Sunday, January 15, 2023

अमुल मधील वादळ

10.01.2023 अमुल मधील वादळ. आज एका अनपेक्षित घटनेमध्ये गुजरात को ऑप मिल्क मार्केटिंग फेडरशन ( अमुल ) ह्या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री आर एस सोधी यांना अमुल मधील 40 वर्षाच्या नोकरी नंतर तडकाफडकी कामावरून काढून टाकले. गेले 12 वर्ष ते मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पहात आहे. 1946 साली धवल क्रांतीचे जनक मिल्कमन डॉ. वर्गीस कुरियन ह्यांनी सूरवात केलेल्या "कैरा डिस्ट्रिक्ट को ऑप मिल्क प्रोड्युसर युनियन" ह्या संस्थेचे पुढे महाकाय गुजरात को ऑप मिल्क मार्केटिंग फेडरशन (अमुल ) मध्ये रुपांतर झाले. डॉ कुरियन वर्गीस यांनी निवडलेले श्री आर एस सोधी 1982 साली फक्त रू. 1450 महिना पगारावर रुजू झाले त्यावेळी अमुलचा टर्न ओव्हर फक्त 121 कोटी रुपये होता. ते 2010-11 साली मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवडले गेले त्या वेळी अमुलचा टर्न ओव्हर फक्त 9774 कोटी रुपये होता. तोच 2022-23 ला म्हणजे फक्त 12 वर्षात 72,000 कोटी रुपये एव्हढा आहे. अमुल मध्ये 1 कोटी साठ लाख गवळी , 28 स्टेट मार्केटिंग फेडरेशन मधील 222 जिल्ह्यातील 1,85, 903 को. ऑप सोसायटी मधून दूध संकलन करतात आणि ती जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक संस्था आहे. त्यांची 2000 प्रकारची विविध उत्पादने असून त्यातील 50 सोधी मॅनेजिंग डायरेक्टर असताना लॉन्च झाली. सोधि जयपूर च्या अग्रिकलचर कॉलेज चे इंजिनियर आणि इन्स्टिट्युट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आनंद चे पहिल्या ब्याच चे एम बी ए. ही संस्था सुध्दा डॉ. वर्गीस कुरियन यांनी अमुल मार्फत स्थापन केली. त्यांच्या अचानक काढून टाकण्या मागे नक्की कारण समजले नाही परंतु सोधीं म्हणतात माझी 5 वर्षाची मुदत 2 वर्षापूर्वीच संपली होती आणि मला 2 वर्ष मुदत वाढ दिली होती. पण त्यांच्या सर्व्हिस टर्मीनेशन पत्राचा रोख वेगळाच वाटतो असे जाणकार म्हणतात. अगदी अशाच प्रकारे ह्याच फेडरेशनने आपले या आधीचे अध्यक्ष आणि अमुलचे एके काळचे सर्वेसर्वा धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचेवर 2006 साली अविश्वास ठराव आणला होता आणि त्यांनी 35 वर्षाच्या सेवेनंतर नाईलाजाने राजीनामा दिला. बरेच वेळा फेडरेशन मधील सत्ता संघर्ष आणि राजकारण असे या मागचे कारण असू शकते. माधव भोळे.

आदिवासी आणि वनवासी यातील फरक.

आदिवासी आणि वनवासी यातील फरक. भारतात आदिवासी ह्या विषयाला विशेष महत्व आहे. आदिवासी म्हणजे जे भारतातील मूल निवासी. असे म्हणतात साधारण, 4,000 वर्षापूर्वी भारतात आर्यन संस्कृती आली. लोकमान्य टिळक लिहितात (ओरायन ग्रंथ), "या पूर्वी आर्य उत्तर ध्रुवाजवळ रहात होते. वेदांची उत्पती त्या ठिकाणी झाली. त्यानंतर त्यातील काही टर्की आणि इराक जवळील युफ्रेस्टस नदी किनारी मेसोपोटेमिया येथे राहायला आले तर काही सिंधू नदी जवळ राहायला आले. दोघेही वैदिक संस्कृतीचे पालक. युफ्रेट्स जवळील वेदांना खालवियन वेद असे म्हणतात." त्यापूर्वी भारतात द्रविडी संस्कृती होती आणि त्या पूर्वी येथे द्रविड पूर्व संस्कृती होती. भारतातील आदिवासी हे ह्या द्रविड पूर्व संस्कृतीचे वंशज आहेत ज्याला आपण tribal किंवा Normadic tribes असे म्हणतो. द्रविडी लोक रावणाला मानतात रामाला मानत नाही. राम आर्य होता तर रावण अनार्य होता. दंडकारण्याच्या दक्षिणेकडील भाग हा बहुतेक द्रविड लोकांनी भरला होता तर उत्तरेकडे आर्य जास्त होते. ( देवरूखे स्वतःला पंचद्रविड ब्राह्मण म्हणून मानतात.). अर्थात द्राविदानी सुध्दा नंतर वेद स्वीकारले. सर्व आदिवासी वनात किंवा जंगलात रहात नाहीत. त्यामुळे सर्व आदिवासी वनवासी होत नाहीत. उदा. जे आदिवासी वाळवंटात राहतात ते वनवासी होऊ शकत नाहीत. त्यामुळे सर्व आदिवासी वनवासी होऊ शकत नाहीत. तसेच सर्व वनवासी आदिवासी असतीलच असे नाही. माधव भोळे

एकच ध्यास! रत्नागिरी जिल्ह्याचा विकास!!

एकच ध्यास! रत्नागिरी जिल्ह्याचा विकास!! महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतिशील राज्य मानले जाते. त्यात रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे अथांग समुद्र आणि स्वच्छ किनारे, डौलदार वळणाच्या नागमोडी खाड्या, उंचच उंच डोंगर, हिरवीगार वनसंपदा, बारमाही वाहणारे धबधबे, लहान मोठ्या नद्या आणि मुख्य म्हणजे प्रदूषण मुक्त वातावरण. काय नाही ते सांगा इथे? मग एव्हढे करून रत्नागिरी जिल्हा प्रगती पथावर का नाही? आपल्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल हा प्रश्न माझ्याप्रमाणेच सर्वानाच पडलेला असेल!! आपल्या सुपीक तांबड्या जमिनीवर तयार होणारी फळ आणि फुल संपदा ह्याचा आपण विकास करायला हवा. आंबा, काजू ह्या पारंपरिक पिकांबरोबर काळीमिरी, लवंग, दालचीन सारखे मसाल्याचे पदार्थ, बांबू, करवंद, कोकम ह्या विषयात आपण व्यवसायिक लागवड करायला हवी. बांबूचे कोंब माकडे खातात तर ते फुटल्यानंतर त्याला कडुलिंबाच्या तेलाचा एक हात ब्रशने मारावा आणि पावसाळ्यात वर प्लास्टिक बांधावे म्हणजे वानर, माकडे खाणार नाहीत आणि किडही लागणार नाही. एकदा बांबू 1 ते 1.5 फुटाचे वर गेला की मग तो माकडे खात नाहीत. डोंगर उतारावर आपले पावसाळी पाणी झटकन ओसरून जाते, त्याठिकाणी मोठमोठाली शेततळी बांधून त्यातून किंवा बोअरच्या साहाय्याने ड्रिप इरिगेशन व्यवस्था करून पोफळीच्या बागा वाढवायला हव्यात आणि त्यावर काळी मिरीचे आंतरपीक घ्यायला हवे. त्यामुळे आपले वार्षिक उत्पन्न वाढेल. वानर आणि माकडे काळी मिरी खात नाहीत. शेडनेट च्या सहायाने सिझनला वेलवर्गीय भाजीपाला, भोपळी मिरची सारखे रोख उत्पन्न घेता येते. सणासुदीच्या सिझन मध्ये झेंडूची फुले चांगली कमाई करून देतात जे अगदी डोंगर उतारावर सुध्दा होते आणि माकडे खात नाहीत. ज्या ठिकाणी इरिगेशन ची व्यवस्था होऊ शकत नाही अशा ओसाड जमिनीमध्ये आयन, किंजळ, भेळा, बांबू अशी जंगली झाडे लावावीत, त्याचे उत्पन्न साधारण 10 वर्षात तयार होते. त्याला पाणी द्यावे लागत नाही. साग 20 वर्षानंतर तयार होतो तो म्हातारपणाचा प्रोवीडांट फंड आहे. आमच्या गावात एकाने 5000 साग लावले आहेत, 10 वर्षात फार उंच आणि मजबूत झाले आहेत. आपल्या कोकणात चंदनाचे सुध्दा झाड होते पण लहान असताना माकडांपासून थोडी निगा राखायला हवी. एकदा मोठे झाले की ती खात नाहीत. आपल्या जिल्ह्यात असलेल्या शेती मदतनिसांचा आपण उपयोग करून घेत नाही. सरकारी योजना भरपूर आहेत पण आम्ही लाभ घेत नाही. कित्येक जमिनी सामाईक असतात, त्यावर ना हरकत प्रमाण पत्राअभावी काही कामे रखडतात. आमच्या पैकी कित्येकांनी आपल्या जमिनीचे परीक्षण करून आपल्या झाडांना काय खते लागतात, काय मायक्रो न्युट्रियांट्स लागतात याची माहिती घेतलेली नाही. कोणी सांगेल तसे किंवा दुकानदार सांगेल ते खते आणि औषधे वापरतात. जिथपर्यंत आपण मोठे जमीन तुकडे आणि व्यवसायिक गुंतवणूक करणार नाही तेथपर्यंत त्याच्या आर्थिक गणिताचा ताळमेळ बसणार नाही. त्यासाठी वेळ पडल्यास सामूहिक शेती करता येईल का हा विकल्प पण विचारात घ्यायला हवा. आपण सर्व प्रश्नांना एकच उत्तर, प्रश्न विचारून देत आलो आहोत. "वानर आणि माकडांचा खूप त्रास आहे बंदोबस्त कसा करायचा ते आधी सांगा?". जी फळे आणि झाडे माकडे खात नाहीत त्यावर भर द्यावा. थोडी फार राखण ठेवली तर माकडांचा त्रास कमी होतो. फूड प्रोसेसिंग ह्या विषयात आपण फार पाठी आहोत. कोकम सरबत, अंबावडी, फणस पोळी, फारफार तर लोणची ह्या पलीकडे आपण अजूनही गेलो नाही. आपली आंबा कॅनिंग कपॅसिटी कमी असून आपला बहुतेक माल गुजरात मध्ये जातो. आपला बहुतेक काजू गोवा आणि केरळ मध्ये प्रोसेसिंगला जातो. आंबा, फणस, काजू, कोकम, आवळा, करवंद, जांभूळ ह्यापासून अनेक पदार्थ तयार होऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे जाम, मोरंबे, चुंदा, बर्फी, सरबते इत्यादी पदार्थ तसेच सर्व प्रकारचे पापड, फेण्या, कुरडया इत्यादी वाळवणाच्या पदार्थाना खूप मागणी आहे. तसेच सर्व प्रकारच्या पिठाना, नाचणी सत्त्व ह्या पदार्थाना शहरात खूप मागणी आहे. त्यासाठी योग्य कमिशनवर लोक घरगुती विक्री करायला तयार आहेत. पण त्याला आधुनिकतेची सुध्दा जोड हवी. महिला बचत गट एकत्र येवून या विषयात महत्वाची कामे करू शकतील. फक्त भारताचे फूड प्रोसेसिंग मार्केट 25 लाख कोटी रुपये आहे. हापूस हा आंब्याचा राजा समजला जातो. हापूस ची चव जगात उत्कृष्ट आंब्याची चव मानली जाते. भारतात 1500 प्रकारचे आंबे तयार होतात. त्यातील 1000 प्रकारचे आंबे व्यवसायिक उत्पादन देतात. भारतात एकंदर 200 लाख मे. टन आंबा उत्पादन होते पैकी सर्वात जास्त उत्तरप्रदेश मध्ये 40 लाख टन होते तर सर्वात कमी महाराष्ट्रात 5,66,000 मे. टन होते म्हणजे संपूर्ण भारताच्या सुमारे 2.5%. पेप्सी, कोका कोला, पार्ले सारख्या कंपन्यांना त्यांच्या माझा, फ्रूटी, सारख्या आंबा पेयांमध्ये लाखो टन आंब्याची गरज आहे. एकटा कोका कोला माझा पेयासाठी वर्षाला 70,000 मेट्रिक टन आंबा भारतातून विकत घेतो. आपल्या जिल्ह्यात डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ,दापोली, कॉलेज ऑफ ऍग्रिकलचर, दापोली, कॉलेज ऑफ फोरेस्ट्री दापोली, डेअरी आणि ऍनिमल हजबंड्री शाखा, दापोली आहे. त्याच विद्यापीठाच्या अंतर्गत भाट्ये नारळ संशोधन केंद्र आहे, शिरगाव येथे मत्स्य व्यवसाय आणि मत्स्योत्पादन कॉलेज आहे. सावर्डे येथे गोविंदराव निकम कृषी कॉलेज, दहीवली, चिपळूण येथे शरद पवार कृषी कॉलेज, शरद पवार कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि होरटीकलचर सुध्दा आहे. ह्या सर्व ठिकाणी तयार झालेले विद्यार्थी आपल्याला शेतात काम करताना दिसत नाहीत. ते शहरात नोकरीला जातात. यातील उच्च शिक्षित कधी बँकांच्या अग्रिकलचरल लोन डिपार्टमेंट मध्ये नाहीतर पीक विम्याच्या कंपन्यांत किंवा शेतीविषयक केमिकल विकणाऱ्या कंपन्यांत काम करतात. शहरात 10 x 12 ची भाड्याची खोली असली तरी चालेल पण बाप जाध्यानी 5 एकर जमीन आणि मोठे घर ठेवले असेल ते नको. त्याची दोन कारणे एक म्हणजे रोख पैसा आणि दुसरी म्हणजे विवाह समस्या. आपण सरकारी योजनांचा लाभ पूर्णपणे घेत नाही. भाऊबंदकी मुळे आपल्या कित्येक जमिनी ओसाड आहेत. ह्यासाठी समाज म्हणून आपण एकत्र यायला हवे. आपल्या खाडी किनारच्या जमिनी सुध्दा ओसाड आहेत. त्यात मत्स्योत्पादन विषयक शेती करायला हवी. आपण खारे आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन सुध्दा करू शकतो. जगाची मत्स्योत्पादन मागणी 228 बिलियन डॉलर ची आहे त्यापैकी भारताचा वाटा फक्त 7.7 बिलियन डॉलर एवढाच आहे. आपण कलचर्ड मोत्याची शेती करू शकतो. त्याला जगात खूप मागणी असून हे उत्पन्न 15 ते 18 महिन्यात तयार होते. तसेच रंगीत ( ऑर्नामेंटल ) माश्यांची पैदास करून ती शहरात किंवा परदेशी विक्रीस पाठवू शकतो. जगात 322 मिलियन डॉलर चा ऑर्नामेंटल फिशचा व्यवसाय आहे त्यात भारत फक्त 3.22 मिलियन डॉलर एक्सपोर्ट करतो तर सिंगापूर सारखा छोटा देश 62 मिलियन डॉलर करत आहे. अलीकडे आपल्या जिल्ह्याने पर्यटन क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. परंतु आपल्या भागातील रस्ते आणि दळणवळणाची साधने सुधारायला हवी. कोकण रेल्वे च्या फेऱ्या वाढवायला हव्यात तसेच त्यात चिपळूण, रत्नागिरी साठी विशेष डब्याची सोय हवी. एस टी च्या सेवेचा दर्जा सुधारायला हवा. प्रत्येक रेल्वेगाडीला कनेक्टिंग पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय हवी. खात्रीशीर आणि वक्तशीर टुरिस्ट गाड्या आणि टुरिस्ट टॅक्सीची खूप आवश्यकता आहे. भारताच्या इतर भागात ही सोय खूप चांगली आहे पण कोकणात वक्तशीर आणि खात्रीशीर पणाची कमतरता आहे. यातील बऱ्याच गोष्टी ऑनलाईन वर मिळायला हव्यात. त्याचीं योग्य पारदर्शक माहिती इंटरनेटवर / वेबसाईट वर उपलब्ध हवी. तितका प्रोफेशनलपणा अजून आपल्याकडे आला नाही. आपल्याकडे कमीत कमी माहिती देण्याचा कल आहे. त्यामुळे विश्वासार्हता कमी होते. कोकणातील खाड्यामध्ये केरळ प्रमाणे हाऊस बोट किंवा बोटिंगची सफर करण्याची सोय तेथील तालुका किंवा गाव पातळीवर झाली तर कोकण सारखे नंदनवन जगात कोठे असणार नाही इतके आपले कोकण सुंदर आहे. फक्त नेत्यांवर अवलंबून विकास होणार नाही. यातील कोणत्याही बाबतीत स्वतः पासून सूरवात करायला हवी दोष देणे बंद करून स्वतः सुधारणा करायला हवी. ह्या बाबतीत प्रत्येक ग्राम सभेने ह्या वर काही विशेष सभा घेवून गावात रोजगार निर्मिती कशी होईल, पीक पाणी, शेती उत्पन्न या बाबत विचार करायला हवा. गणपती, शिमगा, वाडीची पूजा, गावची जत्रा अशावेळी येणाऱ्या चाकरमान्यांसमोर यातील एक दोन सभा व्हायला हव्यात. जिथपर्यंत हे होणार नाही तेथपर्यंत गावातून शहराकडे जाणारा लोंढा आटणार नाही. जय रत्नागिरी, जय महाराष्ट्र, जय भारत माधव भोळे

Saturday, January 7, 2023

ब्राह्मण समाजापुढील आव्हाने !!

ब्राह्मण समाजापुढील आव्हाने !! ब्राह्मण समाज हा विद्वान समाज म्हणून ओळखला जातो. पूर्वीच्या काळात राजांचे सल्लागार, खोत, कारभारी, चिटणीस, टिपणीस, सरदार अशी पदे ह्या समाजाला मिळाली होती. एकेकाळी ब्राह्मणांना राजाश्रय होता. शेतीसाठी जमिनी होत्या. आज कुळकायद्यामध्ये ब्राह्मणांची शेती गेली. राजाश्रय तर सोडाच पण उलट विशिष्ट वर्गाला आरक्षण दिल्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता कमी झाली. शिक्षणाचे बाजारीकरण केल्यामुळे आणि महागाईमुळे शाळा कॉलेजमध्ये भरमसाठ फी वाढ झाली, मेरिट सोडून जातीला महत्व आले आणि त्यामुळे चांगल्या शाळा कॉलेजमधील प्रवेशास अडचणी येवू लागल्या. ह्या सर्व विषयात इतर समाजाला विविध सवलती प्राप्त झाल्या आहेत पण त्या ब्राह्मणांना उपलब्ध झाल्या नाहीत. पारंपरिक भिक्षुकी शिक्षण आणि व्यवसायात रस कमी झाला. त्यामुळे एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या ब्राह्मण वर्गाला आपला संसार कसा चालवायचा हा मोठा प्रश्न सर्वसामान्य ब्राह्मण समाजाला पडला आहे. आजपर्यंत धंदाउद्योग केला नसल्यामुळे त्याबद्द्ल मनात असलेल्या शंका कुशंका सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन नाही. धंदा व्यवसायात लागणारी लवचिकता, संधीशोधक वृत्ती ह्याबद्दल घरातून संस्कार नाहीत. आम्ही सर्वच रामशास्त्री बाण्याचे असल्यामुळे वेळ पडल्यास नुकसान करून घेवू पण तत्व सोडणार नाही हा आमचा हेका म्हणा किंवा तत्व म्हणा ह्या मुळे आम्ही मागे पडत चाललो आहोत. त्यातून जर व्यवसाय करायला गेलो तर आमच्या समाजाकडून प्रोत्साहन नाही, उलट तो कसा नुकसानीत येवू शकेल अशाप्रकारचे पाय खेचणारे अनाहुत सल्ले दिले जातात. इतर समाजाप्रमाणे आमची कोणतीही व्यापार विषयक संघटना नसल्यामुळे आम्हाला व्यापारी वर्गातून पाठिंबा कमीच. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला विवाहासाठी आपली मुलगी द्यायला लोक तयार नाहीत कारण त्यांना त्यांच्या व्यवसायाची खात्री वाटत नाही. ( म्हणजे जी नोकरी दुसऱ्याचा व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाची खात्री वाटते पण आपल्या मुलांच्या व्यवसायांबद्दल खात्री नाही. बघा किती विरोधाभास आहे?). मान्य आहे सर्वच किर्लोस्कर होऊ शकत नाहीत पण मेहेनत केल्यास आणि उत्तम गुणवत्ता राखल्यास एखादा पणशीकर किंवा चितळे सुध्दा होऊ शकतो हे सुध्दा समजून घ्यायला हवे. मुळात जे पाहिजे ते मिळवण्यासाठी जी जिद्द लागते, जी मेहेनत लागते, ती करण्याची मानसिक तयारी नाही कारण आमचा एक गोड गैरसमज आहे की आम्ही बुद्धिजीवी आहोत, बुद्धिवान आहोत त्यामुळे आम्ही फक्त बुध्दीचीच कामे करणार. त्यामुळे आम्ही मागे पडत चाललो आहोत. प्रगती नाही असे नाही, पण इतर समाजाच्या प्रगतीच्या वेगाच्या मानाने आमची प्रगती कमी वाटते. ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान ह्या उक्तीचा योग्य तो अर्थ आम्हाला समजला नाही. आणखी एक प्रश्न सर्व समाजांना भेडसावत आहे जो ब्राह्मण समाजालाही भेडसावत आहे. तो म्हणजे विवाह समस्या. आपल्या समाजात इतर समाजाप्रमाणेच मुला मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जेवढ्या अपेक्षा जास्त वाढल्या, तेव्हढे विवाह होण्याचे विकल्प कमी होत आहेत. विवाहाबद्धल विचार करण्याच्या पद्धती बदलल्यामुळे विवाहासंबंधी कलह वाढून सुख, शांती, समाधान भंग पावत चालले आहेत. शिक्षणाचा हा अनपेक्षित परिणाम म्हणायला हवा. अनादी काळापासून राष्ट्र उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान अमूल्य आहे. अनेक वेळा राष्ट्रहितासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. अन्याय आणि अत्याचार या विरुद्ध भगवान परशुरामाचा आदर्श ठेवून त्यांनी स्वात्र्यंत्र लढ्यात आपले प्राण पणाला लावून स्वतः ला झोकून दिले आहे. असे असताना एकेकाळी इतर समाज जो ब्राह्मणांना आदर देत होता तो आदर आजकाल कमी होऊन उलट कोणाच्या पूर्वजांनी काय केले त्याचा आढावा घेवून तेच तेच जुने विषय चघळत ठेवून ब्राह्मण विरोधी वातावरण तापवण्याचा पद्धतशीर प्रयत्न काही विशिष्ट राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून केला जातो आहे. त्यासाठी अगदी दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी, महापराक्रमी पेशवे, लोकमान्य टिळक, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे या सारख्या विभुतींवर सुध्दा शिंतोडे उडविण्यास ही मंडळी कमी करत नाहीत. अनाजी पंत, कवी कलश, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या सारख्या मंडळींच्या नावाचा वापर करून ब्राह्मणांना झोडपणे आणि आपली राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पोळी भाजून घेणे एव्हढेच काम ही मंडळी अगदी खालपासून वरपर्यंत करत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअँप सारख्या समाज माध्यमांवर हे ज्ञाती कलहाचे विषबीज पद्धतशीर पणे पेरले जात आहे. समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्यास जे काही लागेल ते सर्व ही मंडळी करत असतात, जेणेकरून काही विशिष्ट गटाची मते आणि सहानुभुती त्यांना मिळेल. अशी अनेक आव्हाने ब्राह्मण समाजासमोर आहेत. ह्या समस्या आणि आव्हाने यावर उपाययोजना काय आहेत ह्यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो, परंतु थोडक्यात सांगायचे झाल्यास, ब्राह्मणांनी आपली शैक्षणिक घोडदौड अशीच चालू ठेवावी, त्यासाठी समाजाने आपल्या शैक्षणिक संस्था आर्थिकदृष्ट्या आणि व्यवसथापकीय दृष्ट्या बळकट करायाला हव्यात. संस्थांची शैक्षणिक किंवा अन्य येणी असतील तर समाजाने जागरूक राहून ती येणी वसूल करण्यास संस्थांना मदत करायला हवी. आपल्या पाल्याला व्यवसायाचे बाळकडू घरातूनच द्यायला सुरवात करायला हवे. नोकरी घेणारे होण्याऐवजी नोकरी देणारे बनायला हवे. सामाजिक संस्थांनी औपचारिक शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यायला हवा. व्यवसायिकांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विशेष कार्यक्रम आखणे इत्यादी गोष्टीना संस्थांनी महत्व द्यायला हवे. व्यवसायिकांकडे नफेखोर किंवा गुन्हेगार या विचाराने न बघता, त्यांना योग्य व्यक्ती असल्यास त्यांच्या अडचणीच्या वेळी जशी जमेल तशी मदत करायला हवी. मेहेनतीला पर्याय नाही. तुम्ही कितीही बुद्धिमान असाल पण लोकांना सांभाळून, त्यांना विश्वासात घेवून, त्यांच्या सहकार्याने टीम वर्क म्हणून काम करायला शिकायला हवे. उच्चनिचता हा विचार डोक्यात न आणता, जे पडेल ते काम करायला शिकायला हवे. व्यवसायात किंवा इतर ठिकाणी सुध्दा लागणारी लवचिकता अंगी बाणवायला हवी. उगाचच रामशास्त्री बाणा नको. सामाजिक किंवा अन्य टीकेला बळी न पडता, आणि त्यांच्या आरोपांचे खंडन करण्यात वेळ न घालवता तो वेळ आणि ताकद आपल्या ध्येयपूर्तीसाठी खर्च करायला हवी. बोलणारे बोलत राहतील, काम करणारे पुढे जातील हे लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य अथवा कृती करू नये त्याचे परिणाम कधीच चांगले असणार नाहीत. जे काम हातात घ्याल ते पूर्णत्वास नेण्यासाठी लागेल ते कष्ट, त्याग करण्याची तयारी आणि मनाचा खंबीर पणा हवा. समाजात एकजूट असेल तर कोणीही आपले वाकडे करू शकत नाही हे लक्षात घ्या. जैन, पारशी समाजाकडे बघा. सबंध भारतात जैन लोकांची लोकसंख्या 44 लाख आहे म्हणजेच भारताच्या लोकसंख्येचा 0.4% आहे पण त्यांची आर्थिक आणि सामाजिक शक्ती एव्हडी मोठी आहे की विमान कंपन्यांत सुध्दा जैनांसाठी वेगळा शाकाहारी मेनू आहे. तर पारशी समाजाची लोकसंख्या एक लाखाच्या आत म्हणजेच 0.06% एव्हढीच आहे पण उद्योगधंदे, वकिली, व्यापार ह्या क्षेत्रात ते बरेच आघाडीवर आहेत. ब्राह्मणाची लोकसंख्या अंदाजे 6 कोटी 5 लाख म्हणजे जवळजवळ 4.6% आहे. तरी आपण कच का खातो ह्यावर नक्कीच विचार करायला हवा. फक्त स्वतःसाठी न जगता समाजासाठी काहीतरी करायला हवे अशी भावना प्रत्येक ब्राह्मणात येईल त्याचवेळी एक समाज म्हणून आपण पुढे जावू. माधव भोळे

Wednesday, January 4, 2023

माधव भोळे यांचा थोडक्यात परिचय

माधव भोळे यांचा थोडक्यात परिचय जन्म : गिरगाव, मुंबई, 18.01.1955 वास्तव्य : मालाड, मुंबई शाळा: चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल. 1971 SSC batch. कॉलेज: इंटर सायन्स पर्यंत एल्फिन्स्टन कॉलेज, फोर्ट, मुंबई आणि पुढे बी. एस. सी. ( Statistics / Mathematics ) के. सी कॉलेज, चर्चगेट, 1976. पुढे एम. एस. सी. कॉम्प्युटर सायन्सचा पदवीधारक. नंतर कॉम्प्युटर आणि इनफरमेशन टेक्नॉलजी विषयातील विविध सर्टिफिकेट कोर्सेस केले. नोकरी: पहिली नोकरी 1977 ला आय. आय. टी., मुंबई, पवई येथे कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून. बँकिंग, फायनांशियल, ईआरपी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ह्या विषयात, विविध कंपन्यांमध्ये, विविध पदांवर नोकऱ्या केल्या. नोकरीनिमित्त अमेरिका, शारजाह, दुबई, स्पेन ह्या ठिकाणी काही काळासाठी वास्तव्य केले. त्या नंतर उच्यशिक्षित लोकांसाठी राष्ट्रीय आणि आंतररष्ट्रीय स्तरावर १० वर्ष प्लेसमेंट सर्व्हिसेसचा व्यवसाय केला. छंद: सामाजिक कार्याचे बाळकडू वडील कै. गणेश रामकृष्ण भोळे आणि आतेभाऊ कै. नारायण सखाराम वीरकर, डोंबिवली यांचेकडून मिळाले. १९७९ साली विद्यार्थी सहायक संस्थेतर्फे प्रथमच विद्यार्थी पुस्तक पेढीची योजना मांडून कार्यकर्ता म्हणून सुरवात केली ती सर्व सहाकाऱ्यानी मिळून एकंदर ३५ वर्ष चालवली. १९८१ साली विद्यार्थी सहायक संस्थेमध्ये कै. लक्ष्मणराव भोळे अध्यक्ष असताना सर्वात तरुण विश्वस्त म्हणून प्रथमच बिनविरोध निवडून आलो. त्या नंतर एकंदर ३७ वर्ष ह्या संस्थेशी सक्रिय निगडित असून नोकरी निमित्त बाहेर गावी जायला लागल्यामुळे वेगवेगळ्या वेळी, विश्वस्त मंडळात काम विश्वस्त म्हणून केले. देवरूखे युवा ह्या संघटनेचा संस्थापक सदस्य. २००३ साली श्री लक्ष्मी मल्लमर्दन प्रासादिक मंडळ, मुबई ह्या वीर, तालुका चिपळूण ह्या संस्थेत सचिव म्हणून सुरवात केली आणि ७० वर्ष जुने भव्य मंदिर दुरुस्त करून त्या मंडळाचा शानदार शतकमहोत्सव, २०१३ साली आणि ७०० वर्ष जुन्या ६ फूट उंच मूर्तीचा वज्रलेपन आणि अर्चा विधी सोहोळा २०२२ साली सहकाऱ्यांच्या मदतीने साजरा करत गांगाजळीत मोलाची भर घातली. अजूनही ह्या संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहे. २०१२ साली कै. राम गणेश निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधीचा सचिव म्हणून काम कामाला सुरवात केली आणि संस्थेच्या भरीव प्रगतीला हातभार लावला असून अजूनही कार्यरत आहे. २०१८ साली निवृत्त झाल्यानंतर लिखाणाला सुरवात केली आणि आतापर्यंत विविध विषयात मराठी आणि इंग्रजी मधून जवळपास १५० चे वर हौस म्हणून लेख लिहिले आहेत. हे लेख फेसबुकवर नेहमी प्रसिद्ध होत असतात. माधव भोळे.

Saturday, December 24, 2022

आर्टिफिशयल इंटीलिजनस - ओपन ए. आय. चाटबॉट ( OpenAI ChatGPT )

आर्टिफिशयल इंटीलिजनस - ओपन ए. आय. चाटबॉट ( OpenAI ChatGPT ) काल एक बाजूचा मुलगा, यू टयुब वर एक व्हिडिओ बघत होता. मी सहज विचारले काय रे काय बघतोस? तो म्हणाला एक नवीन चाटबॉट आला आहे. चाटबॉट म्हणजे प्रश्नोत्तरे करणारा प्रोग्राम. हल्ली आपण कोणत्याही कंपनीच्या वेबसाईटवर गेलात तर उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात एक प्रश्र्नोतर करणारी खिडकी आपोआप उघडली जाते. पहिला प्रश्न येतो, "May I help you?". मग जसे एखाद्या कंपनीची रिसेप्शनिस्ट प्रश्नोतर करत आपल्याला मार्गदर्शन करते तसे ह्या खिडकीतून आपल्याला मार्गदर्शन होते, त्या त्या प्रोग्रामच्या भागाला चाट बॉट असे म्हणतात. चाट बॉट म्हणजे गप्पा मारणारा रोबोट. Robot चा शोर्टफोर्म bot, म्हणून चाटबॉट. हा चाटबॉट त्याला लिहून ठेवलेल्या, ठराविक प्रश्नांची, ठराविक उत्तरे देतो. हा अगदी प्राथमिक आर्टिफिशयल इंटीलिजनस ( AI ). झाला. असाच एक चाटबॉट ओपन ए. आय. नावाच्या कंपनी ने काढला आहे त्याचे नाव आहे "Chat GPT". नुकतेच त्याचा बेटा (मार्केट पूर्व) अवतार बाजारात आला आहे. ही ओपन ए. आय. नावाची कंपनी म्हणजेच ओपन आर्टिफिशयल इंटीलिजनस ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) तयार करणारी कंपनी आहे. तिची मूळ संकल्पना, सॅम अल्टमेन आणि इतर ४ अमेरिकन तंत्रज्ञांनी काढली असून त्यातील एक आहे एलोन मस्क ( होय तोच एलोन मस्क ज्याची टेस्ला इलेक्ट्रिककार ची आणि स्पेसएक्स नावाची अंतराळ यान बनवण्याची कंपनी आहे आणि जो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे ). या सर्वांनी मिळून सुमारे 1 बिलियन डॉलर ह्या कंपनीमध्ये गुंतवले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयाचा, मानवी जीवनासाठी जास्तीत जास्त उपयोग होण्याच्या दृष्टीनं विकास करणे हे तिचे उदिष्ट आहे. सध्याच्या कॉम्प्युटरच्या युगात पुढची पायरी म्हणजे आर्टिफिशियल इंटीलिजनस ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि मशीन लर्निग ( यंत्राचे शिकणे ). जसे आपण लहान असताना एक एक पायरी वर चढायला शिकतो आणि मोठेपणी खाली न बघता आपोआप जिना चढून वर जातो, कारण आपल्या मेंदूने ती पायरी चढण्याची प्रक्रिया शिकलेली असते, तशीच एखादी गोष्ट किंवा प्रक्रिया कॉम्प्युटर ला शिकवली जाते त्याला मशीन लर्निग म्हणतात. ह्या मध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ( लिखाणाचा किंवा संभाषणाचा किंवा त्यातील सूचनांचा खरा अर्थ समजावून घेतले जाणारा प्रोग्राम ) च्या सहायाने प्रथम आपण लिहिलेला प्रश्न किंवा सूचना समजावून घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याबाबतीत कॉम्प्युटरकडे असलेल्या ज्ञानाचा ( पूर्वीची गोळा केलेली माहिती ) उपयोग करून आपणास उत्तर दिले जाते. ह्या विषयाला आर्टिफिशियल इंटीलिजनस आणि मशीन लर्निग ( AI / ML ) असे म्हणतात. आता ह्या आर्टिफिशियल इंटीलिजनस विषयात अनेक कंपन्या काम करत असून त्यातील एक आहे ओपन ए. आय. तर ह्या चाट जीपिटी ( Chat GPT) ला त्या मुलाने गणिताचे काही कठीण प्रश्न प्रोग्रामिंग मध्ये सोडवायला सांगितले तर त्याने चक्क प्रोग्राम कोड च तयार करून दिला जो बरोबर होता. त्या नंतर त्याने त्या प्रश्नात थोडा बदल केला तर लगेच त्याने कोड बदलून नवीन कोड दिला. त्या मुलाला उत्सुकता वाटली म्हणून त्याने सूचना केली की मला शाळेत महात्मा गांधींवर एक प्रेझेंटेशन करायचं आहे, तर लगेच त्याने प्रेझेंटेशन च्या 5 / 6 स्लाईड ला लागणारा मजकूर तयार करून दिला. त्या मुळे आणखीनच उत्सुकता वाढली. तो मुलगा म्हणाला मला गांधी, ओबामा, मेसी ह्यांचेवर एक नाटकाची स्क्रिप्ट हवी आहे तर त्यांनी नाटकाच्या स्क्रिप्ट प्रमाणे गांधी, ओबामा, मेसी यांच्यातील जवळजवळ खरा वाटेल असा संवाद तयार केला उदा. "गांधी म्हणाले जगात शांततेचा भंग होत चालला आहे! ओबामा म्हणाला आपण काय करू शकतो? गांधी म्हणाले ओबामा तू एक अत्यंत ताकदवान राष्ट्राचा अध्यक्ष आहेस, आपली ताकद वापरून तू शांती प्रस्थापित करू शकतोस. मग मेसी तेथे येतो, तो म्हणतो ह्या विषयात स्पोर्ट्सला खूप महत्व आहे. स्पोर्ट्स मुळे लोक एकत्र येतात. स्पोर्ट्स मुळे आपण आपसातील वाद कमी करू शकतो..." अशा आशयाचे स्क्रिप्ट तयार करून दिले. ते फार सुंदर आणि भावनात्मक होते असे नाही पण हा चाट बॉट आपली ताकद दाखवू शकला. त्याला आणखी सुधारले तर तो आणखी चांगले काम करेल हे नक्की. मुलाने "ज्येष्ठ लोकांसाठी एक आकृती बनवून त्यात कोणते रंग घालू? असा प्रश्न केला" लगेच उत्तर आले, ज्येष्ठांची नजर कमकुवत असते, त्यांना जास्त भडक रंग टाकले तर बघायला किंवा वाचायला त्रास होतो. तू फिके रंग टाक जसे की फिकट हिरवा. एकाने त्याला सांगितले अमुक अमुक अल्गोरिथम ( सूत्र ) मला डोनाल्ड ट्रंपच्या पद्धतीने समजावून सांग, लगेच चाट बॉट डोनाल्ड त्रंप च्या बोलण्याच्या पद्धतींत उत्तर देतो, "माझ्या पेक्षा हा अलोगोरिथम आणखी चांगला कोणीही समजावू शकत नाही". अशा विविध प्रश्नांची किंवा सूचनांची विविध उत्तरे किंवा प्रक्रिया, त्यांचे विविध आयाम लक्षात घेवून हा चाट बॉट देतो. ह्या कंपनीचे आणखी एक प्रोडक्ट आहे डेले 2 जे आपल्या सूचनेनुसार एखादे चित्र काढते, रंग भरते, त्यात सूचनांप्रमाणे सुधारणा करते, त्याचे आकार बदलते. एलोन मस्क सद्या ह्या कंपनीच्या बोर्ड किंवा डे टु डे कारभाराशी निगडित नाही कारण त्याची टेस्ला कंपनी सुध्दा "विना चालक" गाडी बनवते आहे ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप वापर होतो जसे की गाडी सिग्नलला आपोआप थांबते, आपली गाडी पुढील गाडी पासून सुरक्षित अंतरावर ठेवते, पुढच्या गाडीचा स्पीड कमी झाला तर स्वतःचा वेग कमी करते, रस्त्यावर सांगितलेल्या नकाशा प्रमाणे गाडी वळवते किंवा चालवते इत्यादी. ह्या सर्व ठिकाणी AI चा वापर होत असल्यामुळे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ नये म्हणून त्याने त्याच्या ओपन ए. आय. कंपनीतील बोर्ड सीट चा राजीनामा दिला परंतु गुंतवणूक काढून घेतली नाही. शिवाय ही कंपनी कशी चालवावी ह्या बाबतीत सुध्दा इतर भागीदारांबरोबर त्याचे मतभेद झाले. त्याचे मते हे तंत्रज्ञान कितीही चांगले असेल तरी त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि जसे की ऑटोमेशनमुळे नोकऱ्या जाऊ शकतात, खरया सारख्या वाटणाऱ्या खोट्या बातम्या तयार करून निवडणुकात गोंधळ तयार केला जाऊ शकतो, शस्त्रांचे ऑटोमेशन वाढू शकते, खाजगी आयुष्य उध्वस्त होऊ शकते, चुकीचा डेटा असेल तर चुकीचे सूत्र वापरून चुकीचा परिणाम मिळू शकतो अशा अनेक विषयात त्याचा गैर वापर होऊ शकतो. ह्या गैर असंस्कृत वापरला त्याचा पूर्ण विरोध आहे. तो या बाबतीत नेहमीच सावधान करण्याचा प्रयत्न करत असतो पण म्हणून आर्टिफिशयल इंटीलिजनस चे महत्व तो कमी समजत नाही. ह्या विषयात पुढे घोडदौड सुरूच राहणार आहे. माधव भोळे.

The Universal Declaration of Human Rights:

The Universal Declaration of Human Rights: 1. We are all free and equal. We are all born free. We all have our own thoughts and ideas. We should all be treated in the same way. 2. Don’t discriminate. These rights belong to everybody, whatever our differences. 3. The right to life. We all have the right to life, and to live in freedom and safety. 4. No slavery – past and present. Nobody has any right to make us a slave. We cannot make anyone our slave. 5. No Torture. Nobody has any right to hurt us or to torture us. 6. We all have the same right to use the law. I am a person just like you! 7. We are all protected by the law. The law is the same for everyone. It must treat us all fairly. 8. Fair treatment by fair courts. We can all ask for the law to help us when we are not treated fairly. 9. No unfair detainment. Nobody has the right to put us in prison without a good reason and keep us there, or to send us away from our country. 10. The right to trial. If we are put on trial this should be in public. The people who try us should not let anyone tell them what to do. 11. Innocent until proven guilty. Nobody should be blamed for doing something until it is proven. When people say we did a bad thing we have the right to show it is not true. 12. The right to privacy. Nobody should try to harm our good name. Nobody has the right to come into our home, open our letters or bother us or our family without a good reason. 13. Freedom to move. We all have the right to go where we want in our own country and to travel as we wish. 14. The right to asylum. If we are frightened of being badly treated in our own country, we all have the right to run away to another country to be safe. 15. The right to a nationality. We all have the right to belong to a country. 16. Marriage and family. Every grown-up has the right to marry and have a family if they want to. Men and women have the same rights when they are married, and when they are separated. 17. Your own things. Everyone has the right to own things or share them. Nobody should take our things from us without a good reason. 18. Freedom of thought. We all have the right to believe in what we want to believe, to have a religion, or to change it if we want. 19. Free to say what you want. We all have the right to make up our own minds, to think what we like, to say what we think, and to share our ideas with other people. 20. Meet where you like. We all have the right to meet our friends and to work together in peace to defend our rights. Nobody can make us join a group if we don’t want to. 21. The right to democracy. We all have the right to take part in the government of our country. Every grown-up should be allowed to choose their own leaders. 22. The right to social security. We all have the right to affordable housing, medicine, education, and child care, enough money to live on and medical help if we are ill or old. 23. Workers’ rights. Every grown-up has the right to do a job, to a fair wage for their work, and to join a trade union. 24. The right to play. We all have the right to rest from work and to relax. 25. A bed and some food. We all have the right to a good life. Mothers and children, people who are old, unemployed or disabled, and all people have the right to be cared for. 26. The right to education. Education is a right. Primary school should be free. We should learn about the United Nations and how to get on with others. Our parents can choose what we learn. 27. Culture and copyright. Copyright is a special law that protects one’s own artistic creations and writings; others cannot make copies without permission. We all have the right to our own way of life and to enjoy the good things that “art,” science and learning bring. 28. A free and fair world. There must be proper order so we can all enjoy rights and freedoms in our own country and all over the world. 29. Our responsibilities. We have a duty to other people, and we should protect their rights and freedoms. 30. Nobody can take away these rights and freedoms from us.