स्वातंत्रता दिवस, भारत आणि आत्मनिर्भरता
नुकतेच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी दिल्ली मधील लाल किल्यावरून १५ ऑगस्ट २०२५ रोजी, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे खणखणीत भाषण केले. अर्थात स्वातंत्र्य दिन म्हटले म्हणजे आपल्या सर्वांची छाती अभिमानाने फुलून येते. बरोबर याच दिवशी १९४७ साली, ज्या सम्राज्यावरील सूर्य मावळत नाही असे म्हटले जायचे त्या ग्रेट ब्रिटनचा, लाल किल्यावरील युनियन जॅक असलेला झेंडा उतरवून त्या ठिकाणी सुदर्शन चक्र असलेला, भारताचा तिरंगा ध्वज मोठया अभिमानाने फडकू लागला. आपण एका जागतिक सम्राज्याच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. अर्थातच ही अतिशय आनंदाची बाब आहे.
पण कालच्या एका घटनेने ह्या स्वातंत्र्यावर नक्कीच विचार करायची वेळ आली आहे. २०१६ साली एस्सर ऑइल ह्या भारतीय कंपनीचे काही समभाग, रोसनेफ्ट ह्या रशियन कंपनीने विकत घेतल्यानंतर त्या कंपनीचे नांव नयारा एनर्जी असे झाले. ह्या कंपनीचा भारतातील वाडीनार, गुजरात येथे प्लांट असून ते रशियन ऑइल भारतात रिफाईड करतात आणि त्याची प्रॉडक्ट भारतात आणि जगभरात एक्स्पोर्ट करतात. त्यांच्या प्लांट मध्ये मायक्रोसॉफ्ट क्लाउड कोम्पुटिंगवर वेगववेगळी कॉम्प्युटर अप्लिकेशन चालवली जातात आणि त्यात मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर वापरली जातात.
युक्रेन आणि रशिया या मधील युद्धामुळे युरोपीयन युनियनने युद्ध समाप्तीसाठी दबाव म्हणून रशियन तेल खरेदीला बंदी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जे देश किंवा कंपन्या रशियन तेल विकत घेतील किंवा विकतील, किंवा रशियन सेवा विकत घेतील तर त्यांना इतर युरोपयन सेवा सुद्धा समाप्त कराव्या असे आदेश युरोपीयन युनियनने दिले आहेत.
अशा परिस्थितीमध्ये दिनांक २२ जुलै २०२५ रोजी मायक्रोसॉफ्टने नयारा एनर्जीची क्लाऊड सर्व्हिस बंद केली त्यामुळे त्या नयारा एनर्जीच्या वाडीनार रिफायनरी मधील मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरवर चालणारी काही कार्यें बंद पडली. अर्थात नयारा एनर्जीने त्यावर अमेरिकेत कायदेशीर दाद मागितली आहे कारण रशियन तेलावर ना अमेरिकेने बंदी घातली आहे ना भारताने बंदी घातली आहे मग अमेरिकन कंपनी भारतातील कंपनीची सेवा कशी बंद करू शकते?. मायक्रोसॉफ्टने नंतर ती सेवा देणे चालू केले परंतु तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कीं ह्या क्लाऊड कॉम्पुटिंग मुळे कोणतीही अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी अमेरिकेत बसून जगातील कोणाचाही गळा पकडू शकते हे त्यांनी सिद्ध केले. हे नवीन प्रकारचे साम्राज्य आहे. हे आहे क्लाऊड सॉफ्टवेअर साम्राज्य आहे आणि जे देश अमेरिकेचे सॉफ्टवेअर, क्लाऊड सर्व्हर वापरतील ते ह्या अमेरिकेचे गुलाम असतील. असाच प्रयत्न अमेरिका GMO ( genetically modified organism) बियाणे आणि प्रॉडक्ट भारताने विकत घेण्यासाठी दबाव टाकत आहे जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर वर्षानुवर्षे अवलंबुन राहाल.
याचाच अर्थ भारतातील कंपन्यांना दुसऱ्या कोणत्या देशावर अवलंबुन राहायचे नसेल तर भारतील वेबसाईट भारतीय सर्व्हर वर लाँच करायला हव्यात, भारतीय क्लाऊड सर्व्हर, भारतीय डेटा सेंटर्स, भारतीय सॉफ्टवेअर तयार करणे आवश्यक आहे.
ज्या वेळी चीनने स्वतःचे गुगल सारखे सर्च इंजिन ( बायडू ), स्वतःचे ऍमेझॉन ( अलीबाबा एक्सप्रेस ), स्वतःचे फेसबुक ( we Chat ), स्वतःचे X ( sina weibo ), स्वतःचे इंस्टाग्राम ( लिटील रेड बुक ), स्वतःचे चॅट जिपिटी ( डीप सिक ), स्वतःचे क्लाऊड आणि वेब सर्व्हर बनवले त्यावेळी सर्व जगाने त्यांना वेड्यात काढले पण आज वरील घटनेवरून भारताला धडा घ्यायला हवा.
आणि त्याच कारणामुळे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी हीच गोष्ट सांगितली कीं आपल्या देशाला अनेक विषयात आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे त्या पैकी वरील सॉफ्टवेअर आणि सर्व्हर, डेटा सेंटर्स हा एक महत्वाचा भाग आहे.
आज पर्यंत भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यानी अब्जो डॉलर रुपयांचा व्यवसाय केला परंतु हातांच्या बोटावर मोजण्या एवढ्या कंपन्यानी स्वतःचे सर्व्हर, क्लाऊड कॉम्पुटिंग इत्यादी इन्फ्राष्ट्रक्चर तयार केले आहे. बाकी सर्व कंपन्या परदेशींय इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि परदेशीय सॉफ्टवेअर कंपन्यानवर अवलंबून आहेत. बहुतेक सॉफ्टवेअर कंपन्या दुसऱ्या कंपन्यांचे कंत्राटदार म्हणून काम करतात.
अमेरिकन व्यवसायिक या बाबतीत कितीतरी पुढे आहेत. नुकतेच जानेवारी २०२५ मध्ये एआई चे अमेरिकेतील आणि जगातील सर्वात ताकदवान इन्फ्राष्ट्रकचर तयार करण्यासाठी ओपन एआई ( चॅट जिपिटी तयार करणारी कंपनी ), सॉफ्टबँक विजन फ़ंड ( वेंचर कॅपिटल फर्म) , ओरॅकल, MGX ( युएई स्थित एआई वर गुंतवणूक करणारी कंपनी ) आणि इतर पार्टनर्स ह्या कंपन्यानी एकत्र येऊन १०० बिलीयन डॉलर्स गुंतवणूक करून स्टारगेट नावाचे प्रोजेक्ट ( ए आई इन्फ्रास्त्रक्चर प्रोजेक्ट) सुरू केले आहे जे २०२९ पर्यंत पूर्ण होईल. त्यात पूर्णत्वापर्यंत सुमारे ५०० बिलीयन डॉलर्स ची गुंतवणूक त्यात होईल.
अमेरिकेत एक गोष्ट चांगली आहे, जेथे भरमसाठ गुंतवणूक लागते तेथे वेगवेगळे गुंतवणूकदार एकत्र येऊन सहकार्य करत वेगळी कंपनी स्थापन करतात आणि ते काम करतात. भारतात अशा एकत्र काम करणाऱ्या भारतीय कंपन्या किंवा कॉरपोरेटस मध्ये कमी बघायला मिळतात. कारण या साठी लागणारे आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक इंजिनिरिंग नावीन्य ( Financial engineering innovation ), कायद्याचे राज्य, समान उदिष्ट असलेली समज ( common understanding ), व्यवसायिक व्यवस्थापन ( प्रोफेशनल मॅनेजमेंट ) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांबद्दलचा विश्वास इत्यादी गोष्टींचा अभाव आहे.
जर भारताला जगातील एक आत्मनिर्भर, पुढरलेला देश आणि एक महत्वाची अर्थ व्यवस्था बनायचे असेल तर ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे.
माधव भोळे.
No comments:
Post a Comment