Tuesday, December 2, 2025

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास

धर्म एक अफूची गोळी, भारत आणि विरोधाभास 


आज बिहार मधील पूर्व चंपारणमध्ये विराट रामायण मंदिर परिसरात, ३३ फूट उंच, १७.८ फूट परीघ असलेली २१० टन वजन असलेली, एकाच ग्रानाईट दगडातून कोरलेली, सहस्त्रलिंग शिवलिंगाची महाकाय मूर्ती स्थापन करण्यासाठी तामिळनाडू मधील महाबलीपुरम मधून निघाली असे वाचले. 


दिवसेंदिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारची देवळे स्थापून करून किंवा असलेल्या देवळानचा जीर्णोद्धार करून गेल्या ५०० वर्षात धर्माची आणि आस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न बहुतेक सत्ताधाऱ्यांकडुन होताना दिसत आहे. ही समाधानाची बाब आहे. पण त्या मागे नक्की विचार काय आहे हे जाणून घ्यायला हवा.


पूर्वीचे राजे महाराजे जनता भुकी किंवा अर्ध पोटी असताना सुद्धा अशा प्रकारची मंदिरे बांधून आपली धर्माबद्दलची आस्था, कर्तव्य आणि कलासक्ती याचे प्रदर्शन करीत. जनतेच्या अडीअडचणी, त्यांची सुख दुःखे आणि प्रशासनात बोकाळत चाललेला भ्रस्टाचार याच्याशी त्यांचे सोयर सुतक नव्हते कीवा ते जाणून घेण्याची तसदी ते घेत नसतं. एखाद दुसरा गुन्हेगार पकडला गेला तर त्याला कडेलोट करायचा की झाले काम ( ED सारखे ).


आज कालचे सर्वच राजकीय पक्ष अश्याच प्रकारचा विचार करतात. काल झालेल्या नगर पंचायत आणि नगर परिषदांमध्ये मतदानासाठी पैसे वाटून जागा जिंकण्याच्या कार्यक्रमात तर जणू स्पर्धाच लागली होती. कारण त्यांना माहिती आहे की एकदा जिंकून आले की जेव्हडे खर्च केले त्यांच्या १०० ते १००० पट ते हडप करू शकतात. सरकारी अनुदान, निधी वाटप, भूखंड लाटणे, टेंडर घोटाळे, टेंडर शिवाय वर्क ऑर्डर काढणे, नाले सफाई या साठी त्यांच्या सभामध्ये राजरोस हाणामाऱ्या होताना लोकांना दिसतात ते काही देशप्रेम म्हणून नव्हे. आणि या गोष्टी फक्त बदनाम नेत्यांबद्दलच नाही तर त्यांच्या चेल्या चपाट्या पासुन ते गल्ली मधील छोटया कार्यकर्त्या पर्यंत लागू आहेत. एव्हडी सरकारी ऑडिट होऊन सुद्धा हे घडते म्हणजे विचार करा. भ्रस्टाचार नुसता निधी खाण्यातच नाही तर सामान्य माणसांच्या सेवा पुरवण्यात सुद्धा होत आहे. मृत बॉडी पोस्ट मार्तंम केल्या नंतर पैसे दिल्याशिवाय लवकर मिळत नाही ही अवस्था आहे. ( सारांश सिनेमा बघा. पण ही सत्य परिस्थिती आहे.)


अशा वेळी मूळ मुद्धे झाकण्यासाठी, लोकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष व्हावे म्हूणन आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी धर्म ही एक अफूची गोळी म्हणून अनेक राज्यकर्त्यांनी कित्येक शतके याचा वापर केला आहे. 


औरंगजेब कोणतेही नीच कृत्य करताना ते इस्लामच्या इफाजतीसाठी करत आहे असे सांगून करायचा मग ते सक्ख्या भावाला दारा शु्कोहोला मारणे असून दे की जन्म दात्या बापाला कैदेत टाकणे असून दे आणि त्याचे पोसलेले मौलवी त्याच्या निर्णयावर हाजी म्हणायचे. बस.


धर्माचा मूळ उद्धेश अत्याचाराविरुद्ध लढणारा, सुसंस्कृत, संस्कारी नागरिक तयार करणे जों एक न्याय्य व्यवस्था असलेला समाज निर्माण करेल अथवा त्याचा भाग बनेल. त्याचसाठी वेद, रामायण, महाभारत, श्रीमद भगवद गीता, इत्यादी धर्म ग्रंथांची निर्मिती झाली. मंदिर किंवा देवमूर्ती हे त्या धर्माच्या आशा आकांक्षाचे प्रतिक मानले गेले. त्या मूळ उद्धेशाला हरताळ फासून चाललेली ही धर्म पुनरस्थापना हा एक दिखावाच म्हणावा लागेल. याचे कारण राजा कालस्य कारणम. 


मंदिरे बनवूच नयेत या मताचा मीं नाही, परंतु हा देश धर्माने चालावा असे वाटतं असेल तर जमिनीवरील त्रुटी कमी करून सुधारणा होणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे असे मीं मानतो. मीं एक सनातनी असून धर्म आणि देव मानतो म्हणून हे लिहावेसे वाटले.


माधव भोळे

Monday, December 1, 2025

देव धर्म आणि कुळाचार

देव धर्म आणि कुळाचार 


आज काल अनेक मंडळींना आपल्या घरचा देव धर्म, कुलदेवता, कुळाचार, गोत्र, इत्यादी गोष्टी माहिती नसतात. मग अडचण आली की लोक कोणा कोणाला तरी विचारत राहतात आणि अर्धवट माहितीवर पुढे काम करतात. 


पुढील पिढी इंग्रजी माध्यमातून शिकलेली असणार अशा वेळी ही माहिती आवश्यक आहे असे वाटते. कित्येक वेळा पुढील पिढीला ते सांभाळायचे असते परंतु त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसते.


जर आपण अशी माहिती आणि ते कुळाचार कसे करावेत याची थोडक्यात माहिती लिहून ठेवली तर किती सोपे होईल. तसेच प्रत्येक वेळचा नैवेद्य कसा करावा याची सुद्धा थोडक्यात माहिती लिहून ठेवायला हवी. 


आपण जर आपापल्या घरची ही माहिती लिखित स्वरूपात ठेवली किंवा त्याला लॅमिनेट करुन ठेवले तर त्याचा उपयोग आपल्या पुढील पिढ्याना होईल असे वाटते.

मला वाटते यात किमान खालील गोष्ट लिहायला हव्यात 


१. आडनांव

२. गोत्र

३. मूळ गांव आणि मूळ चौथऱ्याचा पत्ता 

४. लेख लिहिला त्या वेळचे वास्तव्य आणि पत्ता 

५. कुल देवता आणि कुल दैवत 

६. ग्राम देवता 

७. चैत्र हळदीकुंकू 

८. श्रावण मांस विशेष 

८.१ नारळी पौर्णिमा नैवेद्य ( जागर )

८.२ गोकुळ अष्टमी उत्सव 

८.३ श्रावण महिन्यातील एकादशण्या

८.४ वार्षिक रुद्र वगैरे करण्याची प्रथा 

९. गणपती आराधना ( किती दिवस ). 

९.१ गणपतीवर एकादशणी करतात कां? अथर्वशिर्ष पठण इत्यादी 

१०. गौरी आराधना ( कशी करतात ). खड्याच्या, मुखवटा, इत्यादी 

१०.१ गौरी नैवेद्य कसे आणि कोणत्या दिवशी करतात.

११. अनंत पूजा असल्यास ती कधी करतात 

१२. महालय पर्व : श्राद्ध & ते करण्याची पद्धत ( चटावर, पिंडदान इत्यादी ). श्राद्ध करण्याची तिथी. 

पिंडदान करण्यासाठी वडील, आजोबा, पणजोबा यांची तसेच तर्पण करण्यासाठी इतर जवळच्या नातेवाईकांची नांवे आणि गोत्र 

१३. नवरात्र : हिंदू पंचांगात ३/ ४ वेळेला नवरात्र या पैकी कोणतेही एक केले जाते.

१३.१ चैत्र नवरात्री 

१३.२ अश्विन नवरात्री 

१३.३ कार्तिक नवरात्री 

१३.४ मार्गशिर्ष नवरात्र ( खंडोबाचे ) इत्यादीl

नवरात्र स्थापन करणे, नवरात्र करण्याची पद्दत, बसता उठताना सवाष्ण, कुमारिका पूजन, महालक्ष्मी पूजन, अष्टमी होम, नवरात्र उठवणे, दररोज नैवध्य पद्धत 

१४ दीपावली नैवेद्य

१४.१ वार्षिक कार्तिकी किंवा तत्सम ग्राम दैवत उत्सव 

१४.२ देव दीपावली नैवेद्य 

१५. होळी उत्सव ( नैवेद्य गोडे नैवेद्य आणि तिखट नैवेद्य ). होलिका दहन 

१६. धनुर्मास नैवेद्य

१७ संक्रांत : हळदीकुंकू. 

     १७.१ संक्रांत नववधू विशेष.


आम्ही आमच्या वीर गावामध्ये श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवाचा उत्सव कसा साजरा करावा याचे असेच लिखाण करून ठेवले आहे, जे वज्रलेप पुरवणी मध्ये प्रसिद्ध केले आहे.


यात काही सुधारणा हवी असल्यास कळवावी.


माधव भोळे 


सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व

 सुयश टिळकची कोलंबोवारी, दित्वा चक्रीवादळ आणि कवित्व 


काल एक  तडफदार मराठी ब्राह्मण अभिनेता, सुयश टिळक याने श्रीलंकेतील दित्वा चक्री वादळात कोलंबो एअरपोर्ट बंद झाल्यामुळे त्याच्यासहित प्रवाशांचे झालेले हाल, तेथील एयरलाईन्स आणि भारतीय दुतावासाचे कर्मचारी यांनी आपल्या व्यक्तिगत अडचणी बाजूला ठेवून प्रवाश्याना मदत करण्यासाठी केलेले शर्थीच प्रयत्न आणि एकंदर ३८ तासाचा तो कठीण काळ या बद्धल वर्णन करणारी आणि सर्व मदत करणाऱ्या आणि प्रार्थना करणाऱ्या मित्र मंडळीचे आभार व्यक्त करणारी पोस्ट टाकली. पोस्टचा उद्देश सरळ आणि स्पष्ट होता.


परंतु ब्राह्मण माणसाने कुठलीही पोस्ट टाका त्यावर काही ठराविक समाजातील लोकांनी कुसकट, खवचट टिप्पणी नाही केली तर ते स्वतःला संविधान प्रेमी मंडळी कशी म्हणवतील? 


एकाने विचारले, "अरे तू तिकडे विदेशात कशाला गेला होतास? आता तू परत लोकमान्य टिळकांसारखे सोन्याच्या योनीतून प्रवेश करणार कां?".  विषय काय? तू लिहितोस काय? जरा तरी परिस्थिचे गांभीर्य? किती नीच वृतीची ही हलकट माणसे आहेत!!


होय लोकमान्य टिळकांनी आपला मुलगा श्रीधर याचा व्रतबंध करायचे ठरवले त्यावेळी पुण्यातील पुरोहित मंडळींनी त्यांना संगितले की तुम्ही विदेश यात्रा केली आहेत तर हिंदू धर्मातील प्रथेप्रमाणे तुम्ही प्रायश्चित घेतल्याशिवाय आम्ही तुमच्या मुलाची मुंज लावणार नाही. प्रायश्चित चित्त असे की त्यांनी प्रतिमात्मक सोन्याच्या योनीतून प्रवेश करायचा. 


त्यावेळी श्रीधर टिळक म्हणाले की माझी मुंज नाही झाली तरी हरकत नाही पण हे होऊ द्यायचे नाही. त्या वेळी लोकमान्यांनी ब्रह्मवृंदाच्या शब्दाला मान देत तो विधी केला आणि श्रीधरची मुंज लावली. त्या एका गोष्टीसाठी ब्राम्हण विरोधी मंडळींनी त्या काळी लोकमान्यानवर सडकून टीका केली. लोकमान्यांच्या ब्रह्मवृंदानंपुढे नमते घेण्याच्या एका चुकीसाठी त्यांच्या इतर सद्गुणानवर बोळा फिरवणारे हे कोण? ह्यांची काय लायकी?


तो काळ संपला, टिळक सुद्धा गेले आणि ते ब्रम्हवृंद सुद्धा गेले असणार, पण अजून १०० वर्षानंतर सुद्धा हेच ताशे आणि टोमणे लोक अजूनही मारत आहेत. सुंभ जळले तरी पिळ जळत नाही. 


मग कां कोणी वर्मा कर्मा IAS च्या कुटुंबात लोक आपली ब्राह्मण कन्या दान करतील? जों म्हणतो की जेथपर्यंत माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीच्या मुलाला कोणी ब्राह्मणव्यक्ती जेथ पर्यंत आपली मुलगी देत नाही तेथपर्यंत आरक्षण आवश्यक आहे. त्या मुलीला काय दररोज टोमणे खाऊन आत्महत्या करायची आहे?


जातीच्या भिंती होत्याच त्या अजूनच रुंदावत चालल्या आहेत इतकेच. सुधारणा काहीही नाही कारण द्वेष नसानसात भिनला आहे.


माधव भोळे 


Saturday, November 29, 2025

सयाजी शिंदे यांचे चुकलेच!!

सयाजी शिंदे यांचे चुकलेच!!


सयाजी शिंदे एक उत्तम अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी आहेत या बद्धल दुमत नाही. साधूग्राम मधील वृक्ष तोड हा सार्वजनिक तसेच जनतेचा विषय आहे तो लोकशाही मार्गाने सोडवायला हवा यातही वाद नाही. परंतु साधू संतांना "ते आले गेले मेले तरी काही फरक पडत नाही " अशी उर्मट भाषा त्यांना शोभतं नाही. माणसाचे संस्कार त्यांच्या वक्तव्यातुन आणि वागणुकीतुन प्रकट होत असतात.


आपल्या मागण्या कायदेशीर, सनदशीर मार्गाने, वृक्ष ऑथॉरिटी, environmental tribunal, कोर्ट आणि जनतेच्या दरबारात जरूर उचलून धरायला हव्यात परंतु लोकांच्या आदरस्थानी असलेला कुंभमेळा, साधू दर्शन आणि त्यांची उपस्थिती यावर अर्वांच्य भाषेत बोलण्याचे काही कारण नाही आणि तसा परवाना त्यांना कोणी दिला? 


यश डोक्यात गेले की माणूस अहंकारी होतो आणि आपले म्हणणेच बरोबर असे सर्वांनां ओरडून सांगायचा प्रयत्न येनकेन प्रकारे करतो. 


सयाजी शिंदे यांचे चुकलेच. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची चळवळ कमकुवत होते हे त्यांच्या लक्षात येत नाही.


माधव भोळे 

Wednesday, November 26, 2025

भारताचे संविधान कसे तयार झाले?

भारताचे संविधान कसे तयार झाले?

नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी भारत सरकारने २६ नोव्हेंबर २०१५ रोजी हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारताचे संविधान तयार करण्यासाठी १९४६ मध्ये एक संविधान सभा स्थापन करण्यात आली होती. या सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे सभेचे सर्वात वयस्कर सदस्य असल्याने ते तात्पुरते अध्यक्ष बनले. त्यानंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने १३ समित्या नेमल्या होत्या. यापैकी एक महत्त्वाची समिती होती मसुदा समिती, जिचे अध्यक्ष डॉ. बी.आर. आंबेडकर होते. या समित्यांच्या अहवालांच्या आधारावर सात सदस्यांच्या मसुदा समितीने संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला. 

'संविधान' शब्दांमध्ये कुणी लिहले होते?

भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. यात ३९५ कलमे, २२ भाग आणि ०८ अनुसूची आहेत. हे संविधान छापलेले किंवा टाईप केलेले नव्हते, तर ते इंग्रजी आणि हिंदीमध्ये हस्तलिखित होते. शांतिनिकेतनच्या कलाकारांनी आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली हे संविधान सुंदर अक्षरात लिहिले होते. दिल्लीत प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी या संविधानाची सुलेखन (calligraphy) केली. 

सिंधू संस्कृतीपासून ते राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ 

संविधानाच्या मूळ प्रती भारतीय संसदेच्या ग्रंथालयात विशेष हेलियमने भरलेल्या पेट्यांमध्ये सुरक्षित ठेवल्या आहेत. संविधानाच्या प्रत्येक भागाची सुरुवात भारताच्या इतिहासातील एखाद्या दृश्याने होते. नंदलाल बोस यांनी संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला भारताच्या राष्ट्रीय इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग चितारले आहेत. या २२ चित्रांमध्ये सिंधू संस्कृतीपासून ते राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या ४००० वर्षांच्या भारतीय इतिहासाची झलक दिसते. 

४२ वी घटनादुरूस्ती

संविधान १९४९ मध्ये स्वीकारले गेले तेव्हा नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्यांची (Fundamental Duties) कोणतीही तरतूद नव्हती, जरी मूलभूत हक्कांसाठी (Fundamental Rights) भाग तीन होता. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आली. हे सरदार स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशींवर आधारित होते. या समितीने सुचवले होते की, नागरिकांनी आपल्या मूलभूत हक्कांचा वापर करताना आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये.

११ मूलभूत कर्तव्ये

४२ व्या घटनादुरुस्ती, १९७६ नुसार, संविधानात एक नवीन प्रकरण 'IV-A' जोडले गेले, ज्यात फक्त एक कलम, कलम ५१-अ होते. यात नागरिकांसाठी दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता. मूलभूत कर्तव्ये प्रत्येक नागरिकाला आठवण करून देतात की, संविधानाने त्यांना काही मूलभूत हक्क दिले असले तरी, लोकशाही वर्तनाचे काही मूलभूत नियम पाळणेही आवश्यक आहे. कारण हक्क आणि कर्तव्ये एकमेकांशी जोडलेली आहेत. मूलभूत कर्तव्यांच्या समावेशामुळे आपले संविधान मानवी हक्कांच्या वैश्विक घोषणेच्या (Universal Declaration of Human Rights) कलम २९ (१) शी आणि इतर अनेक आधुनिक देशांच्या संविधानांशी सुसंगत झाले. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना USSR (सोव्हिएत युनियन) मधून घेण्यात आली. मूलभूत कर्तव्ये भारतीय परंपरा, पौराणिक कथा, धर्म आणि पद्धतींमधून घेतली आहेत. ती भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेल्या कार्यांचे संहिताकरण आहेत. सुरुवातीला दहा मूलभूत कर्तव्ये होती. नंतर २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे ११ वे कर्तव्य जोडले गेले.

Thursday, November 20, 2025

मैथिली ठाकूर

मैथिली ठाकूर 


२५ वर्षाची मैथिली ठाकूर जेव्हा प्रथमच बिहार विधानसभेमध्ये निवडून येते तेव्हा अनेकांचे डोळे विसफारले जातात. तिने असे काय कर्तृत्व केले की तीला लोकांनी निवडून दिले? या उलट जन सुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोरने बिहार सुधारण्याचे मोठ मोठे वादे केले होते तरी त्याला एकही जागा मिळाली नाही यावर लोक रकाने च्या रकाने लिहत आहेत. 


प्रथम म्हणजे प्रशांत किशोर एक Psephologist ( निवडणूक अभ्यासक ) म्हणून उदयास आला. प्रथम काँग्रेस, नंतर भाजपा, नंतर नितीश कुमार यांच्या निवडणुकामध्ये त्याने Psephologist  म्हणून चांगली कामगिरी केली. त्या नंतर त्याने बिहारला सुधारण्यासाठी जन सुराज्य पार्टी काढली. परंतु ह्या व्यक्तीवर कोणी कशाला विश्वास ठेवेल? आज पर्यंत त्याची कारकीर्द एक निवडणूक कॉन्ट्रॅक्टर म्हणून होती.  निवडणुकीची पोस्टर तयार करणे, राहुल गांधींनी कुठे जेवण करावे, कुठे सभा घ्याव्यात, कुठली स्लोगन चांगली उपयोगाला येईल इत्यादी परंतु स्वतः आपल्या भागात काही चांगले काम केले किंवा काय याबद्धल त्याचे रिपोर्टकार्ड शून्य. एव्हडे असूनसुद्धा त्याने पक्ष काढायची हिम्मत केली म्हणजे जमिनीवर काही नाही आणि आकाशात बंगले बांधण्यासारखेच आहे. जर प्रथम आपली एखादी लहान टीम घेऊन कोणाबरोबर आलायन्स केले असते तर त्याचा उपयोग त्याला झाला असता. 


या उलट मैथिलीचे कर्तृत्व व्यक्तिगत जरी असले तरी ती एका महान राष्ट्रीय पक्षाची उमेदवार होती. त्या पक्षाची कामगिरी गेले कित्येक वर्ष दमदार राहिलेली आहे. तीला एक मोठा पाठिंबा आहे. अजून तरी तिच्यावर कोणता डाग लागलेला नाही. त्या मुळे लोकांनी तीला निवडून दिले. आजपर्यंत अनेक कलाकारांनी अनेक पक्षांमधून निवडणूक लढवली पण त्यातील बरेचसे निवडणूक हरले. मैथिली जरी बिहार सोडून दिल्ली मध्ये स्थायिक असली तरी मैथिलीची भोजपुरी भाषेतील गाणी लोकांना आपली वाटतात. ती आपल्या बिहारी भोजपुरी, मैथिली संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते असे तेथील लोकांना वाटते. म्हणून लोकांनी तीला निवडून दिल.


आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "man is known by the company he keeps". त्या मुळे मैथिलीकडुन खूप शिकण्यासारखे आहे. स्वतःचे हॉटेल उघडून यशस्वी चालवायला वेळ लागेल पण कामत किंवा मॅकडोनाल्डची फ्रंचाईज घ्या  तीला यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. पण जेथपर्यंत आपण कमी ताकदवान असतो तेथपर्यंत हेच चांगले.


माधव भोळे 


घराणेशाही ??

 घराणेशाही ??


ज्या मोदीजींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर आसूड ओढत आपला आणि भाजपाची विजयी अश्वमेध घोड दौड गेली २५ वर्ष पुढे नेलीत त्याच भाजपाला घराणेशाहीनीच पूर्ण पणे ग्रासलेले दिसते. अगदी लोकसभेपासून ते जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत सर्वत्र आपल्याच घरात उमेदवारी मिळावी हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांचा आग्रह असून त्याला उच्च पदस्थांचा पाठिंबा पदोपदी दिसून येतो.


महाराष्ट्रात तब्बल ३३ भाजपा नेत्यांनी आपल्याच घराण्यातील  पत्नी, सुना, मुले, नातवंडे, नातेवाईक यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. 

गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन,

संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे,

मंगेश चव्हाण यांच्या पत्नी,  जैकुमार रावळ यांच्या मातोश्री नयन कुवर रावळ, भाजपा आमदार तानाजी मुटकुळे मुलगा शिवाजी मुटकुळे. शिवाय सावंतवाडी संस्थांनाची सून सौं. श्रद्धा भोसले. अशी अनेक नांवे घेता येतील.


या आधी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला सुद्धा हेच केले गेले. नितेश राणे, सुजय विखे पाटील, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन, रक्षा खडसे इत्यादी वारसदार आधीच काम करीत आहेत. 


मोदी साहेब, जे जे आरोप आपण दुसऱ्यावर केलेत ते ते आता आपल्या पक्षाला चिकटले आहेत, मग ते काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे असोत की आणखी काही. ज्या पवार कुटुंबावर आपण ७०,००० कोटीचे घोटाळेबाज म्हणून आरोप केलेत, त्यांच्याच कुबड्या घेऊन आपण महाराष्ट्रात मुख्य मंत्री पद राखत आहात. 


जरी तुमची स्वतःची प्रतिमा स्वच्छ असली तरी आता तुम्ही भ्रस्टाचार मुक्त भारत हा नारा देऊच शकत नाही. 


माधव भोळे 


Tuesday, November 18, 2025

आरक्षणाची फळे :

आरक्षणाची फळे :


२०२४ साली त्यावेळचे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आणि आताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी एक विचार मांडला की अनुसूचित जाती आणि जमातीमधील आरक्षणाचा विचार करताना क्रिमी लेयर चा निकष सुद्धा लावावा. म्हणजे जरी एखादी व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीत जन्म घेतली असेल परंतु त्याचे वार्षिक उत्पन्न क्रिमी लेयर पेक्षा जास्त असेल तर त्याला आरक्षणाचा लाभ मिळू नये. या विचारावर अनुसूचित जाती जमातीतील प्रस्थापित मंडळींनी सडकून टीका केली कारण त्यांना आणि त्यांच्या पुढील पिढ्याना त्याचा लाभ मिळणार नाही. प्रस्थापित आधीच मोक्याच्या जागा घेऊन बसले आहेत आणि त्यांना पुढच्या शंभर पिढ्याची काळजी करत आहेत.


काल एका समारंभात गवई साहेबांनी परत त्याचा उच्चार केला आणि आपल्या विधानाला पुष्टी दिली. गवईंच्या मते त्या समाजातील एक अत्यंत श्रीमंत किंवा IAS अधिकारीचे मुल याची पार्श्वभूमी आणि एका गरीब मागास शेतकरीचे मुल याची पार्श्वभूमी ही सारखी नसल्यामुळे गरीब मागास शेतकऱ्यांच्या मुलाला तो लाभ मिळायला हवा. 


प्रस्थापितांचे म्हणणे की आरक्षण हे जाती जमातीला मिळाले असून ते आर्थिक मागासलेपणासाठी मिळाले नाही. तर गवई साहेब म्हणतात जों गरजू आहे त्याला प्राधान्य मिळायला हवे. 


जेव्हा बाबासाहेबांनी आणि घटना समितीने आरक्षणाचा विचार केला तेव्हा वर्षानुवर्षे वंचित असलेल्या समाजातील मागासलेपणा दूर व्हावा आणि त्यांना इतर समाजाबरोबर सन्मानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी घटनेत केलेली ही तरतूद आहे. त्या वेळी जात हा फक्त मागासलेपणाचा एक निकष म्हणून मानला गेला पण मागासलेपणा हा आरक्षणाचा मुख्य कणा आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी त्या आरक्षणाची मर्यादा १० वर्ष ठेवली जेणेकरून हा बॅकलॉग १० वर्षात भरेल अशी माफक अपेक्षा. पुढे वेळोवेळी सभागृहाने ही मर्यादा वाढवली. 


ज्या कुटुंबाचा मागासलेपणा गेला आहे त्याचा आरक्षणासाठी विचार करण्यापेक्षा जों अजूनही मागासलेला आहे त्याला आरक्षण मिळायला हवे असा आग्रह गवईसाहेब धरत असतील तर त्यात चूक ते काय? त्यांनी त्या समाजाला आरक्षण देऊ नये किंवा त्यांचा आरक्षणाचा टक्का कमी करावा असे तर म्हटलेनाही ना? पण जों पात्र आहे त्याला प्रथम आरक्षण मिळायला हवे एव्हडेच ते म्हणाले पण त्या मुळे प्रस्थापितांच्या बुडाला आग लागली. मागासले पणा आर्थिक किंवा सामाजिक निकषावर व्हायला हवे. जों सुशिक्षित आहे किंवा जों सधन आहे तो आरक्षणासाठी अपात्र आहे असे त्यांना वाटते. मला वाटते त्यांचे विचार योग्य आहेत. सर्व विचारवंत लोकांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा.

माधव भोळे



Monday, November 17, 2025

निर्मळची जत्रा

निर्मळची जत्रा 


वसईजवळील नालासोपारा हे एक मोठे ऐतिहासिक गांव आहे. त्याचे पूर्वीचे नांव शूर्पारक असे आहे. अगदी प्राचीन काळापासून हे एक उत्कृष्ट बंदर म्हणून ओळखले जात होते. अरब आणि रोमन सम्राज्याचे व्यापारी येथून समुद्रमार्गे गलबातातून माल नें आण करीत. 


पुढे पंडित भगवानलाल इंद्रजिच्या पुढाकाराने १८८२ साली झालेल्या पुरातत्व विभागाच्या उतखननामध्ये येथील सोपारा गावाजवळ सम्राट अशोकाचा बौद्ध स्तूप आणि बौद्ध भिक्षुकांची भिक्षा पात्रे, सोन्याची नाणी, सुवर्णं फुले, चांदीची भांडी इत्यादी वस्तू मिळाल्या. ( त्या एशियाटीक सोसायटी फोर्ट येथे ठेवल्या आहेत. ). 


असे म्हणतात सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गावोगाव बौद्ध भिक्षुकांच्या फौजाच्या फौजा पाठवल्या होत्या त्यातील काही भिक्षुक जोगेश्वरी गुंफा ( ज्या पुढे योगेश्वरी देवीच्या मंदिरात परिवर्तीत केल्या गेल्या), बोरिवली ईस्ट कान्हेरी गुंफा, बोरिवली पश्चिम मंडपेश्वर येथे रहात होते. काही ह्या सोपारा भागात वास्तव्य करुन होते. त्याकाळी त्या बौद्ध भिक्षुनी तेथे वास्तव्य असलेल्या वसई,नालासोपारा, विरार भागात तेथील नागरिकांचे खूप धर्मांतरण केले. 


या बौद्ध आक्रमाणाला उत्तर देण्यासाठी हिंदूं धर्माने सुद्धा महाप्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून जगन्नाथ पुरी येथील ५ वे शंकराचार्य जगदगुरू स्वामी विद्यारण्य आपल्या नालासोपाऱ्या जवळील निर्मळ गावात १९ वर्ष वास्तव्य करून होते आणि तेथेच त्यांचे महानिर्वाण झाले. 


ज्या ठिकाणी त्या शंकराचार्यांची समाधी आहे तेथे एका बाजूला शंकर पार्वती आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी विष्णु अशी दोन छोटी देवळे आहेत. हे सर्व ज्या मंदिर आवारात आहे ते मंदिर प्रथम चालुक्य राजाने आणि नंतर पुढे वसई वर विजय मिळवल्या नंतर चिमाजी अप्पा यांनी बांधले.


ज्या नागरिकांना शंकरचार्या नी बौद्ध धर्मातून हिंदू धर्मात परत आणलेले ते सर्व सामवेदि झाले. त्याचा अपभ्रमश म्हणजे समेधी होय.


दर कार्तिक कृष्ण एकादशी पासून तेथे १५ दिवस जत्रा भरते. या वर्षी ती दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ ला सुरू झाली. त्या जत्रेला जाण्याचा योग काल १६.११.२५ रोजी माझे मित्र श्री प्रकाश वीरकर, विरार आणि श्री विशाल वीरकर, नाला सोपारा यांच्या सहकार्यामुळे आला. 


मुंबई शहराजवळ असून सुद्धा निर्मळ गांव अजून काही प्रमाणात गावासारखेच असून जवळच एक मोठा नैसर्गिक गोड्या पाण्याचा निर्मळ तलाव आहे शिवाय गावात कमीतकमी ६/७ छोटे गोड्या पाण्याचे तलाव आहेत. तेथून जवळच कळंबचा समुद्र किनारा आहे. स्वच्छ हवा आणि भरपूर उजेड असलेल्या ह्या भागात वातावरण आल्हाददाई होते. 


जत्रेला विविध स्थानिक खाद्य प्रकार, वेगवेगळी खेळणी, कणगरे, काटेकरंदे, कोनफळी कंद, सुकलेली सुकेळी इत्यादी रानमेवा, गृह वस्तूइत्यादी विकण्यासाठी सुमारे २५० ते ३०० स्टॉल होते तसेच मोठा फिरता पाळणा, आणि मेरी गो राउंड चक्र वगैरे बच्चे कंपनीचे आकर्षण होते.


नालासोपारा पश्चिम स्टेशन पासून २५१ नंबरची विसई विरार महापालिकेची बस निर्मळ नाक्याला आपल्याला सोडते तेथून ५ ते ७ मिनिटे चालत हे शंकराचार्य समाधी मंदिर आहे. शिवाय शेयर रिक्षा स्टेशन ते सोपारा आणि सोपारा ते निर्मळ अशा जातं असतात.


आपणांस शक्य असेल तर एकदा जरूर भेट द्या.


माधव भोळे 

घातक खेळी

घातक खेळी 


आज सुजित भोगले यांचा लेख वाचला. कळव्याचे सर्वेसर्वा जितूद्दीन आव्हाड यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बनवण्यासाठी भाजपच्या आशिष शेलारांनी दिलेला पाठिंबा हे अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांचे पंख छाटण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली एक चाल आहे हे उघड आहे. 


ज्या उद्धव ठाकरेंनी बंद खोलीत आश्वासन दिले  ते पाळले नाही म्हणत २० वर्ष एकत्र काम केलेलेल्या भाजपची साथ सोडली आणि उबाठा काँग्रेसच्या वळचणीला गेली त्याला नमोहरम करण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्या देवेंद्रजिनां घ्यायला लागल्या तेच शिंदे आणि पवार आता त्यांना डोईजड व्हायला लागले म्हणून ही खेळी आपण खेळत आहात. 


कालच बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षपद सुद्धा आपण उद्धव ठाकरे यांना बहाल केलेत. पण चिखलात खेळलेल्या राजकारणामध्ये सर्वच रुतुन बसतात कारण चिखलच एव्हडा घट्ट झाला आहे. 


सर्व सामान्य हिंदू मतदाराला जितूद्दीन सारख्या I love gaza म्हणणाऱ्या आणि अनंत करमुले सारख्या सामान्य माणसाला बंगल्यावर नेऊन पोलिसांसमोर मारझोड करणारा नेता डोक्यात गेला आहे. एक वेळ उद्धवजींना ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षपद बहाल केले ते जनता मान्य करेल कारण ते नैसर्गिक खेळी वाटते पण जितुधीनला पाठिंबा देणे अयोग्यच.


तुम्ही आजपर्यंत राजकारणात जेव्हड्या खेळी खेळलात त्यातील बऱ्याच उलटल्या. तुमची प्रतिमा दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तुमच्या प्रचंड बुद्धिमत्तेचा उपयोग यापेक्षाही चांगला झाला असता. पण प्रशासन आणि आपले गृहखाते सुधारून आपली प्रतिमा उचवण्यात लक्ष न देता आपला सारा वेळ आपणच तयार केलेले खड्डे भरण्यात जात आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे.


माधव भोळे

Friday, November 7, 2025

निवडणूक आयोगाचा गलथान कारभार

निवडणूक आयोगाचा गलथान कारभार 


गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील घोळ चव्हाट्यावर येत आहेत. जरी त्यातील त्रुटी विरोधी पक्ष शस्त्र म्हणून वापरत असले तरी दुबार नांवे येणे, एकाच पत्यावर शेकडो मतदार नांवे असणे. मृत व्यक्तींची नांवे मतदार यादीतून कमी न करणे यां सारख्या अनेक त्रुटी ह्या मतदान यादीत दिसून येतात.  


भारतात जरी राजीव गांधी काळापासून कॉम्पुटर युग समजले गेले तरी त्याचा खरा वापर आधार कार्ड संस्थेच्या ( UIDAI ) उगमा पासून २९ सप्टेंबर २०१० साली मनमोहन सिंग सरकारच्या काळात सरकारी दफतरे, बँका, इत्यादी क्षेत्रात होऊ लागला. त्याचा प्रसार पुढे २०१४ साला पासून मोदी सरकार मध्ये आणखी मोठया प्रमाणात झाला. २०१६ साली त्याचा कायदा सुद्धा प्रस्तापित झाला. 


भारतात क्रिसील ( बँका तर्फे लोन साठी ) , अग्रीस्टॅक ( अग्रीकल्चर डिपार्टमेंट ) सारख्या अनेक संस्थानी आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या खात्यानी टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले कारभार सुधारले. रेशनिंग ऑफिस मध्ये बायोमेट्रिक सिस्टीम लागू झाली. परंतु निवडणूक आयोगाने आपल्या त्रुटी कमी करण्यासाठी अशा टेक्नॉलॉजीचा पुरेपूर उपयोग केला नाही. काही अंशी केला असेल पण मतदारयाद्या जों निवडणुकीचा गाभा आहे त्यातील घोळ कायम आहेत. त्या बाबतीत गंभीरता दाखवलेली दिसत नाही.


आज काल मतदारयाद्यांना जे आव्हान दिले जात आहे त्याला सर्वस्वी निवडणूक आयोगच जबाबदार आहे. एकीकडे आपला देश चांद्रयांना पासून मंगळयांना पर्यंत येऊन पोहोचला म्हणून आपण अभिमान बाळगतो परंतु लोकशाहीचा गाभा असलेल्या निवडणुका पारदर्शक आणि त्रुटीविना व्हायला हव्यात असा आग्रह धरताना दिसत नाही.


निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र आयोग असून तो राष्ट्रपतीनच्या अख्त्यारीत येतो. त्यांचा कारभार सुरळीत चालणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. मग ते स्टेट इलेक्शन कमिशन असो की सेंट्रल इलेक्शन कमिशन असो.  


असो आता बिहारच्या निवडणुकी पासून  SIR ( Special intensive revision ) ची सुरवात झाली ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. पण ह्या गोष्टी जास्त तर्कशुद्ध होणे आवश्यक आहेत आणि आता उपलब्ध असलेली टेक्नॉलॉजी हे करण्यासाठी सक्षम आहे. 


आणखी एक गोष्ट, सरकार  ग्रामपंचायत पासून, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालीकांना अनुदान देते. जर तेथील जन्म मृत्यू दाखले यांचा समन्व्यय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लावता आला तर सरकारच्या अनेक योजनां मध्ये त्याचा उपयोग होईल आणि अनुदाना मधील गळती थांबवली जाईलच पण मतदार याद्या मध्ये सुद्धा सुधारणा होण्यास मदत होईल. सरकार आणि निवडणूक आयोग यांनी यां विषयात सहकार्य करून मतदार याद्या जास्तीतजास्त स्वच्छ आणि अस्सल कशा बनतील याचा विचार करायला हवा.


माधव भोळे 

Sunday, October 26, 2025

विवाह जमणे किंवा जमवणे, एक अडथळा शर्यत?

 विवाह जमणे किंवा जमवणे, एक अडथळा शर्यत?


आज काल समाज माध्यमातून एक विशेष चर्चा सुरू असते. ती म्हणजे आजकालच्या मुलामुलींचे विवाह योग्य वयात होत नाहीत. अर्थात त्याची अनेक कारणे आहेत. पण काही तरुणांशी बोलल्यानंतर असे लक्षात आले की आजकालचे विवाह जमणे किंवा जमवणे म्हणजे एक अडथळा शर्यत आहे. आणि समजा तो जमला तर तो विवाह टिकणे म्हणजे आणखी एक दिव्य कसोटी आहे.


ह्या बाबतीत काही व्यक्तींशी चर्चा करता असे लक्षात आले की, वेगवेगळ्या कारणांमुळे समाज विखूरला गेल्यामुळे बहुतेक तरुण तरुणी मॅरेज ब्युरोच्या इंटरनेटवरील ऍपचा वापर करतात. त्यामध्ये आपण किंवा आपल्या पालकांनी विवाहेच्छुक व्यक्तीची, त्याच्या कुटुंबियांची माहिती आणि संभाव्य वधू / वराबद्धल अपेक्षा यांची माहिती भरून देणे इत्यादी. 


येथपर्यंत प्रक्रिया योग्य आहे. खरी मजा पुढेच आहे. ती म्हणजे त्या व्यक्तीचा प्रोफाइल भरताना काही ऍप असे काही अंनशन्ट प्रश्न विचारतात की त्यांचे प्रोफाइल फिल्टरिंग म्हणजे अतिरेक वाटतो. ज्यांना ह्या विषयाचे काही अगाध ज्ञान आहे असे ते समजतात ती मंडळी प्रोफाइल मध्ये खालील प्रश्न विचारतात. ते बघून प्रश्न पडतो की ही मंडळी विवाह जमवण्यासाठी आहेत की आपली मेम्बरशिप कायम राहून गल्ला भरण्यासाठी आहेत?

उदा.?

१. आपण विवाह कशा प्रकारे साजरा करू इच्छिता?

    १.a) साधा समारंभ फक्त जवळचे नातेवाईक सहित १.b) हाय फाय हॉटेल किंवा डेस्टिनेशन विडींग १.c) रजिस्टर्ड विवाह १.d) मित्र मैत्रिणी, जवळचे नातेवाईकां सह.

२. पहिले मुलं लग्न झाल्यानंतर किती वर्षानंतर व्हावे असे वाटते?

    ३.a) 0 ते ३ वर्षांमध्यें ३.b) ३ ते ६ वर्षा मध्ये ३.c) ६ वर्षानंतर ३.d) कधीच नाही.

३. लग्न झाल्यानंतर हनिमूनला कुठे जावे असे वाटते?

    ३. a जवळपास च्या ठिकाणी ३.b भारतात कोठेही ३.c परदेशीं

४. जर आपला घटस्फोट झालाच तर आपण तो कसा हाताळाल ( ह्या प्रश्नाबद्दल मीं खात्री पूर्वक सांगू शकत नाही पण कोणी तरी असे विचारते असे कळते ).

४.a सहमतीने ( mutual consent ) ४.b भरभक्कम पोटगी मागून ४.c समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही अशी आर्थिक सोय मागून.


असे अनेक प्रश्न विचारले जातात. अनेक मंडळी ह्या प्रश्नाची उत्तरे बघूनच अनेक चांगल्या प्रोफाइलकडे दुर्लक्ष करतात. अरे ज्या गोष्टी अजून काहीच ठरल्या नाहीत. अजून त्या दोघांनी एकमेकांची तोंडे सुद्धा बघितली नाहीत त्यांची ह्या विषयातील मते विचारून तुम्ही तरुणांच्या मनात अडथळे आणि गोंधळ निर्माण करत आहेत. कारण नसताना एखाद्या विषयावर काल्पनिक ( hypothetical) चर्चा करणे बरोबर नाही. 


विवाह जमवायचा असेल तर सुरवातीला एकमेकांना भेटायला हवे तुमचे चार चांगले गुण आणि दुसऱ्याचे चांगले चार गुण एकमेकांना माहिती व्हायला हवेत. अनेक प्रश्न चर्चा करून सोडवता येतात. जर आधीच एव्हडे प्रश्न असतील तर कोणताही विषय कधीच सुटू शकणार नाही. 


चर्चा केल्यावर माणसाची मते बदलू शकतात. परंतु असे अनशन्ट प्रश्न विचारून तुम्ही ह्या विवाह जमवण्याच्या प्रक्रियेत फक्त अडथळे निर्माण करत असता. शिवाय हजारो प्रोफाइल समोर असल्यामुळे प्रत्येक वेळी बघणाऱ्या व्यक्तीला वाटते की अजून चांगले, अजून चांगले स्थळ मिळेल आणि त्या नादात तो काहींना काही कारण काढून समोर असलेले स्थळ घालवून बसतो. इंग्रजीत एक म्हण आहे "A bird in the hand is worth two in the bush" म्हणजे हातात असलेला पक्षी झुडपात असलेल्या पक्षा पेक्षा जास्त महत्वाचा कारण झुडपातील पक्षी उडून जाऊ शकतो. किंवा हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे.


त्या मुळे विवाह जमवण्यासाठी फक्त आवश्यक तेव्हडीच माहिती घ्यायला हवी. प्रथम एकमेकांना भेटायला हवे, फोन वर किंवा प्रत्यक्ष काही वेळा चर्चा करायला हवी मगच एखाद्या व्यक्तीबद्दल आपण निश्चित मत बनवू शकता.


लोकांच्या मनात असे काही भरलेले असते की सांगता येत नाही. माझा एक मित्र त्याच्या एका ज्योतिष मित्रावर फार विश्वास ठेवे. कोणतीही मुलगी सांगून आली की प्रथम आपल्या मित्राकडे तिची पत्रिका दाखवे. आणि काही ना काही कारण काढून नकार देत असे. एकदा तो म्हणाला "ज्योतिष मित्र म्हणतो मुलीचे बाकी सर्व गुण जुळत आहेत पण तिच्या पहिल्या डिलिव्हरीला थोडा अडथळा आहे. मग काय करू?". मीं मित्राला म्हटले. अरे काय तू विचार करतोस? आधी लग्न तर जमू दे मग पहिल्या डिलिव्हरीचा विचार कर. असे करता करता वयाची ४२ उजाडली तेव्हा एक दिवस अचानक लग्न जमले. 


पूर्वी सुद्धा लोक पत्रिका बघत पण त्यांच्या अपेक्षा आणि अटी कमी असत. मुलगी संसार करण्यासाठी योग्य आहे की नाही याला महत्व जास्त होते आणि बाकीचे विषय गौण मानले जायचे. आता कोणता विषय महत्वाचा आणि कोणता नाही यामध्येच गोंधळ उडतो कारण प्रश्न आणि विषय जास्त झालेत.


बघा तुम्हांला पटते का?


माधव भोळे 



Tuesday, October 21, 2025

हरिबा डेयरी फार्मची यशोगाथा

हरिबा डेयरी फार्मची यशोगाथा 


नुकतेच एका गुजराती माणसाने मला काजू कतलीचा एक तुकडा हातावर ठेवला. त्याची चव अतिशय सुंदर होती. ही काजू कतली, हरिबा डेयरी फार्म, बुधना, भावनागर, गुजरातचे प्रॉडक्ट होते. कोण म्हणेल त्यात काय विशेष आहे?


ह्या डेयरी फार्मचे संस्थापक विनूभाई सुतारिया हे हिरे व्यवसायात नोकरीं करत. त्यांना पहिल्यापासूनच गोपालन करण्याची हौस आणि ईच्छा होती. आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी आपली ही हौस पुरी करण्याची ईच्छा आपला मुलगा मेहुलकडे व्यक्त केली. मेहुलने सुद्धा त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 


वेद सांगतात, गाय आपली माता आहे. तीला सन्मानाने वागवले पाहिजे ह्या भावनेने त्यांनी २०१४ ला सुरवातीला २/३ गाई पाळायला बुढाणा येथे सुरवात केली. ह्या साध्या सुध्या गाई नसून गीर गाई आहेत. भारतातील गीर आणि सैहवाल जातीच्या गाई A2 दूध देतात. जगातील सर्वच गाई A2 दूध देत नाहीत.त्यांनी लोकांना वैदिक संस्कृतीचे महत्त्व आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे समाविष्ट करू शकतो हे समजावून सांगितले.


काय आहे हे A2 दूध?

फक्त A2 मध्ये बीटा-केसिन प्रोटीन आहे आणि ते कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे A, D आणि B12 सारख्या पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे, जे हाडांचे आरोग्य, स्नायूंचे कार्य आणि प्रतिकारशक्तीला समर्थन देते. A2 दूध काही लोकांसाठी पचण्यास सोपे आहे. 


वडिलांच्या ह्या विचाराने सुरवात झालेल्या गोपालनाला त्यांचे सुपुत्र मेहुल याचे समर्थन लाभले. मेहुल MBA झाल्यानंतर त्यांनी ७/८ ठिकाणी नोकऱ्या केल्या. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या छंदाला आकार देण्याचे ठरवले. 


२०१८ मध्ये शुद्ध, सेंद्रिय आणि रासायनमुक्त दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने त्याने हरीबा डेयरी फार्म ह्या नावाने एक डेयरी फार्म सुरू केला. हरी बा म्हणजेच "mother nature" किंवा "निसर्गमाता". 


वेदिक पद्धती: भारतीय वैदिक संस्कृती आणि तिच्या मूल्यांवर आधारित ही डेअरी चालवली जाते. वेदामध्ये गायीला मातेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे हरिबा डेअरी फार्ममध्ये गायींची काळजीपूर्वक आणि सन्मानाने सेवा केली जाते.


खास उत्पादन: त्यांच्या उत्पादनांमध्ये गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप आणि इतर उत्पादने समाविष्ट आहेत. त्यांचे तूप पारंपरिक वैदिक पद्धतीने ( रवी घुसळून लोणी तयार करून कढवून तयार केले जाते., बाकीच्या डेयरी मध्ये यांत्रिक पद्धतीने वेगळ्या प्रोसेसने ते केले जाते ) ज्यामुळे त्याची गुणवत्ता उत्कृष्ट असते. 


नैतिक व्यवसाय:

प्राण्यांची काळजी: हरिबा डेअरी फार्ममध्ये गायींना बांधून ठेवले जात नाही. त्यांना मोकळेपणे फिरण्याची आणि चरण्यासाठी पुरेशी जागा दिली जाते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते आणि त्यांच्यासाठी भक्तिमय संगीत आणि संस्कृत मंत्रांचे पठण केले जाते, ज्यामुळे गायी आनंदी आणि निरोगी राहतात.


शुतक परंपरा: हरिबा डेअरी फार्ममध्ये हिंदुंच्या 'शुतक' परंपरेचे पालन केले जाते, ज्यानुसार जेव्हा गाय वासराला जन्म देते, तेव्हा १५ दिवसांपर्यंत तिचे दूध वापरले जात नाही. त्यामुळे त्यांचे तूप धार्मिक विधींसाठीही योग्य मानले जाते. 


ग्राहकांचा विश्वास:

ग्राहकांचा अनुभव: हरिबा डेअरी फार्मने त्यांच्या उत्कृष्ट उत्पादनांच्या गुणवत्तेमुळे आणि वेळेवर वितरणाबद्दल ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. अनेक ग्राहकांनी त्यांच्या उत्पादनांबद्दल, विशेषतः खजूर आणि सुकामेव्यापासून बनवलेल्या मिठाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांची प्रोडक्ट haribadairyfarm.com वर उपलब्ध असून त्यांना देश विदेशातून मागणी आहे. 


मेहुलने वेगवेगळे व्हिडीओ बनवून आणि सोशल मीडियाचे मार्केटिंग तंत्र वापरून आपल्या कंपनीची खूप प्रगती केली आहे. सध्या त्यांच्याकडे ७२ गीर गाई असून गेल्यावर्षीची उलाढाल २ कोटी रुपयाची आहे.


स्थान: हा फार्म गुजरातमध्ये सौराष्ट्रातील बुढाणा गांव,तालुका शिहूर , जिल्हा भावनगर येथे आहे, जिथे गीर जातीच्या गायींचे मूळ स्थान आहे. यामुळे त्यांना गीर गायींची उत्तम काळजी घेणे शक्य झाले आहे.


माधव भोळे 

Sunday, October 19, 2025

अर्थव्यवस्थेचा थर्मामीटर

अर्थव्यवस्थेचा थर्मामीटर

गेल्या काही वर्षांमध्ये गणपती, नवरात्री, दिवाळी आणि होळी यां हिंदूंच्या मुख्य सणानमध्ये बाजारात आलेली गर्दी बघितली तर लक्षात येईल की भारतीय अर्थव्यवस्थेला किती झळाली आली आहे. 


वर्ल्ड गोल्ड कौन्सिल च्या आकड्यानुसार २०२४ भारतीय ग्राहकांनी ८०३ टन सोने विकत घेतले. २०२१ पासून दरवर्षी साधारण ७५० ते ८४० टन सोने भारतीय ग्राहक विकत घेत आहेत. 


नुसत्या जी एस टी बचत उत्सवाच्या पहिल्या ८ दिवसात ( नवरात्रामध्ये ) एकट्या मारुती सुझुकी ने १.६५ लाख गाड्या विकल्या आणि त्यांच्याकडे ४.५ लाख गाड्यांचे बुकिंग आहे. 


यां वर्षी गणपती उत्सवात  महाराष्ट्रात ४५ ते ५०,००० कोटींची उलाढाल झाली, तर गेल्या वर्षी फक्त होळी मध्ये भारतात ६०,००० कोटींची उलाढाल झाली. नुसत्या दिवाळीमध्ये जवळजवळ १५,००० कोटीचे फटाके वाजवले जातात. 


गेल्या काहींवर्षात GST कलेक्शन सरासरी ९.४% ने वाढले असून गेल्या वर्षीचे वार्षिक कलेक्शन २२.०८ लाख कोटी रुपये झाले आहे. २०२५ मध्ये महिना सरासरी २ लाख कोटी GST कलेक्शन आहे. 


आता सांगा भारताला डेड इकोनॉमि म्हणणाऱ्या अर्थ तज्ञाला परत शाळेत जायला नको का?


जळगाव ला महाराष्ट्राची सोनेरी राजधानी म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त सोने जळगाव येथे विकले जाते. 


माधव भोळे

Wednesday, October 15, 2025

मनाचे श्लोक आणि देऊळ बंद २

मनाचे श्लोक आणि देऊळ बंद २


काल मनाचे श्लोक हा सिनेमा बंद पाडल्या नंतर देऊळ बंद २ ह्या सिनेमाचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय त्याच्या निर्मात्याने घेतला. 


 सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती याची खिल्ली उडवण्याची, सो कॉल्ड पुरोगामी मंडळीनची, जणु स्पर्धाच लागली आहे.


या आधी कोणत्याही परधर्मीयांनी आपल्या स्वतःच्या धर्माविरुद्ध काही सिनेमा किंवा नाटक प्रदर्शित केलेले आठवते का? त्यांच्या देवाची खिल्ली उडवली तर कधी कोणी गप्प बसले आहे का? गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु गोविंदसिंग, अल्ल्हा किंवा येशू ख्रिस्त यांची खिल्ली उडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांचा समाज कधी गप्प बसला आहे का? मग सहनशिलतेचा ठेका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ठेका फक्त सनातनी हिंदुनीच घेतला आहे का? 


ज्या संविधानाचा आधार घेत ही मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डांगोरा पिटतात त्या संविधानाचे "सर्व धर्म समभाव" हे मूलभूत तत्व ते सोईस्कर विसरतात आणि त्या मुळे लोक कायदा हेतात घेतात. कायदा हातात घेणे गैर आहे पण न्यूटन च्या नियमानुसार ऍक्शन ला रिऍक्शन असतेच हा सृष्टीचा नियम आहे.


लोक सिनेमा आणि सिनेकलाकारांना आदर्श मानतात. त्या आपल्या इमेजचा उपयोग ते जाहिराती करून पैसे कमावण्यात करतात, त्या मुळे कोणत्याही धर्माविरुद्ध टीका, टिपण्णी होईल असे कृत्य न घडावे याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. 


माधव भोळे 

मरावे परी कीर्ती रूपे उरावे!!

 मरावे परी कीर्ती रूपे उरावे!!


इंद्रनील तावडे नांव आपण कधी ऐकले आहे का? काल मनोज आचार्य ह्या पनवेलला राहणाऱ्या माझ्या परिचिताचा फोन आला होता. डॉक्यूमेंटरी फिल्म तयार करणे, प्रेसेंटेशन तयार करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. मनोज अतिशय मन लावून काम करतात. सेकण्डरी स्कुल्स एम्प्लॉयीज कॉऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिं. मुंबई ५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मनोजकडे तिच्या वाटचालीची डॉक्युमेंटरी करण्याचे कंत्राट मिळाले आहे.


त्या संस्थेचा इतिहास बघता त्याची स्थापना इंद्रनील तावडे ह्या सदग्राहस्थाने केली असे त्यांना कळले. आता डॉक्युमेंटरी बनवायची म्हणजे निदान त्या संस्थेच्या संस्थापकाचा फोटो तरी हवा म्हणून त्याने माहिती घ्यायला सुरवात केली . इंद्रनील गिरगांवात रहात असत. मीं पूर्वी गिरगांव मध्ये रहात असल्यामुळे साहजिकच मनोजने मला संपर्क केला आणि कै. इंद्रनील तावडे यांच्याबद्दल विचारले.


इंद्रनील पूर्वी प्रभूसेमिनरी स्कुल, ठाकुरद्वार, गिरगांव येथे इंग्रजीचे शिक्षक होते. माझे नातेवाईक कै. विजय भोळे यांच्या करेलवाडी, ठाकुरद्वार येथील विजय क्लासेस मध्ये इंद्रनील इंग्रजी शिकवत असत त्या मुळे त्यांची माझी थोडीफार ओळख होती. त्यांनी इंग्रजी विषयावर काही पुस्तके सुद्धा लिहून प्रसिद्ध केली होती. त्या पुस्तकांचा प्रसार करण्यासाठी ते विविध शाळांना भेट देत. त्या वेळी शाळेतील शिक्षकांना कमी पगार असत. त्यांना कर्ज वगैरे मिळणे अवघड जाई. सामाजिक पिंड असल्यामुळे तावडे सरांना ह्या विषयात काहीतरी काम करण्याची ईच्छा झाली आणि अशी झाली सेकंण्डरी स्कुल एम्प्लॉईज कोऑप क्रेडिट सोसायटीची सुरवात. यां वर्षी ह्या क्रेडिट सोसायटीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या २८ शाखा असून गतवर्षीची उलाढाल २२४२ कोटीची आहे. 


ह्या शिवाय कोकणातील उत्पादने आणि आंबा काजू यांना मुंबईमध्ये बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी "रत्नागिरी फोरम" हे अनऔपचारिक संगठन सुद्धा स्थापन केले. शिवाय मराठा मंदिर संस्था , मराठा उत्कर्ष मंडळ यांसारख्या संस्थामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. कोकणातील आणि विशेषतः आपल्या समाजाने शिक्षणात आणि उद्योगधंद्यात पुढे यावे यां साठी त्यांचा कायम प्रयत्न असे. 


आज तावडे साहेब नाहीत. तसेच त्या काळची त्यांना ओळखणारी माणसे सुद्धा गिरगांवात रहात नाहीत. ( सर्व विखूरली गेली ). पण योगायोगाने आणि थोड्या प्रयत्नाने मला माझ्या मित्रांद्वारे त्यांच्या मुलाचा संपर्क प्राप्त झाला आणि तो श्री मनोज आचार्य यांच्या पर्यंत पोहोचवण्यात मला यश आले. एका चांगल्या व्यक्तीच्या स्मृतीना उजाळा देण्यात माझा खारीचा वाटा मिळाला हा माझा भाग्याचा क्षण. आज ५० वर्षानंतर सुद्धा तावडे सरांच्या कामाची आठवण आणि नोंद होत आहे हे विशेष आहे.


समाजात वाईट गोष्टी आपोआप पसरतात पण चांगल्या पसरवायला कष्ट घ्यायला लागतात म्हणून हा प्रयत्न.


कै. इंद्रनील तावडे यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन.


माधव भोळे 

Thursday, October 9, 2025

स्वप्न !!

 स्वप्न !!


आज एक लेख वाचत होतो, त्याचे शीर्षक होते "मुंबईमध्ये १ लाख मराठी फेरीवाले दिसायला हवेत". या आधी वडापाव / झुणका भाकर केंद्रे आणि नारळ विक्री मराठी माणसाची असायला हवीत असे स्वप्न एका मोठ्या नेत्याने पाहिले होते.


स्वप्नच पाहायची असतील तर मोठी स्वप्न बघायला हवीत. वसई, पुणे, सांगली, औरंगाबाद आणि इतर महाराष्ट्रातील निदान २५% उत्पादक मराठी असायला हवेत. 


मराठी शेतकऱ्यांचे स्वतःचे मार्केटिंग फेडरेशन हवे.

मुबलक किनारा लाभलेला महाराष्ट्र मत्स्योत्पादनामध्ये निदान २ नंबरवर असायला हवा.


महाराष्ट्रातून एक्स्पोर्ट होणारा कारगो आणि कंटेनर मालात महाराष्ट्रीय उत्पादनाची भागीदारी निदान २५% असायला हवी. 


फेरीवाले बनून आयुष्यभर मराठी माणसाने रस्त्यावरच काढावे का? म्हणजे परप्रांतीय मोठमोठ्या टॉवर मध्ये येऊन राहणार आणि त्यांना रस्त्यावरील मराठी फेरीवाले सर्व्हिस देणार? काय पण स्वप्न?😰


इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, "Having low aim is crime, failure is not".


माधव भोळे

Wednesday, October 8, 2025

राजा कालस्य कारणम!

 राजा कालस्य कारणम!


संस्कृत मधील एक सुभाषित आहे राजा कालस्य कारणम! याचा अर्थ कोणत्याही अडचणीला किंवा येणाऱ्या काळाला राजा जबाबदार असतो. 


सध्या जगाचे दोन किंवा तीन अनभिशिक्त राजे आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन. भारत अजून बराच पाठी आहे. 


आज Ravindra Datar यांची एक पोस्ट वाचली. अमेरिकेनी AIM-120-C आणि काही तत्सम प्रगत मिसाईल पाकिस्तानला निर्यात करण्याचे ठरवले आहे.

AMRAAM ह्या नवीन पॅकेजच्या अंतर्गत अमेरिकेने त्यांच्या ३० मित्र देशांना ४१.६ बिलीयन डॉलर्सचा प्रगत शस्त्र पुरवठा करण्याचे ठरवले आहे. हा म्हणे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी शस्त्र निर्यात पॅकेज आहे. 


अमेरिका येन केन प्रकारे जगाचा तारणहर्ता आणि पालक बनण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजत असते, त्यातील एक म्हणजे देशा देशात भांडणे लावणे, त्यांना शस्त्र पुरवठा करणे आणि मग शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी शांतता प्रस्तापित करण्याचे ढोंग करणे. 


आता पाकिस्थानला नवीन शस्त्र पुरवठा झाला म्हणजे भारत अर्थातच नवीन शस्त्रास्त्र खरेदीसाठी रशियाकडे धाव घेणार किंवा जे जमेल ते स्वतः तयार करणार. थोडक्यात ही शस्त्रास्त्र शर्यत सुरूच राहणार. अशीच शस्त्र शर्यत रशिया आणि युरोप मध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे. थोडक्यात काय जगात अस्थिरता निर्माण करायची आणि त्याचा फायदा घेऊन आपली शस्त्र विकून आपला दबादबा वाढवायचा.


अगदी हीच नीती वापरून पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीने, भारतात, समृद्ध अशा भारतीय संस्थानिकांमध्ये भांडणे लावून त्यांना आपले सैन्य आणि दारुगोळा पुरवून, त्या संस्थानिकांना खिळखिळे करून टाकून अक्खा देश गिळनकृत केला आणि भारतावर १५० वर्ष राज्य केले आणि तेच संस्थानिक त्यांचे मांडलिक झाले. इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि घराघरामध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला बेघर करत गरिबीच्या खाईत लोटून राजे म्हणून निघून गेले. 


जगामध्ये महामारी, भुकमारी, बेरोजगारी, पर्यावरण बदल, नैसर्गिक आपत्ती इत्यादी मानव जातीला हैराण करणारे अनेक प्रश्न असताना ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मूठभर लोक आणि त्यांच्या कंपन्या चालण्यासाठी मेक अमेरिका ग्रेट ह्या पोकळ कल्पनेच्या नावाखाली असे मानवसंहारक उपदव्याप चालवायचे हे अत्यंत घातक आहे. ट्रम्पच्या आधीच्या लोकांनी सुद्धा हेच केले आहे. बरे एकाने शस्त्र हातात घेतल्यानंतर दुसऱ्याला गाल पुढे करता येणार नाही म्हणून तो ही ह्याच शर्यतीत अडकतो आणि फसतो. 


आज पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशात महागाईचा डोंब उसळला आहे. एका रोटीची किंमत २५ पाकिस्तानी रुपया झाला असून पाकिस्तानी रुपयाची किमत १ पाकिस्तानी रुपया = ०.३२ भारतीय रुपया आहे. 


ग्लोबल हंगर इंडेक्स २०२४ ( जागतिक भुकमारी निर्देशांक २०२४) मध्ये १२७ देशामध्ये पाकिस्तानचा १०९ तर भारताचा १०५ वा क्रमांक लागतो. भारताचे म्हणणे आहे की ही खरी स्थिती नाही. नसेल सुद्धा. पण आपण पहिल्या ५० मध्ये नक्कीच नाही ). ह्या वरून एक गोष्ट स्पष्ट होते की मानव हितासाठी अजून बऱ्याच गोष्टी करणे बाकी आहे. 


एक दिवस युद्ध चालणे म्हणजे १ वर्ष अधोगती करण्यासारखे आहे. ( असे असताना सुद्धा पेहेलगाम अटॅक नंतर मोदींनी युद्ध होता होता टाळले म्हणून राहुल गांधी, प्रणिती शिंदे सारखे काही नासमज नेते मोदींना डिवचत बसले ). 


यावर उपाय काय आहे? पूर्वी आपल्याला इसापनीती मधील एक गोष्ट शिकवली होती. दोन माकडांच्या वादात मांजराने पूर्ण लोणी फस्त केले. त्यावरून धडा घेऊन वागायचे. कोणी उचकवले म्हणून उचकायचे नाही. आपल्या प्रगतीच्या आणि उदिष्ठानच्या आड येणारी प्रलोभने किंवा संकटे शांत डोक्याने कशी टाळता येईल ते बघायचे. 


राजाने हेच करायला हवे. तरच "राजा कालस्य कारणम " ह्या उक्तीचा सुंदर आणि खरा अर्थ जगाला सापडेल.


माधव भोळे

ईश्वर आणि नास्तिकता

 ईश्वर आणि नास्तिकता 


सरन्यायाधिशांच्या सनातन धर्माविरुद्धच्या वक्तव्यावरून आस्तिक आणि नास्तिक यांच्यामध्ये समाज माध्यमांवर जुगल बंदी सुरू आहे. त्यातील एक परकोटीचा विषय एका नास्तिकाने मांडला तो म्हणजे "एव्हडा पूर आला, एव्हडे भूकंप झाले पण त्यावेळी तुम्हांला वाचवायला देव आला होता का?".


याचे साधे उत्तर आहे ते असे:


जगातील अनेक नैसर्गिक आपत्ती मानव निर्मित आहेत. बेसुमार जंगलतोडी मुळे भूसखलन होते, पर्यावरण घातक कार्यक्रमांमुळे ओझोन लेयर कमी होतो, त्याचा वातावरणावर परिणाम होऊन अतिवृष्टी आणि महापूर येतात ह्या सारख्या अनेक गोष्टी मानव निर्मित आहेत. त्यामध्ये ईश्वराला दोष का द्यायचा? 


नास्तिकाने कितीही डांगोरा पिटला तरी एक गोष्ट सर्वांनी समजून घ्यायला हवी की तुम्ही हे जे लिहीत आहेत किंवा विचार पुढे मांडत आहात ते देवाने तुम्हांला जिवंत ठेवले आहे म्हणूनच. तुमचा प्रत्येक श्वास ईश्वर नियंत्रित आहे. जेथपर्यंत तो तुमच्यावर राजी आहे तो पर्यंत तुम्ही खूष. जेव्हा त्याचा तुमच्याबाबतीत मूड बिघडेल तेव्हा जगातील उत्तमातील उत्तम डॉक्टर सुद्धा तुमचे प्राण वाचवू शकणार नाही.


आपल्या शरीराची रचना एव्हडी गुंतागुंतीची आहे की दररोज नवनवीन शोध लावले जात आहेत तरी अजूनही माणसाच्या शरीराचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. यातील एखादा घटक जरी असंतुलित झाला तरी माणसाला पीडा निर्माण होते. हे सर्व घटक सुरळीत चालतात म्हणून आपण जिवंत आहोत. 


एका डॉक्टरकडे पाटी बघितली "We treat, he cures". जों खरोखर ज्ञानी आहे तो हे समजू शकेल.


हीच गोष्ट नैसर्गिक आपत्ती बद्दल आहे. त्या ठिकाणी तुम्ही असणे किंवा नसणे किंवा तुमचे संकट काही प्रमाणात कमी असणे हे सुद्धा ईश्वरी ईच्छाच म्हणायला हवी.


आता कोणी म्हणेल की संकटात सोडवायचेच होते तर तो आपल्यावर संकट का आणतो?


जर संकटे आली नाहीत तर आपल्या अस्तित्वाचा आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा कस लागत नाही. चांगले आणि आनंदी जगणे आपण आपला हक्क मानतो. जे आपण करतो तेच योग्य असे मानव मानतो. पण तसें नसते. अशा वेळी ईश्वर वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करीत असतो. ते ज्यावेळी समजून घेतले जातं नाही त्या वेळी आपले अस्तित्व दाखवायची वेळ ईश्वराला येत असते. 


ईश्वर एक माना किंवा अनेक माना पण ईश्वर ही संकल्पना मानवाने आपल्या कल्याणासाठीच केली आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. त्याच्यावर शिंतोडे कशाला उडवायचे. तुम्ही नास्तिक असणे हा तुमचा चॉईस आहे पण दुसऱ्याचे मन दुखवायचा तुम्हांला कोणी अधिकार दिला?


माधव भोळे

Thursday, October 2, 2025

भारत विरोधी शक्ती!!

भारत विरोधी शक्ती!!


भारताला खिळखिळे करण्याचे काम देश विघातक शक्ती, अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू सातत्याने करत असतात.


देशाच्या प्रत्येक भागात धर्म विरुद्ध धर्म, जाती विरुद्ध जाती, सनातनी विरुद्ध पुरोगामी, राज्य विरुद्ध राज्ये संघर्ष सुरूच आहे. रस्ता रोको, आंदोलने, बंद याच्या नावाखाली दंगा फसाद आणि तोडफोड सुरूच आहे. 


उत्तर प्रदेश मध्ये सुरू झालेली I Love Mohammed ही अशीच एक चळवळ. तिचे पडसाद देशभर उमटायला लागले. आज अहिल्यानगर मध्ये कोणी समाजविघातक शक्तींनी रस्त्यावर "I love Mohammed " लिहून जाणून बुजून वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिवर्तन दगडफेक आणि लाठी चार्ज होण्यात झाले. 


आरक्षणाच्या निमित्ताने मोर्चा काढणे, शक्ती प्रदर्शन करणे आणि स्थानिक व्यवहार आणि प्रशासन ठप्प करणे हा तर जन्म सिद्ध हक्कच झाला आहे. बरे एकाची मागणी मान्य झाली कीं लगेच चेन रिऍक्शन प्रमाणे दुसऱ्याची सुरवात झालेली असते. कोणतेही सरकार किती पूर्ण पडणार? 


शेतकरी जेव्हा उत्पादन जास्त होते तेव्हा शेतमालाला वाढीव भाव मिळावा म्हणून रस्त्यावर दूध ओतून आणि भाजीपाला फेकून त्या अन्नाचा अपमान करतात, हे चुकीचच आहे.


कधी कबुतरांसाठी कोणी जैन मुनी शस्त्र हातात घेण्याचे म्हणतो तर कोणी महाराज हिंदूंचा टक्का वाढण्यासाठी १० मुले जन्माला घालावी असे म्हणतो. सर्व बाजूनी टाळ्या वाजवायला लोक तयार आहेत. न सिद्ध झालेल्या वोटचोरी च्या नावाखाली तरुणांची माथी भडकवली जातात. सारासार विचार आणि विधिनिषेध काहीच राहिलेला नाही. 


माझी ही कृती देशप्रेमी आहे कीं देश विघातक आहे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. लाखो करोडो हात कामाचे तास वाया घालवत आहेत. काही तरी उदर निर्वाहाचे काम सोडून आंदोलने, मोर्चे, दंगे फसाद हेच काम राहिले आहे कारण मोफत तांदूळ, रेशन, औषधोपचार, विमा देऊन सरकार लोकांना आळशी बनवत आहे. 


आणि तुम्हांला माहितीच आहे कीं Empty mind is the devil. 


कोण हे नेते जे हे सर्व करायला लावतात?. कोण करतय हे काम? काही मुठीभर लोक वेगवेगळे निमित्त काढून लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. राजकारणी लोक आपल्या फायद्यासाठी अशा लढाया सुरूच ठेवत असतात. लोकशाहीचा अतिरेक सुरू आहे आणि शासन याचे नियंत्रण करण्यात कमी पडत आहे. 


सरकारने आणि प्रशासनाने या पाठी असलेल्या विघातक शक्तीना वज्र मूष्टीने चिरडून टाकायला हवे मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो, कारण त्यांचा मूळ उद्धेश धार्मिक किंवा सामाजिक नसून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा आहे.


एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो पण घरातील शत्रू नाही परवडत.


माधव भोळे 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विरोधक 


आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाली. एक रोप लावले आणि त्याचा वटवृक्षच नाही तर एक वनराजी तयार झाली. आता वनराजी म्हटल्यावर काही लोक त्याकडे मनःशांती म्हणून बघतात तर काही लोक आत हिस्त्र प्राणी असतील असा ग्रह करुन घेऊन त्यांची चड्डी आधीच ओली होते.


कोणताही विचार आपण जगापुढे मांडा, त्याच्या बाजूने आणि विरुद्ध लोक असणारच. पण जों विचार १०० वर्ष तग धरून आहे तो स्वीकारार्ह आहे म्हणूनच तग धरून आहे हे साधे गणित आहे. 


जगाच्या इतिहासात अनेक तत्ववेत्ते आणि नेते होऊन गेले. मार्क्स, हिटलर, गांधी, सावरकर या सारखे अनेक प्रभावी नेते होऊन गेले पण त्यांचे विचार त्यांच्या बरोबर संपले. पण श्रीराम, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण, महावीर, गौतम बुद्ध, गुरु नानक यांचे विचार आजही तग धरून आहेत कारण ते कोणा एका व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा एखाद्या समाजाच्या फायद्या साठी तयार झाले नसून मानव जातीच्या भल्यासाठी तयार झाले. 


संघांचे सुद्धा असेच आहे. संघांचे विचार हे राष्ट्र सेवेसाठी समर्पित आहेत. अर्थात विचार म्हटले कीं चर्चा होणारच आणि सर्वच विचार लोकांना पटतील असेही नाही पण एक मोठे उदिष्ट म्हणजे आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती, देश प्रेम आणि निष्ठा. या तिन्ही बाबतीत संघ स्वयंसेवक पूर्ण पणे परीक्षेत उतरताना दिसतात. हा एक प्लस पॉईंटच बाकी सर्व तथाकथित मायनस विचार पुसून टाकतो. मीं संघीय नव्हतो आणि नाही. पण जे योग्य आहे ते लिहायला मीं कचरणार नाही.


मग विरोधक किती भुंकत आहेत ते भुंकुंदेत. 


असो, सर्व देशप्रेमी मंडळींना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दसऱ्याच्या शुभेच्छा.


माधव भोळे 

सिमोल्लंघन!!

सिमोल्लंघन!!

आज विजयादशमी, आज सिमोल्लंघन!!

पूर्वी राजे रजवाडे हा सण अतिशय उत्साहात साजरा करायचे. नवनवीन प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी ते मोठ मोठ्या मोहिमा आखायचे आणि त्याचा मुहूर्त ते आज विजयादशमीला करायचे. विजयादशमी हा साडे तीन मुहूर्तामधील एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. मैसूर सारख्या एकेकाळच्या संस्थांनामध्ये अजूनही विजयादशमीचा अतिशय देखणा सोहोळा होत असतो. 


पण इंटरनेटच्या ह्या सीमाविरहित युगात अशा सिमोल्लंघनाला काही महत्व राहिले आहे का? आणि सव्वा लाख रुपये १० ग्राम सोने असताना असे कोणते सोने आहे जे आपण खुले आम मोफत वाटू शकतो?


जरी काळ बदलला असला तरी या उत्सवांचे महत्व कधीच कमी होणार नाही. ट्रम्प सारख्या विक्षिप्त माणसाने दाखवून दिले कीं तुम्ही जगात सर्व गोष्टी आपल्या हक्काच्या आहेत असे समजून राहू शकत नाही. तुम्हांला दुर्बल राहून चालणार नाही. तुम्हाला स्वतःची ताकद निर्माण करायलाच हवी. रशिया आणि युक्रेन मधील युद्धानंतर "बळी तो कान पिळी" ही म्हण पुन्हा पुन्हा अधोरेखित केली आहे. 


आता या पुढे भारतीय बाजारपेठांमध्ये परदेशी, तकलादू, चकाचक माल दिसण्यापेक्षा मजबूत, टिकावू, पर्यावरण पूरक, कार्यक्षम आणि ऊर्जा कार्यक्षम ( energy efficient ) तसेच नावीन्यपूर्ण ( innovative ), सुंदर डिझायनिंग, आकर्षक पर्यावरण पूरक पॅकेजिंग असलेला आणि रास्त किंमत असलेला भारतीय मालच दिसायला हवा. अशा आत्मनिर्भर भारतीय उत्पादनांनी जगाच्या पाठीवर राज्य करायला हवे. 


आमची वरील सर्व उत्पादने आणि सॉफ्टवेअर उत्पादने जगाच्या पाठीवर विविध भाषांमध्ये, उपभोक्ता अनुकूल ( User friendly ), तेथील देशाच्या प्रचलित कायद्याचे पालन करणारी, तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध असायला हवी कीं जेणेकरून तेथील जनता आपल्या मौखिक प्रसिद्धीने भारतीय माल आपल्या देशात प्रचार आणि प्रसार करण्यास आणि विक्री करण्यासाठी मदत करेल. 


जर भारतीय शेतकरी, उत्कृष्ट दर्जाचा, सकस, सेंद्रिय शेतमाल, मोठ्या प्रमाणात तयार करू शकले आणि कोल्ड स्टोरेज चेन किंवा अन्य प्रकारे ताजे राहतील असे जर इतर देशात पोहोचवू शकले तर मग जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे आणि उत्पादने कचऱ्याच्या भावाने सुद्धा कोणी विकत घेणार नाही.


आपल्याला आता नवीन पद्धतीने सिमोल्लंघन करायला हवे. आपण तर परदेशात पोहोचुच पण आपली उत्पादने आणि सेवा सुद्धा तेथे पोहोचल्या पाहिजेत. तेथे ट्रम्प सारखा किंवा पुतीन सारखा आसुरी विजय न मिळवता त्यांच्या मनावर प्रथम विजय मिळवायला हवा. 


१९८४ साली प्रथमच अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जाताना हीच भावना माझ्या हृदयात होती. त्यावेळी H1B मिळणे कठीण होते म्हणून आम्ही B1/B2 विसा वर आमच्या कंपनी तर्फे गेलो होतो. ज्या वेळी आम्ही असखलित इंग्रजी मध्ये बोलू लागलो त्यावेळी तेथील स्टाफला आश्चर्य वाटले. ते म्हणाले तुमचे इंग्रजी तर उत्तम आहे. आम्ही समजत होतो भारत म्हणजे एक गारुड्यांचा आणि जंगलांचा प्रदेश आहे. अर्थात तेथे उत्तम रीतीने सॉफ्टवेअरमध्ये काम करून आम्ही आणि आमच्यावेळच्या सॉफ्टवेअर इंजिनियरांनीं भारताच्या IT इंडस्ट्रिचा पाया मजबूत केला आणि त्याची पुढे प्रगती दिसतेच आहे. त्यावेळी भारतात हातांच्या बोटावर मोजण्या इतक्या सॉफ्टवेअर कंपन्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर पाठवत असत. अगदी इन्फोसिस जरी १९८१ साली स्थापन झाली तरी त्यांना अमेरिकेत पहिला इंजिनियर पाठवायला १९८३ साल उजाडल होते. त्यानी १९८३ साली डॉन लिलीच्या डेटा बेसिक कोरपोर्शन अमेरिकेत पहिल्यांदा सॉफ्टवेअर इंजिनियर पाठवला. 


आपल्या सिमोल्लंघन करायचे असेल तर प्रथम आपल्यातील रावण दहन करायलाच हवेत. बाहेरील शत्रू आपण मारूच पण आपल्यातील अंतर्गत शत्रू आपण प्रथम मारायला हवेत. आपल्यातील सारासार विचार करण्याची कमतरता, जोखीम न पतकरणे, कोणत्याही विषयाचा पुरेसा अभ्यास न करता त्यात उतरणे, आर्थिक अव्यवस्थापन, मानवी मूल्ये आणि मानस शास्त्राचा अभ्यास नसणे किंवा असल्यास त्याचा गैरवापर करणे इत्यादी रिपुंचे दहन आपल्याला करायला हवे. हे आपण आजपासूनच सुरवात करून सिमोल्लंघन करूया. 


हे सर्व करण्यासाठी आणि भारत एक मजबूत, सर्व दृष्टीने सक्षम राष्ट्र बनण्यासाठी सर्वांनां विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.


माधव भोळे 


Friday, September 26, 2025

आधुनिक महंमद तुघलक

आधुनिक महंमद तुघलक

गेल्या २ दिवसात ट्रम्प तात्याने दिनांक २२.०९.२०२५ पासून  H1B विसा ( रोजगार विसा ) वर वार्षिक १ लाख डॉलर्सची फी लावली आणि संपूर्ण सोशल मीडिया त्याच्या ह्या अध्यक्षीय अध्यादेशा भोवती नाचू लागली. ट्रम्प च्या आदेशामुळे अमेरिकन कंपन्या भारतात आपली गुंतवणूक वाढवतील आणि भारतीय आय टी इंडस्ट्रीला पुन्हा पालवी फुटेल इथं पासून ते अमेरिकेतील ३ लाख भारतीय लोकांना पुढील ३ वर्षात आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील, वगैरे वगैरे विषयावर घोळून घोळून लिहिले गेले.  ट्रम्प चे म्हणणे आहे कीं ज्या नोकऱ्या H1B वाले घेतात त्या योग्य ते प्रशिक्षण देऊन अमेरिकन लोकांना मिळाव्यात, त्या साठी त्यांनी खेळलेली ही चाल आहे. त्याने आकडेवारीनिशी दाखवून दिले कीं H1B मुळे किती अमेरीकन लोकांच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत आणि म्हणून ही पाऊले उचललि गेली आहेत.
काही प्रमाणात हे सत्य असले तरी हेच सत्य आहे असे नाही.

पण त्यांचे परिणाम सखोल आहेत.
१. दरवर्षी ३,३०,००० विध्यार्थी अमेरिकेत शिकायला जातात. त्यातील ९०% लोक ह्या आशेवर जातात कीं त्यांना अमेरिकेमध्ये नोकरी मिळेल आणि मग तेथे ग्रीन कार्ड इत्यादी मिळेल. जर H1B मिळण्याच्या शक्यता अतिशय धुसर असेल तर कोणता विद्यार्थी ५० ते ७० लाख खर्च करून अमेरिकेत शिकायला जाईल? अमेरिकेतील अनेक विद्यापीठे परदेशींय विद्यार्थ्यांच्या फी वर जगतात. त्याच बरोबर विद्यापीठाच्या त्या गावातील व्यवहार सुद्धा त्याच विद्यार्थ्यांवर अवलंबुन असतात ही सुद्धा एक बाजू आहे.

२. अमेरिकन कंपन्यांना योग्य ती प्रशिक्षित मानव संसाधने योग्य खर्चात मिळाली नाहीत तर ते आपली उत्पादने बाहेर हलवतील. विशेषतः ज्या बाबतीत तसें शक्य असेल तर ते तसें करतील. आणि तसें होऊ शकत नसेल तर त्या कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल आणि नफा कमी होऊन अमेरिकन सरकारला कमी टॅक्स मिळेल.

३. अमेरिकन लोकांना प्रशिक्षित करायला हवे हे म्हणणे जरी तात्विक दृष्ट्या बरोबर असले तरी बेडूक फुगला म्हणून बैल होत नाही. जों बुद्धिमान नसेल त्याला तसें ट्रेनिंग देणे सोपे होणार नाही. त्यामुळे अमेरिकन कंपन्याच्या प्रगतीवर निश्चित परिणाम होऊन ते जगाच्या स्पर्धेत पाठी पडतील आणि ते अमेरिकेला परवडणार नाही.
४. अमेरिकेत एकंदर 16,33,94,000 एव्हडे लोक नोकरीं करतात.  त्या पैकी सुमारे ६ लाख लोक H1B व्हीसा वर काम करतात. म्हणजेच एकंदर नोकऱ्यांच्या फक्त  ०.३७ % एव्हडेच लोक H1B वर काम करतात. ही  संख्या अतिशय नगण्य आहे परंतु ह्या H1B वाल्या मंडळीची प्रगती इतर अमेरिकन लोकांच्या डोळ्यात भरते. तरी बरे त्याच कामाला अमेरिकन ३ पट पैसे घेतात.
५. सन २००० पूर्वी H1B कोटा फक्त ६५,००० होता तो काही काळा करीता १,१५,००० केला होता. सध्या कोटा ६५,००० + २०,००० ( अमेरिकेत मास्टर्स  शिक्षण घेतलेले ) म्हणजे एकूण ८५,००० असा आहे. म्हणजेच भारतातील ३,३०,००० लोक अमेरिकेत शिकायला जातात त्यातील फक्त २०,००० लोकांना H1B visa मिळण्याची शक्यता होती ( ह्या कोटा मध्ये सर्व देशातील नागरिक येतात. फक्त भारतीयच नाही. ). ट्रम्प सरकारने सरसकट सर्वांनां १,००,००० अमेरिकन डॉलर्स ची वार्षिक फी लावली आहे.

याच्यासारखा तुघलकी निर्णय हाच करू शकतो. या मुळे अमेरिकन हाय टेक कंपन्या, संशोधने या सर्वांना उच्च शिक्षित मॅन पॉवर दुरापास्त होणार आहे. या मुळे अमेरिकेचेच नुकसान होणार आहे.

६. रशियाला नामोहरम करण्यासाठी आणि त्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी भारतीय उत्पादनांवर टारीफ वाढवणे, भारतीय पेट्रोलियम प्रोडक्ट्स वर बंदी घालणे, तसें करण्यासाठी युरोपियन देशांना आपल्या गुटात ओढणे इत्यादी करत असताना ट्रम्प आत्मघातकी निर्णय घेत आहे जे कोणाच्याच फायद्याचे नाही.

ट्रम्प चे सद्याचे निर्णय म्हणजे नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा होऊन दे या सूत्रावर आधारित आहे.

लवकरच ट्रम्पच्या या आणि अशा विवादीत कृती त्याची लोकप्रियता सब झिरो ( शून्य पेक्षा ही कमी ) करतील आणि ट्रम्प एयर फोर्स वन विमानातुन हवेतून जमिनीवर विचार करेल याची मला खात्री आहे.

तो पर्यंत "If you cannot avoid it then Enjoy".

माधव भोळे

नवीन SEZ कन्सेप्ट

 नवीन SEZ कन्सेप्ट


जर अमेरिकन कंपन्याना H1B विसा वर माणसे अमेरिकेत नेणे परवडणार नसेल तर महाराष्ट्राने पुणे किंवा नवी मुंबई येथे एक नवीन SEZ ( सॉफ्टवेअर एक्स्पोर्ट झोन ) सिटी काढावी जेथे फक्त परदेशींय कंपन्या भारतीय तंत्रज्ञ घेऊन आपली कामे करतील आणि त्यांना नो इन्कम टॅक्स, नो GST फॉर 10 years. 

जर १० वर्षात कामगार संख्या दुप्पट केली तर आणखी 5 वर्ष वाढवून मिळेल. 


हे शहर एक इंटींग्रेटेड स्मार्ट सिटी हवी जेथे ऑफिस आणि घर यामध्ये अंतर फक्त १५ मिनिटाचे असावे. म्हणजेच त्या शहरात राहणाच्या जागा, ऑफिसेस, डेटा सेंटर्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सस , बगीचे, लायब्ररी, शॉपिंग मॉल्स, जिम, थियटर इत्यादी सर्व असायला हवे. कमीत कमी ३,००,००० लोक वस्ती सहज माऊ शकेल असे हवे.


जर सरकारने मनात आणले तर ते शक्य आहे. जर गुजरात सरकार GIFT city बांधू शकते तर महाराष्ट्र का नाही करू शकत?


माधव भोळे 

Thursday, September 18, 2025

इंजिनियर्स डे आणि कवित्व

इंजिनियर्स डे आणि कवित्व 


कालच्या इंजिनियर्स डे निमित्ताने  bhogle s suchitchandra यांनी स्वतः इंजिनियर आहे म्हणून लेख लिहितो आहे असे म्हणून रस्ता बनवणाऱ्या इंजिनियरांवर एक विडंबनपर लेख लिहिला तो वाचायला मिळाला. त्यात त्यांनी इंजिनियर लोक डॉक्टरांपेक्षा किती महत्वाचे असून रोजगार निर्मितीमध्ये त्यांचा किती मोठा वाटा आहे असे म्हणत खराब रस्त्यामुळे गाड्यांची स्पेयर पार्टची चालणारी दुकानें, पंक्चर वाले, ओरथ्रोपेडिक सर्जन, आयुर्वेद आणि पंचकर्म यांचे चालणारे दवाखाने, विमा कंपन्या इत्यादी रोजगार निर्मिती होते असे लिहून म्हणत "कुऱ्हाडीचा दांडा गोतांस काळ" म्हणतात तसें सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात आपल्याच कुळाचा  उद्धार केला.


पण इंग्रजी मध्ये एक म्हण आहे "beauty is in the beholder's eyes" किंवा "दृष्टी तशी श्रुष्टि". 


त्या लेखक महाशयाना,  रेल्वे गाडीचा आवाज अचानक बदलला म्हणजे रेल्वे लाईनला तडा गेला आहे असे ठामपणे सांगून शेकडो प्रवाश्यांचे जीव वाचवणारा, ज्यांनी मैसूर जवळील कृष्णराजा सागर धरण बांधताना  भारतात प्रथमच स्वयंचलित पूर नियंत्रक दरवाजे निर्माण करून बसवले आणि ज्यांच्या नावाने आपण इंजिनियर्स डे साजरा करतो ते भारतरत्न  सर विशवेश्वरैया आठवले नाहीत!


त्यांना, वाफेचे इंजिन तयार करणारा जेम्स वॉट आठवला नाही, कीं इलेक्ट्रिकचा शोध लावणारा आणि त्याचा उपयोग करत संपूर्ण मानव जातीवर उपकार करणारा थॉमस अलवा एडिसन आठवला नाही. अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून मानव जातीवर उपकार करण्यासाठी डॉक्टरांना लागणारी अत्याधुनिक यंत्रे तयार करणारे बायोमेडिकल इंजिनियर आठवले नाहीत?


त्याना काश्मीर सारख्या अतिशय थंड प्रदेशात थंडी पावसात भर जंगलात उभे राहून चेनाब नदीवरचा पूल बांधणारे आणि त्या पुलाचे अतिशय कल्पक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान तयार करून वापरणारे इंजिनियर आठवले नाहीत?


त्याना अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विलीयम्स आणि बक विलमोर यांना सुखरूपपणे पृथ्वीवर परत अणणारे स्पेसएक्स क्रू ड्रगन स्पेसक्राफ्ट तयार करणारे इंजिनियर आठवले नाहीत?


अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यामुळे इंजिनियर्सनी मानव जातीसाठी चांगले काम केले आहे.


पण लेखकाला फक्त रस्ते बांधणी इंजिनियर आठवला ज्याचे यश, अपयश भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात तरी राजकारणी, नोकरशहा, स्थानिक गुंड इत्यादी बाह्य घटकांवर अवलंबुन आहे. तो बिचारा ह्या सर्व व्यवस्थेचा घटक आणि बळी आहे ज्याला नागरिक म्हणून आपण तितकेच जबाबदार आहोत, पण बळी मात्र त्याचा?


बिचारा वर्षभर शिव्या खातच असेल पण त्याच्या हक्काच्या दिवशी तरी त्याला मोकळा श्वास आनंदाने घेऊ ध्या.


असो आपण सर्व माझ्या बरोबर हॅपी इंजिनयर्स डे म्हणू या आणि त्यांच्या विद्वात्तेला आणि महत कार्याला प्रणाम करूया.


माधव भोळे 

Monday, September 8, 2025

पर्यावरण पूरक गणपती

 पर्यावरण पूरक गणपती


आज गिरगांव आणि जुहू चौपाटी येथील गणेश विसर्जनाचे काही फोटो बघितले. समुद्राचे कसे आहे, तो तारंगणारी कोणतीही वस्तू पोटात ठेवत नाही उलट किनाऱ्याकडे परत फेकतो. काल विसर्जन झालेल्या PoP ( Plaster of Paris ) च्या मूर्ती न विरघळ्यामुळे त्यांचे वेगवेगळे अवयव तुटलेल्या, रंग उतरलेल्या मूर्ती किनाऱ्यावर भग्न अवस्थेत बघायला मिळाल्या. 


ज्या मूर्ती आपण सन्मानाने घरी आणतो, देव म्हणून त्याची पूजा करतो त्याची अशी वाईट अवस्था बघितल्यावर कसे वाटेल? आपले कोठेतरी चुकतंय का? 


मूळ शास्त्रात पार्थिव गणेशाची पूजा असे सांगितले आहे. म्हणजे माती पासून तयार करून मतिमध्ये परत मिसळेल अशी मूर्ती पुजायला हवी. पण देखावे, भव्यता, उत्सव आणि उत्साह, स्टाईल या सारख्या बाह्य आकर्षणा साठी आपण PoP च्या मूर्ती विकत घेतो. पण त्याचे काय परीणाम असतात ते अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी चौपाटी किंवा अन्य तलावाजवळ जाऊन बघावे म्हणजे कळेल कीं त्या मूर्तिची काय आणि कशी विल्हेवाट लावली जाते.


त्याच बरोबर आरास करताना शक्यतो थर्माकोल वापरण्या ऐवजी कागद किंवा पुठ्ठा वापरावा कीं ज्याचा पुनर्वापर ( Recycling ). होऊ शकतो.


या बाबतीत काही मंडळींनी झाड्यांच्या बिया असलेल्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या ज्या विसर्जनानंतर ती माती परत कुंडी मध्ये किंवा अंगणात मिसळली जाते आणि त्या पासून नवीन झाडें निर्माण होतात.


आपण खरोखरचं गणेश भक्त असाल तर या वर नक्की विचार कराल...!!


माधव भोळे



Saturday, September 6, 2025

फडणवीस सरकारचा कामगार विरोधी निर्णय!

फडणवीस सरकारचा कामगार विरोधी निर्णय!


काल फडणवीस सरकारने एक अंत्यत दुर्दैवी असा कामगार विरोधी निर्णय घेऊन खाजगी आस्थापनातील दुकानें आणि फॅक्टरी मधील कामगारांच्या कामाचे तास वाढवले. 


दुकानामध्ये ९ तासाच्या ऐवजी १० तास आणि फॅक्टरी मध्ये दररोज ९ तासाच्या ऐवजी १२ तास पर्यंत काम करण्यासाठी आणि मासिक ओव्हर टाईम लिमिट १२५ तासाऐवजी १४४ तास असा बदल फॅक्टरी ऍक्ट मध्ये केला आहे. त्यामुळे त्यांचे कामाचे तास आठवड्याला १०x ६ = ६० किंवा १२ x ६ = ७२ होणार आहे.


संपूर्ण जगातील कामगारांचे कामाचे सरासरी तास वानौटू मध्ये आठवड्याला २५ तास प्रति आठवडा तर भूतान सारख्या फक्त ८ लाख लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ५४ तास प्रति आठवडा असून जगातील सरासरी कामाचे तास आठवड्याला ३५ ते ४५ असताना महाराष्ट्राने इतर राज्यातील कामगार विषयक नियमातील सुधारणाचा आधार घेत हे वरील कामाचे तास वाढवले आहेत.


भारताला प्रगतीशील बनवण्यासाठी कामगारांची पिळवणूक आवश्यक आहे का? भारतासारख्या लोकसंख्या बहुल्य देशात काम मागणारे हजारो हात काम मागत असताना त्यांना संधी द्यायची सोडून कामगारांचे कामाचे तास वाढवणे किंवा त्यांचे निवृतीचे वय वाढवणे हे अतिशय चुकीचे धोरण आहे.


जगातील अनेक तज्ञाच्या मते माणसाच्या आजारपणासाठी कामाचा ताण हा एक मोठा घटक असताना लोकांचे आयुष्यमान सुधारण्यासाठी सर्व जग "वर्क लाईफ बॅलन्स" बद्दल बोंब मारत असताना अशा प्रकारची कामाच्या तासाची वाढ करणे म्हणजे गुलामगिरीतुन सुटून परत गुलामगिरीत जाण्यासारखे आहे. देशात आणि महाराष्ट्रात इंटींग्रेटेड वसाहती ( जेथे कामाची कार्यालये आणि राहण्याची ठिकाणे एकत्र असणे ) नसल्यामुळे कामगारांना कामावर पोहोचण्यासाठी १ ते २ तास लागत असताना अशा प्रकारची वाढ करणे म्हणजे भांडवलदरांकडून होत असलेल्या कामगार शॊषण आणि पिळवणुकीला खत पाणी घालण्यासारखे आहे. 


विशेषत: हॉस्पिटल मधील नर्सेस ज्या ८ तासाची ड्युटी करतात किंवा जेथे कंटिन्यूस प्रोडक्शन असते, किंवा डायमंड कटिंग किंवा अन्य काही क्षेत्रे जेथे आणि तेल घालून काम करावे लागते तेथे हे नियम लागू केले तर ती मंडळी ५० व्या वर्षीचं निकामी होतील हे लक्षात घ्यायला हवे तसेच त्यांच्या कामाचा दर्जा सुद्धा घसरेल.


आपल्याला स्मार्ट काम करणारे कामगार हवेत कीं ओझी वाहणारे गाढवं ( हा सुद्धा गाढवाचा अपमानच आहे पण त्याला लोक तसेच वागवतात म्हणून लिहितो ) हवे आहेत? भांडवलदार आणि व्यापाऱ्यांची बाजू घेऊन केलेले हे काम निश्चितच निषेधार्थ आहे. आपल्या सारख्या सुज्ञ मुख्यमंत्र्याने या वर फेरविचार करावा म्हणून हे विनंती पत्र.


माधव भोळे

Friday, September 5, 2025

ब्रेकिंग न्यूज??

ब्रेकिंग न्यूज??

सद्या समाज माध्यमातून किंवा टीव्ही चॅनल मधून "अमेरिकेला भारताचा सर्वात मोठा धक्का", "ट्रम्पची बोलती बंद" , इत्यादी इत्यादी मथळे असलेल्या बातम्या सतत येत असतात.  अमेरिकेची ताकद काय आहे हे न कळल्यामुळे असे बालिश चाळे माध्यमे करीत असतात.
मीं देशाभिमानी परंतु डोळस भारतीय आहे.
जरा एका आकडेवारी कडे नजर टाकूया:
१) भारताचा जिडीपी ४.१९ ट्रिलीयन डॉलर्स आहे तर अमेरिकेचा ३०.५०७ ट्रिलीयन डॉलर्स म्हणजे ७.२८ पट जास्त.
२) भारताचे दर डोई उत्पन्न २९३७ डॉलर्स तर अमेरिकेचे ८९,१०५ डॉलर्स म्हणजे २९.५ पट जास्त
३) भारताचा ऐयर फोर्स २,४३० विमाने (१,३९,५७६  ऍक्टिव्ह ड्युटी फोर्स) तर अमेरिकेचा एयर फोर्स ५,२१७ फायटर विमाने (३,३०,१५९  ऍक्टिव्ह ड्युटी फोर्स )
४) भारता कडे एकंदर  १७ पारंपरिक सबमरीन आणि २ न्यूक्लीयर पॉवरड सबमरीन तर  अमेरिका ७१ न्यूक्लीयर पॉवरड सबमारिन्स आहेत.
५) भारताकडे १३५ नेव्हल शिप्स आहेत तर अमेरिकेकडे ४७० नेव्हल शिप्स आहेत.
६) भारताकडे एकंदर ५१ लाख मिलिटरी माणसे आहेत तर अमेरिकेकडे २८.६ लाख मिलिटरी माणसे आहेत. या बाबतीत भारत मोठा आहे.
७) भारताकडे १८० न्यूक्लीयर वॉर हेड्स आहेत तर अमेरिकेकडे ५५८० न्यूक्लीयर वॉर हेड्स आहेत.
८) अमेरिकेचे क्षेत्रफळ ९८ लाख वर्ग फूट तर भारताचे क्षेत्रफळ ३२.८७ लाख वर्ग फूट आहे म्हणजे अमेरिका क्षेत्रफळाने भारताच्या ३ पट  मोठा आहे.
९) अमेरिकेची लोकसंख्या ३४.७३ कोटी तर भारताची १४६.३९ कोटी आहे.
१०) अमेरिका जगामध्ये ३.२ ट्रिलीयन डॉलर्सचा एक्स्पोर्ट करते तर भारत जगात ८२४.९ बिलीयन डॉलर्स चा एक्स्पोर्ट करतो.
११) तंत्रज्ञान, आर्थिक ताकद, औद्योगिक गुंतवणूक, संशोधन, इन्फ्रा स्ट्रक्चर, शैक्षणिक प्रगती आणि विद्यापीठे इत्यादी विषयात अमेरिका भारताच्या कितीतरी पुढे आहे.

१२) गेल्या काही वर्षात भारताची कामगिरी जरी चांगली असली तरी कर्ज माफी, भ्रष्टाचार, काळा पैसा, अनियंत्रित सरकारी खर्च,  लोकशाहीचा अतिरेक या सारख्या गोष्टीमुळे अमेरिकेला मागे टाकण्यास भारताला या शतकात तरी शक्य होईल असे दिसत नाही.

मग एव्हडे असताना कोणत्या आधारवर ही मंडळी "भारताचा अमेरिकेला मोठा धक्का"  असा मथळा देऊन ब्रेकिंग न्यूज चालवतात? उगाच काहीतरी बरळत राहायचे.
त्या तात्या ट्रम्पचा एक ढिल्ला आहे पण बाकी सगळ्यांनी तरी जपून लिहायला हवे.
असो गणराया तात्या ट्रम्प ला आणी ह्या चाटू समाज माध्यमाना चांगली बुद्धी दे आणि जगावरील आलेली संकटे दूर होवोत हीच प्रार्थना.!

माधव भोळे

Thursday, September 4, 2025

परीक्षेतील यश अपयश!!

 परीक्षेतील यश अपयश!!


गेल्या ५ दिवसात मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. जरांगे आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी अडून बसले होते आणि फडणवीस सरकारचे प्रतिनिधीत्व करीत मंत्रीमंडळाला विश्वासात घेऊन सरकारची बाजू मांडत होते. मुद्धा शेवटी कोर्टात गेला. दोन्ही बाजूला फटकारले गेले. दोन्ही बाजूला काही चुका झाल्या. समाजाकडून, प्रसार माध्यमांकडून, विरोधी पक्षांकडून आणि अस्तनीतील निखऱ्यांकडून दोन्हू बाजुनंवर टीका झाली. पण सरते शेवटी दोन्ही बाजूनी समन्वय साधत एका ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 


पण टीका तर होणारच. जों समाजासाठी काम करतो त्यावर टीका होणारच. कारण कोणीही बिनचूक नसतो. काही ना काही चुका होणारच. जों काम करतो त्यांच्याच चुका होतात. जों काम करत नाही त्याच्या चुका कशा होतील? 


आहो आपण नोकरीं मध्ये असताना एखादा साधा ड्राफ्ट जरी बनवला तरी त्यात साहेब चुका काढतो. कोणता तरी शब्द बदलतो. इकडचे वाक्य तिकडे करत ड्राफ्टला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते अशा गोष्टींना जास्त मनावर घेऊ नये. काम करणाऱ्याने काम करावे. टीका काराने टिका करावी. शेवटी काम महत्वाचे. त्यासाठी तर आपण नोकरींमध्ये एकत्र आलो असतो. कोण शहाणा याला महत्व नाही.


असो,


माधव भोळे


Wednesday, September 3, 2025

एकीचे बळ

एकीचे बळ 


इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, "United we win, divided we ruin" किंवा "United we stand, divided we fall", या म्हणीचा प्रत्यय गेल्या पाच दिवसात मराठा आरक्षणाच्या बाबतीत आला. जरी १२ वि पर्यंत शिक्षण झाले असलेल्या मनोज जरांगेला लोकांनी ४ थी पास म्हणून हिणवले. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या आंदोलनाची बांधणी केली तसेच ज्या पद्धतीने त्यांनी वाटघाटी केल्या त्यावरून त्यांच्या बुद्धिमतेचा नक्कीच कस लागतो. शिक्षणाने माणूस हुशार बनतो पण बुद्धिमत्ता शिक्षणावर अवलंबुन नसते. ती जन्मजात असते, ती कोणत्या डिग्रीवर अवलंबुन नाही. तारतत्म्य कळायला कॉमन सेन्स लागतो. आपल्याकडे असलेल्या मॅनपॉवर, रिसॉर्सेस, वकील, अभ्यासक यांचा वापर करत त्याने सिद्ध केले कीं तो एक नेता आहे. स्वतःची घरची परिस्थिती बिकट असून सुद्धा आपल्यापूर्ती विचार न करता सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कुणबी मराठा मंडळींसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही असे लोकांना वाटल्यामुळे लोक आपला नोकरीं धंदा सोडून त्यांच्या पाठी उभे राहिले. अर्थात त्यांचा सुद्धा त्यात फायदाच होणार आहे म्हणूनही. 


अनेक लोकांनी टीका केली कीं आमक्या तमक्या नी रसद पुरवली वगैरे वगैरे परंतु आलेला सर्वच मराठा बांधव काही पैसे घेऊन आलेला नक्कीच दिसत नव्हता. 

त्यांच्या समाजाच्या एकीचे बळ त्यांना मिळाले आणि त्याचे फळ सुद्धा ते चाखतील;


पण ;


ज्यावेळी साखरसम्राट शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुबाडतात, सहकारी साखर कारखाने कर्जबाजारी करून स्वस्तात विकत घेतात, राजकारणी पॅनल बनवून सहकारी बँकेत निवडणुका लढतात आणि निवडून आलेले लोक सहकारी बँकेत घोटाळे करतात, छोट्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नादाला लागून शेतकरी आणि शहरवासीय डुबतात, दलालांच्या अडवणूकीमुळे आणि सावकारांच्या लुटी मुळे शेतकरी कर्जबाजारी होतात आणि आत्महत्या करतात त्यावेळी हीच एकी कुठे असते? 


प्रत्येकाने स्वार्थी असणे गैर नाही पण स्वार्थ म्हणजे नेमके काय याचा अर्थ समजला पाहिजे. ज्यावेळी तुमची शक्ती संघटित असते तेव्हा राजकारणी तुमच्यातील कच्चे दुवे शोधून काढतात आणि त्यांना हाताशी धरून तुमची एकी तोडतात. ब्रिटिशांनी हेच काम करून १५० वर्ष राज्य केले. आताचे राजकारणी तेच करीत असतात. प्रत्येक गावा गावात, तालुका ठिकाणी, जाती जातीत, धर्मा धर्मात, पक्षा पक्षामध्ये, कसब्या कसब्या मध्ये वाद लावून आपल्या पोळ्या भाजतात आणि नेते बनले कीं सर्व सहकारी संस्थांवर डल्ला मारून सामान्य जनाना लुटतात ही वस्तू स्थिती आहे. अर्थात काही अपवाद आहेत पण फारच थोडे. 


चला तर आता प्रत्येक समाजाने एकत्र होऊन आपापल्या सहकारी संस्था, साखर कारखाने, शहरातील खेळाची मैदाने, उद्योग धंदे इत्यादी भ्रष्टाचारापासून वाचवूया!


माधव भोळे 

ता.क. ही पोस्ट आरक्षणाबद्दल नसून त्यावर कोणीही कॉमेंट करू नये ही विनंती.


Tuesday, September 2, 2025

यशस्वी होण्याचा सोपा मंत्र!

यशस्वी होण्याचा सोपा मंत्र! 

ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपले अपयश लपवा!


आजकाल ब्राह्मणांना शिव्या घालणे ही फॅशन झाली आहे. भारतात कोठेही कोणालाही काहीही अपयश आले मग ते निवडणुकीत असो, शिक्षणाच्या स्पर्धेत असो, नोकरीं व्यवसायात असो की कला क्षेत्रात असो, भारतात ही फॅशन झाली आहे कीं ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपले अपयश लपवा!


पण  ज्यावेळी भारत रशिया कडुन तेल विकत घेतो आणि अमेरिकेच्या दबावाला झुकत नाही असे लक्षात आल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा व्यापार मंत्री पीटर नव्हेरो यानेही ज्यावेळी हेच उद्गार काढले कीं भारतात ब्राह्मण मंडळी इतर भारतीय लोकांच्या जीवावर नफेखोरी करतात, त्यावेळी मात्र मीं ब्राह्मण असल्यामुळे माझी छाती गर्वाने भरून आली कीं माझी ज्ञाती एव्हडी प्रसिद्ध आहे कीं ते अमेरिकेचे सिंहासन सुद्धा डळमळवू शकते. या पूर्वी अनेक ब्राह्मणांनी आपल्या तपस्चर्येने इंद्राचे सिंहासन डळमळवाल्याचे कथा पुराणात वाचले होते पण आता प्रत्यय आला.!!


विशेष म्हणजे ज्या भारताबद्धल ते बोलत आहेत त्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे अब्राह्मण आहेत तरी सुद्धा असे वाक्य म्हणणे म्हणजे पीटर नव्हेरो हे काबीले टारीफ ( तारीफ ) असेच म्हणायला हवे.


पूर्वी सर्व कथामध्ये म्हटलेले असायचे कीं "आटपाट नगर होते त्यात एक गरीब दरिद्री ब्राह्मण होता". म्हणजे ब्राह्मण दरिद्री असून सुद्धा त्याच्या विद्वत्तेमुळे त्याला मान होता. मग आता तर सरस्वती पुत्र असलेल्या ब्राह्मणांना लक्ष्मी पुत्र व्हायला विकसित भारतात अनेक संधी आहेत, तर त्यांनी आणि त्यांच्या पुढील पिढ्यानी प्रचंड मेहेनत घेऊन खूप संपत्ती जमा करावी आणि आपला कमी झालेला महिमा परत मिळवून घ्यावा आणि संपुर्ण जगावर राज्य करावे असे मीं आवाहन करतो. म्हणजे निदान आरक्षणासाठी  आझाद मैदानावर आंदोलन करायला नको 


माधव भोळे 

Sunday, August 31, 2025

विश्वासाचा पाया - २

 विश्वासाचा पाया - २

पूर्वी मीं या ग्रुप मध्ये मीं एक पोस्ट टाकली होती "विश्वासाचा पाया" त्यामध्ये सर्व प्रथम लिहिले होते
Never over commit.: जर आपल्याला एखादी गोष्ट जमणार नसेल तर आधीच सांगा.

काल  चिनार मैदान,डोंबिवली ( प ) येथील येथील आंनदी कला केंद्राचा मूर्तिकार गणपती उत्सवाच्या आधी दोन दिवस पळून गेला आहे. त्यांनी कुवतीपेक्षा जास्त मूर्ती करायला घेतल्या आणि उद्या गणेश चतुर्थी आली आणि अजून अनेक मूर्ती अपूर्ण होत्या, काही मूर्तिचे रंग अर्धवट झाले होते. त्यामुळे ग्राहकांना तोंड दाखवले तर ते मारतील ह्या भीतीने तो पळून गेला असावा. त्याचा परिणाम म्हणजे ज्या लोकांना हे समजले ते मिळतील त्या मुर्त्या घरी घेऊन गेले आणि शेकडो भक्तांना मूर्ती मिळाल्या नाहीत. सर्वकडे गोंधळ आणि बोंबाबोंब झाली आहे.

अशीच गोष्ट पुणे येथील एका उद्योजिकेला दररोज २०० किलो खवललेले खोबरे लागते म्हणून जाहिरात दिली होती. त्याप्रमाणे दुसऱ्या बाईंनी २ दिवस पुरवठा केला आणि तिसरे दिवशी पासून मोबाईल स्विच ऑफ करून बसली. त्या मुळे त्या उद्योजकेच्या व्यवहारात नक्कीच अडचण आली.

या उलट गिरगावातील देशमुखलेन मधील नाना जोशी कॅटरर यांचे वडील. जवळजवळ ५० वर्षा पूर्वीची गोष्ट. एका विवाहमध्ये त्यांनी आयस्क्रीमची ऑर्डर घेतली होती. त्यावेळी विवाहामध्ये आयस्क्रीम म्हणजे अप्रूप होते. त्यावेळी वरळी वरून आयस्क्रीमची गाडी मागवायला लागायची. दुपारी ४.३० वाजता गाडी वरळी वरून निघाली आणि वाटेत ऍक्सीडेन्ट होऊन आडवी झाली. बाबांनी दुसरी गाडी मागवली आणि ६.३० वाजता  रिसेप्शन सुरू होण्यापूर्वी आयस्क्रीम हजर केले. याला म्हणतात कमिटमेन्ट.

आपण एक लक्षात घ्यायला हवे कीं आपण जों माल कोणाला पुरवतो तो कदाचित कोणाचा कच्चा माल असतो तर कोणाचा ऑर्डरचा माल असतो. तो जर वेळेत आणि योग्य गुणवत्तेचा नसेल तर? कोण तुम्हांला  व्यवसाय देणार? मग तुम्ही कोणाचे कोण का असेना.

माधव भोळे

आत्मनिर्भर भारत २

 आत्मनिर्भर भारत २

दिवसेंदिवस अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संघर्ष वाढत चालला आहे. अमेरिकेच्या आक्रमक व्यापारी धोरणांमुळे आणि जरुरी पेक्षा जास्त दबावामुळे भारताची अमेरिकेमध्ये असलेली ७०% निर्यात कमी होणार आहे. त्यामुळे त्या निर्यातीशी संबंधित असणारा रोजगार, कच्चा मालाचे व्यापारी, उत्पादक, त्या साखळीवर आणि त्यांच्याशी संबंधित रोजगार यावर सुद्धा नक्कीच परिणाम होणार आहे. 


मोदींच्या कणखर भूमिका घेत अमेरिकेतील मांसाहारी डेयरी प्रोडक्ट्स, जेनुके बदललेली अन्न शृंखला आणि इतर व्यापारास सखत मनाई केल्यामुळे चवताळून ट्रम्प सारख्या लहरी अध्यक्षाने भारतावर खुन्नस काढून टारीफ वाढवून भारताला नामोहरम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. 


अशा परिस्थिती मध्ये एकंदर परराष्ट्र धोरण आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याचे आकलन असून सुद्धा जयमोहन, विष्णुगुप्त, देवधर सारखी काही मंडळी भारताचे काहीही वाकडे होत नाही अशा आशयाच्या पोस्ट रंगवून रंगवून सांगत आहेत. 


अमेरिकेच्या दबावाला बळी पडायचे नाही हे जरी त्रिवार सत्य असले तरी दुसऱ्या देशामध्ये आपल्या वस्तू एक्स्पोर्ट करणे तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, इम्पोर्ट सब्स्टिटयूट तयार करणे, आत्म निर्भर होणे ह्या गोष्टीला वेळ लागतो. आत्मनिर्भर ह्या गोष्टी साठी सातत्य लागते. त्यामध्ये स्मॉल आणि मिडीयम स्केल कंपन्या आडव्या होतात. आता कुठे करोना परिणामातून त्या नुकत्याच बाहेर येत आहेत.


दिवाळी आणि गणपती मधील रंगीत विद्युत रोषणाई माळा, LED बल्बस, आणि कंदीला सारखा चिनी माल जेव्हा बाजारात ठाण मांडून बसलेला आहे तेव्हा लक्षात येते कीं आपण फेसबुकवर जीव तोडून उठवलेला चिनी उत्पादनवरील बहिष्कार थंड पडला आहे. कारण आपले उद्योगपती उत्पादक कमी आणि व्यापारी जास्त आहेत. आपली क्षमता असून सुद्धा ते रिस्क घ्यायला तयार नसतात. त्यामुळे ते बाहेरून कच्चा माल आणून त्यावर प्रक्रिया करून विकण्यात त्यांना जास्त स्वारस्य असते. संघटित व्यवसाय करण्यासाठी त्यांची तयारी नसते. 

ज्या वेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी नेहरूनी एक चांगली भूमिका घेतली होती. सर्व उत्पादने आणि सेवा भांडवलदारांच्या हातात न राहता त्यातील काही महत्वाची उत्पादने आणि सेवा जसे कीं कोळसा, वीज, तेल, संरक्षण आणि रेल्वे यांना लागणारे पार्टस आणि मशीनरी, मशीन टूल्स, शिपिंग, लॉजिस्टिक्स, टेलिकॉम इत्यादी क्षेत्रामध्ये सरकारी गुंतवणूक आणि नियंत्रण ठेवण्याचा पायंडा पडला. उद्देश हाच होता कीं सरकार कोणावर अवलंबुन राहणार नाही. परंतु त्यांच्या पक्षांनी आणि सरकारी बाबुनी त्या धोरणाची पूर्ण वाट लावली. राज्यकर्ते नालायक असल्यामुळे अजूनही MIDC मधील रस्ता कोणी करायचा याबद्दल वाद घालणारे नोकरशाह असल्यामुळे MIDC सारख्या संस्था पांढरा हत्ती बनत चालल्या. एखाद्या कामाला लागणाऱ्या शेकडो परवानग्या आणि या सर्वांचा परिणाम नोकर शहानचे आणि राजकारण्यांचे खिसे भरण्यात उद्योजक पिचून जातो. 


जर खरोखर मोदीजींना आत्म निर्भर भारत घडवायचा असेल तर राजकारणी आणि नोकरशहा यांच्या भ्रस्टाचारावर कडक कारवाई झाली पाहिजे. पण पवार यांचे गुणगान गाणारे मोदीजी आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवणारे अमित शहा यांना ते कितपत साध्य होईल हे सांगणे कठीण आहे. आज गांव पातळी वर सरपंच पदाचा लिलाव होत आहे तर देश पातळीवर न्यायाधीश आणि इंजिनियर च्या घरी रात्रभर नोटा जाळल्या जात आहेत. ईडी ची कारवाई फक्त विरोधकांना गप्प करण्यासाठी केलेली दिसते पण राज्य भ्रस्टाचार पथके आपला पगार तरी त्या पकडलेल्या पैशातून सरकारकडे जमा करू शकतात का हा प्रश्न आहे?

भारताला जर पहिल्या तीन मधील अर्थ व्यवस्था बनायचे असेल तर भ्रस्टाचाराची कीड समूळ नष्ट व्हायला हवी.


माधव भोळे 


रिल्स आणि फॉलोअर्स

 रिल्स आणि फॉलोअर्स 


सध्या रिल्सचा जमाना आहे. चांगल्या सुसंस्कृत, सुशिक्षित घरातील स्त्रिया आणि मुली यांची अघोषित स्पर्धा सुरू आहे. रोज वेगवेगळी वस्त्रे, दागिने, केश रचना, मेकप इत्यादीचा वापर करून वेगवेगळ्या कोनातून फोटो, रिल्स काढून आपापले फॉलोअर्स वाढवण्याचा आणि त्यायोगे काही उत्पन्न मिळते का हे बघण्याचा आणि प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न सुरू आहे. दररोज आज मीं कशी दिसते या सारखे निरर्थक प्रश्न विचारत आहेत त्याबद्दल हा लेख आहे.


पण ज्या स्त्रिया आणि मुली अशा प्रकारे आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू इच्छितात त्यांना हे समजायला हवे कीं हे सौंदर्य चार भिंतीच्या बाहेर गेले कीं जसे गुळाला मुंगळे चिकटतात तसें मुंगळे आणि मधमाशा आपल्या जवळ घोंगावत राहणार. 


अनेक नेटकरी मग अशा काही घाणेरड्या कमेंट्स करतात कीं त्या स्त्रिया आणि त्यांचे घरांदाज पती, बंधू, माता पिता, सासू सासरे, दीर आणि नणंदा वाचू शकणार नाहीत. तुम्ही म्हणाल आता समानता आणि स्त्री स्वातंत्र्याचा जमाना आहे. नक्कीच पण त्या वातावरणाचा उपयोग आपल्या शिक्षणासाठी, आपले चांगले छंद जोपसण्यासाठी, स्वतःच्या आणि घराच्या उन्नती आणि आर्थिक प्रगती साठी करायला हवा. वेळ पडली तर किंवा अंगात धमक असेल तर कोणताही व्यवसाय किंवा नोकरीं करून घरादाराच्या किंवा समाज कार्य करून देशसेवेसाठी करायला हवा. 


रील एक किंवा फोटो हे समाज माध्यमासाठी एक कंटेन्ट आहे, जों त्यांना जाहिरातीतून पैसे मिळवून देतो. आता आपण आपल्याला किती एक्स्पोज करायचे ते आपणच ठरवायला हवे. हा जर तुम्ही काही कलाविष्कार, ज्ञान, आपल्या व्यवसाय किंवा उत्पादनाची जाहिरात किंवा अन्य काही माहिती या रिल्स द्वारे समाजाला देणार असाल किंवा ते समाजोपयोगी असेल तर जरूर टाकायला हवे. पण आपले सौंदर्य असे वेशीवर टांगून ठेवू नका असे मला वाटते. बाकी निर्णय ज्याचा त्याचा.


माधव भोळे 

Monday, August 25, 2025

अजब न्याय वर्तुळाचा!

अजब न्याय वर्तुळाचा!

आज CSDS / लोकनीतीचे डायरेक्टर श्री संजय कुमार ह्यांनी X ह्या इंटरेनेट प्लॅटफॉर्मवर आणि पेपर मध्ये वोटर लिस्ट आणि मतदानाबदल चुकीची माहिती दिली आणि त्यानंतर या बाबत माफी मागून सुद्धा त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला असे संजय कुमारच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिल्यामुळे सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश श्री BR  गवई यांनी त्या बाबतीत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांना स्टे दिला आहे. आणि असे नेहमी करीत नाही असेही म्हटले आहे. 


पण न्यायपालिकेपुढे सर्व समान असे म्हणत असताना या आधी एखादी व्यक्ती थेट सुप्रीम कोर्टात न्याय मागायला गेली तर सुप्रीम कोर्ट सांगते, आधी हाय कोर्टात किंवा खालच्या कोर्टात जां आणि तेथे तुम्हांला न्याय नाही मिळाला असे वाटले तर मग वरच्या कोर्टात या असे असताना ह्याच केसच्या बाबतीत शिरस्ता का बदलला?


म्हणजे जों व्यक्ती एका महत्वाच्या पदावर राहून इंटरनेट आणि पेपर मध्ये चुकीची माहिती देऊन देशात "वोटचोरी" च्या नावाखाली जमाव आणि आंदोलन करण्यासाठी कारणीभूत होतो तो माफी मागून नामानिराळा होऊ पाहतो त्याला लगेचा न्याय मिळतो आणि जे वर्षानुवर्षे भगवा दहशतवाद किंवा तत्सम कथित खोट्या कारणासाठी बदनाम होऊन त्यांचे आयुष्य बरबाद केले जाते त्यांना तुरुंगावास? हा कोणता न्याय?


असे संजय कुमारना कोणते विशेष अधिकार घटनेमुळे प्राप्त झाले आहेत कीं ते थेट सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाऊ शकतात? या आधी गेले काही महिने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशानीच कळवले होते कीं "No out of turn hearing", मग आताच का? याचे कारण लोकांना कळायला हवे.


माधव भोळे 

Sunday, August 24, 2025

प्रधानसेवक मोदी जीं!!

 प्रधानसेवक मोदी जीं!!


मोदींची ही तिसरी टर्म सुरू आहे. अनेक विरोधक मोदींवर नाराज आहेत पण देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी कणखर निर्णय घेताना मोदी राजकीय परिणाम काय होतील याकडे संपुर्ण दुर्लक्ष करतात हे विरोधातील विरोधी व्यक्ती सुद्धा मान्य करेल.


या आधी काश्मीरच्या विकासासाठी आणि भारताच्या सुरक्षेसाठी ३७० कलम हटवताना मोदींनी जे साहस दाखवले तेच साहस अमेरिकेच्या दबावाने भारतात शिरू पाहणाऱ्या GMO सिड्स आणि ऑरगॅनिक फूड्स रोखताना केले. भारतीयांच्या फायद्यासाठी इराण आणि रशियाकडून स्वस्त तेल विकत घेण्यासाठी त्यांनी अमेरिकेचा रोष पतकरला. रिझर्व बँकेच्या धोरणामध्ये कॉन्टीजन्सी फ़ंड ची मर्यादा ठरवून घेण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि उरलेला नफा सरकारला लाभांश म्हणून घेऊन तो भारताच्या विकासासाठी योगदान म्हणून वापरण्याची व्यवस्था केली असे अनेक देशहिताचे निर्णय त्यांनी घेतले..


तरुणाई आणि जुगारी लोकांना जुगाराच्या व्यसानाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सरकारचा २ लाख करोड रुपये जिडीपी देणारा आणि वार्षिक २५,००० करोड रुपये टॅक्स देणारी ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रि ज्यामध्ये पैसे लावले जातात त्या इंडस्ट्रिवर बंदी आणून त्याचा पैसा बँकेत किंवा अन्य मार्गाने जमा होण्यास कारणीभूत होणाऱ्या आस्थापनांना त्यांचे बरोबर व्यवहार केल्यास जबर दंड लावण्याची व्यवस्था केली. या बाबतीत एक ठराव आज लोकसभेत आणि राज्य सभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. टीकाकारांच्या मते जरी या मुळे ४०० कंपन्यामधील २ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्या तरी ४५ करोड लोकांचे २५ ते ३०,००० करोड रुपयाचे नुकसान कमी होऊन ते पैसे इतर त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी आणि संसारासाठी वापरले जातील.


असे निर्णय घ्यायला निर्णयक्षमता तर लागतेच पण लोकांबद्धलचा जिव्हाळा आणि देशप्रेम आवश्यक असते आणि ते मोदीमध्ये ठासून भरले आहे.


आज प्रधानसेवक ही उपाधी नक्कीच सार्थक होत आहे. अशा अनेक विषयांमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता, शारीरिक ताकद आणि लोक प्रतिनिधित्व त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


माधव भोळे 



Thursday, August 21, 2025

ढोल ताशा आणि टाळ मृदूंग

ढोल ताशा आणि टाळ मृदूंग 


आज San Diego ह्या अमेरिकन शहरामध्ये तेथील महाराष्ट्र मंडळाचा ढोल ताशा पथक फोटो बघितला. पुण्यामध्ये गेले काही वर्ष ढोल ताशा पथकाचे फॅड वाढत चाललेले दिसते. पुण्यातील पहिले ढोल ताशा पथक १९६० साली अप्पासाहेब पेंडसे यांनी सुरू केले. विशेषत: गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणूकमध्ये सलामी द्यायला अशी पथके वापरली जातात. हल्ली या साठी काही कोर्सेस किंवा सराव क्लासेस सुद्धा घेतले जातात. असे म्हणतात पुण्यात किमान २५० ढोल ताशा पथके आहेत. तरुणाईचा जोश त्यात नक्कीच दिसून येतो. एकमेकातील चढाओढ नक्कीच असते.


