Sunday, December 3, 2023

अन्नधान्य, एका राष्ट्रीय संपत्तीची नासाडी

अन्नधान्य, एका राष्ट्रीय संपत्तीची नासाडी (सुज्ञ नागरिकांनी विचार करण्याची गोष्ट!!) ज्यावेळी हमी भाव मिळत नाही म्हणून शेतकरी दूध, टोमॅटो, कांदा यासारखे शेतमाल रस्त्यावर फेकतात आणि पत्रकार ते दृश्य चॅनल्स वर ही बातमी सर्वात पहिली आम्ही दाखवली म्हणून अभिमान बाळगतात त्यावेळी एवढ्या अमूल्य राष्ट्रीय संपत्तीची जाहीर नासधूस होत असून सुद्धा कोणाला त्याचे गांभीर्य कळत नाही याचे वाईट वाटते. लग्न समारंभ तसेच इतर धार्मिक आणि सामाजिक समारंभा मध्ये शिजवलेल्या अन्नपदार्थांची नासधुस होत असते. अशा प्रसंगी येणारी मंडळी किती येणार याचा नक्की अंदाज नसल्यामुळे माणसे कमी आली तर शिजवलेले अन्न फुकट जाते. त्याची विल्हेवाट नंतर लावली जाते पण ति योग्य असेलच असे नाही. त्यात सध्या बुफेचा काळ असल्यामुळे आपण कितीश्रीमंत आहोत आणि बुफेच्या शेकडो व्हरायटी आपण ठेवल्या या नादात बुफेच्या अनेक काउन्टरवर अन्न उरते याचा विचार यजमानाकडून केला जातं नाही. काही समाजात अशा प्रसंगी ५ ते ८ पकवान्न वगैरे ठेवण्याची प्रथा आहे. अशा वेळी साहजिकच अनेक पदार्थ उरणे आणि काही पदार्थ कमी पडणे हे ओघाने आलेच. यामध्ये कॅटररचा जरी फायदा होत असला तरी अन्नधान्याची नासाडी होते हे नाकारता येणार नाही. लोक मोठमोठ्या हॉटेल मध्ये जातात आणि अधिक उणे पदार्थ मोहामुळे मागवून काही पदार्थ असेच टाकून देतात. तुम्ही आपापल्या शारीरिक कुवती प्रमाणे हवे तेव्हढेच मागवायला काय हरकत आहे? निदान नासाडी होणार नाही. माझ्या एका मित्राच्या हॉटेल मध्ये लिहिले होते सर्व थाळी साफ असेल तर बिलावर १०% डिस्काउंट मिळेल. त्याला नम्रता पूर्वक हात जोडले. त्यातच हल्ली तरुण मंडळींमध्ये वाढदिवसाला तोंडाला केक फासण्याचा जो अचरटपणा सुरु झाला आहे हा कुठेतरी थांबायला हवा. अन्नछत्र चालवणाऱ्या धार्मिक मंडळींनी जर असा संदेश दिला की येणाऱ्या पहिल्या अमुक एक संख्ये पर्यंतच (आणि अर्थातच अमुक एक वेळेपर्यंत येणाऱ्या) मंडळींनाच मोफत भोजन मिळेल, तऱी सुद्धा हा उद्देश काही प्रमाणात सफल होईल. ठीक आहे तुम्ही श्रीमंत आहात आणि ति श्रीमंती दाखवण्याचा तुम्हांला हक्क आहे परंतु राष्ट्रीय संपत्तीची नासधूस करण्याचा कोणालाही हक्क नाही. असे होऊ नये यासाठी एक सोपा उपाय आहे असे वाटते. तो म्हणजे आमंत्रणामध्येच एका बाजूला भोजनाची वेळ लिहितात त्या ठिकाणी खाली एक तळटीप म्हणून "आपल्याकडील किती व्यक्ती भोजनाला येणार आहेत हे व्हाट्सअप नंबरवर कळवले म्हणजे त्यांचे भोजन सुनिश्चित करता येईल. जे असे कळवणार नाही त्याना अशी खात्री यजमान देऊ शकणार नाहीत" अशा आशयाची विनंती वजा इशारा लिहावा. सुरवातीला काही लोकांना संकोच वाटेल पण एकदा ही चांगली प्रथा सुरु झाली की त्याचा समाजाला आणि पर्यायाने देशाला फायदा होईल. आपले बघून इतर समाज सुद्धा त्याचे अनुकरण करतील. कोणीतरी सुरवात करायलाच हवी मग आपल्यापासूनच करायला काय हरकत आहे? हा संदेश कृपया आपल्या मित्र मैत्रिणींना सुद्धा पाठवा ही विनंती. माधव भोळे

Sunday, November 19, 2023

संत भानुदास

"भूतभव्यभवत्प्रभुः" 🌼 पंधराव्व्या शतकाची चाळीशी सरत आली होती तेव्हाचे दिवस. ज्या मुघलांच्या घराण्यानं भारताच्या संपूर्ण भविष्यावर नांगर चालवला त्यांच्यापैकी पहिल्या आक्रमकाचा, म्हणजे बाबरचा जन्मही झाला नव्हता तेव्हाचे दिवस. पण तरीही साधारण ४ शतकांपेक्षा अधिक काळ भारत आणि इथले हिंदू लोक सतत सुलतानी संकटांना तोंड देत होते. कत्तलींचा काळ. गोवंशापासून ते घरातल्या लेकीबाळींपर्यंत कुणालाही तलवारीच्या धाकावर कधीही उचलून नेलं जात होतं असे दिवस. देवळं पाडली जाऊन तिथे मशिदी उभ्या ठाकत होत्या. उत्तरेच्या परिसरात शेकडोंचे तांडे धर्मांतराच्या वेडानं झपाटून हिंदूना दिवसरात्र छळीत होते. पण दैवाची योजना कुणाला कळली आजवर ? आजही याचा हिशेब लागणं कठीणच. या भरतभूवरी यवन माजले फार चौशीबाजुंनी फक्त दिसे अंधार गाायाबायांच्या भयाण किंकाळ्यांनी बदलला भविष्याचासुद्धा आकार याच सगळ्या भोवतालात आज ज्यांची गोष्ट लिहायला घेतली आहे त्या भानुदासांचा जन्म झाला. ऋग्वेदी कुटुंबात. हे संत भानुदास म्हणजे आपणा सगळ्यांना परिचित असलेल्या संत एकनाथांचे पणजोबा बरं का ! लहान वयातच धर्माचरण, शास्त्राभ्यास आणि उपासनेनं असे काही घडत गेले की थेट सूर्यनारायणांची कृपा झाली. नाथ महाराज याविषयी लिहिताना म्हणतात की... ज्याने बाळपणी आकळिला भानु । स्वये जाहला चिद्‍भानु । जिंकोनी मानाभिमानु । भगवत्पावनु स्वये जाला ॥ वयाबरोबर येणारी कर्तव्यं पार पाडीत होतेच भानुदास. कपड्यांचा व्यापार मांडला होता म्हणे एक. पण कुळाचं कल्याण ज्याने घडत राहिलं ती भगवंत भक्ती प्राणाहून प्रिय. त्याच भगवंताच्या भक्तीतून ते म्हणे एकदा दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्याच्या दरबारी गेले. भगवंताची कथा सांगायला येणाऱ्या शास्त्रनिपुण सत्पुरुषांना त्याकाळी हिंदू राजांच्या दरबारात मान होता. राजानंही गरीब ब्राह्मणाचं विद्यार्जनातून आलेलं, भक्तीनं जपलेलं आणि आचरणानं सिद्ध केलेलं तेज ओळखलं आणि म्हटलं, "सांगा भगवंताची कथा. नगरीचे सारे लोक ऐकतील. आम्हीही रोज येऊ." त्याकाळात राजा स्वतः भागवतकथा ऐकायला येत असे. महालाजवळच्याच एका देवळात मंडप सजला. नगरात दवंडी पिटून झाली. दिवस ठरला. उद्यापासून भागवत सप्ताहाला सुरुवात. अगदी "आदौ देवकी देव गर्भ जननं"च्याही आधीपासून भागवताचा महिमा वर्णनातून मांडणं सुरु झालं. एकापेक्षा एक उत्तम पदं, रागाला धरून केलेली जाणारी गायकी, सूक्ष्म ज्ञानानं भारलेलं निरूपण नि कथाभागाचा रसभरित प्रसाद ज्याच्या त्याच्या तळहाती देऊ लागले संत भानुदास. त्यांच्या ओजस्वी वाणीतून. एक दिवस त्यांच्या अपेक्षेपेक्षा कथाभाग नि त्या दिवशीचा संपूर्ण कार्यक्रम जरा लवकर आटोपला. राजा भानुदासांना म्हणाला, "चला शास्त्रीबुवा, आपल्याला आज आमच्या नगराची सफर घडवून आणतो. दुर्गादेवीच्या दुष्काळानं पोळलेल्या मराठी प्रांतातले तुम्ही. बघा तरी वैभव म्हणजे कसं नि काय असतं ते." आता राजाला हे कोण समजावणार की ज्याला लहान लेकरू असताना सूर्यनारायण स्वतः प्रगट होऊन आशीर्वाद देतील इतकी उपासना मांडता आली त्याला वैभव वैभव म्हणजे अजून काय दाखवणार कुणीही ? पण म्हणतात ना, सारं काही विधिलिखित आहे. भानुदासांनीही राजाची मर्जी राखली. राजाच्या शानदार रथात बसून नगराच्या कानाकोपऱ्यात हिंडून झाल्यावर राजा त्यांना एका देवळात घेऊन आला. त्याचं आराध्य दैवत असलेल्या देवीच्या दरबारी. संध्याकाळची वेळ होती. अगदी सुरेख फुलांची पूजा बांधलेली होती. पांढऱ्या शुभ्र शेवंतीच्या माळा लावल्या होत्या महिरपीवर. देवीच्या डोईवर देखण्या पिवळ्या फुलांची वेणी होती. गळ्यात तान्ह्या तान्ह्या मोगऱ्याच्या कळ्यांनी भरगच्च भरलेली माळ घातलेली होती. चरणांपाशी कमळं होती. सगळीभर धूप दरवळत होता. तूपाचा मंद दिवा तेवत होता समोरच. शेजारी दोन उंचच्या उंच समया तेजाळत होत्या. देवीच्या मूर्तीवर भानुदासांनी आजवर कधीही पाहिलं नव्हतं इतकं सोनं होतं. दिव्यांच्या प्रकाशात झळाळणारा तो साक्षात शक्तीचा गाभारा पाहिला आणि भानुदासांनी थेट हात जोडले... "सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि। गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तुते॥" इतक्या भक्तीभावानं देवीला केलेला नमस्कार राजानं पाहिला, चटकन् आपणही हात जोडले नि खांद्यावरच्या उंची वस्त्रावरुन हात फिरवीत भानुदासांना प्रश्न केला, "मग ? काय शास्त्रीबुवा ? कसं आहे आमच्या देवीचं देऊळ ? कशी आहे आमच्या देवीची प्रभा ? कसं आहे हे वैभव ? पाहिलंय का याआधी कुठे आमच्या या देवीइतकं तेजस्वी रूप कुण्या देवीचं ?" लहान वयापासून शास्त्राच्या कुसुमांनी मनुष्यजन्मरुपी कृपेची यथायोग्य पूजा केलेली होती हो, राजाचा अहंकार क्षणात ओळखला, आणि तरीही अजाण लेकराच्या खोड्यांकडे आईने दुर्लक्ष करावं तसं अगदी राजाच्या अवगुणाकडे दुर्लक्ष करीत म्हणाले, "काय ते रूप, काय ती पूजा बांधलेय. वाह राजन वाह. फार प्रसन्न वाटलं." बरं इथपर्यंत राजाने तरी थांबायचं की नाही ? त्यालाही त्याच्या वैभवाचे गोडवे गाण्यात इतका रस की पुढे पुन्हा विचारू गेला, "बास ? एवढंच ? प्रसन्न वाटलं फक्त ? डोळे दिपले नाहीत ? पाहिलंय का कधी इतकं सोन्यानं मढलेलं देवतेचं रुप ? तुमच्या पंढरपुरचा पांडुरंग का कोण म्हणता तो आहे का असा ? हे देऊळ पाहिलंत ? हे नगर पाहिलंत ? आहे असं काही तुमच्या पांडुरंगाच्या पंढरपुरात ?" आता मात्र भानुदासांमधला भगवत् भक्त कडाडून जागा झाला बरं. पित्याची निंदा ऐकून पुत्राच्या मुठी वळल्या जाव्यात किंवा माहेरच्या माणसांना बोल लावलेले पाहून एखाद्या विवाहितेची नजर जशी क्षणात करारी व्हावी तसं भानुदासांचं बोलणंच पालटलं. मनात म्हणतायंत, "आमचा पांडुरंग होय रे ? तुझा कुणीच नव्हे ? हीच का देवाबद्दलची जाण ? मग कशाला मांडलंय भागवत कथेचं सोंग ?" घडीभर विचार केला आणि म्हणाले, "आता काय सांगायचं राजेसाहेब. तुमच्याच राज्यात येऊन तुमच्याच नगरीत राहून तुमचाच अवमान करायचं पाप माझ्याहातून कशाला घडवता. छान आहे हो तुमचं विजयनगर. देवीचं हे देऊळही छान आहे हा. चला. निघूया आता ?" राजाने हसत हसत बोलणाऱ्या भानुदासांचे हे बोल ऐकले मात्र आणि त्याच्यातल्या अहंकाराला जे काही उधाण आलं की काय सांगावं. कुतुहलाने बोलू गेला. म्हणाला "म्हणजे ? तुमचं पंढरपूरही असं आहे ? तुमच्या पांडुरंगाचं देऊळही हे असं भव्य आहे ? आमच्या इतकं वैभव आहे पंढरपुरात ?" भानुदास म्हणाले, "इतकं ? छ्छे छ्छे !" राजा मिशीला पीळ देत म्हणाला, "हा हा. तेच म्हणतो." भानुदासांनी पुढच्या क्षणी म्हटलं की, "अहो हे तुमचं वैभव आहे ना इतका तर पंढरपुरातल्या पोरटोरांच्या खिशात खुर्दा खुळखुळतो. पंढरपुराची बातच निराळी हो. जाऊ दे काय सांगायचं आता." एवढं वाक्य बोलून भानुदास निघायची गडबड करीत पुढे जायला पावलं उचलू लागले. राजाच्या मनाला आणखी एक धडक बसली. म्हणाला, "काय म्हणता ? हे माझ्या साम्राज्याएवढं वैभव पोरांच्या खिशातला खुर्दा ? हे महाल, हे सोनं नाणं, ही रत्नं, हे एकाहून एक डेरेदार वृक्ष, या फळबागा, या अस्सल देशी गायी, त्यांचं दूधदुभतं, या पंचपक्वान्नाने भरलेल्या मेजवान्या ? हे सगळं आहे पंढरपुरात ?" भानुदास हसत म्हणाले, "हे आहे ? अहो याच्यापेक्षा आहे !" राजाला आता मात्र चांगलीच चीड येऊ लागली. अंगावरची वस्त्रं सावरीत, मुकुट सारखा करीत तो भानुदासांना म्हणाला, "बघा शास्त्रीबुवा...मी ठरवलंच तर पंढरपुरात येऊन जातीने पाहीन बरं का सगळं." देवाला नावं ठेवणाऱ्याला ऐकतोय का काय भानुदासांसारखा भगवत् भक्त. त्यांनीही सांगितलं, "या या. मी तर म्हणतो याच. पाहा कसं आहे पंढरपूर. नाही ना पाहिलं अजून ? वीटेवर उभं, मकरकुंडलं ल्यालेलं, कटीवर हात घेऊन, मंदस्मित करीत साऱ्या विश्वाकडे पाहणारं शारंगधराचं ते रुप पाहिलं नाहीत ना अजून ? अहो काय सांगू तुम्हाला, ही तुमची रत्नं रत्नं म्हणता ना ती जात्यात भरडून त्याची रांगोळी काढतात आमच्या पांडुरंगाच्या देवळासमोर. तीही शेणाने सारवलेल्या प्रांगणात. हे जे वृक्ष वृक्ष म्हणता ना असली साधी झाडं नाहीतच हो पंढरपुरात. सगळेच्या सगळे कल्पवृक्षच. छायेत बसलात नि काही मागितलंत की त्वरित मिळेल अशी व्यवस्था. साध्यासुध्या गायीबियी तर नावालाही नाहीत पांडुरंगाच्या गावी. सगळ्याच्या सगळ्या कामधेनु. आणि देवाचं देऊळ ? देवाचा गाभारा ? त्याचं वर्णन काही माझ्यासारख्या पामराच्या वाणीला शक्य नाही इतकं ते प्रचंड तेजाने भारलेलं आहे." राजा म्हणाला, "अस्सं ? तरी म्हणजे साधारण काय ? सांगा तरी. आमच्या देवीपेक्षा देखणी असते का पूजा तिकडची ? इतकं आमच्या देवीइतकं भव्य आहे का तुमच्या पांडुरंगाचं देऊळ ? तुमच्यासारख्या गावोगावी जाऊन कथा सांगणाऱ्या फाटक्या लोकांचा देव तो, कसा असणार ? तसाच असायचा." एवढं ऐकलं मात्र आणि भगवंताच्या निंदेनी आता भानुदास पुरते संतापले. राजाला अद्दल घडलीच पाहिजे असं मनात आलं आणि भानुदास म्हणाले, "रागावू नका राजेसाहेब, पण देवी पंढपुरातल्या रुक्मिणी पांडुरंग मंदिराच्या महाद्वारासमोर जो रस्ता आहे ना त्यावर केर लोटतात केर. दिवसातून तीनदा !" आता हे ऐकल्यावर राजाच्या रागाचा पारा चांगलाच वर चढला. म्हणाला, "भटजी ? काय बोलता ?" क्षणात रागाने राजाच्या वाणीचा असा काही ताबा घेतला की ज्याचं नाव ते. राजा म्हणाला, " आता तुमची कथा बिथा काही नाही. थेट पंढरपुरात चला. आत्ताच्या आत्ता निघायचं. मी स्वतःच्या डोळ्यांनी सारं पाहीन आणि तुम्ही जे बोलला आहात त्यातली एकही गोष्ट खोटी निघाली तर लक्षात ठेवा की तुम्हाला तिथेच सुळावर चढवीन. प्राण घेईन प्राण." झाली ना पंचाईत ? काय गरज होती अतिशयोक्ती करीत जायची. अहंकाऱ्याचा खेळ त्याचा त्याच्यापाशी म्हणून सोडून द्यायला हवं होतं ना. आपण कुणीही त्यांच्याजागी असतो तर हेच केलं असतं की नाही ? अहो बळी तो कान पिळी हा सृष्टीचा नियम आहे. पण भगवत् भक्त आणि तुम्हा आम्हा सामान्यांमध्ये हाच फरक आहे बरं...देवाची निंदा, देवाला दुय्यम दाखवलं जाणं, देवाची टिंगल कधीही सहन करत नाहीत भक्त. मग त्यासाठी त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले तरी बेहत्तर. मग काय... पालख्या, हत्ती, घोडे, दिमतीला सेवक मंडळी, थोडीफार कुमक, प्रवासातल्या भोजनासाठीचं सामानसुमान, आचाऱ्यांचा कंपू, तंबूची कापडं, पाणी, सरबतं, आणखी काय काय मोठ्या लोकांच्या सगळ्या मोठ्या गोष्टी बरोबरीला घेऊन मजल दरमजल करीत आले राजेसाहेब भानुदासांबरोबर पंढरपुराजवळ. अगदी जवळ जवळ येत गेले आणि बघता बघता चंद्रभागा दिसायला लागली इतक्या जवळ येऊन पोहोचले. भगवंताच्या प्रेमापोटी धाडस तर केलं हो... आता पुढे काय ? रत्नांच्या रांगोळ्या नि कल्पवृक्ष कुठले हो ? वाळवंट भिमेकाठचं. दगडाच्या भिंतींचं देऊळ. नामाच्या प्रेमात बुडालेले भगवंताचेच भक्त नि अवघ्या भक्तीमय वातावरणानं भारलेला ऐहिक सुखांच्या आसक्तीपासून खूप खूप लांब पोहोचलेला हा परिसर. देवाच्या अस्तित्त्वानं, परमार्थ आणि अध्यात्माच्या तेजानं उजळणारा भोवताल. पाहता पाहता पंढरपूर दिसायला लागलं. लहानसहान घरं दिसू लागली. आणि आता अगदी पांडुरंगाचं देऊळ समोर नजरेच्या टप्प्यात आलं अगदी. राजाच्या भोई लोकांनी पालखी खाली ठेवली. राजेसाहेब बाहेर येऊन साधारणशा उंच जागेवर एक पाय रोवून, एक हात कमरेवर हिंदकळणाऱ्या तलवारीच्या मुठीवर ठेवून गरजले... "का रे बुवा ? हेच ना तुझं पंढरपूर ? रत्नाच्या रांगोळ्या, कामधेनु, कल्पवृक्ष...इथेच आहे ना ते सगळं ?" भानुदास पुढे येत म्हणाले. "तर तर...हे काय. हेच पांडुरंगाचं पंढरपूर. आम्हा भगवत् भक्तांचं माहेर. आईचं घर हेच." "हो ना ? मग कु़ठं आहेत दाखवा तुमचे कल्पवृक्षं. कुठयंत कामधेनु ? या दगडाच्या देवळात उभा आहे ना तुमचा पांडुरंग का कोण तो ?" आता मात्र भानुदासांचा नाईलाज झाला... "किती भार घालू रघुनायकाला, मजकारणे शीण होईल त्याला" म्हणताना समर्थ रामदासांच्या मनात जे भाव प्रगटले काही शतकांनी, तेच भाव भानुदासांच्याही मनी होते हो. देवाला का भार आपल्या शहाणपणाचा. पण आता करायचं तरी काय ? करणार काय ? जे आजवर सगळ्या भक्तांनी केलं तेच ! सर सर सर सर ओढली जाणारी तिची साडी मुठीतून निसटताना रजस्वला द्रौपदीनं "गोविंद" म्हणून ज्याला आर्त हाक दिली, कड्याच्या टोकावरून लोटून टाकलं गेलं तेव्हा "नारायण नारायण" असा अखंड नामजप सुरु ठेवीत प्रल्हादानं ज्याच्यावर विश्वास ठेवला, कुलक्षय घडताना पाहून विषादाने भरलेलं मन अर्जुनाने ज्या "माधवा"कडे हक्कानं मोकळं केलं, "कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतःक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:" म्हणत हजारो राजांनी जरासंधाच्या विध्वंसाला घाबरून ज्याची करुणा भाकली, त्याच भगवंताला हाक मारली भानुदासांनी ! मनातल्या मनात हात जोडले, पांडुरंगाची मूर्ती डोळ्यांसमोर आणली आणि म्हणाले, "देवा...संतत्वाची उपाधी लोकांनी दिली खरी, पण किती रे मी दीन तुझ्या लीलेपुढे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, आणि मत्सराचा त्याग करून तुझ्याच नामात बुडालो म्हणून निश्चिंत झालो होतो पण माझ्या भगवंताविषयी क्षणभर वाईट शब्द ऐकले आणि क्रोध आवरला नाही रे. चुकलंच. चलाखी करू गेलो. पण आता हा राजा हट्टाला पेटला आहे. ऐकत नाही. आता तूच कसं ते यातून तारून ने." तोवर इकडे राजा आणखी चवताळला होता. म्हणाला, "काय रे बुवा...वाचा बसली का आता ? करु का सूळ तयार ?" भानुदास भानावर आले. डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि म्हणाले, "राजेसाहेब, का इतके संयम सोडून वागता. रागावणार नसाल तर एक सांगू ?" "काय ते बोल चटचट" राजाने संतापून सांगितलं. मृदू स्वरात भानुदास म्हणाले, "आपण फार मोठी लोकं. आपले शौक मोठे. शिकारीला वगैरे जाणं, शस्त्रांचे खेळ, साम्राज्याचा विस्तार वगैरे वगैरे. नाही म्हटलं तरी अजाणतेपणी काही ना काही गोष्टी घडायच्याच अशा हातनं की ज्याला शास्त्रानं पाप मानलंय. तेव्हा असं करता का, राजेसाहेब एकदा या चंद्रभागेत स्नान करा बघू. भिमाई सगळं पाप नाहीसं करील नि मग बघा हे पंढरपूर नि इथला पांडुरंग. मी जे जसं सांगितलं तसंच्या तसंच दिसेल." राजाही आता ऐकण्यातल्या नव्हता. त्यानं पटापट अंगावरची उंची वस्त्रं उतरवली. दागिने काढले. तलवार अंगरक्षकाकडे सोपवली आणि दाण दाण पावलं आपटीत चंद्रभागेच्या पात्राकडे निघाला. पाण्यात उतरला. एक दोन तीन चार करीत चांगल्या दहा बुड्या मारल्या पाण्यात. आणि तिथूनच आवाज दिला, "का रे बुवा ? धुतली गेली ना पापं ? कुठंयंत तुझी रत्नं ? नि कुठंय तू सांगितलेलं पंढरपूर ?" भानुदासही आता अगदी निश्चिंतपणे देवावर भार टाकून मोकळे झालेले असल्यानं धीटाईनं म्हणाले, "हो हो. पापं धुतली गेली ना. पण ती गतजन्मांची होती बहुधा. जरा आणखी बुड्या मारा. या जन्माचं बिंब अजून उजळायचंय." राजा पुन्हा पाण्यात बुड्या मारायला लागला आणि इकडे भानुदासांनी हात जोडले, "देवा ? का रे परिक्षा पाहतोस भक्ताची ? मी काय माझ्या कुळाची महती गात हिंडतो का रे गावोगावी ? माझ्या घरादाराचं कौतुक सांगितलं का रे या राजाला मी ? तुझीच महती सांगितली ना रे ? मग का रे असा अंत पाहतोस. आई रखुमाई ? आपण तरी काहीतरी सांगा देवांना ? तुमच्या लेकराला सुळावर द्यायची का वाट पाहता ?" आणि मग... भक्ताने भावबळे रुक्मिणीवर कळवळून फक्त आळवला नि त्याला भक्ताची दया आली नाही असं होईल का ? तुम्ही आम्ही काय म्हणतो ते सोडा हो, साक्षात माऊली सांगून गेलेतच ना की, "एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥" राजाने पुन्हा एक बुडी मारली नि वर आला मात्र..... डोळे चोळत राहिला हो कितीतरी वेळ. चंद्रभागेच्या तीरावर एक दोन तीन चार नव्हे कल्पवृक्षांची अख्खी राई होती राई. एकेक एकेक पाऊल पुढे टाकीत पाण्याबाहेर जायला निघाला तर पायाला काही टोचलं म्हणून खाली पाहिलं तर जडजवाहिरांचा खच पडला होता दगडगोट्यांसारखा चंद्रभागेच्या पाण्यात. घाटाच्या पायऱ्या चढून वर आला. भानुदासांकडे पाहिलं आणि आदरानं हाक दिली, "महाराज...चला पांडुरंगाच्या दर्शनाला चला." वेगेवेगे देवळाकडे आले सगळेजण. देवळातून आत शिरणारच तेवढ्यात एक कोणीतरी स्त्री ओळखीची वाटली म्हणून राजानं मान वळवली आणि घळाघळा पाणी वाहून लागलं डोळ्यांतून... समोर त्याचं आराध्यदैवत असणाऱ्या त्या देवी होत्या. हाक मारली. देवींनी वळून पाहिलं, राजाच्या चेहऱ्यावरनं मायेनी हात फिरवला पण पुढच्या क्षणी परत फिरल्या. राजा मागे मागे धावला. म्हणाला, "कुठे निघालात देवी ? मी आजवर तुमच्या मूर्तीचीच पूजा करीत राहिलो. आज साक्षात समोर अवतरलात. आणि आता असंच जाऊ देईन ? सेवेची संधी द्या." देवी म्हणाल्या, "ते सेवा बिवा आपल्या घरी. इथे नाही. मला कामं आहेत चिकार. आणि मालकांचं लक्ष असतं बरं चौफेर. बोलत राहू नको माझ्याशी. जाऊ दे मला." राजा अचंबित झाला. "मालक ? कोण मालक ? तुम्ही कुणाच्या चाकरीत असणार ?" देवी म्हणाल्या, "ते काय मालक वीटेवर उभे आहेत आतमध्ये. तेच माझे मालक. माझ्या एकटीचे नव्हेत...साऱ्या विश्वाचे मालक तेच." राजाची बुद्धीच चालेनाशी झाली. कशीबशी देहाची झोल जाणारी पालखी त्यानं सावरली नि गाभाऱ्याकडे मान वळवली. पाहतो तर काय...किती किती पाहावं तरी काय... जैसा उपनिषदांचा गाभा । तैसा विटेवरी उभा । अंगीचिया दिव्य प्रभा । धवळिलें विश्व ॥ दोन्हीं कर कटीं । पीतांबर माळ गांठी । माळ वैजयंती कंठीं । कौस्तुंभ झळके ॥ कल्पदुम छत्राकार । तळीं त्रिभंगीं बिढार । मुरली वाजवी मधुर । श्रुति अनुरागें ॥ शंख चक्र गदाधरु । कासे सुरंग पीतांबरु । चरणीं ब्रीदाचा तोडरु । असुरावरी काढितसे ॥ डोळे दिपले हो राजाचे. हात जोडले गेले. मान वाकली. सगळा अहंकार गळून गेला. डोळ्यांतून वाहणारं पाणी थांबता थांबेना. भानुदासांनीही हात जोडले. देवाचं स्मितहास्य पाहून त्यांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. पण यातून उद्भवलं मात्र भलतंच. राजा नव्या हट्टाला पेटला. पांडुरंगांपाशी जाऊन म्हणू लागला तुम्ही माझ्या विजयनगरात चला. इथे या दुष्काळी देशात काय ठेवलंय. मला तुमच्या पाहुणचाराची संधी द्या. चला पांडुरंगा चला. आता रुसलेल्या रक्मिणीमागे जो पार उत्तरेतून धावत धावत पंढरीपर्यंत आला तो काय अशा कुण्या राजाच्या सांगण्यावरनं पंढरपूर सोडून जाईल का ? पण राजा काही ऐकेना. प्रसंगाची नाजूक बाजू लक्षात घेत काही काळाने देवांनी युक्ती योजली. म्हणाले, "चल राजा...येतो तुझ्या विजयनगरात...पण एक अट मात्र आहे." राजा म्हणाला, "एकच का दहा सांगा. तुम्ही काय म्हणाल ते करतो. सगळ्या अटी मान्य. पण माझ्याबरोबर माझ्या नगरीत चला." "देव म्हणाले, थांब थांब. घाई करू नको. आधी अट ऐक. मग राजी हो. अट अशी की माझ्या कुठल्याही भक्ताला तुझ्या नगरीत कसलाही त्रास झाला, माझ्या भक्ताचा जर किंचितही छळ झाला, त्याची अवहेलना झाली तर मी तत्क्षणी त्याचेबरोबर पंढरीत परत येणार. चालेल ना?" "असं आम्ही का करू देवा. तरी तुमच्या समाधानासाठी सांगतो की अट मला मान्य. चला." ठरलं. देव पंढरी सोडून विजयनगरात निघाले. निघालेच काय काही काळातच पोहोचलेही. मोठ्ठं भलंथोरलं देऊळ बांधायला घेतलं राजाने. विठ्ठलाचं नवं देऊळ. तोपर्यंत देवाला लख्ख महालातच गाभारा स्थापून दिला. रोजची सेवा सुरु झाली. हे भलेमोठे हार येऊ लागले. सुगंधी अत्तरांचे अक्षरशः पाट वाहू लागले. नैवेद्याचा दिमाख वाढू लागला दिवसेंदिवस. सगळीकडे नुसता उत्सव सुरु होता. रोजचा काकडा, उपासना, सेवा, स्नान, भोजन, निद्रा सगळ्याची व्यवस्था चोख लावली गेली होती. इकडे पंढरीत मात्र देवाविना सारे अगदी कासाविस झाले. पण करणार काय ? देव स्वतःच्या मर्जीने विजयनगरात गेले तर आपण कसं काही बोलणार. सगळ्यांनाच चिंता वाटू लागली. मग काय, ज्येष्ठ म्हणून देवांना परत आणायची जबाबदारी पुन्हा भानुदासांवरच दिली गेली. त्यांचा नि राजाचा परिचयही होता. भानुदास आले पुन्हा विजयनगरात. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. सगळा पाहुणचार कसा बसा अवघडून अवघडून स्विकारत जरा मोकळीक मिळताक्षणी ते पांडुरंगापाशी आले. म्हणाले, "का रे देवा लेकरांना एकटं टाकून इकडे आलास ? आम्हाला काय ठाऊक नाही का की तुला या सगळ्या वैभवाचा सोस नाही. या संपत्तीचं साक्षात नारायणाला ते काय अप्रुप असायचं ? नामाहुन प्यारं तुला काहीही नाही, नामाइतका तुला कशाचाही मोह नाही, भक्तीइतकं तुला दुसरं काहीही गोड लागत नाही, नि भक्तांच्या खऱ्या भावबळाविना तुला कशाचीही भूक नाही. मग का रे असा इथे उभा ? चल की रे तुझ्याच पंढरपुरात परत." पांडुरंग म्हणाला, "कसं आहे भानुदासा, तुम्ही भक्तांनी देवावर विसंबून नको त्या गोष्टी मांडायच्या, नि मग निस्तारायची वेळ आली की देवाकडे धावायचं हे कायमचंच आहे. अगदी तो माझा अर्जुन मला इतका प्रिय पण त्यालाही हे चुकलं नाही. मला ठाऊक आहे की तुम्हाला चैन पडत नाही माझ्याविना नि तुम्हालाही ठाऊक आहेच की मलाही तुम्हा सगळ्या भक्तांविना कुठेही फार काळ करमत नाही. पण सध्या असं कर, हा माझ्या गळ्यातला सोन्याचा हार घे नि तुझ्या गळ्यात घाल. आणखी काय सांगू ?" भानुदास रागावले. "देवा ? काय करता हे ? मी या सोन्यासाठी का आलो इथे ? हीच माझी भक्ती जाणलीत ? मला मागायचं तर काहीही नाही तुमच्या कृपेविना पण सोन्यापेक्षा तो वैजयंती हार द्या. माझ्यासारख्याला शोभेलही आणि तुमच्या गळ्यातला वैजयंती हार माझ्यासारख्या पामराला मिळणं याहून वेगळा मोक्ष म्हणजे तरी काय?" देवांनी काही ऐकलं नाही. "भानुदासा, आत्ता आधी मी सांगतो ते ऐक. तो सोन्याचा हार गळ्यात घाल नि तुझ्या कामाला लाग जा बघू. मला जरा विश्रांती घेऊ दे. हीच माझी आज्ञा." आता साक्षात भगवंताच्या आज्ञेपुढे काय बोलणार ना हो ? भानुदासांनी मुकाट्याने देवांनी दिलेला सोन्याचा हार परिधान केली, साष्टांग नमस्कार करून माघारी निघाले. महालात काही त्यांना चैन पडेना. म्हणून स्नान करून उपासनेला बसू या विचारानं नदीकडे गेले. तेवढ्यात इकडे देवाच्या सेवेत असलेल्या मंडळींना लक्षात आलं की देवाच्या गळ्यातला एक सोन्याचा हार गायब आहे. कुणीतरी चोरला ? चोरलाच असणार. इथे कुणाचं येणं जाणं नाही फारसं राजे आणि शास्त्रीबुवांशिवाय. मग एखाद्या अट्टल चोराव्यतिरिक्त हे काम कुणाचं असणार ? त्यांनी त्वरित राजाला याची माहिती दिली. राजाने सैनिक बोलावले, आदेश काढला. "लवकरात लवकर सगळ्यांनी कामाला लागा. देवांचा हार चोरीला गेलाच कसा ? गेलाच आहे तर आता सूर्यास्तापूर्वी तो हार सुस्थितीत मिळवा आणि चोराला चांगला चोप द्यायला परत आणा दरबारात नाहीतर गाठ माझ्याशी आहे." राजाचं अवसान पाहून फौजा नगरीत सगळीकडे धावत सुटल्या. ज्याला त्याला संशयित मानून झडती सुरु झाली. तिकडे भानुदासांनी वस्त्रं घाटावर काढून ठेवली. "देवाने दिलेला हार एखादी बुडी मारताना हरवता नये, देवाचा देवाला परत करून टाकू रात्री महालाकडे जाताना" असा विचार करून तो हारही कपड्यांजवळच ठेवला आणि नदीत उतरले. फिरता फिरता चार सहा सैनिक नदीघाटाकडे आले आणि एका सैनिकानं तो हार ओळखला. झालं...भानुदासांना पाण्यातून अगदी ओढीत बाहेर आणलं गेलं नि हारासकट दरबारात नेऊन हजर केलं. राजा संतापाने लालबुंद झाला होता. भानुदासांना काय चाललंय काहीच कळेना. त्यांनी राजाची आज्ञा तेवढीच ऐकली, "पांडुरंगाच्या गळ्यातल्या सोन्याचा हार चोरणाऱ्या या गुन्हेगाराला सुळावर चढवा!" मनातल्या मनात म्हणाले, "वाह देवा वाह...आता तुझ्या दर्शनाला यायचीही चोरी की रे ! आता काय कीर्ती होईल पुढे सगळीकडे तुझी ? की खऱ्याखुऱ्या भक्तीभावानं देवाच्या दर्शनाला जाणाऱ्यांच्या माथी चोरीचा आळ येतो आणि कृपा म्हणून काय मिळतं तर सुळावर दिलं जाण्याची शिक्षा!" देव नेहमीप्रमाणेच नित्यप्रशांत मुद्रेत उभं राहून, दोन्ही हात कटीवर ठेऊन हसत हसत सगळं बघीत होता नुसता. नदीतिरावरच सूळ तयार केला गेला. लोक जमले. नगरात दवंडी पिटून पिटून सगळ्यांना बोलावलं गेलं. आणि त्या बघ्यांच्या गर्दीसमोर नि राजाच्या आदेशानुसार भगवत् भक्त भानुदासांना सुळावर चढवलं गेलं ! पण देवाच्या योजनेचा आवाका इतकाच असेल का ? पुढच्या क्षणी सुळाचा कल्पवृक्ष झाला. सारा खेळ क्षणार्धात लक्षात आला आणि भानुदास गोड गळ्याने विठ्ठलभक्तीचा अभंग गाऊ लागले... जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें । म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ॥ राजाला नि उपस्थितांना काहीही कळायच्या आत अधिकारी स्वरात पांडुरंगांचा आवाज ऐकू आला, "राजा...पंढरपुराहून तुझ्या नगरीत येण्यापूर्वी सांगितलेली अट मोडलीस. माझ्या भक्ताला त्रास झाला. हा मी निघालो बरं का पंढरीत!" सगळी लीला राजाच्याही लक्षात आली. मेख उमगली. आपण ज्याला रे बुवा म्हणून एकेरीत हाक मारली, चोर समजून ज्याला सुळावर देऊ केलं तो भगवंताचा किती मोठा आणि किती लाडका भक्त होता याची जाणीव झाली. पण वेळ आता निघून गेली होती. संत भानुदासासोबत पांडुरंग पंढरपुराकडे निघाला. पांडुरंग ज्या दिवशी विजयनगरातून पंढरीत परतला तो दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी. पंढरपूर जवळ आल्यावर म्हणे भक्तांनी थाटामाटात देवांचं स्वागत केलं. पुष्पवृष्टी केली, मंगलवाद्यांच्या आवाजाने आसमंत भरून गेला, साऱ्या पंढरीत आनंदीआनंद झाला. भानुदासांच्या अपार भक्तीच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी साक्षात भगवंतानेच पुढे त्यांच्या कुळात एकनाथ महाराजांच्या रुपात जन्म घेतल्याचं म्हटलं जातं. म्हणूनच, "भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरीतीर" असं त्यांचं वर्णन केलं जातं. देव भक्तासाठी काय काय करतो याचं कधीही पुसलं न जाणारं हे आणखी एक उदाहरण ! असा आहे भूत, वर्तमान आणि भविष्य या साऱ्यावर ज्याची सत्ता आहे तो, म्हणजेच भूतभव्यभवत्प्रभुः ! ☺ #कौस्तुभअरुण © कौस्तुभ अरुण आठल्ये, रत्नागिरी. कार्तिक शुक्ल प्रतिपदा १४ नोव्हेंबर २०२३ Disclaimer - This is a redeveloped version of "akhyayika", a tale told by ancestors, shared with only intention of "Prachar Prasar" of greatness of Sanatan Dharma and Lord Pandurang. The original scripts, incidents, beliefs, facts and its interpretation may vary from this particular write up. This post does not intend to disrespect anyone or anything in any form. This is personal piece of linguistic art distributed among readers for above mentioned purpose only.

२४ लाख दिव्यांची दिपावली?

खालील लेख राजकारण म्हणून न बघता माहिती म्हणून बघावा ही विनंती. २४ लाख दिव्यांची दिपावली? काल एक व्हिडीओ बघितला, अयोध्येमधील दिव्यांमध्ये तेल ओतताना, कोणाचे लक्ष नाही असे बघून तेलाच्या बरण्या घेऊन पळून जाणारी गरीब मुले बघितली. २४ लक्ष दिवे उजळण्यासाठी लागणाऱ्या दिव्यांमध्ये तेल ओतण्यासाठी नियोजन केलेल्या मुलांच्या अंगावरील कपडे अर्थातच अस्वछ तसेच जुने होते. त्यांना या दिपावली बद्दल काय वाटत असेल ? कोणासाठी आहे ही दिपावली? जगाला दाखवण्यासाठी की रेकॉर्ड करण्यासाठी? सुपीक, सपाट जमीन, गंगा, यमुना सारख्या मोठ मोठ्या नद्या, दुबार पीक, मुबलक मनुष्यबळ असून सुद्धा ही स्थिती का? एकेकाळी भारताचे वैभव बघून अनेक परकीय आक्रमक ते लुटण्यासाठी भारतात आले. काच कामासाठी आणि गालिचा साठी प्रसिद्ध आग्रा, पितळेसाठी मुरादाबाद, लाकूड कामासाठी आणि फर्निचर साठी सहारणपूर, अत्तरांसाठी कनोज, बांबू आणि चामड्याच्या वस्तू साठी कानपुर, आंब्यासाठी आणि चिकन कापडा साठी लखनौ प्रसिद्ध आहेत. भारतातील ३०% मध उत्तरप्रदेशात तयार होतो. उत्तरप्रदेश मध्ये प्रत्येक जिल्ह्याचे काहींना काही असे वैशिष्ट्य आणि उत्पादन क्षमता आहे, असे असताना सुद्धा एवढी गरिबी का? उत्तर प्रदेशची लोकसंख्या २४ कोटी आहे म्हणजे १३२ कोटी भारतीयांच्या १८.१८% जनता या राज्यात राहते. हिंदुस्थानचे लाडके मुख्यमंत्री योगीजींनी उत्तर प्रदेशाचा पदभार स्विकारल्या नंतर अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले आहे असे नक्कीच म्हणावे लागेल. योगी मुख्यमंत्री होण्यापूर्वी, २०१६ मध्ये उत्तर प्रदेश राज्याचे सकल उत्त्पन्न १२.४७ लाख कोटी होते पण योगी २०१७ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१७ साली ते १४.४५ लाख कोटी झाले म्हणजे १६% वाढले. हळू हळू ते वाढत जाऊन २०२३ साली ते २४.३९ लाख कोटी झाले ही लक्षणीय प्रगतीच् म्हणावी लागेल. परंतु उत्तर प्रदेश ची लोकसंख्या २४ कोटी असल्यामुळे त्याचे दर डोई उत्पन्न फक्त रु. ८३,००० एवढेच आहे. जिडीपी मध्ये भारतात उत्तरप्रदेश चा नंबर ५ वा लागतो तर दर डोई उत्पनामध्ये त्यांचा नंबर ३२ वा लागतो. म्हणजेच गरिबी मध्ये उत्तर प्रदेश बिहार च्या खालोखाल आहे. योगीच्या राज्यात प्राथमिक शिक्षणात सुधारणा झाली असली तरीसुद्धा नीती आयोगाच्या यादीत एकंदरीत शिक्षणाच्या यादीत उत्तरप्रदेश १८ वा तर बिहार १९ वा आहे. योगीजींच्या प्रयत्नाने अनेक मोठ मोठ्या उद्योग धंद्यानी उत्तर प्रदेश मध्ये गुंतवणूक केली परंतु प्रशिक्षित मनुष्यबळ, परवडेल असे विजदर, उद्योजक पूरक टॅक्स सिस्टीम आणि वातावरण या विषयात अजून काम करणे आवश्यक आहे. शिवाय पारंपरिक व्यवसायाना आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. भारतातील चांगल्या कारागीराना आवश्यक वाटल्यास परदेशात प्रशिक्षण देण्यास पाठवले पाहिजे. काच कामासाठी बेलजीयम, फर्निचर साठी स्पेन, गालिचा साठी ईराण इत्यादी देशातील फॅक्टरी मध्ये असलेला जागतिक दर्जा आपल्या देशाच्या उत्पादनामध्ये यायला हवा तर एक्स्पोर्ट उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. मी स्पेन मध्ये एका १०० वर्ष जुन्या हूर्ताडो नावाच्या फर्निचर कम्पनिमध्ये सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी गेलो होतो. त्यांचा जगभर कारभार होता. त्यांचे फर्निचरचे पॉलिश, आधुनिक मशीनने तयार केलेली नक्षी, वेगवेगळ्या डिझाईन चे फर्निचर, आकर्षक मांडणी, त्याचे मार्केटिंग काटेलॉग, प्राईसिंग स्ट्रॅक्चर, कॉस्टिंग पद्धती, लाकडाचा दर्जा, सोफ्यावरील फेबरीक व्हरायटी बघून पागलच झालो. तुम्हांला खरोखरचं फर्निचर शोरूम बघायच्या असतील दुबई मध्ये शेख झायाद रोड ला किंवा स्पेन मध्ये वॅलेंशिया ला जां. भारताच्या ५ ट्रिलीयन डॉलर्स इकोनॉमि च्या स्वप्नात उत्तर प्रदेशचा १ ट्रिलीयन डॉलर्स चा भाग असावा असे योगीजींचे स्वप्न आहे पण त्यासाठी खूप अंतर गाठायचे ( आताच्या रेट ने ८.५ वर्ष ). हे सर्व करत असताना मानवतावादी दृष्टीकोन ठेवून विकास होणे आवश्यक आहे. माधव भोळे

Saturday, November 11, 2023

नादब्रह्म इडलीच्या

२०१६ साली हातगाडी वर सुरु केलेल्या नादब्रह्म इडलीच्या १५० व्या शाखेचे संभाजी नगर येथे उदघाटन. पुणे मार्केट यार्ड जवळ एका शेतकऱ्याने २०१६ साली सुरु केलेल्या नादब्राह्म इडलीचा प्रवास थक्क करणारा आहे. दत्तात्रय निदवांचे यांनी स्वतः प्रथम पुणे मार्केट यार्ड मध्ये फळ विक्रेता म्हणून सुरवात केली पुढे दुबईत काम करणाऱ्या त्यांच्या मेव्हण्याने पुण्यात येऊन पुढे रस्त्यावर इडली विकायला सुरवात केली. फक्त १० रुपयात इडली, चटणी आणि अमर्याद सांबार. चव सुंदर असल्यामुळे व्यवसाय वाढत चालला. त्यानंतर दत्तात्रयांचे चिरंजीव मेकॅनिक इंजिनियर हरीश आणि त्याच्या इतर भावडांनी मिळून पुण्यात भारतीय विद्यापीठाजवळ प्रथम नादब्राह्म इडली डोसा हॉटेल काढले. आणि तीच चव आणि तीच किंमत यावर हॉटेल चालवले. वर्षभरात पुण्यात १८ शाखा काढून त्यांनी गेल्या ७ वर्षात आपल्या हॉटेलचा व्यवसाय १५० शाखां वर नेला. ते फ्रंचाईझ मॉडेल प्रमाणे काम करतात. त्यांच्या फ्रंचाईसची फी शहरा शहरा प्रमाणे वेगळी असून मुंबईत साधारण रु १५ लाख पडते अधिक सेलवर काही फी असते. ते दररोज २.५ ते ३ लाख इडल्या विकतात. माधव भोळे

Friday, November 10, 2023

धनत्रयोदशी

धनत्रयोदशी आज धनत्रयोदशी. सर्व सामान्य व्यक्तीला धन म्हणजे पैसा, सोने नाणे, पशु धन, शेतमाल, इत्यादी मूर्त किंवा दृश्य स्वरूपातील गोष्टी वाटतात. पण त्याही पेक्षा एक मोठे धन आहे ते म्हणजे आरोग्य. जर आरोग्य चांगले असेल तर त्याला वरील सर्व मूर्त सुखांचा उपभोग घेता येईल नाहीतर म्हणतात ना "चणे आहेत पण दात नाहीत", सर्व सुख असून सुद्धा उपभोग घेता येत नाही. आपल्या हिंदू धर्मात देव विष्णुचे दुसरे नांव धन्वंतरी आहे. तो आपल्या आरोग्याची काळजी वाहतो. तो आपल्यावर प्रसन्न असणे आवश्यक आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी खालील मंत्र म्हटला जातो. ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरायेः अमृतकलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोगनिवारणाय् त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप श्रीधनवन्तरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नमः ॥ ( भगवंतांचे परमपुरुष वासुदेव, ज्याने हातात अमृताचा कलश धारण केला आहे, जो सर्व भयांचा नाश करतो आणि जो सर्व रोगांचे निवारण करतो, त्यांना नमस्कार असो.) पण माझ्यामते त्याही पलीकडे एक धन आहे, ते म्हणजे विचारांचे धन. जर हे धन चांगले असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास नक्कीच मदत होते. म्हणतात ना मन चिंते ते वैरी न चिंते किंवा काळजी सारखा दुसरा वाईट रोग नाही. अनेक लोक मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा कर्क रोगानी आजारी असतात, त्यातील बहुतांशी मंडळीना काही ना काही काळजी असते भले ते आपल्याला दाखवत नसतील. सतत स्ट्रेस असणे किंवा मनात वाईट विचार असणे हे चांगल्या मनाचे आणि पर्यायाने शरीराचे लक्षण नाही. जर तुम्हांला चांगले विचार मनात यावेसे वाटत असतील तर सतत प्रेरणादायी, सकारात्मक वाचत राहा, तसेच काम करा. ते करत असताना तुमची ऊर्जावृद्धी होईल. शेवटी देवच आपल्याकडून घडवून घेत असतो. आपली दुःखे आणि अडचणी त्याच्याकडे सोपवा आणि चांगले विचार आपल्याकडे ठेवा. समर्थ श्री रामदास स्वामींनी मन ह्या विषयाचा फार मोठा अभ्यास केला आहे. सर्व व्यवस्थित होईल. ही दीपावली आणि पुढील वर्ष तुम्हांला सुख समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावो. माधव भोळे

Thursday, November 9, 2023

बाबामहाराज सातारकर

वारकारी कीर्तन परंपरेचा एक मुकुटमणी हरपला. जेष्ठ कीर्तनकार ह. भ. पारायण बाबामहाराज सातारकर यांचे ८७ व्या वर्षी दुःखद निधन बाबामहाराज सातारकर : (५ फेब्रुवारी १९३६). महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले. २६ मार्च १९५४ रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. १९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन – प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले. १९७४ साली श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले. १९८० ते १९९९ या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली. १९९८ ते २००१ या कालावधीत अमृतानुभवावर प्रवचने केली. डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. १९८६ साली लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो आदी ठिकाणी १४ ज्ञानेश्वरी प्रवचने बाबामहाराजांनी केली आहेत. मुंबई दूरदर्शनवरील प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात अशोक रानडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. कैवल्याचा पुतळा, ज्ञानाची दिवाळी, तुका झालासे कळस, अनाथांचा नाथ, देवाचिये द्वारी अशा अनेक प्रवचन मालिका विविध दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच मुंबई दूरदर्शनवर त्यांनी सादर केल्या आहेत. कीर्तनाच्या सुमारे ५७ ध्वनिफिती तसेच १२ सीडी बाबा महाराजांनी प्रकाशित केल्या आहेत. ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी, ऐश्वर्याची वचनाक्षरे, ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत, श्री सद्गुरू दादामहाराज सांप्रदायिक भजन मालिका अशी बाबामहाराज सातारकर यांची ग्रंथसंपदा आहे. लोणावळ्यापासून ८ कि. मी. अंतरांवर दुधिवरे येथे १६ एकर जागेत बाबामहाराजांनी आध्यत्मिक केंद्र उभे केले आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार (१९८६), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन तर्फे तत्कालीन कुलगुरू श्रीधर गुप्ते यांच्या हस्ते सत्कार (१९९०), पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र (१९९०), सासवड नगरपरिषदेतर्फे सत्कार (१९९०), महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते मानपत्र (१९९१), सरगम कॅसेट कंपनीद्वारे प्लॅटिनम डिस्क विमोचन आणि तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्य यांच्या हस्ते सत्कार (१९९२), जागतिक मराठी परिषद दिल्ली यांच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कार (१९९४) अशा विविध मानपत्रांनी आणि सत्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय सातारा भूषण, फलटण भूषण आणि महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही बाबा महाराजांना सन्मानित करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय बाबामहाराज सातारकर यांनी आपल्या जीवन कर्तृत्वाने साध्य केला आहे. माधव भोळे स्रोत मराठी विकिपीडिया

नर्मदा परिक्रमा म्हणजे काय?

नर्मदा परिक्रमा म्हणजे काय? परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा.नर्मदा ही अमर कंटक ला उगम पावून पूर्वेकडून पश्र्चिमेला भडोचपर्यंत १६०० कि. मी.वाहत येवून खंबातच्या आखातात समुद्राला मिळते. हिला भारतातील आद्य म्हणजे प्रथम नदी मानतात.भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे दोन भाग अधोरेखित करणारी ही सीमारेषाच आहे. मार्कंडेय रूषींनी नर्मदेची प्रदक्षिणा सर्वप्रथम केली व तेव्हा पासून हा परिक्रमेचा प्रघात पडला. बहुतेक सर्व सत्पुरुष व साधूसंतांनी परिक्रमा व नर्मदे काठी तपस्या केल्याचे दाखले आहेत. उदा. गरुडेश्र्वर इथे टेंबे स्वामींची समाधी आहे. नारेश्र्वरला श्री रंगावधूत महाराजांची समाधी आहे. नर्मदा परिक्रमा मी स्वतः २००५ साली वयाच्या ६५व्या वर्षी केली . श्री गजानन महाराजांच्या भक्त निवासात उज्जैनला रहाण्याची सोय उत्तम असते व होते. आमचा मुक्काम तिथेच होता. अत्यंत स्वच्छ परिसर, पांढर्‍या स्वच्छ चादरी,मोकळ्या हवेशीर प्रशस्त खोल्या, सेवाभावी कर्मचारी, साधे पण रुचकर भोजन या सर्वामुळे अत्यंत प्रसन्न वातावरण अनुभवले. यात्रेच्या आदल्या दिवशी रात्रीच्या भोजनाला या आदि नदीच्या काठांवर रहाणार्‍या ५ आदिवासी कुमारिकांना औक्षण करून स्वतः त्यांना वाढायची रीत आहे. त्याप्रमाणे त्यांना स्वतः हवे नको ते बघत भरपेट जेवू घातले. त्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर तृृृृृृृप्तीचे समाधानाचे हास्य खुलावे म्हणून त्यांच्यासाठी खास मुंबईहून नेलेल्या भेटी त्यांना दिल्या आणी प्रसन्न चेहर्‍याने त्या परतल्यावर आम्ही जेवलो. दुसरे दिवशी सकाळी गुरुजी आमच्या नाश्त्यानंतर हजर झाले. सर्व साहित्य घेवून देवदर्शन करुन आम्ही नर्मदाकिनारी यात्रेचा संकल्प सोडण्यासाठी गुरुजींसोबत पोचलो. नर्मदेचे विस्तृृृृृृत पात्र व घाट सकाळच्या वेळी गजबजलेलेच होते. आम्ही सर्वजण स्री पुरुष यात्रेकरु मैय्याच्या (इथे सर्वजण तिला याच नांवाने संबोधतात) पात्रात गुडघाभर पाण्यात गुरुजींसमोर वर्तुळाकार उभे राहिलो. गुरुजींनी मैय्याची करुणा भाकली व विनंती केली की हे सर्व भक्तजन तुझ्या परिक्रमेला निघाले आहेत.त्यांची इच्छा पूर्ण करणे तुझ्याच हाती आहे. तेव्हा तू त्यांच्यावर प्रसन्न होवून त्यांचा संकल्प निर्विघ्नपणे पूर्ण कर. त्यानंतर ते पुन्हा तुझ्या भेटीला येतील व संकल्प पूर्ती बद्दल तुला नमन करुन तुझी ओटी भरतील. इथे एक स्पष्ट करायला हवे की नर्मदा ही कुमारिका माता मानली जाते. विस्तार भयास्तव त्याची कहाणी इथे देत नाही. संकल्प सोडल्यावर रिकाम्या प्लॅस्टिक बाटलीत पात्रातले वाहते स्वच्छ पाणी आम्ही सर्वानी भरुन घेतले. भक्त निवासात परतून सामान आवरले व आम्ही १७-१८जण टेम्पो ट्रॅव्हलरमधे दिल्या जागी स्थानापन्न झालो. यात्रा मैय्याच्या कांठाकांठाने पण तिला सतत उजवीकडे ठेवून प्रथम आम्ही भडोच या गुजरात मधील शहराच्या दिशेने वाटचाल (प्रत्यक्षात बस चाल) चालू केली. ह्या यात्रेत देह कष्टविण्याला महत्व आहे.धर्मशाळेत मिळेल त्या खोलीत ती स्वच्छ करुन राहणे.चटई किंवा सतरंजीवर झोपणे. उशी,चादरही चैनच समजायची, जवळपासच्या सुलभ शौचालयांचा प्रार्तविधीसाठी उपयोग करणे. दाढी वगैरे करायची नसतेच. सोयीस्कर साधे स्वच्छ धुवट कपडे घालणे अपेक्षित असते, इस्री वगैरेला वेळही नसतो व त्याची गरजही भासत नाही. सकाळ संध्याकाळ नर्मदाष्टकम् स्तोत्र ,नर्मदेची आरती,नर्मदे हर चा जप करणे, प्रातःकाळी उठून नर्मदेच्या थंडगार पाण्यात डुबकी मारणे, स्नान करुन स्वतःचे कपडे धुणे, ओल्या कपड्यांचे पिळे दिवसभर प्लॅस्टिक च्या पिशवीत स्वतःसोबत बाळगणे, नाश्ता,दुपारचे भोजन,संध्याकाळचा चहा यावेळी बस थांबल्याबरोब्बर उतरुन भराभर झाडा झुडपाना प्लॅस्टिक पिशवीतल्या नायलाॅनच्या दोर्‍या बांधणे,त्यावर हातातले ओले पिळे भराभर वाळत घालून त्यांना चाप लावणे. पुन्हा चहा, नाश्त्यानंतर,भोजना नंतर चाप,दोर्‍या कपडे पिशवीत व प्रवास चालू. या प्रवासात दिनक्रम साधारण पणे असा असायचा. पहाटे ४वाजता उठणे. आमच्याही आधी स्वैपाकीण बाई उठायच्या. सतरा अठराच्या ग्रूप व सेवक वर्गासाठी पुरेल एवढा रोज वेगवेगळा नाश्ता,पोळ्या,भाजी,वरण,आमटी ताक,दही असे सर्व वेगवेगळ्या स्टीलच्या मोठ्या डब्यात भरुन गाडीत न सांडेल अशा रीतीने भरायच्या! तोवर आमचे सर्व आन्हिक उरकलेले असायचे. मग गरमागरम चहा घेवून आम्ही बसमधे जागा पकडायचो.बस मधे अभंग,गाणी, हास्यविनोद सर्व खूप चालायचे. रोज नवे गांव,नवे मुक्कामाचे ठिकाण! अशी १७-१८ दिवसांची भ्रमंती. रस्ते खराब त्यामुळे सारखे डोके टपाला आपटणे,मळमळणे हे मंडळीचे चालूच होते. वाटेत जाता जाता जमेल ते स्थलदर्शन म्हणजे महत्वाच्या मंदिराना भेटी! अशा प्रवासात श्रावण बाळा प्रमाणे आपल्या वृृृृृृृृृद्ध व आंधळ्या आईबापांना दोन मोठ्या वेताच्या टोपल्यात बसवून ती कावड खांद्यावर घेवून रोज १०-१५ कि.मी. अंतर अनवाणी चालणारा साधु वेषातला आधुनिक श्रावणबाळ पाहून आश्र्चर्याचा जब्बरदस्त धक्का बसला. तो पुढच्या कठपोल या मुक्कामी भेटला तेंव्हा त्याच्याशी बोलायची संधी मिळाली. तो फौजी रजा घेवून म्हातार्‍या आंधळ्या आईबापाची इच्छापूर्ती करत होता.मागे कडेवर लहानगे मूल घेवून,शिरावर वेताची पाटी ठेवून त्यात शिधा व स्टोव्ह ठेवून त्याची पत्नी ,जिला परिक्रमेच्या काळात ब्रम्हचर्य पालनामुळे माता मानावे लागते ,ती ही अनवाणीच चालत होती.रोज १०-१५ कि.मी.प्रमाणे गेले कित्येक महिने सर्व कुटुंब अनवाणी रस्ते तुडवीत होते. असा श्रावणबाळ फौजी २१व्या शतकात भारतात पहायला मिळाला हे माझे भाग्य! कठपोल हे नर्मदेच्या तीरावरचे शेवटचे खेडेगांव ! इथे नर्मदा समुद्रात विलीन होते .म्हणजे नर्मदाही नर्मदा नदी न राहता तिची समुद्रतील खाडी बनते. म्हणून मग एका शिडाच्या गलबतातून, पैलतीरावरच्या मीठीतलाई या खेडेगावी जाण्यासाठी, भरती ओहोटीचा अंदाज घेवून निघावे लागते.आमचा kथला मुक्काम सरपंचाच्या घरीच होता.शेणानी सारवलेल्या गुळगुळीत जमिनी, आडाचं थोडं मचूळच पाणी त्याच्या बाजूला सांडपाण्यावर पोसलेलं केळीच बन, बाहेर सोप्यावर अंथरलेली पथारी ,चहूबाजूला कारव्याच्या काठ्यांच कम्पाऊंड असं छान खेडवळ वातावरण होतं. दुसर्‍या दिवशी सक्काळी ६लाच चहा बिस्किटावर बोळवण करून आमची रवानगी खाडीकिनारी झाली.गलबतावर प्रार्तविधीची सोय नसते आणी खाडी ओलांडून मिठीतलईला पोचणं वार्‍याची दिशा व वेगावर अवलंबून असतं ४, ६, किंवा अगदी ८तासही लागू शकतात. त्यामुळे सर्व उरकून पलिकडे पोचेपर्यंत न खाता पिता रहाणे अत्यावश्यक असते. बराच वेळाच्या प्रतीक्षेनंतर बोट सुटणार असा संकेत मिळाला. बोटीपर्यंत पोचायला पँट्स मांड्यांपर्यंत दुमडून, आवश्यक त्या सामानाने भरलेली प्लॅस्टिक बॅग डोक्यावर धरुन,पादत्राण न घालता, तोल सांभाळत, काळ्या वस्रगाळ मातीच्या गुळगुळीत बुळबुळीत चिखलात पाय मांडीपर्यंत रुतवत, जाण्याचे भयानक दिव्य करावे लागले. बायकांचे तर हाल विचारुच नका. एक जाड्या बाई ही सर्कस करताना बिचार्‍या पडल्या व माखलेल्या चिखलासह कसेबसे त्यांना बोटीत चढवले. सहा तासाने पलिकडे पोचल्यावर त्यांना सचैल स्नान पुन्हा करावे लागले. हात,पाय,तोंड धुवून जेवणावर ताव मारला. वाटेत शूलपाणीचे जंगल लागते. इथे पुण्यवान लोकांना अश्वत्थामा दिसतो म्हणतात पण आमच्यात कोणीही तितका पुण्यवान बहुधा नसल्याने आम्हाला काही दिसला नाही. हे जंगल लागण्याआधी जवळपासचे सर्व मूल्यवान सामान नदी काठच्या केवाडियांच्या(नावाड्यांच्या) हाती सुपूर्द करायचे असते कोणत्याही चिठ्ठीचपाटी शिवाय ! मगआपण यात्रे दरम्यान पैलतीराच्या गांवी पोचलो की इकडचे त्याचे सगेसोयरे सर्वसामान बिनचूक आपल्या हवाली करतात.श्रीरामाने यांच केवडियांच्या पूर्वजांच्या नावे तून नर्मदा मैय्या पार केली होती म्हणे. इतकी प्रामाणिक,बिनचूक व विनामूल्य सेवा एकविसाव्या शतकात कोणताही ढिंढोरा न पिटता आजही दिली जाते हे पाहून ऊर भरुन आला. यानिमित्ताने सांगायचे म्हणजे इथल्या स्थानिकांचे मैया वर इतके प्रेम,आदर,श्रद्धा आहे की वाटेत कुठेही परिक्रमा करणारे भेटले की अगदी प्रेमाने त्यांची सेवा करण्याची संधी मागतात. चहा पाजतील,जेवायला घरी चला म्हणतील. आणि सेवा करु दिल्याबद्दल पाया पडून आभारही मानतील. आम्ही सकाळी बस घेवून पहाटे पांचला नर्मदेच्या वालुकामय किनार्‍यावर स्नानाला गेलो तर बस वाळूत रुतली.जाम बाहेरच निघेना. एका गांवकर्‍याने गावातला ट्रॅक्टर व सांखळी आणून बस खेचून बाहेर काढून दिली व पैसे द्यायला गेल्यावर काकुळतीला येवून पाया पडून ही माझी सेवा रुजू करून घ्या अशी विनंती केली. मंडळी हे भारतातलं २१व्या शतकातलं अनोखं पण लोभस वास्तव आहे. माहेश्र्वरचं पुण्यश्र्लोक अहिल्याबाईंच घर,देवालय, सुंदर घाट, हे सर्व पहाटे पहाटे पाहिलं. नेमावर,बडवानी,होशंगाबाद जबलपूर सारखी शहरे पाहिली.जबलपुरच्या धुवांधार धबधब्यात चार,आठ आणे, रुपयासाठी ऊंच कड्यांवरुन उड्या मारणारीआठ,दहा,बारा वर्षांची पोरं पाहिली. अमर कंटकला उगमस्थानी बोटाच्या करंगळी एवढी धार असलेली पवित्र नर्मदा तीर्थ रुपाने पोटात घेतली. शांत व तृृृृृृृृृृृप्त वाटलं. शेवटी पुन्हा उजैनला येवून संकल्प पूर्ण झाल्याची पूजा केली.शिर्‍याचा नैवेद्य दाखवला. नर्मदेचं पाणी प्रत्येक ठिकाणी बाटलीतलं थोडं मैय्याला अर्पण करायचं,पुन्हा बाटलीत तिथलं जल भरायचं . असं प्रत्येक ठिकाणी करत करत सर्व ठिकाणच्या जलाने भरलेली बाटली मैय्याला अर्पण केली. पुन्हा घरच्यासाठी तीर्थ भरून घेतले. त्या अखंड खळाळणार्‍या पवित्र मैय्येला नमस्कार करून तिचा निरोप घेतला.