पहिले पाऊल!
देवरुखे उद्योजक ह्या व्हाट्सअप ग्रुपचे प्रवर्तकांचे मार्फत काल दिनांक ३.८.२०२५ रोजी वेस्ट एंड हॉटेल, मारिन लाईन्स ह्या ठिकाणी, देवरुखे बिझिनेस फोरम ह्या ग्रुपने, एक मेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ह्या उक्तीला न्याय देत आजची बिझिनेस फोरम आयोजित केली होती. अतिशय सुरेख आयोजन, वेळेचे काटेकोर नियोजन, उत्कृष्ट निवेदन, जेष्ठ मंडळीचे मार्गदर्शन, तरुण आणि अनुभवी उद्योजक आणि व्यावसायिक यांची उपस्थिती आणि रुचकरं भोजन, ह्या कार्यक्रमाने ह्या सर्वच आघाड्यांवर बाजी मारली आहे.
आधी केले मग सांगितले ह्या उक्ती प्रमाणे अनिल नवरंगे सर, चंद्रशेखर भडसावळे सर, डॉ पुराणिक, दिवाकर निमकर, संदीप भाटलेकर, नितीन कराडकर, समीर काळे सर इत्यादी मंडळींनी आपले अनुभव दिल खुलासपणे उपस्थितांसमोर मांडले.
अमेय पांगरकर यांच्या AI वरील भाषणातून AI म्हणजे काही जगावेगळे भूत आहे आणि ते सर्वांनां नाकाम करणार ही माझ्या सारख्या सर्व सामान्य व्यक्तीच्या मनात असलेली भीती काढून टाकण्याचा रास्त प्रयत्न केला. विशेषत: त्यांनी सांगितले की ज्या कामाला कल्पकता लागते, जे काम आधी कुठेही कोणत्याही मानवाने केलेले नाही ते काम AI ने करण्याचा प्रयत्न करू नका. कारण AI हा एक शिक्षित जादूचा दिवा आहे. जेव्हडे त्याला शिकवलेले असते तेव्हडेच काम तो जास्तीतजास्त योग्य प्रमाणात आणि कमीतकमी वेळात करतो.
Garbage in garbage out ह्या कॉम्पुटर च्या नियमानुसार जर तुम्ही आवश्यक असलेली योग्य माहिती, योग्य पद्धतीने दिलीत तर AI तुम्हांला त्याचे चांगले परिणाम देतो, या उलट चुकीची माहिती दिलीत तर अनपेक्षित उत्तर देतो हे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी बुद्धिमत्तेला पर्याय होऊ शकणार नाही हे त्रिवार सत्य त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांच्या दोन्ही पुस्तकांच्या भेटी बद्दल त्यांचे आणि आयोजकांचे आभार.
नितीन कराडकर सरांनी एका वाक्यात जीवनाचे सर सांगितले "मृत्यू, टॅक्स आणि परिवर्तन" ह्या तीन गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. त्यांना घाबरून जाऊ नका, तर त्यांना सामोरे जायला शिका.
सरकारी यंत्रणा, GST, यश अपयश हे अडथळे येतच राहणार पण त्याला खंबीर पणे तोंड द्या आणि ठाम उभे रहा.
नवरंगे सर आणि चंद्रशेखर भडसावळे यांनी पर्यावरण संवर्धन, कार्बन क्रेडिट, वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषयाला हात घालून, माणसाच्या अजून पुढील शंभर पिढ्या सुसहाय्य जगाव्यात ह्या करिता काय उपाय योजना करायला हव्यात ह्याबद्दल सुद्धा चांगले मार्गदर्शन केले.
एकंदरीत कार्यक्रम चांगला झाला. छोटे उद्योजक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील या साठी काय करता येईल या बद्दल सलील कारुळकर यांनी सूचना केली, तिचा विचार करायला हरकत नाही.
आज आपल्या समाजात सुद्धा परिवर्तन होत आहे हे बघून आनंद झाला. आपल्या आणि पुढच्या पिढीला सरस्वती पूजका बरोबरच लक्ष्मी पूजक होण्यासाठी त्यांनी चक्कीवरं ओव्या गायला सुरवात केली आहे. जर आत दाणे टाकले तर आटा नक्कीच बाहेर येणार.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. हे सर्वांच्या लक्षात हळू हळू येत आहे.
भूषण शितूत, दिनेश निमकर, मंदार कानडे, योगेश वीरकर, समीर निमकर, प्रशांत जोशी, श्रीमती शिल्पा भोळे, निशिगंध भडसावळे आणि सर्व आयोजन टीम ला मनःपूर्वक धन्यवाद.
हे पहिले पाऊल आहे. अशी अनेक पावले चालू तेव्हा कोठे हिमालय सर होणार आहे.
सर्व जेष्ठाना नमस्कार, आणि आपले असेच मार्गदर्शन सर्वांनां लाभो हीच प्रार्थना.
माधव भोळे
No comments:
Post a Comment