Sunday, January 5, 2025

विश्रांती

 २.१.२०२५

विश्रांती 

काल एका फार प्रसिद्ध अशा नटाबद्दल पोस्ट वाचली. नाटक सुरू असताना अचानक तों पूर्ण ब्लँक झाल्यामुळे नाटक अचानक थांबवावे लागले. होय शरद पोंक्षे ह्या गुणी नटाच्या बाबतीत असे घडले. झाले तें नक्कीच दुर्दैवी आहे. पण यातून काही धडा घेणे आवश्यक आहे म्हणून लोकांचा विरोध पत्करून सुद्धा ही पोस्ट लिहित आहे. 


शरद पोंक्षे अत्यंत गुणी आणि स्पस्ट वक्ते नट आहेत. त्यांची अनेक मते मला पटत नाहीत त्यामुळे त्यांचा मीं चाहता नसलो तरी त्यांच्या सद्गुणानचा मला आदर आहे. 


साधारण ५ वर्षांपूर्वी तें एका मोठ्या दुर्धर आजारातून बरे झाले. त्या नंतर त्यांनी परत कार्यक्रम, व्याख्यान, नाटके यांचा धडाका सुरू केला. वास्तविक ५८ वर्ष हे काही फार मोठे वय नाही परंतु आजाराची पार्श्वभूमी बघता प्रत्येक शरीराला आणि त्या पेक्षाही मनाला विश्रांतीची गरज असते. 


शरीर हे मशीन नाही. अहो मशीन सुद्धा जास्त वापरले की बिघडते आणि वापरले नाही तर गंजते मग शरीराचे काय? तें तर आपल्या अवलिया ईश्वराने जगातील सर्वात उत्कृष्ट बनवलेले सर्वात कमी ऊर्जेवर चालणारे, सर्व वेगवेगळ्या सिस्टीम अतिशय सुरळीत आणि एकत्रितपणे चालणारे अप्रतिम अतुलनीय मशीन आहे. ज्या मध्ये मन नावाचा एक अदृश्य भाग आहे.


यां अशा अप्रतिम मशीनवर आपण तुटे पर्यंत ताण दिला की तें बिघडणारच. त्यात त्याला आजाराची पूर्व पार्श्वभूमी असेल तर तें जपूनच वापरायला हवे. पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते आणि आनंद मिळतो म्हणून त्याच्या वापराचा अतिरेक होता कामां नये. हे फक्त शरद पोंक्षे यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच लागू आहे. 


प्रत्येकाची काम करण्याची, ताण सहन करण्याची एक मर्यादा आहे. ति ओळखुन त्याने योग्य ति विश्रांती घेणे आवश्यक आहे. वानप्रस्थाश्रमाची कल्पना याचाच एक भाग आहे. म्हणून तर संत मंडळी म्हणतात 

"ठेविले अनंते, तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान". पण ह्या उक्तीचे अनेक चुकीचे अर्थ लोकांनी काढले. याचा अर्थ असा नव्हे की आपण आपल्या प्रगतीसाठी काही करू नये. जरूर करायला हवे पण आपल्या मर्यादा ओळखून काम करायला हवे. 


माधव भोळे 


ज्ञाती संमेलने आणि त्याची आवश्यकता

 ज्ञाती संमेलने आणि त्याची आवश्यकता 


मनुष्य हा समूहाने राहणारा प्राणी आहे. आपल्या भारतीय ज्ञातींमध्ये वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळे कार्यक्रम, मेळावे, संमलने घेतली जातात. त्यामध्ये आपल्या मंडळींना आपले विद्याभ्यास, कला, खेळगुण यातील नैपूण्य सादर करण्याची संधी मिळत असते. विद्यार्थी संमलानातून आपल्या शैक्षणिक कामगिरी बद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. आपला, आपल्या पाल्याचा बहुमान / सत्कार व्हावा हे सर्व पालकांना वाटत असते. 


पण अलीकडे एक अशी प्रथा झाली आहे की काही ठराविकच लोक अशा संमेलनाला उपस्थित रहातात. आपल्या पाल्याला जर बक्षीस असेल तर आपण उपस्थित रहातो नाहीतर नाही. अनेक लोकांना ह्या ज्ञाती संमेलनाना उपस्थित रहाणे म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो. जशी काही त्यांना ज्ञातीची गरजच उरली नाही. ठीक आहे आज गरज नाही असे वाटत असेल पण ज्या वेळी गरज वाटेल त्यावेळी तुम्ही साद घालाल त्यावेळी लोक पण तसाच विचार करतील. 


तुम्हीच विचार करा, तुमच्या पाल्याचा सत्काराच्या वेळी कोणीतरी त्याचे कौतुक करावे, टाळया वाजवाव्या असे तुम्हांला वाटते मग दुसऱ्या पाल्याच्या वेळी तुम्ही नको का टाळया वाजवायला हजर? समाज हा टू वे ट्राफिक आहे. 


काल एक ओळखीचा मित्र भेटला होता. गेले काही दिवस तों खूप आजारी होता. तरी धापा टाकत जिना चढत तों विध्यार्थी संमेलनाला आला होता. त्याला विचारले की तू अतिशय आजारी होतास तर का आलास? तर त्याने सांगितले की "माझ्या मुलाला येथे बक्षीस आहे आणि त्यावेळी मीं नसेन तर त्याला कसे वाटेल. त्याच्या बालवयात त्याचे कौतुक मीं करायलाच हवे. मग पुढे तों किती मोठा झाला तरी ति सर त्यावेळी येणार नाही". हे ऐकून मला पटले की अशी संमेलने वेळोवेळी व्हायलाच हवीत आणि त्यात लहान थोर ज्ञाती बांधवानी उत्स्फूर्त भाग घ्यायलाच हवा. 


काल ज्यावेळी गौतम अदानी ह्यांचे हस्ते डी. गुकेश ह्या नवीन जागतिक बुद्धिबळ पटूचा सत्कार केल्याचा फोटो मीं बघितला त्यावेळी मला फार आनंद झाला. गुकेश चे आई वडील दोन्ही डॉक्टर असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलाच्या उपजत गुणांना वाव दिला आणि त्याचे फळ आज त्यांना मिळाले. 


ज्ञाती बांधवानी आपल्या तसेच इतर विद्यार्थ्यांना , कलाकारांना, खेळाडूना उपस्थित राहून प्रोत्साहन दिले तर असेच जागतिक दर्जाचे नागरिक तयार होतील ही आशा.


माधव भोळे 


Wednesday, January 1, 2025

कोकणातील स्पेशल टेस्टी खमंग पदार्थांची यादी

*कोकणातले स्पेशल टेस्टी खमंग पदार्थ यादी ..*
------------------------------------------------------------------- 

कोकणातील स्पेशल टेस्टी खमंग पदार्थांची यादी खालीलप्रमाणे 👇

1) शिरवळ्या(शेवया) व नारळाचे दूध
2)सोलकढी
3)रायवळ आंब्याची आमटी
4)घावन,आंबोळ्या
5)बटाट्याची कापं,कच्च्या केळ्याची,सुरणाची कापं
6)अळूवाडी व अळूचे फतफते
7)गुळपोहे
8)तिखट मिरची चुरडून केलेले पोहे
9)उकडीच्या पोळ्या, पुरणपोळीसारखे गव्हाच्या लाटीत तांदूळाची उकड घालून पोळी करणे ही आमरसाबरोबर खातात
 10)कोळाचे पोहे,
 11)सांदण, 
12)पातोळे,
13) ओल्या फेण्या.
 14) कोळाच भरीत ( वांग्याचे)
 15)कडधान्याच्या पाण्याचं कळण,
 16)फणसाच्या पु-या,
 17)भोपळ्याचे घारगे,
 18)काकडीचे (तवसाचे) घावन.
19)रायवळ आंब्यांचे कोयाडं.
 20)दडपे पोहे,उकड,
 21)पावसाळ्यात मिळणारी भारंग भाजी
 22)केळफूल भाजी,
23) आठळ्या भाजी, ( फणस बिया) (गोड ,तिखट)
 24)आंबोळी,
 25)फणसाच घावन घाटलं
26) चांदीवड्याच्या पानावरच्या फेण्या
 27)फणसा चा रस काढून केलेली सांदण
28)ऋषी पंचमीची भाजी
29 मोकळं भाजणी
 30)पंचामृत, घारगे,
 31)तिखटामिठाचा शिरा,
32) घावन व नारळाचे दूध 
33)फोडणीची पोळी,
34)पोळीचे लाडू
 35)तांदुळाच्या साल पापड्या ,
36)गव्हाचा चीक,
37)पंचामृत,
38)कायरस,
39)दिंड,
40)कडबू, 
41)उकडीच्या पोळ्या,
42)फणसाची भाजी,
43)केळफुलाची भाजी..
 44)फणसाच्या आठीळांची खेड ,
 45)गोवलाच्या पानांच्या अळूवडीसारख्या वड्या, 
46) गरे घालून केलेली कढी, 
47)पडवळाच्या बीयांची चटणी, 
48)आंब्याचं रायतं,
 49)सगळ्या प्रकारच्या फळभाज्यांची भरीतं,
 50)मोदक,तूप व नारळाचं दूध  
51)पारोशाची भाजी/भजी इ.इ.
 52)कुळीथ पिठलं..
 53)मेतकुट ,तूप,गुरगुट्या भात ..
54) सुधारस
 55) हळदी च्या पानावर थापून उकडलेली पानगी
 56)खापराची पोळी आणि त्याच्याबरोबर नारळाचं दूध गूळ घातलेलं
 57)बिंबलाचे लोणचे,
 58)मनगणं,
59) रस शेवया.
 60)ओल्या फेण्या बरक्या फणसाचे गरे घालून केलेली कढी
 61)फणसाचं सांदण,
 62)खांडवी
 63)ओल्या काजुची उसळ, 
64)अंबाडे फळाची उड्ड मेथी, चटणी, लोणचे
 पाटवड्या,
 65)राघवदासाचे लाडू, आंबोळी.
 66)भोपळ्याचे घारगे
 67)भोपळ्याच्या सालींची चटणी,  
68)उकड कडबोळी
 भारंगीची,
69)कुवाळीची,खडकतेऱ्याची भाजी
 70)कापे गऱ्यांची खीर
 71)निवगऱ्या,
72)सांज्याच्या पोळ्या,
 73)घोळीची भाजी
74) तांदूळाची पेज,
 75)रातांब्याच बियांच सार ,
76)खापर पोळी,
 77)वेसवार ,
 78)कापा फणसा चे पिकलेले गरे, उभे चिरून त्याला साखर मीठ मोहोरी लाल सुकी मिरची घालून केलेली भाजी
79)बरक्या फणसाचे गर घालून केलेली कढी
 80))मिरगुंड
 81)पोह्याचे पापड
82) फणसाचे तळलेले काप
83) आंबापोळी
 84)तांदूळ चिकवड्या,
 85)लाल तांदूळाचा भात, 
86) वालाची उसळ,
 87) तांदूळ भाकरी, 
88)पोह्याचे डांगर
 89)गव्हल्याची खीर
90) पावटे किंवा कुळिथाची आठीळ्या घालून उसळ .
91) कैरीचे नारळाचा रस घालून केलेले सार
92) भारंगी ची भाजी , 
93) उडीदाच्या पापडाच्या डांगराच्या लाट्या, 
94)कच्च्या कुयरिची(छोटासा कोवळा फणस) 
95) भिजवलेले शेंगदाणे व सांडगे मिरची तळून भाजी.
96) जमिनीत अंकुरलेल्या हिरव्या काजुची भाजी 
97) गोड आमसूले, आमसूलाच्या वड्या, 
98) बिमलं, करमल यांची उड्डामेथी, चटणी, लोणचे, 
99) काळ्या वाटण्याची उसळ व वडे 
100) पातोळे . ---- कोकणी खाद्यसंस्कृतीमधला अजून एक आगळावेगळा पदार्थ . कोकणी पदार्थात तांदूळाला महत्त्वाचे स्थान आहे .खुपशा पाककृती या तांदूळाभोवती फिरत राहतात .                                  
         पातोळ्यांचे घटक पदार्थ - तांदूळाचे जाडसर पीठ , तवशाचा कीस ( जुन मोठी काकडी साधारण एक किलो वजन ) , गुळ पाऊण किलो , हळदीची पाने साधारण १८-२० .अर्धा चमचा मीठ .
           काकडीच्या बिया काढून काकडी किसुन घ्यावी.एका मोठ्या पातेल्यात तुपावर कीस परतुन घ्यावा .काकडी किसल्यावर त्याला पाणी सुटते ते सुद्धा यात वापरावे .नंतर यात गुळ मिसळावा .थोडे मीठ घालावे .गॕसवरच गुळ मिसळून घ्यावा .गॕस बंद करून मिश्रण गरम असताना त्यात तांदूळाचे पीठ चांगले मिसळुन घ्यावे .हे मिश्रण साधारणपणे दोन तास भिजू द्यावे . नंतर हळदीचे पानाला तुपाचा हात फिरवावा .पानाच्या अर्ध्या भागात भिजवलेले पीठ थोडे जाडसर थापावे आणि उरलेले अर्धे पान त्यावर घडी घालावे .जास्ती जाड करू नये .नीट शिजत नाही .अशी सर्व पाने लावून घ्यावी .
              इडली पात्रात तळाशी पाणी घालावे .त्यात एक चाळण ठेवावी .चाळण पाण्यात बुडणार नाही याची खबरदारी घेणे . चाळणीत मध्यभागी एक तांब्या उपडा ठेवावा .त्याच्या कडेने ही पाने उभी लावावी .साधारणपणे आठ ते दहा .(छायाचित्रे पहावी .म्हणजे योग्य कल्पना येईल .) साधारण पंधरा मिनिटे शिजवावे . पाच मिनिटांनी वाफ जिरल्यावर झाकण उघडून पातोळे बाहेर काढावे .बरोबर तोंडी लावायला भरपूर तुप आणि कैरीचे लोणचे .               
             तवसे मिळाले नाही तर कोणतीही जुन काकडी वापरलेली चालते . पण तवशाचा स्वाद काही वेगळाच .
101) गवसणी ची पोळी..हा पदार्थ मी केवळ ऐकला आहे, कधी खाल्ला नाही. माझ्या आईनी सांगितल्या प्रमाणे हि पोळी आमरसा बरोबर खायला करतात..जसे पुरणपोळी करताना, गव्हाच्या कणकेत पुरण भरून पोळी करतात तसे ह्या पोळी मध्ये गव्हाच्या कणकेत तांदुळाची उकड भरून हि पोळी करतात.
102) कुळथाचे कळण आणि उसळ
Ravyach(Rawa tupawar khamanga bhajun) kanheri.Panyatil,tup,jire ,mith,Pani ghalun keleli.Kanheri.
Pachayla sopi.
103) 
अंबाडीची भाजी लुप्त झाली आहे,बहुतांश भाजीवल्याना सुद्धा ही पालेभाजी माहिती नाही,जी लसूण आणि मुगाची डाळ घालून अतिशय उत्तम लागते
104) घोळीची भाजी,
 105) पोह्याच्या पीठाचा दुध-गुळ घालून केलेला मधल्या वेळी खाण्यासाठी केलेला लाडू 
106) देवदिवाळीला कोकणात नैवेद्याला घारगे करतात.साजूक
तुपातला शिरा करुन त्यात कणीक घालून तळायचे.अप्रतिम
लागतात.
107) आठळ्या पावटे भाजी, भाजून पावटे घातलेली पाऱ्याची भाजी, अळूची देठी 2 प्रकारची, देठी गाठी भाजी, घाटले, कच्च्या आंब्याचे सार, गोड गुळाचे पोहे, गूळ घालून केलेली शिकरण, अनेक प्रकारची भरीत, रायते आणि कायरस, भाजणीतील शेवग्याच्या शेंगा, तिखट गोड घारगे, गुळाची सांजा पोळी, डाळिंबी सोबत कॉम्बिनेशन असलेल्या भाज्या उदा. पडवळ, दुधी,तोंडली घोसाळे etc घालून केलेली. काही विशिष्ट तूप जिऱ्याच्या फोडणीत केलेल्या भाज्या, मेथी,अळू,अंबाडी ची डाळ कण्या घालून केलेली गोळा भाजी, आंबोळ्या v नारळाचे दूध, मोकळ भाजणी, वाटली डाळ, घट्ट उकड हे माझ्या माहितीतले विस्मरणात गेलेले पदार्थ, आई मावशी यांना विचारले तर त्या अजून खूप,माहीत नसलेली नावे सांगतील
108) लुप्त होत चाललेले चित्पावनी खाद्य पदार्थ:

खाली दिलेले खाद्यपदार्थ आम्ही आमच्या खाद्यसंस्कृतीतून हद्दपार करीत
पुढच्या पिढ्यांना आम्ही न्यूडल कमी ड्रायफुड ची दिशा दाखवीत .
असे हे पदार्थ एक वेळ पोटाची भूक म्हणी खात सलो. आज ती खाद्यसंस्कृतीची एक विविधता म्हणून पुढल्या पिढ्यांसमोर ठेवायला किमान हरकत नाही. 

१. कायरस : 
२. सुकृण्डे: म्हटले सारखा सुखरून्डे (सुक्कीना उंडे ) मुग्गांची डाळ किंवा चण्याच्या डाळीचे दर वर्षी श्राद्ध /महालयाला मुद्दाम करीत असत. इतर वेळी करीत नाहीत.
३.पानगा/पाने : 
४. पिठलां :
५. चुलीवरली भाकरी : अताशा भाकरी गॅसवर भाजसत. तांदळाच्या पिठाची उकड करून, केळीचे पानावर थापटुन, चुलीवर भाकरी भाजीत असतांना ओले कपड्याने पाणी फिरवनी भाजलेली भाकरी खूसखुशीत होते. भाजनी चुलीत घालून फुगवलेली भाकऱ्याची चवच वेगळी. 
६. तांबडे तांदुळाची पेज अणि बरोबर खारतली आंबाडी.
७.टायकिळेची भाजी.
८. उकड आंबाडेचां रायतां 
९. आंकुराची भाजी अणी सांबारां.
१०. लापशी: 
११. तांदुळाची उकड : 
१२. कर्मलाचां लोणचां :
१३. पणसाची खीर :
१४. गावठी तिखटमिठाचे पाहु/पोहे :
१५. नासणेची आंबील :
१६. मिरची पुड कमी खोबरेल तेला बरोबर उकडलेल्यो आठुळ्यो :
१७. हिरवां केळां निखाऱ्यात भाजनी खाणां. :
१८.कुड्याच्या फुलांची भाजी/ शेंगांची चटणी :
१९. घोटशेरीचे आकूर तेची भाजी :
२० तांदुळाच्यो शेव्यो
२१. खापरोळी : कोकणातली आणखीन एक दुर्मिळ झालेला पदार्थ म्हणजे खापरोळी.
साहित्य-4वाट्या तांदूळ,2वाट्या हरभरा डाळ, 1वाटी उडीद डाळ, चमचा भर मेथीदाणे, नारळाचा रस आणि गुळ, वेलची पुड.
दोन्ही डाळी तांदूळ आणि मेथीदाणे स्वच्छ धूवून 7ते8तास भिजवावे. नंतर रवाळ वाटून घ्यावे. आणि परत 7/8तास झाकून ठेवावे. नारळाचा रस गुळ आणि वेलची घालून तयार करावा. ८तासांनंतर हे पिठ फुगुन येईल. आता भिड्याला तेल लावून आंबोळी घालावी. वाढताना डीश मध्ये आंबोळी ठेऊन वर नारळाचा रस घालावा.
२२. खांटोळी : 
२३. तवसळी :
२४. दुधी भोपळेची खिर :
२५. कणग्यांची खिर : 
२६. मेथीची पेज :
२७. कुवाळेचे सांडगे : 
२८. भारलेली मिर्ची : 
२९. घोटांचां रायतां :
३०. अननसाची चटणी अणी भाजी :
३१. खोबरे ची कापां :
109) रातांब्याच बियांच सार ,खापर पोळी, वेसवार ,
110) मेतकुटाची धिरडी
111) ओली हळद आंबे हळदिचे लोणचे 
112) दही केळं. ( पिकलेल्या केळ्याची कोशिंबीर थोडीशी मोहरी फेसून लावायची, थोडसं मीठ, थोडीशी साखर)
113) दामटी 
ही दामटी माझी आजी छान करायची तांदूळाच्या पिठात तेल,मीठ, थोडा ओवा जीरे घालायचे (हे ओवा जीरे मी नंतर अॕड करायला लागले छान चव लागते आजी फक्त तेल मीठ घालायची) आणि संपूर्ण पीठ दुधात भिजवायचे पोळीच्या पिठासारखे आणि थालिपिठासारखे तव्यावर तेल टाकून छान खरपूस मिडियम आचेवर भाजून घ्यायचे वरुन तूप घ्यायचे खाताना, लींबू लोणच्याबरोबर छान लागतात ह्या दामट्या.

राघवदास लाडू रेसिपी 👇
(रवा, खवा खोबरे लाडू )

साहित्य : 2 भांडी रवा, 2 भांडी साखर, 1 भांडं खवा, पाऊण भांडे डेसीकेटेड खोबरे (खरे तर नारळाचा चव घालतात पण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लवकर खराब होतील म्हणून नाही घातला) तूप 1 भांड्याच्या वर, वेलची पूड, काजू, बेदाणे चिमूटभर मीठ..
रवा तूप घालून खमंग भाजून झल्यावर त्यातच डेसीकेटेड नारळ घालून थोडे परतावे, दुसरीकडे खवा परतून घ्यावा नंतर रवा खवा खोबरे सगळे एकत्र करून थोडे भाजावे 
बेदाणे धुवून थोडा वेळ पाण्यात भिजू द्यावेत नंतर ह्या भाजलेल्या रवा खवा ह्यात काजू बेदाणे घालावे रव्याच्या गरम असण्याने बेदाणे पण थोडे गरम होतात त्यावरच वेलची पूड घालावी..
दुसरीकडे 2 भांडी साखरेचा पाक करायला ठेवावा अगदी एक तारी न करता थोडासा घट्ट असू द्यावा मग ह्या रव्याच्या मिश्रणात पाक घालून नीट एकत्र करावे थोड्या वेळाने थोडे थोडे ढवळावे मिश्रण आळले की त्याचे लाडु वळावेत...
टीप : मिश्रण हळूहळू आळंत गेले की समजावे लाडु मऊ होणार आणि पटकन आळले तर हमखास भागराच होणार..
सुजाता परांजपे

खांडवी ...रेसिपी👇
माझाही एक प्रयत्न...

मी हे microwave मध्ये केलंय तयारीचा वेळ सोडून अवघ्या 6 ते 7 मिनिटांत तयार..
एकीकडे गुळ पाण्यात विरघळवून उकळत ठेवले उकळी आल्यावर त्यातच कीसलेलं आलं, चिमूटभर मीठ आणि नारळाचा चव घातला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद केला...
दुसरी कडे 2 वाट्या इडली रवा त्यात तूप घालून microwave ला 2,2 मिनिटे असे 6 मिनिटं ठेवून खमंग भाजून घेतले नंतर गुळ खोबरे आले मिश्रित उकळते पाणी थोडे थोडे घातले रवा थोडे थोडे पाणी घातल्याने छान मोकळा शिजला पुन्हा 1 मिनिट microwave मधे ठेवून बाहेर काढले आणि मग छान ढवळून आधीच तूप लावून ठेवलेल्या ताटात घातले नीट पसरून त्यावर नारळाचा चव घालून थापले गार झल्यावर वड्या पाडल्या...
सुजाता परांजपे

सुरणाची उपासाची भाजी, केनी -कुर्डू ची भाजी, बिरडे उसळ, केळ्याचे घारगे, ताकातल्या तिखट पानग्या, सुरळीच्या वड्या, शेवग्याच्या शेंगा घालून आमटी, गोळ्यांची आमटी, डाळिंब्या , शेवग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी, ओव्याच्या पानांची भजी.
प्राजक्ता मेहेंदळे

अळूची देठी - 
हे आळूच्या दांड्या न चे उकडुन आणि साल काढून केलेलं भरित असतं.. दही मीठ तूप जिऱ्याची फोडणी
घालून करायचे 
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Wednesday, December 18, 2024

रिझर्व बँक स्वायत्तता आणि सरकार

 १९.१२.२०२४

रिझर्व बँक स्वायत्तता आणि सरकार
भारतीय रिझर्व बँक ही प्रथम ब्रिटिश काळात १९३४ च्या रिझर्व बँक कायद्यानुसार १ एप्रिल १९३५ साली स्थापन झाली. त्याचे पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ हे एक व्यवसायिक बँकर होते. त्यावेळी ती स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे
A) पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देणे.
B) बँक नोट प्रसारित करणे
C) आर्थिक स्थिरतेसाठी योग्य तों निधी राखीव ठेवणे
D) देशाच्या प्रगतीसाठी करन्सी आणि क्रेडिट (पत ) सिस्टीम तयार करणे आणि चालवणे. पतपुरवठा नियंत्रण करणे.

पुढे १९४३ मध्ये सर चिंतामणरावं द्वारकानाथ देशमुख, ICS ( C D Deshmukh), हे तिचे पहिले भारतीय गव्हर्नर बनले. १९४४ साली रिझर्व बँकेच्या कायद्यात बदल होऊन पब्लिक डेबट ऍक्ट १९४४ साली पास झाला. यामुळे सरकारला आपल्या कार्यासाठी कर्जरोखे किंवा अन्य स्वरूपात लोकनिधी उपलब्ध करणे शक्य झाले.

पुढे १९४९ मध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आला त्याद्वारे बँकांचा कारभार, जमा कर्त्यांच्या जमेचे सौरक्षण, आणि बँकांची आर्थिक स्थिरता इत्यादी विषयात व्यवस्थापन करण्याचे अधिकार रिझर्व बँकेला मिळाले.

रिझर्व बँक,  बँकांच्या स्थिरतेसाठी कॅश रिझर्व रेशो ( CRR) आणि स्टेट्युटरी लिक्विडटी रेशो ( SLR) असे दोन प्रकारचे डिपॉसिट बँकांच्या राखीव निधीमध्ये अपेक्षित करते. पैकी CRR चा निधी रिझर्व बँकेकडे ठेवला जातों तर SLR निधी हे बँक स्वतःकडे वेगवेगळ्या मालमत्ताच्या स्वरूपात ठेवतें. यासर्वावर RBI चे नियंत्रण असते. शेतीविषयक बँकावर नाबार्डचे नियंत्रण असते.

रिझर्व बँक गव्हार्निंग बोर्ड २१ जणांचे असून त्याची नियुक्ती भारत सरकार आपल्या अर्थ मंत्रालयामार्फत करते. रिझर्व बँक गवर्नर त्या बोर्डाचा प्रमुख असतो.

रिझर्व बँक, त्यांच्या सांख्यिकी विभागातर्फे जमवलेल्या माहितीतून देशातील महागाई दर आणि तों नियंत्रणात आणण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट ( प्रमुख कर्ज व्याज दर ) वर नियंत्रण करते.  हे दर वेळोवेळी साधारण दर दोन महिन्याला रिझर्व बँक गवर्नर प्रसारित करतात.

त्याशिवाय, 2010 साली भारताच्या अर्थमंत्र्याच्या पदसिद्ध अध्यक्षतेखाली आर्थिक स्थिरता आणि राष्ट्रीय विकास परिषद (Financial stability and development council ) स्थापन झाली. ह्या परिषदेमध्ये रिझर्व बँक, सेबी, PFRDA ( पेन्शन फ़ंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी), IRDA ( इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हेलोपमेंट ऑथॉरिटी), FMC ( फॉरवर्ड मार्केट्स कमिशन ) यासंस्थांचे उच्च पदस्थ अधिकारी असतात. ह्या परिषदेकडून वर्षातून दोन वेळा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसारित केला जातो. हे करण्याचे कारण म्हणजे रिझर्व बँकेशिवाय वरील इतर संस्था सुद्धा देशाच्या आर्थिक स्थिरतेशी संबंधित आहेत.

दरवर्षी रिझर्व बँक सरकारला झालेल्या व्यवहाराच्या नफ्यातून काही लाभांश देते व उरलेला नफा राखीव निधी म्हणून ठेवते. सन २०२३-२४  साला साठी रिझर्व बँकेने केंद्र सरकारला रु. २.११ लाख कोटी एवढा लाभांश दिला. हा लाभांश गेल्या वर्षीच्या तुलनेत १४०% जास्त आहे. ह्या वाढीव लाभांशामुळे सरकार आपल्या बजेट मधील वित्तीय तूट (उत्पन्न आणि खर्च यातील तफावत) कमी करू शकेल.

रिझर्व बँकेकडे दोन प्रकारचे रिझर्व असतात, एक परकीय चलन स्वरूपात आणि दुसरे भारतीय रुपयाच्या स्वरूपात ज्याला कॉन्टीजन्सी रिस्क बफर (CRB)  असे म्हणतात. वरील लाभांश वाढवताना रिझर्व बँकेने आपल्या CRB मध्ये ६% वरून ६.५% एव्हडी वाढ केली आहे. रिझर्व बँकेकडे सध्या परकीय चालनामध्ये २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ६५८.०९ बिलीयन डॉलर्स राखीव निधी आहे, त्यापैकी ६७.५७३ बिलीयन डॉलर्स सोन्याच्या रूपात आहेत तर १७.९८५ बिलीयन डॉलर्स हे अंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे असलेले भारताचे पैसे काढण्याचे विशेष अधिकाराच्या स्वरूपात आहेत. भारताचे फॉरेक्स रिझर्व हे त्याच्या ११.२ महिने इम्पोर्टच्या किमती एव्हडे आहे.

गेले काही महिने, युक्रेन युद्धामुळे झालेल्या कच्चा तेलाच्या किमतीतील दरवाढी मुळे, अनेक परकीय गुंतवणूकदार आपला भारतीय शेयर बाजारातील सहभाग कमी करून आपली गुंतवणूक चीनकडे वळवत आहेत. त्यामुळे डॉलर्सच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे. त्याला उपाय म्हणून भारतीय रिझर्व बँक आपल्याकडे असलेले डॉलर्स विकून, रुपयाची घसरण थांबण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे परकीय चलन साठा कमी होत आहे. २०१४ मध्ये १ डॉलर = ६१.८३०६ रुपये होता तों आता १ डॉलर = ८४.९० रुपये झाला आहे ( १७.१२.२०२४). गेल्या वर्षी  याच तारखेला तों रु. ८३.०२४ एव्हडा होता म्हणजेच एका वर्षात तों २.२६% नी घसरला तर गेल्या १० वर्षात तों ३७.३१% नी घसरला.

भारताचे परकीय कर्ज ६८२.३ बिलीयन डॉलर्स जे भारताच्या जिडीपी च्या १८.८% आहे. भारताचा डॉलर मधील जिडीपी ३.५५ ट्रिलीयन डॉलर्स आहे.

रिझर्व बँकेचे मुख्य काम आर्थिक स्थिरता स्थापन करण्यासाठी योग्य तों राखीव निधी उपलब्ध करणे आणि सांभाळणे. याविरुद्ध वर्षानुवर्षे सरकारचे म्हणणे आहे की आपला देश हा विकासाधीन ( developing) देश असल्यामुळे आपला खर्च हा नेहमीच वाढीव असणार. त्यामुळे आपली वित्तीय तूट ( त्या वर्षातील उत्पन्न आणि खर्च यातील तफावत ) ही वाढत जाणार. २०२० - २०२१ सालच्या कोविड लॉकडाऊन मुळे, सरकारने केलेल्या लोक कल्याणकारी योजना आणि तात्पुरते उपाय, यामुळे सुद्धा ही तफावत दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या होत असलेल्या जिडीपीच्या वाढीपैकी बराचसा भाग हा सरकारने इन्फ्रास्ट्रकचर वर होत असलेली गुंतवणूक असून त्यामधून उत्पन्न परतावा मिळायला वेळ लागतो. शेतीविषयक उत्पन्नामध्ये घट होत असून त्याची जिडीपी मधील भागीदारी दिवसेंदिवस कमी होत आहे, तर उत्पादन क्षेत्रातील वाढ होत नाही. दरवर्षीच्या वित्तीय तुटीमधून कर्जाची उत्पती होत असते. शिवाय कर्जावरील व्याज शिल्लकेला कमी करत असते.

भारताचे कर्ज तिच्या जिडीपीच्या ८१.५९% म्हणजेच 3.23752 ट्रिलीयन डॉलर्स आहे. सरकार हे गुणोत्तर कमी करण्याचा कसोशिने प्रयत्न करीत आहे, परंतु वाढती वित्तीय तूट, जागतिक अस्थिरता आणि मेक इन इंडिया किंवा स्किल इंडिया यासारख्या योजनाना मिळालेला मिश्र प्रतिसाद, वाढता इम्पोर्ट यामुळे त्यात यश येणे अवघड होऊन बसले आहे. जेथपर्यंत सरकार आपल्या व्यवस्थापनावरील खर्च आटोक्यात आणत नाही तेथपर्यंत ही स्थिती अशीच रहाणार.

भारताचे दरडोई उत्पन्न २०१४ मध्ये Rs. ७२,८०५ होते तें  २०२४ मध्ये रु. १,८४,००० म्हणजेच १० वर्षात १.५२७ पट वाढले यां विरुद्ध भारताचे दरडोई कर्ज २०१४ मध्ये Rs ४३,१२४ होते तें वाढून २०२२ मध्ये Rs १,०९,३७३  झाले म्हणजेच यां काळात तें 2.53 पट वाढले. म्हणजे दरडोई उत्पन्न पेक्षा दरडोई कर्ज वाढण्याचा वेग जास्त आहे.

सरकार आणि रिझर्व बँकेने आपापल्या गरजा ओळखून त्यामध्ये सुवर्ण मध्य काढणे आवश्यक आहे, जेणेकरून सरकार आवश्यक तेव्हडाच खर्च करेल आणि रिझर्व बँक आवश्यक तेव्हडाच निधी राखीव ठेवेल असे न केल्यास कोणताही देश कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू शकणार नाही.

जगात कर्ज आणि जिडीपी रेशो प्रमाणे काही देश:
United States: 121.31%
France: 111.8%
Japan: 261.29%
United Kingdom: 101.36%
Sweden: 32.69%
Spain: 111.6%
Italy: 144.41%
South Africa: 71.12%
India: 83.13%

माधव भोळे

Monday, December 9, 2024

सात बारा थोडक्यात माहिती.

 सात बारा थोडक्यात माहिती.

आपले जमिनीचे ७/१२ असतात त्यात पुढील भागा मध्ये जमिनीचे ठिकाण, त्याचा सर्व्हे नंबर, सर्व्हे पोट क्रमांक, जमिनीची वर्गवारी (  वरकस, डोंगराळ, बागायती, जिरायती, इत्यादी ), जमिनीचे क्षेत्र हेक्टर आणि आर मध्ये ( १ आर = १,०७६.४ वर्ग फूट किंवा १०० वर्ग मिटर. १०० आर म्हणजे एक हेक्टर. साधारण पणे १ हेक्टर म्हणजे २.५ एकर अंदाजे समजले, थोडीफार फुटात तफावत असते. जुन्या पद्धतीमध्ये १ गुंठा म्हणजे १०८९ वर्ग फूट आणि ४० गुंठे म्हणजे एक एकर ),


त्यातील वर्गवारिप्रमाणे प्रत्येक क्षेत्र किती मापाचे आहे आणि एकंदर क्षेत्र किती मापाचे आहे हे पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेले असते. तिसऱ्या कॉलम मध्ये भोगावटदार: यां मध्ये जमीन मालकाचे नांव ज्याला भोगवटदार म्हणतात. जास्त भोगवटदार असतील तर त्यांचा जमिनीतील हिस्याचे प्रतिशत प्रमाण (%).


जर एखादे नांव तेथे असेल तर तें कोणत्या फेरफार नोंदीमुळे तेथे आले त्याचा फेरफार नंबर नावाच्या बाजूला गोल करून लिहितात. फेरफार म्हणजे कोणत्या बदलामुळे उदा. वारसा हक्काने किंवा खरेदी खतामुळे, किंवा विवाह नोंदणी मुळे विवाहित स्त्रीचे नांव बदलले इत्यादी.

४था कॉलम मध्ये जर जमिनीला कुळ लागले असेल तर कुळाचे नांव. आणि फेरफार नंबर, त्यानंतर इतर हक्कदारांची नांवे येतात.

जर जमिनीवर काही बोजा किंवा कर्ज बोजा ( देणे  असेल तर ) तें सुद्धा लिहिले जाते. खरेदी किंवा विक्री करताना तों बोजा काढून टाकल्याशिवाय हा व्यवहार होत नाही. ही झाली पुढील पानावरील माहिती. 


पाठच्या पानावर त्या शेतात होत असलेले पिक पाण्याची नोंद दरंवर्षी होते. उदा. त्या शेतात कोणतें पिक घेतले आहे. त्याचा उतारा किती येतो हे सुद्धा काही ठिकाणी लिहिले जाते. जर पिक न घेता शेत वारंवार रिकामे ठेवले जातं असेल तर त्याचा भोगावट दार बदलण्याचा हक्क सरकारला आहे.   शेत साऱ्यावर सरकारचे महसूल उत्पन्न  अवलंबुन असतें. 


पिक पाणी नोंद ही कर्ज घेण्यासाठी किंवा विमा योजनेची सुविधा घेण्यासाठी उपयोगाला येते. कारण तुमचे शेती उत्पन्न त्या नोंदीवर समजते. 


ज्यांनी पिक बदलून तेथे बागायती किंवा इतर वृक्ष लावले असतील तर त्याची नोंद तेथे घेणे आवश्यक आहे. कुळ कायदयाच्या केसेस मध्ये यां नोंदी खूप महत्वाच्या ठरतात.


माझ्या समजूती प्रमाणे लिहिले आहे. काही चुकीचे असेल तर जाणकारांनी जरूर मार्गदर्शन करावे.


माधव भोळे 

फक्त १५ मिनिटे आणि शेकडो कोटींचा चुराडा.

फक्त १५ मिनिटे आणि शेकडो कोटींचा चुराडा.


आज महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री श्री देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून आणि श्री एकनाथजी शिंदे आणि श्री अजित दादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय भव्य दिव्य असा शपथविधी पार पडला. प्रथम त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.


त्या शपथविधी साठी खुद्द देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, अमितभाई शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामण, अश्विनी वैष्णव, पियुष गोयेल, ज्योतिद्र राजे सिंदिया, चिराग पासवान सहित अनेक केंद्रीय मंत्री तसेच २४ भाजप प्रदेशित राज्याचे मुख्यमंत्री, शिवाय सहयोगी पक्षाचे चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते, संत, महंत, उद्योगपती, क्रिकेटीयर, सिनेमा श्रुष्टीतील दिग्गज, लाडक्या बहिणी एव्हड्या एकंदर ४३,००० मंडळीची उपस्थिती होती. यां समारंभासाठी हजारो पोलीस, मंत्रालय आणि इतर विभागातील शेकडो सरकारी कर्मचारी रात्रंदिवस खपत होते. अजय अतुल चा ऑर्केस्ट्रा आपल्यासाठी रिझवत होता. ( ज्या वेळी अदानी, अंबानी, बिर्ला यांच्यासारखे प्रचंड मोठे अबजाधिशांनासुद्धा यां १५ मिनिटासाठी आपले त्या दिवसाचे महत्वाचे व्यावसायिक कार्यक्रम बाजूला ठेवून हजर राहावे लागते, त्यावेळी तर त्यांच्या असहायतेची किंव मला आली. असे म्हणतात की बिर्लाच्या एव्हड्या कंपन्या आहेत की प्रत्येक कंपनीला जरी एक दिवस भेट दिली तरी त्याच कंपनीला परत भेट द्यायला त्यांना ३ वर्ष लागतात असे मला त्यांच्या कंपनी मधील एक माणूस म्हणाला होता.)


फक्त १५ मिनटं चाललेल्या यां कार्यक्रमासाठी एव्हडा मोठा घाट घातला होता तों सुद्धा अर्थातच जनतेच्या पैशातून. गेले कित्येक वर्ष सरकार बजेट मधून आपल्या व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्याचा वादा करते. आपल्या बजेटच्या १५ तें २०% खर्च हा फक्त आपल्या व्यवस्थापनावर होत असून, बजेट आणि उत्पन्नाचे स्रोत यांमध्ये नेहमीच तफवात असते. बजेट नेहमीच घाट्याचे असते. अर्थात त्यामुळे कर्ज वाढतच असते.


परंतु सरकारी जाहिरातबाजी, भव्य समारंभ, मंत्र्यांचे बंगले आणि त्यांची वारंवार चाललेली नूतनीकरणे, त्यांची इलेक्ट्रिक बिले, लावाजमा, सुरक्षा, गाड्या, हेलिकॉप्टर, वारंवार चाललेले दौरे, आमदार खासदारांची आयुष्यभराची पेन्शने, यावरील खर्च याचे गणित सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. 


शेतकरी, लाडक्या बहिणी, आंदोलनकर्ते यांना एव्हडेच समजते की आपल्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत, पण नागरिकांना समजतच नाही की अपण दिलेले टॅक्सेस खरोखर योग्य ठिकाणी खर्च होत आहेत कां? अनेक मूलभूत सरकारी योजना पैशाच्या अभावी पडून आहेत. 


मोठमोठाले ब्रिजेस, इन्फ्राष्ट्राचर, विमानतळे, महारास्ते इत्यादी गोष्टीमुळे आपण विकसित झालो, आपली इकोनॉमि ५ ट्रीलिएन ची झाली यां भ्रमात आपण आहोत. पण आपल्या कष्टाने मिळवलेल्या पैशाचा असा वायफळ दुरुपयोग होतो याबद्दल कोणीच खूष नाही. शिवाय एवढ्या ४३,००० लोकांचा अमूल्य वेळ जीं एक राष्ट्रीय संपत्ती आहे ती वाया गेली तें वेगळेच.


अतिशय खडतर अशा संघर्षमय आयुष्यानंतर १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला तों सुद्धा समर्थ रामदास स्वामीं यांच्या सल्ल्यावरून, जिजाऊ मातेच्या आशिर्वादानें आणि काशीचे गागाभट्ट यांच्या मार्गदर्शना खाली. स्वतः तें यां गोष्टीसाठी तयारच नव्हते परंतु गेल्या कित्येक शतकात मोगल साम्राज्यात हिंदू राजाचा राज्याभिषेक झाला नाही आणि हिंदुचे अस्तित्व दाखवणे गरजेचे आहे हे ज्यावेळी छत्रपतीना पटले त्यावेळी त्यांनी तों सल्ला स्वीकारला. स्वतःच्या मोठेपणाची त्यांना हौस नव्हती. आजचा शपथविधी सोहोळा बघून छत्रपतीनी सुद्धा तोंडात बोट घातले असेल, कोण हा फडणवीस म्हणून?


पण ईथे तर काय जनतेने बहुमताने निवडून दिले म्हणजे आपण काहीतरी फार मोठा पराक्रम गाजवला यां भूमिकेत असे शपथविधी भारतात राजरोस होत आहेत. सर्वत्र फक्त धनिकांचे राज्य आहे. निवडणुकीत उभे राहून जिंकलेल्या पैकी ८०% पेक्षा जास्त उमेदवार करोडोपती आहेत. निडणुकीत उभे राहिलेल्या मंडळीपैकी ७५% लोक राजकारणी घराणेशाहितून पुढे आले आहेत. अगदी राजघराणी सुद्धा यां स्पर्धेत कमी नाहीत. निवडून आलेल्या मंत्र्यांचा, नेत्यांचा आणि कार्यकर्त्याचा थाट अतिशय राजेशाही असतो. यांच्या बैठका फाईव्ह स्टार हॉटेल मध्येच होत असतात.


लोकशाही हे फक्त लेबल आहे. हे सर्व वतनदारांचे राज्य आहे, तुम्ही कोणालाही निवडून द्या, तों कोणत्या ना कोणत्या राजकीय घराण्याशी निगडित आहे कारण पक्ष ए बी फॉर्म देतात तेच मुळी अशा मंडळींना जों पैसा खर्च करू शकेल. आणि ही सर्व सामान्यांची ताकद नाही.


सर्व सामान्यांनी फक्त गुपचूप टॅक्स भरायचा. टॅक्स रेट वाढवला तर त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. टॅक्स वाढवणे शक्य नसेल तर त्यावर सरचार्ज बसवायचा. तें म्हणतील ती पूर्व, तें म्हणतील त्या योजना आणि तें म्हणतील तें बजेट. कधीही टॅक्सेस वाढवताना लोकमत विचारात घेतले जात नाही. बजेट पूर्व मिटिंग फक्त आणि फक्त देखावा असतो. टूथपेस्ट, मोबाईल, हेयर ऑइल सारख्या मूलभूत गोष्टींवर १८ टक्के जीएसटी आहे तर हेलिकॉप्टर वर फक्त ५% आहे. बघा कशी टॅक्स रचना ती. तयार घरांवर जींएसटी नाही आणि बांधकाम होत असलेल्या घरांवर ५% जींएसटी आहे. कोणता अर्थशाश्त्रज्ञ यांना सल्ले देतो कोण जाणे.


विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष फक्त निवडणुकांपुरते, बाकी सर्व एकत्र बसून चहा पीतात आणि हा तमाशा बघत असतात.


माधव भोळे

Tuesday, December 3, 2024

जाहिरात आणि भुलावण्या

 जाहिरात आणि भुलावण्या 

आजकाल अनेक रिअल इस्टेट डेव्हल्पर च्या जाहिराती समाज माध्यमांवर येतात. अतिशय आकर्षक फोटो किंवा डिझाईन असलेले फ्लॅट्स, बंगले, जमिनी वगैरे. एका पेक्षा एक सुविधा आणि सवलती जाहीर केलेल्या असतात. 


अर्थात अशी जाहिरात बघून लोक आकर्षित होतात. त्यांच्या स्वप्नातील घर, आणि तें ही थोडक्या पैशामध्ये मिळत आहे हे बघून त्यांना फोन करण्याचा मोह आवरत नाही.


मग आपण फोन करतो आणि एखादी उत्तर भारतीय ललना आपल्या फोन ला उत्तर देते.


ती : सर आप जगह देख रहे है?

आपण : जीं हा 

ती : सर क्या देख रहे है 1 BHK, 2 BHK यां 3 BHK. 

आपण : देख रहा हूं 2 BHK पर कोई बजेट मे अच्छा 3 BHK मिलेगा तों भि सोच सकता हूं 

ती: सर हमारे पास बहुत ऑप्शन्स है 1 BHK, 2 BHK, 3 BHK, टेरेस फ्लॅट, गार्डन व्यू फ्लॅट. 

सर आपका बजेट क्या है? 

आपण: बजेट ऐसा नहीं, पहिले क्या है वों देखके बता सकता हूं 

ती: सर हमारे पास बंगला ऑप्शन भि है, 2/3 BHK, with veranda और बंगले के सामने गार्डन.

आपण: अरे वा, ये तों बहुत अच्छा है.

ती : अच्छा तों आपके घर मे कितने लोग है? 

आपण : 4 लोग, हम दो, हमारे दो

ती : आपके दो लडके है यां एक लाडका एक लडकी?

आपण : उससे आपको क्या लेना देना.

ती : सर दोनो लडके है तों एक बेडरूम मे चलेगा, पर लडकी है तों एक और बेडरूम लगेगा.

आपण : ठीक है हमे कमसे कम, 2 BHK कां मकान चाहिये.

ती : ये देखो हमारे स्टेशन के पास २ मिनिट दुरी पर २ टॉवर प्रोजेक्ट चल रहे है और स्टेशन से सिर्फ 15 मिनिट दूर ३ बंगलो प्रोजेक्ट चल रहे है

आपण: क्या प्राईस क्या है?

ती : सर टॉवर प्रोजेक्ट मे 2 BHK प्राईस है 40 और 3 BHK 50 लाख. और बंगलो प्रोजेक्ट भि 2 BHK 55 लाख और 3 BHK 65 लाख 

आपण: कोनसा स्टेशन है?

ती : सर आसनगाव.

आपण: तें कुठे आले? 

ती: सर कल्याण कसारा लाईन है उसमे है.

आपण: तों पहिले क्यू नहीं बताया?

ती : क्या नहीं बताया? सब मालूमत तों दे रही हूं 

आपण : कोनसा स्टेशन क्यू नहीं बताया.

ती : सर आपने कहा पूछा! आप अभी पूछा तभी जबाव दिया. सर आप कहा रहते हो?

आपण : मै गोरेगाव रहता हूं

ती: तों सर आसन गांव आपके यहाँ से रेल्वे से नजदिक रहेगा. गुगल मॅप देखो. 

आपण : आप किधरसे बात कर रही हो? 

ती : सर मै बंगलोर से बात कर रही हूं

आपण : तों फिर आपको गोरेगाव और आसनगांव दोन्ही सरिखा लगेगा, स्वाभाविक है.

ती : सर दोनो तों गांव ही है ना?

आपण : पर ये आसनगाव की मार्केटिंग आप बंगलोर से क्यू कर रही हो.

ती: सर हम एक टेलिमार्केटिंग कंपनी है, हरररोज 100 फोन कॉल करने कां टार्गेट है! उसके लिये हमे हररोज 250 रुपया मिलता है. सर कुछ गलती हो गया क्या? 

आपण : नाही मॅडम आपकी कोई गलती नहीं. मै आसनगाव जगह नहीं धुंड रहा हूं.

ती : सर आपको इन्व्हेस्टमेंट के लिये अच्छा रहेगा. हमारी कंपनी हौसिंग लोन भि प्रोव्हाईड करती है 

आपण : मै पहिले ही बताया की मै आसनगांव जगह नही धुंड रहा हूं!

ती : तों पहिला ही क्यू नहीं बताया? फुकट टाईम पास कर रहे हो? लडकी कां आवाज अच्छा लगा, किया बात चालू.

आपण : आपको कुछ गलत फैनी हो गयी है. आप तमीज से बात किजीये 

ती : फोन ठेवून देते  


त्या नंतर आठच दिवसात महाराष्ट्रातील पुणे, तळेगाव, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार,नालासोपारा, अगदी गोरेगाव सोडून सर्व ठिकाणच्या इस्टेट एजंट चे फोन यायला सुरवात होते. सकाळी उठलो नाही तर फोन. 

एजंट : सर आप जगह देख रहे क्या?

आपण : आपको कोन बोला?

एजंट.: सर आपकी इन्कवायरी आई थी

आपण : मेरी कोई इन्कवायरी नहीं है 

एजंट : सर है तों बोल देना, अच्छा प्रपोसलं दे दूंगा 


आतापर्यंत जवळजवळ ४५० एजंट चे नंबर ब्लॉक केले आहेत. आज जागा घेऊन दोन वर्ष झाली तरी अधुन मधून फोन येतच असतात. 

म्हणतात ना लग्न पाहावे करून आणि घर बघावे विकत घेऊन.


यां जाहिरातीच्या दुनियेत बडा घर पोकळ वासा मंडळी खूप आहेत. एकां ठिकाणी झणझणीत मिसळची जाहिरात बघितली, म्हणून माझ्या मित्रानी त्या हॉटेल ला फोन केला. 

मित्र : आम्हाला १५ प्लेट मिसळ हवी आहे. 

हॉटेल : आम्ही फक्त सकाळी ९ तें १२ मिसळ ठेवतो

मित्र : तुम्ही करून ठेवा. आम्ही पार्सल घेऊन जातो 

हॉटेल : आम्ही पार्सल देत नाही.

मित्र : बरे उद्या सकाळी येतो.

हॉटेल: जास्त प्लेट असतील तर २ दिवस आधी सांगावे लागेल कारण तशी तयारी करावी लागेल. उद्या शक्य नाही. 

मित्र : आहो आम्ही स्वतः १५ लोक येऊन उद्या मिसळ खाऊन जाऊ. 

हॉटेल: आम्ही मिसळ जास्त बनवून ठेवत नाही. सर्वाना ताजी आणि झणझणीत मिसळ देतो. आधी बनवून ठेवली की चव उतरते. आज ऍडव्हान्स दिलात तर परवा १५ प्लेट मिसळ मिळेल.

मित्र : ठीक आहे. विचार करून कळवतो. 

(मनात ) मग एव्हडी झणझणीत मिसळची जाहिरात करता. साधी १५ प्लेट मिसळ देऊ शकत नाही. १५ म्हणजे काही १०० प्लेट नव्हेत, की त्यासाठी २ दिवस आगाऊ ऑर्डर करावी लागेल.


कोणीतरी म्हटले आहे रिकामा घडा जास्त आवाज करतो आणि उथळ पाण्याला खळखळात फार. 


माधव भोळे