Tuesday, August 16, 2022

७९ वर्षाचा कर्मयोगी अशोक सुटा

७९ वर्षाचा कर्मयोगी अशोक सुटा. साधारणपणे साठी ओलांडली की लोक निवृत्ती आणि परमार्थाच्या मागे लागतात. पण कर्मयोगी अशी व्यक्ती असते की ती आयुष्यभर सतकर्माच्या पाठी असते. असाच एक कर्मयोगी आहे श्री अशोक सुटा ज्याने वयाच्या ७९ व्या वर्षी आणखी एका कम्पनीची घोषणा ७ जुलै 22 ला केली. त्या कंम्पनीचे नाव आहे हॅपीयेस्ट हेल्थ. कोण आहेत हे अशोक सुटा. 12 नोव्हेंबर 1942 साली दिल्ली येथे जन्मलेले अशोक सुटा, 1960 साली लखनऊच्या प्रसिद्ध अशा "ला मार्टनिर" कॉलेजमधून इंटर सायन्स झाले आणि 1964 साली पुढे आय आय टी रुरकी ( त्या वेळची युनिव्हर्सिटी ऑफ रुडकि ) मधून बी ई इलेक्ट्रॉनिकस तसेच 1973 साली एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट फिलिपीन्स मधून एम बी ए झाले. ( ही त्यावेळी आशिया मधील एक जग प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट होती. आजही आहे. ). त्यावेळी श्रीराम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ( Delhi cloth mill DCM group, दिल्ली ) ने प्रथमच भारतात मायक्रोप्रोसेसर वर आधारित कॉम्प्युटर बाजारात विकायला आणला होता. त्यामध्ये त्यांनी 1965 ला नोकरीला सुरवात केली. आपल्या माहितीसाठी लिहितो HCL चे आताचे यशस्वी अध्यक्ष शिव नाडर ह्यांनी सुद्धा येथूनच व्यावसायिक आयुष्याची सुरवात केली आणि मग HCL स्थापन केली. नंतर सुटानी विप्रो कंपनी मध्ये नोकरी करून 1984 ते 1999 पर्यंत त्यांनी विप्रो चे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि 1984 च्या वार्षिक 2 मिलियन डॉलर टर्नओव्हर वरून 500 मिलियन डॉलर एव्हडा नेऊन ठेवला. विप्रो च्या वाढीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये विप्रोतुन राजीनामा देऊन 10 व्यवसाईक आणि व्हेंचर कॅपिटल पार्टनर च्या साहायाने माईंड ट्री नावाची सॉफ्टवेअर कम्पनी काढली आणि 2011 पर्यंत तिचा टर्नओव्हर 402 मिलियन डॉलर वर नेऊन ठेवला. त्याआधी 2007 साली त्यांनी माईंड ट्री चा शेयर बाजारात आणला तो 100 पेक्षा जास्त वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला. 2019 साली लार्सन अँन्ड टूब्रो इन्फोटेक ने माईंड ट्री ला विकत घेतले त्यावेळी त्यांचा ट्टर्नओव्हर 1 बिलियन डॉलर होता आणि त्यांचे कडे 20,000 लोक काम करत होते. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या आणि त्यांचे, कम्पनीचा विस्तार कसा करावा याबद्दल मतभेद झाल्याने त्यानी 2011 मध्ये माईंड ट्री मधून बाहेर पडून आपल्या मित्रांच्या साहाय्याने हॅपीएसट माईंड नावाची सॉफ्टवेअर कम्पनी काढली. 2021 मध्ये त्यांचा टर्नओव्हर 104 मिलियन डॉलर आहे. सध्या हॅपीएसट माईंड ची घोडदौड जोरात सुरू आहे. ते सुरू असतानाच त्यांनी आता आपले लक्ष वैदयकीय विषयाकडे केंद्रित करून गेल्या वर्षी "वाढते वय आणि न्यूरॉलॉजीकल समस्या" याविषयावर संशोधन करण्यासाठी स्कॅन नावाचे एक ना-नफा एन जी ओ (ना-सरकारी ) संशोधन केंद्र काढले आहे. या विषयातील पुढील पाउल म्हणून सर्वसामान्य माणसाचे आरोग्य, त्याचे प्रश्न, त्यावरील तज्ञ मते, आयुर्वेदिक, ऑलोपथिक, युनानी, होमिओपॅथी विषयातील उपचार पद्धती इत्यादी सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी "हापीएसट हेल्थ" नावाची कम्पनी सुरू केली आहे. स्वतःचे वय 79 असताना त्यांची समर्पित जीवन जगण्याची आणि आपले ज्ञान आणि संपत्ती लोकोपयोगी व्हावी यासाठी चाललेली धडपड बघून आनंद आणि आश्चर्य नक्कीच वाटते. हे सर्व करत असताना ते स्वतः मिळवलेल्या संपत्ती मधील काही वाटा अपंग मंडळींसाठी ट्रस्ट काढून खर्च करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा. माधव भोळे.

Thursday, July 7, 2022

हिंदुत्व गदाधारी, घंटाधारी की आणखी काही!!

हिंदुत्व गदाधारी, घंटाधारी की आणखी काही!! आज काल हिंदुत्वाचा मोठाच बोलबाला झालेला दिसतो. जो उठतो तो हिंदुत्वावर बोलतो. कोणी कोटावर जानवे घालून हिंदु बनतो, तर कोणी हनुमान चाळीसा लाऊडस्पीकरवर लावायला सांगून, भगवी शाल पांघरून मी हिंदू आहे हे सिद्ध करतो. कोणी इफतिहार च्या पार्टीला बोलावून हिंदूंची सहिष्णुता दाखवतो, तर कोणी मी सावरकरवादी म्हणून स्टेजवरून जोरजोरात ओरडून हिंदुहृदयसम्राट सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार लोकांच्या घशात ओतण्याचा प्रयत्न करतो. नक्की हिंदुत्व आहे तरी काय? मला तर कधी कधी कोडेच पडते. जे वेदात, पुराणात सांगितले ते हिंदुत्व की दुपारी 12 ते 3 मोफत इडली चटणी मिळते म्हणून अम्मा किचनच्या समोर धक्काबुक्की करून आपले पोट भरणारी गरीब जनता असताना, त्याच गरिबांच्या लाटलेल्या पैशातून आणि भ्रष्टाचाराने कमावलेल्या पैशातून तिरुपती बालाजीला सोन्याचा मुकुट अर्पण करणाऱ्या राजकारण्यांचा सत्कार करणारे ब्राह्मवृंद आणि विश्वस्थ हे हिंदुत्व? लेख लिहायचे कारण, काल आम्ही राहतो त्या ठिकाणी जवळच असलेल्या पाटलादेवी मंदिराची वार्षिक चैत्र जत्रा होती. जत्रा म्हणजे उत्साह, जत्रा म्हणजे उत्सव. पण एके काळी शांतपणे कंदिलाच्या किंवा पेट्रोमॅक्सच्या शांत प्रकाशात निघणारी ही जत्रा गेले काही वर्षे तरुणाईचे आकर्षण बनले आहे ते दर 200 मीटरवर लावलेल्या कर्कश्श डीजे आणि डिस्को लाईट्सच्या प्रकाशात नाचणाऱ्या मंडळींनमुळेच. तेव्हढ्याशा त्या एक किलोमीटर च्या परिसरात कमीतकमी 40 ते 50 मोठे ( अंदाजे 2 फूट x 3 फूट) डीजे स्पीकर जे कानठळ्या बसवत होते आणि डिस्कोलाईट्स डोळ्याचा थरकाप उडवणारे प्रकाश टाकत होते. तरुणाई, अगदी अबाल वृद्ध भगिनी सुद्धा, त्या तालावर वेडेवाकडे अंगविक्षेप करत बेभान होऊन नाचत होत्या. रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरला बंदी असताना सुद्धा आम्ही आमच्याच बापाची मुंबई असे समजत असल्यामुळे सम्पूर्ण परिसर रात्री 1 वाजेपर्यंत या आवाजाने दणाणून सोडला होता. अगदी पुण्यातील तरुणाई जशी मोठमोठ्याने ढोल बडवत रात्रभर गणपती विसर्जन मिरवणूक काढते आणि त्यासाठी आधी 2 / 2 महिने तालमा करत बसते तसेच. म भले त्या ढोलांचा त्रास आजूबाजूच्या रहिवाश्याना का होईना!. नक्की आपण कोठे जात आहोत, काय करत आहोत याचे भान समाजाकडे राहिलेले नाही. 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ घेण्यासाठी रेशनवर लाईन लावणारी आणी विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी सरकारकडे अर्ज करणारी मंडळी जेव्हा लग्नात हळदीला गावकऱ्यांना आणि पाहुण्यांना उंची दारू पाजतात आणि लग्नसमारंभाला आणि वाढदिवसाला लाखो रुपये खर्च करतात किंवा मंदिरे उत्सवासाठी लाखो करोडो खर्च करतात तेव्हा नक्की समाज कोणत्या दिशेला चालला आहे याची कल्पना करून कीव येते. थोडक्यात फुकट आणि आयते मिळालेले पैसे उडवायचे आणि परत कर्जबाजारी होऊन लोकांकडे आणि सरकार कडे भीक मागायला तयार. राजकारण्यांना अशीच जनता हवी असते की जिला धर्म ही अफूची गोळी देऊन त्यांच्या धार्मिक भावनाना फुंकर घालत राहायचे आणि त्या मंडळींचा पाठिंबा घेऊन सरकार दरबारी भ्रष्टाचाराने करोडो रुपयांची मालमत्ता बनवायची. लोकांच्या सणासुदीला गणपती मंडळे, सार्वजनिक पूजा, मंदिरांचे उत्सव याला छोट्या मोठ्या देणग्या देऊन जनतेची तोंडे बंद करायची आणि कंत्राट दारांबरोबर साटे लोटे करून एका वर्षात 40 मालमत्ता रजिस्टर करायच्या अशासारखी राजकारणी आणि नोकरशाही मंडळी या धर्माच्या अफूच्या गोळीचा पुरेपूर फायदा घेत असतात, हे सर्व जनतेला माहिती असून सुद्धा जनता हतबल आहे. कारण ती धर्मा धर्मात, जाती जातीत विभागली आहे, ती पक्षापक्षात विभागली आहे ती राज्या राज्यात विभागली आहे, ती भाषा भाषांमध्ये विभागली आहे एवढेच काय तर ती गुरू गुरूनमध्ये सुद्धा विभागली गेली आहे. सध्याचे वातावरण हे सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी धर्माचा वापर करून राजकिय पक्षांमध्ये चढाओढ तयार करणारे आहे आणि त्यामध्ये तुमच्या आमच्यासारखी धार्मिक मंडळी प्यादि आहेत. नाही ते घंटा धारी, नाही ते गदा धारी. ते आहेत सत्ताधारी आणि सत्ता पिपासू. आचार्य रजनीश म्हणतात त्याप्रमाणे धर्म ही एक अफूची गोळी आहे. तिचा वापर करून अनेकांनी आपली राज्ये बसवली, चालवली आणि वाढवली सुद्धा. मग तो क्रूरकर्मा हिटलर असो, अल्लाउद्दीन खिलजी असो, रोमन कॅथॉलिक साम्राज्य असो की अगदी अलीकडे औरंगजेब असो. सम्राट अशोकाने अहिंसक बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्षुनच्या धार्मिक फळ्या तयार केल्या आणि त्याना संरक्षण देण्यासाठी हिंसक युद्ध फौजा वापरल्या. केव्हडा हा विरोधाभास!!. अगदी हिंदू संस्थानिक सुद्धा यात कमी नाहीत, नाहीतर करोडो रुपये मंदिरे आणि धार्मिक कार्यासाठी खर्च केलेल्या हिंदू संस्थानात गरीब आणि गरिबी हा वर्गच राहिला नसता. ज्या वेळी मोठमोठाली मंदिरे उभारली गेली त्यावेळी गरिबांना कामे रोजगार मिळाला पण त्यांची कायमची रोजी रोटी मिळण्यासाठी कोणतीही उपाययोजना या राजांनी दूरदृष्टीने तयार केलेली मी ऐकली नाही. नाहीतरी राजांजवळ आलेली ही संपत्ती ही गरिबांच्या घामाच्या आणि कष्टांच्या पैशातूनच तयार झाली होती किंवा इतर राज्यांवर आक्रमणे करून तयार झाली होती ज्यात अनेक गरीब मारले गेले आणि अनेकांचे गरिबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. आज खऱ्या हिंदुत्वाचा पूर्णपणे विसर पडला आहे. हिंदू धर्मात वर्ण संकल्पना आहे ती प्रत्येकाला गुणांनुसार कर्म करायला कामाचे विभाजन करण्याचे एक साधन म्हणून आहे पण पूर्वीपासूनच राजकारणी आणि स्वार्थी मंडळींनी त्याचा वापर उचनीचता आणि स्वार्थ यांच्यासाठी केला आहे. तीच गोष्ट जातींचे बाबतीत आहे. शास्त्राप्रमाणे प्रजोपत्ती होताना जीनस ( जिवशास्त्रीय जनुके) ना महत्व आहे त्यामुळे अंगीभूत गुण हे जीन्स मधून पुढील पिढीला हस्तांतरित होत असतात त्याचबरोबर ते सहवासाने सुद्धा तयार होतात. या सिद्धांतानुसार पुर्वी सुतार, लोहार, चांभार, सोनार, शिंपी, चित्रकार, ज्योतिषी अशा अनेक व्यवसायावर आधारित किंवा गुणांवर आधारित जाती तयार झाल्या. त्यात उच नीचता हा हेतू नव्हता उलट मानवी जीवनाला सर्वांची गरज आहे आणि एकमेकांना एकमेकांची गरज आहे हा सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र होता. पण परत राजकारणी आणि स्वार्थी मंडळींनी त्याची तोडामोड करून आपापल्या हितासाठी पाहिजे त्यावेळी त्याचा वापर आपसात भांडणे लावण्यात आणि आपला फायदा करून घेण्यात केला. या ठिकाणी हिंदुत्वाची पहिली हार झाली असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर त्यात घुसलेल्या अनिष्ट प्रथा ज्या लोकांनी आपापल्या विचारानुसार दूरदृष्टी न ठेवता घुसवल्या. त्यामुळे अनेक लोक दुखावले गेले. स्पृश्य, अस्पृश्य, विधवा, सती, बळी, बाल विवाह, अशा अनेक प्रथा ज्यामुळे समाजातील रिसोर्सेस चे विभाजन झाले. हिंदूंचे मूळ असलेले रूप म्हणजे "वसुधैव कुटुंबकम" किंवा "जो जे वांचील तो ते लाभो" ह्या कल्पनेतून तयार झालेला हा सम्पूर्ण लोकशाही मानणारा आणि कल्याणकारी समाज ह्या प्रथा, जाती, पाती या आपणच तयार केलेल्या जाळ्यात नकळत बांधला गेला आणि अडकला. वडिलांच्या वचनपूर्तीसाठी आपल्या तारुण्याची आणि राज्यपदाची होळी करून वनवासात जाणारा राम फक्त देवळात राहिला. त्यांनी जनतेला न्याय देण्यासाठी आपल्या पत्नीला सुद्धा परीक्षा ध्यायला लावली त्यातील झालेला अन्याय लोकांच्या नजरेत आला पण न्यायासमोर सर्व समान आणि छोट्यातील छोटा व्यक्ती सुद्धा राज्यात न्याय मागू शकतो ह्या न्यायदानाच्या महत्वाच्या पैलूंचा विसर लोकांना झाला. हनुमाना सारख्या वानर जातीच्या प्राण्याने दाखवलेली स्वामी निष्ठा आणि श्रद्धा यांचा आदर्श आहे. स्वामी निष्ठेसाठी जरी पर्वत उचलून आणायची वेळ आली तरी ती आणायची तयारी आमच्यात आहे हे तो दाखवतो. हनुमान आपल्या गुणाने देव झाला. हिंदू धर्म सर्व प्राणीमात्रांना सारखीच किंमत देतो हे उदाहरण दाखवते. महर्षी पराशर आणि कोळी कन्या सत्यवती यांच्यापासून निर्माण झालेला वेद व्यास महर्षी तसेच वाल्या कोळ्या चा झालेला वाल्मिकी ऋषि दोन्हीना हिंदू धर्मात अत्यन्त महत्वाचे स्थान आहे. व्यासांनी अनेक पुराणे लिहिली आणि ती शिरसावंध्य मानून हिंदूंनी त्याला आपल्या धर्मात सन्मान दिली. खरा हिंदू गुणांना महत्व देतो. भाऊ वनवासात असताना त्यांच्या पादुका ठेवून त्याच्या नावाने राज्य करणारा भरत आपल्या निस्वार्थी पणाचा आणि बंधुप्रेमाचा आदर्श दाखवतो त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. सम्पूर्ण रामयणच हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा आदर्श आहे. लोकांना वाटते भगवत गीता हा हिंदूंचा पूजनीय ग्रंथ आहे. पूजनीय म्हणण्याचे कारण लोक त्याची पूजा करतात. खरे म्हटले तर धर्मग्रंथांचे स्थान देवघरात नसून आपल्या आचरणात आहे. भगवत गीता ही मानवी जीवनाची आचार संहिता आहे. कोणाशी कोणत्या वेळी आणि कसे वागायला हवे. कर्म म्हणजे काय आणि कर्तव्य म्हणजे काय याचा सुरेख कार्यानुभव त्यात आहे. वेद आणि उपनिषदे यामधून त्या त्या वेळच्या धुरीणांना, साधू संतांना आलेल्या अनुभवांचे विश्लेषण आहे त्यात समाजोपयोगी मार्गदर्शन आहे. परंतु ज्यावेळी सर्व प्रश्न आणि सर्व अडचणी एखादी खड्याची अंगठी घालून सुटतात किंवा मंदिरात दान केल्यानंतर किंवा मारुतीला शनिवारी तेल घातल्यानंतर कोणतेही अनैतिक कर्म करा, देव तुम्हाला तारून नेईल अशी भावना ज्यावेळी मनात उत्पन्न होते किंवा तसे मार्गदर्शन केले जाते त्यावेळी धर्म म्हणजे एक बाजार होतो मग तो गदाधारी असला काय किंवा घंटा धारी असला काय, काय फरक पडतो? हिंदू धर्म आपली मुळे विसरून त्यांच्या फांध्याना मजबूत करायला लागला आहे. भक्तीभावापेक्षा किंवा अचरणापेक्षा प्रदर्शनाला महत्व वाढत आहे. "परित्रणाय साधूनांम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनाय" म्हणायचे आणि अत्याचार आणि भ्रष्टाचाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे किंवा सोयीनुसार त्यात सामील व्हायचे असे जर वर्तन असेल तर धर्म असला काय किंवा नसला काय सारखेच. आजकाल धार्मिक कृत्यांपेक्षा त्याच्या सादरीकरणावर जास्त भर दिला जात आहे ते चुकीचे आहे. मुंजीमध्ये बटूला गुरुगृही पाठवण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेपेक्षा बटुच्या आईचा पार्लरने केलेला मेकअप महत्वाचा झाला आहे. तो गुरुगृही जाताना त्याला देण्यात येणाऱ्या रुखवात रुपी शिदोरी आणि आवश्यक वस्तूंपेक्षा भाड्याने आणलेला रुखवात प्रदर्शन सेट जास्त चर्चेचा होऊ लागला. मुंज म्हणजे मौज बंधन म्हणजे आता अभ्यासाचे वय झाल्यामुळे खेळातील लक्ष कमी करून हातात अध्यापनाकडे लक्ष दे, स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिका,गुरूंची आज्ञा पाळायला शिकून बाहेरच्या जगात वावरायचे ज्ञान घे आणि मोहा पासून जपून रहा आणि आपला अभ्यास पूर्ण करून लवकर गृहस्थाश्रमात येऊन आपला संसार थाट हे सांगण्याचा सोहोळा. ते सर्व सोडून भलतंच काहीतरी व्हायला लागले तर आम्ही संस्कार पाळतो म्हणजे फक्त प्रदर्शनापूरते असे म्हटले तर वावगे होणार नाही. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा झोपलेल्या हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन केले त्यावेळी मन्त्रतंत्र पेक्षा आचरणावर भर दिला. हिंदू हृदय सम्राट सावरकरानी जेव्हा सर्व हिंदूंना एकत्र व्हायला सांगितले त्यावेळी हिंदू धर्मातील सर्व वाईट चालीरिती गाडून एका उदात्त उद्दिष्टासाठी एक व्हा जेणेकरून एक स्वतंत्र, आत्मनिर्भर समाज तयार करण्याची त्यांची संकल्पना होती. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे "भले जरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी" असे म्हणणारा तो खरा हिंदू. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत नामदेव, संत तुकाराम या आणि अशा विविध जाती धर्म पंथांच्या संत विभूतींचे विचार समजून घेऊन त्यांना मानणारा तो खरा हिंदू. हिंदू धर्माचे अनेक चांगले पैलू आहेत आणि तो लोक मनापासून स्वीकारतील जेणेकरून एक सुसंस्कृत समाज जगाला मिळेल या आशेने लोक हिंदुत्वाकडे बघत आहेत. तो परमोच्च बिंदू गाठण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी, नुसता टिळा डोक्याला लावून हिंदू म्हणवून घेण्यात काही पुरुषार्थ नाही. माधव भोळे

काँग्रेसची पक्षफुटी:

काँग्रेसची पक्षफुटी: गेले 15 दिवस, देश 56 वर्ष जुन्या, महाराष्ट्रातील शिवसेनेसारख्या कॅडरबेस पक्षात फुटी कशी होते याबद्दल प्रसार माध्यमातून बघत आहे. पण जसजसे पक्ष जुना होत जातो आणि नवीन नेतृत्व येते तसतसे ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. काँग्रेस सारख्या 137 वर्ष जुन्या पक्षाला पण ते चुकलेले नाही. 1857 च्या भारतातील स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांचे धाबे दणाणले. हा देश कसा चालवायचा आणि याला कसे नियंत्रित करायचे याबद्दल ब्रिटनच्या संसदेमध्ये विविध खल होत असत. 1883 साली ऍलेन ह्युम ह्या ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्याने सुशिक्षित भारतीय लोक आणि ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये सम्पर्क तसेच विचार विनिमय व्हावा, इंग्रज भारतात करत असलेले सुधारणेचे प्रयत्न भारतीयांना कसे उपयोगाचे आहेत आणि भारतीयांच्या आशा आकांक्षा ब्रिटिश सरकार पर्यंत कशा पोहोचवता येतील या दृष्टीने एक व्यासपीठ तयार होईल अशी कल्पना ब्रिटिश सरकारपुढे मांडली. कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आमंत्रण देऊन तसेच त्यावेळचा व्हाईस रॉय लॉर्ड डफ्रिन यांच्या पूर्व परवानगीने त्याने 28 ते 31 डिसेंबर 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संस्थेचे पाहिले अधिवेशन उमेश चंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे भरवले. मुळात त्यांना ते पुणे येथे भरवायचे होते, परंतु कॉलरा च्या साथीमुळे ते मुंबईत घेतले गेले. या सभेला विलियम वेडरबर्न, दादाभाई नौरोजी,मुंबई, पुणे सार्वजनिक सभेचे गणेश वासुदेव जोशी, सुधारक या वर्तमान पत्राचे संपादक आणि पुणे येथील समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर, जस्टीस काशिनाथ त्र्यंबक तेलंग, हिंदू समाज सुधारक नारायण गणेश चंदावरकर, सर दिनशॉ वाच्छा असे एकंदर 72 प्रतिनिधी होते. सुरवातीला भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा हा ह्या परिषदेचा उद्देश होता, जो पुढे भारतीय स्वातंत्र्य या विषयावर परिवर्तित झाला. पूर्वी या संस्थेचा सरकारच्या नजरेत आवश्यक त्या सुधारणा आणून, पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी याचे साहाय्याने सरकार दरबारी सहानुभूती तयार करणे एवढाच उद्देश असायचा. त्यांनंतर या संस्थेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अनेक उच्चशिक्षित मंडळी या काँग्रेसला जोडली गेली. त्या पक्षात पुढे 1890 मध्ये लोकमान्य टिळक, आणि 1920 मध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी सारखे नेते पुढे जोडले गेले. लोकमान्य टिळकांना त्यावेळचे गोखले, दादाभाई नौरोजी सारखी मंडळी यांचे धोरण अतिशय सौम्य आणि मुळमुळीत वाटायचे. त्यामुळे काँग्रेस मध्ये पहिली फूट पडली. मवाळ गट म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर सारखी ज्यांना स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणा महत्वाच्या वाटायच्या या विरुद्ध लोकमान्य टिळकांच्या मते आधी स्वातंत्र्य मग सुधारणा करायच्या त्या आम्ही ठरवू असे वाटायचे. कलकत्ताचे बिपीन चंद्र पाल, पंजाबचे लाला लजपतराय आणि महाराष्ट्र चे लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने जहाल गट स्थापन झाला तर गोपाळ कृष्ण गोखले , दादाभाई नौरोजी सारख्या लोकांना मवाळतेचा शिक्का बसला. 1907 साली सुरत येथील काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्ष मवाळ गटाचा असावा की जहाल गटाचा असावा यावरून तुफान राडा झाला आणि काँग्रेस मध्ये पहिल्यांदा धोरणात्मक फूट पडली. ब्रिटन मधून शिकून आल्यावर 1912 साली जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे सभासद झाले! पुढे 1915 साली साऊथ आफ्रिकेतील वंशवाद लढा यशस्वी केल्यानंतर महात्मा गांधी मुंबईला परतले. काँग्रेसचे जुने मवाळ नेते गोपाळ कृष्ण गोखले यांनी काँग्रेसची सूत्र महात्मा गांधींच्या हाती घेण्यास विनंति केली. तसेच ते करण्यापूर्वी संपूर्ण भारत फिरून भारताच्या लोकांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आणि त्यांच्या गरजा समजून घेण्यास सांगितल्या. मधल्या काळात 1920 साली टिळकांचा मृत्यू झाला होता आणि जहाल गटाचा पगडा हळूहळू कमी होऊ लागला. 1923 साली जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांनी त्यावेळच्या काँग्रेस नेतृत्वाने ब्रिटिशांकडे सम्पूर्ण स्वराज्य मागावे अशी विनंती केली पण त्यावेळच्या काँग्रेस नेतृत्वाला ती घाई वाटत होती. त्यांचे म्हणणे आधी सुधारणा मग स्वातंत्र्य. ती मागणी मान्य न झाल्यामुळे कंटाळून मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी "स्वराज पार्टी" नावाचा स्वतःचा वेगळा पक्ष काढला. त्यांचे ध्येय होते "संपूर्ण स्वराज्य". ही काँग्रेसची दुसरी मोठी फूट. 1924 साली महात्मा गांधी बेळगाव अधिवेशनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. पुढे 1938 ला सुरत जवळील हरिपूरा मधील काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले. पुढे 1939 मध्ये जबलपूर, मध्यप्रदेश जवळील त्रिपुरी, मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षकीय निवडणुकीत सुभाष चंद्र बोस यांनी महात्मा गांधींनी सुचवलेल्या डॉ पट्टाभि सितारामैया या उमेदवाराचा 1580 विरुद्ध 1377 असा सपशेल पराभव केला आणि ते दुसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. सुभाष चंद्र बोस ना ब्रिटिश सरकारला 6 महिन्याच्या आत भारतातून चले जावं असे सांगायचे होते परंतु गांधीजींच्या मते देश आणि कॉंग्रेस त्याला अजून तयार नव्हता. डॉ. पट्टाभि सितारामैया यांचा पराभव महात्मा गांधींच्या जिव्हारी लागला. त्यामुळे नेहरू, पटेल, गोविंद वल्लभ पंत या सारख्या महात्मा गांधींच्या अनुयायांनी राजीनामा देऊन सुभाषचंद्र बोस ना एकटे पाडले. सुभाषचंद्र च्या लक्षात आले की आपले विचार कितीही योग्य असले तरी महात्मा गांधीच या काँग्रेस चे अनभिषिक्त अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून स्वतःचा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला त्याचे अस्तित्व बंगाल पुरते मर्यादित राहीले. याच काळात काँग्रेस मधील जय प्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया या काँग्रेस मधील लोकांनी शेतकरी, कामकरी, ट्रेड युनियन, वगैरे लोकांच्या हितासाठी 1934 साली काँग्रेस सोशियलिस्ट पार्टी काढली. पुढे नेहरूंनी 1947 च्या स्वातंत्र्या नंतर काही प्रमाणात सोशियालीझम ची नीती धोरणे वापरायला केल्यामुळे या मंडळींनी ही पार्टी बरखास्त केली. नेहरूंच्या धोरणांचे ते खूप चाहते बनले. 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्रीजींच्या निधनानंतर काँग्रेस मध्ये दोन तट पडले एक जुन्या लोकांचा, जुन्या उजव्या विचारसरणीचा जे सोव्हिएत युनियनशी संबंध ठेवण्यात रस घेत नव्हता तर दुसरा इंदिरा गांधींचा ज्यांना सोव्हिएत युनियन बरोबर मैत्री ठेवून समाजवादी लोकप्रिय योजना आणि घोषणा देऊन सरकारला आणी पर्यायाने काँग्रेसला पाठिंबा घेणाऱ्यांचा, भले त्यासाठी देशाचे पैसे ( अनाठायी ) खर्च झाले तरी चालतील. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी गरिबी हटाव ची घोषणा दिली तसेच 19 जुलै 1969 ला 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि गरिबांसाठी लोन मेळे भरवून राष्ट्रीयकृत बँकांचा पैसा खिरापतीसारखा वाटून लोकांची सहानुभूती मिळवली. या मतभेदांमुळे काँग्रेस ने 12 नोव्हेंबर 1969 ला इंदिरा गांधींना पक्षातून काढून टाकले आणि इंदिरा गांधींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (R) नावाचा नवीन पक्ष स्थापन केला, त्याला लोक काँग्रेस (I) सुद्धा म्हणत I म्हणचे इंदिरा, तर जुन्या लोकांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (O) झाला किंवा त्याला सिंडिकेट काँग्रेस म्हणायाचे ज्यात कामराज, मोरारजी देसाई, निजलींगप्पा सारखे नेहरूंच्या वेळचे जुने सहकारी लोक होते. इंदिरा गांधींच्या बाजूने 705 पैकी 446 काँग्रेस चे प्रतिनिधी उभे राहायले. पुढे सिंडिकेट कॉंग्रेस जनता पक्षाच्या विलीन झाली. आता जी काँग्रेस आहे ती काँग्रेस आय आहे. 10 जून 1999 रोजी, सोनिया गांधींचा भारतीय नागरिकत्व हा मुद्दा घेऊन काँग्रेस पक्षातील त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील काँग्रेसी श्री शरद पवार यांनी पी के संगमा, तारिक अन्वर यांच्या साहाय्याने केला आणि त्यामुळे शेवटी त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टी नावाची पार्टी काढली जीचे अस्तित्व महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे. 1 जानेवारी 1998 रोजी पश्चिम बंगालच्या लोकांच्या आशा आकांक्षा पुरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या लढाऊ नेत्या मूळ काँग्रेसी श्रीमती ममता बॅनर्जी यांनी त्रिणमूल काँग्रेस नावाचा पक्ष काढला आणि काँग्रेस परत एकदा फुटली. 1969 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेहरू गांधी परिवाराची दासी बनली आहे असे काही जणांचे म्हणणे आहे. गेले काही दिवस या पक्षाची वेगवेगळ्या निवडणुकांची कामगिरी बघितली तर ही बुडणारी बोट आहे असे लोकांना वाटते. काँग्रेसची अधोगती वाचवण्यासाठी गेल्या वर्षी काँग्रेस मधील 23 जास्त प्रभावी व्यक्तींनी श्रीमती सोनिया गांधी यांना एक पत्र लिहून संघटनेत मोठे बदल करण्याची विनंती आणि अपेक्षा केली आहे. बघूया किती काळ काँग्रेस सोनिया गांधी आणि गांधीपरिवाराच्या नियंत्रणा खाली रहाते!. शिवसेनेचे जेष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसात, शिवसेनेच्या 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार यांच्या साहाय्याने आणि भाजप च्या संपूर्ण सहकार्याच्या आश्वासनाची जोरावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना पक्ष अजून किती दिवस ठाकरे परिवाराच्या नियंत्रणा खाली राहतो हे बघणे इष्ट ठरेल. माधव भोळे,

Thursday, June 30, 2022

टूर ऑपरेटर

टूर ऑपरेटर "टूर ऑपरेटर: काश्मीर, वैष्णवदेवी, वाघा बॉर्डर म्हणजे शुद्ध फसवणूक". आज एका ब्लॉग वर वरील आशयाचे वाक्य वाचायला मिळाले. हाऊस बोट देखावा आणि प्रत्यक्ष या विषयावर ही चर्चा होती. प्रवास वर्णन वाचणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात नक्कीच फरक आहे. परंतु अनेक लोक आपला टूर ऑपरेटर निवडताना वेगवेगळ्या, काही वेळा अवास्तव अपेक्षा करतात. अनेकांना अतिशय कमी दिवसात ह्या ट्रिप करायच्या असतात किंवा कमी पैशात आणि जास्तीतजास्त सुविधा देणाऱ्या हव्या असतात. काहींना तर काश्मीर किंवा केरळ च्या ठिकाणी मराठी पुरण पोळी किंवा मोदक असे अपेक्षित असतात. मला कळत नाही की तुम्ही कॅटरर बघता अहात की टूर ऑपरेटर? काश्मीर, वाघा बॉर्डर, वैष्णवदेवी म्हणजे सर्वात मोठी फसवणूक हे वाक्यच लेखकाच्या विचाराचा धुंडोला देतो. भारत हा खंडप्राय देश आहे, तेथे ऋतुमानानुसार हवामान बदलते. काश्मीर हे नंदनवन आहे यात कोणाचेही दुमत नाही. तुम्ही कोणत्या सिझनला जाता, तुमच्या प्रवासातील टप्पे आणि त्यातील धावपळ किंवा लगबग तुम्हाला त्या प्रवासाचा आनंद देते. कित्येक ठिकाणी स्टे न करता आपण फक्त वरवर स्पॉट पूर्ण करायचे म्हणून धावत असतो, त्याला टुरिसम म्हणता येईल का? मग म्हणायचे की आमची निराशा झाली. ज्या वेळी मोसम सुंदर असतो त्यावेळी टुरिस्ट ची संख्या त्या भागात जास्त असते आणि त्यामुळे हॉटेलची भाडी सुद्धा जास्त असतात हे सरळ लॉजिक असल्यामुळे अनेक स्वस्त टूर ऑपरेटर ऑफ सिझनला टूर घेऊन जातात. आता त्यावेळी जायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे. काश्मीर सारख्या ठिकाणी घोडे घेताना खूप बर्गेनिंग करावे लागते पण ती गोष्ट आपल्या माथेरान ला सुद्धा आहे. काश्मीर ला टॅक्सी युनियन आहेत ते फिक्स भावात काम करतात हे तेथे गेल्यावर कळते. अमृतसर आणि वाघा बॉर्डर किंवा जवळील रणजित सिंग म्युसीयम चा किल्ला असलेला टुरिस्ट स्पॉट हे अप्रतिम आहेत. त्यांचे वर्णन शब्दात वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवणेच चांगले. लोकांना लंडन मधील बकिंगहॅम पॅलेस समोरील चेंज ऑफ गार्ड बघितले की स्टेटस वाढल्यासारखे वाटते पण वाघा बॉर्डर ( खरे नाव अतारी बॉर्डर आहे) वरील पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आमने सामने होणारा चेंज ऑफ गार्ड चा 1 ते 1.30 तसाचा कार्यक्रम फसवणूक वाटते या सारखे आश्चर्य नाही! काश्मीर,केरळ, कन्याकुमारी, गढवाल, हिमाचल, सुंदरबन, सेवन सिस्टर्स, गोवा,अंदमान अगदी भारताचा कोणताही नावाजलेला टुरिस्ट स्पॉट घ्या त्यात लोकांना भरभरून बघण्यासारखे आहे. फक्त वाजवी दरात ते कसे बघायचे या साठी काही मन्त्र आहे. मी कधीच कुठल्या टूर ऑपरेटर बरोबर जात नाही. आमच्या फॅमिली आणि मित्रमंडळींची टूर स्वतः अरेंज करतो. साधारण पणे दिवसाला 2 ते 3000 माणशी प्रतिदिन असा खर्च येतो. यात प्रवास खर्च सुद्धा येतो आणि जेवण खाणा सहित. साऊथला हॉटेल भाडी कमी आहेत. नॉर्थला जास्त आहेत. जेवण आपण घेऊ तसे आणि त्या दर्जाचे आहे. आता भारतात सर्वत्र सर्व मिळते ( पुरण पोळी आणि मोदक सोडून☺️). मेक माय ट्रिप किंवा बुकिंग डॉट कॉम सारख्या वेबसाईटवर अनेक पाहिजे ती पाहिजे त्या दर्जाची हॉटेल्स उपलब्ध असून एकही पैसा किंवा क्रेडिट कार्ड लिंक न करता आपण ती बुक करू शकता आणि वेळ पडल्यास प्रवासाच्या आधी दोन दिवसपर्यंत कोणताही चार्ज न पडता बुकिंग रद्द करू शकता. सम्पूर्ण प्रवास ऑनलाइन बुक होऊ शकतो. लोकल साईट् साईट सिनिंग आपण ऑनलाइन टॅक्सी बुकिंग किंवा त्या हॉटेलच्या मॅनेजर शी बोलून करू शकतो कारण त्यांना तेथील लोकल जास्त माहिती असते. आपल्याला जर टूर ला जायचे असेल तर तेथील वातावरण, त्यावेळचे हवामान, तेथील टुरिस्ट स्पॉट, त्यामधील अंतरे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग, वेगवेगळ्या वाहन व्यवस्था, त्यांचे दर, अशा सर्व गोष्टी थोड्या अभ्यास केल्या तर आपल्या ज्ञानात सुद्धा भर पडते आणि खर्च सुद्धा कमी होतो. मेहेनत घेतली तर सर्वानाच त्याचा लाभ होतो. आणि हो अडचण आली तर तेथील लोक नक्कीच मदत करतात. अजून ती माणुसकी भारतात आहे. अजूनपर्यंत मला कधी वेळ आली नाही पश्चाताप करण्याची की मी स्वतः टूर अरेंज का केली त्याची कारण सर्व ट्रिप सुंदर झाल्या. माधव भोळे

