेटीज मध्ये बसवायचे उद्धिष्ट ठेवले आहे. पूर्वी यातील अनेक पार्टस बाहेरून मागवले जात, पण या पुढे ते देशांतर्गतच तयार करून वापरण्याचे ठरवले असून त्याची जबादारी सी-डॅक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ला दिली आहे.  

त्याचाच एक भाग म्हणून २०१७ मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या मुदतीत सरकारने ४०० कोटी रुपये निधीची मान्यता देऊन  २०१८ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणेच्या डॉ सूर्यचंद्र ए.राव  यांचे नेतृत्वाखाली "प्रत्युष" हा ४ पेटा फ्लॉप्स गती असलेला सुपर कॉम्पुटर  आणि अशाच प्रकारचा "मिहीर" नावाचा सुपर कॉम्पुटर National Centre for Medium Range Weather Forecasting (NCMRWF), Noida. या हवामान खात्याच्या दुसऱ्या विभागात बसवला गेला त्याची गती २.८ पेटा फ्लॉप्स आहे. हे दोन्ही एकमेकांशी संलग्न असल्यामुळे दोघांची एकत्रित गती ६.८ पेटा फ्लॉप्स आहे. हे दोन्ही सुपर कॉम्पुटर २०१८ साली सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे कॅबिनेट मंत्री  डॉ हर्ष वर्धन यांचे हस्ते देशाला अर्पण झाले. २०२० मध्ये "प्रत्युष आणि मिहीर" मुळे भारताचा सुपर कॉम्पुटर मधील जागतिक क्रमांक १६५ वरून ६६ गेला. प्रत्युष चा वैयक्तिक क्रमांक ६७ वा आहे तर मिहीर चा क्रमांक १२० आहे. हे जागतिक क्रमांक कायम बदलत असतात पण एक झलक म्हणून आपणास विशद केले. सध्या  जगातला सर्वात जलद सुपर कॉम्पुटर  "फुगाकु" हा कोबे, जपान मध्ये  असून त्याचा स्पीड आहे १००० पेटा फ्लॉप्स आहे ( एक पेट फ्लॉप = १००० टेरा फ्लॉप ).

कित्येक वेळा आपणास असे वाटते कि भारतात दरवर्षी लाखो इंजिनीयर्स उत्तीर्ण होतात, त्यातील अनेक अत्यंत हुशार असून परदेशात आपली रोजी रोटी शोधतात, तरीपण आपला देश सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये म्हणावा तशी प्रगती का करू शकला नाही. याचे एक कारण म्हणजे भारतीय उद्योजग संशोधन या विषयात पैसे खर्च करायला किंवा गुंतवायला उत्सुक नाहीत. त्यांना व्यापारी पद्धतीचे तयार प्रोडक्ट आणि तयार बाजारपेठ पाहिजे आणि कोणताही धोका नको आहे. म्हणूनच आपल्याकडे गुगल, टेस्ला, फेसबुक, अँपल सारख्या टेक्नॉलॉजी वर आधारित जागतिक कंपन्या तयार होत नाहीत, असे मला वाटते. आता मोदी सरकारने स्टार्टपवर जोर दिला आहे आणि त्यासाठी तरुण वर्ग सुद्धा जोरदार तयारी करत आहे,  तरीपण आपल्या समाजातील मानसिकता हीच कि जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत त्याच्या संशोधनाला बाजारात किंमत नाही. म्हणून आपण नोकरदार किंवा व्यापारी आहोत.

माधव भोळे (9819479791)

इंजिनियर पार एक्सलन्स - एलोन मस्क

 इंजिनियर पार एक्सलन्स - एलोन मस्क

मागे मी,  मंगळावर वस्ती तयार करण्याचे भन्नाट स्वप्न पाहणाऱ्या, अमेरिकन तरुण उद्योगपती, एलोन मस्क बद्दल येथे लिहिले होते. नासासाठी उपग्रह बनवणाऱ्या आणि अवकाशात उपग्रह सोडण्याचे वाहन ( Space Satellite Launching vehicle) तयार करणारी स्पेस एक्स कंपनी, विजेवर चालणाऱ्या चार चाकी तयार करणारी टेस्ला कंपनी, जमिनीखालून कॅप्सूल मधून अतिवेगवान प्रवासी आणि माल वाहतूक करणारी हायपर लूप कंपनी या सारख्या कंपन्यांचा,  एलोन मस्क मुख्य प्रवर्तक आहे. या कंपन्यांच्या प्रगतीमुळे आणि  त्यांनी आपल्या पुढील दशकाची झलक जाहीर केल्यामुळे, त्यांच्या शेयरची किंमत वाढल्यामुळे,  एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. त्याची वैयक्तिक संपत्ती आता २०३ बिलियन डॉलर  झाली आहे.

नुकतेच  एलोन मस्कने आणखी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. स्पेसएक्स च्या यशाच्या जोरावर त्यांनी "स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट" नावाची एक नवीन कंपनी सुरु करून जगभरात सॅटेलाईट द्वारे अतिवेगवान इंटरनेट सेवा प्रदान करण्याचा त्याचा मानस आहे. या कंपनीने या बाबतीत, युनायटेड किंगडम (ग्रेट ब्रिटन ) च्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तेथे या सेवेचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० महिन्यातच केला आहे. तेथील ग्राहकांच्या म्हणण्यानुसार त्यांना ८५ MBPS एव्हडा इंटरनेट वेग मिळत आहे. याची महिन्याची किंमत १२० डॉलर आहे. (भारतात सध्या कमीत कमी ०.५ MBPS ते जास्तीत जास्त १२ MBPS इंटरनेट वेग मिळतो).

वर्क फ्रॉम होम या करोना च्या देणगीमुळे इंटरनेट हि विजेसारखीच एक अत्यावश्यक सेवा बनली आहे. त्यामुळे अशा अतिवेगवान इंटरनेट ला खूप मागणी आहे. सध्या या कंपनीने ८३० सॅटेलाईट वरून आपले काम सुरु केले असून पुढील दशकात ४३,००० सॅटेलाईट ते या कामांसाठी अवकाशात सोडणार आहेत. अर्थातच त्यामुळे मूळ स्पेस एक्स कंपनीला सॅटेलाईट बनवण्याचे, अवकाशात सोडण्याचे आणि ते तंदुरुस्त ठेवण्याचे कायम स्वरूपी काम मिळणार आहे आणि त्याच बरोबर या कंपनीला जगभरातील इंटरनेट ग्राहकांचा महिन्याचा रतीब सुरु होणार आहे.  आणि हो तेथे सॅटेलाईटची तोडफोड करायला आपले तथाकथित शेतकरी सुद्धा जाऊ शकणार नाहीत ?

गुगलचा लॅरी पेज, मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स, ऍमेझॉनचा जेफ बेझो आणि आता टेस्लाचा एलोन मस्क यांच्या कर्तृत्व, दूरदृष्टी आणि व्यावसायिकता यांचे जोरावर त्यांनी जगाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. नशिबाने हे सर्व अमेरिकेसारख्या खुल्या अर्थव्यवस्थेत बहरले गेले पण जर ते कम्युनिस्टांच्या जगात असते तर अलीबाबा डॉट कॉम आणि आंट फायनांशियल चा प्रवर्तक जॅक मा  याची जशी कम्युनिस्ट चीन वाट लावत आहे तशी त्यांची अवस्था झाली असती. (असे ऐकू येते कि चीन जॅक मा च्या ह्या कंपन्यांचे राष्टियकरण करण्याचा विचार करत आहे). जग ४ जी, ५ जी ची चर्चा करत आहे आणि हा पठ्ठा सॅटेलाईट द्वारे स्वस्त कम्युनिकेशन देण्याचा घाट घालत आहे. एलोन मस्क च्या या नवीन उपक्रमाला माझ्या भरभरून  शुभेच्छा.

माधव भोळे (९८१९४ ७९७९१)

क्वेस्ट (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट - quest.org.in)

 
क्वेस्ट (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट - quest.org.in)
 असोरे, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी गावातीतील सुप्रसिद्द वासूनाना निमकर घराण्याच्या सुकन्या श्रीमती अपर्णा भोळे आणि त्यांचे चुलत बंधू श्री निलेश निमकर यांनी लहानपणा पासून शिक्षण क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले आहे. श्री निलेश निमकर यांचे पिताश्री  डॉक्टर विष्णुपंत गणेश निमकर हे चिपळूण आणि सभोवतालच्या गावात दवाखाना चालवत त्यामुळे निलेश ना  ग्रामीण भागाची आवड होती. एकदा ते पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर), जव्हार तालुक्यातील ऐने या गावी  वारली चित्रकला शिकायला गेले असता योगायोगाने ग्रामीण भागातील बाल शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले.  ऐने ह्या साधारण ९०० वस्ती असलेल्या दुर्गम आदिवासी भागात पद्मश्री अनुताई वाघ यांनी सुरु केलेल्या ग्राम मंगल या संस्थेमार्फत चालवलेल्या बालवाडी मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. ऐने, दाभोण आणि राणखोल या तीन गावांमिळून ग्राम मंगल हि संस्था १२ अंगणवाड्या चालवत होती. आदिवासी बोली भाषा आणि सरकारी प्राथमिक पाठयपुस्तकातील उच्च सुसंस्कृत भाषा  यांचा कोठेच ताळमेळ बसत नसल्यामुळे शिकवायचे कसे  हे एक मोठे आव्हानच त्यांच्यासमोर होते. अशा वेळी ते आणि त्यांचे सहकारी यांनी आदिवासी समाजाची सांकेतिक भाषा आणि त्यांची बोली भाषा यांचा मेळ घालून व्यावहारिक भाषा तयार केली जी तेथील विध्यार्थ्यांना पटकन समजायला लागली. तेथून सुरवात झाली एका नवीन पर्वाला.
आदिवासी आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मजबूत करणे हे  त्यांच्या आयुष्याचे  एक उत्तुंग ध्येय झाले. गेले २० वर्ष बालशिक्षण, शिक्षकांसाठी शिक्षण, पाठ्यक्रम तयार करणे सारख्या विषयात काम केल्यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम,  युनिसेफ, सर रतन टाटा ट्रस्ट सारख्या संस्थाचे, निलेश सल्लागार म्हणून काम करतात.  बालवाडीतील अतिलहानग्या मुलांना शिकवण्यासाठी लागणारा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने त्यांची नेमणूक केली आहे. श्री  निलेश याना महाराष्ट्र फौंडेशन तसेच इतर अनेक संस्थांतर्फे  शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय कामगिरी बद्दल पुरस्कार मिळाला आहे.  माझी अंगणवाडी, माझी ओळख, वेगवेगळ्या वयोगटासाठी माझे गणित, माझे पुस्तक, माझा गणित खेळ संच, अनवट वाट, छत्री, भाकर, रंगी बेरंगी बाजार, अशी एकंदर ३० चे वर  पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
 
त्यांच्या भगिनी श्रीमती अपर्णा भोळे ह्या जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेऊन त्या पुढे ठाणे येथील सुप्रसिद्ध ए. के. जोशी उच्च माध्यमिक विद्यालयात कला शिक्षका म्हणून काम करू लागल्या. त्यांचे सर्व लक्ष आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांबरोबरच आपले बंधू निलेश यांच्या कार्यक्षेत्राकडे होते. वेळ मिळेल तसा त्या त्यांच्या कार्यात स्वयंस्फूर्त सहभाग देत होत्या. आपल्या निवृत्ती नंतर काही काळ श्रीमती अपर्णा भोळे यांनी सन्मित्र समाचार ची उपसंपादिका म्हणून सुद्धा काम पहिले परंतु कार्यबाहुल्यामुळे त्यांनी ते पद सोडून दिले.
 
श्री निलेश निमकर यांची या विषयातील तळमळ आणि धडपड सुप्रसिद्ध मराठी कलाकार  श्री अतुल कुलकर्णी यांच्या नजरेत आली. ते आणि आणखी काही समविचारी लोक एकत्र आल्यामुळे क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट, ( quest.org.in) हि बिनसरकारी संस्था २००७ साली स्थापन झाली.  सुरवातीला श्री अतुल कुलकर्णी, अध्यक्ष, श्री निलेश निमकर संस्थापक सदस्य आणि निर्देशक तर श्रीमती अपर्णा भोळे या संस्थेत विश्वस्थ म्हणून काम करू लागले.
वाडा जिल्ह्यातील सोनाळे या आदिवासी गावात ह्या संस्थेचे मुख्य  कार्यालय असून आज  हि संस्था महाराष्ट्रातील ३६  जिल्ह्यात पसरली असून सुमारे ५७०० शाळा / अंगणवाड्यांमधील सुमारे ९००० हून अधिक शिक्षक / शिक्षिकांपर्यंत पोहोचली असून त्या मार्फत ती ग्रामीण भागातील सुमारे २,६०,००० विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन पद्धतीने त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षणामध्ये विध्यार्थ्यांबरोबर शिक्षकांचा मोठा वाटा असल्यामुळे या नवनवीन कार्यपद्धती शिक्षकांना समजावून देऊन त्यांचे मार्फत हे प्रयत्न केले जातात. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्या द्वारे त्यांचे जीवन सुखमय व्हावे हा या मागील मुख्य उद्देश आहे.  ही संख्या दर वर्षी वाढत आहे. १४ वर्ष इतक्या कमी वेळात ते  शक्य झाले ते केवळ त्यांनी तयार केलेल्या ५४ प्रशिक्षित, समाज कार्याची आवड असलेल्या  शिक्षक मित्रांमुळे.  अर्थातच असंख्य हितचिंतक, टाटा ट्रस्ट, अझीम प्रेमजी ट्रस्ट सारख्या नावाजलेले देणगीदार, समाजसेवी सल्लागार, आणि असंख्य स्वयंसेवक यांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही असे संस्थेचे अध्यक्ष श्री अतुल कुलकर्णी याना वाटते. समाजातील अनेक संस्थांकडून क्वेस्ट च्या भव्यदिव्य कामाची दखल घेऊन तिला सन्मानित केले आहे. नुकतेच श्री अतुल कुलकर्णी यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा देऊन सध्याचे उपाध्यक्ष श्री मनोज कार्येकर यांनी आता हि धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
 
क्वेस्ट, श्रीमती अपर्णा भोळे आणि त्यांचे चुलत बंधू श्री निलेश निमकर यांच्या या ऋषी तुल्य परंतु उत्तुंग कार्याचा परिचय समाजाला व्हावा म्हूणन ह्या लेखाचा खटाटोप.
माधव भोळे  
२४/०२/२०२१

 

जागतिक तापमान वाढ आणि मानव

 जागतिक तापमान वाढ आणि मानव:

 सध्या गर्मीचे दिवस आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी तपमान 27 ते 32 डिग्री सेंटिग्रेड  आहे तर ह्युमीडिटी 78 % आहे. पुणे येथे तपमान 19 ते 37 डिग्री सेंटिग्रेड आहे तर ह्युमीडिटी 23 % आहे. हे तपमान रहायला अश्यक नसले तरी रहायला अडचणीचे वाटते. दिवसेंदिवस हे तपमान वाढत जात आहे. 1881 ते 1981 पर्यन्त जे तपमानात गेल्या शंभर वर्षात ते 1.3 डिग्री वाढले तर सध्याच्या शतकात ते 1.8  डिग्री वाढणार आहे.

 याचा एक दुषपरिणाम म्हणजे समुद्राची पातळी वाढणे. गेल्या शतकात ही 6 - 8 इंचाने वाढली आहे. असे म्हणतात 2050 पर्यन्त ही 1 फूट ते 2 फूट 9 इंच एवढी वाढणार असून  त्यानंतर दक्षिण मुंबई वर्षातून एकदा तरी काही काळ पाण्याखाली रहाणार आहे.

 उष्णतामान वाढल्यामुळे अंटारटीक मधील बर्फाचे वितळणे आणि समुद्राचे पाणी गरम झाल्यामुळे आकारमान वाढणे ही पाण्याची पातळी वाढण्याची दोन मुख्य कारणे आहेत. या मुळे जगातील अशी अनेक बेटे पाण्याखाली बुडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आहेत. दुसरा परिणाम म्हणजे वाढलेल्या समुद्राच्या पातळी आणि उष्णतामानामुळे

समुद्राचे बाष्पीभवन वाढून जास्त पाऊस पडेल, कधी कधी अतिवृष्टी सुद्धा होईल, तसेच अवेळी पाऊस पडणे सुद्धा आहे. त्याचा शेतीवर दुष्परिणाम होईल.

 

पृथ्वीचे तपमान वाढायला  अनेक करणे आहेत. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे ग्रीन हाऊस गॅस एमिशन. सुर्यावरून पृथ्वीवर जी ऊर्जा येते ती समुद्र आणि जमीन तापवते. त्यानंतर जास्त झालेली ऊर्जा पृथ्वी परत रेडिएशनने अवकाशात फेकण्याचा प्रयत्न करते. त्या पैकी काही ऊर्जा पाण्याची वाफ, कारबन डायॉक्साईड, मिथेन, नाट्रोजन ऑक्साईड, ओझोन आणि काही कृत्रिम केमिकल गॅस जसे की क्लोरोफ्लोरोकार्बोन (CFCs) जे आपल्या विविध स्प्रे मध्ये असतात असे गॅसेस ही ऊर्जा आपल्यात राखून (absorb) ठेवतात, जी पृथ्वीवरील जीवनाला ऊपयुक्त  असते. या सर्वांना मिळून ग्रीन हाऊस गॅसेस असे म्हणतात.  परंतु ज्या वेळी या ग्रीन  हाऊस गॅसेसचे प्रमाण जास्त वाढते तेव्हा सुर्याकडून जास्त आलेली ऊर्जा जास्त प्रमाणात राखून ठेवली जाते आणि त्यामुळे जरुरी पेक्षा जास्त तपमान वाढते, त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. हे होण्याचे कारण म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा यांचा अमर्याद वापर तसेच केमिकल कारखान्यातून निघणारे विविध वायू, शेती च्या मशागती मधून निघालेला जास्त कॅरबन डायॉक्साईड, वनांचे नष्टीकरण असे आहे. हे ग्रीन हाऊस इफेक्ट वाढत चालला तर माणसाला जगणे मुश्किल होईल.

 

जर ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करायचा असेल तर पेट्रोल, कोळसा, डिझेल याचा वापर कमी करणे. CFCs असलेले स्प्रे न वापरणे. कोळसा आणि डिझेल चा वापर कमी करायचा असेल तर सोलर ऊर्जा किंवा वायूऊर्जा ( wind energy) वापर वाढवणे तसेच वृक्षलागवड करणे.याबाबतीत

आपण काय करू शकतो. आयुष्यात कमीतकमी 10 तरी झाडे लावून ती जगवायची, शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून मार्गक्रमण करणे. पाण्याची नासाडी कमी करणे अशी छोटी उद्धिष्ट तरी ठेवू शकतो. ही कमीत कमी देणं आपण आपल्या पुढील पिढीला ठेवूया.

 

जगात विकसित देश सर्वात जास्त ऊर्जा, पाणी वापरतात आणि त्यांच्यामुळे विकसनशील देशाना जास्त भुर्दंड पडतो. ते होऊ नये आणि सर्व राष्ट्रांनी ही आपली  जबाबदारी आहे हे समजून देणे  आवश्यक आहे, या साठी United Nations Framework Convention on Climate Change (UNFCCC) हि एक जागतिक संस्था या विषयासाठी स्थापन झाली असून पॅरिस येथील कार्यक्रमात 160 देशांनी आपापल्या देशाची  तपमान वाढ 1.5 ते 2 डिग्री पर्यंत मर्यादित ठेवण्याचे स्वघोषीत उद्धिष्ट ठरवले आहे.  शिवाय विकसित देशांनी विकसनशील देशाला वृक्षलागवड आणि कारबन चा वापर कमी केल्यास त्याबदल्यात कारबन क्रेडिट देण्याचे मान्य केले आहे, जे बाजारात रोख विकता किंवा विकत घेता येतात. इतके वर्ष अमेरिका या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देत होती पण चीनच्या असम्बध वागण्यामुळे अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष  ट्रम्प ने पॅरिस करारातुन माघार घेतली.

 

आता आपल्याला कळले असेल की मोदी सरकारने गेल्यावर्षी कर्नाटकातील 107 वर्ष वयाच्या सालूमारदा, थीमाक्का आजींना 380 वडाची आणि 8000 इतर झाडे लावल्याबद्दल पद्मश्री का दिली ती?

 

माधव भोळे (9819479791)

दोन साम्राज्यांची चढाओढ

 

दोन साम्राज्यांची चढाओढ

 

प्रस्तावना, आंट फायनान्शियल:

आपण अलीबाबा डॉट कॉम ह्या चिनी ई-कॉमर्स वेबसाईट बद्दल नक्कीच ऐकले असणार! होय, ह्याच अलीबाबा डॉट कॉम चा प्रवर्तक असलेल्या "जॅक मा" ह्या चिनी इंग्रजी शिक्षका पासून ते आंतरप्रिनर पर्यंत जीवन प्रवास केलेल्या एका अब्जोपतीची आणखी एक कम्पनी आहे तिचे नाव आहे "आंट फायनान्शियल". हि कंपनी चीनमधील छोटे व्यापारी, गरजवंत यांचेबरोबर  “अली पे” सारख्या विविध इंटरनेट प्लॅटफॉर्म वरून आर्थिक व्यवहार करते. अलीबाबा ची आणखी एक रिटेल ई-कॉमर्स कंपनी “अली एक्सप्रेस” वर ५० लाख नोंदणीकृत छोटे मोठे व्यापारी आहेत.  त्या सर्वाना ट्रेंड फायनान्स, वर्किंग कॅपिटल इत्यादी त्यांच्या वाढीसाठी लागणारे वित्त हि “अली पे” पुरवते. या साठी लागणारा अर्थपुरवठा ते एक तर चिनी बँकांकडून घेतात किंवा खाजगी गुंतवणूकदारांकडून घेतात.  या शिवाय, डिजिटल पेमेंट्स ( पे टीएम सारखे ),  संपत्ती व्यवस्थापन (Wealth Management), इन्शुरन्स इत्यादी कामे सुद्धा हि कंपनी करते.

भारतात ह्या प्रकारच्या वित्त पुरवठ्याला, नॉन बँकिंग फायनान्सिल कंपनीज (NBFC) असे म्हणतात. भारतात दोन प्रकारच्या  NBFC आहेत जसे कि बजाज फायनान्स, मुथूट फायनान्स, श्रीराम फायनान्स वगैरे ह्या ऑफलाईन NBFC आहेत तर  Flexiloans, Lendingkart, Indifi Technologies and Capital Float सारख्या नवीन स्टार्टअप फायनान्शिअल टेकनॉलॉजी कम्पन्या आहेत ज्या कंपन्या इंटरनेट माध्यमातून हे काम करायला लागल्या आहेत. ह्या नवीन भारतीय स्टार्टअप फायनान्शियल कंपन्या गुंतवणूकदारांना योग्य तो परतावा देण्याचे मोबदल्यात त्यांचे कडून पैसे घेतात आणि ते पैसे गरजू लोकांना वाढीव व्याजावर कर्ज म्हणून देतात आणि त्याबदल्यात काही कमिशन आकारतात. हे सर्व काम इंटरनेट ऍप किंवा वेबसाईट मार्फत आपण घर बसल्या करू शकतात.ह्या कंपन्या बँक नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेचे कर्ज विषयक व्याज दर आकारणे बंधनकारक नाही. अर्थात काही रिस्ट्रिक्शन आहेतच. 

"आंट फायनान्सियल"  हि “अली पे” ची होल्डिंग कंपनी आहे.  "आंट फायनान्सियल" हे काम अतिशय वेगळ्या पद्धतीने, टेकनॉलॉजिचा उपयोग करून आणि वेगाने करते.  उदा. द्यायचे झाल्यास अलीबाबा आणि अली एक्सप्रेस वरील ५० लाख व्यापाराचा संपूर्ण डाटा,  ते करत असलेली विक्री आणि त्यातून मिळणारे प्रॉफिट ह्या कंपनीकडे असल्यामुळे डेटा ऍनालीटिकस आणि आर्टिफिशिअल इंटीलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अक्षरश: कर्ज विनंती  केल्यापासून फक्त १५ मिनिटात त्या गरजवंताच्या खात्यात पैसे जमा केले जातात. तशाच प्रकारे याच ई-कॉमर्स वेबसाईट वर असलेले १० करोड ग्राहकांचा सुद्धा संपूर्ण डेटा, ते वापरात असलेले क्रेडिट कार्ड वरील व्यवहार आणि त्याचे सिबिल स्कोर सारखे रेटिंग यांची संपूर्ण माहिती त्यांच्या कडे असल्यामुले त्यांना हि कंपनी त्वरित व्यक्तिगत लोन सुद्धा पुरवते.  “अली पे” या त्यांच्या फायनान्शियल ई-कॉमर्स वेब साईटवर १०३ कोटी नोंदणीकृत ग्राहक आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो चीन मध्ये वार्षिक २९ ट्रिलियन डॉलर्स (२९० हजार कोटी डॉलर्स)  चे डिजिटल व्यवहार मोबाईल वरून होतात आणि पुढील ५ वर्षे या आकड्यात ५०% वृद्धी होण्याचे संकेत आहेत.

 

आंट फायनान्सियल ची समभाग विक्री:

या कम्पनीने दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या समभागांची विक्री करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या निवदा २९ ऑक्टोबर ला मागवल्या होत्या. एकंदर ३४.४ बिलियन डॉलर्स रकमेच्या समभागांची विक्री शांघाय आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज वर करण्याचे योजले होते आणि त्यासाठी जवळजवळ ३.२ ट्रिलियन डॉलर्स  च्या निविदा मिळाल्या. हा आर्थिक जगातील एक विक्रमच होता. या कम्पनीच्या शेयरला आलेली एव्हडी मागणी बघून चिनी राज्यकर्त्यांच्या पोटात ढवळायला लागले आणि त्यांनी रातोरात अशा फायनान्शियल कम्पन्यांच्या व्यवहारावर काही नवीन निर्बंध आणून त्या निर्बंधानुसार हि समभाग विक्री व्हावी अशी सूचना "आंट फायनान्शियल" देऊन अचानक दिनांक ३ नोव्हेम्बर ला त्या शेयर ची विक्री थांबवली.

ह्या समभाग विक्रीमुळे "आंट फायनान्शियल" ची मार्केट व्हॅल्यू ३१३ बिलियन डॉलर होणार होती. Berkshire Hathaway, Visa आणि Mastercard या जगातील मोठ्या आर्थिक कम्पन्यानंतर ती जगातील चौथी मोठी मार्केट व्हॅल्यू असलेली आर्थिक कंपनी होणार होती. आंट चे मार्केट व्हॅल्युएशन इजिप्त, चिली किंवा फिनलँड देशांच्या च्या जी डी पी पेक्षा जास्त किंवा जे पी मॉर्गन चेस आणि कंपनी या अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकेपेक्षा जास्त होणार होते. आणि नेमके याच ठिकाणी चीन च्या राज्यकर्त्यांना धोका वाटला. इतके वर्ष चीन आपल्या घरगुती (डोमेस्टिक) तांत्रिक कंपन्यांना प्रोत्साहित करत होती. पण या कम्पन्यांवरचे नियंत्रण सुटून जावे एवढ्या त्या मोठ्या व्हायला नकोत असे चीन च्या राज्यकर्त्यांना वाटत असावे. जर हि  समभाग विक्री यशस्वी झाली असती तर जॅक मा, ज्याने ६०,००० अमेरिकन डॉलर गुंतवणूक करून अलीबाबा डॉट कॉम स्थापन केली, त्याची निव्वळ किंमत (Net Worth) जी आंट फायनान्सियलच्या समभाग विक्री पूर्वी  ४८.२ बिलियन डॉलर होती आणि जी त्या नंतर ७१.६ बिलियन डॉलर एव्हडी झाली असती ती एका रात्रीत ३ बिलियन डॉलर ने कमी झाली.

ज्या २०० चिनी बँकांकडून वित्त पुरवठा घेऊन आंट फायनान्सियल आपल्या ग्राहकांना कर्ज देण्याचे काम करत होती, अशा प्रकारच्या फायनान्शियल कम्पन्या समांतर अर्थ व्यवस्था करतात अशा भीतीपोटी त्यानि अशा फायनान्सियल कम्पन्यांचा बँकांकडून होणारा अर्थ पुरवठा बंद करून त्यांनी आपल्या ताकदीवर आणि आपले फंड वापरून आपल्या ग्राहकांना कर्ज द्यावे अशा आशयाचे निर्बंध आणले. त्यामुळे त्या कम्पन्यांपासून होणाऱ्या व्यवसायावरच कुर्हाड घालण्याचा प्रयत्न केला आहे.

या आधी सुद्धा ज्या ज्या इंटरनेट टेक्नॉलॉजी कम्पन्या चिनी कम्युनिस्ट राज्यकर्त्यांना धोकादायक वाटल्या त्या त्यावर त्यांनी निर्बंध आणले. दिवसागणिक ताकदवान होत चाललेल्या  इंटरनेट आणि टेकनॉलॉजी अब्जोपतीची चिनी अर्थव्यवस्थेवर आणि चिनी ग्राहकांवर होत असलेली मजबूत पकड, चिनी राज्यकर्त्यांना नको आहे आणि त्यामुळे ते  मक्तेदारीविरोधी नवनवीन कायदे आणून यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

चिनी राज्यकर्ते हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कि बॉस कोण आहे? आणि त्या मुळे सध्यातरी या अब्जोपतीना गप्प बसणे भागच आहे.

माधव भोळे (98194 79791)

19.11.2020

माझे मत (देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी)

 

माझे मत (देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी)

देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीची सुरवात ज्या सदगृहस्थाने केली ते कै. शंकर गोपाळ मादुस्कर हे आम्ही ज्या चाळीत गिरगावमध्ये राहत होतो त्याच चाळीत राहत होते. चाळीतील सर्व त्यांना अण्णा म्हणायचे.  अण्णांचे वडील लहानपणीच वारल्यामुळे त्यांच्या विधवा आईने त्यांना काबाड कष्ट करून त्यांचा भाऊ वेदशास्त्री कै. दत्तात्रय श्रीधर भोळे यांच्या मदतीने शिकवले. त्या वेळी ते  बी ए  पर्यंत शिकले होते.  ते आयुर्विम्यात नोकरी करायचे. अण्णा उत्तम कीर्तनकार होते तसेच, सन्मित्र समाचार  सुरवात करण्यात आणि चालवण्यात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या लहानपणीचा आलेल्या अडचणी आणखी कोणावर आल्यास त्याला मदत व्हावी उद्दात्त हेतूने त्यांनी दें. ब्रा. अनाथ कौटुंबिक निधीची स्थापना केली. लहानपणा पासून मी अण्णांना ओळखत होतो पण त्यांनी केलेले हे सामाजिक कार्य एव्हडे मोठे असेल याची त्या वेळी कल्पना नव्हती. समाजातील विधवा, निराधार, अबला स्त्रियांना तसेच अनाथांना मदत देण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न ते आणि त्यांच्या मित्राजनांनी केला आहे. पुढे कै बाळकृष्ण सीताराम मुळ्ये, कै बाळासाहेब कुळकर्णी, कै गजाभाऊ वीरकर वगैरे मंडळी आणि आता आता  पर्यंत श्री रामभाऊ निमकर यांनी हि धुरा सांभाळली. सध्या असलेल्या निधीतून संस्था दरवर्षी प्रत्येक अर्जदार गरजू व्यक्तीला रुपये ३००० मदत करते. या वर्षी, आजपर्यंत ५२ लोकांना मदत केली आहे. दिवसेन दिवस श्रीमंत आणि गरीब यातील दरी वाढत चालली आहे आणि त्या मुळे ज्ञातीतील गरीब अनाथांची गरज आणि संख्या सुद्धा वाढते आहे. वार्षिक रुपये ३००० हि अत्यंत तुटपुंजी मदत आहे. आपण निदान वार्षिक रुपये १२०००/- तरी मदत करावी असे मला वाटते.

मधल्या काळात, समाजात काही मतप्रवाह चालला होता कि आपण एक वृद्धाश्रम बांधावा. वृद्धाश्रम म्हटला कि निवास आला, अस्थापन आले आणि त्या बरोबर अस्थापन खर्च आला. तसेच तो एका भौगोलिक विभागासाठी उपयुक्त होतो. उदाहरणार्थ समजा  रत्नागिरी येथे हा बांधला तर बडोदा किव्वा  पुण्याकडील एखादी माता, आपल्या शिकणाऱ्या मुलाबाळाना घेऊन या आस्थापनात येउन राहण्याची शक्यता कमीच आहे. या उलट आमची गुहागर मधील भगिनी म्हणेल कि माझे घर आहे परसव आहे मी त्या कडे लक्ष ठेऊ शकते, कमी आहे ती रोकड. जर आपण तिला रोकड दिली तर ती आपल्याच घरी सुखात राहील आणि स्वतःचे घर आणि परसव टिकवून ठेवेल.

जे पैसे आपण वृद्धाश्रमाला खर्च करणार होतो असे मानतो ते पैसे जर आपल्या दे. ब्रा. अनाथ कौटुंबिक निधीला मिळाले तर आपण नक्कीच या सर्व निराधार, अनाथ व्यक्तीचे अश्रू पुसू शकू असे मला वाटते. १९८४ साली मी विध्यार्थी साहायक संस्थेमध्ये विश्वस्थ म्हणून काम करत असताना त्या वेळचे अध्यक्ष कै लक्षमण राव भोळे यांनी सुद्धा हाच विचार संस्थेतील त्या वेळच्या विश्वस्थाना पटवला आणि कै ठकुताई कोकजे यांनी वसतिगृह बांधण्याचे अटीवर दान केलेली खार, मुंबई  येथील जमीन विकून आलेल्या रुपयातून संपूर्ण भारतात शिकण्यासाठी विध्यार्थ्यांना मदत करण्यास निधी उभा केला. त्याच दूरदृष्टीचे फळ आजची पिढी चाखत आहे. एक चांगला विचार संपूर्ण समाज घडवू शकतो हेच यातून दिसते. त्या साठी आस्था महत्वाची आहे.

माधव भोळे (मोब. ८४५१८८६७५९)

(श्री माधव भोळे दे. ब्रा अनाथ कौटुंबिक निधीचे चिटणीस असून हे त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत).

Saturday, December 23, 2017

डॉ. विक्रम अंबालाल साराभाई

आधुनिक भारताचे शिल्पकार – डॉ. विक्रम अंबालाल साराभाई

डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म दिनांक १२ ऑगस्ट, इ.स. १९१९ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे एका सधन घराण्यात झाला. ते एक प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांना भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. 

त्यांचे वडील अंबालाल साराभाई हे मोठे उद्योगपती होते आणि आई सरलादेवी त्यांचे घरी मॉंटेसरी पद्धतीने  शाळा चालवायच्या.  त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. आपले विद्यापीठ पूर्व (Pre University) शिक्षण आपल्या आईच्या शाळेत, एका यूरोपीय शिक्षकाचे मार्गदर्शनाखाली, आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात, सेंट जॉन या महाविद्यालयात शिकायला गेले. तेथे त्यांनी नैसर्गिक विज्ञान या विषयात 1940 साली ट्रिपोस पदवी  घेतली. वैश्विक किरणे (Cosmic Rays) हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता आणि त्यात त्यांना पुढे शिकायचे होते, पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील प्रसिद्ध इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये, नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली, वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४५ साली ते पुन्हा केम्ब्रिज येथे परतले आणि १९४७ साली त्यांनी "उष्णकटिबंधीय अक्षवृत्त्यांमधील वैश्विक किरणे अभ्यास" या विषयात पी एचडी प्राप्त केली.

१९४२ साली त्यांचा विवाह भरतनाट्यम आणि कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी स्वामीनाथन यांच्याशी झाला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली. कार्तिकेय पुढे पर्यावरण शास्त्रज्ञ झाले तर मल्लिका साराभाई या पुढे प्रसिद्ध नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्त्या झाली.   

वयाच्या २८ व्या वर्षी, १९४७ साली, अंतराळ विज्ञानाची जन्मभूमी मानली जाणारी "भौतिक संशोधन प्रयोगशाळा (Physical research Laboratory)" त्यांच्या रिट्रीट या घरी त्यांनी सुरु केली. पुढे ११ नोव्हेंबर १९४७ रोजी अहमदाबाद येथील एम जी सायन्स इन्स्टिटयूट मध्ये कर्मक्षेत्र एज्युकेशनल फाउंडेशन आणि अहमदाबाद एज्युकेशनल फाउंडेशन संस्थेच्या साहाय्याने त्याला प्रथम मूर्त स्वरूप देण्यात आले. प्राध्यापक कलपाठी रामकृष्ण रामनाथन, हे या संस्थेचे पहिले संचालक (डायरेक्टर ) होते. सुरवातीला वैश्विक किरणे आणि उच्च वातावरणाचे गुणधर्म या विषयावर संशोधन सुरु होते, पुढे अणूऊर्जा आयोगाच्या (Atomic Energy commission) अनुदानामुळे त्याची व्याप्ती वाढवून सैद्धांतिक भौतिक शास्त्र (Theoretical Physics) आणि रेडिओ भौतिकशास्त्रावर (Radio Physics) संशोधन होऊ लागले. १९६५ ते १९७१ या काळात त्यांनी त्याचे संचालक म्हणून काम बघितले.   

१३ डिसेम्बर १९४७ रोजी डॉ विक्रम साराभाई, उद्योगपती कस्तुरभाई लालभाई आणि सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ आणि "वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद(Council for Scientific and Industrial research - CSIR) चे पहिले महासंचालक "सर डॉ शांतीस्वरूप भटनागर" यांच्या कल्पनेतून साकार झालेली अहमदाबाद येथील वस्त्र निर्मिती उद्योगाला उपयोगी अशा "अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्रीज रिसर्च अससोसिएशन" स्थापन केली, १९४९ साली CSIR कडून मान्यता मिळाल्या नंतर त्याची पायाभरणी सरदार वल्लभभाई पटेल तर उदघाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हस्ते झाले. १९५६ पर्यंत ते त्याचे मानद संचालक होते.

१९५० पासून त्यांनी त्यांच्या कुटुंबिक व्यवसायात प्रामुख्याने लक्ष द्यायला सुरवात केली. १९५० ते १९६६  या काळादरम्यान डॉ. साराभाई यांनी बडोद्यात अनेक उद्योगांची स्थापना केली, जशा कि साराभाई केमिकल्स, साराभाई ग्लास, सुह्रिद गेयगी मर्यादित, सिन बायोटिक्स मर्यादित, साराभाई मर्क मर्यादित आणि साराभाई इंजिनियरिंग ग्रुप.  मुंबई मध्ये त्यांनी स्वस्तिक तेल कम्पनीचे व्यवस्थापन ताब्यात घेतले. तेल काढण्याचे  नवीन तंत्र विकसित केले आणि कृत्रिम डिटर्जंट्स आणि कॉस्मेटिक्सची निर्मिती केली. कलकत्ता येथे त्यांनी स्टॅण्डर्ड  फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे ​​व्यवस्थापन ताब्यात घेतले. तेथे त्यांनी पेनिसिलीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सुरवात केली आणि फार्मास्युटिकल उत्पादनांच्या संख्येत वाढ केली. १९६० मध्ये त्यांनी नैसर्गिक आणि कृत्रिम औषध उत्पादने तपासणीसाठी साराभाई रिसर्च सेंटर, बडोदा ची स्थापन केली.

डॉ. साराभाईंना व्यवस्थापन क्षेत्रात फार रस होता. १९५६ मध्ये त्यांनी अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशनची स्थापना केली आणि १९६० मध्ये बडोदा येथे त्यांनी ऑपरेशन्स रिसर्च ग्रुपची (ओआरजी) स्थापना केली. भारतातील व्यावसायिक व्यवस्थापनाची गरज पूर्ण करण्यासाठी १९६१ साली विक्रम साराभाई यांच्या पुढाकाराने, त्या वेळचे गुजरातचे मोठे लोकोपकारी उद्योगपती कस्तुरभाई लालभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री डॉ जीवराज मेहता यांचे साहाय्याने त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील, जगप्रसिद्ध व्यवस्थापन शिक्षण संस्था स्थापन केली. या कामात त्यांना त्यावेळचे केंद्र सरकार, राज्यसरकार, स्थानिक उद्योगपती, अमेरिकेचे फोर्ड फौंडेशन आणि हार्वर्ड विद्यापीठ या सर्वांचे सहकार्य लाभले. १९६५ पर्यंत ते त्याचे मानद संचालक होते.

१९६२ मध्ये भारतातील अंतराळ संशोधन सुसूत्रित करण्यासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) च्या राष्ट्रीय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. साराभाई यांनी स्वीकारली. हीच  संस्था पुढे १९६९ सुरु झालेल्या भारतीय  अंतराळ संशोधन संथेचा (ISRO)  पाया बनली. केरळ राज्याची ची राजधानी असलेल्या त्रिवेंद्रम जवळील "थुम्बा" या उपनगरात, थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉचिंग स्टेशनची स्थापना करण्याचे निर्देश दिले आणि फ्रेंच सेंटॉर संशोधन रॉकेटच्या निर्मितीसाठी एक कार्यक्रम सुरू केला. थुम्बा येथील रोहिणी आणि मेनका या दोन भारतीय रचनेच्या रॉकेट लाँचरच्या विकासामागे त्यांची मोठी प्रेरणा होती.  १९६६ मध्ये ते अणु ऊर्जा आयोगाचे (Atomic Energy commission) अध्यक्ष होते.

त्यांनी आणखी काही स्थापन केलेले ठळक प्रकल्प / संस्था म्हणजे कल्पाकम, तामिळनाडू येथे सुरु केलेला, अणू ऊर्जेसाठी  वापरण्यात येणारा "फास्टर ब्रीडर टेस्ट रिऍक्टर (FBTR)", कलकत्ता येथे सुरु केलेली "व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन आस्थापन" , हैदराबाद येथे सुरु केलेले "इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड", जादूगुडा, झारखंड येथे अणुऊर्जेसाठी लागणारे "युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड" होत.

१९६२ मध्ये ते भारतीय शास्त्र परिषेदेच्या भौतिक विभागाचे अध्यक्ष, तसेच भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन चे आणि संरक्षण विभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयक कमिशनचे ते अध्यक्ष होते. अनेक भारतीय आणि विदेशी, शास्त्र विषयक संस्थांमध्ये त्यांची मोलाची कामगिरी होती. १९७० साली व्हिएना, ऑस्ट्रिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाच्या परिषदेचे ते अध्यक्ष होते आणि १९७१ साली "अणुऊर्जेचा शांततामय उपयोग" या संयुक्त राष्ट्र परिषदेच्या चौथ्या सभेचे ते उपाध्यक्ष होते.



सायन्स त्यांचा आत्मा होता आणि त्याद्वारेच आपल्या महान देशाच्या शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक समस्यावर आपण उपाय शोधू शकतो यावर त्यांचा दृढविश्वास होता.  उपग्रह दूरचित्रवाणीचा वापर करून, आधुनिक तंत्रज्ञानाने, दूरच्या  गावांतील शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याची योजना त्यांनी तयार केली.  जी पुढे Satellite Instructional Television Experiment (SITE)  म्हणून प्रसिद्ध झाली.  



पंडित नेहरूच्यावर असलेल्या  प्रेमाचे पोटी आणि त्यांचे दूरदृष्टीला अभिवादन म्हणून डॉ साराभाई स्वतः स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेला "नेहरू फौंडेशन" असे नाव देऊन यांनी त्या द्वारे अनेक सामाजिक उपक्रम सुरु केले जे आजहि सुरु आहेत.

शास्त्र आणि तंत्रज्ञान यासाठी प्रसिद्ध असलेले "शांतीस्वरूप भटनागर"  पारितोषिक डॉ साराभाई यांना १९६२ साली त्यांच्या भौतिक शास्त्रातील कामगिरी साठी देण्यात आले. १९६६ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले. १९७२ साली त्यांचे मृत्यूचे पश्चात,  सायन्स आणि टेकनॉलॉजी या विषयातील त्यांच्या भरीव कामगिरीसाठी, त्यांना "पदम विभूषण" हा 'किताब त्यांना बहाल करण्यात आला.

अशा या भारताच्या महान सुपुत्राने दिनांक ३० डिसेम्बर १९७१ रोजी रशियन रॉकेटचे उड्डाण आणि थुम्बा रेल्वे स्टेशनचे उदघाटन करून झाल्यावर,  त्यांच्या कोवलम येथील आवडत्या रिसॉर्ट मध्ये रात्री आपल्या रूम मध्ये शांतपणे झोपले असताना त्यांना मृत्यूने कवटाळले,  परंतु त्या बाबतीत कोणतीही चौकशी झाली.  मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे ५२ होते.  कदाचित भारताच्या शास्त्रीय आणि अणू शक्तीची प्रगती एवढ्या झपाट्याने होणे कोणा जागतिक शक्तीला रुचले नसेल काय?


माधव भोळे (८४५१८८६७५९ )