Monday, August 18, 2025

देवाभाऊ अजब तुझे सरकार!

 देवाभाऊ अजब तुझे सरकार!


"लबाड जोडीती इमल्या माड्या, 

गुणवंतांना मात्र झोपड्या,

पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, 

वेश्येला मणिभार, 

उद्धवा अजब तुझे सरकार.


वाईट तितुके ईथे पोसले,

भलेपणाचे भाग्य नासले, 

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार 

उद्धवा अजब तुझे सरकार."

ह्या गीताच्या ओळी आपण लहानपणा पासूनच ऐकत आहोत. त्याचा प्रत्यय वारंवार येतो 

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील, तलाठी प्रशांत थोरात यांची ३० जुलै रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात बदली झाल्यामुळे ८ ऑगस्ट २०२५ रोजी उमरी मधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना निरोप समारंभ आयोजित केला होता. अशा वेळी साहजिकच आनंदाचे वातावरण असल्यामुळे त्यांनी खुशिमध्ये येऊन "तेरे जैसा यार कहा" हे किशोर कुमारचे गाणे गायले. त्याचा कोणीतरी व्हिडीओ केला आणि तो वायरल केला. त्यामुळे ऑफिस टाईम मध्ये गैरवर्तन केल्याच्या कारणावरून त्याला कामावरून सस्पेंड केले आहे. 


मजा अशी कीं महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक पासून अगदी महानगर पालिकेच्या आणि सरकारच्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये लाचखोरी आणि रेटकार्ड असते अशा आशायाच्या बातम्या पेपरात राजरोस छापून येतात. मध्यंतरी मुंबईतील बिल्डर मंडळींनी लाच देण्याचे प्रमाण वाढले आहे अशी बातमी दिली होती. रेणू कात्रे ह्या महिलेने आत्महत्या केल्या नंतर तिचा पती म्हाडा मधील रजिस्ट्रार, बापू कात्रे महिना २० ते २५ लाख कमवतो अशी तक्रार रेणूच्या भावाने केली होती त्याची फक्त चौकशी सुरू झाली. अशा बातम्या असूनही सरकारचे लाच लुचपत खाते कोणत्याही प्रकारची कारवाई करताना आढळत नाही. हजारो तक्रारी येतात तेव्हा कुठे एखाद्या खालच्या लेव्हल च्या व्यक्तीवर कारवाई होताना दिसते. मोदींच्या वक्तव्या नुसार ७०,००० कोटींचा भ्रस्टाचार करणारे उपमुख्यमंत्री होतात पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी / नोकराने काही विशेष प्रसंगी गाणे गायले म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन लगेच सस्पेंड सुद्धा केले गेले? त्याला फक्त वॉर्निंग देऊन काम झाले असते.


सरकार एवढेच जर शिस्तप्रिय असेल तर भ्रस्टाचाराचे आरोप मंत्री, त्यांचे स्वीय सचिव यांच्यावर होण्यापासून ते मिठी नदी सफाई सारख्या अनेक प्रकरणे गाजली नसती. बिचाऱ्या तुकाराम मुंडे सारखे निर्भयी IAS अधिकारी २० वर्षात २३ वेळा बदली झाले नसते.


असो, 

कली युगात आणखी काय अपेक्षित आहे?


माधव भोळे 

No comments:

Post a Comment