प्रेयसिकडून परमेश्वराकडे ...

प्रेयसिकडून परमेश्वराकडे ... एकदा आय. आय. टी. पवई मध्ये महाराष्ट्र मंडळ, आय. आय. टी. तर्फे एक कार्यक्रम होता त्या अंतर्गत सुप्रसिद्ध साहित्यिक कै. विद्याधर गोखले यांचे व्याख्यान होते. व्याखानाचा विषय होता "प्रेयसिकडून परमेश्वराकडे". हे शिर्षकच मुळी आश्चर्यकारक होते. खरे तर प्रेयसी आणि परमेश्वर हे दोन असंबद्द विषय. असो. गोखले उर्दूचे अभ्यासक आणि पूर्व प्राध्यापक, लोकसत्तेचे संपादक. उर्दू शेरशायरी हा त्यांचा आवडता विषय. मिर्झा गालिब हा अर्थातच त्यांचा आवडता कवी. त्यांनी उदाहरण देऊन सुरवात केली. म्हणाले गालिब म्हणतो, ईशक ने गालिब निककमा कर दिया. गालिब आपल्या प्रेयसीला म्हणतो की मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो, परंतु तुझ्या दरबारात आलो की जे मोठे शेट, धनवान मंडळी असतात ते पुढे पुढे करतात आणि कुठेतरी कोपऱ्यात बसून तुझी एखादी प्रेमळ नजर माझ्यावर कधी पडेल याची मला वाट बघायला लागते. सगळ्या शेटजींना तू तुझ्या हातानी सुरई भरून जाम ( मदिरा) पाजते आणी मी मात्र तुझ्या हातुन मदिरेच्या एका एका थेंबाची वाट बघत बसतो. मिर्झा पुढे म्हणतो, माझ्या मनातील दर्द ( वेदना, प्रेम) सांगण्यासाठी चिट्ठी लिहीत होतो, बऱ्याच चिठ्ठ्या लिहिल्या आणि फाडून टाकल्या कारण काय लिहावे शब्दच सुचत नव्हते. शेवटी धीर करून मेहेंदीच्या पानावर माझ्या हृदयाची शाई करून प्रेम पत्र लिहिले, आणि माझ्या बाजूच्या मुलाकरवी तुझ्याकडे पाठवले. तू न वाचताच त्या चिट्ठी चा चोळामोळा करून टाकलास. मी म्हटले ठीक आहे नाहि वाचलिस तर नाही पण निदान त्या मेहेंदि ने रंगलेले तुझे हात बघून माझ्या प्रेमाची पोच पावती मला मिळाल्यासारखे वाटले. गोखले पुढे म्हणतात, खऱ्या भक्तांचे असेच असते, परमेश्वराच्या दरबारात हे धनिक, शेटजी लोक पुढे पुढे करत आरती घेतात आणि आरतीत चांगले पैसे टाकतात म्हणून पुजारी त्याना विशेष दर्शन आणि पूजा करायला मदत करतात आणि खरे गरीब बिचारे भक्त दूरवर गर्दीमध्ये देवाचे लांबून का होईना मुख दर्शन तरी होईल का ह्याचा विचार करत मैलोनमैल लांब रांग लावतात. नक्कीच प्रेयसी आणि परमेश्वर यांचे या बाबतीत तरी साम्य आहे असे म्हणायला काय हरकत आहे. खऱ्या प्रियकराची किंवा खऱ्या भक्तांची या दोघांनाही कदर नाही. हे व्याख्यान ऐकुन मला सुद्धा एकदम हसू आले. मनात म्हटले, अगदी हीच परिस्थिती सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची सुद्धा आहे. जे खरे कार्यकर्ते असतात ते कायम कामच करत राहतात मग त्यांना एखादा तुकडा टाकावा त्याप्रमाणे सचिव, उपसचिव, नाहीतर संयुक्त सचिव म्हणून पद देऊन त्यांची बोळवण करून त्यांना आयुष्यभर काम करायला लावले जाते आणि जे धनिक आहेत, जे वर्षानुवर्षे काहीही काम न करता झब्बे घालून स्टेजवर वर्षांतून एकदा भाषणे ठोकतात ते अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे पदे मिरवत असतात. थोडक्यात काय पळसाला पाने तीन !! माधव भोळे

रोह्याच्या गोट्याची चाय!!

रोह्याच्या गोट्याची चाय!! काल 31 मे. महिना संपत आला होता. मी आणि माझ्या मोठया भगिनी, आमच्या वीर गावातील घराच्या अंगणात बसलो होतो. सुट्टीवर आल्यामुळे वेळच वेळ होता. दोन वेळा जेवायचे आणि गावामध्ये भटकायचे, संध्याकाळी मनसोक्त गप्पा मारायच्या एव्हढाच उद्योग. मी तिला जॅक मा (अलिबाबा.कॉम) , जेफ बेझो (ऍमेझॉन), एलोन मस्क ( टेस्ला), डॉक्टर हॅमर ( ऑक्सिडेंटल पेट्रोलियम ), रितेश अगरवाल ( ओयो रूम्स अँड हॉटेल्स), संजीव भिकचंदानी ( नोकरी.कॉम) वगैरे लोकांच्या जीवनाबद्दल आणि त्यांनी गाठलेल्या आयुष्यातील उंची बद्दल सांगत होतो. तिने या गोष्टींबद्दल फार ऐकले नसल्याने तिला फार आश्चर्य वाटले. सामान्य घरातून आलेल्या व्यक्ती एव्हडी मोठी उंची गाठू शकतात या बद्धल तीला आनंद झाला. तिने विचारले की आपली मुले असे काही का करत नाहीत? आज आमच्या देशात अनेक उच्चशिक्षित लोक आहेत. त्यांच्या पगाराचे आकडे ऐकून तर मती गुंग होते. पण यातील अनेक मंडळी कोणत्या ना कोणत्या व्यवसायिकाकडे, उद्योजकाकडे किंवा MNC मध्ये नोकरी करत असतात. ह्या सर्व मंडळींना चांगल्या प्रकारचे ज्ञान असते, परंतु कमी असते ती ईर्षा, हिम्मत, रिस्क घेण्याची ताकद आणि सर्वात महत्त्वाचे, आपण घेत असलेल्या निर्णयाची खात्री ( conviction). ज्या वेळी एखादी व्यक्ती सर्व विचारांती एखादा निर्णय घेते त्या वेळी तो निभावून नेण्याची क्षमता त्याच्यात येते ती त्या व्यक्तीकडे असलेल्या निर्णयाबद्दलची खात्री असेल तर. ती खात्री नसेल तर तुम्ही किती शिक्षित आहेत, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमचा किती वशिला आणी वजन आहे त्याची काही किंमत होत नाही, जसे की एखादा भरदार छातीचा तगडा माणूस पाण्यात पोहोत असेल तरी जर आत्मविश्वास नसेल तर तो अडचणीत येऊ शकतो तसेच. आमच्यामध्ये किंवा आमच्या मुलांमध्ये हे आदर्श का नाहींत? आम्ही आमचा वेळ खरोखर योग्य ठिकाणी खर्च करतो का? आमच्या करियर प्लानिंगला आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही वेळ देतो का? आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो का? याचा विचार आपण केला पाहिजे. या उलट आम्ही इतिहासात रमतो. छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, चाफेकर बंधू, भगतसिंग, सुभाष चंद्र बोस, हिंदू आणि हिंदुत्व, नरेंद्र मोदी, अयोध्या इत्यादी विषय आले की आमच्या लेखण्या फेसबुकवर धारदार होतात किंवा आमच्या चर्चानमध्ये आमचा आवाज चढतो, पण त्यांनी केलेल्या कर्माची उद्दिष्टे काय होती आणि आम्हि त्यातील किती करत असतो याचा विचार होत नाही. वरील सर्व आदरणीय व्यक्ती एका विशिष्ठ उद्दिष्टांनि जगल्या. भारत मातेची सेवा करणे, संस्कृतीचे जतन करणे ही त्यातील प्रमुख उद्दिष्टे होती. आता काळ बदलला आहे. देश सेवा करण्याचे अन्य मार्ग सुद्धा उपलब्ध आहेत त्यावेळी सुद्धा होते. पूर्वी स्वदेशी चळवळीच्या वेळी बिर्ला, टाटा, बजाज, पैसा फ़ंड वाले काळे सारख्या उद्योजकांकरवी देशाच्या उत्पादनात वाढ करणे आणि रोजगार निर्मिती करून गरिबी दूर करणे ही सुद्धा देश सेवाच आहे असे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या धुरीणांचे म्हणणे होते. प्रत्येकाने जेल मध्ये जायला पाहिजे, गोळ्या खायला पाहिजे, फाशी जायला हवे असे नाही. त्यामुळे ज्याला जमेल तसे त्याने काम करायला हवे. अमेरिका श्रीमंत आणी प्रगत झाली कारण तेथे अनेक उद्योजक तयार झाले आणि त्यांच्या आणि त्यांच्या कामगारांच्या टॅक्स मधून देशाची प्रगती झाली. अमेरिकेतील अनेक कंपन्या जगभरात कारभार करून तेथील उत्पन्न अमेरिकेत नेतात. ( उदा. गुगल आणि फेसबुकवर वर जगभर जाहिराती टाकल्या जातात आणि त्याचे उत्पन्न थेट अमेरिकेत जाते.) स्वीडन आणि युरोपमधील अनेक औषध कंपन्या जगभर आपली उत्पादने विकत असतात. टेक्नॉलॉजी बदलांमुळे आता प्रगतीचे आणखीन नवनवीन मार्ग तयार झाले आहेत. कदाचित त्याला तुम्ही इकॉनॉमिकल इमपीरियालीझम म्हणू शकता. पण हे सत्य आहे. विनोबा भावे सांगतात, प्रत्येकाने आपले अंगण साफ केले तरी देश साफ होईल. त्यामुळे प्रत्येकाने प्रयनांची पराकाष्ठा करायला हवी. आयुष्यात कधीतरी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हायला हवे. देशसेवा करण्याचा हा एक राजमार्ग असू शकतो. आज वीरहुन रेल्वे ने मुंबईला परतत असताना रोहा स्टेशनवर एक चहावाला आला आणि ओरडला रोह्याच्या गोट्याची चाय!! कोणीतरी त्याची मस्करी केलीं हे काय नवीन रे. तो म्हणाला तुम्ही माझी मस्करी करा. तुम्ही अमृततुल्य चहाचे नाव ऐकले असेल. मला पण माझा ब्रँड बनवायचा आहे. या रेल्वेमध्ये माणगाव ते पनवेल पर्यंत माझ्याच चहाची आठवण लोकांना झाली पाहिजे. मला पण माझा ब्रँड बनवायचा आहे "रोह्याच्या गोट्याची चाय!!". मी म्हटले मान लिया बॉस. तुझे स्वप्न तरी मोठे आहे. तू नक्कीच ते साध्य करशील. माझे एक जेष्ठ (senior) होते, ल. गं. भोळे, फार मोठा माणूस. ते सांगायचे " Having low aim is crime, failure is not". त्यांची आणि त्यांच्या त्या वाक्याची या निमित्ताने आठवण झाली. माधव भोळे

पथदर्शी

पथदर्शी गेले काही दिवस मी आय आय टी, आय आय एम सारख्या अति उच्च शिक्षित लोकांची वर्णने वाचत आहे. त्यांनी साहित्य, कादंबऱ्या, मौंटेनियरिंग, साहसी वृत्ती, व्यक्तिमत्व विकास सारख्या विषयात आपले नाव कोरले आहे आणि खूप वलय निर्माण केले आहे. अनेक लोक त्यांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या लोकांमध्ये मिसळण्याच्या सहज स्वभावामुळे भारावून गेले आहेत. लोक त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून बघत आहेत. एक यशस्वी व्यक्ती आणि एक माणूस म्हणून असलेल्या त्यांच्या या गुणांची नक्कीच कदर करायला हवी. पण खरच, आय आय टी, आय आय एम सारख्या संस्था अशा प्रकारची मंडळी तयार करण्यासाठी निर्माण झाल्या आहेत का? आय आय टी आणि आय आय एम सारख्या संस्था भारतात आणि जगात इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन शिक्षण देण्यासाठी प्रसिध्द आहेत. या मंडळींच्या शिक्षणाचा आणि बुद्दीमत्तेचा खरच जगाला जाऊन दे पण निदान आपल्या देशाला तरी किती प्रमाणात उपयोग होत आहे ? सरकार एका आय आय टी विद्यार्थ्यामागे वार्षिक रु 6 लाख, एका आय आय एम विद्यार्थ्यामागे वार्षिक 8 लाख आणि एका फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट च्या विध्यार्थ्यांचे मागे वार्षिक 15 लाख खर्च करते. ज्या वेळीं ह्या संस्था स्थापन झाल्या त्यावेळी देश उभारणीसाठी यातील विद्यार्थ्यांचा उपयोग होईल हा एक उदात्त हेतू होता. मला विचाराल तर मला पद्मश्री श्रीधर वेम्बु हा तंजावर, तामिळनाडू मधील एन्टरप्रिनर आवडतो. ५६ वर्षांचा श्रीधरने आय आय टी मद्रास मध्ये इलेक्टरीकल इंजिनिअरिंग शिकून पुढे अमेरिकेत प्रिन्सनटन युनिव्हर्सिटी मध्ये एम एस आणि पी एचडी करून स्वतःची एक झोहो नावाची नेट्वर्किंग आणि सॉफ्टवेअर as सर्व्हिसेस देणारी कम्पनी स्थापन केली. त्याच्याकडे 12,000 लोक जगभरात काम करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या अमेरिकेतील बे एरिया मध्ये असलेल्या झोहो कम्पनीचे आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यालय चेन्नई जवळील एका उपनगरात हलवले असून त्याने तामिळनाडूच्या ग्रामीण भागात झोहो स्कुल नावाची प्रशिक्षण संस्था काढून तेथुन प्रशिक्षित झालेल्या लोकांना तो आपल्या कम्पनी मध्ये सामावून घेतो. स्वतः श्रीधर चेन्नई जवळील त्याच्या गावात राहून टिपिकल ग्रामीण आणि निसर्गाशी जवळीक साधणारे जीवन जगत असताना त्याच्या अत्याधुनिक अशा ऑफिसमध्ये तो सायकल ने जातो. गेल्याच वर्षी भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांनी त्याच्या कार्याचा पद्मश्री देऊन गौरव करून त्यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीमध्ये आय टी विषयात सल्लागार म्हणून स्थान दिले. झोहो ची 2022 मधील उलाढाल रु 5231 कोटी असून तिच्या मालमत्तेची किंमत usd 570.7 million आहे. ही आहे आय आय टी च्या शिक्षणाची ताकद आणि किंमत सुद्धा. मला इन्फोसिसचे नारायण मूर्ती आवडतात. नारायण मूर्ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, म्हैसूर मधून इलेक्टरीकल इंजिनियर झाले आणि त्यानंतर आय आय टी कानपुर मधून एम टेक झाले. काही वर्षे दुसऱ्या कम्पनिमध्ये काम केल्या नंतर त्यांनी महाकाय अशी इन्फोसिस कम्पनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने स्थापन करून देशभरातील लाखो युवकांना आय टी क्षेत्रात चांगले पगार देऊन आकर्षित केले आणि शेयर होल्डर्स ना सुद्धा मालामाल केले. कॉर्पोरेट गव्हर्ननन्स चा आदर्श घालून सेबी सारख्या संस्थांना पथदर्शक कामगिरी करून देशाच्या सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस क्षेत्रात अब्जो रुपयांची वाढ करून दाखवली ( सॉफ्टवेअर आणि बी पी एम चा 2022 मध्ये देशाच्या जी डी पी मधील वाटा 8% म्हणजे 194 बिलियन डॉलर्स किंवा 14 लाख 55 हजार कोटी एव्हडा आहे). इन्फोसिस मुळे भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्राला जगात मान मिळायला मोठा हातभार लागला असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. इन्फोसिस ची 2021 ची वार्षिक उलाढाल 1,01,700 कोटी रुपये एव्हडी असून तेथे 2,60,000 एव्हडे पगारदार काम करतात. इन्फोसिस चे शेयर भारतातच काय पण अमेरिकेतील न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि न्यासडाक ह्या टेक्नोलॉजी कंपन्यांच्या स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट झाले आहेत. ही आय आय टी ची आणि इंजिनियरिंगची ताकद. आय आय एम अहमदाबाद च्या पूर्व विद्यार्थीनि इंदिरा नुई ह्या जागतिक दर्जाच्या पेप्सीको कम्पनीचा अध्यक्षा झाल्या आणि पेप्सीको चे लेज आणि कुरकुरे चे प्लांट त्यांनी भारतात सुद्धा उभारले. हैद्राबाद मध्ये पेप्सीको चा मँगो ज्यूस संबंधी कारखाना उभारावा म्हणून 2015 साली त्यावेळचे आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांना जाऊन भेटले तर त्यांनी सांगितले आम्हाला वर्षाला 25 कोटी टन आंबे लागतात.पण आंध्र प्रदेशमध्ये सर्व मिळून फक्त 7 कोटी टन आंबे तयार होतात. तुम्ही लागवड वाढवा. (आपल्या माहितीसाठी महाराष्ट्राचा नंबर आंबा उत्पादनात भारतात 5वा आहे). शिवाय आम्ही भारतातील ताजे नारळ पाणी विकायला सुद्धा उत्सुक आहोत आणि इतरही शेतीविषयक अन्न धान्य विकत घ्यायला उत्सुक आहोत. पेप्सी ने भारतात अनेक शेतकरी आणि कामगाराना रोजगार दिला. पंजाब मधून चिप्स साठी विशिष्ट प्रकारचे बटाटे आणि सॉस साठी आणि इतर पदार्थांसाठी विशिष्ट प्रकारचे टोमॅटो शेतकऱ्यांकडून करार पद्धतिने लावून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. ही आहे आय आय एम च्या शिक्षणाची ताकद. आय आय एम मधून शिकून पुढे नावाजलेले प्रसिद्ध अर्थशास्त्री आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नर डॉ रघुराम राजन, मास्टर कार्ड चे सी ई ओ अजय बंगा, मेक माय ट्रिप ह्या ट्रॅव्हल बुकिंग साईट चे सी ई ओ दीपक कालरा, जाहिरात क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व प्रसून जोशी असे एक ना अनेक मंडळी आपापल्या क्षेत्रात जगभर ठसा उमटवून आहेत. त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या बुद्धिमतेचा जगाला आणि शक्य असेल तेव्हा भारताला आणि भारतीयांना कैक पटींनी उपयोग होत आहेत. देशसेवा म्हणजे फक्त बंदुकीच्या गोळ्या खाल्याने किंवा फासावर लटकल्याने होते असे नाही. आपल्या बरोबर असलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी जरी हातभार लागला तरी ती देशसेवाच म्हटली पाहिजे. अर्थात कोणी आपले जीवन कसे व्यतीत करावे किंवा कोणी कोणाला आदर्श मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी काही व्यक्ती ह्या वादातीत आणि पथदर्शी असतात असे मला वाटते. माधव भोळे