कली युगात काय चाललंय काय?
नुकतेच एक बातमी वाचली. कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्यामधील धर्मस्थळ ह्या धार्मिक स्थळाची गोष्ट. ह्या ठिकाणचे मंदिर हे मंजुनाथ ह्या शंकर देवाचे मंदिर असून तेथे मधवा वैष्णव पुजारी असून हेगडे नावाच्या अतिशय श्रीमंत अशा जैन कुटुंबियांचे ताब्यात कारभारासाठी आहे.
गेले ८०० वर्ष ह्या ठिकाणी धार्मिक पवित्र कामे होत असून तेथे देश विदेशातून लाखो भक्तगण येतात आणि त्या देवस्थानाला करोडो रुपयांचे उत्पन्न आहे. अनेक भक्तांनी देवस्थानाकडे अनेक जमिनी दान केल्या आहेत. त्यांचे व्यवस्थापन ह्याच कुटुंबियांकडे आहे.
त्या देवस्थानामध्ये १९९५ ते २०१४ पर्यंत काम करणाऱ्या एका सफाई कामगारांने ३ जुलै २०२५ रोजी दोन ऍडव्होकेट ना घेऊन रंगीत फोटो च्या पुराव्या सहित, असा दावा केला की ह्या देवस्थानाच्या परिसरात गेल्या १९ वर्षात १०० हुन अधिक महिला, विद्यार्थिनी यांचेवर बलात्कार करून त्यांचा खून करून नग्न अवस्थेत त्यांना पुरण्याचे किंवा जाळण्याचे काम त्याला नाईलाजाने करावे लागले. त्यांनें याला विरोध केल्यास त्याला मारून टाकण्याची धमकी दिली गेली आणि दबावाखाली त्यांने हे काम केले असे तो म्हणतो. २०१४ ते आतापर्यंत तो तेथून पळून गेला आणि भूमिगत राहिला परंतु त्याचा अंतरआत्मा त्याला स्वस्थ बसून देत नव्हता. शेवटी त्याने वकिलांचा सल्ला घेऊन कर्नाटक पोलिसांकडे पुरावे सादर केले आणि त्याला संरक्षण देण्याची विनंती केली, कारण हेगडे कुटुंबिय खूप श्रीमंत असून त्यांची पोच वरपर्यंत आहे. ते त्याचा कधीही काटा काढू शकतात.
ह्या बाबती मध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ( SIT) स्थापन करून त्यांच्यातर्फे ह्या संपूर्ण नीच घृणास्पद कृत्याची चौकशी व्हावे अशी त्याने सरकारला विनंती केली. २००३ साली अनन्या भट नावाची मुलगी अशाच प्रकारे धर्मस्थळ येथे ट्रिप ला गेली असता गायब झाली होती आणि तिची आई सुजाता भट हिने तिचा खूप शोध घेतला आणि नंतर पोलिस तक्रार केली परंतू तिला अनेक धमक्या मिळाल्या मुळे तिने आपली तक्रार पाठी घेतली असे आज SIT पुढे झालेल्या जबाबात तिने सांगितले.
कर्नाटक महिला राज्य कमिशनच्या पत्रानंतर कर्नाटक चे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता ह्या प्रकरणासाठी SIT चौकशी लावली असून त्यामध्ये चौकशी सुरू झाली आहे.
या आधी महाराष्ट्रात शनि शिंगणापूर येथील रंजक कथा आपण वाचल्याच असाल ज्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शनि शिंगणापूर येथे २५८ कर्मचारी आवश्यक असताना २४६४ कर्मचारी काम करत आहेत असे दाखवून गेले १० वर्ष वाढीव कर्मचाऱ्यांचा पगार गायब होतो असे स्वतः फडणवीस म्हणाले आणि त्या विषयात चौकशी लावली आहे असे सांगितले.
श्रद्धाळु भक्त आपल्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आणि संपत्ती दान करीत असताना त्याची भर कोठे होते याचा विचार प्रत्येक देणगीदाराने करायला हवा. धर्मात सतपात्री दान धर्म करावा असे म्हटले आहे. ते पैसे जर सत्ताधिशांच्या आणि ठगांच्या खिशात जातं असतील तर त्या साठी उपाय योजना होणे आवश्यक आहे.
कलीला असाच सोडला तर एकदिवस तो सर्वांचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवायला हवे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment