Sunday, August 13, 2023
आत्महत्या?
आत्महत्या? 😢😢
खरे म्हणजे मी या विषयावर कधीच प्रकट होत नाही. पण आज सकाळपासून फेसबुकवर आणि मेडिया वर सुप्रसिद्ध तरुण अभिनेता सुशांत सिह रजपूत याच्या आत्महत्येच्याबद्दल जो काही मारा चालू आहे, त्याबद्दल थोडेसे लिहावेसे वाटले म्हणून लिहितो. त्याच्याबद्दल नाही.
खरे म्हणजे ज्या फेसबुकवर मी आज लेख लिहीत आहे त्याचा उगमच मुळी मार्क झुकरबर्ग सारख्या अतिशय विचारी अश्या मनोवैज्ञानिकाकडून झाला. मार्क कदाचित या विषयातील डिग्री होल्डर नसेल परंतु माणसाला भावना असतात, त्या व्यक्त करायला, कोणाबरोबर तरी शेयर करायला एखादी जागा, एखादा गावाबाहेरचा कट्टा, एखादी मित्राची साथ किंवा एखाद्या प्रेयसीची कुस लागते हे तो जाणून होता आणि आहे.
भावनांचा हा चक्रव्यूह भेदण्यासाठी फेसबुक किंवा सोशल मीडिया सारखा चांगला पर्याय नाही. काही वेळा लोक त्याचा अतिरेक सुद्धा करतात पण ठीक आहे, होते असे कधी कधी. आज फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया असताना सुद्धा मनात आशा कोंड्या का तयार होत असतील?
त्याचे एक आणि मोठे कारण म्हणजे आपण पाहिलेली स्वप्ने आणि आपण आपल्या प्रगतीबद्दल मनात तयार केलेले आराखडे किंवा आलेख हे सुद्धा आहे. स्वप्न अनेक प्रकारची असतात आणि प्रगतीला सुद्धा अनेक व्याख्या असतात. प्रत्येकजण ती आपापल्या कुवतीनुसार ठरवत असतो.
स्वप्न असायलाच पाहिजेत, पण स्वप्न साकार होत नाहीत म्हणून त्यावर निराश होण्याचे काही कारण नाही. देवांनी माझ्या मनासारखेच सर्व करावे हा हट्ट आपण का करावा हेच मला कधी समजले नाही. मला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी मी माझ्या कुवतीनुसार हवे ते प्रयत्न,कष्ट, मेहेनत केली आहे आता प्रारब्धात असेल तर ते होईल. प्रारब्ध, दैव या सारखे शब्द याच कारणासाठी तयार गेले असावेत. सिकंदर, नेपोलियन किंवा हिटलर सारखी जगजेती मंडळी सुद्धा कोठेतरी हरलीच. मग आपण कोण आहोत. याचा अर्थ संत श्रेष्ठ तुकारामांसारखे "ठेविले अनंते तैसेचि रहावे" असा नसून जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आपण कोठेही कमी पडता कामा नये. पण वेळ आलीच तर नकार, किंवा अपयश पचवण्याची ताकद सुद्धा मनात आणि शरीरात हवी.
८४ लक्ष योनीतुन नरदेह एकदा मिळतो आणि तो चांगल्या रीतीने उपभोगता यावा त्याचा चांगल्या रीतीने उपयोग व्हावा यासाठी देवाने आपल्याला या पृथ्वी तलावावर पाठवले आहे त्या देवाचा अपमान असे आत्महत्या करून आपण करू शकत नाही.
ईच्छा असेल तर मार्ग जरूर आहे असे म्हणतात, कदाचित तो लांबून जाणारा असेल, कदाचित तो मार्ग शोधताना दुसरा मार्ग सापडेल. पण सतत काहीतरी करत रहा जेणेकरून आपण एकटे रहाणार नाही, आपल्या बरोबर काही काम करत चला, भले त्यात आर्थिक फायदा होवो, अथवा न होवो.
उद्याचा येणारा उषषकाल, आजच्या रात्रीच्या उदरातूनच येतो हे लक्षात ठेवा. कदाचित काही चुका अशा असतात ज्या सुधारू शकत नाहीत त्या विसरायला शिका त्यातच तुमचे आणि सर्वांचे भले आहे.
माधव भोळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment