Sunday, August 13, 2023
सत्तेचा माज: एक आठवण.
सत्तेचा माज: एक आठवण.
आपल्या पासपोर्टच्या पाठी एक शेरा असतो, इमिग्रेशन क्लियरन्स करायला पाहिजे कीवा नको. पूर्वी आखाती देशात जायचे म्हटले की इमिग्रेशन चेक करणे आवश्यक असायचे.
मला 1983 साली ऑफिस तर्फे दुबई ला जाण्याची पहिल्यांदाच संधी आली होती. साहेबांनी सांगितले, खिरा नगर, सांताक्रूझ येथे केंद्रीय कामगार खात्याचा एक विभाग आहे, आवश्यक ती पत्रे ऑफिसमधून घेऊन तेथे जाऊन तुझ्या पासपोर्टवर इमिग्रेशन क्लियर करून घे म्हणजे पुढील आठवड्यात तू दुबईला जाऊ शकतो. या सर्व प्रक्रियेला मी नवीनच होतो. खिरा नगर येथे सकाळी 8 वाजता गेलो तर तेथे माणसांची ही झुंड होती. जवळजवळ 500 ते 700 माणसे, त्यांचे एजंट, तेथे होते. तेथील एका क्लार्कला विचारून फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे आणि पासपोर्ट जोडून फॉर्म योग्य त्या खिडकीवर भरून दिला. आता दुपारी 4 वाजता पासपोर्ट छापा मारून मिळणार म्हणून जेवून चार वाजेपर्यंत तेथे आजूबाजूला वेळ काढला.
4 वाजता सुरू होणारे काम 4.30 ला सुरू झाले. मी लाईनमध्ये उभा होतो. शिपाई एकेक नाव पुकारत होता आणि लोक पासपोर्ट घेऊन जात होते. माझा पासपोर्ट ढिगाऱ्याखाली होता. प्रत्येक वेळी नवीन पासपोर्ट यायचे आणि माझा पासपोर्ट खालीच रहायचा. बघितले सर्व एजंट मंडळींचे पासपोर्ट पटापट क्लियर केले जात होते आणि आमच्या व्यक्तिगत सरख्यांचे पासपोर्ट खालीच रहात होते. तेथपर्यंत 6 वाजत आले आणि ऑफिस बंद व्हायची वेळ आली. मी नवीन असल्यामुळे मला वाटले की परत उध्या यायला लागते की काय? म्हणून मी तेथील अधिकाऱ्याला म्हटले सर आम्ही येथे 4 वाजल्यापासून उभे आहोत. माझा पासपोर्ट तुमच्या समोरच पडला आहे पण तुम्ही बाकीच्या मंडळींचे पासपोर्ट क्लियर करता आणि माझा खाली का ठेवला आहे? त्यावर तो अधिकारी भडकला. या सत्ताधारी मंडळींना असे प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. जर एकसारख्या विनवण्या, यस सर, यस सर केले तर त्यांना आणखीनच चेव येतो. सरकारी ऑफिसमध्ये, मूर्खासारखे जे होईल ते बघत बसल्याशिवाय पर्याय नसतो.
त्यांनी मला विचारले कुठे आहे तुझा पासपोर्ट? मी म्हटले बघा हा लाल स्टिकर लावलाय तो. त्यांनी तो पासपोर्ट घेतला. माझे नाव विचारले. मला वाटले हा आता सही करून देईल. त्याने शेवटचे पान काढले आणि त्या इमिग्रेशनच्या भागात भली थोरली फुल्ली मारून ठेवली आणि म्हणाला जा आता कुठे जायचे तिथे. आता तू कुठेही जाऊ शकत नाही. पासपोर्ट हातात घेतला आणि आपले काय नुकसान झाले ते लक्षात आले. अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये जाऊन साहेबाला सर्व गोष्ट सांगितली. साहेब अनुभवी होता. त्यांनी आमच्या ऑफिसचा एजंट थॉमस कुकला हे सर्व सांगितले. दोन दिवसांनी मला थॉमस कुकच्या अधिकाऱ्याबरोबर वरळी येथील मुख्य पासपोर्ट अधिकाऱ्या बरोबर भेटायला जायला सांगितले गेले. तेथे गेल्यावर पासपोर्ट अधिकाऱ्याने सर्व हकीकत समजून घेतली. त्यांनी खिरानगर मधील प्रमुख लेबर ऑफिसर ला फोन लावला आणि त्याचा कानावर सर्व प्रकार घातला आणि मग आपल्या अधिकारात, माझ्या पासपोर्ट वर इमिग्रेशन कॅलियरन्सचा छापा मारला. सर्व कागदपत्रे बरोबर होतीच.
ते 8 दिवस एवढे टेन्शन मध्ये गेले की विचारून सोय नाही. बरे अशा प्रश्नाला काळ हेच उत्तर असते.
म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. सूर्य पश्चिमेला उगवतो तर होय म्हणायला लागते.
माधव भोळे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment