Thursday, September 12, 2024

Practice makes men perfect

 Practice makes men perfect

आपण शाळेत असताना असे अनेक सुविचार लिहायला शिकलो पण त्याचे खरे महत्व आपल्या पैकी किती जणांना कळले तें माहिती नाही.

आज सोनू शर्मा ह्या प्रेरणादायी वक्तृत्व करणाऱ्या एका सदगृहस्थाचे भाषण युट्यूब वर ऐकत होतो.
तों सांगत होता. ५ ऑक्टोबर २००७ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधील एका ODI मध्ये ऑस्ट्रेलीयन तरुण क्रिकेटीयर Brad Hogg नें सचिन तेंडुलकर चा क्लीन बोल्ड केला. त्या वेळी तरुण असलेल्या ब्रॅडला अर्थातच ती मोठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट होती. त्या खुशीत संध्याकाळी मॅच संपल्यावर तों त्या क्षणाचा फोटो घेऊन सचिनच्या ड्रेसिंग रूम मध्ये गेला आणि त्याला त्या फोटोवर सही करण्याची विनंती केली.
सचिननें कोणताही राग मनात न धरता त्या फोटोवर सही केली आणि त्या खाली एक संदेश लिहिला "तुला परत कधी माझी विकेट मिळणार नाही". त्यानंतर कमीतकमी ३० तें ३२ वेळा सचिन विरुद्ध Hogg खेळले पण एकदाही तों सचिनला आउट करू शकला नाही. अर्थात तों आत्मविश्वास होता प्रॅक्टिसचा. आपला शब्द खरा करण्यासाठी त्याने अपरंपार कष्ट केले आहे, उगाच नाही तों जगातील एक श्रेष्ठ फलंदाज  आहे.

अशीच एक गोष्ट, जगातील एक प्रख्यात स्पॅनिश चित्रकार पाबलो पिकासो बद्धल आहे. एकदा तों रस्त्याने जातं असताना एका बाईने त्याला ओळखले आणि ती आनंदाने नाचायला लागली. तिने त्याला विचारले तुम्ही पाबलो पिकासो नां? त्याने आपली ओळख कबूल केली. ती म्हणाली मी तुमची खूप मोठी फॅन आहे. माझी तुम्हांला एक विनंती आहे. तुम्ही आताच्या आता मला एक चित्र काढून द्या. योगायोग म्हणजे तिच्या पिशवीत एक कागद आणि पेन्सिल होती. पिकासो नें उभ्या उभ्याचं एक पेन्सिल स्केच पटकन ३० सेकंदात काढून दिले आणि म्हणाला जा घेऊन हे ५० लाख डॉलर्स चे चित्र. ती खूष झाली पण नंतर तिला वाटले की तिला खूष करण्यासाठी त्याने चित्राची किंमत ५० लाख डॉलर्स सांगितली असणार. विश्वास न बसल्यामुळे ती तीन चार आर्टस् स्टुडियो मध्ये गेली आणि हे चित्र विकण्याबद्दल तिने विचारणा केली. बहुतेक सर्वांनी तें चित्र ५० लाख किंवा जास्त किमतीला विकत घेण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर तिने तें चित्र विकले नाही आणि पिकासोचा पत्ता शोधत शोधत ती त्याच्यापर्यंत पोहोचली आणि तिने त्याला सांगितले. तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे अनेक लोक हे चित्र ५० लाखाला घ्यायला तयार आहेत. पण मला एक सांगा तुम्ही ३० सेकंदात एव्हडे चांगले चित्र काढू कसे शकता. मला पण तुमच्याकडे ही कला शिकायची आहे. त्यावर पिकासो नम्रपणे म्हणाला. ताई, जे सुंदर चित्र मी अवघ्या ३० सेकंदात काढले ती कला अवगत व्हायला ३० वर्ष घालवली आहेत. प्रॅक्टिस किंवा ज्याला आपण रियाझ म्हणतो तों गेले ३० वर्ष मी करत आहे तेव्हा कुठे हे जमले आहे. हाच तों रियाझ चा प्रभाव.

एकदा हॉकी मधील भारतातील सर्वोत्तम खेळाडू ध्यानचंद एका अंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत होता. जवळजवळ अर्धा तास झाला तरी एकही गोल तों करू शकला नाही. शेवटी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला विचारले काय रे तुझ्या भरवशावर आपण ही मॅच खेळत आहोत आणि तुझा प्रभाव अजुनसुद्धा काही दिसत नाही. असे झाले तर मॅच आपण हरू. त्यावर तों न रागावता म्हणाला. ही मॅच खेळायचे थांबवा कारण येथील गोल पोस्ट चुकीच्या अंतरावर आहे असे वाटते. त्यावेळी सर्वांनी त्याला मुर्खात काढले परंतु रेफ्रि ला सांगून मॅच थांबवली आणि गोल पोस्ट चे अंतर, ठरलेल्या स्टॅंडर्ड्स प्रमाणे आहे की नाही तें चेक केले.आणि खरोखरच तें योग्य प्रमाणापेक्षा २ फूट कमी भरले. याला म्हणतात आत्मविश्वास आणि प्रॅक्टिसचा प्रभाव.

अगदी प्रसिद्ध गोष्ट म्हणजे सुप्रसिद्ध भारतीय इंजिनियर सर विश्वेशवरईया एकदा सुरवातीच्या काळात रेल्वेने रात्रीचा प्रवास करत होते. तों ब्रिटिश इंडियाचा काळ होता. रिझर्वेशन न मिळाल्यामुळे  विश्वेशवरईया खिडकीला डोके टेकून झोपले होते.  अचानक त्यानां रेल्वेच्या आवाजात काहीतरी जाणवले आणि त्यांनी रेल्वे थांबवण्याची साखळी खेचली. थोड्या अंतरावर रेल्वे थांबली. त्या नंतर गार्ड आणि मोटरमेन दोन्ही त्यांच्या पर्यंत पोहचले आणि साखळी का खेचली म्हणून विचारले. त्यांनी सांगितले की माझ्या अंदाजाप्रमाणे पुढे रूळ तुटलेला आहे. त्याप्रमाणे गार्ड नें तेथपर्यंत जाऊन बघितले असता तों रूळ पुढे १०० मिटर वर खरोखरच तुटलेला होता. गार्डनें स्वतः परत येऊन विश्वेशवरईयानां सांगितले की बरे झाले तुम्ही चेन खेचलीत म्हणून नाहीतर हजारो प्रवाश्याचें जीव धोक्यात आले असते. पण मला सांगा तुम्हांला कसे कळले की पुढे रूळ तुटला आहे तें? त्यावर तें म्हणाले जेथपर्यंत रूळ एकसंध होता तेथपर्यंत रेल्वे चा आवाज एका लायित येत होता, पण जसे पुढे रूळ तुटला त्यावेळी गाडीचा आवाजाची लय बदलली होती. आणि माझ्या कानाला तें लगेच लक्षात आले. एक इंजिनियर म्हणून निरीक्षण आणि अभ्यास ह्या गोष्टींमुळे तें महान झाले.

म्हणून म्हणतात "Practice makes men perfect".

असो.

माधव भोळे

Monday, September 2, 2024

८ सप्टेंबर रोजी गणेश स्वाहाकारासाठी १००८ मोदक पाहिजेत

 "८ सप्टेंबर रोजी गणेश स्वाहाकारासाठी १००८ मोदक पाहिजेत".


वरील पोस्ट काल वाचली आणि मती गुंग होऊन गेली. 

आज सकाळी एक बातमी वाचली की नामिबिया देशामध्ये तीव्र दुष्काळ पडल्यामुळे तेथील अन्नधान्य परिस्थिती अतिशय बिकट झाली असून देशाचा ८४% अन्नधान्य साठा समाप्त झाला आहे आणि त्यामुळे नाईलाजाने तेथील झेब्रा, हत्ती, हरीणे सारखे ७४३ वन्य प्राणी मांसाहार करण्यासाठी त्यांची हत्या करण्याचे सरकारने ठरवले आहे. 


अन्नाचे महत्व आपण लहानपणापासूनच जाणतो. आपण जर एखादी नावडती वस्तू जेवणाच्या पानात टाकून दिली तर आपल्या पालकांनी आपल्याला जबरदस्तीने ती खायला लावली असेल तें आपणांस आठवत असेल. अन्नाची नासाडी करायची नाही, गरजेपेक्षा जास्त पानात वाढून घ्यायचे नाही हे आपण सुद्धा शिकलो आणि आपण आपल्या मुलांना शिकवत असतो.


जे अन्नधान्य राब राब राबून बि पेरल्यानंतर कमीतकमी ४ तें ६ महिन्यांनंतर तयार होते आणि जे शेतकरी, दलाल, वाणी यांच्या मार्फत आपल्या घरी येऊन आपल्या सुग्रीणीनच्या हस्ते तयार करून आपल्या ताटात वाढले जाते त्याची राख रांगोळी करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला आहे?


ज्यावेळी शेतकरी संप करतात आणि त्यातील काही नादान शेतकरी आपले दूध, टोमॉटो, इतर शेतमाल रस्त्यावर ओततात त्यावेळी आपल्यासारखी सुज्ञ मंडळी त्याचा जाहीर निषेध करतात मग तीच मंडळी अशा समारंभाला मोदका सारखा लोभस पदार्थ यज्ञात आहुती देताना गप्प का राहतात? 


मान्य आहे की तें आमचे धार्मिक संस्कार आहेत. पण खरा धर्म कळला तर ही गफलत होणार नाही. यज्ञ याचा अर्थ त्याग आणि परिश्रमांची पराकाष्ठा. म्हणजेच यशस्वी होण्यासाठी जे प्रयत्न आपण करतो, त्याच्या फळाची कोणतीही अपेक्षा आपण ठेवत नसून तें सर्व आपल्या इंद्र, गंगा किंवा इतर देवताना अर्पण करतो आणि त्याचा कोणताही मोह आपण ठेवत नाही. आपण कामावलेले आपण ईश्वराकडे अर्पण करत आहोत याचे तें प्रतीक आहे. 


यज्ञाचा दुसरा शास्त्रीय अर्थ म्हणजे धुरीकरण ज्याला इंग्रजीमध्ये फ्यूमिगेशन असे म्हणतात. वातावरणात असलेल्या कृमी, कीटक, वाईट बॅक्टरिया यांना अशा प्रकारे वेगवेगळ्या वनस्पती जश्याकी पळस, उंबर, आघाडा, खैर, पिंपळ, दुर्वा, शमी, दर्भ जाळून त्यांचा प्रादुर्भाव कमी केला जातो. हल्लीचे वास्तूशास्त्रकार त्याला निगेटिव्ह एनर्जी घालवणे म्हणतात! (त्यावर परत कधीतरी लिहीन ). 


हिंदू धर्मात त्यागाला फार महत्व आहे. परंतु तों त्याग करत असताना दुसरे कोणतेही पाप आपण करत नाहींना हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. म्हणून तर यज्ञामध्ये जेथे बळी देण्याची प्रथा होती ती बदलून आता आपण कोहोळा अर्पण करत असतो.


ऋतू, काल आणि स्थळा नुसार आपल्या धर्मात रीती भातींमध्ये बदल करायला परवानगी आहे. आपला धर्म शिस्तबद्ध असला तरी त्यात लवचिकता आहे. म्हणून तर आपल्याकडे पूजेच्या वेळी एखादी गोष्ट उपलब्ध नसली तरी त्या ऐवजी अक्षता वाहायला पर्याय आहे. कारण आपण उपचारापेक्षा भावनेला महत्व देतो आणि तेच योग्य आहे.


तर तात्पर्य काय, आपल्या धर्माचे नांव उज्वल राहावे असे वाटतं असेल तर त्यातील न्याय्य, सकारात्मक, जीवनाला आणि श्रुष्टीला पूरक अशा रितींचा पुरस्कार करायला हवा. त्यातील अनिष्ठ प्रथा आणि परंपरा यांना बगल द्यायला हवी. स्वामी विवेकानंद, पंडित मदन मोहन मालवीय, विष्णु शास्त्री पंडित, गोपाळ गणेश आगरकर, स्वा. सावरकर, महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे आणि रघुनाथ धोंडो कर्वे सारख्या महितीनी आणि संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या विभूतिनी हीच शिकवण जगाला देण्याचा प्रयत्न केला. 


धर्म चांगले संस्कार देतो मग तें आचरणात आपणच आणायला हवे. मुलांना जे शिकवतो तें स्वतः आचरणात आणायला हवे. 


जय श्रीराम, श्री विष्णवेनमः 


माधव भोळे

Sunday, September 1, 2024

श्रावण पूजेसाठी साठ हजार बेल पत्र?

श्रावण पूजेसाठी साठ हजार बेल पत्र?

वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे हा जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग मोबाईल वर ऐकत असतानाच एक पोस्ट नजरे समोर आली. श्रावण सोमवारच्या पूजेसाठी साठ हजार बेल पत्र पाहिजेत म्हणून. येथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रश्न नाही परंतु आपली व्रत वैकल्य पूर्ण करण्यासाठी बेलाच्या पानांची अव्याहत तोड करायची हे पटत नाही. जे बेलाचे झाड आपल्याला ऑक्सिजन देते, ज्या बेलाच्या पानांमुळे पाणी आणि सूर्य प्रकाशाच्या साहाय्याने फोटो सिंथेसेस प्रक्रिया होऊन झाडाचे अन्न आणि ऑक्सिजन तयार होतें, त्यामुळे झाडाची वाढ होते आणि तें जगण्यास मदत होते, त्या बेलपत्रानाच भरमसाठ तोडायचे? हा कोणता धर्म संस्कार? पुण्य कमावणाच्या नादात आपण किती स्वार्थी झालो आहोत हे ह्यातून दिसून येते.


मागे लहानपणी आईसाठी संपूर्ण चातुर्मास पुस्तकामधील वाटीभर दुधाची गोष्ट वाचत असे त्याची आता आठवण झाली. एका राज्यांचा राजा सर्व प्रदेशाला आदेश देतो, की येत्या सोमवारी मंदिरात शंकरावर अभिषेक करायचा आहे, सर्व गाभारा दुधानी भरायला हवा, तरी सर्व नागरिकांनी आपआपल्या घरातील जास्तीतजास्त दूध आणून अभिषेकासाठी दान द्यावे. त्यामुळे राजाला आणि महादेवाला खूष करण्यासाठी नागरिकानी घरातील लहान वृद्धाना दूध प्यायला न देता मोठ मोठ्या कासंड्याभर दूध अभिषेक पात्रात ओतायला सुरवात केली. पण गाभारा काही भरेना. शेवटी दुपारी सर्व घरचे उरकून, वासरांना दूध पाजून, लहान मोठ्यांना तृप्त करून एक छोटी वाटीभरून दूध घेऊन एक आजी मंदिरात आली. येथे अभिषेक सुरूच होता पण गाभारा भरत नव्हता. आजीने तें वाटीभर दूध अभिषेक पात्रात ओतले मात्र आणि संपुर्ण गाभारा दुधाने भरून गेला. कारण आजीने एक वाटीच का होईना पण तें भक्ती भावाने आणि आपली सर्व कर्तव्य पार पाडून हे दूध अर्पण केले होते. म्हणूनच देव संतुष्ट झाला.


तात्पर्य जे धार्मिक कृत्य कराल तें भक्ती भावाने करावे, त्यामध्ये अवडंबर नसावे. निसर्गाचे कोणतेही नुकसान त्यात असू नये. थोडीच पण नीटनेटकी सुवासिक फुले वापरायला हरकत नाही. पत्री सुद्धा मोजकीच वापरावी. 


झाडें जगली तर माणूस, सृष्टी आणि पृथ्वी जगणार आहे हे लक्षात घ्यायलाच हवे. पुढील पिढीसाठी निसर्गाचा हा अमूल्य ठेवा राखून ठेवणे आपले कर्तव्यच आहे.