पूर्वी ढोल ताशा पथकाचा उपयोग युद्धभूमीवर सैनिकांमध्ये युद्ध ज्वर निर्माण व्हावा, लढायला ऊर्जा मिळावी म्हणून तसेच धार्मिक आणि सामाजिक समारंभा मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून केला जात असे. 


पण ढोल ताशाचा आवाज बघता त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वयस्कर मंडळींना होणारा त्रास आणि कानाचा बहिरे पणा बघता राष्ट्रीय हरित ट्रीब्युनलने यावर मर्यादित संख्या ठेवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगीती दिली. 


एक ढोल ताशा साधारण १०४ ते १०५ डेसिबल पर्यंत ध्वनी निर्माण करतो तर एकत्रित पथक ११३ डेसिबल ध्वनी निर्माण करतो. सर्व साधारण माणसाला ० ते ७० डेसिबल पर्यंत ध्वनी  अतिशय सुसहाय आणि सुरक्षितपणे ऐकता येतो. त्या नंतर त्याच्या कानाला आणि अर्थात मेंदूला सुद्धा त्रास व्हायला सुरवात होते असे मेडिकल शास्त्र सांगते. जर ध्वनी १२० डेसिबल च्या वर गेला तर कानाचा पडदा हमखास फाटतो. अशा परिस्थिती मध्ये ढोल ताशा वाजवणे समाजासाठी किती सुसाह्य आणि सुरक्षित आहे याचा सर्व जनतेने विशेषतः तरुणाईने विचार करायला. असे म्हणतात तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. अर्थात हीच गोष्ट DJ ला सुद्धा लागू आहेच. म्हणून तर महाराष्ट्रात DJ ला कायदेशीर बंदी आहे. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय हरित त्रिब्युनलच्या निर्णयावर का स्टे दिला त्याचे कारण नक्की समजतं नाही. 


आम्ही परंपरा किंवा संस्कृती पाळण्याच्या नक्कीच विरोधात नाही पण आपला आनंद लुटताना दुसऱ्याचे नुकसान होणार नाहींना याची काळजी लोकशाहित अपेक्षित असते. नाहीतर कबुतरांना दाणे घालण्यावरून एव्हडा वादंग मजला नसता.


मला वाटते आपल्या परंपरेमध्ये धार्मिक समारंभ, भजन कीर्तन याठिकाणी फिरत असताना टाळ मृदूंग जास्त चांगला वापरला जाऊ शकेल, जेणेकरून भक्तिमय वातावरण सुद्धा निर्माण होईल आणि ध्वनी प्रदूषणाचा अतिरेक होणार नाही. मृदूंग ढोल ताशा एव्हडे ध्वनी प्रदूषण नक्कीच करीत नसते.


माधव भोळे 

राणीची विहीर

राणीची विहीर 

राणी की वाव ( अर्थात ' राणीची विहीर ' ) ही भारतातील गुजरातमधील पाटण शहरात स्थित एक पायऱ्यांची विहीर आहे. ती सरस्वती नदीच्या काठावर आहे . तिचे बांधकाम ११ व्या शतकातील चौलुक्य राजा भीम पहिला याची पत्नी उदयमती हिने आपल्या पतीच्या स्मरणार्थ केले. गाळाने भरलेली विहीर १९४० च्या दशकात ते पुन्हा शोधले गेली गेली आणि १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने त्याचे पुनर्संचयित केली . २०१४ पासून ते भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे. पायऱ्यांची विहीर भूमिगत विष्णुचे मंदिर किंवा उलटे मंदिर म्हणून डिझाइन केलेली आहे; पाण्याचे पावित्र्य दर्शवते, पायऱ्यांमधील शिल्पे असंख्य हिंदू देवतांचे चित्रण करतात . ती शिल्पात्मक पॅनेलसह सात स्तरांच्या पायऱ्यांमध्ये विभागली गेली आहे. या पॅनेलमध्ये ५०० हून अधिक प्रमुख शिल्पे आणि एक हजाराहून अधिक लहान शिल्पे आहेत जी धार्मिक, धर्मनिरपेक्ष आणि प्रतीकात्मक प्रतिमा एकत्र करतात. 


मीं ही विहीर पाटण येथे आपले एक मुळे आडनावाचे गृहस्थ यांचेकडे गेलो असता पहिली आहे. 


माधव भोळे 

Monday, August 18, 2025

स्वातंत्रता दिवस, भारत आणि आत्मनिर्भरता

 स्वातंत्रता दिवस, भारत आणि आत्मनिर्भरता 


नुकतेच आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी दिल्ली मधील लाल किल्यावरून १५ ऑगस्ट २०२५ रोजी, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे खणखणीत भाषण केले. अर्थात स्वातंत्र्य दिन म्हटले म्हणजे आपल्या सर्वांची छाती अभिमानाने फुलून येते. बरोबर याच दिवशी १९४७ साली, ज्या सम्राज्यावरील सूर्य मावळत नाही असे म्हटले जायचे त्या ग्रेट ब्रिटनचा, लाल किल्यावरील युनियन जॅक असलेला झेंडा उतरवून त्या ठिकाणी सुदर्शन चक्र असलेला, भारताचा तिरंगा ध्वज मोठया अभिमानाने फडकू लागला. आपण एका जागतिक सम्राज्याच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. अर्थातच ही अतिशय आनंदाची बाब आहे.  


पण कालच्या एका घटनेने ह्या स्वातंत्र्यावर नक्कीच विचार करायची वेळ आली आहे. २०१६ साली एस्सर ऑइल ह्या भारतीय कंपनीचे काही समभाग, रोसनेफ्ट ह्या रशियन कंपनीने विकत घेतल्यानंतर त्या कंपनीचे नांव नयारा एनर्जी असे झाले. ह्या कंपनीचा भारतातील वाडीनार, गुजरात येथे प्लांट असून ते रशियन ऑइल भारतात रिफाईड करतात आणि त्याची प्रॉडक्ट भारतात आणि जगभरात एक्स्पोर्ट करतात. त्यांच्या प्लांट मध्ये मायक्रोसॉफ्ट क्लाउड कोम्पुटिंगवर वेगववेगळी कॉम्प्युटर अप्लिकेशन चालवली जातात आणि त्यात मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर वापरली जातात. 


युक्रेन आणि रशिया या मधील युद्धामुळे युरोपीयन युनियनने युद्ध समाप्तीसाठी दबाव म्हणून रशियन तेल खरेदीला बंदी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जे देश किंवा कंपन्या रशियन तेल विकत घेतील किंवा विकतील, किंवा रशियन सेवा विकत घेतील तर त्यांना इतर युरोपयन सेवा सुद्धा समाप्त कराव्या असे आदेश युरोपीयन युनियनने दिले आहेत. 


अशा परिस्थितीमध्ये दिनांक २२ जुलै २०२५ रोजी मायक्रोसॉफ्टने नयारा एनर्जीची क्लाऊड सर्व्हिस बंद केली त्यामुळे त्या नयारा एनर्जीच्या वाडीनार रिफायनरी मधील मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरवर चालणारी काही कार्यें बंद पडली. अर्थात नयारा एनर्जीने त्यावर अमेरिकेत कायदेशीर दाद मागितली आहे कारण रशियन तेलावर ना अमेरिकेने बंदी घातली आहे ना भारताने बंदी घातली आहे मग अमेरिकन कंपनी भारतातील कंपनीची सेवा कशी बंद करू शकते?. मायक्रोसॉफ्टने नंतर ती सेवा देणे चालू केले परंतु तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कीं ह्या क्लाऊड कॉम्पुटिंग मुळे कोणतीही अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी अमेरिकेत बसून जगातील कोणाचाही गळा पकडू शकते हे त्यांनी सिद्ध केले. हे नवीन प्रकारचे साम्राज्य आहे. हे आहे क्लाऊड सॉफ्टवेअर साम्राज्य आहे आणि जे देश अमेरिकेचे सॉफ्टवेअर, क्लाऊड सर्व्हर वापरतील ते ह्या अमेरिकेचे गुलाम असतील. असाच प्रयत्न अमेरिका GMO ( genetically modified organism) बियाणे आणि प्रॉडक्ट भारताने विकत घेण्यासाठी दबाव टाकत आहे जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर वर्षानुवर्षे अवलंबुन राहाल.


याचाच अर्थ भारतातील कंपन्यांना दुसऱ्या कोणत्या देशावर अवलंबुन राहायचे नसेल तर भारतील वेबसाईट भारतीय सर्व्हर वर लाँच करायला हव्यात, भारतीय क्लाऊड सर्व्हर, भारतीय डेटा सेंटर्स, भारतीय सॉफ्टवेअर तयार करणे आवश्यक आहे.


ज्या वेळी चीनने स्वतःचे गुगल सारखे सर्च इंजिन ( बायडू ), स्वतःचे ऍमेझॉन ( अलीबाबा एक्सप्रेस ), स्वतःचे फेसबुक ( we Chat ), स्वतःचे X ( sina weibo ), स्वतःचे इंस्टाग्राम ( लिटील रेड बुक ), स्वतःचे चॅट जिपिटी ( डीप सिक ), स्वतःचे क्लाऊड आणि वेब सर्व्हर बनवले त्यावेळी सर्व जगाने त्यांना वेड्यात काढले पण आज वरील घटनेवरून भारताला धडा घ्यायला हवा.


आणि त्याच कारणामुळे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी हीच गोष्ट सांगितली कीं आपल्या देशाला अनेक विषयात आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे त्या पैकी वरील सॉफ्टवेअर आणि सर्व्हर, डेटा सेंटर्स हा एक महत्वाचा भाग आहे. 


आज पर्यंत भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यानी अब्जो डॉलर रुपयांचा व्यवसाय केला परंतु हातांच्या बोटावर मोजण्या एवढ्या कंपन्यानी स्वतःचे सर्व्हर, क्लाऊड कॉम्पुटिंग इत्यादी इन्फ्राष्ट्रक्चर तयार केले आहे. बाकी सर्व कंपन्या परदेशींय इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि परदेशीय सॉफ्टवेअर कंपन्यानवर अवलंबून आहेत. बहुतेक सॉफ्टवेअर कंपन्या दुसऱ्या कंपन्यांचे कंत्राटदार म्हणून काम करतात.


अमेरिकन व्यवसायिक या बाबतीत कितीतरी पुढे आहेत. नुकतेच जानेवारी २०२५ मध्ये एआई चे अमेरिकेतील आणि जगातील सर्वात ताकदवान इन्फ्राष्ट्रकचर तयार करण्यासाठी ओपन एआई ( चॅट जिपिटी तयार करणारी कंपनी ), सॉफ्टबँक विजन फ़ंड ( वेंचर कॅपिटल फर्म) , ओरॅकल, MGX ( युएई स्थित एआई वर गुंतवणूक करणारी कंपनी ) आणि इतर पार्टनर्स ह्या कंपन्यानी एकत्र येऊन १०० बिलीयन डॉलर्स गुंतवणूक करून स्टारगेट नावाचे प्रोजेक्ट ( ए आई इन्फ्रास्त्रक्चर प्रोजेक्ट) सुरू केले आहे जे २०२९ पर्यंत पूर्ण होईल. त्यात पूर्णत्वापर्यंत सुमारे ५०० बिलीयन डॉलर्स ची गुंतवणूक त्यात होईल.


अमेरिकेत एक गोष्ट चांगली आहे, जेथे भरमसाठ गुंतवणूक लागते तेथे वेगवेगळे गुंतवणूकदार एकत्र येऊन सहकार्य करत वेगळी कंपनी स्थापन करतात आणि ते काम करतात. भारतात अशा एकत्र काम करणाऱ्या भारतीय कंपन्या किंवा कॉरपोरेटस मध्ये कमी बघायला मिळतात. कारण या साठी लागणारे आर्थिक व्यवस्थापन आणि आर्थिक इंजिनिरिंग नावीन्य ( Financial engineering innovation ), कायद्याचे राज्य, समान उदिष्ट असलेली समज ( common understanding ), व्यवसायिक व्यवस्थापन ( प्रोफेशनल मॅनेजमेंट ) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांबद्दलचा विश्वास इत्यादी गोष्टींचा अभाव आहे.


जर भारताला जगातील एक आत्मनिर्भर, पुढरलेला देश आणि एक महत्वाची अर्थ व्यवस्था बनायचे असेल तर ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे.


माधव भोळे.

देवाभाऊ अजब तुझे सरकार!

 देवाभाऊ अजब तुझे सरकार!


"लबाड जोडीती इमल्या माड्या, 

गुणवंतांना मात्र झोपड्या,

पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, 

वेश्येला मणिभार, 

उद्धवा अजब तुझे सरकार.


वाईट तितुके ईथे पोसले,

भलेपणाचे भाग्य नासले, 

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार 

उद्धवा अजब तुझे सरकार."

ह्या गीताच्या ओळी आपण लहानपणा पासूनच ऐकत आहोत. त्याचा प्रत्यय वारंवार येतो 

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील, तलाठी प्रशांत थोरात यांची ३० जुलै रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात बदली झाल्यामुळे ८ ऑगस्ट २०२५ रोजी उमरी मधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना निरोप समारंभ आयोजित केला होता. अशा वेळी साहजिकच आनंदाचे वातावरण असल्यामुळे त्यांनी खुशिमध्ये येऊन "तेरे जैसा यार कहा" हे किशोर कुमारचे गाणे गायले. त्याचा कोणीतरी व्हिडीओ केला आणि तो वायरल केला. त्यामुळे ऑफिस टाईम मध्ये गैरवर्तन केल्याच्या कारणावरून त्याला कामावरून सस्पेंड केले आहे. 


मजा अशी कीं महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक पासून अगदी महानगर पालिकेच्या आणि सरकारच्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये लाचखोरी आणि रेटकार्ड असते अशा आशायाच्या बातम्या पेपरात राजरोस छापून येतात. मध्यंतरी मुंबईतील बिल्डर मंडळींनी लाच देण्याचे प्रमाण वाढले आहे अशी बातमी दिली होती. रेणू कात्रे ह्या महिलेने आत्महत्या केल्या नंतर तिचा पती म्हाडा मधील रजिस्ट्रार, बापू कात्रे महिना २० ते २५ लाख कमवतो अशी तक्रार रेणूच्या भावाने केली होती त्याची फक्त चौकशी सुरू झाली. अशा बातम्या असूनही सरकारचे लाच लुचपत खाते कोणत्याही प्रकारची कारवाई करताना आढळत नाही. हजारो तक्रारी येतात तेव्हा कुठे एखाद्या खालच्या लेव्हल च्या व्यक्तीवर कारवाई होताना दिसते. मोदींच्या वक्तव्या नुसार ७०,००० कोटींचा भ्रस्टाचार करणारे उपमुख्यमंत्री होतात पण एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी / नोकराने काही विशेष प्रसंगी गाणे गायले म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन लगेच सस्पेंड सुद्धा केले गेले? त्याला फक्त वॉर्निंग देऊन काम झाले असते.


सरकार एवढेच जर शिस्तप्रिय असेल तर भ्रस्टाचाराचे आरोप मंत्री, त्यांचे स्वीय सचिव यांच्यावर होण्यापासून ते मिठी नदी सफाई सारख्या अनेक प्रकरणे गाजली नसती. बिचाऱ्या तुकाराम मुंडे सारखे निर्भयी IAS अधिकारी २० वर्षात २३ वेळा बदली झाले नसते.


असो, 

कली युगात आणखी काय अपेक्षित आहे?


माधव भोळे 

Friday, August 15, 2025

डॉ. राजेंद्र भारूड, एक यशोगाथा!!

 डॉ. राजेंद्र भारूड, एक यशोगाथा!!

माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातीला सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर्पयतची मजल गाठता आलीच नसती.मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं.

आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर - इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं. पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत  होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतर्‍च्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते. एम.बी.बी.एस.च्या  शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता. घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो  आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं. माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.  आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतर्‍च्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा? छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता. पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतर्‍च्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुर्‍खं कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता. वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेर्पयत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो. आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही? जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहे. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते. लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.
( जिल्हाधिकारी, नंदुरबार)( मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)

भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

 *भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती*


१) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला 

२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व 

३) महिना: श्रावण 

४) दिवस: अष्टमी 

५) नक्षत्र: रोहिणी 

६) दिवस: बुधवार 

७) वेळ: १२:०० रात्री

८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य. 

९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व

१०) जेव्हा कृष्ण  ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध)  झाले.

११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते.

१२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)

१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.


*कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.*

मथुरेत कृष्ण, कन्हय्या 

ओडिशामध्ये जगन्नाथ

महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा 

राजस्थानमध्ये श्रीनाथ

गुजरातमध्ये द्वारकाधीश

गुजरातमध्ये रणचोछोड

कर्नाटकातील उडुपी, कृष्णा

केरळमधील गुरुवायुरप्पन 


जन्म ठिकाण:- मथुरा

जन्मदाते माता पिता:- देवकी, वासुदेव

संगोपन करणारे पालक:- यशोदा, नंद

बहीण भाऊ:- सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)

गुरु, शिक्षक:-  ऋषी संदिपनी

जिवलग मित्र:- सुदामा


*धर्मपत्नी ८:-* रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)


*कृष्णाची मुले:-* एकूण ८०


*श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.*


*श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.*


*श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.*


*श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.*


*श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.*


*श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०): प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.*


*श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.*


*श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०):- संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.*


*राधा:-* राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. 


*श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु*


*आवडती फुल:-* फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)


प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.


*शंख:-* शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.


*आयुधं:-* त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.


*बासरी:-* कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .


*मोरपंख:-* रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.


*शिक्षण:-* श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.


*कार्य:-* कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.


*गीता उपदेश:-* महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.


*श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण*


कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."

"मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते." गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही." सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.

  

*अवतार समाप्ती:-* महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला

  

यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।

अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।

परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे  युगे।।।।


श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय ...