Thursday, August 21, 2025

ढोल ताशा आणि टाळ मृदूंग

ढोल ताशा आणि टाळ मृदूंग 


आज San Diego ह्या अमेरिकन शहरामध्ये तेथील महाराष्ट्र मंडळाचा ढोल ताशा पथक फोटो बघितला. पुण्यामध्ये गेले काही वर्ष ढोल ताशा पथकाचे फॅड वाढत चाललेले दिसते. पुण्यातील पहिले ढोल ताशा पथक १९६० साली अप्पासाहेब पेंडसे यांनी सुरू केले. विशेषत: गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकमध्ये सलामी द्यायला अशी पथके वापरली जातात. हल्ली या साठी काही कोर्सेस किंवा सराव क्लासेस सुद्धा घेतले जातात. असे म्हणतात पुण्यात किमान २५० ढोल ताशा पथके आहेत. तरुणाईचा जोश त्यात नक्कीच दिसून येतो. एकमेकातील चढाओढ नक्कीच असते.


पूर्वी ढोल ताशा पथकाचा उपयोग युद्धभूमीवर सैनिकांमध्ये युद्ध ज्वर निर्माण व्हावा, लढायला ऊर्जा मिळावी म्हणून तसेच धार्मिक आणि सामाजिक समारंभा मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून केला जात असे. 


पण ढोल ताशाचा आवाज बघता त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वयस्कर मंडळींना होणारा त्रास आणि कानाचा बहिरे पणा बघता राष्ट्रीय हरित ट्रीब्युनलने यावर मर्यादित संख्या ठेवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगीती दिली. 


एक ढोल ताशा साधारण १०४ ते १०५ डेसिबल पर्यंत ध्वनी निर्माण करतो तर एकत्रित पथक ११३ डेसिबल ध्वनी निर्माण करतो. सर्व साधारण माणसाला ० ते ७० डेसिबल पर्यंत ध्वनी  अतिशय सुसहाय आणि सुरक्षितपणे ऐकता येतो. त्या नंतर त्याच्या कानाला आणि अर्थात मेंदूला सुद्धा त्रास व्हायला सुरवात होते असे मेडिकल शास्त्र सांगते. जर ध्वनी १२० डेसिबल च्या वर गेला तर कानाचा पडदा हमखास फाटतो. अशा परिस्थिती मध्ये ढोल ताशा वाजवणे समाजासाठी किती सुसाह्य आणि सुरक्षित आहे याचा सर्व जनतेने विशेषतः तरुणाईने विचार करायला. असे म्हणतात तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. अर्थात हीच गोष्ट DJ ला सुद्धा लागू आहेच. म्हणून तर महाराष्ट्रात DJ ला कायदेशीर बंदी आहे. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय हरित त्रिब्युनलच्या निर्णयावर का स्टे दिला त्याचे कारण नक्की समजतं नाही. 


आम्ही परंपरा किंवा संस्कृती पाळण्याच्या नक्कीच विरोधात नाही पण आपला आनंद लुटताना दुसऱ्याचे नुकसान होणार नाहींना याची काळजी लोकशाहित अपेक्षित असते. नाहीतर कबुतरांना दाणे घालण्यावरून एव्हडा वादंग मजला नसता.


मला वाटते आपल्या परंपरेमध्ये धार्मिक समारंभ, भजन कीर्तन याठिकाणी फिरत असताना टाळ मृदूंग जास्त चांगला वापरला जाऊ शकेल, जेणेकरून भक्तिमय वातावरण सुद्धा निर्माण होईल आणि ध्वनी प्रदूषणाचा अतिरेक होणार नाही. मृदूंग ढोल ताशा एव्हडे ध्वनी प्रदूषण नक्कीच करीत नसते.


माधव भोळे 

No comments:

Post a Comment