माधव भोळे 

Thursday, August 8, 2024

आरक्षण

आरक्षण.

दिवसेंदिवस आरक्षण हा मुद्धा अतिशय गंभीर होत चालला आहे. आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे की कोणीही राजकारण्याने सत्तेसाठी काहीही आश्वासन देऊन सत्ता मिळवावी.

आपल्या शेजारील बांगलादेश मध्ये शेख हसीना पंतप्रधान झाल्यानंतर गेले काही वर्ष बांगलादेश स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये ३०% आरक्षण ठेवले होते. त्यानंतर "Students against descrimination" ह्या विध्यार्थी संघटनेने निदर्शने करीत असा आरोप केला की ह्या आरक्षणामुळे शेख हसीनाचा अवामी लीग पक्ष ज्याने बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याचा पुढाकार घेतला होता त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाजवी फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांनी घटनेतील मूळ ७% आरक्षण सोडून बाकीच्या ९३% सरकारी नोकऱ्या मेरिट वरती मिळाव्यात यासाठी आंदोलन सुरू ठेवले. गेले १५ वर्ष हे सुरूच होते. त्या नंतर वेगवेगळ्या कोर्ट प्रक्रियेनंतर शेवटी बांगलादेश सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करीत नवीन आरक्षण रद्द करत ९३% जागा मेरिट वर भरण्याचा आदेश सरकारला दिला. मधल्या काळात आंदोलन हिंसक झाल्यामुळे त्यावर सरकारकडून बळाचा वापर केला गेला, त्या मुळे आंदोलन आणखीनच चिघळले. 


त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेख हसीनाच्या राजीनाम्याची मागणी केली. ती मान्य न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा डोंब उसळून त्याचे पर्यवसान शेख हसीना काल संध्याकाळी भारतात राजकीय आश्रयास आल्या. आज दुपारी त्या लंडन येथे जातील असे सांगितले जातील.


भारतीय राज्यकर्त्यानी यापासून धडा घेणे आवश्यक आहे. जर मेरिटला डावलून आपण काही गोष्टी करत राहाल तर ऱ्हास होणारच. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आरक्षणाची ५१% ची मर्यादा वाढवण्यासाठी चढओढ लागली आहे.


भारताच्या सुप्रीम कोर्टने सुद्धा नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार आरक्षणाचा लाभ फक्त पहिल्या पिढी पुरताच मर्यादित असावा आणि ओबीसी प्रमाणे बाकी आरक्षणाला सुद्धा क्रिमी लेयर बंधन असावे असे म्हटले आहे. सध्या आरक्षण ही जमीनदारी झाली आहे. जों आरक्षणाचे लाभ घेऊ शकतो त्याच्या पुढच्या जेवढ्या शक्य असतील तेवढा लाभ घ्यायला बघत आहेत, त्यामुळे खरोखरचं जों गरजू आहे त्याला काही लाभ मिळत नाही.

सरकारने यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे.


माधव भोळे 

Monday, August 5, 2024

वंशावळी-वंशवेल (Family Tree) म्हणजे काय?

 All Right Reserve @Copyright 

वंशावळी-वंशवेल (Family Tree) म्हणजे काय व 

९ पिढयाची वंशावळी कशी जुळवावी

(वंशावळी#स्वतःवडील-आजोबा-पंजोबा-खापरपंजोबा-पन्तू-नातू-अन्तू-खातू-नातू)

महसुल लेखः शुक्रवार दिनांक: ८ मे २०२०


आपण सर्वसाधारणपणे आपल्या पुर्वजांच्या वंशाची, कुळातील पूर्वजांच्या वंशावळी ही काही अपवादात्मक कारणांसाठीच जुळविण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. शाळा महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणा-या काही महत्वाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यामध्ये वंशावळी हा एक भाग आहे. परंतु हा वंशावळी जुळविण्याचा व शोधण्याचा मार्ग हा तात्पुरत्या कागदोपत्री तरतूदीसाठी सिमीत आहे. कारण जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील व वडीलांचे वडील म्हणजे आजोबा इथपर्यंतच हा वंशावळीचा विषय मर्यादित होतो.

परंतु काही शहरात आजचा मुंबईस्थित तरूण वर्ग व उत्साही चाकरमाणी आपली वडीलोपार्जित मालकीची जागा, कुळाची जागा, वंशाची वंशावळी या पारंपरिक व महत्वाच्या गोष्टीचा शोध लावण्याचा व ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत व बहुतेक लोकांना यात यशही आले आहे व येत आहे.


आपण आपल्या पुर्वजांच्या वंशाची साधारणतः ९ पिढ्याच्या वंशाची वंशावळी शोधू शकतो जुळवू शकतो. या सर्व प्रकारात महसुल विभागाचा दस्तैवजांपैकी काही महत्वाचे दस्तैवज खालीलप्रमाणे-


१)जंगलखर्डा नोंदवही पत्रक सन १८८६- सदर नोंदवहीत आपल्या वंशातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणतः १८२० साली झाला होता त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजे ज्यांचा जन्म सन १७०० ते १७२० च्या आसपास झाला आहे त्या वंशातील मुळपुरुषाचे नाव नोंद असते. म्हणजे आपण ७ व ८ व ९ क्रमांकाची पुरुषाची वंशावळी या दस्तैवजावर नोंद असते

२)बोटखत नोंदवही १८९५ - या दस्तैवजावरून आपण साधारण ७ व ८ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

३)प्रतीबुक हिस्सावार पत्रक नोंदवही- दस्तैवजावरून आपण साधारण ६ व ५ व ४ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

४)आकारफोड पत्रक १९५७-

दस्तैवजावरून आपण साधारण ४ व ३ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो. सन १९५६-१९५७ रोजी आपल्या जमीनीवर कसतव नोंद असलेले पूर्वज यांची माहीती आकारफोड पत्रकात मिळते 

५)फेरफार पत्रक नोंदवही व मेळाची फाईल-फेरफार दस्तैवज संचिका- गावनमुना ६अ, तसेच गुणपत्रिका या दस्तैवजावरून वंशावळीतील ३ व ४ क्रमांकाच्या पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

६)विदयमान २०२० चा ७/१२ उतारा- यावर आपले व आपल्या वडीलांचे नाव असते म्हणजे क्र.१ व २ क्रमांक ची वंशावळी येथे जुळली जाते.

महसुल जमीन माहीतीकामे इतर महत्वाचे दस्त-

७) टिपनबुक नोंदवही-

(जागेचे सर्व्हे, वर्णन नोंद व मुळ भोगवटाधारक सदर बुकात सापडतात. साधारण १८४० ते १८८० या कालावधीच्या नोंदी)

८)सुडपत्रक-सुडाचा उतारा सन १८६४-सुडाच्या मुळ उता-यास जमाबंदी पत्रक असेही म्हणतात. जागेचे वर्णन याबाबत माहीती.

यापैकी कोणते दस्तैवज कोठे अर्ज करावेत.

१) जंगलखर्डा नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय

२) बोटखत नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय

३)प्रतीबुक हिस्सावार पत्रक नोंदवही-

तालुका भूमी अभिलेख तथा भुमापन विभाग कार्यालय

४) आकारफोड पत्रक- तालुका भूमी अभिलेख तथा भुमापन विभाग कार्यालय

५) टिपनबुक नोंदवही-भुमापन तथा भुमीअभिलेख विभाग तहसील

६) मेळाची फाईल-तहसिल/तलाठी कार्यालय

७) फेरफार नोंदवही/गुणपत्रिका/गावनमुना ६अ, ७/१२ उतारा-तलाठी कार्यालय

८) मेळ साक्षीदार पुरावा-तहसिलदार/तलाठी कार्यालय/ 


वंशावळी(Family Tree) जुळणी करून तहसिल क्षेत्रातील दुय्यम निबंधक तथा सक्षम महसुल प्रमाणक अधिकारी मार्फत प्रमाणित करावी. सदर प्रकरणातील टिपनबुक(सन १८४० ते सन १८८०), सुडाचा उतारा १८६४-सुडपत्रक, जंगलखर्डा नोंदवही १८८६ व बोटबुक नोंदवही-१८९५, ही मोडी लिपीमध्ये तहसिल कार्यालय/भुमापन तथा भुमीअभिलेख यांचे कार्यालयात उपलब्ध होते. त्याचे मराठीमध्ये शासकीय मोडीलिपी तज्ञाकडुन प्रमाणीत हस्तांतर करून घ्यावे. उपरोक्त महसुल वंशावळी संबधित माहीती व दस्तैवज हे महाराष्ट्रातील विविध तालुका-जिल्हा महसुल कार्यालयातून प्रत्यक्ष गोळा केलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे आहेत.वाचकांनी इतरही महसुल दस्तैवजांचीही माहीती घ्यावी व अभ्यास करावा.


व सदर दस्तैवज हे शासकीय नमूद महसुल विभागात अर्ज करून प्रत्येक दस्तैवज हा रुपये २/- ते जास्तीत जास्त रुपये १०/-व पेक्षा कमी जास्त शासकीय नियमानुसार भरणा करुन(प्रत्येक पृष्ठ) उपलब्ध होतात.

सदर वंशावळी जुळवणी संदर्भात माझा मुळ लेख हा २० एप्रिल २०१८ रोजी प्रसारित झाला होता. आता पुन्हा एकदा लोकांच्या माहीती व आग्रहावरून माझ्या पेजवर प्रसारित करत आहे. मुळ लेखात फेरफार-बदल करताना लेखकाची परवानगी घ्यावी. All Right Reserve @Copyright


महसुल लेखन व संशोधन :

DR. RANJANA B. KHOCHARE

PHD IN LAW, LLM, LLB, MBA, DBM, DCL

ADVOCATE BOMBAY HIGHCOURT 

SUNIL BHADEKAR

LLB, MBA(FINANCE), BCOM

-9920945107-9029644000


==================================

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन

RTI Human Rights Activist Association

ऑलिम्पिक आणि विध्यार्थी

 ऑलिम्पिक आणि विध्यार्थी.

सध्या दिनांक २६ जुलै तें ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत पॅरिस येथे २०२४ चे ऑलिम्पिक सुरू आहे. हा खेळांचा महाकुंभच म्हणा की. भारतातर्फे ११७ खेळाडू विविध खेळात भाग घेत आहेत.


खेळ हा सुदृढ तब्येतीची गुरुकिल्ली आहे. खेळ आणि कसरती मुळे तब्येत निरोगी राहण्यास मदत होते. मन प्रफुल्लित होते. सांघिक आणि व्यक्तिशः स्पर्धात्मक काम करण्यास तें ऊर्जा देतात. नेतृत्व गुण तयार होण्यास तें मदत करतात असे त्याचे विविध फायदे आहेत. ऑलिम्पिक मध्ये विविध देशाचे खेळाडू भाग घेत असतात. त्या निमित्त त्या देशांची तोंडओळख होते.


सर्वाना पॅरिस येथे तें बघण्यासाठी जाणे शक्य नाही. आपल्या विद्यार्थ्यानी आणि तरुणांनी हे ऑलिम्पिक निदान टीव्ही वर बघायला हवे. खालील चॅनल वर तें बघायला मिळेल.

Sports 18 1 HD/SD, Sports 18 2 HD/SD, VH1, MTV, Colors networks, and Sports 18 3 HD/SD will provide the live coverage of the 2024 Summer Olympics in Paris. 

शिवाय आपल्याकडे जिओ फायबर असल्यास त्याच्या स्पोर्ट्स चॅनल वर तें बघायला मिळेल. 


मुलांना नुसते पुस्तकी किडे बनवू नका. आजूबाजूला काय चालले आहे त्याची माहिती होणे आवश्यक आहे.


माधव भोळे

हिंदुस्थानची तुकडे तुकडे गँग

हिंदुस्थानची तुकडे तुकडे गँग.

१६ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड यांनी भारतातील प्रांतीय ब्रिटिश गव्हर्नरना मदत करण्यासाठी तयार केलेल्या प्रांतीय विधान परिषदेमध्ये हिंदुस्थानातील विविध जमाती आणि धर्मांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून वरवर उदात्त वाटणारा "Communal Award" जाहीर केला, ज्याद्वारे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती, अँग्लो इंडियन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असे प्रत्येक वर्गासाठी एक मतदार संघ असे मतदार संघांचे विभाजन करण्यात येईल अशी ति योजना होती. थोडक्यात या मंडळीमध्ये फोडाफोडीचे राजकारण करून आपली सत्ता कायम ठेवायची असा तो अंतस्थ हेतू होता.


परंतु महात्मा गांधींचा ह्या योजनेला सक्त विरोध होता. भारतीय नागरिकांनी आपापसात लढावे हेच त्यांना मान्य नव्हते. त्यात निदान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, हिंदूं धर्माचा पोटभाग असल्यामुळे त्यांच्यात तरी विभाजन नको असे त्यांचे मत होते. तें त्यावेळी येरावडा कारागृहात होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी निरोप पाठवला परंतु ह्या योजनेला बाबासाहेबांचा पाठिंबा होता, त्यामुळे तें गांधीना भेटण्यास तयार नव्हते. बाबासाहेबाना वाटले की ह्या लवादा मुळे अनुसूचित जाती आणि जमातींचे वेगळे अस्तित्व मान्य होईल. शेवटी त्यावेळचे प्रथम दलित क्रिकेटियर बाळू पालवणकर याने मध्यस्ती करून आंबेडकरांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली आणि त्यानंतर दिनांक २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्यात अनुसूचित जाती आणि जमातीना काही जागा जास्त देऊन एकत्र निवडणुका लढण्याच्या अटीवर, हिंदूतर्फे भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय तर अनुसूचित जाती आणि जमातींतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली आणि पुणे करार झाला.


आज ९२ वर्षांनी भारताच्या अमृत काळात राहुल गांधीनी देशाची जात निहाय जन गणना करण्याची मागणी संसदेत केली आहे. त्यांची मागणी आहे की जेवढी प्रत्येक जातीची लोकसंख्या तेवढा त्याचा ह्या देशावर हक्क. 


म्हणजे १९५२ साली याचे आजोबा नेहरू यांनी प्रथम कुटुंब नियोजन सुरू केले तें वेडे होते आणि हा म्हणतो जेवढी तुमची लोकसंख्या तेवढ्या प्रमाणात तुमचा जास्त हक्क. लोकसंख्या वाढवा आणि जास्त हक्क मिळवा असाच याचा अर्थ होतो. 


आपले लाडके नेते कै. वल्लभभाई पटेल यांनी ५६२ संस्थांने एकत्र आणून हा देश एकसंघ बनविला. त्यात प्रशासकीय दृष्टीने भाषावर प्रांत रचना झाली त्यात काही तंटे आधीच सुरू आहेत.


भारतात ३,००० जाती आणि २५,००० उपजाती आहेत. त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे आणि देशाचे तुकडे पाडण्याचे हे मोठे शडयंत्र आहे. आधीच हा देश विविध संस्कृती, वेगवेगळे आहार, विहार, वेगवेगळे पोशाख यांनी बनलेला असला तरी तो एक आहे. त्यात आता जातीय जनगणना करून आणखी तंटे वाढवायचे आहेत का? 


ईथे महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठे या दोन समाजात सध्या जी रस्सीखेच सुरू आहे ती सोडवताना सरकारचे नाकी नऊ आले आहेत, तर ह्यांची नवीन योजना म्हणजे २८,००० समाजात भांडणे लावण्याची बिनडोक कल्पना आहे. त्याने भारत परत हजारोच काय पण लाखो वर्ष पाठी जाईल यात शंका नाही. 


बरे सर्व लोक हक्क मागत आहेत पण जबाबदारीची जाणीव कोणाला आहे का? हक्क आणि जबाबदारी नेहमी हातात हात घालून येत असतात हे कोण समजणार?


देव करो आणि अशी मागणी निदान या युगात तरी मान्य न होवो.


माधव भोळे