Friday, August 15, 2025

मांसाहार बंदी!!

 मांसाहार बंदी!!

महाराष्ट्रातील काही नगरपालिकांनी १५ ऑगस्टच्या दिवशी मांसाहार बंदी केली असून मटण आणि चिकन विकणाऱ्या दुकानाना ते विकण्याचे बंदी करणारे आदेश दिले आहेत. जास्त खोलात गेले असता कळते की गोकुळ अष्टमी आणि पर्युषणाचा पाहिला दिवस असल्यामुळे ही बंदी लागू केली आहे.


मीं पूर्वी दुबईत रहात असताना आम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवावे लागे. दुबई हे जाहीररित्या मुस्लिम धर्मीय राज्य असल्यामुळे, सरकारी फतव्यामुळे, रमझान महिन्यामध्ये तेथे दिवसा खाद्य पदार्थांची रेस्टॉरंट बंद असायची. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की आपले काय होणार? परंतु तेथील राजाच्या लक्षात आले की दुबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुसलमान लोकांनी रमझान पाळायला हवा म्हणजे बाकीच्यानी तो पाळायलांच असे नाही, हा उद्दात विचार करून त्यांनी अमुस्लिम बांधवांसाठी दिवसासुद्धा ही रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचे किंवा त्यांना होम डिलिव्हरी देण्याचे आदेश दिले आणि आमचा प्रश्न सुटला.


दुबई सारख्या मुस्लिम देशाला हे कळावे आणि आम्ही विविध जात, पंथ, धर्म, संस्कृती असलेल्या एकसंघ राज्यातील लोकांना आणि त्यांच्या प्रतिनिधीना हे कळू नये की आपली आराधना, आपला धर्म, आपले संस्कार आपल्याजवळ ठेवायला हवेत आणि ते आपण दुसऱ्यावर लादु शकत नाहीत. तुम्ही जैन आहात म्हणून महावीर जयंती किंवा पर्युषण दिवसात कोणी मांसाहार करू नये अशी अपेक्षा कशी बाळगू शकता? तुमचा धर्म तुम्ही अवश्य पाळा पण दुसऱ्यावर थोपण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. 


मीं स्वतः पूर्ण शाकाहारी असलो तरी सुद्धा माझे हेच मत आहे.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment