इवलेसे रोप लावियले द्वारीं, तयाचा वेलू गेला गगनावरी.
( Wall Mart)
वॉलमार्ट हे नाव कदाचित सर्वानाच परिचित असेल
असे नाही, पण आपण डीमार्टचे नाव नक्कीच ऐकले असणार. वॉलमार्ट हे, डीमार्ट सारखेच, एक सर्वसामन्याला लागणाऱ्या
सामानाचा किरकोळ व्यापार करणारी भव्य डिपार्टमेंटल दुकान असलेली जगातली सर्वात मोठी
साखळी आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे माणूस काय करू शकतो याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
वॉलमार्ट कॉर्पोरेशन.
सध्याच्या वॉलमार्ट कुटुंबाचे आजोबा म्हणजेच
वॉलमार्ट चे संस्थापक “सॅम वॉल्टन” हे एका गरीब शेतकरी कुटुंबात १९१८ साली जन्मले.
२० व्या शतकाच्या सुरवातीला अमेरिकेत आलेल्या मंदीमुळे अनेकांची कंबरडी मोडली होती
त्यातीलच एक सॅमचे पण कुटुंब होते. सुरवातीला कुटुंबाला हात भर लावण्यासाठी घरच्या
गाईंचे दूध काढून, ते विकून, अगदी पेपर टाकण्यापर्यंत सर्व कामे या पठ्ठ्याने केली.
सॅमच्या अशा सुरवातीच्या खडतर काळामुळे आणि
नंतर अमेरिकेच्या मिलिटरी विभागातील कॅप्टन या हुद्द्यावरील त्याच्या गाठीशी असलेल्या अनुभवामुळे त्याने वयाच्या
२६ व्या वर्षी "बेन फ्रँकलिन व्हरायटी स्टोर्स" हे एक व्यवसाय चालू असलेले
डिपार्टमेंटल दुकान विकत घेऊन केली. २ जुलै १९६२ साली सॅम वॉल्टनने स्थापन केलेल्या
वॉलमार्ट कॉर्पोरेशनचे त्यांनी आणि त्याच्या पुढील वारसदारांनी, अब्जो रुपये महसूल
असलेले एक साम्राज्यच तयार केले. १९६२ पासून पुढील पाच वर्षात सॅमने २४ दुकाने उघडली.
१९८५ ते
१९९७ दरम्यान वॉलमार्ट स्टोर्स संख्या १९० वरून
८०० पर्यंत वाढली. नवनवीन दुकाने स्थापित करता
करता २०१९ पर्यंत त्यांनी फक्त अमेरिकेमध्ये ४,७६९ दुकाने स्थापन केली आणि या पैकी
३५३४ हि सुपरसेंटर आहेत. एखादे सुपर सेन्टर अंदाजे १,२०,००० वेगवेगळ्या वस्तू विकते.
२०१९ शेवट्पर्यंत जगभरात त्यांनी ११,७६६ दुकाने स्थापन केली आहेत.
अल्बानी, न्यूयॉर्क मधील, क्रॉसगेट्स कॉमन
या ठिकाणी वॉलमार्टचे सर्वात मोठे २,६०,००० स्क्वेर फूट (जवळ जवळ सहा एकर क्षेत्रफ़ळ
असलेले ) सुपरसेंटर डिपार्टमेंटल दुकान आहे. ३१ जानेवारी २०१७ ला वॉल मार्ट ची विक्री
४८५.९ बिलियन डॉलर, म्हणजेच बेल्जीयम देशाच्या ४६६ बिलियन डॉलर एवढ्या जीडीपी (ग्रोस
डोमेस्टिक प्रोडक्टस) पेक्षा जास्त होती. वॉलमार्ट आपल्या वेबसाईटवर म्हणते जगभरात
दर आठवड्याला २६ कोटी (इंडोनेशियाच्या २६ कोटी लोकसंख्येच्या जवळपास) ग्राहक त्यांच्या
दुकानांत खरेदी करतात. वॉलमार्ट हे जगातील सर्वात मोठी नोकरदारांची कंपनी आहे. त्यांच्याकडे २२ लाख लोक
काम करतात. आपल्याला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, पण ब्लूमबर्ग या आर्थिक उलाढालीवर
लक्ष ठेवणाऱ्या संस्थेनुसार, या कम्पनीचे मालक मिनिटाला ७०,००० डॉलर्स, म्हणजेच तासाला
४ मिलियन डॉलर्स आणि दिवसाला १०० मिलियन डॉलर्स (७४० कोटी रुपये) कमवतात. त्यामुळे
हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब बनले असून, या कुटुंबाची एकत्रित माया १९० बिलियन
डॉलर्स एव्हडी आहे.
त्याच्या यशाचे गमक म्हणजे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा
कमीतकमी किमतीत, दर्जेदार, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने ग्राहकां समोर आकर्षक पद्धतीने
मांडणे. अर्थात यासाठी योग्य खरेदी, आकर्षक मांडणी, ग्राहकांच्या विचारला प्राधान्य,
ग्राहक सम्पर्क आणि संवर्धन यासारखे आजकाल महत्वाचे असलेल्या अनेक विषयावर त्यांनी
सुरवातीपासून लक्ष केंद्रित केले. यासाठी प्रस्थापित संकल्पनांच्या
पुढे जाऊन त्यांनी स्वतःचे असे व्यवस्थापन तंत्र तयार केले. यातील काही दुकाने विशेष
वस्तूं उदारणार्थ किराणा सामान, औषधे, परिधान वस्त्र, लाकडी सामान, फोटोग्राफी सामान
यासाठी असतात तर काही दुकानांत या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. वॉलमार्ट स्टोअर
(ज्याला वॉल-मार्ट डिस्काउंट सिटी म्हटले जाते) मध्ये कमी किंमतीत अमेरिकन निर्मित
उत्पादनांचा पुरवठा करण्यावर भर दिला गेला.
वाल्टन एंटरप्राईजेस या त्यांच्या होल्डिंग
कंपनीमार्फत वाल्टन कुटुंबाकडे वॉलमार्टमध्ये फक्त 50% भागभांडवल असून बाकीचे भांडवल लोकांचे आहे. २०१८ मध्ये ह्या कंपनीने तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स लाभांश दिला. सॅम वॉल्टन यांची नात कॅरी वॉल्टन पेनर यांनी एके ठिकाणी लिहिले आहे “माझ्या आजी आजोबांना सॅम आणि हेलन वॉल्टन यांना
संधीचा फायदा कसा घ्यायचा माहित होते. तीन दशकांपूर्वी, माझे आजोबांना हे माहित होते की चांगले काम कुटुंबीयांनी एकत्र
येऊन करणे, त्यांच्या कुटुंबासाठी उपयुक्त आहे, ज्यामूळे अनेक लोक समूहांमध्ये आमूलाग्र
बदल होऊ शकतो”. २०१९ शेवटला वॉलमार्ट या कम्पनीचे मार्केट कॅपिटलायझेशन ३२६.८७ बिलियन
डॉलर एव्हडे आहे.
नवीन आव्हाने, नव्या दिशा:
व्यवसाय म्हटलं म्हणजे त्यात सात्यताने बदल
होत असतात. टेकनॉलॉजीच्या युगात तर त्यात फारच लवकर घडामोडी होत असतात. इंटरनेट चा
प्रसार जसजसा होऊ लागला तसतसा वॉलमार्टला एक मोठा प्रतिस्पर्धी वर्ग तयार झाला आणि
तो म्हणजे ऑनलाईन किरकोळ व्यापार. ५ जुलै १९९४, म्हणजे वॉलमार्टच्या स्थापने नंतर अंदाजे
३२ वर्षानंतर स्थापन झालेल्या Amazon.com या मार्केटप्लेस ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीने
वॉलमार्ट सारख्या अनेक ऑफ लाईन म्हणजे प्रत्यक्ष किरकोळ व्यापार करणाऱ्या कंपनींच्या
अस्तित्वालाच धोका निर्माण केला. २०१९ च्या
शेवटाला ऍमेझॉनच्या वेबसाईटवर ६० कोटी ६ लाख एव्हडी विविध प्रोडक्ट विकायला आहेत आणि
त्यांची एकत्रित विक्री ८७.४ बिलियन डॉलर ( वॉलमार्ट ची १२९ बिलियन डॉलर) आहे. वॉलमार्ट आपल्या डिपार्टमेंटल दुकाना द्वारे
फक्त ४ कोटी ६० लाख ७६ हजार एव्हडी प्रोडक्ट विकते. २००९ साली वॉलमार्टने सुद्धा wallmart.com
नावाने आपली वॉलमार्ट मार्केटप्लेस (ऑनलाईन शॉपिंग ) व्यवस्था सुरु करून त्याद्वारे
आपली आणि दुसऱ्याची प्रोडक्टस विकायला सुरवात केली असून सध्या वॉलमार्ट च्या वेबसाईटवर
३५ कोटी एव्हडी विविध प्रोडक्ट विकायला आहेत.
नवीन असून सुद्धा ३१ जानेवारी २०१९ ला ऍमेझॉनचे
मार्केट कॅपिटलिझेशन १ ट्रिलियन एवढे (म्हणजे वॉलमार्ट च्या तिपट्ट ) झाले आहे. कारण
कमी भांडवल आणि जास्त नफा असे या मार्केटप्लेस दुकानाचे गमक आहे. त्यामुळे लोकांना
ऍमेझॉन च्या शेयर्स पासून संपत्ति जास्त लवकर तयार होणार अशी आशा आहे. ऍमेझॉन चा
प्रमुख जेफ बेझोझ याची एकंदरीत मालमत्ता ११० बिलियन डॉलर एव्हडी आहे. याच व्यवसायातील
अलीबाबा एक्सप्रेसचे चिनी मालक जॅक मा सांगतात, “माझ्या वेबसाईट वर १ बिलियन डॉलर एव्हडी
वाढीव विक्री तयार करायला जेवढे भांडवल ओतायला लागते त्याच्या ८ ते १० पट जास्त भांडवल वॉलमार्टला तेव्हडिच वाढीव
विक्री तयार करायला लागेल. कारण त्यांना जागा, नोकर वर्ग, गोदाम, वगैरे सर्वच ठिकाणी
पैसे ओतावे लागतात या उलट मला २ कॉम्प्युटर सर्व्हर ज्यादा लावले कि माझे अर्धे काम
तेथेच होऊन जाते.”
माधव भोळे (स्रोत गुगल )
No comments:
Post a Comment