अस्मिता आणि प्रगती
Thursday, February 17, 2022
अस्मिता आणि प्रगती
भारत आणि अमेरिका, सांस्कृतिक आणि वैचारिक दरी
भारत आणि अमेरिका, सांस्कृतिक आणि वैचारिक दरी
Kashmir Tour, My Observation
ऑक्टोबर महिन्यात श्रीनगर येथे 4 दिवस जाण्याचा योग आला. तेथील काही व्यक्तींशी बोलायला संधी मिळाली. माझे अवलोकन खालील प्रमाणे.
१) तरुण मंडळी भरकटलेली आहेत. त्यांना शाळेपासूनच शिकवले जाते की भारत वेगळा देश आहे आणि काश्मीर स्वतंत्र आहे.
२) तरुण मंडळींचा प्रश्न होता की आम्ही जर भारतीय आहोत असे आपण म्हणता तर येथे जागोजागी मिलिटरी कशासाठी? एवढ्या बंधनात आम्हाला का ठेवले आहे? दर पाच मिनिटांनी बंदूकधारी दिसत आहेत. तुम्हाला हेल्मेट घालण्याची किंवा मास्क लावण्याची सक्ती केली तरी तुम्ही अस्वस्थ असता मग येथे तर गेले 70 वर्ष मिलिटरी राज्य करत आहे ते आम्ही का सहन करायचे?
आम्ही ज्यावेळी प्रवास करत होतो त्यावेळी अमित शाह तेथे भेट देणार होते आणि श्रीनगरचा काही भाग जेथे मिलिटरी एस्टेबलिशमेन्ट आहे तेथे अक्षरश: दर 2 मिनिटांनी आर्मरड व्हेईकल त्यावर पाठी, पुढे, डाव्या, उजव्या बाजूला स्टेनगनवाले बंदूकधारी होते. शिवाय दुकानांच्या छपरावर सुद्धा उभे होते. जम्मू, श्रीनगर रस्त्यावर मिलिटरी कोनव्होय जाताना दिसत होते. ही चित्र भयानक वाटले. तरुणांचे म्हणणे जर आम्ही स्वतंत्र तर हे कशासाठी? आम्हि एका जेलमध्ये आहोत आणि ते आम्हाला पसंत नाही.
मिल्ट्री प्रेसेन्स श्रीनगर मध्येच जास्त दिसला पण गुलमर्ग, पेहेलगाम, सोनमार्ग येथे नगण्य होता.
३) 370 कलम काढल्याने आमचे संरक्षण काढून घेतले आहे. आमच्या राज्यात आमचा रोजगार काढून घेऊन परप्रांतीय येथे कब्जा करू शकतील ते आम्हाला नको आहे, बिहारी, उत्तरप्रदेश, बंगाल मधील लोक आमचा रोजगार काढून घेणार असतील तर ते आम्हाला नको आहे.
४) आमच्या राज्याचे आम्ही बघून घेऊ. आम्हाला मिलिटरी ची आवशक्यता नाही.
५) टुरिस्ट लोकांवर हल्ले होत नाहित कारण ते आमचे अन्नदाते आहेत. पूर्वी तसे होत होते परंतु लक्षात आले की त्याचा इकॉनॉमी वर परिणाम होतो म्हणून ते बंद झाले आहेत.
६) तरुणांचे म्हणणे गेले पाच वर्षे राज्याची प्रगती होत आहे, सर्व ठिकाणी मुली टॉप करत आहेत. मुले आयएएस मध्ये पास होत आहे. आम्हाला प्रगती हवी आहे पण बंधन नको आहे. मी म्हटले प्रगती व्हायला आणि भारताची किंमत कळायला अजून 20 वर्ष लागतील. ज्यावेळी प्रगतीची फळे चाखाल त्यावेळी वाटेल की भारतात विलीनीकरण फायद्याचे आहे ते. तेथपर्यंत तुम्ही भरकटत रहाल. पाकिस्तान मध्ये गेला असतात तर तेथील नागरिकांची काय प्रगती आहे ते तुम्हाला माहितीच आहे. परंतु तेथे पाकिस्तान विषयक जास्त चांगले चित्र तेथील मीडिया रंगवते असे वाटले.
७) मी एका तरुणाला विचारले काश्मिरी महिला हिजाब घालत नाही तर पारंपरिक ड्रेस घालतात ते तुम्हाला चालते. तुमचा धर्म पाळायला आणि 5 वेळा नमाज पढायला बंधन नाही मग भारताबद्दल एव्हडा तिरस्कार का? त्याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. तुम्हाला प्रगती साठी भारत हवा पण भारतीय बंधने तुम्हाला नकोत हे कसे शक्य आहे? त्यावर गप्प.
८) एकंदर अजूनतरी मानसिक स्थिती पूर्णपणे भारतीय दिसली नाही. जरी भारतीय असले तरी स्वतःची अस्मिता स्वतंत्र ठेवण्याकडे कल दिसला.
९) वयस्क लोकांचे म्हणणे दगड मारण्याचे दिवस गेले. आता दगड मारताना पकडले तर 8 वर्ष जेलमध्ये जायला लागते. कोण जाणार? हे सर्व दंगे धोपे येथील स्थानिक राजकीय पार्टी करत असतात आणि लोकांना भडकवत असतात.
१०) अनव्यार्थ एकच तेथील राजकिय पक्ष आपापले वर्चस्व टिकवण्यासाठी अशा तरुणांचा पुरेपुर उपयोग करून घेत आहेत आणि लागेल तेव्हा पाकिस्तान च्या साहाय्याने दंगे धोपे घडवून आणत आहेत.
११) कायम मिलिटरी वास्तव्य जरी योग्य नसले तरी तरुणांचे मतपरिवर्तन करणे आवश्यक आहे नाहीतर परिस्थिती अशीच राहणार आणि भारत सरकारचे पर्यायाने करदात्यांचे पैस आणखी कित्येक वर्ष पाण्यात जाणार हे नक्की.
माधव भोळे
Tourism Letter to Shri Uddhav Thakare CM, Mah
२९.१०.२०२१
श्री. उद्धवजी ठाकरे साहेब,
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
मंत्रालय, मुंबई ४००००१.
विषय: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनातील लढायांवर आधारित, 7D ( seven dimenshion) या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, चित्रपट बनवणे आणि ते वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर सशुल्क प्रदर्शित करणे. तसेच शक्य असेल त्या गडकिल्ल्यांवर यात्राव्यवसाय (टुरिसम ) च्या दृष्टीने तशी व्यवस्था करणे.
महोदय;
मी आणि माझा परिवार ऑक्टोबर 2021 मध्ये अमृतसर, पंजाब येथे गेलो असता तेथे "गोविंद गड किला" या एका यात्रास्थळाला भेट दिली. गोविंद गड हा "पंजाब सिंह राजा रणजितसिंह" यांचे निवास स्थान असून त्या ठिकाणी तेथील किल्ल्याला सुशोभित करून त्याकाळचे शस्त्रागार, प्राचीन इमारती, तोफा, खंदक, संरक्षक भिंती इत्यादींचे प्रत्यक्ष दर्शन ठेवले आहे. हा सम्पूर्ण किला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. त्याशिवाय तेथे एक छोटेसे प्रेक्षागार ( ऑडीटोरीयम) आहे ज्या मध्ये राजा रणजित सिंह यांच्या जीवनावर आधारित 20 मिनिटांचा एक 7D ( seven dimenshion) चलतचित्रपट आहे. या चित्रपटाची विशेषता म्हणजे यामध्ये असणारी पात्रे, घोडदौड, तोफांचे आवाज इत्यादी गोष्टी अत्यन्त सजीव, आपल्या अंगावर चालून येतिल अशा, जणूकाही आपणच त्या लढाईत भाग घेत आहोत असे वाटते अशी व्यवस्था त्यामध्ये आहे. आपली आसने सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने पाठिपुढे, वरखाली, तिरपी किंवा सरळ दिशेने होत असतात आणि त्या चलत चित्राचा आपण एक भाग बनत असतो. मध्येच एखादा तोफेचा तुकडा आपल्या अंगावर येत असतो असा भास नव्हे प्रत्यक्ष काहीतरी हलकेच आपल्या शरीराला चाटून सुद्धा जाते अशी त्या आसनाची व्यवस्था आहे. सम्पूर्ण 15 मिनिटे आपण त्या भावविश्वात गुंग असतो.
राजा रणजितसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणे योग्य नाही, परंतु अशा प्रकारच्या यात्रा स्थळांद्वारे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, लढवय्येपणा, शासनपद्धती, व्यवस्थापन शास्त्र आणि इतर गौरवशाली इतिहास नवीन पिढीला या नवीन तंत्रज्ञानाद्वारे अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल असे वाटते.
एक शासनकर्ते म्हणून आणि व्यक्तिगत रित्या आपण आणि आपला बाळासाहेब ठाकरे परिवार छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानता हे जाणूनच मी अशा प्रकारची विनंती आपणास करत आहे.
आपण तज्ञांशी सल्लामसलत करून आपल्या महाराष्ट्रात या विषयात काय आणि कोठे करता येईल याचा आपण जरूर विचार कराल याची मला खात्री आहे.
आपला नम्र,
माधव भोळे
शेयर बाजार ?
एक दोन दिवसांपूर्वी मी कोकणात जमीन विकत घेण्याबद्दल लेख लिहिला होता. प्रतिक्रिया वरून असे वाटते की बऱ्याच लोकांना हा लेख उपयुक्त वाटला.
आपण ज्यावेळी जागा विकत घेतो त्यावेळी दोन कारणे असतात. एक म्हणजे उपयुक्तता, दुसरी म्हणजे गुंतवणूक. जर उपयुक्तता शाश्वत, निदान पुढील पाच वर्षे असेल तर ती जागा जरूर विकत घ्यावी नाहीतर भाड्याने घ्यायला हरकत नाही.
ज्या वेळी आपण गुंतवणूक म्हणून विचार करता त्यावेळी जर ती जमीन असेल तर ती शहरा लगतच्या भागात असेल तर त्यात वृद्धी चांगली होते कारण बरेच वेळा शहराच्या सीमा वाढतात पण सरकारी प्रकल्प येणार या विचाराने घेतली तर भारतात योजलेले सरकारी प्रकल्प आणि प्रत्यक्षात उतरणारे सरकारी प्रकल्प या मध्ये कमीतकमी 10 ते 30 वर्षापर्यंत कालावधी असतो आणि तो प्रकल्प होणार म्हणून भाव आधीच वाढवून ठेवलेले असतात. कित्येक वेळा असे प्रकल्प बासनात गुंडाळले जातात आणि गुणवणूक फुकट जाते.
तसेच मुंबईत भाव वाढले म्हणून विरार वसई मध्ये भाव त्याच प्रमाणात वाढतील असे ही नाही. तेथे भाडे सुद्धा कमी मिळेल. आणि मेंटेनन्स ला पैसे जातील ते वेगळेच.
एखादा फ्लॅट किंवा जमीन घ्यायला अनेक कागदपत्रे, त्याची सत्यता, त्या आधीं लोकेशन, आजूबाजूची वस्ती, विकायची वेळ आली तर विक्री किती लवकर होईल, नावावर होईल की नाही, सम्पूर्ण मालकी मिळेल का? टायटल क्लीयर आहे ना, अतिक्रमण होईल का? या आणि अशा अनेक बाबी बघायला लागतात.
शिवाय प्रत्येक एरिया मध्ये ठराविक जमिन किंवा फ्लॅट घ्यायचा झाल्यास कमीतकमी निदान 10 लाख ते 1 करोड किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागते. या सर्व गोष्टीं ऐवजी , बँक आणि पोस्टातील फिक्स डिपॉझिट सोडून दुसरे काही गुंतवणूक मार्ग बऱ्याच प्रमाणात शाश्वत आहे का याचा विचार केला असता खालील उत्तर मिळते.
प्रथम मी हे लिहितो की मी कोणी मान्यवर गुंतवणूक सल्लागार किंवा ब्रोकर नाही पण जो अनुभव आला तो सांगतो. जर आपण भारतीय शेयर बाजारात गुंतवणूक केलीत तर या बाजारात कमीतकमी रु 10000 ( या पेक्षाही कमी रकमेपासून होऊ शकते) पासून ते कितीही मोठ्या रकमेची गुंतवणूक करता येते. खरेदी किवा विक्री चा व्यवहार एका मिनिटात, पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन ( घरात बसून किंवा अगदी मोबाईल वर बाहेर फिरतीवर असताना सुद्धा), क्लीयर टायटल, आग, पूर, वादळ, इत्यादी नैसर्गिक आपत्ती यामुळे पूर्ण नुकसान होणार नाही अशी, खरेदीची रक्कम आपल्या बँक खात्यातून आणि विक्री ची रक्कम तसेच लाभांश ( डिव्हिडंड) परतावा सुद्धा आपल्या बँक खात्यात ऑटोमॅटिक जमा होतो, कोठेही जायची गरज नाही. विक्रीचे पैसे 2 दिवसात आपल्या खात्यात जमा होतात, खरेदीचे पैसे त्याच दिवशी आपल्या ब्रोकर कडे जमा करणे आवश्यक आहे. कित्येक ब्रोकर डीलव्हरी वर कमिशन लावत नाहीत म्हणजे तो व्यवहार कमिशन रहित होतो.
समजा काही कारणांमुळे आपल्यास एखाद्या समभागाची खरेदी चुकीची झाली अशी वाटली तर दुसऱ्या मिनिटाला काही थोडे नुकसान किंवा फायदा घेऊन ती लगेच विकता येते. वेगवेगळ्या चांगल्या शेयर्स ची खरेदी आपण केलीत तर एक चांगला बॅलन्स पोर्टफोलिओ तयार होऊन मार्केट च्या कोणत्याही स्थितीत आपणास नुकसान होणार नाही एवढी काळजी आपण घेऊ शकतो.
अर्थात या साठी थोडाफार अभ्यास करणे आवश्यक आहे. निदान कोणी चांगला माहितगार, अनुभवी सल्लागार असणे आवश्यक आहे. या देशात आणि मार्केट मध्ये अशा अनेक कम्पन्या आहेत की त्या वर्षानुवर्षे चांगल्या चालल्या असून त्यांच्या शेयर च्या भावात वर्षानुवर्षे नियमित वाढ होत असते. काही कम्पन्या चांगले डिव्हिडंड देतात तर काही कम्पन्या कमी डिव्हिडंड देतात पण त्यांचे प्रॉफिट वाढल्यामुळे त्यांचे रिझर्व्ह वाढून त्यांच्या बाजरी मूल्यात वाढ होऊन त्याचा फायदा गुंतवणूकदाराला मिळतो. ज्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात असे शेयर बाजारात खूप असून त्या पैकी कित्येक शेयर नियमित 15% ते 35% पर्यंत भांडवल वृद्धी दर्शवतात.
हा शेयर बाजार शिकायला फार कठीण नाही परंतु थोडे अंकगणित आणि थोडे कॉमर्स च्या टर्म्स चे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्याला ते नाही तो सुद्धा इच्छा असल्यास शिकू शकतो.
बरेच वेळा लोक जास्त परताव्याचा साठी, किंवा लवकर श्रीमंत होण्यासाठी इंट्रा डे ( दररोज खरेदी विक्री) किंवा ऑप्शन सारख्या शेयर बाजारात पैसे न समजता लावतात. ते चुकीचे आहे कारण हे विषय जे त्यात माहीर आणि काटेकोर माहितगार आहे त्यांच्यासाठीच आहेत. अनेक लोक एक दोन सेमिनार करून येतात आणि ह्या विषयात जातात पण ते चूक आहे.
आपण जर प्रतिथयश किंवा चांगल्या ट्रॅक रेकोर्ड असलेल्या ब्लु चिप कँपन्यांचे शेयर घेतलेत आणि ते कमीत कमी 3 ते 4 वर्ष ठेवलेत तर त्याचा चांगला परिणाम आपणास दिसून येईल. स्वतः खरेदी विक्री करणे आणि म्युचल फंड मधून गुंतवणूक करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. स्वतः आपण एक दोन वेळा चुकाल पण जस जसे आपण त्यात काम कराल तस तसे आपण त्यात आणखी यशस्वी व्हाल. म्युचल फंड मध्ये आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो. त्यांच्या कामाच्या पद्धती आणि गरजा वेगळ्या असतात. स्वतःचा अभ्यास महत्वाचा तसेच आजूबाजूला किंवा आर्थिक क्षेत्रात काय घडामोडी सुरू आहे याचे ज्ञान असेल तर आणखीन उत्तम. पण एक लक्षात घ्या की जरी मार्केट काही दिवस खाली असले तरी ते नंतर वरती येणारच त्यामुळे एखादेवेळी आपल्या पोर्टफोलिओ ची किंमत कमी झाली तरी जर आपण लगेच ते शेयर विकत नसल्यास त्यात काही नुकसान होत नाही. तुम्हाला कोणीही विकत घ्या किंवा विका याची जबरदस्ती करत नाही आणि घेतलेले सर्व निर्णय स्वयंप्रेरीत असतात. तुम्हाला सांगतो इन्फोसिस, टीसीएस, हिंदुस्थान लिव्हर, मारुती, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, ब्रिटनिया, विप्रो, आयशर मोटर्स, रिलायन्स, एचडीएफ च्या सर्व कम्पन्या, लार्सन तुबरो इत्यादी अनेक कम्पन्या ज्यांची मॅनेजमेंट प्रोफेशनल पद्धतीने काम करते त्या सर्व कँपन्यांच्या शेयर्स मध्ये पैसे गुंतवा, कधीच पश्चाताप करायची वेळ येणार नाही. मी हे जनरल लिहिले असून या आणि अशा कँपन्यांचे शेयर खरेदि करताना मार्केट वरती असताना गुंतवू नका पण जरी चुकून असे केलेत तरी फार मोठे नुकसान होणार नाही याची खात्री बाळगा.
कदाचित काही मंडळींना ते या वयात जमणार सुद्धा नाही पण तुमच्या मुलांना आता पासूनच या वयात ह्या गोष्टी शिकून घ्यायला सांगा. नाहीतरी आपण हे सर्व पुढील पिढी साठी करत असतो मग नुसते पैसे ठेवण्यापेक्षा किंवा ते कसे गुंतवुन त्याची भांडवल वृद्धी कशी होईल हे त्यांना शिकवणे जास्त उपयोगी होईल.
शेवटी एक मोलाचा सल्ला, इंग्रजीत एक म्हण आहे don't put all your eggs in one basket. म्हणजे आपली सर्व गुंतवणूक एकाच प्रकारात ( म्हणजे जमीन, फ्लॅट, सोने, फिक्स डिपॉझिट, शेयर मार्केट इत्यादी) किंवा एकाच कम्पनी च्या शेयर मध्ये गुंतवू नका कारण या जगात काहीच शाश्वत नाही त्यामुळे जरी एका ठिकाणी अडचण आली तरी दुसरी बाजू आपली पडती बाजू सावरून घेऊ शकेल अशा रीतीने गुंतवणूक करा.
माधव भोळे
सुगंधाचा व्यापार
सुगंधाचा व्यापार
(सुगंधी अत्तरे, आवश्यक तेले ( essential oils), चंदन तेल याचा व्यापार:)
गेल्या काही दिवसात आपण एक बातमी वाचली, कानपुर, उत्तर प्रदेश चे एक व्यापारी श्री पियुष जैन यांचे घरी इन्कमटेक्स ची धाड, रु 257 कोटी ची रोख रक्कम, 23 किलो सोने एव्हडी रक्कम घरी मिळाली. कपाटे च्या कपाटे नोटांच्या बंडलानी भरलेली होती.
एव्हडा पैसा कोणत्या व्यापारात असतो? काय आहे हा सुगंधी व्यापार?
सर्व प्रकारची स्प्रे परफ्युम, अत्तरे, अगरबत्ती, धूप कोन, प्रसाधन वस्तू ( कॉस्मेटिक्स), टॉयलेटरीस, साबण, सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ, ड्रिंक्स, अगदी बासमती तांदूळ सुद्धा, या सर्वांमध्ये याचा वापर होतो.
दोन प्रकारचे सुगंध तयार केले जातात. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरे कृत्रिम. त्यात पुन्हा दोन प्रकार आहेत, एक म्हणजे चव ( Flavours) आणि दुसरे म्हणजे सुगंधी ( Fragrances). खाद्य पदार्थांमध्ये चविष्ट ( Flavours) द्रव्य वापरले जाते ज्यांमुळे त्या त्या प्रकारचा वास आणि चव येतो. यात सुद्धा फळांचा सुवास किंवा फळांची चव असणारी द्रव्ये तसेच खाद्य पदार्थांची चव किंवा सुवास असणारी द्रव्ये बेमालूम पणे रोजच्या खाद्य पदार्थांमध्ये मिसळली जातात. काही ठराविक मर्यादेपर्यंत याला FDI ( Food and Drugs administration) या सरकारी विभागाची मान्यता असते.
बाजारात मिळणारे लेमन किंवा ऑरेंज हे पेय काही लिंबू किंवा संत्र्या पासूनच बनले असे नाही. कृत्रिम सुगंध आणि कृत्रिम चवीने हे बनवले जाते. नाही तर हजारो लिटर वेलची दुधाला किंवा श्रीखंडाला किती वेलची लागेल याचा विचार करा? बाजारात मिळणाऱ्या ऑरेंज मध्ये संत्र्याचा सुवास आणि चव टाकली असते. तीच गोष्ट बासमती तांदळाची आहे. बाजारात मिळणारे लांब तांदूळ जरी बासमती चा वास देत असले तरी ते बासमती असतीलच असे नाही. एकदा पाण्यात घातले की त्याचा वास निघून जातो पण अस्सल बासमतीचे असे होणार नाही.
सुगंधां च्या बाबतीत सुद्धा असेच आहे. बाजारात मिळणारी चंपा, मोगरा, गुलाब इत्यादि फुलांचा, फळांचा सुवास देणारी अगरबत्ती, अत्तरे, परफ्युम या सर्वांमध्ये या सुगंधी द्रव्यांचा वापर होतो.
जर ही द्रव्ये कृत्रिमरित्या केमिकलनि बनली असतील तर तिची किंमत फारच कमी असते पण तीच नैसर्गिक रित्या बनली असतील तर तिची किंमत कैक पटींनी असते. जर एक लिटर/ किलो कृत्रिम गुलाब द्रव्य घेतले तर अगरबत्ती साठी ते रु. 500 ते 1000 / किलो एव्हडे आहे पण तेच नैसर्गिक गुलाब तेल घेतले तर त्याची खादि ग्रामोद्योग ची किंमत 15 मिलिलिटर ला 275 रुपये ( रु. 18.33 प्रति मिलिलिटर ) म्हणजे रु. 18,330 प्रति किलो होते. हे झाले साध्या गुलाबाचे. दमस्कस नावाच्या गुलाबाचा सुगन्ध तर 1,40,000 रुपये प्रति लिटर विकला जातो, जे होलसेल मध्ये साधारण 40 ते 45,000 रुपये प्रती लीटर पडेल. ह्याचे कारण ज्यावेळी 200 किलो गुलाबाच्या पाकळ्या जेव्हा वापरल्या जातात तेव्हा 1 ग्राम नैसर्गिक गुलाबाचे तेल मिळते. ह्यातील बहुतेक तेले बाष्पीभवन किंवा सोलव्हेन्ट एक्सट्रक्शन किंवा कोल्ड प्रेस या पद्धतीने काढली जातात. ही essential oils निसर्गोपचार, आयुर्वेद, आणि काही वेळा किमती परफ्युमरी साठी सुद्धा वापरली जातात. अगरबत्ती मध्ये वापरले जाणारे गुलाब तेल ह्याला इंडस्ट्रीयल परफ्युम असे म्हणतात. ते कृत्रिम रित्या बनवल्यामुळे तुलनेने फार स्वस्त असते.
कृत्रिम सुगंध ज्याला इंग्रजीत एरोमॅंटिकल केमिकल असे म्हणतात ती भारतात अनेक कारखान्यात बनतात. हे कारखाने त्याची प्रमुख रॉ मटेरियल बनवतात. त्याचे कमी अधिक प्रमाणात मिश्रण करून पुढे वेगवेगळे सुगंध बनवले जातात. कधी कधी यात सुद्धा नैसर्गिक तेले वापरली जातात पण त्याप्रमाणे फिनिश प्रोडक्ट च्या किमतीत फरक होतो. फ्रांस सारख्या शहरात शेकडो केमिस्ट या वर काम करून नवनवीन सुगंधी मोलेक्युल तयार करत असतात आणि एखादा सुगंधी मोलक्युल बाजारात एकदम हिट होऊन त्या मोलक्युल च्या परफ्युमला जगभरात भयंकर मागणी येते.
आसाम मध्ये मिळणाऱ्या अगर जातीच्या झाडाच्या खोडाच्या सालांपासून तयार होणारे उद नावाचे अत्तर भारतातील सर्वात किमती अत्तर म्हणून जगात विकले जाते आणि त्याची किंमत साधारण 10 मिलिलिटर ला रु. 50,000 म्हणजे एका मिलिलिटर ला रु 5,000 एवढी आहे. आपण अजमल परफ्युम नावाची आसाम मधील परफ्युमरी जिचे हेड ऑफिस मशीद बंदर, मुंबई आणि गल्फ मधील दुबई तसेच अनेक ठिकाणी आहे या बद्दल ऐकले असाल. बदरुद्दीन अजमल हे लोकसभेतील आसाम मधील खासदार असून ते पूर्वीपासूनच या व्यापारात आहेत. हे अत्तराचे मोठे व्यापारी असून आसाम मधील अगर झाडापासून बनणारे उद हे अत्तर हे त्याच्या प्रगतीचे मुख्य कारण आहे. या आणि अशा अनेक नैसर्गिक अत्तराची खूप मोठ्या प्रमाणात निर्यात भारतातून होत असते. श्रीमंत इस्लामिक देशामध्ये बकुर आणि उद याला खूप मागणी आहे तर अमेरिका, युरोप आणि इतर पुढारलेल्या देशात निसर्गोपचार पद्धतीसाठी नैसर्गिक तेलाची खूप मागणी आहे.
कानपुर जवळील कानोज या शहरात 16 व्या शतकात जहांगीर बादशाह ने इराण मधून तज्ञ आणून कानोज येथे सुगंधी द्रव्ये बनवायची सुरवात केली असे आधुनिक इतिहास सांगतो. अजूनही कानोज मध्ये पारंपारिक पद्धतीने गुलाब, वाळा, इत्यादी अनेक फुले, वनस्पती, झाडाची मूळे, खोडे, पाने, मसाल्याचे पदार्थ एवढेच काय पण माती पासून सुद्धा सुगंध निर्माण करण्याचे कारखाने असून त्याचा होलसेल व्यापार कानपूर शहरातून होतो. उत्तर प्रदेश मध्ये या व्यवसायास लागणारे रॉ मटेरियल जसे की अलिगढ मध्ये रोझ दमस्कस सारख्या दर्जेदार गुलाबाची शेती होते तर पचोली, गवती चहा, सारखी वनस्पती तसेच अनेक उत्तम शेतीचे पर्याय तेथे घेतले जातात. ज्याला आपण इकॉसिस्टिम म्हणतो ती तेथे आहे. महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीमुळे या गोष्टींकडे सरकार लक्ष देत नाही. गावठी कोकणी गुलाब तसेच सोनचाफा, सोनटक्का, अनंत इत्यादी सुंदर सुवासिक फुले कोकणात असून कोकणात एकही परफ्युमरी नाही. काहीच नाही तर कोकणातील मातीचा सुगन्ध पाऊस पडल्यावर अत्यन्त सुंदर येतो त्याचे परफ्युम पण येथे बनत नाही याचे वाईट वाटते. मद्रास मध्ये मोगरा तेल फार सुंदर तयार होते. तर बंगलोर येथे चंदन तेलाचे कारखाने आहेत. जशी भारतात कानोज हे अत्तरांचे आणि नैसर्गिक तेलाचे माहेरघर आहे तसे फ्रांस मध्ये ग्रास हे या विषयात माहेरघर आहे. फ्रांस मधील 2/3 नैसर्गिक तेले ग्रास मध्ये बनतात
महाराष्ट्रात कृत्रिम एरोमॅंटिकल केमिकल मध्ये एस एच केळकर, मुलुंड, मुंबई मध्ये यांचे फार वरचे नाव आहे. त्याच्या शिवाय सुद्धा अनेक मंडळी या कृत्रिम सुगंधात काम करत आहेत. मुलुंड येथे वझे केळकर कॉलेज मध्ये या विषयात 2 वर्षाचा परफ्युमरी आणि कॉस्मेटिक मॅनेजमेंट चा डिप्लोमा कोर्स सुद्धा आहे.
हा विषय म्हणजे फार मोठा समुद्र आहे. भारतातून 2021 साली 1734 कोटी रुपयांची नैसर्गिक तेलाची निर्यात झाली तर अगरबत्ती चा देशांतर्गत व्यापार 8,600 कोटी आणि अगरबत्ती ची निर्यात 1000 कोटींची झाली. ही फक्त वरवरची आकडेवारी आहे अजून त्यात कॉस्मेटिक आणि टॉयलेतरी विचारात घेतली नाही आहे.
मराठी माणूस यात कोठे बसतो मला माहित नाही. एक एस एच केळकर सोडले तर बाकी सगळे फुटकळ व्यापारी आहेत.
माधव भोळे.
केल्याने होत आहे रे ( भाग 2)
केल्याने होत आहे रे ( भाग 2)
मागच्या लेखात आपण बघितले की इंडियन शार्क टॅंक ह्या सोनी एंटरटेनमेंट चॅनल वरील बिझिनेस रिऍलिटी शो, जो भारतातील नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करते, त्यांच्या व्यवसायिक कल्पनांवर चर्चा करून त्या कल्पना आणखी विस्तृत आणि सशक्त बनवण्यासाठी मदत करते आणि त्यातील कोणती कल्पना व्यवहारिक वाटली तर त्यामध्ये व्हेंचर कॅपिटल सुद्धा गुंतवते, त्यातील 7 जजेस पैकी एक पियुष बन्सल यांची माहिती आपण काल बघितली. आज आपण सौ नमिता थापर यांचे बद्दल जाणून घेऊ.
1977 मध्ये जन्मलेल्या पुणे स्थित नमिता थापर ह्या पुण्यातील एमक्युयर ह्या औषधी कम्पनी ( फार्मा ) च्या एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांचे वडील श्री सतीश मेहता हे ह्या कम्पनीचे संस्थापक, CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एमक्युयर फार्मा कम्पनी चा वार्षिक टर्नओव्हर 6091 कोटी रुपये असून त्यांचेकडे 11,000 नोकर आहेत आणि 70 देशात त्यांचे जाळे असून त्यांच्या 14 प्लांट मधून 350 औषधी ब्रँड तयार होतात.
नमिताचे शालेय आणि कॉमर्स मधील कॉलेजचे शिक्षण पुण्यातूनच झाले. त्या चार्टर्ड अकाऊंट झाल्या आणि पुढे नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका मधील ड्युक्स युनिव्हर्सिटी च्या फुकवा स्कुल ऑफ बिझिनेस मधून त्यांनी एम बी ए केले. अमेरिकेत गायडंट कॉर्पोरेशन मध्ये 6 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायात भारतात मदत करायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम चीफ फायनॅन्सीयल ऑफिसर हे पद सांभाळले आणि पुढे त्या एमक्युयर च्या एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर झाल्या. त्यांनी विकास थापर यांच्याशी विवाह केला असून ते एमक्युयर मध्ये ते कॉर्पोरेट प्रेसिडेंट, बिझिनेस अँड फायनान्स पदावर काम करतात.
हे करत असताना नमिता थापर ह्या फुकवा स्कुल ऑफ बिझिनेस च्या भारत विभागात बोर्डवर नेमल्या गेल्या, शिवाय भारतातील TiE ( The Indus Enterprenures) ह्या 1992 साली सुरू झालेल्या सिलिकॉन व्हॅली, अमेरिका येथील कनवल रेखी, सुहास पाटील आणि प्रभू गोयल ह्या तीन टेक्नॉलॉजिस्ट नि सुरू केलेल्या स्टार्टअपस ना फ़ंडिंग करणाऱ्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या बोर्डावर त्या आहेत. TiE हे स्टार्टअप साठी एक मोठे व्यासपीठ आहे. आजपर्यंत 10,000 स्टार्टअप ह्या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. यंग प्रेसिडेंटस ऑर्गनायझेशनच्या त्या सक्रिय सभासद आहेत.
ह्या शिवाय नमिता थापर, हार्वर्ड बिझिनेस स्कुल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद, इकॉनॉमिक टाईम्स वूमन कॉन्फरन्स, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्त्ररीज ( FICCI) ह्या ठिकाणी विशेष वक्त्या म्हणून मार्गदर्शन करत असतात.
तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी इनक्रेडीबल व्हेंचरस ही शैक्षणिक संस्था काढली असून त्यामार्फत 18 ते 24 वर्षापर्यंत च्या तरुणांना स्टार्टअप साठी मार्गदर्शन करतात. आजपर्यंत 25 स्टार्टअप मध्ये त्यांनी स्वतः गुंतवणूक केली आहे.
त्या स्वतः एक यशस्वी व्यावसायिक असून इंडियन शार्क टॅंक मार्फत नवोदित स्टार्टअपना त्या मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेची बाजारी किंमत 600 कोटी रुपये एव्हडी आहे.
माधव भोळे